
कॉर्बेटच्या वाटांवर.. ढिकाला- जंगल सफारी -०१
बऱ्याच दिवसात कुठली जंगल सफारी झाली नव्हती. कोरोनाचा काळ अगदीच भाकड गेला होता.
त्यानंतर लॉकडाऊन मधल्या तुंबलेल्या कामांची रांग लागली होती.
आमच्या नेहमी एकत्र जाणाऱ्या ग्रुप्सपैकी एका ग्रुपचं कुठेतरी जाऊया, कुठेतरी जाऊया.. असं बोलणं चाललं होतं.
2022 जानेवारीपासून मे, दिवाळी, क्रिसमस असं होता होता शेवटी मार्च 2023 मध्ये ढिकाला ला जायचं ठरलं.
एका मित्राने बुकिंग्जची सर्व जबाबदारी उचलली आणि सफारीचं बुकिंग, हॉटेल्स बुकिंग, विमानाचं बुकिंग असं सगळं काम पार पाडलं.
ऐन मार्चच्या मध्यात जायचं ठरलं होतं. मार्च एंडिंगची काम होतीच, पण कसंही करून जायचं हे मात्र नक्की होतं.
पहिला टप्पा होता मुंबई दिल्ली विमान प्रवासाचा आणि दिल्लीवरून पुढचा टप्पा होता कॉर्बेट मचाण रिसॉर्ट, रामनगर.
हा जवळजवळ पाच सव्वा पाच तासाचा रस्ता होता आणि मध्ये पाऊण तास जेवणाचा पकडला तर सहा तास लागणार होते. आमच्या गाडीचा ड्रायव्हर एकदम मस्त कलंदर होता.
वाटेत ज्या ठिकाणी चांगलं नॉनव्हेज मिळेल तिथे जेवायला थांबू असं त्याला सांगितलं होतं. प्रवासातले पहिले दोन तास जे ढाबे लागले ते सगळे शिव ढाबे होते म्हणजे थोडक्यात प्युअर व्हेज.
पण नॉनव्हेज हवंय कळल्यावर तो म्हणाला, दिड, दोन तास थांबायची तयारी असेल तर एका मस्त चांगल्या ठिकाणी नेतो.
त्याने गाडी उभी केली ती प्रसिद्ध करीम मोगलाई स्पेशल सिन्स-१९३१ कडे..
प्रचि -०१ : करीम..
प्रचि -०२ : त्याच्या आवारात होता हा मादक सुवासाचा गावठी गुलाब..
तिथे व्यवस्थित जेवण झालं. जेवण अप्रतिम होतं.
प्र. चि. -०३ : हा त्यांच्या हॉटेलमध्ये, त्यांच्या हॉटेलचं पुरातनपण दाखवणारा भिंतीवर टांगलेला फोटो..
त्यानंतर आमचा पुढचा प्रवास सुरू झाला. दिल्ली रामनगर हायवे वरती काही काम सुरू असल्यामुळे ड्रायव्हरने गाडी एका आतल्या रस्त्यावरुन काढली. हा रस्ता तेवढा रुंद नव्हता पण वाटेत लागणारी गावं, शेतं, झाडं यामुळे हायवेसारखा रुक्ष आणि निरस न वाटता लाईव्हली वाटत होता.
रस्ता आणि शेत याच्यामधून एक कालवा जात होता. सध्या त्याच्यात पाणी नव्हतं पण गरजेनुसार सोडत असावेत.
प्र. चि-०४ :
बऱ्याच वेळानंतर उत्तर प्रदेशची सीमा ओलांडून आम्ही उत्तराखंडमध्ये प्रवेश केला. रस्त्यावरची दिसणारी एक विशेष गोष्ट म्हणजे संपूर्ण उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये जी जी आंब्याची झाडं दिसत होती ती अफाट मोहराने लगडली होती. आंब्याला आलेला एवढा मोहर मी आधी कधीही पाहिला नव्हता. जिथे आंब्याच्या झाडांची दाटी असायची तिथे गाडीची काच खाली केल्यावर एक धुंद करणारा मोहराचा वास दरवळायचा. वाटेत एका ठिकाणी ड्रायव्हरला सांगून त्याच्याच कृपेने एक चहाचा ब्रेक घेतला.
