नमस्कार! मुलांना सुट्ट्या लागल्या आहेत. त्यांचा वेळ कसा जाणार ही पालकांची चिंता आहे. मुलांसाठी 50 गमती व प्रयोग मी आणत आहे. दररोज मी माझ्या ब्लॉगवर एक प्रयोग व एक गमतीची कृती पोस्ट करेन. ह्या प्रयोगांसाठी घरामध्ये असलेल्या गोष्टीच लागतील! हे सर्व प्रयोग व गमती करायला अगदी सोप्या आहेत. वय 8 पासून पुढची व मोठेही त्याचा आनंद घेऊ शकतात. हा पहिला प्रयोग.
प्रयोग 1. पाणी कसं पडत नाही?
हा आश्चर्यकारक प्रयोग मला माझ्या मुलीने- अद्विकाने करून दाखवला! एक ग्लास पाण्याने पूर्ण भरा. एक ग्लासच्या आकारापेक्षा मोठा पुठ्ठा घ्या. ग्लासपेक्षा थोडा मोठा आकार कापून घ्या. ग्लासमध्ये पाणी पूर्ण् भरा. ग्लासवर पुठ्ठा ठेवा. आता ग्लास सिंकच्या वर धरा. ग्लास व पुठ्ठा दोन्ही व्यवस्थित पकडा. आता ग्लास उलटा करा! पुठ्ठ्याच्या खाली ठेवलेला हात काढून घ्या. हात काढला तरी पुठ्ठा पडत नाही आणि पाणीही पडत नाही! खालून काहीच आधार नसूनही पुठ्ठा पडत नाही! हे होण्याचं कारण म्हणजे पाण्याचं वजन हे खालून वरच्या दिशेने असलेल्या वातावरणाच्या दाबापेक्षा कमी असतं! ग्लास पूर्ण भरलेला मात्र हवा. 2-3 वेळेस हे करून पाहा व आनंद घ्या!
गंमत कृती 1. कागदापासून फटाका बनवा!
हीसुद्धा गंमत अद्विकाने मला दाखवली. कागदापासून तुम्ही मोठा दचकवणारा आवाज करणारा फटाका बनवला आहे का? त्याला एक मिनिटही लागत नाही. एक कागद घ्या, त्याला दोनदा दुमडा. मग त्यावर एक ट्रिक करायची! थोडा प्रयत्न करून पाहा व तुमच्या दोस्तांना विचारा. खूप सोपं आहे. मित्रांना दचकवायला किंवा घाबरवायला नक्की वापरता येईल!
तुमचा अनुभव नक्की शेअर करा. मी दररोज माझ्या ब्लॉगवर असा एक प्रयोग व एक गंमत पोस्ट करेन. ब्लॉगची लिंक ही आहे. पोस्टस इंग्रजीमध्येही उपलब्ध असतील. इथेही अधून मधून अपडेटस देईन.
(वाचल्याबद्दल धन्यवाद. लेख जवळच्यांसोबत अवश्य शेअर करावा. -निरंजन वेलणकर 09422108376. आकाश दर्शन, ध्यान, फन- लर्न व फिटनेस सत्र. लेख लिहीण्याचा दिनांक: 1 मे 2025)
अरे वा. मस्तच.
अरे वा. मस्तच.
मुलांना दाखवता येईल. आणि त्याबरोबर आपल्याही कन्सेप्ट रिवाईज होतील.
छान उपक्रम. रोज वाचेन. धन्यवाद.
छान उपक्रम आहे. आवडला.
छान उपक्रम आहे. आवडला.
एक कागद घ्या, त्याला दोनदा दुमडा. मग त्यावर एक ट्रिक करायची! > हे काही समजले नाही.
Paper popper
Paper popper
Paper bomb
या नावांनी सर्च केल्यावर मिळाले बरेच काही.
लेखात काय दिले ते मात्र नाही समजले. अर्थात क्लिअर दिले नाहीये.
उपक्रम मात्र छान आहे. आवडला.
आतली घडी थोडी बाहेर ओढून तो
आतली घडी थोडी बाहेर ओढून तो कागद कोपऱ्यात पकडून झटकायचा. मग त्याचा फट असा आवाज होतो . केले आहे लहानपणी.
पाण्याचा व हवेच्या दाबाचा प्रयोग सुद्धा अभ्यासक्रमात होता. वर्गात तो करत असताना सगळीकडे पाणीच पाणी झाले होते . तेव्हा आमचे विज्ञानाचे शिक्षक म्हणाले की पुढच्या तासाच्या शिक्षकांना बहुदा वर्गात पोहत यावे लागेल .
