आधीच क्लिअर करतो. ती ९५ वर्षांची आहे. मी नाही पण मी लहान असल्यापासून ती माझी क्रश आहे. दक्खनची राणी. डेक्कन क्वीन. मी तिला कधी पहिल्यांदा पाहिले ते लक्षात नाही. पण ती लहानपणी अप्राप्य वाटायची. आम्ही जायचो नेहमी कर्जत व कल्याणला. दोन्हीकडे ती थांबत नसे, निदान मुंबईला जाताना. त्यामुळे आम्ही नेहमी सिंहगड, डेक्कन एक्सप्रेस व नंतर इंद्रायणी. कधी कोयना. पण मी रेल्वेलाइनच्या जवळपास जरी असलो व तिची वेळ असली की हिंदी पिक्चरमधल्या "छुपाना भी नहीं आता, जताना भी नहीं आता" वाल्या प्रेमिकासारखा तिची वाट पाहात असे. पण तेव्हाची तिची अवाढव्य इंजिने पाहिलीत तर लक्षात येईल- प्लॅटफॉर्मवर उभे असलो, की आपल्याकडे दुर्लक्ष करून समोर बघत पुढे जाणार्या एखाद्या कडक शिक्षिकेसारखी ती वाटायची (त्यावेळेस उपमांमधेही शाळेसंबंधीच गोष्टी सुचत).
तिचा लुक सुद्धा तेव्हा इतका देखणा असे!
इतर तपकिरी डब्यांच्या गाड्या व इंजिने यांच्या तुलनेत एकाच रंगातले इंजिन व डबे असलेला तिचा लुक रॉयल वाटे व तिचे वेगळेपण उठून दिसत असे. लहानपणी कल्याणाला गेलेलो असताना एक दोन वेळा संध्याकाळी आवर्जून स्टेशनला जाउन तिला सुसाट जाताना वरच्या पुलावरून पाहिल्याचे आठवते.
मग नंतर तिच्यापेक्षा वेगवान, तिच्या पेक्षा आरामदायी मार्गाने प्रवास केला. राजधानी झाली, गतिमान झाली, शताब्दी झाली. युरोपातील ट्रेन्स झाल्या. विमाने वगैरे तर वेगळेच. पण तिचे आकर्षण अजिबात कमी झाले नाही. इथे अजूनही कधी मोकळा वेळ असेल तर यूट्यूबवर एखाद्या स्टेशनमधून दणाणत जाणार्या गाड्या पाहण्याचा छंद आहे, त्यातही डेक्कन शोधतो. मध्यंतरी एकदा केवळ डेक्कनमधे बसायचे म्हणून पुण्याहून मुंबईला डे ट्रिप करून आलो. व्हिस्टाडोममधून मात्र प्रवास अजून राहिला आहे. एकदा मॉन्सूनचा जोर ओसरला की ऑगस्ट-सप्टेंबर मधे विस्टाडोममधून आजूबाजूचा निसर्ग अफलातून सुंदर दिसत असेल हे या क्लिपमधून जाणवते.
हे फॅसिनेशन कधी निर्माण झाले लक्षात नाही.
"डेक्कनमधे ट्यूबलाइट्स असतात" - माझ्या वडिलांचे मामा लहानपणी मला डेक्कन कशी ओळखायची ते सांगत असलेले मला अजूनही लक्षात आहे. शिवाजीनगरला त्यांच्या घरातूनही गाड्या दिसत. लहानपणी मी त्यांच्या खिडकीतून गाड्यांच्या खिडक्यांमधल्या लोकांना टाटा करत असे. तेव्हा फेसबुक असते तर त्या लोकांना मी People you may know मधे नक्की दिसलो असतो.. मग थोडा मोठा झाल्यावर संध्याकाळी शिवाजीनगर स्टेशनवर जाउन बसायचो. तेव्हा मुंबईकडून खूप गाड्या येत. त्यातली डेक्कन कशी ओळखायची, तर इतर गाड्यांमधे तेव्हा पिवळे दिवे असत व डेक्कन मधे ट्यूब्ज. खरे म्हणजे डेक्कनच्या डब्यांचा रंगही वेगळा असे. पण का कोणास ठाउक ही खूण त्यांनी सांगितलेली लक्षात राहिली. ही स्टेशनवर जाउन "रेलफॅनिंग" करण्याची आवड तशीच राहिली. विमानतळावर एकवेळ मला थोड्या वेळानंतर कंटाळा येईल पण एखाद्या बिझी रेल्वे स्टेशनवर मी कितीही वेळ रमतो.
सध्या सर्वच गाड्यांना WAP सिरीज मधली भारतातच बनलेली समोरून तिरपी चपट अशी इंजिने सगळीकडे आहेत. पण पूर्वी पुणे-मुंबई लाइनवर डीसी ट्रॅक्शन होते. तेव्हा WCM सिरीज मधली काही इंग्लंडमधे बनलेली, काही थोडी जपानमधे (हिताची कंपनीची) तर एक मॉडेल भारतात पहिल्यांदा बनलेले विद्युत इंजिन "लोकमान्य". त्याआधी तिचे सुरूवातीचे इंजिन वेगळे होते. मला बरेच दिवस त्याच्या क्लिप्स सापडत नव्हत्या. गेल्या काही दिवसांत त्याही सापडल्या.
