आपण करत असलेले निरागस गॅसलाइटींग

Submitted by तुष्कीनागपुरी on 4 April, 2025 - 04:10

आपल्या मनात बरेच वेळा गॅसलाईटींग करणाऱ्या लोकांची एक साचेबद्ध प्रतिमा असते. अमूक अमूक खलनायकाच्या भूमिकेत असलेली व्यक्ती गॅसलाईटींग करते अशी काही उदाहरणे देखील मनात असतात. आपणही तसे करत असू याची आपल्याला कधी कल्पना येत नाही किंबहुना आपण तसे कधी करूच शकत नाही याची खात्री पण काही लोकांना वाटू शकते.
.
गॅसलाईटींग म्हणजे थोडक्यात समोरच्या व्यक्तीला वाटलेल्या भावना नाकारणे किंवा ती व्यक्ती जे म्हणतेय ते झालेलेच नाहीये असे समजून ते ठासून मांडणे कबूल करून घेणे.
.
काही साधारण संवाद पाहुया:
.
मित्रांमधला एक संवाद:
मित्र १: माझा मुद्दा मला निट मांडता आला नाही असे वाटले त्यामुळे काही मुद्दे निट बोलता आले नाहीत
मित्र २: तू छान बोललास रे. छान मांडलेस तू, आम्हाला सगळे कळले.
.
आई मुलीचा एक संवाद:
मुलगी: हे चार दिवस फार जड जातात मला
आई: अग फक्त पुढचे २५ वर्ष सहन करायचे आहे तुला, यात काहीच नाही सगळेच करतात, हे मान्य करून जगणे आवश्यक आहे
.
बाबा मुलाचा एक संवाद:
मुलगा घाबरल्यामुळे रडतोय.
बाबा: आधी रडणे बंद कर. तिथे काहीच नाहीये. रडणे एकदम बंद, घाबरायचे काही कारणच नाहिये.
.
सेवानिवृत्त आई आणि पन्नाशीतला मुलगा एक संवाद:
मुलगा: मला असे वाटले की अमुक वेळी माझ्या आईने माझे कौतुक केले नाही
आई: तुझ्यासाठी मी काय काय केले तुला माहित आहे, तुझ्याशिवाय माझे आयुष्यात दुसरे काहीच नाहिये. इतके करूनही तुला असे वाटत असेल तर मी हतबल आहे. तुला कळलेच नाही माझे सगळे काही तुझ्यासाठीच आहे. तुला असे वाटेल याची मला कल्पना पण नव्हती, हे माझ्यासाठी अनपेक्षित आहे, आणि खूपच दुःखदायी आहे.
.
या सर्व संवादांमधे संवाद सुरू करणारी व्यक्ती आणि दुसरी व्यक्ती एकमेकांसाठी जवळचे आणि घनिष्ट आहेत हे गृहित आहे. दोघांमधे प्रेम आहे, एकमेकांचे भले करण्याची तीव्र इच्छा आहे. काही बाबतीत तर एक व्यक्ती दुसऱ्यावर अवलंबून आहे.
.
सध्या बहुचर्चित असलेल्या अडोलसन्स या नेटफ्लिक्स मालिकेचा तिसरा भाग पाहताना एका जागेवर त्या मालिकेतले मध्यवर्ती पात्र तेरा वर्षांचा मुलगा जेमी आणि समुपदेशक यांचा संवाद सुरू असताना, जेमी काही बोलतो आणि मग तिच्या कडून अपेक्षा करतो की आता तू मला “तसे नसतेच, त्याला अमुक अमुक पद्धतीनेच करायचे असते” असे काही सांगणे अपेक्षित आहे तसे कर म्हणून आग्रह करतो. त्याचे म्हणणे असते की सगळेच तसे करतात. जेव्हा तो कथित मुद्दे मांडतो तेव्हा त्याला सगळ्यांकडून सांगितले जाते तशिच ठराविक साचेबद्ध उत्तरे तिने पण त्याला द्यावीत अशी त्याची अपेक्षा असते. तेव्हा ती त्याला सांगते की मला फक्त तुला त्याबद्दल काय वाटले हे जाणून घ्यायचे आहे. ते मूळात काय आहे यापेक्षा तुला ते कसे जाणवले तुझ्या मनात त्याची काय प्रतिमा आहे हे जाणून घेणे माझे काम आहे. त्या एका क्षणाला त्या समुपदेशिकेने माझे मन जिंकले.
.