आतली घडी थोडी बाहेर ओढून तो
आतली घडी थोडी बाहेर ओढून तो कागद कोपऱ्यात पकडून झटकायचा. मग त्याचा फट असा आवाज होतो . केले आहे लहानपणी.
>>>>>
हो बरोबर.. मी स्वतः केले नव्हते पण पाहिले आहे पोरांना करताना
मला रुमालाचा आवाज काढायला आवडायचे. किंबहुना आजही आवडते. पण तेव्हा नुसते आवाज नाही तर मारामारी करायचो. वेळप्रसंगी लाल लाल वळ सुद्धा उठायचे
यावरून एक धागा सुचला.. काढतो नंतर
सर्वांना धन्यवाद!
सर्वांना धन्यवाद!
@sonalisl जी, हो, पूर्ण दिलं नाहीय. मुद्दाम थोडं सांगून बाकी करण्यासाठी राहू दिलंय.
@ ऋन्मेऽऽष जी, हो!
आजचा प्रयोग व गंमत इथे वाचता येईल.
कागदामध्ये असं छिद्र पाडा
कागदामध्ये असं छिद्र पाडा ज्यामधून तुम्ही जाऊ शकाल!
>>>>
येस... हे माहीत आहे.
कदाचित मुलाना माहीत नसेल.
दाखवतो आजच
मागच्या दिवसांमध्ये पोस्ट
मागच्या दिवसांमध्ये पोस्ट केलेले काही प्रयोग व गमती:
माठ कशामुळे गार होतो?
खेळाच्या मैदानात तुमची पाण्याची बाटली गार कशी ठेवणार?
तेच पाणी, पण वेगळा अनुभव
पंखा कसा काम करतो?
सायकल हळु चालवण्यातली गंमत
ओल्या पृष्ठभागावरून घसरणे!
आडवा होणारा हात
सांडणारं पाणी
सगळे प्रयोग व गमती इथे वाचता येतील. धन्यवाद.
मी लहान मुलांवर अशी ट्रिक
मी लहान मुलांवर अशी ट्रिक नेहेमी वापरतो.
what is your name ?
prachi
how do you spell it ?
P R A C H I
wrong !
what is your name ?
rahul
how do you spell it ?
R A H U L
wrong!
I asked you 'how do you spell it' the correct answer is I T
@ विजयकुलकर्णी जी! मस्त! छान
@ विजयकुलकर्णी जी! मस्त! छान आहे ट्रिक.
ब्लॉगवर पुढचे प्रयोग व गमती पोस्ट केल्या आहेत.
प्रयोग 9. पाण्यावर वस्तु का
प्रयोग 9. पाण्यावर वस्तु का तरंगतात?
पाण्यावर वस्तु का तरंगतात ह्यावर तुम्ही कधी विचार केला आहे का? एक सोपी गोष्ट करू. कागदाची एक छोटी नाव बनवू व ती बादलीभर पाण्यात सोडू. तरणशक्ती किंवा प्लावकता (buoyancy/ upthrust) ह्या गुणधर्मामुळे वस्तु तरंगतात. तरणशक्ती हे त्या द्रवाचं बल असतं जे त्यावर पूर्णत: किंवा अंशत: बुडालेल्या वस्तुच्या वजनाला विरोध करतं. वस्तुचा तरंगण्याचा गुणधर्म ते दर्शवतं. जेव्हा लाकडासारखी एखादी गोष्ट पाण्यावर तरंगते, तेव्हा लाकूड हे समान वजनाच्या पाण्याच्या तुलनेत कमी पाण्याचे विस्थापन करत असते (कारण त्याची घनता पाण्याहून कमी असते). जी वस्तु पाण्याच्या वजनापेक्षा कमी वजनाला विस्थापित करते, ती तरंगते. विचार करा- आपण जमिनीवर उभे राहू शकतो, कारण आपण आपल्या वजनाच्या जमिनीला फार कमी प्रमाणात विस्थापित करतो. परंतु कल्पना करा की, एकदम एखादी मोठी इमारत जमिनीवर उभी राहिली, तर तिच्यामुळे समान वजनाच्या जमिनीचे मोठ्या प्रमाणात विस्थापन होईल व त्यामुळे इमारत जमिनीवर उभी राहू शकणार नाही तर आत जाईल.
गंमत 9. तुमच्या होडीचे प्रवासी!