वास्तविक ही ७०ज मधली WCM इंजिने पाच वेगवेगळ्या प्रकारची होती. WCM-१ ते WCM-५. यातील दोन तीन इंजिने कसारा घाटातील सुंदर निसर्गाच्या पार्श्वभूमीवर "कभी हाँ कभी ना" मधल्या या गाण्यात दिसतात. तेथे ती एकच गाडी आहे असे भासवले असले तरी ते २-३ वेगवेगळ्या गाड्यांचे शूटिंग आहे, आणि त्यातली एकही गाडी त्यातील कथेत दाखवले आहे तशी गोव्याला जात नाही हा भाग सोडा. त्याचे वर्णन या लेखांत मी केले आहेच. पण या गाण्याने या इंजिनांचे एक सुंदर शूटिंग कायमस्वरूपी केल्याने त्यातील रेल्वे ब्लूपर्स त्याला माफ आहेत.
यातले WCM-५ मॉडेलचे इंजिन हे भारतात बनवलेले पहिले इलेक्ट्रिक इंजिन. ते सुरूवातीला खास डेक्कन करताच वापरले गेले. त्याचे नावही "लोकमान्य" होते. हे आता कलकत्त्याच्या म्युझियममधे आहे. बाकी बरीच इंजिने आता कोठेच उपलब्ध नाहीत. यातली काही इंग्लंडमधे बनलेली होती (व्हल्कन फाउण्ड्री आणि इंग्लिश इलेक्ट्रिक), तर एक मॉडेल हिताची कंपनीचे होते.
गेल्या काही दिवसांत विजेच्या इंजिनांचा तुटवडा आहे की विद्युत पुरवठ्याचा, माहीत नाही. पण पुणे-मुंबई मार्गावर सर्व गाड्या काही दिवस डिझेल इंजिने चालवत होती. तेव्हा रेल्वे फॅन्समधे डेक्कन क्वीनला डिझेल इंजिन लावले आहे ही मोठी "न्यूज" होती. याचे खास कारण आहे. भारतातील बहुतांश जुन्या गाड्या सध्याच्या विद्युतीकरणापूर्वी कधीना कधी कोळशाचे इंजिन व नंतर डिझेल इंजिन लावून धावत होत्या. फक्त डेक्कन क्वीन ही एकच जुनी गाडी अशी आहे की जी पहिल्या दिवसापासून इलेक्ट्रिक इंजिनावर चालली आहे. १ जून १९३० ला ती सुरू झाली. ७ डबे घेउन ती २ तास ५५ मिनिटांत पुणे-मुंबई प्रवास करत असे. तेव्हा रेल्वेमधे तीन वर्ग होते. या गाडीला फक्त पहिला व दुसरा वर्ग होता. नंतर कधीतरी तिसरा वर्ग वाढवला. मग नंतर रेल्वेनेच तिसरा वर्ग काढून टाकला. आता या गाडीला १७ डबे असतात व याच प्रवासाला ती ३ तास १५ मिनिटे घेते.
पूर्वी या गाडीला २ बाय २ सिटींग वाला सुरेख फर्स्ट क्लास होता. त्यात एक फर्स्ट कलास पासहोल्डर्सचाही डबा असे. त्याआधीचा मूळचा फर्स्ट क्लास आणखीनच रॉयल असावा. कारण १९४७ च्या सुमारास त्यात काहीतरी बदल केला गेला होता. नंतर ९०ज मधे रेल्वेने सगळे फर्स्ट क्लास हे एसी मधे बदलले. यातली डायनिंग कार लोकप्रिय आहेच. अजूनही बहुतेक फक्त याच गाडीमधे डायनिंग कार आहे. तेथे रेस्टॉरण्टसारखे बसून खाण्याची मजा वेगळीच आहे.
मध्यंतरी जेव्हा सिंहगड एक्सप्रेस डबल डेकर होती तेव्हा इतर काही गाड्यांनाही एखाद दुसरा डबल डेकर डबा लावला जाई. डेक्कन क्वीनलाही होता. आणि तो सहज लावल्यासारखा नव्हता - इतर डब्यांच्याच रंगात रंगवून तो लावला गेला. मात्र तो काही काळच होता असे दिसते. त्याचा फोटो इथे मिळाला.
या गाडीचे एकेकाळचे रॉयल रूप ब्लॅक अॅण्ड व्हाइटमधे का होईना बघायचे असेल तर कधीकाळी एफटीआयआय ने बनवलेली ही फिल्म पाहा. याचे काही तुकडे मध्यंतरी सोमिवर फिरत होते पण आता ही पूर्ण चित्रफीत उपलब्ध आहे. या गाडीचे व तिने जाणार्या लोकांच्या दैनंदिन प्रवासाचे सुरेख वर्णन यात आहे.
