माझी ९५ वर्षीय क्रश - डेक्कन क्वीन

Submitted by फारएण्ड on 1 June, 2025 - 23:54

आधीच क्लिअर करतो. ती ९५ वर्षांची आहे. मी नाही Happy पण मी लहान असल्यापासून ती माझी क्रश आहे. दक्खनची राणी. डेक्कन क्वीन. मी तिला कधी पहिल्यांदा पाहिले ते लक्षात नाही. पण ती लहानपणी अप्राप्य वाटायची. आम्ही जायचो नेहमी कर्जत व कल्याणला. दोन्हीकडे ती थांबत नसे, निदान मुंबईला जाताना. त्यामुळे आम्ही नेहमी सिंहगड, डेक्कन एक्सप्रेस व नंतर इंद्रायणी. कधी कोयना. पण मी रेल्वेलाइनच्या जवळपास जरी असलो व तिची वेळ असली की हिंदी पिक्चरमधल्या "छुपाना भी नहीं आता, जताना भी नहीं आता" वाल्या प्रेमिकासारखा तिची वाट पाहात असे. पण तेव्हाची तिची अवाढव्य इंजिने पाहिलीत तर लक्षात येईल- प्लॅटफॉर्मवर उभे असलो, की आपल्याकडे दुर्लक्ष करून समोर बघत पुढे जाणार्‍या एखाद्या कडक शिक्षिकेसारखी ती वाटायची (त्यावेळेस उपमांमधेही शाळेसंबंधीच गोष्टी सुचत).

तिचा लुक सुद्धा तेव्हा इतका देखणा असे!

830893-deccan-queen-twitter.jpg

इतर तपकिरी डब्यांच्या गाड्या व इंजिने यांच्या तुलनेत एकाच रंगातले इंजिन व डबे असलेला तिचा लुक रॉयल वाटे व तिचे वेगळेपण उठून दिसत असे. लहानपणी कल्याणाला गेलेलो असताना एक दोन वेळा संध्याकाळी आवर्जून स्टेशनला जाउन तिला सुसाट जाताना वरच्या पुलावरून पाहिल्याचे आठवते.

मग नंतर तिच्यापेक्षा वेगवान, तिच्या पेक्षा आरामदायी मार्गाने प्रवास केला. राजधानी झाली, गतिमान झाली, शताब्दी झाली. युरोपातील ट्रेन्स झाल्या. विमाने वगैरे तर वेगळेच. पण तिचे आकर्षण अजिबात कमी झाले नाही. इथे अजूनही कधी मोकळा वेळ असेल तर यूट्यूबवर एखाद्या स्टेशनमधून दणाणत जाणार्‍या गाड्या पाहण्याचा छंद आहे, त्यातही डेक्कन शोधतो. मध्यंतरी एकदा केवळ डेक्कनमधे बसायचे म्हणून पुण्याहून मुंबईला डे ट्रिप करून आलो. व्हिस्टाडोममधून मात्र प्रवास अजून राहिला आहे. एकदा मॉन्सूनचा जोर ओसरला की ऑगस्ट-सप्टेंबर मधे विस्टाडोममधून आजूबाजूचा निसर्ग अफलातून सुंदर दिसत असेल हे या क्लिपमधून जाणवते.

हे फॅसिनेशन कधी निर्माण झाले लक्षात नाही.

"डेक्कनमधे ट्यूबलाइट्स असतात" - माझ्या वडिलांचे मामा लहानपणी मला डेक्कन कशी ओळखायची ते सांगत असलेले मला अजूनही लक्षात आहे. शिवाजीनगरला त्यांच्या घरातूनही गाड्या दिसत. लहानपणी मी त्यांच्या खिडकीतून गाड्यांच्या खिडक्यांमधल्या लोकांना टाटा करत असे. तेव्हा फेसबुक असते तर त्या लोकांना मी People you may know मधे नक्की दिसलो असतो.. मग थोडा मोठा झाल्यावर संध्याकाळी शिवाजीनगर स्टेशनवर जाउन बसायचो. तेव्हा मुंबईकडून खूप गाड्या येत. त्यातली डेक्कन कशी ओळखायची, तर इतर गाड्यांमधे तेव्हा पिवळे दिवे असत व डेक्कन मधे ट्यूब्ज. खरे म्हणजे डेक्कनच्या डब्यांचा रंगही वेगळा असे. पण का कोणास ठाउक ही खूण त्यांनी सांगितलेली लक्षात राहिली. ही स्टेशनवर जाउन "रेलफॅनिंग" करण्याची आवड तशीच राहिली. विमानतळावर एकवेळ मला थोड्या वेळानंतर कंटाळा येईल पण एखाद्या बिझी रेल्वे स्टेशनवर मी कितीही वेळ रमतो.

