मराठी : श्रवण घडते कसे?

Submitted by हेमंतकुमार on 30 April, 2025 - 18:02

सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

पूर्वपीठिका :
१/ ५/२०२३ : ‘मराठी: वाचन घडते कसे?’ https://www.maayboli.com/node/83383

२७/२/२०२४ : ‘मराठी : लेखन घडते कसे?’
https://www.maayboli.com/node/84711

गेल्या दोन वर्षात वरील दोन्ही मराठी भाषेसंबंधीच्या विषयांना वाचकांनी भरभरून आणि वाचनीय प्रतिसाद दिले. यंदा त्या मालिकेतील तिसरी संकल्पना शीर्षकात लिहिल्याप्रमाणे घेतो आहे.

आपल्या जन्मानंतर जर आपण आपल्या विविध विकासाचे टप्पे बघत गेलो तर त्यात लक्षात येईल, की ज्ञानग्रहणाच्या दृष्टीने श्रवण ही सर्वात पहिली आणि अत्यंत मूलभूत अशी क्रिया आहे. किंबहुना आपण जन्मल्यानंतर प्रथम काय ऐकतो ते म्हणजे आपले स्वतःचेच रडणे ! म्हणूनच कदाचित आयुष्यभर रडगाणी गाणे हा मानवी स्थायीभाव असतो की काय, कोण जाणे ?

जशी बाल्यावस्था पुढे सरकत जाते तसतसे आपण आपल्या घर व परिसरातील ‘मातृ’भाषेतील (आणि अन्य भाषिक देखील) संवाद ऐकू लागतो. तसेच निसर्गातील विविध भाषारहित आवाजही आपल्या कानावर पडत राहतात.

कळत्या वयात आल्यानंतर आपले जे श्रवण घडते त्यामध्ये दैनंदिन संभाषण, विविध आरत्या, श्लोक, गाणी, भजने, भाषणे, शिक्षणादरम्यानची व्याख्याने, कीर्तने, प्रवचने, गप्पा टप्पा आणि घोषणाबाजी अशा असंख्य गोष्टींचा अंतर्भाव करता येईल. अशा श्रवणातून आपण जे काही ज्ञानग्रहण केले किंवा आनंद मिळवला (अथवा नाही) त्यासंबंधी आज आपण काही लिहिणार आहोत. जे श्रवण त्रासदायक वाटते त्याबद्दलही लिहावे. निमित्त अर्थातच मराठी दिनाचे असल्यामुळे आपला परीघ फक्त मराठी भाषेतील श्रवणापुरताच मर्यादित ठेवूयात.

लहानपणापासून आतापर्यंत मराठी भाषेतले आपण काय काय ऐकत गेलात आणि त्याचा आपल्या मनावर कसा परिणाम होत गेला, यासंबंधी सर्वांचे विचार जाणून घ्यायला नक्कीच आवडेल.

मराठी सोडून अन्य काही भाषांतील अनेक गाणी अथवा अन्य काही श्रवणीय गोष्टी कितीही आवडत्या, प्राणप्रिय वगैरे असल्या तरी या धाग्यात त्यांची सरमिसळ नसावी. तसेच दृकश्राव्य माध्यमांपेक्षा शुद्ध श्रवणातून आपण काय अनुभवले यावर मुख्यतः आपले विचार मांडावेत.

आपल्या जीवनप्रवासातील विविध मराठी श्रवणांचे स्थान आणि त्याचा आपल्यावर झालेला परिणाम यासंबंधात मनमोकळेपणाने व्यक्त होऊयात ही विनंती.

