सकाळी सकाळी न्याहारी उरकून रॉबिन आणि हरिभाऊ आपल्या घरातून शेंडे साहेबांना भेटायला त्यांच्या घराकडे निघाले. कच्च्या रस्त्यावरून रॉबिन मस्तपैकी खिशात हात घालून चालत होता आणि हरिभाऊ त्याला आजूबाजूच्या परिसरात काय काय विशेष आहे हे सांगत होते. रस्त्यावरून गावातील माणसे आपापल्या शेतात काम करायला चाललेली दिसत होती. रस्त्याच्या आजूबाजूला मस्तपैकी मोठमोठी झाडे असल्याने मस्त थंडावा जाणवत होता. पुढे जाताना त्यांना गावातील लोकांची छोटी छोटी घरे दिसू लागली, ज्यामध्ये छोटस कुटुंब मावू शकेल. गाव जास्त मोठं न्हवत. हवा मस्त खेळती होती आणी वातावरण अल्हाददायक. या हवेत रॉबिनने पूर्ण छाती भरून श्वास घेतला आणी त्याच्या चेहऱ्यावर समाधानाचं स्मित आलं. दोघेही हळूहळू चालत गावाच्या मुख्य चौकातून पुढे आले. इथून पुढे आता जरा मोठी मोठी घरांची रांग चालू झाली ती ओलांडून पुढे गेल्यावर आजूबाजूला थोडी शेतजमीन दिसत होती.
“ ते तिथे समोर ते पांढऱ्या रंगाचे घर दिसत आहे ना, तिथे जायचंय आपल्याला” समोर बोटाने निर्देश करत हरिभाऊ आता झपाटयाने पुढे चालू लागले.
रॉबिनला हरिभाऊंच्या या चपळपणाचे कौतुक वाटले. ऐन पासष्ठीत देखील हा माणूस कसा तरातरा चालू शकतो याचं त्याला अप्रूप वाटलं. त्यांच्या चालण्याच्या वेगाशी तुलना करत रॉबिनने सुद्धा आपल्या चालण्याचा वेग वाढवला. काही वेळातच ते त्या पांढऱ्या घरापाशी येऊन पोहोचले. मुख्य प्रवेशद्वाराजवळ येऊन हरिभाऊंनी हळूच कडी काढली आणी आतमध्ये गेले. प्रवेशद्वारावरून एक पाउलवाट घराच्या दरवाजाजवळ जात होती. रॉबिन हरिभाऊंच्या पाठोपाठ सभोवतालच निरीक्षण करत आतमध्ये जाऊ लागला. घर हे चांगलाच मोठ्ठ दिसत होतं. घरापुढे चांगली ऐसपैस जागा होती, ज्यामध्ये हिरवळ उगवलेली होती. सभोवताली मोठमोठ्या कुंड्या ठेवलेल्या होत्या ज्यामध्ये काही झाडे लावलेली दिसत होती. घराच्या बाजूला आणी मागेसुद्धा बरीच जागा मोकळी असणार जिथे अशीच झाडे लावलेली असावीत असं रॉबिनला वाटलं. घराच्या डाव्या बाजूला एक नोकर झाऱ्याने झाडांना पाणी द्यायचं काम करत होता. घर दुमजली होतं आणी आतमध्ये बऱ्याच खोल्या असणार असं जाणवत होतं. निरीक्षण करतच रॉबिन दरवाजाजवळ पोहोचला. हरिभाऊ आतमध्ये गेले त्यांच्या पाठोपाठ रॉबिनसुद्धा आतमधे प्रविष्ट झाला. घराचा हॉल बराच मोठा आणी ऐसपैस होता. बाजूलाच एक मोठ्या आकाराचा सोफा होता ज्यावर दहा बारा माणसे आरामात बसू शकली असती. भिंतीवर वेगवेगळ्या प्रकारची चित्र लटकवलेली होती ज्यामध्ये निसर्गचित्र आणी काही जुन्या काळातील मॉडेल्स होत्या. शेंडे साहेब हे रसिक मनाचे असावेत असं रॉबिनला वाटून गेलं. आसपास बऱ्याच जुन्या पण किमती वस्तू शो म्हणून ठेवलेल्या होत्या, एकूणच एका सधन व्यक्तीचे घर वाटत होते. आतमध्ये एक नोकर हॉलची स्वच्छता करत होता. आत जाताच त्याला हरिभाऊंनी इशाऱ्यानेच शेंडे साहेब आतमध्ये आहेत का हे विचारलं. त्यानेसुद्धा इशाऱ्यातच होकारार्थी उत्तर दिलं.