सध्या सर्वच गाड्यांना WAP सिरीज मधली भारतातच बनलेली समोरून तिरपी चपट अशी इंजिने सगळीकडे आहेत. पण पूर्वी पुणे-मुंबई लाइनवर डीसी ट्रॅक्शन होते. तेव्हा WCM सिरीज मधली काही इंग्लंडमधे बनलेली, काही थोडी जपानमधे (हिताची कंपनीची) तर एक मॉडेल भारतात पहिल्यांदा बनलेले विद्युत इंजिन "लोकमान्य". त्याआधी तिचे सुरूवातीचे इंजिन वेगळे होते. मला बरेच दिवस त्याच्या क्लिप्स सापडत नव्हत्या. गेल्या काही दिवसांत त्याही सापडल्या.

वास्तविक ही ७०ज मधली WCM इंजिने पाच वेगवेगळ्या प्रकारची होती. WCM-१ ते WCM-५. यातील दोन तीन इंजिने कसारा घाटातील सुंदर निसर्गाच्या पार्श्वभूमीवर "कभी हाँ कभी ना" मधल्या या गाण्यात दिसतात. तेथे ती एकच गाडी आहे असे भासवले असले तरी ते २-३ वेगवेगळ्या गाड्यांचे शूटिंग आहे, आणि त्यातली एकही गाडी त्यातील कथेत दाखवले आहे तशी गोव्याला जात नाही हा भाग सोडा. त्याचे वर्णन या लेखांत मी केले आहेच. पण या गाण्याने या इंजिनांचे एक सुंदर शूटिंग कायमस्वरूपी केल्याने त्यातील रेल्वे ब्लूपर्स त्याला माफ आहेत.

यातले WCM-५ मॉडेलचे इंजिन हे भारतात बनवलेले पहिले इलेक्ट्रिक इंजिन. ते सुरूवातीला खास डेक्कन करताच वापरले गेले. त्याचे नावही "लोकमान्य" होते. हे आता कलकत्त्याच्या म्युझियममधे आहे. बाकी बरीच इंजिने आता कोठेच उपलब्ध नाहीत. यातली काही इंग्लंडमधे बनलेली होती (व्हल्कन फाउण्ड्री आणि इंग्लिश इलेक्ट्रिक), तर एक मॉडेल हिताची कंपनीचे होते.

गेल्या काही दिवसांत विजेच्या इंजिनांचा तुटवडा आहे की विद्युत पुरवठ्याचा, माहीत नाही. पण पुणे-मुंबई मार्गावर सर्व गाड्या काही दिवस डिझेल इंजिने चालवत होती. तेव्हा रेल्वे फॅन्समधे डेक्कन क्वीनला डिझेल इंजिन लावले आहे ही मोठी "न्यूज" होती. याचे खास कारण आहे. भारतातील बहुतांश जुन्या गाड्या सध्याच्या विद्युतीकरणापूर्वी कधीना कधी कोळशाचे इंजिन व नंतर डिझेल इंजिन लावून धावत होत्या. फक्त डेक्कन क्वीन ही एकच जुनी गाडी अशी आहे की जी पहिल्या दिवसापासून इलेक्ट्रिक इंजिनावर चालली आहे. १ जून १९३० ला ती सुरू झाली. ७ डबे घेउन ती २ तास ५५ मिनिटांत पुणे-मुंबई प्रवास करत असे. तेव्हा रेल्वेमधे तीन वर्ग होते. या गाडीला फक्त पहिला व दुसरा वर्ग होता. नंतर कधीतरी तिसरा वर्ग वाढवला. मग नंतर रेल्वेनेच तिसरा वर्ग काढून टाकला. आता या गाडीला १७ डबे असतात व याच प्रवासाला ती ३ तास १५ मिनिटे घेते.

पूर्वी या गाडीला २ बाय २ सिटींग वाला सुरेख फर्स्ट क्लास होता. त्यात एक फर्स्ट कलास पासहोल्डर्सचाही डबा असे. त्याआधीचा मूळचा फर्स्ट क्लास आणखीनच रॉयल असावा. कारण १९४७ च्या सुमारास त्यात काहीतरी बदल केला गेला होता. नंतर ९०ज मधे रेल्वेने सगळे फर्स्ट क्लास हे एसी मधे बदलले. यातली डायनिंग कार लोकप्रिय आहेच. अजूनही बहुतेक फक्त याच गाडीमधे डायनिंग कार आहे. तेथे रेस्टॉरण्टसारखे बसून खाण्याची मजा वेगळीच आहे.

मध्यंतरी जेव्हा सिंहगड एक्सप्रेस डबल डेकर होती तेव्हा इतर काही गाड्यांनाही एखाद दुसरा डबल डेकर डबा लावला जाई. डेक्कन क्वीनलाही होता. आणि तो सहज लावल्यासारखा नव्हता - इतर डब्यांच्याच रंगात रंगवून तो लावला गेला. मात्र तो काही काळच होता असे दिसते. त्याचा फोटो इथे मिळाला.

या गाडीचे एकेकाळचे रॉयल रूप ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाइटमधे का होईना बघायचे असेल तर कधीकाळी एफटीआयआय ने बनवलेली ही फिल्म पाहा. याचे काही तुकडे मध्यंतरी सोमिवर फिरत होते पण आता ही पूर्ण चित्रफीत उपलब्ध आहे. या गाडीचे व तिने जाणार्‍या लोकांच्या दैनंदिन प्रवासाचे सुरेख वर्णन यात आहे.

