
सोळा दिवसांच्या ऐसपैस जम्मू-काश्मीर सहलीच्या पहिल्या चार दिवसांत जम्मूतली भटकंती आणि वैष्णोदेवीचे दर्शन घेऊन १८ जून २०१७ रोजी विस्तारा एअरलाईन्सच्या विमानाने जम्मू ते श्रीनगर हा जेमतेम २५ मिनिटांचा छोटासा हवाई प्रवास पूर्ण करून सकाळी सव्वा अकराच्या सुमारास आम्ही श्रीनगरला पोचलो होतो.
श्रीनगर विमानतळावरून आम्हाला पहलगामच्या 'द पीस रिसॉर्ट - वलीसन्स' ला घेऊन जाण्यासाठी आलेल्या ओवैस नावाच्या ड्रायव्हरशी भेट झाल्यावर त्याने "आज पहलगामला जाणे धोकादायक असल्याने तुमच्या कार्यक्रमात थोडा बदल करावा लागणार आहे. रिसॉर्टचे व्यवस्थापक ऐजाज ह्यांना कॉल करा, ते तुम्हाला अधिक माहिती देतील" असे सांगितले होते.
ओवैसने सांगितल्याप्रमाणे ऐजाजला फोन केल्यावर "श्रीनगर आणि पहलगाम ह्या दोन्ही ठिकाणची परिस्थिती सर्वसामान्य असली तरी ह्या प्रवासाच्या मार्गावरच्या एका गावात काल लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन स्थानिक अल्पवयीन मुलांचा मृत्यु झाला आहे. आज दुपारी त्यांचा दफनविधी उरकेपर्यंत त्याठिकाणची परिस्थिती तणावग्रस्त रहाणार असून गावकऱ्यांकडून सुरु असलेल्या निदर्शनाला दगडफेक किंवा जाळपोळी सारखे हिंसक वळण लागण्याची शक्यता असल्याने आत्ता थेट पहलगामला न येता आज तुम्ही श्रीनगरमध्येच थांबा. तिथे आमच्याच 'हॉटेल वलीसन्स - श्रीनगर' मध्ये तुमच्या आजच्या मुक्कामाची व्यवस्था केलेली आहे. त्या हॉटेलचे व्यवस्थापक असलेले माझे मोठे बंधू सज्जादभाई आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळपर्यंत तिकडचे वातावरण निवळल्याची खात्री करून तुम्हाला योग्यवेळी सुरक्षितपणे पहलगामला पोचण्यासाठी मार्गदर्शन करतील." अशी सूचनावजा माहिती त्याने दिली होती.
काश्मीर खोऱ्यात पाय ठेवल्या ठेवल्या मिळालेली हि माहिती 'प्रथमाग्रासे मक्षिकापातः' म्हणतात तशी वाटल्याने बायकोचा मूड थोडा ऑफ झाला होता. २००० साली आमची ओळखंच 'सिमला-कुलू-मनाली-वैष्णोदेवी' ह्या सहलीत झाली होती त्यामुळे त्यावेळी जम्मू, कटरा आणि नंतर सुरक्षिततेच्या कारणास्तव दुधाची तहान ताकावर भागवल्यासारखे 'काश्मीर' ऐवजी लेह-लडाखही तिचे पाहून झाले होते. परंतु पृथ्वीतलावरचा हा स्वर्ग पहाण्यासाठी आणि तिथले अलौकिक निसर्गसौंदर्य मनमुराद अनुभवण्यासाठी केलेल्या अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर ऑफिसममधून चांगली मोठी रजा आणि मनात खूप साऱ्या अपेक्षा/कविकल्पना घेऊन ती इथे आली होती त्यामुळे थोडा मूड ऑफ होणे अगदी सहाजिक होते, पण 'जे होते ते चांगल्यासाठीच होते' ह्याची प्रचिती तिला लवकरच येणार होती!
