भाग ६ : तीर्थबल शारदा मंदीर

Submitted by माझेमन on 3 April, 2025 - 12:13

सेव्ह शारदा समिती पाकव्याप्त काश्मिरातील मूळ मंदिरात पूजेसाठी आग्रही आहे. त्यांच्याच प्रयत्नांनी २०१६ मध्ये पाकव्याप्त
काश्मिरातल्या शारदापीठात देवी शारदेचा फोटो ठेवला गेला. पाकिस्तानी न्यायालयाची परमिशन मिळवून पाकिस्तानी हिंदूंना तिथे पूजा करण्याची परमिशन दिली गेली. सध्या हॉंगकॉंग स्थित असलेल्या श्री वेंकटरमण व सौ सुजाता यांनी २०१९ साली ७०
वर्षांपासून दिवाबत्ती न झालेल्या मूळ शारदापीठात पूजा केली.

शारदा मातेच्या विधिवत प्राणप्रतिष्ठेनंत भारतीय लोकांची ही इच्छा पूर्ण करतं आहे तीर्थबल. बल म्हणजे काश्मिरीत क्षेत्र.
तीर्थबलचा अपभ्रंश तीथवाल.

Sharada Mandir.jpg

१९४७-४८ च्या पाकिस्तानी अटॅकमध्ये नष्ट झालेल्या या मंदिराची व गुरुद्वाराची जागा तीथवालच्या ग्रामस्थांनी राखून ठेवली व २०२१ मध्ये मंदीर निर्माणासाठी दिली. सीमेवरच्या या भागात बाहेरून मजूर आणून काम करवणे आर्थिक किंवा इतर बाबींनी शक्य नसताना या लोकांनी श्रमदानाने हे मंदिर निर्माण केले. मंदिराचे लोकल को-ऑर्डीनेटवर एजाज अहमद खान साहेब आहेत. 'सेव्ह शारदा' आणि मंदिराच्या विश्वस्त समितीचे ते सदस्य आहेत. ते जातीने भाविकांची सोय पाहतात.

मूळ मंदिराच्या धर्तीवर तीथवाल येथील मंदिराला ४ दरवाजे असले तरी आदि शंकराचार्यांच्या कार्याच्या व मंदिर निर्माणातील
शृंगेरी मठाच्या मदतीच्या सन्मानार्थ सध्या मंदिराचे दक्षिण द्वारच उघडले गेले आहे. प्रत्येक दरवाजावर सनातन धर्मातील ४
महत्वाची तत्वं देवनागरी व शारदा लिपीत लिहिली आहेत. मंदिरात कमरेएवढ्या उंचीच्या संगमरवरी स्तंभावर सरस्वतीची पंचधातूची, सोनेरी मुलामा दिलेली मूर्ती प्रस्थापित केलेली आहे. देवीच्या डाव्या पायाशी जमिनीवर आदि शंकराचार्यांची मूर्ती आहे.
शारदापीठाविषयी आस्था असणाऱ्या पाकव्याप्त काश्मीरच्या नागरिकांनी मूळ शारदापीठातून पाठवलेला शिलाखंड देवीच्या
उजव्या पायाशी आहे.

गृहमंत्री श्री अमित शाह यांनी २०२३ च्या चैत्र शुद्ध प्रतिपदेला मंदिराचे उदघाटन केले तर मूर्तीची प्राणप्रतिष्ठा शृंगेरी मठाचे श्री
विदुशेखर भारती स्वामी यांच्या हस्ते झाली.

देवळाच्या परिसरात ध्यान, भजन वगैरे करण्यासाठी वेगळी जागा आहे.

