हे पत्र पूर्णपणे काल्पनीक असून त्यात कोणालाही दुखविण्याचा, धार्मिक तेढ वाढविण्याचा अथवा कोणावरही टीका करण्याचा उद्देश नाही याची सूज्ञ वाचकांनी नोंद घ्यावी ही नम्र विनंती.
*******************************
हे आलमगीर,
बऱ्याच वर्षानंतर तुम्हांला पत्र लिहीण्याचा योग आला. तुम्ही हिंदूवर लावलेल्या जिझीया करासंदर्भातील तुम्हांला लिहीलेल्या पत्रानंतर बहुतेक आत्ताच योग आला. आता हे पत्र २१ शतकात लिहीत आहे तेव्हा या पत्राची भाषा देखील मराठी आहे. तुमच्या आयुष्याची शेवटची कित्येक वर्षे तुम्ही महाराष्ट्रात घालविल्यामुळे कदाचित तुम्हांला ही भाषा अवगत झाली असेल अशी अपेक्षा करतो. हे पत्र जरी तुम्हांला उद्देशुन लिहीले असले तरी त्याचा मूळ उद्देश एका मानसिकतेवर प्रकाश टाकण्याचा आहे.
दिल्लीतून, आपली परवानगी न घेताच निघुन आलो, त्यामुळे कदाचित आपली आमच्यावर खप्पामर्जी झाली असेल. जी गोष्ट सामोपचाराने सुटत नाही (साम) तिच्यासाठी पैसे मोजून(दाम) काम होत असेल तर ठीक. ते जर होत नसेल तर दंड (युद्ध) आणि भेद हे आपले काम करण्याचे उपाय अनादिकालापासून तत्वज्ञानात सांगितले आणि वापरले गेले आहेत. याच साम दंड भेद नितीचा योग्य उपयोग करून मी स्वराज्याच्या स्थापनेची मुहूर्तमेढ रोवली. पण मध्यंतरी, माझ्या दिल्लीतून महाराष्ट्रात परत येण्यासाठी मी कोणत्या मार्गांचा अवलंब केला असेल यावरून जो गदारोळ उडाला होता व चिखलफेक चालू होती त्यामुळे मन विषण्ण झाले आहे. कित्येक शतकानंतर या विषयावर एवढा गदारोळ उडेल असेल असे वाटले नव्हते. काही घटना किंवा कृती या कश्या घडल्या किंवा घडवून आणल्या त्यापेक्षा त्या ज्या चांंगल्या उद्देशासाठी घडवून आणल्या तो जास्त महत्वाच्या असतो. ज्या उदात्त हेतूने मी व माझ्या सहकार्यांनी सारी हयात स्वराज्याच्या स्थापनेसाठी वेचली, तो उदात्त हेतूच आता माझ्या महाराष्ट्रातून आणि देशातून पुसला जातोय हे पाहून येथे मन उदास होते. मी व शंभूबाळ माझ्या मर्द मावळ्यांच्या मदतीने व हुशारीने जर कैदेतून सुटून सुखरूप परत आलो नसतो तर…हा विचार जरी मनात आला तरी थरथरायला होते. महाराष्ट्र पुन्हा कित्येक शेकडो वर्षे मागे ढकलला गेला असता व इतर धर्मींयावरील अत्याचारात कित्येक पटीने वाढ झाली असती.
आपण मुघल सत्ताधीश असताना स्वतःला कधीच या भूमीचे व या भूमीवरील लोकांना आपले मानले नाही. कट्टर धर्मांधतेने आपण कित्येक निरपराध व काफिर म्हणवत इतर धर्मांतील लोकांवर अनन्वीत अत्याचार केलेत, त्याच्यांवर वेगवेगळे कर लादलेत, धर्मस्थळांना त्रास दिलात त्यामुळे लोकांनी देखील कधीच आपला स्वीकार केला नाही. तुम्हीं जर धर्माच्या नावाखाली वेगवेगळ्या धर्मांतील लोकांना त्रास दिला नसतात तर कदाचित लोकांंनी आदराने तुम्हांला आपणहून आलमगीर ही पदवी बहाल केली असती. आदर हा कमवावा लागतो तो जोरजबरदस्तीने मागून मिळण्याची गोष्ट नाही. माझ्या देशात किरकोळ घटना वगळता नानाविध धर्माचे लोक गुण्यागोविंदाने, आनंदाने व सामोपचाराने रहात आहेत. माझ्यानंतर देखील पानिपतावर हिंदू-मुसलमान एकत्र होऊन परदेशी आक्रमणाच्या विरोधात खांद्याला खांदा लावून प्राणपणाने लढले. या देशाला पारतंत्र्याच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी देखील सर्व जाती धर्मांतील लोकांनी आपापसातील सर्व मतभेद विसरून स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला व हौतात्म्य स्वीकारले. कारण ते या मातृभूमीला आपल्या धर्मापेक्षा जास्त जवळची मानत. हेच माझ्या मावळ्यांनी उभ्या केलेल्या स्वराज्याचे यश आहे.