अजूनही पुणे-मुंबई मार्गावर प्राधान्य असलेली ही गाडी आहे. पूर्वी इंग्रजांची ही महत्त्वाची गाडी होती म्हणून व आता पुण्यत राहून मुंबईत रोज अप-डाउन करणार्‍यांची गाडी म्हणून. एकेकाळी सकाळची सिंहगड गेली की साडेसहापासून प्लॅटफॉर्म नं १ वर हिचे पांढरे-निळे डबे दिमाखात उभे असलेले दिसत. आता गेली काही वर्षे ती प्लॅटफॉर्म नं ४ की ५ वरून सुटते. ते कधी व का झाले माहीत नाही. पण एकूणच तिची ती निळी पट्टी असलेले पांढरे/पिवळे डबे व बहुतांश वेळा त्याच मॅचिंग रंगाचे इंजिन ही ओळख होती. "मिले सूर मेरा तुम्हारा" या गाण्यात तिला अजरामर केलेली आहे. तेथे ती कामशेत जवळ इंद्रायणी नदीच्या बाजूने त्या वळणावर अगदी सुंदर दिसते. माझ्या पिढीच्या बहुतेकांना डेक्कन क्वीन म्हंटले की अशाच इंजिनाच्या गाडीचे चित्र डोळ्यासमोर उभे राहात असेल. योगायोग म्हणजे त्या गाण्यातली डेक्कन व गाणारी लता - दोघींचा जन्म साधारण वर्षभराच्या अंतरातला.

या गाडीने अप-डाउन करणार्‍यांची संख्या प्रचंड असल्याने एक इकोसिस्टीम तिच्याभोवती तयार झाली होती. अजूनही आहे असे दिसते. संध्याकाळी ५ ला ऑफिसेस सुटल्यावर आधी डेक्कन निघते व नंतर या मार्गवर फास्ट - डबल फास्ट वगैरे लोकल्स वाढतात - ही पूर्वी चार लाइन्स असतानाची सिस्टीम होती. आता सहा लाइन्स झाल्यावर फास्ट लोकल्सना वेगळी लाइन आणि एक्स्प्रेस गाड्यांना वेगळी लाइन असेल, व त्यामुळे या मर्यादा कदाचित नसतील. तसेच कर्जतला ती पोहोचेपर्यंत मधल्या स्टेशनावर पुण्याला जाणारे लोक पिक अप करत एक लोकल तिच्या थोडे आधी कर्जतला पोहोचते - ती पूर्वी "इंजिन लोकल" होती असे ऐकले आहे -म्हणजे लोकल ट्रेन ऐवजी इंजिन असलेली नेहमीसारखीच गाडी पण लोकलसारखी वापरली जाणारी.. मग लोणावळ्याला डेक्कन पोहोचताना बाजूला एक लोकल तिच्यानंतर मधल्या स्टेशनांतील लोकांकरता उभी असते. त्यामुळे त्या लोकलने तळेगाव, देहू रोड सारख्या ठिकाणांहून पुण्याला जाणार्‍यांकडून त्या वेळेस जोरात (आणि "तोर्‍यात") जाणारी डेक्कन पाहिल्याचे किस्से अनेकदा ऐकलेले आहेत.

मराठी पॉप्युलर कल्चर मधे डेक्कन क्वीनचा उल्लेख खूप ठिकाणी आहे.. पुलंनी २-३ वेळा उल्लेख केला आहे, वपुंनी केला आहे. वसंत बापटांनी तर कविता केली आहे. इतरही लेखकांच्या पुस्तकांत उल्लेख आहेत. 'मिले सुर मेरा तुम्हारा' बद्दल वरती लिहीले आहे. काही पिक्चर्समधेही ती दाखवली आहे. ही जुन्या "हमराज" मधली क्लिप. इथे नावासकट उल्लेख आहे आणि गाडीही तीच आहे. जुन्या निळ्या डब्यांच्या रूपात आहे. यात तो २X२ वाला फर्स्ट क्लासही दिसतो. ही ज्वेल थीफमधली क्लिप. इथे एरव्ही अगदी दुर्मिळ असलेले WCM-4 मला इंजिन सापडले. मात्र ते बघायला ही क्लिप अगदी हळू प्ले करावी लागते.

रेल्वे इंजिनाचे ड्रायव्हर्स - "लोको पायलट" - जेव्हा निवृत्त होतात तेव्हा त्यांना निवृत्त व्हायच्या आधी या गाडीवर ड्यूटी दिली जाते. त्याचाही एक समारंभ असतो. अशा वेळेस प्रत्येक स्टेशनात व इतर गाड्यांना क्रॉस होताना काही विशिष्ठ प्रकारचे हॉर्न वाजवले जातात, सलामी दिल्यासारखे.