मी ह्या आधीही काश्मीरला पर्यटनासाठी एकदा आणि कामानिमित्ताने अनेकदा भेट दिलेली असल्याने तिथे वारंवार घडणाऱ्या अशा घटना व त्यामुळे उद्भवणाऱ्या वाहतुक, दळणवळणाच्या समस्या आणि अनिश्चित परिस्थितीची मला चांगलीच कल्पना होती, आणि 'Leisure Travel' हाच मुख्य उद्देश असलेल्या ह्या सहलीत जम्मू, कटरा, पहलगाम, गुलमर्ग आणि श्रीनगर ह्या पाचही मुक्कामाच्या ठिकाणी किमान एक रात्र तरी अतिरिक्त ठेऊन कार्यक्रमाची आखणी केली होती. त्यामुळे आता बदललेल्या परिस्थितीत आधी ठरवलेला 'पहलगामचा मुक्काम ६ रात्रीं ऐवजी ५ रात्रींचा' आणि 'श्रीनगरचा मुक्काम ४ रात्रीं ऐवजी ५ रात्रींचा' असा किरकोळ बदल होणार होता ज्याचा, आमच्या सहलीवर काहीही विपरीत परिणाम होणार नसल्याने मी निश्चिंत होतो!
श्रीनगर एअरपोर्ट पासून १५ कि.मी. अंतरावर शहराच्या मधोमध, दल सरोवराला (Dal Lake) खेटून असलेल्या 'हॉटेल वलिसन्स पर्यंत पोहोचायला आम्हाला जवळपास अर्धा तास लागला होता.
आम्हा दोघांबरोबर ओवैस असल्याने रिसेप्शन काउंटरपाशी कोणाशीतरी फोनवर बोलत उभ्या असलेल्या सज्जादभाईंना आमची ओळख सांगायची गरजच पडली नाही. माऊथपीसवर हात ठेवत हसून आमचे स्वागत करून रिसेप्शनीस्टकडून पहिल्या मजल्यावरच्या कुठल्याश्या रूमची चावी घेत ओवैसच्या हातातील आमचे सामान रूममध्ये ठेवण्यासाठी एका बेलबॉयला पिटाळले आणि "तुम्ही फ्रेश होऊन या मग आपण आरामात बोलू." असे सांगून त्यांनी पुन्हा फोनवर बोलणे सुरु केले होते.
फ्रेश होऊन आम्ही खाली आल्यावर रिसेप्शन हॉलमधल्या सोफ्यावर बसून काश्मीरी 'कहवा'चा आस्वाद घेत आमचा वार्तालाप सुरु झाला होता.
मगाशी ऐजाजने सांगितलेली माहिती त्यांनी पुन्हा, पण अधिक तपशीलवारपणे सांगितली. कालच्या चकमकीत ठार झालेली ती १६-१७ वर्षांची दोन मुले लष्करी जवानांवर दगडफेक करून त्यांच्या कारवाईत अडथळा आणणाऱ्या जमावात आघाडीवर असल्याने त्या गोळीबारात मारली गेली होती. अशा घटनांमध्ये मेलेल्या लोकांच्या अंत्यविधीसाठी त्यांच्याशी दुरान्वयेही संबंध नसलेली कित्येक निरुद्योगी मंडळी गर्दी करून निदर्शने करतात, त्यांच्यासमोर काही मुल्ला-मौलवी आणि स्थानिक नेते चिथावणीखोर भाषणे करतात त्यामुळे काही प्रसंगी प्रक्षुब्ध जमावाने हिंसाचार केल्याच्या घटना घडल्या आहेत. प्रत्येकवेळी असे होईलच असे नाही, पण ही दोन्ही मुले अल्पवयीन होती त्यामुळे त्याचे भांडवल करून काही अनुचित प्रकार घडण्याची शक्यता असल्याने पोलीस प्रशासनाकडून पर्यटकांच्या सुरक्षेची विशेष काळजी घेण्याची सुचना श्रीनगर ते पहलगाम ह्या संपूर्ण पट्ट्यातल्या हॉटेल व्यावसायिकांना देण्यात आली असल्याने आमच्या पूर्वनियोजित कार्यक्रमात हा बदल सुचवण्यात आल्याचे त्यांच्याकडून समजले. अर्थात अंतिम निर्णय त्यांनी आमच्यावर सोडला होता, परंतु त्या सज्जन माणसाच्या "आज आम्ही तिथे जाण्याचा धोका पत्करू नये" ह्या आर्जवी विनंती मागची कळकळ आम्हाला स्पष्टपणे जाणवली असल्याने आम्ही ती मान्यही केली होती.