हॉल ओलांडून पुढे जात हरिभाऊ रॉबिनला घेऊन आतल्या खोलीकडे गेले जिथे शेंडे साहेब कामानिमित्त नेहमी बसत असत. खोलीचा दरवाजा बंद होता, हरिभाऊंनी रॉबिनला मागे थांबायला सांगून पुढे जाऊन दारावर टकटक करत आवाज केला.
“ कोण “ आतमधून एक गंभीर पण थोडासा संशयी आवाज आला.
“ मी आहे हरिभाऊ “ एकदम हळू आवाजात हरिभाऊ बोलले.
थोडावेळ गेल्यावर दरवाजा आतून उघडला. समोर एक पन्नाशीची व्यक्ती उभी होती. जाड मिशा, गाल फुगलेले, अंगात शर्ट आणि त्यावर दोन बारीक कातडी पट्ट्या मागून खांद्यावरून कमरेला खोचलेल्या होत्या, खाली कोटवर घालतात तसली प्यांट असा एकंदरीत त्या माणसाचा पेहराव होता. असा साहेबी थाटात असलेला हा माणूस म्हणजे शेंडे साहेब असावेत याबद्दल रॉबिनला खात्री झाली
“ या आतमध्ये “ एवढ बोलून शेंडे आतमध्ये गेले
हरिभाऊ आणी रॉबिन त्यांच्या मागोमाग आतमध्ये गेले. हि खोली शेंडे कामासाठी वापरत असत. आतमध्ये एक मोठं टेबल होतं आणी त्यामागे एक खुर्ची होती त्यावर शेंडे रेलून बसले. बाजूलाच असलेल्या छोट्या सोफ्यावर हरिभाऊ आणि रॉबिन जाऊन बसले. मगाशी बाहेर उभा असलेला नोकर लगबगीने आतमध्ये पाण्याचा तांब्या घेऊन आला, तो तांब्या बाजूच्या एका छोट्या टेबलवर ठेवून दिला आणि तो बाहेर निघून गेला.
“ ते मी सांगितलं होतं ना, माझ्या ओळखीचे एक स्नेही होते त्यांचा मुलगा एक गुप्तहेर आहे “ एवढ बोलून हरिभाऊ शांत बसले.
“ अरे हो हो .. सांगितलं होतंत तुम्ही.. अं... “ एवढ बोलून शेंडे साहेब खाली बघत शांत बसले.
रॉबिनला त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारची चिंता जाणवली, कदाचित बंगल्याविषयीची आणि तिथली भुताटकीच्या प्रसंगांची त्यांना आठवण झाल्याने ते शांत झाले असावेत. पण शांततेचा भंग करत शेंडे पुढे बोलू लागले.
“ मला हरिभाऊ बोलले होते तुमच्याबद्दल, मला तशी तुमची माहिती न्हवती पण चौकशी केल्यावर कळल कि गुप्तहेर रॉबिन हे शहरातील एक मोठे गुप्तहेर आहेत. खरंतर या अशा विचित्र प्रकरणात गुप्तहेर काय करू शकतो हे मला सांगता येणार नाही पण या गोष्टी नक्की का घडतायत याचं खरं कारण तरी पुढे यायला मदत मिळेल म्हणून मग मी हरिभाऊंना तुम्हाला बोलवायला होकार दिला” शेंडे जराशी खाली मान करत रॉबिनला बोलले.
“ तुम्ही म्हणताय ते अगदी खरं आहे कि प्रकरण जरा वेगळं आहे पण एखाद्या व्यक्तीला कोणीतरी जाणीवपूर्वक घाबरवून त्याच्या मालमत्तेवर कोणी डोळा ठेवून असेल किंवा ना ना प्रकारे छळत असेल तर हा गंभीर मामला आहे, आणि इथे घरात देखील चोरीचा प्रयत्न झाल्याने कायदेशीर बाबींना धक्का लागलेला आहे” रॉबिन शेंडेंना दिलासा देत म्हणाला.