धन्यवाद !
********************************************************************

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

श्रवण कसे घडते?
मराठी भाषेचे श्रवण संस्कार माझ्या गत ७३ वर्षांच्या आठवणीप्रमाणे वयाच्या तिसर्या ते चौथ्या वर्षी सुरू झाले. माझी आई रामरक्षा आणि इतर श्लोकांबरोबरच मनाचे श्लोक म्हणायची. त्यातील “मना सज्जना...”, “प्रभाते मनी....” वगैरे रोज कानावर पडायचे. त्या बरोबरच तिच्या मंजुळ स्वरातील आरत्या. वडिल मोरोपंतांच्या आर्या म्हणायचे. या व्यतिरिक्त, दारावर येणार्‍या विक्रेत्यांच्या हाळ्या. त्यातील एक चांगली आठवणीत आहे. हा भाजी विकायचा अन पुकारायचा, “ दोन आण्ण्यांव”. भाषेचा हा एक श्रेवणीय अपभ्रंश....
या व्यतिरिक्त, आपली आवड, कामगार सभा, वनिता मंडळ इ. कार्यक्रमातील संवाद, त्यातील लताबाईंची गाणी, विशेषत: भा.रा. तांब्यांची भावगीते--- तिन्ही सांजा, मधु मागसी माझ्या, कळा या लागल्या... यांचा अर्थ कळत नकळत असला तरी त्यातील मराठी भाषेची शुचिता आणि भावगर्भित आशय मात्र हे काहीतरी थोर आहे याची जाणिव बालवयातच होऊ लागली. वडिलांनी एकदा पंडितराज जगन्नाथ नाटकाला मला नेले होते अन मग त्यातील “जय गंगे भागिरथी” या पदाने शास्त्रीय संगीताबरोबरच मराठी भाषेचा समृध्द अविष्कार झाला. मी सहावी सातवीत येईपर्यंत आकाशवाणीवर गीत रामायण येऊ लागले होते. ते श्रवण अद्भुत होते. या शिवाय माझे आजोबा व आजी पांडुरंग भक्त असल्याने त्यांच्याकडे विठोबा भक्तीच्या अनेक रेकॉर्ड्स होत्या. त्यातील “पंढरीनाथा, झडकरी आता”, “विठू माझा लेकुरवाळा”, इ अत्यंत गोड आणि लळा लावणारी भक्तीगीते आजही मला गतकाळात घेऊन जातात. श्रवणाच्या संबंध केवळ स्वरमाधुर्याशी नसतो. ते एक भावविश्व असते ज्याच्याशी आपल्या तारा जुळलेल्या असतात. तरुणपणी ऐकलेले “ धुंदी कळ्यांना” आपल्या प्रणयाराधनेतील एक साथीदार असते. जवळची व्यक्ती कालाच्या प्रवाहात विलीन होते तेव्हा वृध्दापकाळी “बिछडे सभी बारी बारी” कानात रुंजी घालते अन हृदयास विदीर्ण करते.
माझ्या मनावर मराठी भाषेचे संस्कार आणिे मराठी गीतांनी, पुलं व कुसुमाग्रजांच्या अजरामर एकपात्री प्रयोगांनी श्रवणेंद्रियांच्या माध्यमातून केले आहेत.
त्यामुळे भाषा समृध्द होण्यात सर्वप्रथम बालपणापासून झालेले श्रवण, नंतर वाचन, त्या नंतर संभाषण यांचा मोठा वाटा आहे.
सवंग श्रवण सवंग संस्कार करते. तेच अर्थगर्भित असलेले गेय आणि अगेय असे दोन्ही प्रकार श्रवणेंद्रियांना सुखावून जातात अन सुसंस्कारात परिवर्तित होतात.

वा! सुंदर कथन.
* विक्रेत्यांच्या हाळ्या. . . “ दोन आण्ण्यांव”. भाषेचा हा एक श्रेवणीय अपभ्रंश....>>>> खूपच छान. आवडला.
. .
एकेकाळी जेव्हा सदनिकांचे प्रस्थ नव्हते तेव्हा स्वतंत्र बांधकामांमध्ये खोल्यांची उंची चांगल्यापैकी असायची; काही बंगल्यांमध्ये तर 12 ते 14 फूट सुद्धा. तेव्हा उंचावरची जळमटी काढण्यासाठी एक लांब झाडू लागत असे.
त्याचे विक्रेते दारोदार हिंडत आणि जोरदार आरोळी ठोकत,
"खोली साफ करण्याचा.... बांबूवाला झाडू ...."

त्यातील "बांबूSs वाला झाSSडू" ही हाळी ठसकेबाज असायची ! तिची रंगत ऐकण्यातच आहे.
गेले ते दिन . . .

श्रवण म्हणजे ऐकणे
सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे लहानपणी आपल्याला अत्यंत ऐकायला आवडणारी म्हणजे गोष्ट..
आम्हाला बहुतांशी गोष्ट सांगणारी व्यक्ती म्हणजे आजी. तिच्या गोष्टी राजा राणीच्या किंवा प्राण्यांचा नसत.. आता साध्या माणसांच्या असत. मुख्य लक्षात राहिलेल्या म्हणजे खुलभर दुधाची गोष्ट किंवा शुक्रवारची कहाणी. त्यावेळी गोष्टी म्हणून ऐकत असलं तरी पुढे गेल्यावर त्यातले मुद्दे लक्षात आले. काही तत्वे किंवा मूल्य काही प्रमाणात नकळत मार्गदर्शक तत्वे कधी / कशी झाली कळलही नाही.