सज्जादभाईं बरोबरची चर्चा संपल्यावर आम्ही इकडे येतानाच्या रस्त्यावर ह्या हॉटेल जवळच दिसलेल्या एका पंजाबी ढाब्यावर जेवायला गेलो होतो. त्यावेळी आपसात झालेल्या चर्चेत जे महत्वाचे निर्णय घेतले गेले होते त्यांची हॉटेलवर परतल्यावर अंमलबजावणी केली होती. शहराच्या मध्यवर्ती भागातले हे हॉटेल, त्यांच्या रूम्स आणि उपलब्ध सोयी-सुविधा, आसपास उत्तर आणि दक्षिण भारतीय खाद्यपदार्थ मिळणारी उपाहारगृहे इत्यादी गोष्टी आवडल्या असल्याने श्रीनगर मधल्या मुक्कामासाठी आधी ठरवलेल्या हॉटेलचे केलेले ऑनलाईन बुकिंग रद्द करून चार रात्रींसाठी हेच हॉटेल बुक केले होते. तसेच पहलगाम, गुलमर्ग आणि श्रीनगर ह्या ठिकाणी तिथल्या हॉटेलतर्फे स्थानिक भटकंतीसाठी गाडी बुक करण्याचा आधी केलेला विचार बदलून 'श्रीनगर- पहलगाम - गुलमर्ग - श्रीनगर' अशा संपूर्ण प्रवासासाठी आणि त्या त्या ठिकाणच्या स्थानिक भटकंतीसाठी एकच गाडी इथूनच बुक करावी हा विचार सज्जादभाईंना बोलून दाखवल्यावर दोन-चार मिनिटे विचार करून त्यांनी जो प्रस्ताव दिला तो आमच्यासाठी खूपच सोयीस्कर आणि आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरणारा होता.
आधी केलेल्या चौकशीत सगळ्या ठिकाणी ड्रायव्हरचे अलाउंसेस वगैरे मिळून प्रतिदिन ३३०० रुपये दराने टुरिस्ट गाडी भाड्याने मिळणार होती (प्रीपेड टॅक्सी आणि टुरिस्ट गाड्यांचे त्यांच्या त्यांच्या असोसिएशनने ठरवलेले दर सगळीकडे एकसारखे होते हि एक चांगली गोष्ट होती) पण सज्जादभाईंनी आज आम्हाला एअरपोर्टवर रिसिव्ह करायला पाठवलेली आपली 'टोयोटा अल्टिस ही खाजगी गाडी आणि ओवैस हा ड्रायव्हर २००० रुपये प्रतिदिन, पेट्रोलचा खर्च आमचा' असा प्रस्ताव दिला होता. त्यावेळी मी जवळपास ह्या गाडी इतकाच मायलेज देणारी पेट्रोल कारच वापरत असल्याने ह्या एकूण भटकंतीला अंदाजे किती रुपयांचे पेट्रोल लागेल ह्याचे गणित मनातल्या मनात मांडणे अजिबात कठीण नव्हते त्यामुळे ह्या व्यवहारात आपले किमान ७००० रुपये वाचत असल्याचे लक्षात आल्याने त्वरित हा प्रस्ताव मान्य करून मोकळा झालो होतो. मग काय... आम्हा दोघांसाठी अतिशय आरामदायक ठरेल अशी लक्झरी सेडान, ओवैस सारखा नम्र आणि काश्मीर खोऱ्याची खडानखडा माहिती असलेला ड्रायव्हर आणि वर बऱ्यापैकी रकमेची बचत करून देणारा हा प्रस्ताव नाकारणे शुद्ध वेडेपणाच ठरला असता!
असो... संध्याकाळपर्यंत आराम करून झाल्यावर हॉटेलच्या शेजारीच असलेल्या दल सरोवरात शिकाऱ्यातून फेरफटका वगैरे मारून इकडे-तिकडे थोडेफार एमलेस वॉन्डरिंग करून हॉटेलवर परतल्यावर रात्री रूममध्येच जेवता-जेवता चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या 'भारत विरुद्ध पाकिस्तान' ह्या अंतिम एकदिवसीय सामन्याचे थेट प्रक्षेपण आम्ही बघत होतो.
