काशीला जाऊन पंडित पदवी प्राप्त केली की चार पावले उत्तरेच्या दिशेने चालायची प्रथा होती. आता पुढे ज्ञान प्राप्ती करायची ती काश्मिरात. विद्येची देवता सरस्वती वास करते ती काश्मिरात ही पूर्वापार मान्यता. काश्मिरातच का? कारण सतीचा उजवा हात तिथे पडला आहे. त्यामुळे शारदा पीठ हे १८ महाशक्तिपीठांपैकी एक समजले जाते. साक्षात देवीचा वरदहस्त असणाऱ्यांना पंडित म्हणवले गेले तर काय विशेष!
काश्मिरी लोकांच्या लेखी शारदा ही ज्ञानग्रहणाची, सरस्वती ही ज्ञानाची आणि वाग्देवी ही अर्थात वाचेची देवी आणि शारदेचे हे देऊळ हे या तिन्ही देवींचे एकत्र स्वरूप ही त्यांची धारणा आहे.
शारदा पीठाचा पहिला उल्लेख येतो तो शांडिल्य यांच्या संदर्भात. मातंग ऋषींचा पुत्र शांडिल्य याचे उपनयन करण्यास पंडितांनी नकार दिल्यावर शांडिल्याने शारदेचा आशीर्वाद मिळवण्यासाठी शारदापीठापर्यंत प्रवास केला. वाटेत कृष्णगंगेत स्नान केल्यावर त्याचे अर्धे अंग सोन्याचे झाले. म्हणून त्या परिसराला सूनद्रांग (सुवर्णनरअर्धांग) नाव मिळाले. आजही त्या जागेला द्रांग म्हणतात. तेजोवनामार्गे(आजचे तेहिजीन) शारदावनात पोहोचलेल्या शांडिल्याला देवीने दर्शन व वरदान दिले. शांडिल्याच्या पितरांना त्याला तिथे श्राद्ध करण्यास सुचवले. तर्पण करताना त्याने महासिंधूचे जल हातात घेतल्यावर त्याचे मधात रूपांतर झाले व त्यापासून मधुमती नदीची निर्मिती झाली. देवीच्या आशीर्वादाने उच्चविद्याविभूषित होऊन शांडिल्य हे ऋषी म्हणून समाजमान्यता पावले अशी पुराणकथा आहे.
शारदापीठाच्या मंदिराला ४ दरवाजे होते. असं म्हणतात की प्रत्येक दिशेकडून येणाऱ्या विद्वानांची तिथे परीक्षा घेतली जायची. एखादा हुशार माणूस तिथल्या विद्वानांशी शास्त्रार्थात जिंकला तर मंदिराचा त्या दिशेचा दरवाजा कायमस्वरूपी उघडला जायचा. शारदापीठाला सर्वज्ञानपीठ असेही एक नाव होते आणि तिथे चार दिशांसाठी ४ सर्वज्ञानबैठकी होत्या. जिंकलेला विद्वान त्या दिशेच्या बैठकीवर विराजमान व्हायचा.
कालडीचा शंकर काशी, प्रयाग, गया करत शारदापीठात पोहोचला तेव्हा दक्षिणेचा दरवाजा बंदच होता. तिथल्या शैव, जैन, बौद्ध, तिबेटी विद्वानांशी वादविवाद करून तो जिंकला आणि मंदिराचा दक्षिण दरवाजा कायमस्वरूपी खुला झाला. हेच आपले आदि शंकराचार्य. याच रम्य परिसरात शंकराचार्यांनी देवीची स्तुती करणारे 'सौन्दर्यलहरी' स्तोत्र रचले.
परतीचा प्रवास सुरु करण्यापूर्वी शंकराचार्यांनी देवीला आपल्यासोबत दक्षिणेत चलण्याची विनंती केली. देवीने होकार दिला आणि सांगितले की वळून पाहू नकोस. देवीच्या नुपूरांच्या आवाजाने शंकराचार्यांना देवी आपल्यासोबत येते आहे याची खात्री होत होती. परंतु तुंगभद्रेच्या किनारी आल्यानंतर अचानक नुपूरांचा आवाज बंद झाला. शंकराचार्यांनी मागे वळून पाहिले आणि देवीने विग्रहाचे रूप धारण केले. याच ठिकाणी शृंगेरी मठाची स्थापना झाली. आज तिथूनच देवीची मूर्ती तिच्या मूळ स्थानी परत आली.