कदाचित जेव्हा आपल्याला संवाद साधताना समोरच्याने म्हटलेले बरोबर नाही असे वाटते आणि आपण जर लगेच ते त्यांना सांगितले तर त्यांचा फायदा होईल असे आपल्याला वाटत असते. आपण तसे करून त्यांची मदत करतोय अशीच आपली भावना असते आणि कधी कधी तर तेच आपले कर्तव्य आहे हे देखील आपल्याला वाटत असते आणि माहित असते. पण तसे करताना आपले एका सूक्ष्म मुद्यावर दुर्लक्ष होत असते.
.
पहिल्या संवादात जिथे मित्र मित्र बोलत आहेत तिथे पहिल्या मित्राला एक खंत आहे ती व्यक्त झाली आहे. त्यावर उत्तर मिळालेय की जी खंत आहे ती बरोबर नाही पहिल्या मित्राने खंत करायलाच नको. आपल्याला ही खूपच साधी आणि नेहमीची गोष्ट वाटेल पण एक समजून घेणे आवश्यक आहे की पहिल्या मित्राला अशी खंत वाटून घेण्याचा आणि स्वतःच्या भावना असण्याचा आणि त्या व्यक्त करण्याचा अधिकार असावा की नाही? तसा तो असावाच हे जरका पटत असेल. तर आपल्या मित्राला अशी खंत वाटते आहे हे समजून घेणे आणि त्याची पावती देणे सर्वप्रथम आवश्यक आहे हे समजून घेता येईल.
.
या संवादामध्ये आलेल्या उत्तराचा एक अर्थ असाही होतो की पहिल्या मित्राला खंत करायची गरजच नाही त्यामुळे त्याची खंत अनावश्यक आहे. थोडक्यात त्या मित्राच्या भावना नाकारल्या जाताहेत. इथे खरे काय आहे किंवा काय बरोवर आहे हे बघण्याच्या आधी त्या पहिल्या मित्राला हे वाटून गेलेले आहे, त्याच्या साठी ही वास्तविक घडलेली घटना आहे त्यामुळे तसे नाहीच हे सांगणे पटवणे म्हणजे त्या भावना नाकारणे ठरते हे आपल्याला समजत नाही.
.
त्या संवादामधे एक उत्तर असेही असू शकले असते की. अच्छा तुला अशी खंत वाटलेली दिसते, तुला असे वाटले का? अजून सांग तुला काय वाटले. तुला असे वाटण्यामधे अजून काही घटक तुला सांगावेसे वाटताहेत का जे मला माहित नसतील. मला अजून जाणून घ्यायला आवडेल.
.
असे उत्तर असले तर किमान मित्राला वाटलेली खंत आपण समजून घेतोय आणि ती नाकारत नाहीये असे दिसते.
.
पुढच्या आई मुलीच्या त्या चार दिवसांच्या बाबतित चाललेल्या संवादात, मुलीला जो त्रास होतोय ते तिने व्यक्त केलेय त्याची नोंद घेतलीय असे कदाचित आईला वाटत असेल. कदाचित हा संवाद प्रत्येक महिन्यात घडत असावा त्यामुळे ते ठराविक साचेबद्ध उत्तर दिलेले असेल. पण एक समजून घेणे आवश्यक आहे की हे प्राक्तन आहे ते सहन करायचेच आहे या शब्दात असे दिसते की मुलीने हा त्रास हा त्रागा आता बोलणे बंद करावे असे आईला वाटते आहे.
.
“हो का गं. तुला हा त्रास जड वाटतो आहे का पुन्हा. मग तू आज काय करणार आहेस? मला अजून सांग आज काही वेगळे झाले आहे का?” किंवा अश्या काही शब्दांमुळे किमान आई त्या त्रासाची नोंद घेतेय आणि त्याबाबत ऐकायला वेळ देते आहे असे मुलीला वाटेल. कदाचित मुलीला पण विज्ञान आणि प्राक्तन हे सगळे माहित आहे, फक्त आईजवळ व्यक्त व्हायचे आहे आणि उत्तरात तिला तिचा त्रास बरा करून किंवा सोडवून नकोच आहे तर तिचा त्रास समजून घेणारी एक व्यक्ती आहे इतके जाणून व्यक्त होण्याचा वेळ हवा आहे.
.
तिसऱ्या संवादात, मुलाने रडणे थांबवणे हे बाबाला सर्वात आधी व्हावे असे वाटतेय. मुलगा घाबरलाय ही घटना मान्यच नाहीये किंवा शक्य तितक्या लवकर ती स्थिती बदलायची आहे असे बाबाचे विचार दिसताहेत. उत्तरात एक रडणारा मुलगा असे चित्रच बाबाला नकोय असेही दिसते, त्यामुळे ते चित्र शक्य तितक्या लवकर बदलायचा प्रयत्न दिसतोय. कदाचित घाबरणे ही वाईट गोष्ट आहे, त्याची गरजच नाहीये हे बोलण्यातून व्यक्त होतेय.