अजूनही पुणे-मुंबई मार्गावर प्राधान्य असलेली ही गाडी आहे. पूर्वी इंग्रजांची ही महत्त्वाची गाडी होती म्हणून व आता पुण्यत राहून मुंबईत रोज अप-डाउन करणार्यांची गाडी म्हणून. एकेकाळी सकाळची सिंहगड गेली की साडेसहापासून प्लॅटफॉर्म नं १ वर हिचे पांढरे-निळे डबे दिमाखात उभे असलेले दिसत. आता गेली काही वर्षे ती प्लॅटफॉर्म नं ४ की ५ वरून सुटते. ते कधी व का झाले माहीत नाही. पण एकूणच तिची ती निळी पट्टी असलेले पांढरे/पिवळे डबे व बहुतांश वेळा त्याच मॅचिंग रंगाचे इंजिन ही ओळख होती. "मिले सूर मेरा तुम्हारा" या गाण्यात तिला अजरामर केलेली आहे. तेथे ती कामशेत जवळ इंद्रायणी नदीच्या बाजूने त्या वळणावर अगदी सुंदर दिसते. माझ्या पिढीच्या बहुतेकांना डेक्कन क्वीन म्हंटले की अशाच इंजिनाच्या गाडीचे चित्र डोळ्यासमोर उभे राहात असेल. योगायोग म्हणजे त्या गाण्यातली डेक्कन व गाणारी लता - दोघींचा जन्म साधारण वर्षभराच्या अंतरातला.
या गाडीने अप-डाउन करणार्यांची संख्या प्रचंड असल्याने एक इकोसिस्टीम तिच्याभोवती तयार झाली होती. अजूनही आहे असे दिसते. संध्याकाळी ५ ला ऑफिसेस सुटल्यावर आधी डेक्कन निघते व नंतर या मार्गवर फास्ट - डबल फास्ट वगैरे लोकल्स वाढतात - ही पूर्वी चार लाइन्स असतानाची सिस्टीम होती. आता सहा लाइन्स झाल्यावर फास्ट लोकल्सना वेगळी लाइन आणि एक्स्प्रेस गाड्यांना वेगळी लाइन असेल, व त्यामुळे या मर्यादा कदाचित नसतील. तसेच कर्जतला ती पोहोचेपर्यंत मधल्या स्टेशनावर पुण्याला जाणारे लोक पिक अप करत एक लोकल तिच्या थोडे आधी कर्जतला पोहोचते - ती पूर्वी "इंजिन लोकल" होती असे ऐकले आहे -म्हणजे लोकल ट्रेन ऐवजी इंजिन असलेली नेहमीसारखीच गाडी पण लोकलसारखी वापरली जाणारी.. मग लोणावळ्याला डेक्कन पोहोचताना बाजूला एक लोकल तिच्यानंतर मधल्या स्टेशनांतील लोकांकरता उभी असते. त्यामुळे त्या लोकलने तळेगाव, देहू रोड सारख्या ठिकाणांहून पुण्याला जाणार्यांकडून त्या वेळेस जोरात (आणि "तोर्यात") जाणारी डेक्कन पाहिल्याचे किस्से अनेकदा ऐकलेले आहेत.
मराठी पॉप्युलर कल्चर मधे डेक्कन क्वीनचा उल्लेख खूप ठिकाणी आहे.. पुलंनी २-३ वेळा उल्लेख केला आहे, वपुंनी केला आहे. वसंत बापटांनी तर कविता केली आहे. इतरही लेखकांच्या पुस्तकांत उल्लेख आहेत. 'मिले सुर मेरा तुम्हारा' बद्दल वरती लिहीले आहे. काही पिक्चर्समधेही ती दाखवली आहे. ही जुन्या "हमराज" मधली क्लिप. इथे नावासकट उल्लेख आहे आणि गाडीही तीच आहे. जुन्या निळ्या डब्यांच्या रूपात आहे. यात तो २X२ वाला फर्स्ट क्लासही दिसतो. ही ज्वेल थीफमधली क्लिप. इथे एरव्ही अगदी दुर्मिळ असलेले WCM-4 मला इंजिन सापडले. मात्र ते बघायला ही क्लिप अगदी हळू प्ले करावी लागते.
रेल्वे इंजिनाचे ड्रायव्हर्स - "लोको पायलट" - जेव्हा निवृत्त होतात तेव्हा त्यांना निवृत्त व्हायच्या आधी या गाडीवर ड्यूटी दिली जाते. त्याचाही एक समारंभ असतो. अशा वेळेस प्रत्येक स्टेशनात व इतर गाड्यांना क्रॉस होताना काही विशिष्ठ प्रकारचे हॉर्न वाजवले जातात, सलामी दिल्यासारखे.
आता काही सुपरफॅन्सकरता डेक्कनची विविध प्रकारची इंजिने
- अगदी सुरूवातीचे WCP 1/2 - याचे फोटो उपलब्ध आहेत. पण क्लिप मिळत नव्हती. एफटीआयआयच्या या सुंदर क्लिप मधे शेवटी एकदा ते इंजिन दिसले.