हे जे ठिकाण होतं ते एकदम यंग फॅमिली वाल्यांसाठी असावं, कारण त्याच्या गेट पाशी आणि आवारात कॉर्बेट मधल्या तर जाऊ दे पण आफ्रिकेतल्या प्राण्यांचीपण रेलचेल होती. आमची मुलं आता मोठी झाली आहेत, पण त्यांचं लहानपण आठवून काही स्नॅप्स मारलेच आणि लगोलग त्यांनाही पाठवले.
प्र. चि. -०५ :
साधारणपणे पावणे सहा वाजता कॉर्बेट मचाण या रिसॉर्ट वरती पोहोचलो. आमची बुक केलेली कॉटेज छान दगडी बांधकामाची आणि प्रशस्त होती.
प्र. चि. -०६ :
इथे फक्त एक रात्र मुक्काम असणार होता आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आमची रवानगी जिम कार्बेट मधल्या ढिकाला या ठिकाणी होणार होती.
आकाशात बेमौसमी ढग दाटून आले होते, त्याचा काळोख आणि रिसॉर्ट मध्ये लावलेले छोटेसे दिवे याच्यामुळे माहोल एकदम जबरदस्त बनला होता.
आणि त्यामुळे आमच्यातल्या तीन वारुणीप्रेमी मित्रांचं रसिकत्व जागं झालं होतं..
(असा माहौल नसता तरीही त्यांनी तो बनवला असताच, ही बाब अलाहिदा.)
त्या रात्री जबरदस्त पाऊस पडला त्यामुळे टेंपरेचर एकदम खाली गेलं होतं. रात्रीची फ्लाईट, दिवसभराचा प्रवास आणि पावसामुळे थंड झालेलं वातावरण त्यामुळे छान गाढ झोप झाली. मित्रांची झोप तर विशेष गाढ होती..
दुसऱ्या दिवशी आमची गाडी साडेदहा अकरा वाजता म्हणजेच जरा आरामात येणार होती त्यामुळे आम्ही आन्हिकं वगैरे आटपून रिसॉर्टच्या आवारातले काही पक्षी टिपले.
प्र. चि. -०७ :
हॉटेल रूमच्या बाल्कनीतून टिपलेला हा दयाळ..
प्र. चि. -०८ :
आणि हा जांभळा शिंजीर Purple sunbird..
प्र. चि. -०९ :
हा Chestnut-tailed Starling..
प्र. चि. -१० :
किती खाऊ नी कसं खाऊ..?? या विचारात पडलेला हा बुलबुल..
अकरा वाजता आमची जिप्सी रामनगर वरून ढिकालासाठी निघाली. पहिला मुक्काम होता धनगढी गेट.
या ठिकाणी आम्हाला प्रवेश शुल्क भरायला लागलं. तिथे बऱ्याच गाड्यांची रांग लागली होती.
प्रवेश शुल्क भरायच्या केबिनसमोरच एक सुव्हेनिर शॉप होतं. थोडा वेळ होता म्हणून तिथेच थोडी खरेदी आटपून टाकली.
प्र. चि. -११ अ : धनगढी गेटजवळ जिम काॅर्बेट अभयारण्य आणि त्यातले वेगवेगळे विभाग दर्शवणारा फलक.
प्र. चि. -११ ब :
स्थानिक मटेरियलने शाकारलेलं हे तिथलं कॅन्टीन आणि बाजूला प्रवेश कार्यालय..
प्र. चि. -१२ :
प्रवेशशुल्क भरण्याच्या प्रतिक्षेत सफारी व्हेईकलला टेकून उभा असलेला एक टुरिस्ट..
आता आमचा धनगढी गेट ते ढिकाला गेस्ट हाऊस असा प्रवास सुरू झाला. रस्ता थोडा ओबडधोबड होता. पण जंगल अगदी दाट होतं.
प्र. चि. -१३ :
डोक्यावर झाडांची हिरवी कॅनोपी होती.