आता तुमच्याकडे पाण्यावर तरंगणारी छोटी नाव आहे. ती तरंगू शकेल अशा प्रकारे तुम्ही त्यात काय काय ठेवू शकता? एखादं छोटं रबरबँड? एखादं छोटं इरेझर ती नेऊ शकेल? किंवा छोटं चॉकलेट? आणि समजा एखादं सॉफ्ट टॉय पाण्यावर तरंगत ठेवायचं असेल तर किती मोठी नाव लागेल? विचार करा! प्रयत्न करा! आणि अशा स्टीलच्या तीन वस्तु सांगा ज्या पाण्यावर तरंगतात! होय!
सगळे प्रयोग व गमती इथे वाचता येतील.
- निरंजन वेलणकर
50 दिवसांसाठी 50 गमती आणि
50 दिवसांसाठी 50 गमती आणि प्रयोग!
नमस्कार. आजपर्यंत 17 प्रयोग व 17 गमती पोस्ट केल्या आहेत. गेल्या काही दिवसांमधले प्रयोग व गमती अशा आहेत:
ज्योत किती वेळ चालेल?
ऑक्सीजन आपल्यासाठीही आवश्यक असतो!
पत्त्यांसोबत खेळण्याची वेगळी पद्धत!
तुम्ही हे चॅलेंज घ्याल का?
चमचा कसा तरंगेल?
तरंगणारे फळ व भाज्या
पाणी इकडून तिकडे नेणे!
तुमच्या मित्रांची नावे वापरून शब्दकोडं बनवा!
रंगांसोबत शिकूया!
स्ट्रॉ व छोट्या नळीचा वापर
तरंगणारा बटाटा!
सोबत महत्त्वाची!
बटाट्याचे लांब जाणारे कोंब
बेशिस्त अक्षरे!
इथे सगळे प्रयोग व गमती वाचता येतील.
आपल्या ब्लॉगवरती जाउन सर्व
आपल्या ब्लॉगवरती जाउन सर्व प्रयोग वाचले. काय मस्त शिकवता तुम्ही. अदृष्य ओळी सर्वात आवडला.
नमस्कार. आजपर्यंत 24 प्रयोग व
नमस्कार. आजपर्यंत 24 प्रयोग व 24 गमती पोस्ट केल्या आहेत. मला त्या पोस्ट करतानाच खूप मजा येते आहे. इतके ते प्रयोग व गमती इंटरेस्टिंग आहेत. काही उदाहरणं-
प्रयोग 21. आपोआप फुटणारे फुगे
आपण फुग्यांसोबत थोडं खेळूया. त्यासाठी एक ट्रिक करूया. एक संत्र किंवा लिंबू घ्या. त्याची साल कापा व सालीवर दाब देऊन त्यातल्या द्रवाचे थोडे थेंब गोळा करा. हे थेंब फार महत्त्वाचे आहेत. जेव्हा तुम्ही असा एक थेंब फुग्यावर सोडता, तेव्हा लगेचच फुगा फुटतो. तुम्हांला बोटसुद्धा ठेवावं लागत नाही किंवा जोर द्यावा लागत नाही! फक्त त्या द्रवाचा एक थेंब फुग्यावर सोडा, बस्स! मित्रांसोबत हे करा व हात न लावता फुगे फोडण्याची तुमची ट्रिक त्यांना दाखवा! पण हे का होतं? हे होण्याचं कारण म्हणजे त्या द्रवामध्ये फुग्याचं रबर लगेचच विरघळतं व फुग्यामध्ये एक बारीक छिद्र तयार होतं व तो फुटतो! प्रयत्न करा, हे करा व इतरांनाही दाखवा! आणि स्पर्श न करता फुगा फोडण्याचे इतर कोणते मार्ग आहेत का, ह्यावरही विचार करा.
गंमत 19. एकाच भाषेत बोलायचं
एक मिनिट एकाच भाषेत बोलायचं. हे वाटतं तितकं सोपं नाहीय. कोणतीही भाषा घेऊन प्रयत्न करून पाहा. एक मिनिट म्हणजे 60 सेकंद. फक्त एक भाषा. एकही शब्द दुस-या भाषेचा आला नाही पाहिजे! सोपं वाटतंय? करून पाहा. हवं तर मित्रांसोबत हा खेळ खेळा. एक जण बोलेल व इतर जण तपासतील! हा एक खेळ होऊ शकतो. जितके शब्द दुस-या भाषेतले बोलाल ते नोट करा! सगळ्यांत कमी जो असे शब्द वापरेल तो जिंकेल! बघा, मीसुद्धा दुस-या भाषेतले किती शब्द लिहीलेत इथे!
इथे सगळे प्रयोग व गमती वाचता येतील.