पुढे शाळेत ऐकायचे संस्कार झाले ते परिपाठातून. दररोज सकाळी सहा सातशे मुलं - मुली.. एकाच तालासुरात.. राष्ट्रभक्तीपर गीत, मनाचे श्लोक, गीतेतील अध्याय, भजन, भारुड, अथर्वशीर्ष हे आणि असे .. म्हणत त्याहून उत्तम अशी शालेय दिवसाची सुरुवात असू शकत नाही असं वाटतं.
स्वयंसेवी वृत्तीने ऊन असो की पाऊस दररोज फक्त यासाठी शाळेत येऊन आमच्याकडून ते म्हणून घेणारे, संस्कार देणारे सर यांविषयी अतिव आदर / ऋण कायम मनात राहिले आहे.

या व्यतिरिक्त अजून एका आवाजाच ऋण म्हणजे अर्थात पुलंचा आवाज..
खरं तर ते पहिल्यांदी भेटले ते (कॅसेट मधून) असामी आदमीतील जोशी कुटुंबीय, हरीतात्या, नारायण, pestankaka ... मग या अवलिया व्यक्तिचित्रांचे करते करते म्हणजे साक्षात फुलं हे कळत गेले..
अजूनही कामाच्या थकव्या वर, एखाद्या दुखऱ्या / हळव्या क्षणावर तोच आवाज फुंकर घालतो.

भौतिकाच्या पलीकडे काही असेल या शक्यतेपर्यंत घेऊन जाणारा एक स्वर म्हणजे अमर ओक यांची बासरी.. त्यांचा बासरीचा प्रत्यक्ष कार्यक्रम ऐकताना आलेला अनुभव विलक्षण होता अर्थात अविस्मरणीयही..
या कार्यक्रमात ते म्हणाले होते, शब्दांशिवायचे हे सर तुम्हाला शब्दांच्या शोधात घेऊन जातात आणि त्यामुळे मिळणारा अनुभव प्रत्यक्ष गाण ऐकण्यापेक्षाही उत्कट वाटत असावा..

शाळेत असताना शिवाजी राव भोसल्यांचे ऐकलेले भाषण, शाहीर साबळ्यांचा महाराष्ट्राची लोकधारा कार्यक्रम, चंद्रशेखर गोखल्यांचा चारोळीचा कार्यक्रम, सत्यशील देशपांडेंचा कार्यक्रम हे अजून काही विशेष लक्षात राहिलेले कार्यक्रम /आवाज.

अलीकडे अजून एक खूप भावलेला तरल आवाज म्हणजे देवकी पंडित, २० वर्षानाच्या गॅप नंतर त्यांनी केलेला हा पहिला कार्यक्रम होता.. सारेगम किंवा इतर गाणी पूर्वी ऐकली होती पण हा कार्यक्रम फारच वेगळ्या उंचीवर जाणारा वाटला..

सध्या सहज उपलब्ध होणारे आणि त्यामुळे वाचली (खर तर ऐकली) जाणारी श्राव्य पुस्तके.. ऑडिओ बुक्स, यू ट्यूब कृपेने ऐकायला मिळणाऱ्या कविता, मुलाखती, विनोदी प्रहसने..

प्रतिसाद खूपच मोठा झालाय…

पण धन्यवाद कुमार१, तुमच्या या धाग्या मुळे छान उजळणी झाली. स्मरणरंजन झाले.

धन्यवाद छफ!
प्रतिसाद आवडलाच.

*अमर ओक यांची बासरी…. अनुभव अविस्मरणीयही.., शब्दांशिवायचे हे स्वर तुम्हाला शब्दांच्या शोधात घेऊन जातात… प्रत्यक्ष गाण ऐकण्यापेक्षाही उत्कट
>>> +१००.
निव्वळ वाद्यसंगीताची धुंदी ही काही वेगळीच आहे. मी युट्युबवर यांची बासरी बऱ्याचदा ऐकतो.