आता काही सुपरफॅन्सकरता डेक्कनची विविध प्रकारची इंजिने

- अगदी सुरूवातीचे WCP 1/2 - याचे फोटो उपलब्ध आहेत. पण क्लिप मिळत नव्हती. एफटीआयआयच्या या सुंदर क्लिप मधे शेवटी एकदा ते इंजिन दिसले.

- WCM-1 तिच्या नेहमीच्या इंजिनांपैकी एक. हे व या सिरीजम्धली इतर इंजिने ही तिची माझ्यासारख्या लोकांकरता खरी ओळख. या इंजिनांची एक खासियत म्हणजे इतर बहुतांश इंजिनांप्रमाणे ड्रायव्हर जेथे असतो तेथे त्याचे दार नाही. दार इंजिनाच्या मधे आहे व ड्रायव्हरला फक्त खिडकी आहे. तेथे दारासारखी रचना आहे पण ती बंद आहे. या क्लिपबद्दल - मणी विजय नावाच्या कोणा रेलफॅनने १९९५ साली तेव्हाच्या हॅण्डहेल्ड कॅमकॉर्डरने हे रेकॉर्ड केले. अशा क्लिप्स तेव्हा असणे दुर्मिळ असल्याने ही क्लिप प्रचंड लोकप्रिय आहे. वरकरणी स्टेशनवरून सुटणारी एक गाडी - इतकेच असलेला हा व्हिडीओ दीड लाखांहून लोकांनी बघितलेला आहे.

- WCM-2 साधारण वरच्यासारखेच पण नीट पाहिले की फरक दिसतो. याला लोको पायलटची दारे ड्रायव्हरजवळच आहेत.

- WCM-3 हे कधी डेक्कनकरता वापरले गेले का कल्पना नाही. त्या वरच्या (एफटीआयआय च्या) क्लिपमधे एकदा जे या सिरीज मधले इंजिन लांबून दिसते ते ३ आहे की ४ नक्की कळत नाही.

- WCM-4 हे फार दुर्मिळ आहे. पण ज्वेल थीफच्या अगदी निसटत्या दृष्यात हे इंजिन दिसले.

- WCM-5 - हे "लोकमान्य" - हे तिचे सर्वात प्रसिद्ध इंजिन. भारतात बनलेले पहिले इलेक्ट्रिक इंजिन. बरीच वर्षे डेक्कन, इंद्रायणी व इतर गाड्यांकरता वापरले गेले. याचे पहिले मॉडेल आता कलकत्त्याला म्युझियम मधे आहे. ही क्लिप डेक्कन क्वीनची नाही पण "परवाना" पिक्चरमधल्या या क्लिप मधे - अमिताभ जेव्हा कलकत्त्याला जाणार्‍या गाडीत बसतो ती- हे "लोकमान्य" इंजिन नावासकट दिसते.

- ही पुढची गेल्या काही वर्षांतली. साधारण १९९६-९७ पासून डीसी व एसी ट्रॅक्शन दोन्हीवर चालणारी WCAM सिरीजची इंजिने मुंबई-पुणे लाइनवर दिसू लागली. त्यातलेच हे एक. WCAM-3 . याचे अजून एक व्हेरिएशन WCAM-2. मात्र ही कधी डब्यांच्याच रंगात रंगवलेली पाहिली नाहीत. डबे व इंजिन एकाच रंगात हा प्रकार ती जुनी इंजिने बदलल्यावर नंतर केलेला दिसत नाही

- आणि आता सध्याच्या काळात WAP-4, WAP-5, तर कधी WAP-7 सुद्धा असते. पण त्यांच्या क्लिप्स अगदी सहज उपलब्ध आहेत.

सुपरफॅन मोड ऑफ.

आता या दख्खनच्या राणीचे संस्थान अगदी खालसा झालेले नसले तरी ती पूर्वीच्या इंग्लंडच्या राणीप्रमाणेच नामधारी राहिली आहे असे सध्यातरी चित्र आहे. त्यात पूर्वी पुणे-मुंबई प्रवास करणारे बहुसंख्य लोक रेल्वेने जात. आता स्टेशन्सच्या जवळ राहणारे व अप-डाउन करणारे सोडले तर बहुसंख्य मध्यमवर्गीय/उच्च मध्यमवर्गीय लोक बसने किंवा कारने जातात. त्यामुळे रेल्वेगाड्यांना पूर्वीसारखा "माइण्डशेअर" राहिला नाही. तरीही गाड्यांना गर्दी असतेच हे पाहिले आहे. आणि आता मेट्रो कनेक्शन्समुळे शहराच्या इतर भागांतून स्टेशनवर जाणे सोपे झाल्याने ते महत्त्व पुन्हा वाढेल अशी ही चिन्हे आहेत.

हे सगळे वाचून मी रेल्वेवेडा आहे असा तुमचा समज झाला असेल तर हे पुढचे वाचा. या गाडीचा वाढदिवस दरवर्षी मुंबई व पुणे दोन्हीकडे साजरा होतो. तेथे माझ्या वरताण फॅन असलेले लोक जमा होतात. लोक केक कापतात, ढोल ताशाच्या गजरात तिला निरोप दिला जातो. तेथे मध्य रेल्वेचे अधिकारी वर्ग व अनेकदा कोणीतरी प्रमुख पाहुणेही असतात. इव्हन त्या दिवशी तिला जे इंजिन लावतात त्याच्या लोको शेडपासूनच लोक फोटो सेशन्स करतात.