अगदीच एकतर्फी झालेल्या त्या सामन्यात भारताचा दारुण पराभव करून पाकिस्तानने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यावर बाहेरून अक्षरशः दिवाळीत फुटतात तसे फटाके फुटण्याचा आवाज कितीतरी वेळ येत होता. ह्या प्रकाराबद्दल तो पर्यंत फक्त ऐकून/वाचून होतो आणि असे प्रकार मुंब्रा, भिवंडीतही किरकोळ प्रमाणात होतात हे देखील माहिती होते. परंतु पाकिस्तानचा विजय इथे इतक्या जल्लोषात साजरा होत असेल ह्याची अजिबात कल्पना केली नव्हती.
बाहेर ही फटाक्यांची आतिषबाजी चालू असतानाच प्लेट्स न्यायला आलेल्या रुमसर्व्हिस कर्मचाऱ्याकडे हा विषय काढल्यावर त्याने हसून "आता थोड्या वेळाने बाइक्सवरून भारत समर्थक येतील आणि फटाके फोडणाऱ्या पाकिस्तान समर्थकांच्या घरांच्या छपरावर, गाड्यांवर दगडफेक करून जातील त्याचे आणखीन वेगळे आवाज येतील. भारत जिंकतो तेव्हाही असाच प्रकार दुसऱ्या बाजूकडून केला जातो, एकमेकांवर व्यवस्थित लक्ष ठेऊन असतात दोन्ही बाजूचे गट. आमच्यासाठी नेहमीचेच आहे हे. पण तुम्ही त्या आवाजांकडे लक्ष देऊ नका, झोपा आरामात." असे सांगितल्यावर कपाळावर हात मारून घेतला होता. एकंदरीत विचित्रच वाटला होता हा सगळा प्रकार!
दुसऱ्या दिवशी सकाळी ईन हाऊस रेस्टोरंटमध्ये बुफे ब्रेकफास्ट करून रूममध्ये परतताना रिसेप्शन काउंटरजवळ सज्जादभाई भेटले. हजारो लोकांनी गर्दी केली असली तरी प्रचंड पोलीस बंदोबस्तात काल संध्याकाळी कुठलाही अनुचित प्रकार न घडता त्या दोन मुलांचा दफनविधी पार पडला असून तिथली परिस्थिती सामान्य झाली असल्याची माहिती देऊन आता पहलगामला जाण्याचा आमचा मार्ग निर्वेध असल्याचे त्यांनी सांगितल्यावर फार वेळ न दवडता साडे अकराच्या सुमारास आम्ही पहलगामच्या दिशेने निघालो होतो.
प्रवासाच्या मार्गात ज्या ठिकाणी उपरोल्लिखित घटना घडली ते गाव ओवैसने दाखवले होते. तीन-चार ठिकाणी त्या मृत मुलांचे फोटो आणि त्याखाली पर्सो-अरेबिक लिपीत काहीतरी मजकूर लिहिलेले भले मोठे फ्लेक्स सोडल्यास त्या ठिकाणी काही गंभीर घटना घडली असल्याच्या कुठल्या खुणा न आढळता जनजीवन पूर्वपदावर आलेले दिसले होते. दोन-सव्वादोन तासात ८० किलोमीटर्सचा प्रवास करून आम्ही 'द पीस रिसॉर्ट - वलीसन्स' ला पोहोचलो होतो.
खानबल - पहलगाम राष्ट्रीय महामार्गावर (KP Road) पहलगाम शहरापासून सुमारे साडेनऊ किमी अंतरावर असलेले हे रिसॉर्ट एखाद्या पर्यटनस्थळासारखेच होते. आल्हाददायक हवामान आणि शांत निसर्गरम्य परिसर, चारही बाजूंना दृष्टीस पडणारी उत्तुंग हिमशिखरे, रिसॉर्टला लागूनच खळखळत वाहणारी लिद्दर (लंबोदरी) नदी, छानसा बगीचा, नदीकडल्या बाजूच्या कुंपणाच्या विकेट गेटमधून नदीच्या पात्रात उतरून पाण्यात डुंबण्याची सोय, प्रशस्त रूम्स आणि रूमच्या खिडकीतून दिसणारा नदी प्रवाह अशा सर्व गोष्टी चित्तवृत्ती प्रफुल्लित करणाऱ्या होत्या. 'बजरंगी भाईजान' चित्रपटातल्या एक-दोन प्रसंगांचे चित्रीकरण ह्या रिसॉर्टच्या परिसरात सुरु असताना प्रोडक्शन युनिटचे काही सदस्य इथे मुक्कामास होते त्यावेळचे सलमान खान बरोबरचे त्यांचे दोन-चार फोटोज रिसेप्शनमध्ये लावलेले होते.