छन्दिफन्दि
खूप छान प्रतिसाद तसेच स्मरणरंजन

"खूप छान प्रतिसाद तसेच स्मरणरंजन"
+१
आणि तुमच्या सारख्या अनुभवी व्यक्तींचे प्रतिसादही ज्ञानात भर घालणारे आहेत हो `रेव्यु`... 👍

मराठी भाषेतील सुखद श्रवणाच्या काही आठवणी
-1988 साली मनालीत, जीवघेण्या थंडीत बाजूच्या हॉटेलात काम करणारे मराठी तरुण जोडपे, त्यांच्याशी मराठी संवाद आणि मग त्यांनी खाऊ घातलेले थालिपीठ
-बाबासाहेब पुरंदर्यांची व्याख्याने
-डॉ श्रीराम लागू प्रभृतींची डायलॉग डिलिव्हरी ---- अर्थातच आशयाला दिलेला न्याय
-माझ्या अमेरिकेत वास्तव्य असणार्या नातीने म्हटलेले ’चाफा बोलेना”
-वीररसाने ओतप्रोत पोवाडे जे आमच्या शाळेतील एक वर्गमित्र गायचा
-बेंगळूरु मध्ये आय आय एम च्या विद्यार्थी वसतीगृहात मराठी विद्यार्थी रहायचे, त्यांनी लावलेली नाट्यगीते
-बेळगावला लळा लावणार्या मराठीतील.... हळ्ळामाराचे ( गारपीटीचे) दिवस, सण्ण हुडुगीचे (लहान मुलीचे--- सूनेचे) काम, कळस कळस (पाठव पाठव) म्ह्णलं तर कसं कळसायचं (पाठवायचं) रे धोंडिबा!
-वर्‍हाडातील काहून बे अन काय बे हे नेहमीचे पण प्रचलित अपभ्रंश
अन आता दु:खद आठवणी
-बहुतेक राजकीय अश्रवणीय भाषणे
- अर्थहीन परिसंवाद
- अर्थ न जाणता गायलेली गाणी
-अनर्थ करणारे उच्चार

** बहुतेक राजकीय अश्रवणीय भाषणे
-अनर्थ करणारे उच्चार >>>> +१११

हताशपणे "असो" म्हणण्याखेरीज आपल्या हातात काही नाही.

आजी-आजोबांनी रंगवून सांगितलेल्या इसापनीती आणि पंचतंत्राच्या कथा.
आई बाबांना संगीताची आवड असल्यामुळे घरात नाट्य संगीतापासून लावणीपर्यंत सगळं काही गुणगुणलं जायचं. त्यामुळे मोठेपणी बाथरूममध्ये मानसोक्त गायची सवय लागली. श्रीनिवास खळे यांची गाणी अतिशय आवडती.

बाबांबरोबर कुरुंदकर साहेबांची काही भाषणे ऐकली. अगदी अभ्यासपूर्ण.
पक्षांचे निरनिराळे आवाज भरपूर ऐकायला मिळतील अशा ठिकाणी भटकंती करतो.

माझ्या वरच्या प्रतिसादात खूप जास्त चुका झाल्या/ राहून गेल्या.. झालेल्या हलगर्जीपणाबद्दल क्षमस्व. पण त्यात दुरुस्ती आता करता येणार नाही त्यामुळे ही सुधारित परत टाकते आहे.

****
श्रवण म्हणजे ऐकणे. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे लहानपणी आपल्याला अत्यंत ऐकायला आवडणारी म्हणजे गोष्ट..
आम्हाला बहुतांशी गोष्ट सांगणारी व्यक्ती म्हणजे आजी. तिच्या गोष्टी राजा राणीच्या किंवा प्राण्यांचा नसत.. त्या साध्या माणसांच्या असत. मुख्य लक्षात राहिलेल्या म्हणजे खुलभर दुधाची गोष्ट किंवा शुक्रवारची कहाणी. त्यावेळी गोष्टी म्हणून ऐकल असलं तरी पुढे गेल्यावर त्यातले मुद्दे लक्षात आले. त्यावेळी आजी किंवा आजोबांनी सहज म्हणून बोललेले काही नकळत मार्गदर्शक तत्वे कधी / कशी झाली कळलही नाही.

पुढे शाळेत ऐकायचे संस्कार झाले ते परिपाठातून. दररोज सकाळी सहा सातशे मुलं - मुली.. एकाच तालासुरात.. एकत्र.. राष्ट्रभक्तीपर गीत, मनाचे श्लोक, गीतेतील अध्याय, भजन, भारुड, अथर्वशीर्ष हे आणि असे .. म्हणत त्याहून उत्तम अशी शालेय दिवसाची सुरुवात असू शकत नाही असं वाटतं.
स्वयंसेवी वृत्तीने, ऊन असो की पाऊस, दररोज फक्त यासाठी शाळेत येऊन आमच्याकडून ते म्हणून घेणारे, संस्कार देणारे सर यांविषयी अतिव आदर / ऋण कायम मनात राहिले आहे.