आणि तिचा जनरल फॅनवर्ग वाढतोच आहे. १ जूनला हे लोक तिचे इंजिन सजवतात. पुणे-मुंबई रूटवर विविध ठिकाणी तिचे फोटो, व्हिडीओ काढतात. यूट्यूबवर प्रचंड संख्येने या क्लिप्स आहेत. त्या वरती लिंक दिलेल्या मुंबईच्या स्टेशनवर तिच्या वाढदिवसाच्या समारंभाला असे काही लोक तिच्याच जुन्या लुकची मॉडेल्स घेऊन आले होते. त्यात ती जुनी इंजिने, निळी-पिवळी लिव्हरी (इंजिने-डब्यांचे एकच रंग व पॅटर्न), पांढरी-निळी "अ‍ॅम्ब्युलन्स" लिव्हरी हे सगळे आहे.

एरव्ही मुंबईतील स्टेशनांमधे गाड्या आजकाल स्लो करत असले, तरी त्या दिवशी ती दिमाखात दणाणत जाते. दादरहून प्रवास करणार्‍यांना हे लक्षात येईल की दादरला न थांबता अशा जाणार्‍या गाड्या पूर्वी तरी दोनच होत्या - एक पश्चिम रेल्वेची राजधानी व दुसरी डेक्कन. आता इतरही आहेत. या क्लिपमधे गाडी पुढे गेल्यावर जे "ट्रॅक साउण्ड्स" येतात ते मला अजूनही नॉस्टॅल्जिक करतात.

मध्यंतरी तिच्याकरता नवीन डिझाइन्स तयार केली गेली. त्यातले "पीकॉक थीम" चे डिझाइन आता तिच्या डब्यांकरता केलेले आहे. पण इंजिन त्याच रंगात असणार होते - ते अजून केलेले नाही. मध्य रेल्वेने मधे असेही जाहीर केले होते की पुश-पुल इंजिने वापरून तिचा वेगही वाढवला जाणार आहे. पण ते कोव्हिडच्या थोडे आधी. त्यानंतर त्यावर अजून काही झालेले दिसत नाही. पण या गाडीचा प्रवासी संघ आहे, ते लोक खूप प्रभावी आहेत, तिचा फॅनक्लबही प्रचंड आहे. त्यामुळे तिला पुन्हा एक हेरिटेज ट्रेन म्हणूनही अजून देखणी करतील अशी आशा आहे.

हे आज (१ जून) पुण्यातले यावर्षीचे सेलिब्रेशन! Enjoy! Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

लेख वाचायला सुरुवात केली नाही. पण काही दिवसांपूर्वी 1966 साली फिल्म इन्स्टिटय़ूटच्या विद्यार्थ्यांनी डेक्कन क्वीनवर बनवलेल्या फिल्मची लिंक मायबोलीवर कुठे तरी दिली होती. आता ती सापडत नाही.
इथे दिली तर रिलेव्हंट देखील होईल आणि सापडायला सोयीचे जाईल. लेखाच्या आशयाला पूरकच होईल असे वाटते.

या फिल्म मधे त्या वेळचे अनेक सेलेब्रिटी दिसतात.

https://youtu.be/3vcRKHJg8WI?si=krHWhtwcCK-pn2ns

छान स्मृतिरंजन..
सुट्टीच्या दिवशी निवांतपणे वाचतो. क्लीप्स सह..
माझा एक रेल्वेबाबत ठार वेडा मित्र होता. त्याच्याबद्दल पुन्हा कधीतरी किंवा तुमच्या प्रत्यक्ष भेटीत.
रचाकने, काल पुण्याहून माझ्या मित्राचे १८ मित्र डेक्कन क्वीनच्या पंचाहत्तराव्या वाढदिवसानिमित्त क्वीनने मुंबईला आले, दिवसभर जीवाची मुंबई केली आणि डेक्कननेच संध्याकाळी परत गेले..

फारेंड, छानच केलं लेखात समाविष्ट करून.
लेख आवडला मला. सिनेमाची पिसं काढणारा फारेंड, तुम्ही व्यवस्थित आहात का लिहिणारा फारएण्ड हे वेगवेगळे लोक वाटतात इतकी ट्रीटमेंट वेगळी असते.
हा लेख अमिताभ वेडाने लिहिलेल्या लेखासारखाच झाला आहे. पण व्यासंग लपत नाही. आणि किती सहजता असते.
लेख वाचतानाच जाणवतं.
क्लिप नंतर बघता येतील. खूप छान आणि संग्राह्य लेख आहे.
शेअर करायला परवानगी असावी.