त्या दिवशी संध्याकाळी पहलगामच्या बाजारपेठेत थोडीफार खरेदी आणि जेवण वगैरे उरकून रिसॉर्टवर परतलो होतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी, म्हणजे २० जून २०१७ रोजी ब्रेकफास्ट झाल्यावर तयारी करून ऐजाजने ठरवलेले घोडेवाले आल्यावर साडेदहाच्या सुमारास 'बैसरन व्हॅली' ला जायला आम्ही निघालो होतो. रिसॉर्टपासून जेमतेम ७०-८० मीटर्सवर असलेल्या टेकडीवरून बैसरन व्हॅलीला घोडे/खेचरांवरून जाण्यासाठीची वाट होती.
चढणीच्या त्या पायवाटेवरून अधे मध्ये लागणारे लहान-मोठे ओढे ओलांडत तासा-दीड तासात आम्ही एका पठारावर पोचलो होतो. ह्या पठाराच्या एका बाजूने लांबवर खाली पहलगाम शहर दिसत होते आणि दुसऱ्या बाजूला ह्या परिसरातल्या मनुष्यवस्तीची शेवटची खूण असलेली मेंढपाळांची दोन-तीन कच्ची घरे दिसत होती.
तिथून पुढे एक तासभर ओबड-धोबड वाट तुडवत आम्ही बैसरन व्हॅली मधले मुख्य आकर्षण, 'मिनी स्वित्झर्लंड' म्हणून प्रसिद्ध असलेल्या अतिशय निसर्गरम्य स्थळी पोचलो होतो. तीन बाजूंनी घनदाट जंगल आणि त्यामागच्या उत्तुंग पर्वतशिखरांनी वेढलेल्या हिरवागार गालिचा पसरल्यासारखे प्रचंड मोठे मैदान असे स्वरूप असलेल्या ह्या ठिकाणी झोर्बींग (रोलर) बॉल आणि झीप लाईन सोडली तर पर्यटकांसाठी करण्यासारख्या अन्य कुठल्या अॅक्टीव्हीटीज नाहीत आणि इथे येण्या-जाण्यात किमान अर्धा दिवस खर्ची पडत असल्याने वेळेअभावी बर्याच पर्यटकांना इच्छा असुनही इथे येणे शक्य होत नाही. तसेच एकतर पायपीट किंवा घोडा/खेचरावरून यावे लागत असल्याने ते वयस्कर व्यक्तींसाठी त्रासदायक ठरते आणि लहान मुलांचे मन रमेल असे येथे काहीच आकर्षण येथे नसल्याने पर्यटकांच्या संख्येवर खूप मर्यादा येतात. पण असे असले तरी डोळ्यांचे पारणे फिटवणारे इथले सृष्टीसौंदर्य बघण्यासाठी ज्यांना शक्य असते ते आवर्जून ह्या ठिकाणाला भेट देतात.
मैदानाच्या एका बाजूला कोणा मेंढपाळाचे ६-७ वर्षाचे एक लेकरू आपले लहानसे कोकरू घेऊन भटकत होते. ते कोकरू एवढे गोजिरवाणे होते की त्याला उचलून एक फोटो काढण्याचा मोह काही मला आवरता आला नव्हता.
दुपारी तीनच्या सुमारास 'नभ मेघांनी आक्रमिले' आणि पाऊस पडण्याची दाट शक्यता दिसू लागल्यावर आम्ही परतीची वाट धरली तोपर्यंतचा वेळ तिथल्या अप्रतिम निसर्गाच्या सानिध्यात अगदी मजेत गेला होता.
आधीच्या माझ्या भेटींमध्ये काश्मीर अनेकदा 'बघितले' होते, पण ह्या १६ दिवसांच्या सहलीत आम्ही दोघांनी ते मनमुराद अनुभवले होते. आणि आत्तापर्यंतचे काश्मीर विषयक सर्व अनुभव हे चांगले आणि फक्त चांगलेच असल्याने तिथल्या अनेक आठवणी मनाच्या कोपऱ्यात जपून ठेवण्यासारख्याच आहेत. परंतु २२ एप्रिल २०२५ रोजी बैसरन व्हॅली येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात प्राण गमावलेल्या २६ पर्यटकांमध्ये 'संजय लेले' हा आमचा डोंबिवलीकर शाळामित्र देखील होता त्यामुळे आता काश्मीरच्या, विशेषतः बैसरन व्हॅलीच्या सुखद आठवणींना दुःखाची एक कायमस्वरूपी किनार जोडली गेली आहे.
दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी
दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या संजय लेले तसेच अन्य सर्व पर्यटकांना भावपुर्ण श्रद्धांजली.
संयत आणि सुबक मांडणी. लेख आवडला.
छान लेख.. कंसराज ह्यांना
छान लेख.. कंसराज ह्यांना अनुमोदन...
छान लेख आणि प्रकाशचित्र.
छान लेख आणि प्रकाशचित्र.
संजय लेले आणि त्यांच्या सोबत २६ निरपराध नागरिकांची हत्या होण्याची घटना अत्यंत वाईट आहे
तसेच चिड आणणारी आहे. त्यांच्या कुटुंबाला आणि मित्रपरिवाराला यातून सावरण्यासाठी बळ मिळो.
चित्रदर्शी वर्णन, फोटो
चित्रदर्शी वर्णन, फोटो अप्रतिम.
वाचताना मात्र नुकत्याच घडलेल्या घटनेचे सावट मनावर असल्याने, सध्या वाचू की नको विचार करत होते.
दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या संजय लेले तसेच अन्य सर्व पर्यटकांना भावपुर्ण श्रद्धांजली. >>> अगदी अगदी.
आम्ही डोंबिवलीकर अजूनही सावरलेलो नाहीये. तुमचा तर मित्र गमावला तुम्ही. डोंबिवलीत कुठल्या शाळेत शिकलात.
नुकत्याच झालेल्या भ्याड
नुकत्याच झालेल्या भ्याड पाकीस्तानी अतिरेकी हल्ल्याच्या पाश्र्वभूमीवर हा अनुभव विषण्ण करून गेला.
संजय भावे तुमच्या मित्राला
संजय भावे तुमच्या मित्राला श्रद्धांजली. देव त्यांच्या कुटुंबाला सावरण्याचं बळ देवो.
छान वर्णन केलं आहे तुम्ही पहलगामचं.
पहलगामला गेल्यावर प्रथम तुज पाहता अशी अवस्था झाली होती आणि द्वितीय दर्शनातही ओढ कमी झाली नव्हती. बैसारनचा योग मात्र आला नव्हता.
आता बैसारनचा डाग लागलाय पहलगामला.
कधी तरी हा डाग पुसून निघावा आणि पहलगाम पुन्हा फक्त त्याच्या स्वर्गीय सौंदर्यासाठी ओळखलं जावं ही मनःपुर्वक इच्छा.
आता बैसारनचा डाग लागलाय
आता बैसारनचा डाग लागलाय पहलगामला.
कधी तरी हा डाग पुसून निघावा आणि पहलगाम पुन्हा फक्त त्याच्या स्वर्गीय सौंदर्यासाठी ओळखलं जावं ही मनःपुर्वक इच्छा. >>> खरंय
मस्त लिहिलंय
मस्त लिहिलंय
छान चित्रदर्शी वर्णन.
आता बैसारनचा डाग लागलाय पहलगामला.
कधी तरी हा डाग पुसून निघावा आणि पहलगाम पुन्हा फक्त त्याच्या स्वर्गीय सौंदर्यासाठी ओळखलं जावं ही मनःपुर्वक इच्छा.>>> अगदी अगदी
आठवणी वाचून भुतकाळात मन गेले.
आठवणी वाचून भुतकाळात मन गेले. ८४ मधले काश्मिर शांत वाटलेले. आणि मग नंतरच्या भेटी एक भितीने गोठलेले शहर वाटलेले. ८९ चे व्रण होतेच. त्यानंतर गेलो (९६?) मित्र परीवार बरोबर पण मजा नाही. ते असं वाटलं, इस हसीन चेहरे के पीछे एक दर्दभरी दास्तां है!
तेव्हाच आम्हाला आमच्या ड्रायवरने विचारलेलं, आप ईंडिया से हो?
विचित्र वाटले पण हसून हो म्हटले. एरवी बडबड करणारी मी गप्प राहिले होते ते आठवते.