- WCM-1 तिच्या नेहमीच्या इंजिनांपैकी एक. हे व या सिरीजम्धली इतर इंजिने ही तिची माझ्यासारख्या लोकांकरता खरी ओळख. या इंजिनांची एक खासियत म्हणजे इतर बहुतांश इंजिनांप्रमाणे ड्रायव्हर जेथे असतो तेथे त्याचे दार नाही. दार इंजिनाच्या मधे आहे व ड्रायव्हरला फक्त खिडकी आहे. तेथे दारासारखी रचना आहे पण ती बंद आहे. या क्लिपबद्दल - मणी विजय नावाच्या कोणा रेलफॅनने १९९५ साली तेव्हाच्या हॅण्डहेल्ड कॅमकॉर्डरने हे रेकॉर्ड केले. अशा क्लिप्स तेव्हा असणे दुर्मिळ असल्याने ही क्लिप प्रचंड लोकप्रिय आहे. वरकरणी स्टेशनवरून सुटणारी एक गाडी - इतकेच असलेला हा व्हिडीओ दीड लाखांहून लोकांनी बघितलेला आहे.
- WCM-2 साधारण वरच्यासारखेच पण नीट पाहिले की फरक दिसतो. याला लोको पायलटची दारे ड्रायव्हरजवळच आहेत.
- WCM-3 हे कधी डेक्कनकरता वापरले गेले का कल्पना नाही. त्या वरच्या (एफटीआयआय च्या) क्लिपमधे एकदा जे या सिरीज मधले इंजिन लांबून दिसते ते ३ आहे की ४ नक्की कळत नाही.
- WCM-4 हे फार दुर्मिळ आहे. पण ज्वेल थीफच्या अगदी निसटत्या दृष्यात हे इंजिन दिसले.
- WCM-5 - हे "लोकमान्य" - हे तिचे सर्वात प्रसिद्ध इंजिन. भारतात बनलेले पहिले इलेक्ट्रिक इंजिन. बरीच वर्षे डेक्कन, इंद्रायणी व इतर गाड्यांकरता वापरले गेले. याचे पहिले मॉडेल आता कलकत्त्याला म्युझियम मधे आहे. ही क्लिप डेक्कन क्वीनची नाही पण "परवाना" पिक्चरमधल्या या क्लिप मधे - अमिताभ जेव्हा कलकत्त्याला जाणार्या गाडीत बसतो ती- हे "लोकमान्य" इंजिन नावासकट दिसते.
- ही पुढची गेल्या काही वर्षांतली. साधारण १९९६-९७ पासून डीसी व एसी ट्रॅक्शन दोन्हीवर चालणारी WCAM सिरीजची इंजिने मुंबई-पुणे लाइनवर दिसू लागली. त्यातलेच हे एक. WCAM-3 . याचे अजून एक व्हेरिएशन WCAM-2. मात्र ही कधी डब्यांच्याच रंगात रंगवलेली पाहिली नाहीत. डबे व इंजिन एकाच रंगात हा प्रकार ती जुनी इंजिने बदलल्यावर नंतर केलेला दिसत नाही
- आणि आता सध्याच्या काळात WAP-4, WAP-5, तर कधी WAP-7 सुद्धा असते. पण त्यांच्या क्लिप्स अगदी सहज उपलब्ध आहेत.
सुपरफॅन मोड ऑफ.
आता या दख्खनच्या राणीचे संस्थान अगदी खालसा झालेले नसले तरी ती पूर्वीच्या इंग्लंडच्या राणीप्रमाणेच नामधारी राहिली आहे असे सध्यातरी चित्र आहे. त्यात पूर्वी पुणे-मुंबई प्रवास करणारे बहुसंख्य लोक रेल्वेने जात. आता स्टेशन्सच्या जवळ राहणारे व अप-डाउन करणारे सोडले तर बहुसंख्य मध्यमवर्गीय/उच्च मध्यमवर्गीय लोक बसने किंवा कारने जातात. त्यामुळे रेल्वेगाड्यांना पूर्वीसारखा "माइण्डशेअर" राहिला नाही. तरीही गाड्यांना गर्दी असतेच हे पाहिले आहे. आणि आता मेट्रो कनेक्शन्समुळे शहराच्या इतर भागांतून स्टेशनवर जाणे सोपे झाल्याने ते महत्त्व पुन्हा वाढेल अशी ही चिन्हे आहेत.
हे सगळे वाचून मी रेल्वेवेडा आहे असा तुमचा समज झाला असेल तर हे पुढचे वाचा. या गाडीचा वाढदिवस दरवर्षी मुंबई व पुणे दोन्हीकडे साजरा होतो. तेथे माझ्या वरताण फॅन असलेले लोक जमा होतात. लोक केक कापतात, ढोल ताशाच्या गजरात तिला निरोप दिला जातो. तेथे मध्य रेल्वेचे अधिकारी वर्ग व अनेकदा कोणीतरी प्रमुख पाहुणेही असतात. इव्हन त्या दिवशी तिला जे इंजिन लावतात त्याच्या लोको शेडपासूनच लोक फोटो सेशन्स करतात.