प्र. चि. -१४ :
वाटेत नदीचं रिकामं पात्र जागोजागी लागत होतं. बऱ्याच वेळा त्याच्यावरुनच तात्पुरता रस्ता बनवला होता आणि त्या रस्त्याने गाडी रिकामं नदीपात्र ओलांडत होती.
विशेष म्हणजे संपूर्ण नदीपात्र पांढऱ्या मोठ्या गोल दगड गोट्याने भरलं होतं. असे पांढरे दगड आपल्या महाराष्ट्रातल्या नदीपात्रात मी तरी कधी बघितले नव्हते.
प्र. चि. -१५ :
ही काॅर्बेटमधली लँडस्केपस् आपल्या महाराष्ट्रातपेक्षा एकदम वेगळीच वाटतात. आपल्याकडे लाल/तांबडी किंवा काळी माती आणि काळे करंद दगड, पाषाण.
टोकदार, करकरीत बाजू असलेले, एकदम कठीण.
कारण हे अग्निजन्य, पृथ्वीच्या पोटातून वर आलेले, लाव्हारसाचे. मातीही त्यांच्यापासूनच बनलेली.
इथली माती फिकी आणि दगड पांढरे, बदामी, हलक्या तपकीरी छटांचे.
तुलनेने मृदू असावेत कारण कंगोरे नाहीत. गोल, लांबट, गुळगुळीत गोटे. वाऱ्याने, पाण्याने तासलेले.
आणि मृदू असणारच, कारण हे हिमालयातले पाषाण, जो जगातला तरुण पर्वत, तुलनेने ठिसूळ दगडाचा..
पण ह्या उजळ रंगाच्या, अ-कठीण भासणाऱ्या दगडांमुळे, पांढरट वाळूच्या नदीपात्रांमुळे ह्या लँडस्केप्सना एकंदरीतच एक मृदुता आली आहे, वेगळेपण आले आहे. आपल्या महाराष्ट्रातून आलेल्या लोकांना हा फरक पटकन जाणवतो.
अर्थातच प्रत्येक लँडस्केपची आपापली मजा आणि खासियत वेगळी.
प्र. चि. -१६ :
सुरुवातीलाच एका झाडावर दिसला एक सर्प गरुड..
Crested serpent eagle..
हरणं अधून मधून दिसत होती. माकडंही होतीच.
अशातच आमच्या ड्रायव्हरने गाडी थांबवून एका झाडाकडे बोट दाखवलं तिथे एक घुबड आळसावून निवांतपणे बसलं होतं. हे बहुतेक त्याचं घर असावं आणि म्हणून ड्रायव्हरला ते इथे हमखास असणार हे माहीत होतं.
प्र. चि. -१७ :
आणि ते होतंही अगदी
"आते जाते हुए मै
सबपे नज़र रखता हूँ.." या स्टाईल मध्ये..
त्याचा हा दुसऱ्या बाजूने फोटो..
प्र. चि. -१८ :
Camouflage... Camouflage..
जंगला मधला छान रस्ता पार करत आम्ही ढिकाला गेस्ट हाऊसला पावणेदोन वाजता पोहोचलो.
ढिकाला गेस्ट हाऊसची खासियत ही की ते काॅर्बेटच्या कोअर एरियात वसलेल्या तीन गेस्टहाऊस पैकी आहे आणि सर्व सुखसोईयुक्त आहे.
कारण खिनौली जास्त करुन सरकारी अधिकाऱ्यांसाठी राखीव आहे तर सर्पदुली ला सुखसोई अगदीच कमी आहेत.
बाकी गेस्टहाऊसेस कोअर क्षेत्राच्या बाहेर आणि खाजगी हाॅटेल्स तर अभयारण्याच्याही बाहेर.
कोअर क्षेत्रात असण्याचा फायदा हा की पार्क राउंडसाठी तुम्ही गेटच्या बाहेर पडल्या पडल्या जंगल चालू होतं.
इतर ठिकाणच्या टुरिस्ट्सना त्यासाठी १०, १५ किलोमीटरचा प्रवास करायला लागतो. खाजगी हाॅटेल्स मधल्यांना तर त्याहूनही जास्त.