“ तुम्ही म्हणताय ते खरंय पण.. थोडसं थांबून शेंडे पुन्हा बोलू लागले.. “
“खरं सांगायचं तर मला काही सुचतच न्हवत. पोलिसात गेलो असतो तर इज्जतीचा पंचनामा झाला असता उगाचच त्यांच्या चौकशा, आणि पोलिसांचा हस्तक्षेप मला नको होता” एवढ बोलून शेंडे हातावर हात ठेवून शांत बसले.
“ म्हणूनच तर मी साहेबांना म्हणालो कि आपण दुसऱ्या कोणाची तरी मदत घेऊ ज्यामध्ये जास्त बभ्रा होणार नाही, आणी रॉबिनवर माझा विश्वास आहे तो नक्की आपल्याला या पेचातून सोडवेल” हरिभाऊ रॉबिनकडे पाहत बोलले.
“ तुमच्या तोंडात साखर पडो हरिभाऊ आणी असंच होवो,” एवढ बोलून शेंडे टेबलावर हात ठेवून खाली बघत विचारमग्न झाले.
“ तुमची हरकत नसेल तर सगळा घटनाक्रम मला पुन्हा सांगाल का? तसं मला हरिभाऊंनी सगळी कल्पना दिलेलीच आहे पण तरीही एखादी गोष्ट सुटली असेल तर तुमचाकडून सविस्तर कळेल” आपल्या जॅकेटच्या आतल्या कप्प्यातून महत्वाच्या मुद्द्यांच्या नोंदींसाठी असलेली डायरी आणी पेन काढत रॉबिन म्हणला.
“ हो सांगतो” असं म्हणत शेंडे खुर्ची पुढे ओढून बोलू लागले – “ मी तो बंगला माझे एक स्नेही मेहता यांच्याकडून खरेदी केला हे तुम्हाला हरिभाऊंनी सांगितलच असेल. गावातून शहराकडे जाणाऱ्या रस्त्यावर एवढी चांगली जमीन मिळतेय म्हटल्यावर मी ती लगेच खरेदी केली. मेहतांना सुद्धा तातडीने इथून त्यांच्या गावाकडे परत जायचं होतं कारण त्यांच्या मुलीचा झालेला दुर्दैवी मृत्यू. मेहतांनी ज्या ज्या ठिकाणी बांधकाम केलेलं होतं तिथे मी काही सुधारणा केल्या आणी जुनी भिंत पाडून नवीन बांधकाम करायला सुरुवात केली. बंगल्याच्या आतील रचनेत बदल केले, अर्थात बंगला घेतल्या घेतल्या महिनाभर मला तिथे काही करायला फुरसदच मिळाली नाही. मला तिथे जाऊन सगळी कामे पाहायला जास्त वेळ न्हवता, शहरात माझे काही उद्योग आहेत थोडीफार शेती आहे, तसचं एक पतसंस्था मी चालवतो. या व्यापामुळे जरा सबुरीनेच कामे चालू होती पण काही महिन्यातच बऱ्यापैकी काम उरकलं होतं. पण नंतर अचानक काही लोकांना तिथे वेगवेगळ्या प्रकारचे आवाज ऐकू येऊ लागले. रात्र झाल्यानंतर तिथे जास्तच भयानक वातावरण दिसत असे कारण आजूबाजूला रस्त्यावर दिवे जास्त प्रमाणात नाहीत आणी माणसांची वर्दळ देखील कमी असते. कामगारांना सुद्धा तसेच विचित्र अनुभव आले. त्यामुळे दिवसाढवळ्या सुद्धा तिथे फिरकेना. रात्री अनेकांना तिथे मोठमोठ्याने गळा काढण्याचे आवाज ऐकू आले. नंतर तर काही लोकांनी तिथे एक बाई रात्रीच्या वेळेस खिडकीत केस मोकळे सोडून बाहेर बघत असल्याचा अनुभव देखील सांगितला.” बोलता बोलता अचानक शेंडे थोडंस थांबले.
रॉबिन शांतपणे ऐकत त्याच्या नोंदवहीत काहीतरी लिहित होता. हरिभाऊ हाताची घडी मान खाली घालून ऐकत बसले होते.