आणि तिचा जनरल फॅनवर्ग वाढतोच आहे. १ जूनला हे लोक तिचे इंजिन सजवतात. पुणे-मुंबई रूटवर विविध ठिकाणी तिचे फोटो, व्हिडीओ काढतात. यूट्यूबवर प्रचंड संख्येने या क्लिप्स आहेत. त्या वरती लिंक दिलेल्या मुंबईच्या स्टेशनवर तिच्या वाढदिवसाच्या समारंभाला असे काही लोक तिच्याच जुन्या लुकची मॉडेल्स घेऊन आले होते. त्यात ती जुनी इंजिने, निळी-पिवळी लिव्हरी (इंजिने-डब्यांचे एकच रंग व पॅटर्न), पांढरी-निळी "अॅम्ब्युलन्स" लिव्हरी हे सगळे आहे.
एरव्ही मुंबईतील स्टेशनांमधे गाड्या आजकाल स्लो करत असले, तरी त्या दिवशी ती दिमाखात दणाणत जाते. दादरहून प्रवास करणार्यांना हे लक्षात येईल की दादरला न थांबता अशा जाणार्या गाड्या पूर्वी तरी दोनच होत्या - एक पश्चिम रेल्वेची राजधानी व दुसरी डेक्कन. आता इतरही आहेत. या क्लिपमधे गाडी पुढे गेल्यावर जे "ट्रॅक साउण्ड्स" येतात ते मला अजूनही नॉस्टॅल्जिक करतात.
मध्यंतरी तिच्याकरता नवीन डिझाइन्स तयार केली गेली. त्यातले "पीकॉक थीम" चे डिझाइन आता तिच्या डब्यांकरता केलेले आहे. पण इंजिन त्याच रंगात असणार होते - ते अजून केलेले नाही. मध्य रेल्वेने मधे असेही जाहीर केले होते की पुश-पुल इंजिने वापरून तिचा वेगही वाढवला जाणार आहे. पण ते कोव्हिडच्या थोडे आधी. त्यानंतर त्यावर अजून काही झालेले दिसत नाही. पण या गाडीचा प्रवासी संघ आहे, ते लोक खूप प्रभावी आहेत, तिचा फॅनक्लबही प्रचंड आहे. त्यामुळे तिला पुन्हा एक हेरिटेज ट्रेन म्हणूनही अजून देखणी करतील अशी आशा आहे.
हे आज (१ जून) पुण्यातले यावर्षीचे सेलिब्रेशन! Enjoy!
*दख्खन राणी*
*दख्खन राणी*
*कवी - वसंत बापट*
~~~~~~~~~~~~~~
दख्खन राणीच्या बसून कुशीत
शेकडो पिले ही चालली खुशीत
सुंदर मानव तुंदिल अंगाचे
गालिचे गुलाब शराबी रंगाचे
ठेविल्या बाहुल्या बांधून बासनी
गोजिरवाणी लाजिरवाणी
पोरटी घेऊन पोटाशी कुशीत
दख्खन राणी ही चालली खुशीत
निसर्ग नटला बाहेर थाटात
पर्वत गर्वात ठाकले थाटात
चालले गिरीश मस्तकांवरून
आकाशगंगांचे नर्तन गायन
झेलून त्यांचे नुपूर घुंगुर
डोलती डौलात दुर्वांचे अंकुर
मोत्यांची जाळी घालून भली
रानाची चवेणी जाहली प्रफुल्ल
दख्खन राणीला नव्हती दखल
ड्यूकचे नाकड सरळ अजस्त्र
राहिले उभे हे शतके सहस्त्र
त्याच्याही पाषाण हृदया कळाली
सृष्टीची शोभा ही वृष्टीत वेगळी
नीला तो तलाव तांबूस खाडी ती
पांढरा प्रपात हिरवी झाडी ती
अवतीभवती इंद्राची धनुष्ये
दख्खन राणीत मुर्दाड मनुष्ये
दख्खन राणीच्या कुशीत पोटात
बुडाली जाणीव चहाच्या घोटात
किलवर चौकट इसपिक बदाम
फेकीत फेकीत जिंकित छदाम
नीरस पोकळ वादांचे मृदंग
वाजती उगाच खमंग सवंग
खोलून चंची पोपटपंची
करीत बसले बुद्धीचे सागर
दख्खन राणी ही ओलांडे डोंगर
धावत्या बाजारी एकच बालक
गवाक्षी घालून बसले मस्तक
म्हणाले "आई गं, धबधबा केवढा
पहा ना चवेणी, पहा हा केवडा
ढगांच्या वाफेच्या धूसर फेसात
डोंगर नहाती पहाना टेसात"
म्हणाली आई "पूरे गं बाई,
काय या बेबीची चालली कटकट"
दख्खन राणीचा चालला फुंफाट
दख्खन राणीच्या पोटात कुशीत
शेकडो पिले ही चालली खुशीत
मनाने खुरटी दिसाया मोठाली
विसाव्या तिसाव्या वर्षी ही आंधळी
बाहेर असू दे उन वा चांदणे
संततधार वा धुक्याचे वेढणे
ऐल ते पैल शंभर मैल
एकच बोगदा मुंबई पुण्यात
दख्खन राणी ही चालली वेगात ...
