मराठी : श्रवण घडते कसे?

Submitted by कुमार१ on 30 April, 2025 - 18:02

सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

पूर्वपीठिका :
१/ ५/२०२३ : ‘मराठी: वाचन घडते कसे?’ https://www.maayboli.com/node/83383

२७/२/२०२४ : ‘मराठी : लेखन घडते कसे?’
https://www.maayboli.com/node/84711

गेल्या दोन वर्षात वरील दोन्ही मराठी भाषेसंबंधीच्या विषयांना वाचकांनी भरभरून आणि वाचनीय प्रतिसाद दिले. यंदा त्या मालिकेतील तिसरी संकल्पना शीर्षकात लिहिल्याप्रमाणे घेतो आहे.

आपल्या जन्मानंतर जर आपण आपल्या विविध विकासाचे टप्पे बघत गेलो तर त्यात लक्षात येईल, की ज्ञानग्रहणाच्या दृष्टीने श्रवण ही सर्वात पहिली आणि अत्यंत मूलभूत अशी क्रिया आहे. किंबहुना आपण जन्मल्यानंतर प्रथम काय ऐकतो ते म्हणजे आपले स्वतःचेच रडणे ! म्हणूनच कदाचित आयुष्यभर रडगाणी गाणे हा मानवी स्थायीभाव असतो की काय, कोण जाणे ?

जशी बाल्यावस्था पुढे सरकत जाते तसतसे आपण आपल्या घर व परिसरातील ‘मातृ’भाषेतील (आणि अन्य भाषिक देखील) संवाद ऐकू लागतो. तसेच निसर्गातील विविध भाषारहित आवाजही आपल्या कानावर पडत राहतात.

कळत्या वयात आल्यानंतर आपले जे श्रवण घडते त्यामध्ये दैनंदिन संभाषण, विविध आरत्या, श्लोक, गाणी, भजने, भाषणे, शिक्षणादरम्यानची व्याख्याने, कीर्तने, प्रवचने, गप्पा टप्पा आणि घोषणाबाजी अशा असंख्य गोष्टींचा अंतर्भाव करता येईल. अशा श्रवणातून आपण जे काही ज्ञानग्रहण केले किंवा आनंद मिळवला (अथवा नाही) त्यासंबंधी आज आपण काही लिहिणार आहोत. जे श्रवण त्रासदायक वाटते त्याबद्दलही लिहावे. निमित्त अर्थातच मराठी दिनाचे असल्यामुळे आपला परीघ फक्त मराठी भाषेतील श्रवणापुरताच मर्यादित ठेवूयात.

लहानपणापासून आतापर्यंत मराठी भाषेतले आपण काय काय ऐकत गेलात आणि त्याचा आपल्या मनावर कसा परिणाम होत गेला, यासंबंधी सर्वांचे विचार जाणून घ्यायला नक्कीच आवडेल.

मराठी सोडून अन्य काही भाषांतील अनेक गाणी अथवा अन्य काही श्रवणीय गोष्टी कितीही आवडत्या, प्राणप्रिय वगैरे असल्या तरी या धाग्यात त्यांची सरमिसळ नसावी. तसेच दृकश्राव्य माध्यमांपेक्षा शुद्ध श्रवणातून आपण काय अनुभवले यावर मुख्यतः आपले विचार मांडावेत.

आपल्या जीवनप्रवासातील विविध मराठी श्रवणांचे स्थान आणि त्याचा आपल्यावर झालेला परिणाम यासंबंधात मनमोकळेपणाने व्यक्त होऊयात ही विनंती.

धन्यवाद !
********************************************************************

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
छान प्रस्तावना आणि विषय... Happy
"घाशिराम कोतवालच्या" संगीतानं मला पछाडलयं. कितीही ऐकलं तरी तृप्त होत नाही.
असच काही मनात गुंजणारं
जैत रे जैत ची गीतं.
हमामा पोरी हमामा
अजय, अतुलची गीतं त्यांचं संगीत
लोकसंगीत आणि शास्त्रीय संगीत फ्युजन आवडतं
सध्या एवढंच