शेंडे पुढे बोलू लागले – “ गावात अशी चर्चा सुरु झाली कि मेहतांची मुलगी अवनी हीच भूत त्या बंगल्यात फिरत आहे आणी कोणीही त्या बंगल्याकडे फिरकेना. माझा कानावर सुद्धा या गोष्टी आल्या पण मी कामाच्या रगाड्यात या गोष्टींकडे लक्ष दिले नाही. नंतर मी स्वतः सुद्धा एकदा बंगल्यावर जाऊन पाहावं म्हटलं कारण कामगार तिथे जायला धाजावेनात. तिथे मला एक विचित्र प्रकारची शांतात जाणवली. काही दिवसांनी संध्याकाळच्या वेळेस गेल्यावर मला सुद्धा ते आवाज ऐकायला मिळाले आणी मी जरासा घाबरलो. बरेच लोक म्हणाले बंगला विकून टाका, पण विकणार कोणाला? भूताटकीच्या चर्चा सगळ्या परिसरात पसरल्या होत्या, आणी कोणी विकत घेतला तरी तोट्याचा व्यवहार करून विकावा लागणार होता, ते मला मान्य न्हवत”
“ बऱ बंगला विकत घेण्याविषयी बोलायला कोणी तुमच्याकडे आलं होतं का? “रॉबिनने प्रश्न केला.
“ हो एक दोन खरेदी विक्री करणारे दलाल येऊन गेले होते, पण खूपच कमी किमतीत सौदा करत होते, म्हणून मग मी त्यांना नंतर सांगतो असं म्हणून टाळल” शेंडे कपाळावर आठ्या आणत म्हणाले.”
“ घरात भिंतीवर लिहिलेल्या मचकुराविषयी काही सांगू शकता” रॉबिन बोलला.
जरासा आवंढा गिळून शेंडे खुर्चीत जरा रेलून बसले आणी वर पाहत बोलू लागले.
“ त्या दिवशी मी आणी माझी बायको बाहेर कामानिमित्त गेलो होतो. घरात कोणीही न्हवत, मुलगा आणी मेहुणा सुद्धा बाहेरच कुठेतरी होते. घरात फक्त नोकर होते आणी ते सुद्धा किचनमध्ये कामात आणी काहीजण आतल्या त्यांच्या खोल्यांमध्ये होते. बाहेरून आम्ही दोघे घरात आलो तेव्हा आमच्या खोलीत आम्हाला “ मी आले आहे” असा मजकुर लालभडक रंगात भिंतीवर लिहिलेला दिसला. जवळ जाऊन पाहिलं तर ते रक्त होतं हे समजल्यावर तर मी आणी माझी बायको चांगलेच घाबरलो. घरातील नोकर घाबरून पळत आले त्यांना सुद्धा आश्चर्य वाटलं. मी चौकशी केली कि बाहेरून कोणी आलं होतं का तर ते नाही म्हणाले आणी तसंही आम्ही बाहेर गेल्यावर घराचा मुख्य दरवाजा बंद होता.”
रॉबिनने मधेच शेंडेना प्रश्न केला “ घरातील नोकरांपैकीच कोणीतरी हा खोडसाळपणा केलेला असू शकतो का? किंवा बाहेरच्या कोणीतरी व्यक्तीने नोकरांची मदत घेऊन घरात कोणी नसताना प्रवेश मिळवला आणी रक्ताने लिहिलेला मजकुर भिंतीवर लिहून आल्यामार्गे पसार झालं असेल?
“ नाही ..असं नाही होऊ शकत. आमचे नोकर असं काही करू शकत नाहीत. ते सांगेल ते काम निमुटपणे करत असतात आणी इथे राहायला खायला प्यायला आणी दोन पैसे गाठीला मिळत असताना असलं भलतं सलतं धाडस ते करतील असं मला वाटत नाही” शेंडेनी उत्तर दिलं.
“ तुम्ही नोकरांवर एवढा विश्वास दाखवताय म्हटल्यावर मग घरात दुसरं कोणीही नसताना हे कृत्य अन्य कोण करू शकेल हा प्रश्न गहन होऊन जातो” रॉबिनने शेंडेकडे प्रश्नार्थक नजरेने पहिले.