दख्खन राणी ही चालली वेगात... !!
सुंदर लेख.
सुंदर लेख.
सर्व क्लिप्स पाहिल्या.
सर्व क्लिप्स पाहिल्या. आवडल्या.
इंजिन्सची माहिती जरा टेक्निकल आहे.
आपल्या इथे आणखी एक माबोकर रेल्वे बद्दल लिहीतात. त्यांच्या ही लेखात असे उल्लेख आहेत.
लेखाचा रोख डेक्कन क्वीन आहे नाहीतर ट्रेन आणि आठवणी अशी मोकळीक मिळाली असती तर दुसरा भाग काढावा लागेल धाग्याचा.
फ्लाईंग क्वीन गुजरात्यांसाठी चालू झालेली ना गुजरातेतून ? ती डेक्कन क्वीन पेक्षा फास्ट होती म्हणतात.
भारी लेख
भारी लेख
फ्लाईंग क्वीन गुजरात्यांसाठी
फ्लाईंग क्वीन गुजरात्यांसाठी चालू झालेली ना गुजरातेतून ? ती डेक्कन क्वीन पेक्षा फास्ट होती म्हणतात.
>>>
फ्लाइंग रानी एक्सप्रेस
हिच्या नावात कधीही 'क्वीन' शब्द वापरल्याचं पाहिलेलं नाही. (बोम्बे शेन्ट्रल थी सूरत सुधी फ्लाइंग रानी एक्शप्रेश)
फ्लाइंग रानी गाडीने भरपूर प्रवास केला आहे.
डे.क्वी.पेक्षा फास्ट नसावी.
माझा मामा डहाणूला राहात होता.
माझा मामा डहाणूला राहात होता. त्यामुळे त्याच्या बरोबर फ्लाईंग रानीने प्रवास झाला. कल्याणला राहणाऱ्यांना डेक्कन क्वीनचा उपयोग नाही. त्यामुळे तो योग बराच उशीरा आला. कामाच्या मिटींग मुंबईत असल्या, की आवर्जून पुण्याहून डेक्कन क्वीनने जाऊन डेक्कन क्वीनने परत येत असू . ग्लॅमर आहे त्या गाडीला. अशाच एका प्रवासात निवृत्त होणाऱ्या लोकोपायलटचा प्रवास अनुभवला. प्रत्येक स्टेशनवर त्यांच्यासाठी फ्लेक्स लावले होते. रेल कर्मचारी हात हलवून निरोप देत होते. वेगळा हॉर्न होते, पण ते तेवढे लक्षात नाहीत.
आता कल्याण सुटलं. पण तरी जायची वेळ आली, तर वंदे भारतचा (जरा महाग) पर्याय आहे. कल्याण, ठाण्याला थांबते. त्यामुळे सोयीस्कर आहे. पुण्याला आल्यावर मेट्रोने घराजवळ पोचता येतं.
१ जून २०३० ला ही राणी शंभरी गाठेल. आधीपासून रिझर्व्हेशन करून त्या दिवशी जायला हवं. फा, येशील का?
फ्लाइंग रानी गाडीने भरपूर
फ्लाइंग रानी गाडीने भरपूर प्रवास केला आहे.
डे.क्वी.पेक्षा फास्ट नसावी. >> कुठल्या तरी भाषणात ऐकलं होत. "आपल्या डेक्कन क्वीन खुन्नस म्हणून फ्लाईंग क्वीन आणली. गुजरातमधून यायचं माल विकायचा रात्री परत गुजरात" संजय राऊत, राज ठाकरे किंवा कुणीही असेल.
मस्त लेख!! एकदम अभ्यासपूर्ण.
मस्त लेख!! एकदम अभ्यासपूर्ण..!
मी डेक्कन क्वीनने फारच कमी वेळा प्रवास केला. कारण तेच.. कल्याणला थांबायची नाही! पण केला तेव्हा अगदी लक्षात रहाण्यासारखा प्रवास असायचा. मी आई किंवा आज्जीबरोबर संध्याकाळी डोंबिवली स्टेशनवर गाड्या बघायला जायतो तेव्हा डेक्कन क्वीन पास होताना अ ने क दा पाहिली आहे. अगदी इतरांकडे तु.क. टाकत तोर्यात धाडधाड निघून जायची. आई ऑफिसातून परत येताना तिची गाडी लेट झाली तर ती साईडींगला टाकून डेक्कन क्विन पुढे काढायचे. तेव्हा सगळ्यांची चिडचिड व्हायची. म्हणजे आधीच उशिर आणि त्यात सायडींग. मग "राणी"च्या नावे शिव्या घातल्या जायच्या.