अखेरचे येतील माझ्या...
तू अशी जवळी रहा...
एकवार पंखावरुनी फिरो तुझा हात...
दाटून कंठ येतो, ओठांत येई गाणे जा आपुल्या घरी तू, जा लाडके सुखाने हातात बाळपोथी, ओठांत बाळभाषा रमलो तुझ्यासवे मी गिरवीत श्रीगणेशा वळवून अक्षरांना केले ...
बगळ्यांची माळ फुले अजुनि अंबरात भेट आपुली स्मरशी काय तू मनात? छेडिति पानांत बीन थेंब पावसाचे ओल्या रानात खुले ऊन अभ्रकाचे...
कुमार सर काही गाणी सिनेमातली असतील पण मी ते सिनिमे नाही बघितलेले. सगळी गाणी रेडीओवर ऐकलेली.

अजुनी रुसून आहे...
आज अचानक गाठ पडे...
केळींचे सुकले बाग...
गेले द्यायचे राहुनी...
ती येते आणीक जाते...
ज्ञानेश्वरांचे सगळे अभंग.

"एका लग्नाची गोष्ट" ह्या मराठी नाटकातील श्याम पोंक्षे ह्यांचे हे स्वगत
https://www.marathisrushti.com/mvideos/eka-lagnachi-gosht/
५९ मिनिटाला सुरु होते.
अशा बस मधून प्रवास करायला भाग्य लागते.
नटसम्राट नाटकातील डॉक्टर लागू ह्यांनी अभिनित केलेली स्वगते,

सर्वांना धन्यवाद !
वाचतोय . . .

गीत संगीताला प्राधान्य मिळणार हे स्वाभाविक आहे. श्रवणाच्या अन्य विषयांबद्दलही जरुर यावे.

>>>श्रवणाच्या अन्य विषयांबद्दलही जरुर यावे.>>>हे अभिप्रेत असेल असं मलाही वाटलं होतं पण हे स्ट्रेसबस्टर असल्याने प्राधान्य मिळालं असावं.
केकू सगळी आवडती गाणी.
भिमसेनांचे अभंग ऐकून अन कानसेन झालो.
महाविद्यालयीन शिक्षण घेत होतो . संगीत नाटकाचे फुकट पास मिळाले. तोवर शास्त्रीय संगीत काय असतं हे माहीत नव्हतं. अर्ध नाटक पाहिलं.
निवेदन ऐकाव तर अमिन सायानी, तब्बसूम
आकाशवाणीवरची निवेदनं ही छान असत.
टेकाडे भाऊजी घरात डोळ्यासमोर बघतोय असं वाटायचं. संवादफेक ती पात्रं आणि नेपथ्य तुमच्या डोळ्यासमोर ऊभं करत ही आवाजाची महान किमयाच की.
काही क्रिकेट समालोचक ही स्पष्ट शब्दात, सुंदर समालोचन करायचे मराठीतून. आता नावं आठवत नाहीत.
पारमार्थिक "बाबा महाराज सातारकर" सुंदर, स्पष्ट वाणी आणि गायन. एरवी भजनी भसाडे आवाज नको वाटतात.
साहित्यावर येऊ द्या आता....

श्रवणाच्या अन्य विषयांबद्दलही जरुर यावे:>>>> सर कुठल्याही भाषेत न बसणारे अनेक आवाज आहेत. उदा. लहान मुलांचे हुंदके देत देत रडणे किंवा सिग्नल हिरवा झाला की वाजणारे गाड्यांचे कर्कश्श भोंगे, असे अनेक आहेत.
पण इथे मराठी अभिप्रेत असल्याने लिहित नाही.
अवांतर
एका फ्रेंच दिग्दर्शकाचा सिनेमा बघितला होता. त्यात फक्त आवाज आणि दृश्य होती.

१. वर उल्लेखलेली बहुतेक सर्व गाणी माझ्याही आवडीची आणि छानच.

२. काही क्रिकेट समालोचक
>>>बाळ ज पंडित आणि वि वि करमरकर. या दोघांनी क्रिकेटच्या कित्येक शब्दांचे केलेले मराठीकरण कौतुकास्पद आहे.