“ तेच तर ना... अन्य कोणी हे कृत्य कसं केलं असेल हेच तर समजेना. म्हणूनच तर आम्ही घाबरून गेलो कि नक्की बंगल्यातले भूतच याला कारणीभूत नसावे ना” एक मोठा आवंढा गिळून शेंडे म्हणाले. शेंडेच्या कपाळावर घर्मबिंदू जमा झाले होते, टेबलावरच्या तांब्याच्या भांड्यातून ते गटागटा पाणी प्यायले.
“ बर मग चोरीची घटना झाली तेव्हा नक्की काय काय घडलं” रॉबिनने विचारलं.
“ हे रक्ताने मजकुर लिहिल्यानंतरच्या घटनेनंतर काही दिवसांनीच चोरीची घटना घडली, सकाळी उठल्यावर मी कामाची कागदपत्रे घेण्यासाठी त्या पलीकडच्या खोलीत गेलो होतो जिथे मी माझ्या तिजोऱ्या आणि मोठी कपाटे असतात. आत जाऊन पाहतो तर काय सगळी कागदपत्रे इकडे तिकडे विखुरली गेली होती. कपाटे सताड उघडी होती. मी तर घाबरूनच गेलो” शेंडे कपाळावरचा घाम पुसत म्हणाले.
“ बर काय काय चोरीला गेलं मग “ रॉबिनने शेंडेंवर नजर रोखत विचारलं.
“ काहीच नाही “ थंडपणे शेंडे म्हणाले.
“ काय ...काहीच नाही” रॉबिनने आश्चर्यचकित होऊन विचारलं.
“ हो ना.. म्हणूनच तर आम्ही जास्तच घाबरलो कि चोरीला काहीच गेलं नाही म्हणजे चोरी झालीच नाहीये, उलट घरात आता बंगल्यातील भूत शिरले आहे आणि अशा प्रकारे थैमान घालत आहे. मग बायकोने घाबरून गावातील पुजाऱ्याला बोलावून घेतले आणि हवन विधी करून घेतला. तेव्हा कुठे आमच्या मनाला शांती मिळाली” शेंडे निश्वास टाकत बोलले.
“ या सगळ्या घटना होऊ लागल्याने शेंडे साहेब आणि मी देखील चक्रावून गेलो म्हणूनच तर तुला बोलावण्याचा घाट मी घातला. कारण या समस्यांचं निराकारण तुझाचकडून होऊ शकेल अशी खात्री वाटत होती मला.” आत्तापर्यंत फक्त ऐकत असलेले हरिभाऊ रॉबिनकडे पाहत म्हणाले.
हरिभाऊंच्या या बोलण्याने रॉबिन खाली मान घालून विचारात पडला. शेंडे साहेब सुद्धा खुर्चीत रेलून वर पाहत बसले. घटनाक्रम खरोखरीच बुचकळ्यात टाकणारा होता. शहरालगतच्या बंगल्यामध्ये चित्रविचित्र घटना घडत होत्या ते समजत होतं पण घरात सगळ्यांच्या अपरोक्ष अशा घटना घडणे म्हणजे विशेषच होते.
“रॉबिन तुम्ही आम्हाला या प्रकरणात मदत करू शकाल का ? “ खुर्चीवर रेललेल्या अवस्थेतच शेंडे रॉबिनकडे पाहत म्हणाले.
“ मी नक्कीच प्रयत्न करेन शेंडे साहेब, पण तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो कि मी इथे एक गुप्तहेर म्हणून आलोय आणी या प्रकरणांचा तपास करतोय हे तूर्त कोणास सांगू नका. मी गुप्तहेर आहे हे फक्त तुमच्यापर्यंतच राहूद्यात” रॉबिनने शेंडेना सांगितलं तसं यावर शेंडे ‘ठीक आहे’ असं म्हणाले.
“सध्या तरी मला त्या दोन्ही खोल्या दाखवा जिथे भिंतीवर रक्ताने मजकुर लिहिलेला होताआणि चोरीचा प्रयत्न झालेला होता” रॉबिन उत्तरला.
“ जरूर” असं म्हणत शेंडे जागेवरून उठले.
