खगोलविश्वातील अढळ तारा: नारळीकर सर!

Submitted by मार्गी on 21 May, 2025 - 04:52

नमस्कार. डॉ. जयंत नारळीकर गेले! अनेकांना ज्यांच्यामुळे खगोलशास्त्र कळालं ते नारळीकर सर! विदेशात उच्च पदावर असूनही प्रवाहाविरुद्ध भारतामध्ये विज्ञान प्रसारासाठी आलेले नारळीकर सर! संशोधक, शिक्षक आणि विज्ञान प्रसारक! त्यांना दोनदा भेटण्याचा मला योग आला होता. त्यांची पत्रंही आली होती. त्यांच्याबद्दलच्या आठवणी शब्दबद्ध करण्याचा हा प्रयत्न.

तो दिवस स्पष्ट आठवतो. २२ जानेवारी १९९५! परभणीतल्या अ. भा. साहित्य संमेलनाचा शेवटचा दिवस. माझ्या एका मोठ्या मित्राने मला "प्रेषित" ही नारळीकर सरांची कादंबरी घ्यायला सांगितलं. तेव्हा माझं वय दहा होतं. ही विज्ञान कादंबरी वाचताना अंगावर शहारे येत गेले! त्याच रात्री पूर्ण झाली आणि एक नवीन जग कळालं. परकीय जीवसृष्टीचा शोध, आधुनिक वैज्ञानिक प्रगती, राक्षसी तार्‍यावरील परिस्थिती, विज्ञानातल्या इतर गमती आणि अतिशय गूढ कथानक! पुढच्या वर्षांमध्ये ह्या कादंबरीची ३५ तरी पारायणं केली. ती वाचल्यावर सरांना पत्रही लिहीलं आणि विशेष म्हणजे त्यांचं उत्तरही आलं! प्रेषितनंतर "व्हायरस" कादंबरीवर प्रतिक्रिया दिली तेव्हाही त्यांचं दुसर्‍यांदा पत्र आलं होतं! नंतर "यक्षांची देणगी", "अंतराळातील स्फोट", "अंतराळातील भस्मासूर", "वामन परत न आला", "टाईम मशीनची किमया", "अभयारण्य" अशा त्यांच्या विज्ञान कादंबर्‍या व कथासंग्रहही खूप आवडले. "आकाशाशी जडले नाते" हे विज्ञान पुस्तक मात्र समजायला जड गेलं. त्यांच्या कादंबर्‍यांमधून व कथांमधून विज्ञान मात्र खूप आवडत गेलं आणि गोडी लागत गेली! त्यातूनच १९९७ मध्ये आठवीत असताना मी वर्षभर "आकाश" नावाचं खगोलावरचं पाक्षिक सुरू केलं होतं. ते आयुकाच्या ग्रंथालयात गेलं होतं.

हा लेख इथे इंग्रजीत वाचता येईल.

मार्च १९९९ मध्ये नारळीकर सर नांदेडला आले होते. तेव्हा त्यांचं व्याख्यान ऐकलं. त्यांना जवळून बघता आलं. माझा मामा नंदन फाटक आणि मामाचे मित्र डॉ. राम मोहन राव सर ह्यांच्यासोबत नारळीकर सरांना भेटताही आलं. राव सरांच्या मोठ्या दुर्बिणीतून गुरू ग्रह मला सेट करून दाखवता आला होता! नंतरही एकदा त्यांचं व्याख्यान ऐकलं होतं. नारळीकर सरांच्या संशोधनाच्या संकल्पना व तांत्रिक बाबी तेव्हा समजणं शक्यच नव्हतं आणि आताही‌ ते समजणं कठीणच आहे. पण एक वैज्ञानिक आणि माणूस मात्र हळु हळु कळत गेला. मग ते २४ ऑक्टोबर १९९५ च्या सूर्यग्रहणाच्या वेळेस त्यांनी दूरदर्शनवर केलेलं मार्गदर्शन असेल किंवा विद्यार्थ्यांसाठी सांगितलेल्या विज्ञानातल्या गमती व किस्से असतील. त्यांच्या तशा कॅसेटसही होत्या.