सफारी राईड पार्क राऊंड्स सव्वा दोनला सुरू होतात. त्यामुळे रजिस्ट्रेशन करणं, चाव्या घेणं, सामान टाकणं आणि जेवून घेणं यासाठी फक्त 25 मिनिटे होती.
वेळ नसल्यामुळे सामान रिसेप्शन एरियामधेच ठेवून आम्ही डायनिंग हॉल जवळ गेलो. समोर प्रशस्त अंगण होतं. त्याच्यापुढे लाकडाचा व्ह्युईंग गॅलरीचा कट्टा होता. आणि त्या गॅलरी मधून बऱ्यापैकी खाली वाहत जाणाऱ्या रामगंगा नदीचं पात्र आणि वाळूचा नदीकाठ दिसत होता.
त्या काठावरती तीन हत्तींचा छोटासा कळप फिरत होता.
एखाद दोन फोटो त्यांचेही काढून मग घाईघाईतच जेवणासाठी गेलो.
बुफे जेवण साधंच पण रुचकर होतं.
त्यानंतर पटकन आम्ही आमच्या जिप्सीमधे जाऊन बसलो आणि आमची पहिली पार्क राउंड सुरु झाली.
आमच्या जिप्सीच्या ड्रायव्हरने आम्हाला हॉटेलपासून जवळच असलेल्या दाट झाडीतल्या, खाली दाट पानगळ झालेल्या आणि एका अंधाऱ्या जागेमध्ये गाडी नेली.
इथे बऱ्याच वेळेला एक वाघीण, ‘पेडवाली वाघीण’ हे तिचं नाव; असते म्हणे..
ती काही तिथे नव्हती पण नंतरही ड्रायव्हरने पुढच्या सकाळ संध्याकाळच्या प्रत्येक पार्क राउंडच्या वेळी आधी गाडी इथेच आणली आणि मगच पुढची पार्क राउंड चालू केली. आमच्या मते हा त्याच्या शुभशकुनाचा काहीतरी भाग असावा.
प्र. चि. -१९ :
सुरुवातीलाच रस्त्यावर आली ही चितळ मादी.
तिला बिचारीला रस्ता ओलांडायचा होता म्हणून आम्ही थांबलो. म्हटलं, जा बाई निवांत.. आणि तिने पण विश्वास ठेवून शांतपणे रस्ता ओलांडला.
इथे या जंगलामध्ये प्रत्येक ड्रायव्हर, प्रत्येक गाईड हे नॉर्म्स अतिशय रिलिजियसली पाळतात आणि त्यामुळे अशा जीप गाड्या आणि जंगलामधले प्राणी यांच्यामध्ये एक साहचर्य निर्माण झालेलं आहे. प्राण्यांना माहिती असतं की त्यांचा मान इथे पहिला आहे.
दे ॲक्चुअली नो, दे आर द फर्स्ट प्रायाॅरिटी.
यानंतर आम्ही जवळपासच्या रस्त्यांवरनं प्रवास केला पण विशेष काही प्राणी दिसले नाहीत.
मग ड्रायव्हरने गाडी वळवली ती रामगंगा नदीच्या बाजूबाजूच्या रस्त्याने. मग एका ठिकाणी लाकडी फळ्यांपासून बनवलेल्या पुलावरून आम्ही रामगंगा नदीचं पात्र ओलांडलं.
प्र. चि. -२० :
प्र. चि. -२१ :
मार्च महिना असल्यामुळे नदीला तसं कमी पाणी होतं आणि तिचं पांढऱ्या दगडगोट्यांचं बरंचसं पात्र उघडं पडलं होतं.
या नदीपात्राच्या काही खोलगट भागात पाणी साठलेलं आहे आणि आजूबाजूच्या डोंगरांवरून त्याला थोडा थोडा पाण्याचा पुरवठाही होत असतो.
आत्ता जे उघडं झालेलं पात्र दिसतंय ते पावसाळ्यात पूर्ण पाण्याखाली असतं. सफारी चार ते पाच महिने पूर्णपणे बंद असतात. आणि आत्ता गाड्या ज्या रस्त्यांवरून फिरतात ते रस्तेही पाण्याखाली गेलेले असतात.