त्यांच्या या लगबगीच्या उठण्याने यांना हे प्रकरण किती लवकर तडीस जावे असं वाटत असावं याची कल्पना रॉबिनला येत होती. तसंही वरकरणी दाखवत नसले तरी शेंडे मनातून चांगलेच हादरले होते हे रॉबिनला त्यांच्याशी बोलल्यावर समजलं होतं. खोलीतून शेंडेच्या मागोमाग रॉबिन आणी हरिभाऊ निघाले. हॉल मधून डावीकडे वळत थोडसं पुढे गेल्यावर घरातला जिना लागला जो वर जात होता. जिन्याच्या बाजूने गेल्यावर आतल्या भागात एक खोली दिसत होती. त्या खोलीकडे जात खोलीचा दरवाजा उघडून सावधगिरीने शेंडे आत शिरले, आतजाण्याआधी मागे वळून त्यांनी रॉबिन पण आहे कि नाही याची खात्री करून घेतली. शेंडे बाजूला थांबले.
“ हि समोरची भिंत जिच्यावर मजकुर लिहिलेला होता, आता तो साफ केला आहे” शेंडेनी माहिती पुरवली.
रॉबिनने व्यवस्थितपणे त्या भिंतीचं निरीक्षण केलं. भिंतीवर मचकूर कसा लिहिला असेल याचा अंदाज त्याने घेतला, कारण आत्ता भिंत व्यवस्थित पुसली गेली होती. फिकट रंगाच्या भिंतीचा मजकुर लिहिलेला भाग खरवडला गेला होता. खोलीत सामान जास्त असं न्हवतच, काही बोचकी लाकडी सामान आणी अडगळीच्या खोलीत टाकतात तसे साहित्य एवढेच काय ते सामान. रॉबिनने सभोवार नजर फिरवली तेव्हा त्याला जाणवलं खोलीला एकंच खिडकी आहे, जी लाकडी कलाकुसर केलेली जुन्या पद्धतीची आहे जवळ जाऊन रॉबिनने ती खिडकीदेखील व्यवस्थित न्याहाळली. खिडकीपासून मजकुर लिहिलेली भिंत जास्त लांब न्हवती. थोडावेळ तिथे थांबून रॉबिन आता दुसऱ्या खोलीकडे जायला वळला जिथे चोरीचा प्रयत्न झालेला होता. या खोलीतून बाहेर पडल्यावर पुढे थोडा मोकळा भाग होता आणी नंतर विरुद्ध बाजूला एक खोली होती. शेंडेनी रॉबिनला त्या खोलीकडे जाण्याचा निर्देश केला. तिथे गेल्यावर आधी रॉबिन खोलीचा दरवाजा उघडून आतमध्ये गेला आणी त्याच्या पाठोपाठ शेंडे आणी हरिभाऊ गेले. शेंडेनी सांगितल्याप्रमाणे या खोलीत फक्त दोन मोठी लोखंडी कपाटे, एक तिजोरी आणी लाकडी टेबल, खुर्ची एवढाच पसारा होता.
“ या कपाटांना लॉक लावलेलं असते कि ती उघडीच असतात” रॉबिन कपाटाकडे पाहतच म्हणाला.
“ लॉक असते, कारण या कपाटामध्ये कागदपत्रे असतात” शेंडे म्हणाले.
“ ओह्ह ... आणी याच्या किल्ल्या कुठे असतात?”
“ किल्ल्या माझ्या काम करण्याच्या खोलीत असतात, जिथे मगाशी आपण बसलेली होतो” शेंडे म्हणाले.
रॉबिनने कपाटांच्या जवळ जाऊन दोन्ही हॅन्डल्स तपासले, लॉक पाहिलं कुठेही जबरदस्तीने उघडल्याच्या खुणा न्हव्त्या. कपाटामध्ये फक्त कागदपत्रे असल्यामुळे आतमध्ये उघडून पाहण्याची आवश्यकता रॉबिनला वाटली नाही. या खोलीला सुद्धा एकच खिडकी होती आणी अगदी तशीच जशी मागच्या खोलीत पहिली होती. खिडकीपाशी जाऊन रॉबिन थोडंसं घुटमळला. मग खिडकीपासून बाजूला झाला.