माझ्यासारख्या कित्येकांना खगोलशास्त्राची आवड त्यांच्यामुळेच लागली हे नक्की. खगोलशास्त्र व विश्वरचनाशास्त्र (कॉस्मोलॉजी) हे त्यांचे मुख्य विषय. म्हणूनच ते भारतीय खगोलविश्वाचे जणू अढळ तारे बनले. खगोलशास्त्र व विज्ञान प्रसाराचा चेहरा बनले. विज्ञानावरची पुस्तकं व कथांसोबत त्यांच्या "चार महानगरातले माझे विश्व" ह्या आत्मचरित्रामधूनही विज्ञार्थ्यांना खूप मेजवानी मिळत गेली. त्यांच्या कथांमध्ये व पुस्तकांमध्ये कूट प्रश्न व गणिती संदर्भांची रेलचेल असायची. उदा., १५३ संख्येमध्ये एक विशिष्ट गुणधर्म आहे व तोच गुणधर्म ३७०, ३७१ आणि ४०७ मध्ये आहे. किंवा १ + २ + ३ ..... + १०० ह्या अंकांची बेरीज करण्याची सोपी पद्धत शोधणे! किंवा एका मोठ्या सतरंजीवर एका चादरीवर ठेवलेला चेंडू चादरीला व चेंडूला स्पर्श न करता उचलणे! ६० अंश उत्तर ह्या ठिकाणी विमान पश्चिमेच्या दिशेला उडत असेल व त्याची गती पृथ्वीच्या ६० अंशावरील परिवलन गतीहून जास्त असेल तर सूर्यास्त झाल्यानंतरही‌ सूर्य पश्चिमेला उगवल्याचा अनुभव येऊ शकतो! त्यांच्या लहानपणीची आठवण- ते विद्यार्थी असताना घरामध्ये फळ्यावर रोज गणितातले कूट प्रश्न- कोडी लिहीलेली असायची! ह्या सगळ्यांमधून नारळीकर सर विज्ञानाचे व बुद्धीला धार लावण्याचे बाळकडू द्यायचे. त्यांच्या लेखनामध्ये ही मेजवानी मिळते.

कालांतराने टीआयएफआर (Tata Institute of Fundamental Research), आयुका (Inter University Centre for Astronomy and Astrophysics), GMRT (Giant Meter Wave Radio Telescope) व इतर संस्था- प्रकल्पांमध्ये त्यांचं योगदान किती मोठं होतं हे कळत गेलं. फ्रेड हॉयलसारख्या जगातल्या सर्वोत्तम वैज्ञानिकांसोबत संशोधन करण्याचा राजमार्ग त्यांच्यापुढे होता. असंख्य शैक्षणिक पुरस्कार, स्कॉलरशिप्स व फेलोशिप्स त्यांना मिळाल्या होत्या. पण तरीही, त्या कारकिर्दीच्या शिखरावर असताना १९७२ मध्ये म्हणजे वयाच्या ३४ व्या वर्षी त्यांनी भारतामध्ये येऊन टीआयएफआरमध्ये काम सुरू केलं. प्रवाहाविरुद्ध येणं सोपं नव्हतं. त्यांना खूप अडचणी आल्या. भारतात येऊन राहणं- संसार सुरू करणं कष्टाचं गेलं. इथे प्रत्येक ठिकाणी "लाल फीत" संस्कृती होती, नोकरशाही होती. पण तरीही ते शांतपणे कार्यरत राहिले. टीआयएफआरमध्ये १६ वर्षं काम करून तिथे सुस्थितीत असताना १९८८ मध्ये परत एकदा आयुकाच्या रूपात पुण्यातली नवीन सुरूवात त्यांनी केली! आकाशाच्या उंचीची प्रतिभा आणि तेज असूनही जमिनीवर उभे राहिले. त्यांच्या सहकार्‍यांच्या, मंगलाजींच्या व इतरांच्या आठवणींमधून त्यांच्यातल्या विनम्र माणसाचं दर्शन घडतं. त्यांचा साधेपणा, शिस्त आणि आपल्या कामावर असलेलं कमालीचं प्रेम कळतं.

त्यांचं शिक्षण मुख्यत: उत्तरेत हिंदी माध्यमात आणि नंतर विदेशात झालं होतं. त्यामुळे त्यांची मराठी ही इतकी पक्की नव्हती असं त्यांना वाटायचं. पण तरीही जिद्दीने मराठीमध्ये ते विज्ञान लेखन करत राहिले आणि त्यांच्या लेखनामुळेही लेखकांच्या पुढच्या फळीला प्रेरणा मिळाली. त्यांची पहिली विज्ञान कथा साहित्यिकांना कशी वाटेल ह्याची शाश्वती नसल्यामुळे त्यांनी टोपण नाव वापरून लिहीली होती. पण त्यानंतर भरभरून लेखन केलं. विज्ञान लेखक म्हणूनसुद्धा ते मोठे ठरतात. आधुनिक विज्ञानातले सगळे विषय त्यांच्या लेखनात येतात- वैज्ञानिक दृष्टीकोण, तंत्रज्ञान, तंत्रज्ञानातील धोके, माणसाला विज्ञानाबरोबर आवश्यक असलेली समज, समाजातल्या सर्व घटकांना विज्ञानाचा लाभ होण्याची गरज, पर्यावरण असे अनेक पैलू.