दरवर्षी पाणी ओसरलं की हे दगड मातीचे रस्ते पुन्हा आखले जातात, बनवले जातात आणि मग सफारी सुरू होतात.
प्र. चि. -२२ :
पात्रामधल्या अशाच एका दगडावर उन्ह खात बसलेली ही चार कासवं..
प्र. चि. -२३ :
दगड गोट्यांचा क्लोज-अप..
प्र. चि. -२४ :
आणि अशाच दगडांमधून वाट काढणारी ही टिटवी
River Lapwing..
प्र. चि. -२५ :
याच पाण्यातल्या माशांवर नजर ठेवून असलेला हा खंड्या पक्षी. Crested Kingfisher..
प्र. चि. -२६ :
मातीच्या रस्त्यावर झुडपांच्या मागून अचानक पुढे आलेला हा रान कोंबडा. Red Jungle Fowl..
प्र. चि. -२७ :
आणि हे आईच्या थोडसं मागे राहिलेलं चितळ शावक..
प्र. चि. -२८ :
दुपारची सफारी शार्प सव्वा दोन ला सुरू होते आणि शार्प सव्वा सहा वाजता संपते. यायला एक मिनिटही उशीर झाला तर ती गाडी आणि तो ड्रायव्हर सात दिवसांसाठी बंद केले जातात. अर्थात पर्यटकांचं नुकसान होऊ नये म्हणून त्यांच्या हातातली ती ती टूर पूर्ण झाल्यानंतर या शिक्षेची अंमलबजावणी होते. त्यामुळे सगळे ड्रायव्हर वेळेच्या दोन-चार मिनिटे आधीच पोहोचू, अशा हिशोबाने फिरणं आखतात.
ती परतीची वेळ गाठण्यापूर्वी जिथे वाघ असण्याची शक्यता आहे अशा चौराह्यावरती शेवटची नजर मारणाऱ्या या गाड्या..
प्र. चि. -२९ :
पहिले दिन की ढलती शाम..
संध्यारंग आणि सदैव आशा अमर असणारे पर्यटक..
प्र. चि. -30 :
दुसऱ्या दिवशी सकाळी सव्वासहाला गेट बाहेर पडण्याच्या तयारीत थांबलेल्या गाड्या..
रुममधून बाहेर पडलो तर थंडी मी म्हणत होती. जंगलामधली थंडी आणि रात्री झालेला थोडासा पाऊस यांनी त्या थंडीची तीव्रता अजूनच वाढवली होती. सगळे लोकं नखशिखांत गरम कपड्यात गुरफटलेले होते.
त्या उघड्या जिप्सीमधून प्रवास सुरू झाल्यावर तर गारठा भयंकर वाढला..
या ड्रायव्हर लोकांचं नेटवर्क एकदम जबरदस्त असतं. आमचा ड्रायव्हर गाडी बाहेर पडल्या पडल्या म्हणाला की रामगंगा तळ्यापाशी वाघाचे मोठे पगमार्क्स दिसलेयत म्हणून, तर तिथे एक चक्कर मारू आणि मग पुढे जाऊ. पंधरा मिनिटाच्या थंडीने प्रचंड कुडकुडणाऱ्या प्रवासानंतर आम्हाला दुरुनच रामगंगा तलावाच्या काठावरच्या कुरणाच्या रस्त्यावरती पाच सहा गाड्या शेजारी शेजारी दिसल्या. आमच्या ड्रायव्हरने स्पीड अजूनच वाढवला साहजिकच थंडीची बोच अजूनच वाढली. त्या गाड्यांच्या जवळ पोहोचल्यावर मात्र त्याने वेग कमी केला आणि हळूहळू सगळ्यात शेवटच्या गाडीच्या मागे थांबला.
कुरणामध्ये व्याघ्र महोदय बसले असल्याची ग्वाही आधी आलेल्या भालदार चोपदारांनी दिली.
गाडी थांबल्यामुळे आधीच्या प्रवासात वाजलेली भयानक थंडी, आजूबाजूची हवा तशी थंड असली तरी आता वाजेनाशी झाली होती.