शारदापीठाकडे जाण्यासाठी ४ मार्ग होते. त्यातला एक मार्ग कुपवाड्यावरून डोंगरातून ४० किमी चालत जायचा होता. कुपवाड्यातील टिक्करपासून भाद्रपद शुद्ध चतुर्थीला शारदापीठासाठी यात्रा सुरु व्हायची. तर दुसऱ्या मार्गाने पाकिस्तानस्थित ल्यालपूरवरुन (आजचे फैसलाबाद) - मुझफ्फराबाद व्यापारी मार्गावरून तीथवाल येथे कृष्णगंगेत स्नान करून यात्रा पुढे शारदावनात जायची. पूर्वापार तीथवालमधले खत्री हिंदू व पंजाबी शीख यात्रेकरूंची बडदास्त ठेवायचे. दोन्ही यात्रा गंगाष्टमीला शारदा पीठात संपन्न व्हायच्या. तिथे मधुमती नदीच्या किनाऱ्यावर तर्पण केले जायचे.
मार्ग १ - हा डोंगरातून चालत जाणारा मार्ग आज अस्तित्वात नाही. त्याची थोडी बहुत कल्पना जुन्या काश्मिरी पंडितांनी दिलेल्या माहितीतून मिळते. १९४७ पूर्वी काही साधू संत याच खडतर मार्गाने शारदापीठात जायचे.
मार्ग २ - हा मात्र जास्त सुकर असा वाहतुकीचा मार्ग होता. आजच्या पाकिस्तानातले काही लोक हत्ती, घोडे, घोडागाड्या वगैरे घेऊन या मार्गाने प्रवास करायचे. सामान्य जनही याच मार्गाचा वापर करायचे.
१९४७-४८ मधल्या पाकिस्तानी रेडर्सच्या हल्ल्यात तीथवालमधल्या या मंदिराला व गुरुद्वाराला आग लावण्यात आली.
यात्रा अर्थातच बंद झाली.
काश्मिरी पंडितांच्या सांस्कृतिक इतिहासातील अत्यंत महत्वाच्या अश्या या शारदापीठाला त्यांना भेट देत यावी हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून ‘सेव्ह शारदा समिती’ काम करत आहे. शारदापीठाचे महत्व ओळखून त्याचे पावित्र्य जपले जावे, महत्व अधोरेखित व्हावे व काश्मिरी पंडितांना (कालांतराने सर्व भारतीयांना) कर्तारपूर साहिब कॉरिडॉरच्या धर्तीवर शारदा पीठाला भेट देता यावी ही त्यांची मागणी आहे.
वाजपेयी - मुशर्रफ भेटीत ही बाब तत्वतः मान्य झाली होती. आत्ताही पाकव्याप्त काश्मीरमधल्या स्थानिक सरकारने या मागणीला होकार दिला आहे. शारदी परिसरातील ग्रामस्थ शारदा पीठ यात्रेसाठी उत्सुक आहेत व ‘सेव्ह शारदा समिती’च्या प्रयत्नांना साथ देत आहेत. या यात्रेच्या पुनरुज्जीवनाच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून समितीने तीथवालमधील ग्रामस्थांच्या साहाय्याने मंदिराचे व गुरुद्वाराचे पुनर्निर्माण केले आहे.
सर्व भाग वाचण्यासाठी इथे क्लीक करा.
भाग १ : प्रस्तावना
भाग २ : नमस्ते शारदे देवी काश्मीरपुरवासिनि
भाग ३: शारदापीठ
भाग ४: ही वाट दूर जाते
भाग ५: साधना पास
भाग ६: तीर्थबल शारदा मंदिर
भाग ७ : इतनी कुर्बत है तो फिर...
भाग ८: जरा याद करो कुर्बानी
भाग ९: समारोप
माझेमन, छान माहिती / इतिहास
माझेमन, छान माहिती / इतिहास सांगितला आहेस.
केवढं माहीतीपुर्ण आणि
केवढं माहीतीपुर्ण आणि चित्रदर्शी वर्णन. सासरचं गोत्र शांडील्य असून शांडील्य ऋषीमुनींबाबत काहीच माहीती नव्हत. काश्मीरला जाण्याचा योग कधी येईल, येईल की नाही माहीती नाही पण आला इथे जरुन जाईन. केवढा महान इतिहास आहे या जागेला.
१९४७-४८ मधल्या पाकिस्तानी रेडर्सच्या हल्ल्यात तीथवालमधल्या या मंदिराला व गुरुद्वाराला आग लावण्यात आली. >>> आईगं.
फोटो वगैरे काढायला देतात का तिथे, असेल तर पोस्ट कर.
अश्विनी >>> आभार. आपल्या
अश्विनी >>> आभार. आपल्या वाड्यावरच्या चर्चेमुळे तिथे जायची इच्छा प्रबळ झाली.
अंजू >>> नवीन देवळाचा फोटो काढला आहे. तो पुढच्या लेखात ऍड करणार आहे.
आपल्या वाड्यावरच्या चर्चेमुळे
आपल्या वाड्यावरच्या चर्चेमुळे तिथे जायची इच्छा प्रबळ झाली.>>> तुझ्या प्रवासवर्णनाची वाट बघतेय. किशनगंगेवर गेली होतीस जा? PoK ला जोडणाऱ्या ब्रिजवर पांढऱ्या पट्ट्यापर्यंत जाता आलं का? रात्री राहिली असशील तर अनुभव कसा होता?.... असे बरेच काही जाणून घेण्याची उत्सुकता आहे.