निळा पांढरा रंग विथ निळं इंजिन हीच खरं डेक्कन क्वीनची ओळख पण पुढे इंद्रायणी*, प्रगतीलाही ते रंग देऊन डेक्कनची शान कमी केली असं मला वाटलं. मध्ये काही दिवस डेक्कन क्विन पूर्ण पांढरीही असायची. त्यानंतर तर एकदा काळा/करडा रंग द्यायचं ही घाटत होतं पण त्याला प्रवाश्यांकडून झालेल्या तीव्र विरोधामुळे ते बारगळलं.
* - आम्ही सगळ्यात जास्त प्रवास इंद्रायणीने केला. "१०२७ डाऊन" बहूतेक. अगदी सुरुवातीला इंद्रायणी पण कल्याणला थांबायची नाही. मग आम्ही त्याच्या आधीच्या कर्जत लोकलने कर्जतला जाऊन इंद्रायणी पकडायचो. नंतर ती कल्याणला थांबायला लागली पण कल्याणहून बोर्ड करणार्या लोकांना एस-एल-१ बोगीत रिजर्वेशन मिळायचं (कारण तेव्हा कल्याणचं रिझर्वेशन ऑफिस कॉप्युटराईज्ड नव्हतं) आणि ती बोगी थ्रु नव्हती. त्यामुळे तिथे पँट्री कारमधला ब्रेकफास्ट मिळायचा नाही! नंतर ते बदललं. इंद्रायणीपण तेव्हा बरीच वेगात जायची. ९ / ९:१५ च्या सुमारास पुण्याला पोचल्यावर तिथे छान थंड असायचं. आता इंद्रायणी सोलापूर पर्यंत नेतात आणि त्यामुळे तिची अगदीच रया गेली आहे असं मला नम्र मत आहे !
ही गाडी पुणेकरांनी ओवरहाइप
ही गाडी पुणेकरांनी ओवरहाइप केली आहे. जरा जास्तीच पसंती.
धन्यवाद सर्वांना.
धन्यवाद सर्वांना. प्रतिक्रियाही आवडल्या.
सायो - ते "जताना" केले आहे आता
रानभूली - फ्लाइंग रानीची तुलना सिंहगड एक्सप्रेसशी होत असे कारण तीही डबल डेकर होती. ती किती वेगवान होती कल्पना नाही. इव्हन डेक्कन क्वीन पेक्षा वेगवान गाड्या अनेक होत्या/आहेत. राजधानी बराच काळ भारतातील सर्वात वेगवान गाडी होती हे तुम्हाला माहीत असेलच. नंतर शताब्दी गाड्या सुरू झाल्या, त्यातली एक "गतिमान" झाली. एकूणच खंडाळा घाटातून व मुंबईच्या कम्युटर गर्दीतून जाणार्या गाड्यांपेक्षा उत्तरेकडच्या व इन जनरल पठारावरून जाणार्या गाड्या कधीही जास्त वेगवान असतील.
डेक्कनची इमेज वेगवान गाडी म्हणून आहे हे खरे. पण ते बहुधा पुण्या-मुंबईच्या अवघड रूटच्या संदर्भात. भारतभरचा विचार केला तर इव्हन तेव्हा कदाचित पंजाब मेल जास्त वेगवान असेल.
१ जून २०३० ला ही राणी शंभरी गाठेल. आधीपासून रिझर्व्हेशन करून त्या दिवशी जायला हवं. फा, येशील का? >>> नक्कीच!
वाहते गटग 
निळा पांढरा रंग विथ निळं इंजिन हीच खरं डेक्कन क्वीनची ओळख >>> हो. तो एक पॅटर्न आणि दुसरा निळा-पिवळाही. आणि तेव्हा तिचे इंजिनही त्याच रंगात असे. मला तशीच रंगसंगती असलेली इंद्रायणी आठवते तू म्हंटले आहेस तशी. इन फॅक्ट ती सुरू झाली तेव्हा मला आठवते ती पुणे-मुंबई अंतर डेक्कन इतक्याच किंवा काकणभर कमीच वेळात काटायची. पण नंतर तिचे स्टॉप्स वाढले. मी ही इंद्रायणीनेच सर्वात जास्त प्रवास केला असेल. मे बी इंद्रायणी व सिंहगड. तिचीही एक वेगळीच मजा असायची. खूप स्टेशने थांबूनही ती कल्याणला बर्यापैकी वेळेत पोहोचायची.
लेखातच फोटो टाकायचे होते पण बर्याच फोटोज च्या प्रताधिकारांबद्दल निश्चित माहिती कळाली नाही. म्हणून लिंक्स दिल्या.
लोको पायलटना दिला जाणारा मान व ती परंपरा आवडली. >>> हो ती फार मस्त परंपरा आहे. ती हॉर्न्सची क्लिपपण बघ. अगदी प्रत्येक स्टेशनात व प्रत्येक क्रॉस होणार्या गाडीबरोबर हॉर्न वाजवत अगदी वाजतगाजत हा प्रवास होतो असे दिसते.