फार मस्त.
फार मस्त.
संत्र्याचा प्रयोग मला माहीत होता. दुसरा आचरणात आणणे कठीण आहे.
नवीन इंटरेस्टिंग प्रयोग आलेले
नवीन इंटरेस्टिंग प्रयोग आलेले आहेत.
@ सामो जी, ओके!
नमस्कार. आजपर्यंत 32 प्रयोग व
नमस्कार. आजपर्यंत 32 प्रयोग व 32 गमती पोस्ट केल्या आहेत. गेल्या काही दिवसांमधले प्रयोग व गमती अशा आहेत:
तरंगणारी पेन्सिल
दृष्टी भ्रम (Eye- illusions)!
ओढलं जाणारं पाणी
विजेच्या मदतीने आवाजाचा वेग मोजा!
चंद्राच्या कला तयार करा
ग्रहांच्या कला
अंधार व प्रकाशाचा खेळ
बटाट्यात आरपार जाणारा स्ट्रॉ
स्ट्रॉ, कागद आणि पुठ्ठा
तीन काड्यांचं संतुलन
सी- सॉ मागचं विज्ञान
वाहणारं आणि थांबणारं पाणी
सगळ्यांनी मिळून सांगायची गोष्ट
चुंबक तयार करा
खेचले जाणारे केस
इथे सगळे प्रयोग व गमती वाचता येतील.
- निरंजन वेलणकर (आकाश दर्शन, ध्यान, फिटनेस व फन- लर्न)
वाचते आज.
>>>>>>>>>>गेल्या काही दिवसांमधले प्रयोग व गमती अशा आहेत:
वाचते आज.
नमस्कार. आजपर्यंत 40 प्रयोग व
नमस्कार. आजपर्यंत 40 प्रयोग व 40 गमती पोस्ट केल्या आहेत. आजचं अपडेट-
प्रयोग 40. तुमचे होकायंत्र (कंपास) बनवा!
तुम्हांला होकायंत्र माहिती आहे का? होकायंत्र म्हणजे कंपास. तो नाही जो तुम्ही शाळेत नेता. कंपास किंवा होकायंत्र म्हणजे असं यंत्र जे उत्तर व दक्षिण दिशा दाखवतं. तुम्ही दूर कुठे असताना म्हणजे डोंगरात फिरत असाल किंवा समुद्रात जहाजामधून जात असाल तेव्हा दिशा निश्चित करण्यासाठी व रस्ता शोधण्यासाठी ते उपयोगी असतं. आपण एक होकायंत्र बनवूया! त्यासाठी तुम्हांला एक मोठं चुंबक, एक छोटी सुई व रबराचा किंवा थर्मोकॉलचा तुकडा लागेल (अशी हलकी वस्तु जी सहजपणे पाण्यावर तरंगते). एक ताटली घ्या. तिच्यात पाणी ओता. पाण्यात रबर किंवा थर्मोकॉल टाका. ते तरंगेल. गरज असेल तर कोणाची मदत घेऊन ताटलीच्या बाजूला उत्तर व दक्षिण दिशांची खूण करा. उत्तरेला उ किंवा N आणि दक्षिणेला द किंवा S लिहा. आता सुईला चुंबकावर एकाच दिशेमध्ये 50 ते 60 वेळेस घासा. त्यासाठी 2 मिनिटे लागतील. पूर्ण सुई एकाच दिशेने घासा. त्यामुळे सुईमध्ये तात्पुरते चुंबकत्व तयार होईल. आता चुंबक झालेली सुई रबरावर किंवा थर्मोकॉलवर ठेवा. ती थोडा वेळ हलेक आणि मग एकाच स्थितीमध्ये स्थिर होईल. सुईचा दक्षिण ध्रुव पृथ्वी नावाच्या विशाल चुंबकाच्या उत्तर ध्रुवाकडे आकर्षित होईल! तुम्ही तिला हलवलं तरी ती परत उत्तर- दक्षिण अशीच स्थिर होईल. सुईचं चुंबकत्व टिकेपर्यंत हे राहील. इथे तुम्ही पाण्याचा एक माध्यम म्हणून व रबराचा एक पाया म्हणून कसा वापर केला, ह्याचंही निरीक्षण करा!
गंमत 40. संगत का असर!