३. कुठल्याही भाषेत न बसणारे अनेक आवाज
>>> अगदी अगदी. त्यापैकी काही हवेसे वाटणारे तर काही अति त्रासदायक ! Happy

गावातले गोंधळी एखादी पौराणिक कथा छान विनोदी शैलीत रंगवत. संबळ वाजलाकी वीरश्री संचारत असावी. मला हे वाद्य आजही आवडतं.
हलगी, संबळच्या तालावर नाच...
https://youtube.com/shorts/6uqOzK9nNMk?si=VRUA6dM--4e-z2ro

आकाशवाणी मुंबई - मंगल प्रभात, गंमतजंमत, कामगार सभा, कामगारांसाठी , वनिता मंडळ , गृहिणी (पुणे केंद्राचा कार्यक्रम आठवड्यातून एकदा मुंबई केंद्र सहक्षेपित करीत असे) , पुढे बालदरबार युववाणी, बातम्या, श्रुतिका, पुन्हा प्रपंच, कृतानेक नमस्कार , रंगभूमीवरच्या नाटकांच्या नभोनाट्य आवृत्त्या विविधभारतीवरचे गीतगंगा आणि सांजधारा , नाट्यरंग.
बाळ कुडतरकर, नीलम प्रभू - करुणा देव, प्रभाकर जोशी , विमल जोशी. बरीच नावं विस्मृतीत गेली.

आमच्या घरी नाटक सिनेमाला जायची रीत नव्हती. सगळ्यात जवळचं नाट्यगृह पार्ल्याला. अनेक नाटकांचं ध्वनिमुद्रण किंवा त्यांच्या नभोवाणी आवृत्त्या ऐकल्या. गुंतता हृदय हे, वीज म्हणाली धरतीला , दिवाळीत ऐकवली गेलेली संगीत नाटकं लक्षात आहेत. दिलीप प्रभावळकरांनी बोक्या सातबंडे आका शवाणीसाठी लिहिलंय बहुतेक. त्यात ते स्वतः बोक्याचे बाबा, स्वाती सुब्रमण्यन बोक्याची आई, सुलभा कोरान्ने आजी आणि अजित भुरे दादा. बोक्या कोण होता ते आठवत नाही.

एफेम वाहिन्या सुरू झाल्यावर एफेम गोल्ड व क्वचित एफेम रेन्बो ऐकलं. इथे मन रमलं नाही. आर जेंची बडबड. रेन्बोवरचा पहाटे येणारा एक आर जे आपल्या कार्यक्रमात किती एसेमेस आले, याची आकडेवारी द्यायचा. त्यामुळे त्याच्या कार्यक्रमातलं जे काही ऐकण्यासारखं असे त्याचीही चव बिघडली.

कॅसेट्स आणि सीडीज. सारेगम कारवाँ मराठी. काही गाणी यावरच पहिल्यांदा ऐकली.

सुंदर धागा....

उन्हाळ्याच्या सुट्टीत, मामांच्या घरी आजोबा सकाळीच त्यांची पूजा करताना रेडिओ लावायचे -अंदाजे साडेसहाला.

1990 -91 ला पुणे आकाशवाणी केंद्रावरून गीतारामायण सकाळी 7 च्या आसपास सुरु होता असे.... बाबुजींचे ते सुमुधूर स्वर आजही... सुखद अनुभवांची आठवण करून देतात...

छान लिहिताय सर्वजण!
. .
१. गोंधळी >>> आणि इतर लोककला देखील महत्त्वाच्या. त्यांची कथनशैली श्रोत्यांना गुंगवून टाकणारी असते.

२. नाटकांचं ध्वनिमुद्रण किंवा त्यांच्या नभोवाणी आवृत्त्या
>>> दिवाळीच्या दिवसात तर विशेष आवृत्ती असायच्या.
या जोडीला काही श्रुतिका पण.

१. एफेम वाहिन्या... इथे मन रमलं नाही.
>>> अगदी अगदी. कधीच रमलं नाहीच. विविध भारती जिंदाबाद !

२. बाबुजींचे ते सुमुधूर स्वर >>> +११
गीत रामायणाचे मराठी मनावरील गारुड अजूनही टिकून आहे.

भरत छान आठवणी जागवल्या.
आकाशवाणीच्या "कामगार सभेत" एका लोकनाट्यासाठी मी लिहिलेली लावणी प्रथम गायली गेली. Happy

१.
*शिशु अवस्थेपासूनच घरच्या घरी विविध सणांच्या निमित्ताने आरत्या व श्लोक यांचे श्रवण होऊ लागले. त्या प्रकारांचे एक वैशिष्ट्य म्हणजे ऐकून ऐकूनच त्या गोष्टी आपोआप पाठ होतात; शाळेतल्या कवितांप्रमाणे पुस्तक घेऊन पाठ करण्यासाठी बसावे लागत नाही.