बैसारण रस्ता हा वर्षानुवर्षे तसाच ठेवलाय लोकल बिजनेससाठी.
—-
संजय लेले ह्यांना श्रद्धांजली.
छान लेख आणि फोटो..
छान लेख आणि फोटो..
सौंदर्याला शाप असतो असे का म्हणतात याची प्रचिती आली.
दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या संजय लेले आणि अन्य सर्व पर्यटकांना भावपुर्ण श्रद्धांजली
आणि याला +786
<<< कधी तरी हा डाग पुसून निघावा आणि पहलगाम पुन्हा फक्त त्याच्या स्वर्गीय सौंदर्यासाठी ओळखलं जावं ही मनःपुर्वक इच्छा.>>>
ओहहह. . .
ओहहह. . .
वर्णन सुंदर. पण. . . कंटेक्स्ट भयानक.
माहितीपूरक, सुंदर लेख आणि
माहितीपूरक, सुंदर लेख आणि फोटो ...
सुंदर लेख आणि फोटो!
सुंदर लेख आणि फोटो!
दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या संजय लेले आणि अन्य सर्व पर्यटकांना भावपुर्ण श्रद्धांजली __/\__
कंसराज | मनीमोहोर | उदय |
कंसराज | मनीमोहोर | उदय | अन्जू | मामी
प्रतिसादांसाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏
@ अन्जू
"डोंबिवलीत कुठल्या शाळेत शिकलात."
स.वा. जोशी विद्यालय.
माझेमन । ऋतुराज । झंपी ।
माझेमन । ऋतुराज । झंपी । ऋन्मेऽऽष । मार्गी । सतीश । आकाशानंद
प्रतिसादांसाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏
@ माझेमन
"कधी तरी हा डाग पुसून निघावा आणि पहलगाम पुन्हा फक्त त्याच्या स्वर्गीय सौंदर्यासाठी ओळखलं जावं ही मनःपुर्वक इच्छा."
लवकरच हा डाग पुसला जाऊन तृतीय पहलगाम भेटीत तुम्हाला बैसरन व्हॅली बघण्याचा योग्य येवो अशी सदिच्छा!
@ झंपी
"ते असं वाटलं, इस हसीन चेहरे के पीछे एक दर्दभरी दास्तां है!"
अगदी अगदी...
@ मार्गी
"कंटेक्स्ट भयानक."
Sadly true! 😢
चांगले लिहिलेत
चांगले लिहिलेत
मित्राची आठवण आणि ही ट्रिपची आठवण दोन्ही मिक्स झाले
दुःखाची किनार सदैव.
तुमच्या मित्राला श्रद्धांजली
स.वा. जोशी विद्यालय. >>>
स.वा. जोशी विद्यालय. >>> अच्छा जोशी हायस्कूल.
"अच्छा जोशी हायस्कूल."
"अच्छा जोशी हायस्कूल."
येस्स... 👍
'स.वा. जोशी विद्यालय' म्हंटल्यावर कुठलाही अस्सल डोंबिवलीकर क्षणभरासाठी का होईना पण विचारात पडेल, पण 'जोशी हायस्कूल' म्हंटल्यावर मात्र चटकन त्यांच्या लक्षात येते! तुम्हीही मनाने अस्सल डोंबिवलीकर असल्याची खात्री पटली आहे 😀
झकासराव प्रतिसादासाठी आपले आभार 🙏
तुमच्या मित्राला श्रद्धांजली
तुमच्या मित्राला श्रद्धांजली !
जातिवंत सुंदर लेख आणि फोटो!
थोडं अवांतर पण बरेचदा आमची
थोडं अवांतर पण बरेचदा आमची स्वामी विवेकानंद विद्यामंदीर शाळा, टिळकनगर शाळा असं तोंडात यायचं पण तुमच्या शाळेला जोशी हायस्कूलच म्हटलं जायचं, का ते माहीती नाही. जोशी हायस्कूल आणि टिळकनगर शाळा हुश्शार मुलांच्या समजल्या जायच्या (अजूनही आहेत), एकदम प्रतिष्ठित, बोर्डात मुलं येणाऱ्या शाळा. आमच्यावेळी खूप दबदबा होता.
कश्मीर = शापित सौंदर्य.
कश्मीर = शापित सौंदर्य.
छान लिहिलेय.