.
या उत्तरात मुलगा घाबरला आहे याचा स्वीकार करायला बाबा तयारच नाही आणि ते तसे नाहीच व्हायलाच नको हे त्याला अधिक महत्वाचे वाटते असे दिसते आहे.
.
“तू घाबरलास का? तुला कशाची भीती वाटली सांग. भिती वाटल्यावर तुला काय करावेसे वाटले ते सांग.” काही उदाहरणे देऊन अशी भिती कुणाला आधी वाटायची आणि मग काही काळाने त्या भीतीचे काय झाले अशी एखादी गोष्ट सांगता आली असती. रडणे लगेच बंद करावे असे बाबाला का वाटते? यावर विचार होणे मला आवश्यक वाटतो.
.
शेवटच्या चौथ्या संवादात मुलाला वाटलेली एक भावना एका विशिष्ट वेळेची एक भावना आहे आणि तसे मुलाला वाटू शकते त्याचा स्वीकार उत्तरात दिसत नाही. कदाचित विषय खोल असेल त्याला अनेक पदर असतील आणि मुलाला वाटलेली भावना चूकीची असेल किंवा त्याला वेगळा संदर्भ असेल पण अश्या कोणत्याही कारणाने मुलाला असे वाटणे हाच त्या मुलाचा गुन्हा आहे असे उत्तरातले शब्द सुचवतात. असे बोलून त्या मुलाने आईला कठोर यातना दिलेल्या आहेत हे त्या उत्तरातून पुढे येते. या बाबतीत देखील मुलाला वाटलेली भावना नाकारण्यात येते आहे असे त्या मुलाला वाटतेय हे आपल्याला समजू शकते का याचा विचार करावा लागेल.
.
“कदाचित तुला असे वाटले का? असे वाटले की खूप त्रास होत असेल नाही का? हे तुला नेहमीच वाटते की त्या एका ठिकाणी वाटले, आणि तसे का झाले असावे असे तुला वाटते?” असे काही उत्तरातून संवाद पुढे गेला असता तर कदाचित अजून काही वेगळेच यातून बाहेर आले असते त्याला या वरच्या उत्तराने वाव दिलेला नाही.
.
आपण जेव्हा आपल्या जवळच्या लोकांशी बोलतो तेव्हा त्या लोकांच्या भावना ते सांगतात त्या त्यांच्या आयुष्यात घडलेल्या वास्तविक घटना असतात हे समजून घेऊन, त्यांना आधी स्वीकार करता यायला हवे. त्याची नोंद घेतल्या गेलीय इतके जरी आपण संवादातून कळवू शकलो तर कदाचित संवाद एकतर्फी ठरणार नाहीत.
.
कुणी जर आपल्याला सांगत असेल की मला खरचटले आणि दुखतेय त्याला आपण जर उत्तर दिले की “पाहू अरे हे काहीच नाही खूपच थोडे खरचटले आहे यात काही फार दुखायलाच नको, जाऊदे विसरून जा काही दुखत वगैरे नाहीये” असे सांगितले तर ते त्या खरचटण्याच्या दुःखात आणि एका दुःखाची आपण भर घालतो, भावना नाकारल्या जाण्याचे दुःख हे समजून घ्यायला हवे.
.
समोरचा व्यक्ती काय सांगतोय ते समजून घेणे हे एक महत्वाचे कौशल्य आहे आणि ते लक्षपूर्वक साध्य करावे लागते. ते सोपे नसते. आपण निरागसपणे कधी कधी समोरच्या व्यक्तीच्या भावनाच नाकारत असतो हे समजून त्यावर विचार केला तर आपल्याला आपल्या संवादांमधे बदल घडवून आणता येईल.
.
तुम्हाला कधी असे वाटले आहे का की तुम्ही सांगितलेले पोहोचलेच नाही आणि तसे नाहीच हे तुम्हाला समजावण्यात आलेले आहे. असे अगदी जवळच्या व्यक्तीकडून अधिक होते का?
.
या चार संवादांमधून आपल्याला आपल्या काही जुन्या संवादांची आठवण येऊ शकते आणि त्यावर आपण विचार सुरू केला तर आपल्या जगण्यात भावनिक बदल होऊ शकेल याची मला खात्री आहे.
.
(ऐकून बघणारा)
तुषार जोशी
नागपूर, शुक्रवार,४ एप्रिल २०२५