एकदम ओघवतं झालं आहे.
एकदम ओघवतं झालं आहे.
शारदापीठ नाव फक्त ऐकलेलं पण हा इतिहास फारच रोचक आहे.
आत्ता नकाशात बघितलं तर हे मंदिर पाकव्याप्त काश्मिरच्या लगत पण भारताच्या हद्दीत आहे असं वाटलं. ते सध्याचं पुनरुज्जिवित मंदिर/ रिलोकेट केलेलं का कसं त्याबद्दल इथे किंवा पुढच्या भागात लिहिलंस तर वाचायला आवडेल.
हे वाचुन आता आणखी वाचायची फारच उत्सुकता वाटते आहे.
ओघवते माहीतीपुर्ण आणि
ओघवते माहीतीपुर्ण आणि चित्रदर्शी वर्णन.>]>>> +१ माझंही माहेरच गोत्र शांडिल्य पंच ऋषींबद्दल काहीच माहिती नव्हती. पुढचा भाग वाचायची व प्रत्यक्ष भेट द्यायची उत्सुकता वाढवलीस..
हाही भाग आवडला. एकदम ओघवतं,
हाही भाग आवडला. एकदम ओघवतं, रसाळ लिहिलेयस.
तिन्ही देवींचे एकत्र स्वरूप ही त्यांची धारणा आहे.>>> हे आणि त्या खालचे दोन परिच्छेदातील माहिती रंजक आहे.
हा भाग सुद्धा मस्त.
हा भाग सुद्धा मस्त.
छान माहिती. जागांच्या नावाची व्युत्पत्ती मस्त.
शक्तिपीठे ५१,५३ की १०१? माझा नेहमी गोंधळ होतो.
महाशक्तीपीठे वेगळी आहेत का?
छान्माहिती. हे काहीही माहित
छान माहिती. हे काहीही माहित नव्हतं!
काश्मिरी लोकांच्या लेखी शारदा
काश्मिरी लोकांच्या लेखी शारदा ही ज्ञानग्रहणाची, सरस्वती ही ज्ञानाची आणि वाग्देवी ही अर्थात वाचेची देवी आणि शारदेचे हे देऊळ हे या तिन्ही देवींचे एकत्र स्वरूप ही त्यांची धारणा आहे>>>>
ही तिन्ही नावे सरस्वती देवीची आहेत असे समजत होते.
खुप छान लिहिलेय. पुढे वाचतेय.
कश्यप ऋषींचा नातू आणि देवल
कश्यप ऋषींचा नातू आणि देवल ऋषींचा मुलगा शांडील्य त्याच्यापासून गोत्र निर्माण झालं, आधी मला वाटलं वर उल्लेख केलेले शांडील्य ऋषी म्हणजे आमचं गोत्रवाले असतील.
साधना सेम, मी ही तिन्ही नावं सरस्वतीची समजत होते.
खूप ओघवते आणि माहितीपूर्ण
खूप ओघवते आणि माहितीपूर्ण लिखाण.
करतारपुर साहिब प्रोजेक्ट
करतारपुर साहिब प्रोजेक्ट यशस्वी होऊ शकतो तर सीमेपलीकडे शारदापीठाचाही होऊच शकतो. त्यासाठी प्रयत्न होत राहायला हवेत.
वा मस्त लिहिलं आहे ! पुढचे
वा मस्त लिहिलं आहे ! पुढचे भागही वाचतो.
सुंदर लेख/माहिती!
सुंदर लेख/माहिती!
आभार लोकहो...
आभार लोकहो...
कालडीला जाऊन आलो मी केरळ
कालडीला जाऊन आलो मी केरळ ट्रिप गेलेली तेव्हा.
बोकलत तुमचा अनुभव लिहा की.
बोकलत तुमचा अनुभव लिहा की.
मी वीणा वर्ल्डसोबत गेलो होतो.
मी वीणा वर्ल्डसोबत गेलो होतो. ग्रुप टूर होती. आमच्यासोबत एक लेखिका पण होत्या. त्यांना त्या मठाला भेट द्यायची ईच्छा होती. त्या पुस्तक लिहिणार होत्या. तिथे मगरीने शंकराचार्यांचा पाय पकडला. कालडी शब्दाचा मल्याळम अर्थ म्हणजे पायाची टाच. पायाच्या टाचेने त्यांनी नदीचा प्रवाह बदलला अशी काहीशी गोष्ट होती. धार्मिक स्थळी आपण स्वतःहून जात नाही. देव बोलवतो तेव्हाच जाणं होतं असा काहीसा अनुभव आला. सगळं श्रेय त्या ताईना जातं.