तुमचा जर पवित्र कुराणावर विश्वास असेल तर लक्षात ठेवा त्यात त्या परमशक्तिला सर्व मानवांचा परमेश्वर असे संबोधिले आहे, कुराणात परमशक्तिला फक्त मुस्लिमांचा परमेश्वर असे म्हटलेले नाही. एकाच धर्मांचे विचार उच्च आणि बाकीच्या धर्मांतील लोकांना काफिर समजून त्यांना तलवारीच्या जोरावर धर्मपरिवर्तनासाठी भाग पाडणे या एकाच ध्येयाने आपण आपले राज्य चालविण्याचा तहहयात प्रयत्न केलात पण तुमच्या दुर्दैवाने व आमच्या सुदैवाने कधीच सफल होऊ शकला नाहीत. हाच विचार त्या नियंत्याच्या मनात होता जणू. म्हणनच आम्ही नेहमी म्हणायचो की ही राज्य व्हावे ही श्रींची ईच्छा.
स्वराज्य फक्त एका विशिष्ट धर्मातल्या लोकांसाठीचे राज्य, या मर्यादित व सकुंचीत वृत्तीने उभे राहिले नव्हते. त्यामागे लोकांवर होणार्या अत्त्याचाराला विरोध करण्याखेरीज सर्व जातीधर्मांतील लोकांना शांततेने व गुण्यागोविंदाने रहाण्याजोगे वातावरण तयार करणे हाच उदात्त हेतू होता. शतकानू शतके वतनदारीची पोळी भाजणाऱ्या कित्येकांना "स्वराज्य म्हणजे रयतेच राज्य" हा लोक कल्याणकारी विचार नाही रुचला. अशाच काही जणांनी सुरुवातीला आमच्या स्वराज्यस्थापनेला व नंतर राज्याभिषेकाला विरोध केला. गेल्या काही दिवसात परत एकदा या मनोवृत्ती डोके वर काढत आहेत असे वाटायला लागले आहे. इस्लाम, हिंदू आणि ईसाई इ. धर्म हे केवळ वेगळे शब्द आहेत जे माझ्यामते आपण निर्माण केले आहेत, मानव जातीला वेगवेगळ्या रंगात गुरफटून धर्म नावाच्या अफूची आपल्याया हवी तशी शेती करण्यासाठी. संपूर्ण मानवजातीचे सुंदर चित्र काढण्यासाठी त्या दैवी चित्रकाराने वापरलेला कुंचला तो एकच. त्याला आपण वेगवेगळ्या रंगातून उगीचच बुडवून मानवजातीला विनाशाच्या गर्तेत लोटत आहोत. परमेश्वाने देखील इंद्रधनुष्याचे रंग एकत्र सांधलेत तेव्हांच त्याचा आनंद घेऊ शकतो. आम्हास नक्कीच खात्री आहे की तो जो कोणी परमेश्वर/ ईश्वरीशक्ती आहे ती कधीच कुठल्याही मानवास दुसऱ्या कोणत्याही धर्माप्रती तिरस्कार दाखविणे, विशिष्ट धर्मातील लोक सोडल्यास इतर धर्मातील लोकांचा निर्दयपणे संहार करणे किंवा इतर धर्मातील लोकांना शस्त्राच्या बळावर धर्म परिवर्तन करायला लावायची दूर्बुद्धी देत असेल. हे सर्व काही मूठभर स्वार्थी लोकांनी त्यांना सत्तेचा उपभोग निर्विवादपणे घेता यावा यासाठी चालू केलेल्या क्ल्युप्त्या आहेत. धर्माच्या नावावर लोकांची दिशाभूल करून वेगवेगळ्या धर्मांच्या लोकांमधील तेढ वाढवण्याचा आणि या पृथ्वीवरील मानव जातीत उभी फूट पाडण्याचे कारस्थान चालू आहे. तरूणांना धर्माच्या झेंड्याखाली गोळा करून अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न चालू आहे. तरूणांनी एक लक्षात ठेवले पाहिजे की, चूक आणि बरोबर यात निवड करणे कायमच सोप्पे असते. अवघड असते ते दोन चुकीचे पर्याय समोर असताना त्यातला कमीत कमी हानिकारक पर्याय निवडणे. तरूणांनी पण या फक्त देशाच्या झेड्यांखाली देशविघातक शक्तिंविरूध्द लढायला उभे राहिले पाहिजे. मी तरूणांना कळकळीची विनंती करतो की त्यांनी चुकीच्या मार्गाने जाण्यापेक्षा एकदा बाजी जेधे या तरूण मावळ्याची किंवा मुरारबाजींची गोष्ट वाचावी. या दोघांनी समोर असलेल्या मोहाच्या आयत्या संधी सोडून या आपल्या स्वराज्यासाठी, आपल्या लोकांसाठी प्राणांची आहुती दिली.
नुकत्याच तुमची कबर उखडून टाकण्याच्या बातम्या तुमच्यापर्यंत पोहोचल्या असतीलच….पत्राचा समारोप करताना मला आता मनोमन वाटायला लागले की खरंतर तरुणांनी आपापसातले हेवेदावे विसरून धर्माच्या नावावर आपली पोळी शेकून घेणाऱ्या विघातक शक्तींनाच उखडून टाकायची वेळ आलेली आहे. नाहीतर लवकरच धर्माच्या नावाखाली चालू असलेला नंगानाच या पृथ्वीवरून संपूर्ण मानव जातीला लवकरच संपवून टाकेल.
हे पत्र काल्पनिक आहे, हे
हे पत्र काल्पनिक आहे, हे मान्य.
पण जगातला कोणता बाप आपल्या मुलाची अत्यंत क्रूरपणे, नृशंस पद्धतीने हत्या करणार्या राक्षसाशी / हैवानाशी इतक्या सामोपचाराने बोलेल???