तापमानात विशेष काही बदल नसला तरीही आधीच्या प्रवासात अनुभवलेल्या बेफाट थंडीमुळे, आता थांबलेल्या गाडीमध्ये तीच थंडी एवढी जाणवत नव्हती.
वाघ असल्याच्या बातमीमुळे थोडी उबही आली असेल कदाचित.
कॅमेरे सरसावण्यात आले पण नेम कुठे धरायचा तेच अजून कळत नव्हतं.
एवढ्यातच वाघ बसल्याची नेमकी जागा कळली, कॅमेरा रोखण्यात आला आणि निघाला तृणपात्यांमधून डोकावणारा वाघाचा इमोटीकाॅन..
प्रचि- ३१ :
जरा वेळाने त्याने एक जांभई दिली आणि तो उठून चालायला लागला.
प्रचि- ३२ : व्याघ्र जांभई..
त्या वाघाचे टिपलेले हे वेगवेगळे प्रचि.
प्रचि- ३३ :
एक शेर अर्ज कर रहा हूँ..
मुलाहिजा गौर फर्माईयेगा…
हा वाघ चालताना एवढा आणि असा वळून वळून चालत होता की जसं काही एखाद्या सौंदर्यस्पर्धेत भाग घेणाऱ्याने आपलं शरीरसौष्ठव परीक्षकांना आणि प्रेक्षकांना वेगवेगळ्या कोनातून दाखवून मंत्रमुग्ध करावं.. आणि आपली छाप पाडावी.
प्रचि- ३४ :
प्रचि- ३५ :
प्रचि- ३६ :
तसा एरवी मी शांतच असतो..
प्रचि- ३७ :
मखमली… वेल्व्हेटी…
प्रचि- ३८ :
आ.. देखे जरा...
किसमे कितना है दम…
प्रचि- ३९ :
पाठमोरा..
प्रचि- ४० :
Incomplete Yet Beautiful..
प्रचि- ४१ :
Yawn.... कंटाळा आला बुवा..
प्रचि- ४२ :
You Are Under My Surveillance..
प्रचि- ४३ :
जलाशय, कुरण आणि वाघ - ०१
प्रचि- ४४ :
जलाशय, कुरण आणि वाघ - ०२
आता वाघ असल्याची बातमी लागलेल्या इतर गाड्यांचीही गर्दी व्हायला लागली होती. आणि वाघ महाराजही जरा लांबवर गेले होते.
म्हणून आमच्या गाडीचालकाने तिथून निघायचा प्रस्ताव पुढे ठेवला आणि आम्हीही त्याला मम् म्हणून जिप्सीचा मोहरा दुसर्या रस्त्यावर वळवला..
क्रमशः
शेरखान
शेरखान
वॉव, मस्तच. सगळेच फोटो मस्त
वॉव, मस्तच. सगळेच फोटो मस्त. पुढील लेखाच्या प्रतिक्षेत.
वाव… फोटो व लिखाण दोन्ही
वाव… फोटो व लिखाण दोन्ही मस्त. पुढचे भाग पटापट येऊ द्या. पहिल्या दिवशी वाघ दिसला. लकी आहात.
मस्तच, लिखाण आणि फोटो दोन्ही
मस्तच, लिखाण आणि फोटो दोन्ही छान
खरंच लकी आहात..आम्ही दोन
खरंच लकी आहात..आम्ही दोन सफाऱ्या केल्या..पण no वाघ दर्शन..अर्थात आम्ही ढिकला la नाही गेलो.
फोटो अफाट सुंदर आहेत..लिहिण्याची शैली पण आवडली..
फोटो सुंद र. लेख वाचते.
फोटो सुंद र. लेख वाचते.
फोटो सुंदर आले आहेत. स्पेशली
फोटो सुंदर आले आहेत. स्पेशली वाघोबांचे…
लिखाण पण आवडले.
पुढील भागाच्या प्रतिक्षेत…
लेख इतका सुंदर आहे की मी पण
लेख इतका सुंदर आहे की मी पण vicariously ढिकालाची सफर करून आलो.