मंदिर निर्माण जरी नागरी सहकार्याने झाले असले तरी इथे तैनात असलेल्या रेजिमेंटने भाविकांच्या सुरक्षेची जबाबदारी घेतली आहे. आर्मी कॅम्पवरील पुजारी सकाळी ७ वाजता व सूर्यास्तसमयी देवीची पूजा करतात. सूर्यास्तानंतर मंदिर बंद केले जाते. एखादी वेगळी पूजा, हवन इत्यादी करायचे असल्यास पूजा सामग्री व पुजाऱ्यांची सोय स्वतः करावी लागते.
आर्मीचे ४ जवान मंदिराबाहेरील धर्मशाळेत २४ तास तैनात असतात. सीमेवरील प्रदेश असल्याने रात्री वास्तव्य करणाऱ्या
भाविकांना राहण्याच्या ठिकाणाची नोंद सैनिकांकडे करावी लागते.

मंदिराच्या आसपास होम स्टेमध्ये आजमितीला साधारण १००० रुपये प्रतिदिन प्रमाणे निवास, आंघोळीसाठी गरम पाणी, १ वेळचा नाश्ता व २ वेळच्या जेवणाची सोय होते. अर्थात एजाझभाईंशी बोलून तिथे जाण्यापूर्वी या गोष्टींची खात्री करून तिथे जाणे उत्तम. कारण तीथवाल व तंगधार ही छोटी गावे आहेत व तिथे हॉटेल किंवा रेस्टॉरंट नाहीत.

सेव्ह शारदा समितीच्या श्री रवींद्र रैना (पंडिता) यांनी स्वखर्चाने इथे दोन खोल्यांचा यात्री निवास व किचनची सोय विनामूल्य केली आहे. तुम्ही शुद्ध शाकाहारी असाल, मिश्राहारी घरात स्वयंपाक रांधणे/ भोजन करणे तुम्हाला मान्य नसेल किंवा परान्नग्रहणाबाबत काही नेम नियम पाळत असाल, तर या यात्री निवासमध्ये स्वतःचा शिधा नेऊन स्वयंपाक करता येऊ शकतो. एका वेळी ५०
माणसांचा स्वयंपाक व भोजन करता येईल एवढी भांडी तिथे उपलब्ध आहेत.

किशनगंगा नदीवर छोटा घाट बांधलेला आहे व तिथे स्नान, तर्पण इत्यादी करता येऊ शकते. पण हा घाट पाकिस्तानी चौकीच्या थेट लाईन ऑफ फायरमध्ये येत असल्यामुळे घाटावर जाण्यापूर्वी तैनात सैनिकांशी बोलून परवानगी घेणे उत्तम. एकंदरीत तिथल्या आर्मी कॅम्पमध्ये स्वतःच्या ऍक्टिव्हिटीजची माहिती देणे, त्यांनी दिलेल्या सूचना न चुकता अमलांत आणणे हे आपल्या सुरक्षेच्या
दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहे. कारण किशनगंगा नदीच तीथवालची व या भागात देशाची LOC आहे.

सर्व भाग वाचण्यासाठी इथे क्लीक करा.
भाग १ : प्रस्तावना
भाग २ : नमस्ते शारदे देवी काश्मीरपुरवासिनि
भाग ३: शारदापीठ
भाग ४: ही वाट दूर जाते
भाग ५: साधना पास
भाग ६: तीर्थबल शारदा मंदिर
भाग ७ : इतनी कुर्बत है तो फिर...
भाग ८: जरा याद करो कुर्बानी
भाग ९: समारोप

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

सुंदर प्रसन्न मूर्ती.
सर्वतोभद्र रचनेचे सुरेख मंदिर.
चैत्र नवरात्रात सुंदर लेख वाचायला मिळतो आहे.
धन्यवाद माझे मन

सुरेख मंदिर आहे आणि देवीची मूर्ती पाहून प्रसन्न वाटलं.
इतकी नीट माहिती दिली आहेस त्यासाठी विशेष कौतुक.
सेव्ह शारदा समिती बद्दल काहीच माहिती नव्हती ती ही यानिमित्ताने मिळाली.