सुंदर आणि समयोचित लेख.
<<एखाद्या बिझी रेल्वे स्टेशनवर मी कितीही वेळ रमतो.<<+1
शाळेत हिंदी विषयात 'रेल्वे स्टेशन पर एक घंटा' असे तत्सम विषय असायचे, रेल्वेस्टेशन वर गेल्यावर तसेच निरिक्षण करण्याची सवय लागली.

छान लेख, लेखात क्लिप्स घातल्याने आजुनच चांगला झाला आहे.
लहानपणी शालेय अभ्यासक्रमात एक कविता होती. त्यात डेक्कन क्वीन नी जाणार्या लोकाना घाटातले सौदर्य बघण्यात काही रस न्हवता फक्त गाडीतल्या लहान मुले बाहेर बघत होते अशा अर्थ होता. कवी आठवत नाहीत.

छान लेख.. व्हिडीओ घरून बघेन
डेक्कन क्वीनचे कौतुक पुणेकर भावंडे आणि मित्र यांना फार होते त्यामुळे मलाही अप्रूप होते. राजधानी नाव समजायच्या आधी हाच वेगाचा बेंचमार्क होता. त्याकाळी पुणे फार लांब वाटायचे तिथे रोज अप डाऊन करणारी ट्रेन म्हणून जसे ट्रेन चे कौतुक वाटायचे तसे आपल्या मुंबईत कुठून कुठून लोकं कामाला येतात याचेही वाटायचे.

छान लेख. तांत्रिक माहिती सुद्धा छान आहे,
आणि संदर्भासाठी दिलेल्या क्लिप्सच्या लिंक्स यामुळे लेख फारच रोचक झाला आहे.

डेक्कन क्वीन माझ्याही आवडीची.
डेक्कन क्वीन फॅन नाही पण ती आवडणारा आणि एक प्रवासी म्हणुन माझा अनुभव सांगतो.

१९९१ ते १९९३ दोन वर्षे दरम्यान पुण्यात नोकरीला असताना मला मुंबईला सारखे जावे लागे. तेव्हा कम्पनीने तर्फे मला पुणे-मुंबई रेल्वे पास मिळाला होता. आठवड्यातून तीन दिवस तरी मग मुंबईला अप-डाऊन करायचो, अर्थात डेक्कन क्वीन पहिला प्रेफरन्स असे. येताना तिच्या वेळे पर्यंत काम उरकून ती पकडणे यासाठी धावपळही केली आहे. मरोळ/सीप्झ, किंवा ठाणे MIDC मध्ये दुपार नंतर व्हिजिट असली की मग कर्जतला डेक्कन क्वीनच्या आधी पोचणारी डबल फास्ट लोकल ट्रेन कुर्ला किंवा ठाण्यावरून पकडण्यासाठी धडपडत असे. डेक्कन क्वीन मध्ये चीज टोस्ट छान मिळायचा आणि गरमागरम टोमॅटो सूप सुद्धा.
ही डौलदार गाडी पकडणे, लौकर पुण्यात पोचणे व चीज टोस्ट खाणे ही तीन करणे असत या धडपडीसाठी.
मग १९९१ अखेरीस प्रगती एक्स्प्रेस सुरू झाली. ही मुंबईहून डेक्कन क्वीनच्या अर्धा-पाऊण तास आधी निघुन पुण्यातही आधी पोहोचायची. तेवढीच फास्ट तेवढेच स्टॉप्स. पण डेक्कन क्वीन फॅन्समुळे आणि मुंबईत नोकरी करून पुण्याहुन अपडाऊन करणाऱ्यांना तिची मुंबईहुन सुटणारी वेळ सूट होत नसल्याने तिला एवढी प्रसिद्धी मिळाली नाही.
कधी दक्षिण मुंबईत असेन आणि काम लौकरच आटोपले की मग प्रगतीने येऊ लागलो लौकर पोचायला मिळणार म्हणुन.

पण डेक्कन क्वीन मध्ये पास धारकांच्या जागा ठरल्या असत, कुणी पत्ते खेळणारे, कुणी बुद्धीबळ त्यात पॅन्ट्रीकार मधून येणारे व इतर फेरीवाले यांची ओळख व त्यांना कोण काय घेणार हे माहिती असे त्याप्रमाणे ते स्वतःहुन सर्व्ह करत.
ज्यांना बसायला जागा मिळाली नाही अशा आमच्या सारख्या एकट्या पासधारकांनी कुठे उभे राहायचे याचे अलिखीत नियमही होते. ही मजा प्रगतीत नव्हती.

त्यात एकदा प्रगती आणि डेक्कन क्वीनची चांगलीच गंमत झाली. ती नंतर लिहितो.

जबरदस्त लिहिलेय ( आणि पर्फेक्ट टायमिंग) ! सुपर फॅन तर दिसतोच आहे वाक्या वाक्यात पण खरंच काय तो व्यासंग !! आता या क्लिप्स निवांत बघते. डेक्कन क्वीन चे ग्लॅमर होतेच असे . बहुधा ते पुणेकरांना जास्त असावे. लहानपणी त्या " दख्खन च्या गं राणी मला मुंबईला जायचंय" या गाण्यातून ओळख झाल्यापासून कधी त्या गाडीत बसायला मिळेल असे वाटायचे!!