*शालेय वयात संस्कारांचा एक भाग म्हणून आम्हा मुलांना शेजारी राहणाऱ्या आजोबांकडे गीता समजून घेण्यासाठी पाठवले जाई. त्या आजोबांचे उच्चार सुस्पष्ट व खणखणीत होते. त्यांनी अशा प्रकारे पहिला अध्याय त्यांच्या जोडीने म्हणत आमच्याकडून मराठी अर्थासह पाठ करून घेतला होता. आता मागे वळून पाहता असे वाटते की धर्मग्रंथांमधील चांगल्या विचारांच्या आचरणाच्या बाबतीत आपण फारच थिटे पडतो. तेव्हा नुसत्या पाठांतराला कितपत अर्थ आहे असा विचार सतावत राहतो. पण हरकत नाही, त्या उपक्रमामुळे गीतेची सुरुवात “धृतराष्ट्र उवाच”ने असल्याचे (अन् श्रीकृष्ण किंवा अर्जुन उवाचने नव्हे!) मनात अगदी पक्के ठसले. तसेच त्याच्या पहिल्या प्रश्नावर पुढे संजय जे विस्तृत उत्तर देतो त्यातून ‘संजय उवाच’ हा वाक्प्रचार जनमानसात रूढ झाल्याचे लक्षात आले होते.

* प्रत्यक्ष शाळेत अनेक गुरुजनांकडून अथर्वशीर्ष, विविध महाराष्ट्र आणि स्वातंत्र्यगीते आणि खुद्द शाळेची घोषणा हे स्वच्छ व खणखणीत आवाजात ऐकायला मिळाले. मनात जोश निर्माण होण्यासाठी त्यांचा उपयोग खचितच असतो. या सर्व ऐकलेल्या गोष्टी आजही जवळजवळ पूर्ण लक्षात आहेत.

पुढे चालू . . .


२.

* साधारण विशीत असताना प्राचार्य शिवाजीराव भोसले यांची मोजून तीनच व्याख्याने ऐकली होती. ती मंत्रमुग्ध करणारी शैली नक्कीच मोहवून गेली. अर्थात त्यानंतर पुन्हा पुन्हा त्यांचे अलंकारिक भाषण ऐकावे असे काही वाटले नाही.
मेडिकल कॉलेजमध्ये एका समारंभात ऐकलेले डॉ. बी एन पुरंदरे या प्रख्यात स्त्रीरोगतज्ञांचे उत्कृष्ट देहबोलीसकट केलेले भाषण मनात कायमचे कोरले गेले.

* घरी नियमित येत असणाऱ्या काही लोकांच्या बोलण्यातूनही बरेच काही शिकायला मिळाले. त्यातला एखादा विनोदनिर्मिती करून सर्वांना आपलेसे करून घेई आणि आनंदाचे वातावरण निर्माण करे, तर दुसरा एखादा एक किस्सा सांगता सांगता त्यातून अभिप्रेत असणारे एखादे छानसे तत्त्व देखील हळूच समजावून देई.

जडणघडण होण्याच्या वयात झालेल्या वरील सर्व श्रवणाचे महत्त्व निर्विवाद आहे.

* चाळीशीनंतरच्या आतापर्यंतच्या आयुष्यात विविध मराठी गाण्यांचे आणि शब्दाविण संगीताचे महत्त्व एखाद्या जिवलग सोबत्याप्रमाणे आहे. विस्तारभयास्तव त्यासंबंधी आता लिहित नाही

दु प्र

भोसले, राम शेवाळकर, निनाद बेडेकर हल्ली तूनळी वर‌ .ऐकले.
गीतेवरून आठवलं आम्ही विनोबांची गीताई वसतीगृहात असताना सायं प्रार्थनेत म्हणायचो.
एवढ्यात तूनळीवर सारेगामाची हिन्दी भगवद् गीता ऐकली व नंतर एक प्री रेकॉर्डेड रेडीओ सदृश्य मिनी रेडिओ त्यांचाच "सारेगामा भक्ती" विकत घेतला.
शैलेंद्र भारतींचं सुंदर निवेदन... थोडं अवांतर होतंय पण कान तृप्त करतं.
https://youtube.com/playlist?list=PL5A5QJkW7MkvYslAbg7_rFij8yVEeiEwF&si=...