सर बिग बँगचे विरोधक व स्टेडी स्टेट थिअरीचे समर्थक होते. म्हणजे विश्वाचा जन्म महास्फोटातून नाही झाला तर विश्व आधीपासूनच होतं व नेहमी तसं राहतं असं ते मानायचे. शिवाय ऊर्जा निर्माणही करता येत नाही व नष्टही करता येत नाही तर केवळ रुपांतरित करता येते. त्यामुळे त्यांच्या जन्मानंतर पृथ्वीच्या सूर्याभोवती जवळ जवळ ८७ प्रदक्षिणा झाल्यावर, गुरूच्या साधारण सव्वा सात प्रदक्षिणा झाल्यावर व शनिच्या साधारण तीन प्रदक्षिणा झाल्यानंतर ते शरीर रूपाने जरी सोडून गेले असले तरी प्रेरणा रूपाने व मार्गदर्शक रूपाने "स्टेडी स्टेट" प्रकारे आपल्यासोबत असतीलच.

संशोधन करणारा असला तरी शास्त्रज्ञ समाजाभिमुख राहावा, समाजासोबत जोडलेला असावा हे त्यांनी दाखवून दिलं. विज्ञानाला सोपं करून सांगणं सगळ्यांनाच जमेल असं नाही, पण त्याचा प्रयत्न नक्की करावा, हे त्यांनी स्वत:च्या उदाहरणातून पुढे ठेवलं. स्वत:ची कामं स्वत: करण्याची त्यांची शिस्त आणि अगदी उतार वयामध्येही पाषाण- पंचवटीमधलं त्यांचं फिरणं! सरांकडून इतकं काही मिळाल्यानंतर त्यांनी सांगितलेल्या मार्गावर एक पाऊल जात असल्याचं समाधान नक्कीच वाटतं. फार पूर्वी दूरदर्शनवर मशाल पुढे देतानाचं दृश्य दाखवायचे. त्यामध्ये कपिल देव होता आणि सगळ्यांत शेवटी एक गोंडस मुलगी असायची. सरांनी दिलेली ही विज्ञान प्रसाराची मशाल पुढे नेण्याची जवाबदारी आता आपण सर्वांची आहे!

(वाचल्याबद्दल धन्यवाद. लेख जवळच्यांसोबत अवश्य शेअर करावा. -निरंजन वेलणकर 09422108376. आकाश दर्शन, ध्यान, फन- लर्न व फिटनेस सत्र. लेख लिहीण्याचा दिनांक: 21 मे 2025)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

डॉ. जयंत नारळीकरांना श्रद्धांजली
खूप छान लिहिलंय.
पण माझ्या माहितीप्रमाणे बिग बँग थिअरी हीच विज्ञान विश्वामध्ये जास्त मान्यता पावली आहे.

छान लिहिलं आहेत. तुम्ही डॉक्टर नारळींकडून प्रेरणा घेतली आहेत. तुम्ही मुलांसाठी अंतराळावर विविध प्रकारचे कार्यक्रम आखत असता आणि करत असता. कौतुक तर वाटतच पण तुमचा अभ्यासपण खूप आहे.

छान लिहिलं आहे..

आकाशाच्या उंचीची प्रतिभा आणि तेज असूनही जमिनीवर उभे राहिले. त्यांच्या सहकार्‍यांच्या, मंगलाजींच्या व इतरांच्या आठवणींमधून त्यांच्यातल्या विनम्र माणसाचं दर्शन घडतं. त्यांचा साधेपणा, शिस्त आणि आपल्या कामावर असलेलं कमालीचं प्रेम कळतं.>>>>

. सरांनी दिलेली ही विज्ञान प्रसाराची मशाल पुढे नेण्याची जवाबदारी>>>

डॉ. जयंत नारळीकरांना श्रद्धांजली.

छान लिहिलाय लेख.
माझ्याकडे 'अंतराळातील भस्मासूर' आहे. माझ्या आवडत्या पुस्तकांपैकी एक.