फा, मस्त लिहिलंयस रे. सिंहगड,
फा, मस्त लिहिलंयस रे. सिंहगड, प्रगती, इंद्रायणी, डेक्कन एक्स्प्रेस … गेला बाजार कोयना, महालक्ष्मी - कित्येक गाड्यांनी पुणे-मुंब—पुणे प्रवास केलाय, पण डेक्कन क्वीनचं ग्लॅमरच वेगळं. कित्येक सेलेब्रिटीज (हा शब्दही प्रचलित नव्हता… प्रसिद्ध लोकं, मोठी लोकं म्हणायचे त्यांना) डेक्कन क्वीनने प्रवास करायचे. खर्या अर्थानं ‘दक्खनची राणी‘!!
तर प्रगती-डेक्कन क्वीनची मी
तर प्रगती-डेक्कन क्वीनची मी म्हणालो होतो ती धमाल.
मी प्रगतीत होतो. कर्जतला ती वेळेत पोचली पण कुठल्या तरी पुढल्या ट्रेनला काही प्रॉब्लेम झाला म्हणुन कर्जतहुन निघेना. जस जसा वेळ होत गेला तस तसे लोक हळुहळु नाराजीहून चिडण्यापर्यंत गेले. बरेच रोजचे पासधारक जे त्या दिवशी लौकर निघुन प्रगतीने निघाले होते ते खाली उतरून उभे होते फलाटावर. अर्धा पाऊण तास झाला आणि बरेचजण स्टेशन मास्टरकडे गेले ,काही येत जात होते त्यांच्याकडुन कळत होते. पुढच्या ट्रॅकवर गाडी बंद पडलीय. पण इंजिनसाठी तिसरा ट्रॅक असतो त्याने खाली येणारी गाडी येऊ द्या मधल्या ट्रॅकने प्रगतीला जाऊ द्या, अशी मागणी करत होते. गोंधळ चांगलाच वाढत होता.
मग स्वतः स्टेशन मास्टरही लोकांना शांत करायला प्लॅटफॉर्म येऊन गेले. तेव्हा आता डेक्कन क्वीन यायची वेळ झाली, विचार करू नका सोडा ही दुसऱ्या ट्रॅकने असे त्यांना म्हणु लागले.
नंतर वेळाने डेक्कन क्वीन बाजुच्या प्लॅटफॉर्म येत आहे अशी अनाऊन्समेंट झाली तसा लोकांनी चांगलाच गोंधळ घालायला सुरवात केली. आधी प्रगतीच सोडा म्हणुन.
मग डेक्कन क्वीन बाजुच्या प्लॅटफॉर्मवर येऊन थडकली. ती पण १५-२० मिनिट लेट झाली होती.
आता कोणती आधी सोडणार याची याची उत्कंठा बरीच वाढली होती, आणि लोकांनी प्लॅटफॉर्म प्रगती प्रगतीचा घोषही सुरू केला.
मग प्रगती सुटायला तयार आहेची घोषणा झाली आणि नंतर लगेच डेक्कन क्वीन सुटायला तयार आहेची घोषणा झाली. मग कुणीतरी अरे दोन्ही सोडणार आहेत ओरडले आणि दोन्हींना ग्रीन सिग्नल मिळाला.
प्रगती आणि डेक्कन क्वीन एकाच वेळी कर्जत वरून समांतर निघाल्या!
लोक खिडकीतून, दारातून एकमेकांना हात हलवत कुणी चिडवत जल्लोष करू लागले.
हा अद्भुत प्रवास बघायला मी पण दाराजवळ उभा होतो. बोगद्यात गाड्या जात होत्या आणि बाहेर आल्या की आरडाओरडा. दूर गेलेले ट्रॅक जवळ आले की डबे एकमेकांवर आदळणार की काय असे वाटावे इतक्या वेगाने जवळ येऊन स्थिर होत होते, ते पाहुन लोक ओरडत होते.
खंडाळा जवळ आले तसे आता काय होणार याची परत उत्कंठा वाढली. आमच्या गाडीचे प्रगती प्रगती ओरडत होते तिकडे क्वीन क्वीन डेक्कन क्वीन.
अखेर खंडाळ्या आधी प्रगती मंदावली आणि डेक्कन क्वीन पुढे जाऊ लागली तसे डेक्कन क्वीन वाल्यांनी आम्हाला चिडवून घेतले आणि डेक्कन क्वीन पुढे निघुन गेली.
भारी!
भारी!
मानव भन्नाट किस्सा आहे.
मानव
भन्नाट किस्सा आहे.
फेफ, वावे - धन्यवाद.
सॉलिड किस्सा
सॉलिड किस्सा
भन्नाट किस्सा.
भन्नाट किस्सा.
डेक्कन प्रगती किस्सा भारीच
डेक्कन प्रगती किस्सा भारीच आहे!
मस्त किस्सा डेक्कन क्वीन चा
मस्त किस्सा डेक्कन क्वीन चा
Pages