* विनोबांची गीताई
>> ही मी वरवर चाळून थोडीशीच वाचली आहे. चांगली आहे.

आमच्या एका नातेवाईकांनी मूळ अथर्वशीर्षचे मराठीत काव्य रूपांतर केले आहे. त्याचे ते वाचन करताना आम्ही ऐकले आहे.

चांगला विषय. सवडीने लिहितो. सध्या वाचतो आहे.

गीतेवरून आठवलं आम्ही विनोबांची गीताई वसतीगृहात असताना सायं प्रार्थनेत म्हणायचो. >> +१ शाळेत.
खाली शाखा वरी मूळ नित्य अश्वत्थ बोलिला, ज्याच्या पानांमध्ये वेद जाणे तो वेद जाणतो.

"मराठी सोडून अन्य काही भाषांतील अनेक गाणी अथवा अन्य काही श्रवणीय गोष्टी कितीही आवडत्या, प्राणप्रिय वगैरे असल्या तरी या धाग्यात त्यांची सरमिसळ नसावी. तसेच दृकश्राव्य माध्यमांपेक्षा शुद्ध श्रवणातून आपण काय अनुभवले यावर मुख्यतः आपले विचार मांडावेत."

कुमार सर, हा नियम म्हणजे वरिष्ठ सेनाधिकार्‍याने, मॅगझिन काढुन घेतलेल्या बिनाकाडतुसांच्या बंदुकी सैनिकांच्या हातात देत "हां...करा आता बेछुट गोळीबार" असे सांगण्यासरखे आहे की हो... 😉

जोक्स अपार्ट... 'शुद्ध श्रवणातून' अनुभवलेल्या गोष्टी नेणिवेच्या पातळीवर इतक्या प्रचंड प्रमाणात असतील की त्या संदर्भासहीत आठवुन लिहिणे म्हणजे खुपच कठीण काम आहे! दृकश्राव्य माध्यमांतून जाणिवेच्या पातळीवर अनुभवलेल्या गोष्टींबद्दल लिहिणे हे त्यामानाने खुप सोपे काम होते. पण तो पर्याय बाद असल्याने हरचंद पालवांनी म्हंटल्याप्रमाणे,
"चांगला विषय. सवडीने लिहितो. सध्या वाचतो आहे."

*बेछुट गोळीबार"
>>> गोळी बरोबर लागलेली आहे ! Happy
दृकश्राव्यचा नियम कडक वगैरे नाही हो .
लिहा बिंदास्त तुमच्या पसंतीचे. फक्त धाग्याचे औचित्य लक्षात घेता मराठी गोष्टींबद्दल लिहावे.
Happy

चांगला विषय. सवडीने लिहिणार +१
<मनाचे श्लोक>
हे अगदी आवडीचे. आमच्या शाळेत काही मोजक्या श्लोकांची पाठांतर स्पर्धा असायची. त्यात एकदा बक्षीस मिळवले होते.

मनाचे श्लोक वरून आठवले.
पूर्वी आम्ही मित्रांनी मिळून एक भाषण कट्टा चालवला होता :
https://www.maayboli.com/node/63779
त्यात एके दिवशी एका मित्राने मनाच्या श्लोकांची जन्मकथा आम्हाला अगदी रंगवून सांगितली होती. आता त्यातले सर्व काही आठवत नाही. परंतु ते सर्व २०५ श्लोक रामदासांनी एका बैठकीत रातोरात कल्याणस्वामींना सांगितले होते आणि कल्याणस्वामींनी ते लिहून काढले होते, हा महत्त्वाचा मुद्दा अगदी पक्का लक्षात राहिला आहे.
. .
आज ती संपूर्ण जन्मकथा इथे वाचून काढली :
https://www.mahamtb.com/Encyc/2022/1/6/Article-on-Manache-Shlok.html#/go...
. . .
*अंड्याचे फंडे>>> नाव मस्त !
नक्की वाचतो Happy