Group content visibility: 
Use group defaults

गॅसलायटिंग’चा भ्रमखेळ हा सायकियाट्रिस्ट नंदू मुलमुले यांचा लोकसत्ता 17 डिसेंबर 2022 मधे सविस्तर लेख आहे

छान छान. म्हणजे एखाद्याचे मत पटले नाही आणि असहमती दाखवली, तर तू असहिष्णू आहेस असे त्याला म्हणायचे आणि वरती तू गॅसलायटिंग करत आहेस असे म्हणायचे. इतपत कळले.

<< असा सारखा विचार करत राहिल्याने कधी कधी क्षण निसटून जातो...
Submitted by नानबा >> +१

इंटेंशन महत्वाचे आहे का?>>इंटेशन महत्वाचेच. म्हणूनच 'निरागस' .
मला खरे तर अशा वागण्याला 'निरागस गॅसलाईटिंग' ऐवजी दुसरा चांगला शब्द हवा असे वाटते. कारण बरेचदा योग्य पद्धतीने संवाद साधता न येणे, त्यातून गैरसमज, समजून न घेतल्याची भावना असे होते. काही वेळा समोरच्या व्यक्तीची आणि तुमची विचारधारा/ रिअ‍ॅलिटीच वेगळी असते, मग दोन पार्टीजच्या अपेक्षाच न जुळणे होते. पण या सगळ्यात 'मॅनिपुलेट करुन कंट्रोल ' असे काही नसते. उठसूठ गॅसलायटिंग हा शब्द वापरुन त्या कृतीमागची दाहकता कमी तर होणार नाही ना अशी कधी कधी भीतीही वाटते.

>>हे सुद्धा गॅसलायटिंग असेल का?>>
रानभूली, आपल्या अपत्याकडे अमुक स्कीलसेट हवा नाहीतर जगात निभाव लागणे कठीण हे आईला वाटणे योग्यच आहे. मात्र आईचे टोकणे म्हणजे गॅसलायटिंग नाही. आईचे अपत्याबद्दल वाटणार्‍या काळजीतून चुकीच्या पद्धतीने व्यक्त होणे म्हणजे गॅसलायटिंग नव्हे. 'तुलाही सवयीने हळू हळू जमेल म्हणत प्रोत्साहन देत, पुढील वेळी हे टाळ असे सांगत स्कीलसेट जमवणे करता येते' हे इथे आईला कुणीतरी समजावून सांगायची गरज आहे.

अलीकडे अनेकजण Depression, OCD, गासलाईटिंग हे शब्द असेच casually वापरतात >>>काहीजण वापरत असतीलही कॅज्युअली पण आता पूर्वीपेक्षा या गोष्टींचं व्यवस्थित डॉक्टर कडे जाऊन निदान होण्याचं प्रमाण ही जास्त आहे हेही नाकारता येणार नाही(जे पूर्वी लक्षात यायचं नाही किंवा निदान व्ह्यायचं नाही) त्यामुळे आता जर अनेक जण याविषयी निदान होऊन बोलत असेल तर चांगली गोष्ट आहे त्याने उलट अवेयरनेस वाढतो.

Pages