फारच सुंदर लेख, एकदम अभ्यासपूर्ण स्मरणरंजन. आम्हालाही डेक्कन क्वीन म्हणजे एकदम प्रतिष्ठित गाडी वाटत असे. एकदाच बसायचा योग आला आहे. रेल्वे प्रवास आवडत असे म्हणून काही वर्षापूर्वी तिकिटे रिझर्व्ह करून मुंबई पुणे प्रवास केला डेक्कन एक्सप्रेस ने. पण त्यात एवढी बेसुमार गर्दी झाली होती की नंतर परत काही वर्षे रेल्वे वर फुलीच मारली होती लांबच्या प्रवासासाठी.

सुंदर लेख.

मधे मधे क्लिप्सच्या ऐवजी छायाचित्रे असती तर अजून छान वाटले असते. त्या ओपन करून, जाहिराती बघून, क्लिप बघून परत येण्यात जरा लिंक तुटत होती.

डेक्कन क्वीनचा फॅन क्लब मोठाच आहे. Express highway झाल्यावर बरेच जण बस व कार ने जायला लागले पण त्याआधी डेक्कन क्वीन ने प्रवास म्हणजे पर्वणी होती.

माझे बाबा मुंबईला नोकरीला असताना आम्ही फॅमिली फ्रेंड्स डेक्कन क्वीन ने मुंबईला गेलो होतो तेही अगदी पावसाळ्यात. टिनेज मधे केलेल्या त्या प्रवासात पाहिलेला लोणावळा खंडाळा अजूनही डोळ्यासमोर आहे. हि डेक्कन क्वीन ची पहिली ओळख.

लेखात आलेला daily commuters चा अनुभव पण काही काळ घेतला. बाबा काही काळ रोज अप डाऊन करायचे. डबा, बोगी, सिट सगळे ठरलेले. रोजचे येणारे जाणारे, त्यांच्यासोबत अगदी घरच्यांसारखे संबंध तयार होतात. तो सगळा गृप आमच्या घरी एकदा आला होता. त्या भेटीचे फोटो आजपण घरी आहेत.
बाबांनी अप डाऊन बंद केल्यावर जवळ जवळ सात आठ वर्षांनी मला काही कारणास्तव अप डाऊन करायचे होते. मी पास काढल्यावर पहिल्या दिवशी बाबा ट्रेनमधे बसवायला आले. त्यांच्या गृपला भेटले. माझी ओळख करून दिली. मग मी तो प्रवास काही काळ केला. रोज काही न करता माझ्यासाठी सीट रिझर्व्हर्ड ठेवली जाऊ लागली. त्या रोजच्या प्रवासातले सवंगडी, किस्से, मजा आजपण आठवतात.

पोस्ट विस्कळीत झाली. असो.

फा च्या लेखामुळे परत त्या काळात फिरून आलो.

छान लेख
रेल्वे, क्रिकेट, चित्रपट विषयी लिहिताना तुझ्यामधील फॅन दिसतोच

डोंबिवली प्लॅटफॉर्मवर उभं असताना धडधडत जाताना पाहिली आहे पण कधीही प्रवास केलेला नाही. मुळात पुण्यात जाणं नसल्यावर कशाला लागेल ही गाडी?
बायदवे, >> छुपाना भी नहीं आता, जाताना भी नहीं आता>> हे ‘जताना‘ करायला हवं आहे.

ज्यांना बसायला जागा मिळाली नाही अशा आमच्या सारख्या एकट्या पासधारकांनी कुठे उभे राहायचे याचे अलिखीत नियमही होते. >>>>

Lol

पास धारकांचे अनेक अलिखित नियम असतात, वाऱ्याची खिडकी कोणाची, वाऱ्याच्या बाजूला दोन नंबर सीट कोणाची, विरुद्ध बाजूच्या खिडकीची सीट कोणाची. कोण कुठे उतरल्यावर तिथे कोण बसणार वगैरे.

पत्ते खेळणारे गृपपण फार दिसायचे.

छान लेख...
खात्री पटली डेक्कन तुमचं क्रश आहे...
मुंबईत सर्व लोकल तिचे नित्याचे प्रवासी दरवर्षी दस-याला सजवतात . पुजा करतात. अल्पोपहारही असतो. मज्जानू लाईफ.

एकेकाळी हे बालगीत खूप आवडतं होतं मुलांचं.
https://youtu.be/fAfVGRUQTHs?si=1UEBn5YCCg__l46l

सुरेख झाला आहे लेख. रंजक, माहितीपूर्ण व प्रसन्न शैलीत तर आहेच, शिवाय थोडे पर्सनलाईज करून वाचकांना या पॅशनमधे सामील करून घेतले आहे. जवळजवळ सगळ्या लिंक्स थोड्या का होईना पाहिल्या. मलाही ते लोकमान्य इंजिन आणि रॉयल ब्लू कलरची राणी सर्वात जास्त आवडली. लोको पायलटना दिला जाणारा मान व ती परंपरा आवडली. डबल डेकरची कल्पना माझ्यासाठी नवीन होती. इकोसिस्टीम ते माईन्डशेअरींग - इंटरेस्टिंग आहे. इतर वाहनांनी केलेल्या प्रवासापेक्षाही रेल्वेप्रवासाला स्वतःचा असा काहीतरी चार्म आहेच, जो कधीही ओसरत नाही.