वरच्या प्रयोगामध्ये सुईला चुंबकत्व मिळालं, कारण ती काही वेळ चुंबकाच्या सोबत राहिली. त्यामुळे सोबत म्हणजे कंपनी महत्त्वाची असते. चांगली सोबत- अच्छी संगत नेहमी उपयोगी असते! काही रोग हे संसर्गजन्य (contagious) असतात, हे तुम्हांला माहिती आहे. पण आरोग्य किंवा गुणसुद्धा तसेच असतात व ते संगतीने वाढतात. हे लक्षात ठेवा. आता आपण ह्याचा संबंध आकाशातल्या ता-यांशी जोडू. आपण ता-यांना एकमेकांच्या सोबतीने ओळखू शकतो. म्हणजे सोबत असलेले तारे व ता-यांच्या ग्रूपनुसार त्यांना ओळखू शकतो. आपण त्यांचे पॅटर्न्स किंवा आकारही लक्षात ठेवू शकतो. आता एक प्रश्न पाहा. तुम्ही रात्री जेव्हा बाहेर असाल- जंगलात किंवा डोंगरात तेव्हा तुम्ही उत्तर दिशा कशी शोधाल? कोणते तारे तुम्हांला त्यासाठी मदत करतील? ह्याचं उत्तर द्या. तुमचे मित्र किंवा मोठ्यांची मदत तुम्ही घेऊ शकता. चांगल्या व्यक्तींच्या संगतीमध्ये असणं उपयोगीच पडतं!
इथे सगळे प्रयोग व गमती वाचता येतील.
छान विवेचन.
छान विवेचन.
प्रयोग 50. हवेचा विरोध
प्रयोग 50. हवेचा विरोध
तुम्ही हे अनुभवलं असेल. जेव्हा आपण एखादी पाण्याची बाटली रिकामी करतो, तेव्हा पाणी हळु हळु बाहेर पडतं व बुडबुडे तयार होतात. हवेच्या विरोधामुळे हे होतं. हवा बाटलीत प्रवेश करण्याचा प्रयत्न करते व पाण्याला मुक्तपणे पडू देत नाही. आपण एक छोटा प्रयोग करू. पाण्याने पूर्ण भरलेली एक बाटली घ्या. तुमच्या रोपांजवळ जा व बाटली रिकामी करून पाणी द्या. बाटली उलटी केल्यावर हळु हळु ती रिकामी होईल. तुम्ही ह्याचं निरीक्षण केलं असेलच की, ती जर एकदम उलटी केली तर पाणी खूप हळु पडतं. ती जर तिरपी ठेवली तर पाणी तुलनेने लवकर पडतं. आता एक लांब स्ट्रॉ घ्या, तो बाटलीमध्ये टाका व बाटलीच्या झाकणाजवळ त्याचं टोक दुमडून ठेवा. आता हीच कृती परत करा. ह्यावेळी पाणी वेगाने बाहेर पडेल, कारण हवेला बाटलीमध्ये जाण्याचा वेगळा मार्ग आपण दिला आहे.
गंमत 50. 1+ 2 + 3 + 4 +….+ 50 =?
ही आपली 50 वी गंमत आहे! हे अगदी सोपं गणित आहे. जेव्हा आपण 1 + 2 + 3 + 4 +..... + 50 अशी बेरीज करतो, तेव्हा आपल्याला कोणती संख्या मिळते? नाही, कॅल्क्युलेटर वापरायचा नाही. प्रत्यक्ष बेरीजही करू नका. त्याला वेळ लागेल. ह्या संख्यांचं निरीक्षण करा. 1 ते 50 अशा त्या आहेत. त्या सर्वांची बेरीज. त्या संख्यांच्या तुम्हांला काही जोड्या करता येतात का? उदाहरणार्थ, 1आणि 50, 2 आणि 49, 3 आणि 48, 4 आणि 47 व अशाच इतर? प्रत्येक जोडीचे मूल्य 51 आहे व अशा एकूण 25 जोड्या आहेत. म्हणून उत्तर हे असेल 25 X 51 = 25 X 50 + 25 = 1250 + 25 = 1275.
अगदी ह्याच प्रकारे, तुम्ही ही बेरीजही करू शकता- 1 + 2 + 3 + 4.... + 100. इथे, आपल्याला अशा जोड्या मिळातील- 1 आणि 100, 2 आणि 99, 3 आणि 98 व पुढे. प्रत्येक जोडीचे मूल्य 101 आहे व अशा 50 जोड्या. म्हणजे बेरीज ही असेल- 50 X 101 = 50 X 100 + 50 = 5050. आकड्यांसोबत थोडी मैत्री केली की ते किती गमतीदार आहेत हे लक्षात येतं. तर आपले 50 प्रयोग व 50 गमती पूर्ण झाल्या आहेत. सर्वांना happy learning!