या व्यतिरिक्त अजून एका आवाजाच ऋण म्हणजे अर्थात पुलंचा आवाज..
खरं तर पहिल्यांदा भेटले (कॅसेट मधून) ते असामी असामीतील जोशी कुटुंबीय, हरीतात्या, नारायण, पेस्तानकाका... मग या अवलिया व्यक्तिचित्रांचे करते करविते म्हणजे साक्षात पु लं हे कळत गेले..
अजूनही कामाच्या थकव्याने, ताणाने दमलेल्या तनामनावर, एखाद्या दुखऱ्या / हळव्या क्षणावर तोच आवाज फुंकर घालतो.

भौतिकाच्या पलीकडे काही असेल या शक्यतेपर्यंत घेऊन जाणारा मला गवसलेला एक स्वर म्हणजे अमर ओक यांची बासरी.. त्यांचा बासरीचा प्रत्यक्ष कार्यक्रम ऐकताना आलेला अनुभव विलक्षण होता अर्थात अविस्मरणीयही..
या कार्यक्रमात ते म्हणाले होते, शब्दांशिवायचे हे सूर तुम्हाला शब्दांच्या शोधात घेऊन जातात आणि त्यामुळे मिळणारा अनुभव प्रत्यक्ष गाण ऐकण्यापेक्षाही उत्कट वाटत असावा..

शाळेत असताना शिवाजीराव भोसल्यांचे ऐकलेले भाषण, शाहीर साबळ्यांचा महाराष्ट्राची लोकधारा कार्यक्रम, चंद्रशेखर गोखल्यांचा चारोळीचा कार्यक्रम, सत्यशील देशपांडेंचा कार्यक्रम हे अजून काही विशेष लक्षात राहिलेले कार्यक्रम /आवाज.

अलीकडे अजून एक खूप भावलेला तरल आवाज म्हणजे देवकी पंडित यांचा, २० वर्षानाच्या गॅपनंतर त्यांनी केलेला हा पहिला कार्यक्रम होता.. सारेगमप किंवा इतर कार्यक्रमात त्यांची गाणी पूर्वी ऐकली होती पण हा कार्यक्रम फारच वेगळ्या उंचीवर घेऊन जाणारा वाटला..

सध्या सहज उपलब्ध होणारे आणि त्यामुळे वाचली (खर तर ऐकली) जाणारी श्राव्य पुस्तके (ऑडिओ बुक्स), यू ट्यूब कृपेने ऐकायला मिळणाऱ्या कविता, मुलाखती, विनोदी प्रहसने.. हे व यासारखे बरेच या श्रवणाच्या यादीत आहे.

प्रतिसाद खूपच मोठा झालाय…

पण धन्यवाद कुमार१, तुमच्या या धाग्यामुळे छान उजळणी झाली.

रेव्यु, संजय भावे धन्यवाद!

पक्षांचे निरनिराळे आवाज भरपूर ऐकायला मिळतील अशा ठिकाणी भटकंती करतो. >> मस्त

निव्वळ वाद्यसंगीताची धुंदी ही काही वेगळीच आहे. >> हो त्या अमर ओक यांच्या कार्यक्रमानंतर मला त्याची जाणीव झाली..
जाता जाता एक सांगते, ( कदाचित अनेकांना माहिती असेल...)
अमर ओक यांच्या संग्रहात अनेक बासऱ्या आहेत. कार्यक्रमात ते 20 एक तरी बासऱ्या घेऊन आले होते.. वेगवेगळ्या लांबीच्या, रुंदीच्या असलेल्या त्या बासऱ्यांमधून (अर्थातच) निरनिराळ्या पोताचे ( हाय पीच - लो पीच) अवीट सुरांची प्रात्यक्षिके त्यांनी दाखविली.. तेव्हा शास्त्र आणि कला यांचाही संगम बघायला मिळाला.

*20 एक तरी बासऱ्या घेऊन आले होते..
अगदी ! पाहिलाय मी तो कार्यक्रम.
सह्याद्री वाहिनीवरचे
मैत्र हे तालसुरांचे आणि शब्द सुरांचे
हे दोन्ही कार्यक्रम अप्रतिम असतात. त्यात आतापर्यंत बहुतेक सगळे उत्तमोत्तम कलाकार येऊन गेले आहेत. इथेही ओक बहुतेक आले होते.
. . .
तसेच युट्युबवर मी ब्रायन सिलस यांचे पियानो वादन अनेक वेळा ऐकतो.