<< १९८८ मध्ये परत एकदा आयुकाच्या रूपात पुण्यातली नवीन सुरूवात त्यांनी केली! आकाशाच्या उंचीची प्रतिभा आणि तेज असूनही जमिनीवर उभे राहिले. त्यांच्या सहकार्‍यांच्या, मंगलाजींच्या व इतरांच्या आठवणींमधून त्यांच्यातल्या विनम्र माणसाचं दर्शन घडतं. त्यांचा साधेपणा, शिस्त आणि आपल्या कामावर असलेलं कमालीचं प्रेम कळतं. >>

---- छान लेख.

नारळीकरांचा सहवास मला काही काळ मिळाला आहे. लोकसत्ता रविवार दि.१३ एप्रिल २००३ लोकरंग पुरवणी त "ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी...........प्रश्नोत्तरातून सुसंवाद" या माझ्या पुस्तकाचे प्रो.जयंत नारळीकर यांनी लिहिलेले परीक्षण
https://faljyotishachikitsa.blogspot.com/2006/09/blog-post_1158585111905...

2008 साली झालेल्या फलज्योतिष चाचणी प्रकल्पाचा मी समन्वयक होतो

थोरामोठ्यांचा एक गुण सारखा असतो - साधेपणा आणि विनम्रता. पुण्यात पहिलाच मुक्काम पंचवटीत पडला. तिथे बाजूलाच “भूगोल” मधे राहाणारी एक सिनियर व्यक्ती कधीही आमना-सामना झाला तर स्मितहास्य आणि नमस्काराचे विनम्र उत्तर देत असे.

माझा करंटेपणा असा की ते डॉ. जयंत नारळीकर आहेत हेच मला अनेक वर्ष ठाऊक नव्हते !

लेख वस्तुनिष्ठ, रंजक झाला आहे. मार्गी तुमचेसुद्धा कौतुकच आहे. ५० दिवसांचे ५० - सर्व प्रयोग मी वाचले. खूप रंजक वाटले व किती छान समजावुन सांगीतलेत आपण.

सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद! Happy

@ माबो वाचक जी, हो. मान्यता पावलीय. पण ती काही अंतिम सिद्ध झालीय असं नाही. किंबहुना विज्ञान आपल्याला आपण किती सूक्ष्म आहोत, किती क्षुद्र आहोत हेच सांगतं! त्यामुळे बिग बँग किंवा स्टेडी स्टेट ह्या फक्त थिअरीजच आहेत. सत्य फार लांब आहे.

@ आर्च जी व @ सामो जी धन्यवाद! Happy

@ प्रकाश घाटपांडे जी अरे वा!

@ अनिंद्य जी काय सांगता!!!!

डॉ. जयंत नारळीकरांना श्रद्धांजली .
छान लिहिल आहे लेख .>>> +१
विज्ञान कथा विश्वात काही मोजकेच लेखक असे होते की जे विज्ञानाशी एकनिष्ठ राहून कथा लिहित. डॉ. जयंत नारळीकर हे त्यांच्या पैकी एक.
"मान्यता पावलीय. पण ती काही अंतिम सिद्ध झालीय असं नाही. किंबहुना विज्ञान आपल्याला आपण किती सूक्ष्म आहोत, किती क्षुद्र आहोत हेच सांगतं! त्यामुळे बिग बँग किंवा स्टेडी स्टेट ह्या फक्त थिअरीजच आहेत. सत्य फार लांब आहे">>> Totally Disagree.

@प्रकाश घाटपांडे
तुम्ही दिलेली लिंक उघडत नाही. तुमच्या ब्लॉगवर "पुस्तक परिक्षण -प्रो.जयन्त नारळीकर" आणि "पराधीन नाही जगती पुत्र मानवाचा...जयंत नारळीकर" हे २ लेख सापडले.

विज्ञानाची प्रगती विचारात घेतल्यावर आजही जेव्हा मला एखादा शिकलेला माणूस विचारतो, की ग्रहांचे मानवजीवनावर परिणाम होतात का, तेव्हा मला आश्‍चर्य आणि खेद, दोन्ही अनुभवायला मिळतात. आश्‍चर्य यासाठी, की एकविसाव्या शतकातला मानव हा प्रश्‍न विचारतोय. खेद यासाठी, की विचारणारा भारतीय आहे.
- जयंत नारळीकर

I couldn't have said it any better myself.

मला त्यांच्या हस्ते गणित प्रज्ञा स्पर्धेत प्राविण्य पदक मिळाले होते आणि त्यांनी गणितातील गमतीजमतींबद्दल भाषण दिले होते, ते अजूनही लक्षात आहे. डॉ. नारळीकरांना विनम्र आदरांजली.

होय लिंक चुकलेली आहे. copy paste करताना चूक झाली. तुम्ही दिलेल्या लिंकबद्दल आभारी आहे