दख्खनच्या राणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा. Happy

भारी! काय व्यासंग, काय व्यासंग!!

रेलफॅनिंग हा शब्द प्रथमच कळला मला - घरात सॅम्पल्स आहेत, पण हे नाव माहीत नव्हतं.
आगगाडीच्या प्रवासाची जादू निराळी आहे हे खरंच, तो मलाही आवडतो. पण नुसतं खिडकीत/व्हरान्ड्यात बसून - नंतर टेपवरही - येणार्‍याजाणार्‍या ट्रेन्स काय बघायच्या असं मला वाटायचं!
पण ही सॅम्पल्स ते तासनतास करू शकतात. ती विस्टाडोमची क्लिप खरंच मस्त आहे - पाठवेन त्यांना.

खूप सुंदर झाला आहे लेख. डेक्कन क्वीन माझी ही खूप लाडकी. इंग्रजाळलेली पुण्याची मुलं तिचा उल्लेख कायम डी क्यू असा करत असतं. पुण्याला कायम एक नंबर (जिना नको चढायला बाहेर पडताना ) आणि व्हीटी ला कायम आठ नंबर. तिची जागा फिक्स होती.
संध्याकाळी पाच दहा म्हणजे पाच दहा ला सुटणारच.त्या आधी पाच ची अंबरनाथ फास्ट मुलुंड ला स्लो ट्रॅक वर घेत असत. ती लोकल मुलुंड ठाणे कधी कधी रखडत असे. तेव्हा तिकडे फास्ट ट्रॅक वरून डेक्कन क्वीन धडधडत जात असे. मी कधी कधी दोन नंबर प्लॅटफॉर्म वर मुद्दाम उभी रहात असे ती बघायला. सकाळी मात्र आमची ठाणा फास्ट डेक्कन क्वीन साठी अडवून ठेवत तेव्हा राग यायचा तिचा.
डेक्कन क्वीन मधला ब्रेकफास्ट ही तेवढाच प्रेस्टिजियस होता. बेक्ड बीन्स हा प्रकार मी पहिल्यांदा डेक्कन क्वीन च्या ब्रेकफास्ट मध्येच खाल्ला होता. डेक्कन क्वीन ला नुसतं डेक्कन कधी नाही म्हणायचं कायम क्वीन् लावायच पुढे कारण आणखी एक डेक्कन एक्सप्रेस पण आहे ना रडत खडत सगळी स्टेशनं घेत पुण्याला जाणारी.

" असा व्यासंग करायची इच्छा आहे "
" अं .. या विषयावर आपल्याशी चर्चा करायची आहे " Happy

'फा' रच छान लिहिलंय.
लिहिते रहा. वाचायला आम्ही आहोतच.

काय अभ्यास! काय फँडम!!

मला हे सगळं करायचं बघायचं आहे यार. शेजारीच आहे, आणि तरी तुमच्यासारखे जळवतात..

फा _/\_
तुला ट्रेन्सचं वेड आहे हे माहिती होतं पण फॅसिनेशन सोबत इतका अभ्यास आहे हे नव्हतं ठाऊक Happy छान झालाय लेख. पुन्हा एकदा डेक्कन क्वीनने प्रवास करावासा वाटला.

वाह, सुरेख, रोचक लेख.

मला एकदम ' दख्खनच्या राणी तू नेतेस का मला, पेशवे पुणे पहायचे मला ' गाणं आठवलं.

लहानपणी तिसरीत असताना भावाच्या मुंजीसाठी पुण्याला गेलेलो त्याने मग बसने आळंदीला गेलेलो ते आठवलं. माहेरचे कोणी नातेवाईक आईचे चुलत काका काकू सोडल्यास पुण्यात नसल्याने नंतर जाणं कधी झालं नाही. लग्न झाल्यावर सासरचे भरमसाठ नातेवाईक पुण्यात असल्याने तुरळक प्रमाणात का होईना जाणं व्हायचं डेक्कन कवीनने पुण्यात. गाडीत असताना खंडाळा घाटाचे फेमस गाणं आठवायचं.

मस्त लिहिलंय.

रेल्वे प्लॅटफॉर्मवर उभं राहून धडधडत जाणार्‍या ट्रेन्स बघायला मलाही अतिशय आवडतं.

गेली काही वर्षं मात्र डेक्कन क्वीन किंवा इतर कोणत्याही मुंबई-पुणे ट्रेन्सनी फारसा प्रवास घडलेला नाही. अपवाद वंदे भारत. त्याला कारण त्याचं रिझर्वेशन ऐनवेळीही मिळतं. इतर ट्रेन्स कायम फुल असतात.

Pages