<शिवाजीराव भोसल्यांचे ऐकलेले भाषण>
यांचे भाषण ऐकायचं माझा योग नाही आला परंतु विज्ञानावरचे डॉ. विजय भटकर आणि करियर मार्गदर्शन विषयावरचे डॉ. श्रीकांत जिचकार यांची मी ऐकलेली भाषणे उल्लेखनीय होती. अतिशय मुद्देसूद आणि अभ्यासपूर्ण.

* डॉ. श्रीकांत जिचकार >>> +१
आमच्या कॉलेजमध्ये ते प्रमुख पाहुणे म्हणून आले असता ऐकले आहे. दुर्दैवाने मी ऐकलेले ते त्यांचे शेवटचे भाषण ठरले.
* * *
1970- 80 च्या दरम्यान ऐकलेली दोन भाषणे विशेष लक्षात राहीलीत.
.
आमच्या शाळेत एकदा नामवंत फिजिशियन ह वि सरदेसाई आरोग्यावर बोलण्यासाठी आले होते. तेव्हा ते तरुण होते आणि अगदी राजबिंडे दिसायचे अन् वाणी तर मधुरच (जिभेवर डायबेटीस असणे हा वाक्प्रचार बहुधा त्यांच्यासारख्या लोकांमुळे आला असावा!) त्या भाषणात त्यांनी केलेली एक सूचना अगदी आयुष्यभर लक्षात राहिली. ती म्हणजे,

“सकाळी उठल्यानंतर तुम्हाला फटाफट शिंका येतात का? जर येत असतील तर पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या झोपण्याच्या खोलीचे पडदे नियमित धुवून घेत चला ! त्यात साठणारी धूळ
हे एलर्जीचे एक महत्त्वाचे कारण आहे”.

.
पुण्यातील सुप्रसिद्ध वसंत व्याख्यानमालेतले मी ऐकलेले एकमेव भाषण म्हणजे ॲड. बी जी कोळसे पाटील यांचे. त्याला अनेक तरुणांसह खूप जण उत्सुकतेने आले होते. सगळ्यांचा अंदाज होता की ते जोशी अभ्यंकर आणि मानवत हत्याकांडासंबंधी बरेच काही बोलतील कारण त्या खटल्यांमध्ये ते वकील होते. किंबहुना त्या उत्सुकतेनेच बरेचसे लोक भाषणाला आले होते.

प्रत्यक्षात त्यांनी भाषणात त्याचा फारसा काही उल्लेख केला नाही आणि ते एकंदरीत कायदा आणि समाज या विषयावरच जडभारी बोलले. त्यामुळे बहुतेक श्रोत्यांचा विरस झाल्याचे आठवते.

https://www.youtube.com/watch?v=GZTIK-1nxPw
‘ पुस्तकातली खूण कराया दिले एकदा पीस’ ही इंदिरा संतांची अप्रतिम कविता पद्मजा फेणाणींच्या आवाजात ऐकल्यावर कान कसे तृप्त होतात!

https://www.youtube.com/watch?v=GZTIK-1nxPw
‘ पुस्तकातली खूण कराया दिले एकदा पीस’ ही इंदिरा संतांची अप्रतिम कविता पद्मजा फेणाणींच्या आवाजात ऐकल्यावर कान कसे तृप्त होतात!

गडकऱ्यांची कवीचा कारखाना नावाची गोष्ट स्टोरिटेलवर ऐकायला मिळाली.. आंतर जालावर ते लिखित स्वरूपातही सापडले.. परंतु ऐकायला जास्त आवडले.. हसू आल्याशिवाय रहात नाही
पुलं गडकऱ्यांना गुरु मानायचे आणि शांत शेळकेंच्या पुस्तकातही गडकऱ्यांच्या विनोदी लेखनाविषयी छान उल्लेख मिळाले. त्यामुळे उत्सुकता होती.

विकी वरती गडकऱ्यांचे काही लेख आहेत.. कोणाला हवे असल्यास त्याची लिंक

https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A...

चंगो च्या 'मी माझा' ची एक ऑडिओ कॅसेट आली होती. त्यात रीमा लागू, विनय आपटे इत्यादी बाप लोकांनी चारोळ्या सादर केल्या होत्या. एक वेगळा श्रवणीय आणि अविस्मरणीयआनंद देऊन गेलेला प्रयोग

Pages