सुरेख फोटोज आहेत. जंगलाच
सुरेख फोटोज आहेत. जंगलाच गारूड कधीच कमी होत नाही.
व्वा!
व्वा!
अप्रतिम फोटो आणि सुंदर, चित्रदर्शी लेख.
वाघ दिसला तर... तुम्ही बाकी जंगलाचं, पक्ष्यांचं, इतर प्राण्याचं वर्णन छान केलं आहे. ते आवडलं.
फोटो तर सगळेच अप्रतिम आहेत. पण प्र चि ४३ जास्त आवडला.
पुढील भागाच्या प्रतिक्षेत...
आहाहा फोटो बघितले पटपट.
आहाहा फोटो बघितले पटपट. दुपारी सविस्तर वाचते.
मिसिंग जंगल
अप्रतिम फोटो !
अप्रतिम फोटो !
लेख वाचला नाही अजून..
क्या बात है! मस्त मस्त मस्त!
क्या बात है! मस्त मस्त मस्त! फोटो, वर्णन, सगळंच सुंदर. पुढचे भाग पटापट येऊद्यात.
निरू, लेख मस्त आणि फोटो तर
निरू, लेख मस्त आणि फोटो तर सगळेच अप्रतिम. . खूप फोटो असल्याने जास्तच मजा आली.
वाह ! जबरदस्त! वाघाचे फोटो
वाह ! जबरदस्त! वाघाचे फोटो भारी आहेत.
बिजरानीला पण गेस्ट हाऊस आहे.. आम्ही तिथे राहिलो होतो. धिकालाचं बुकिंग मिळालं नाही म्हणून. तिथेही खूप दाट जंगल होतं.
मस्त सुरुवात. अप्रतिम लिखाण
मस्त सुरुवात. अप्रतिम लिखाण आणि सुंदर फोटो !
पहिल्या दिवशी वाघ दिसला. लकी
पहिल्या दिवशी वाघ दिसला. लकी !!
+ १
फोटो तर टॉप नॉच ❤
लिखाण व फोटो दोन्ही अप्रतिम!
लिखाण व फोटो दोन्ही अप्रतिम!
खूप सुंदर फोटो आणि वर्णनही
खूप सुंदर फोटो आणि वर्णनही छान.
वाघाचं मखमली व्याघ्रचर्म अगदी उठून दिसतंय फोटोत .
वरती फोटो आवडले हे लिहीले
वरती फोटो आवडले हे लिहीले आहेच, लेखही मस्त झालाय.
>>>>एक शेर अर्ज कर रहा हूँ..
मुलाहिजा गौर फर्माईयेगा…
हाहाहा हे भारी आहे.
फोटो अफाट सुंदर आहेत.
फोटो अफाट सुंदर आहेत..लिहिण्याची शैली पण आवडली.. >>>> +999
भारीच सफारी ,
भारीच सफारी ,
प्र.ची. आनि लिखाण
मस्त....
लिखाण आणि फोटो दोन्हीही सुंदर
लिखाण आणि फोटो दोन्हीही सुंदर !!
नदीपात्रातल्या दगडगोट्यांचा
नदीपात्रातल्या दगडगोट्यांचा क्लोज-अप फार्फार आवडला.
वा मस्त लिहिलय. अगदी जंगल उभं
वा मस्त लिहिलय. अगदी जंगल उभं राहिलं आसपास. कॉर्बेटमधे वाघ दिसणं खरच नशीबवान!
चितळमादीचा फोटो फार आवडला. असे हॅबिटाटमधले फोटो फार सुकून देतात. सोबत उनसावलीचा खेळ.
पक्षांचे फोटो खूपच सुंदर. कुठला कॅमेरा, लेन्स? खूपच भारी काढलेत.
वाघाला नुसतं पहाणं अन त्याच्या हलचाली, मागोवा घेत जाणं हा एक अफलातून अनुभव असतो. निरु फार सुंदर शब्दबद्ध केलायस. जियो!
फार मोठं घनदाट अन सुंदर जंगल आहे न ते. जायचय एकदा.
जबरदस्त
जबरदस्त