“ बस चला आता बाहेरच्या बाजूला जाऊन जरा पाहूयात “ असं म्हणत रॉबिन खोलीतून बाहेर पडला.
बाहेर जाऊन काय बघायचंय आता रॉबिनला? शेंडेना वाटलं. कारण घटना तर घरात घडल्या होत्या. पण तरीही आपली शंका मनातच दाबून शेंडे निमुटपणे रॉबिनच्या मागे चालू लागले. ते सगळे हॉलमध्ये येत असतानाच मागून जिन्यावरून कोणीतरी खाली उतरत असल्याचा आवाज आला. आवाज आल्यासरशी ते तिघेही जागीच उभं राहून मागे पाहू लागले. जिन्यावरून एक तरुण आणि मध्यम वयाचा माणूस उतरून खाली येत होता तरुणाने अंगात पांढरा सदरा आणि खाली पांढरी प्यांट घातली होती. केस जरासे विस्कटलेले होते आणि त्याच्या नजरेत एक प्रकारचा माज होता. रंगाने सावळा असून चेहऱ्यावर बेफिकीर वृत्ती दिसून येत होती. त्याच्या मागून येणारा माणूस आपलं मोठ्ठं पोट सावरत धोतर एका हाताने पकडून पुढे येत होता. त्या माणसाने अंगात मातकट रंगाचे जॅकेट घातलेलं होते.
“ काय मग स्वारी कुठे निघालीय आज “ जराशा रागात शेंडे त्या तरुणाकडे पाहत म्हणाले.
“ आलो जरा शिकार करून “ शेंडेंकडे आणी हरिभाऊंकडे हलकीशी नजर टाकत त्या तरुणाने बेफिकिरपणे उत्तर देत तिथून काढता पाय घेतला. दरवाजाकडे जात असताना वाटेत त्या तरुणाला रॉबिन दिसला, त्या तरुणाने जरा घुश्यातच रॉबिनकडे पहिले, एक तीक्ष्ण कटाक्ष टाकून तो रॉबिनच्या अगदीच जवळून गेला. याउलट रॉबिन अगदीच थंडपणे त्या तरुणाकडे पाहिलं होतं. रॉबिनच्या चेहऱ्यावरील रेषही हलली न्हवती.
“ भाऊजी, आलू बरका जरा रानात जाऊन, मस्तपैकी ससा आनतू धरून” मुद्दाम हसत तो पोट पुढे आलेला माणूस त्या तरुणाच्या मागेमागे जाऊ लागला. जाताना तो माणूस सुद्धा रॉबिनच्या पुढून गेला. रॉबिनकडे पाहत त्याने कपाळावर जरा आठ्या आणल्या आणी संशयी नजरेने रॉबिनकडे वरपासून खालपर्यंत पाहिलं. यावेळी सुद्धा रॉबिन चेहऱ्यावरील रेषहि न हलवता थंडपणे पाहत होता. रॉबिनकडे तसं पाहत तो माणूस बाहेर निघून गेला.
“ कधी सुधारणार नाहीत दोघही” तोंडाने पुटपुटत निराशेने मान खाली घालत शेंडेसाहेब रॉबिन जवळ आले.
“रॉबिन, तो निर्लज्ज तरुण माझा मुलगा भैरव होता आणी त्याच्यामागे गेलेला तो त्याचा मामा म्हणजेच माझा एकुलता एक मेहुणा रावसाहेब” शेंडेनी माहिती पुरवली. शेंडेंच्या नजरेत रॉबिनला निराशेचा एक डोंब दिसून आला.
आपल्या मुलाची अशी ओळख करून दिल्यामुळे शेंडेंच्या मनात आपल्या मुलाविषयी काय भाव असतील हे रॉबिन समजून चुकला. त्यामुळे त्यावर अधिक काही आत्ताच बोलायला नको म्हणून रॉबिन जास्त काही बोलला नाही. नंतर हरिभाऊंकडून त्यांची माहिती घेता येईल असं त्याला वाटलं.
“ अहो गेला का हो भैरव बाहेर ..” मागून एका स्त्रीचा आवाज आला. आवाजाच्या दिशेने तिघांनी पाहिलं तर एक स्त्री शेंडेंच्या जवळ येत त्यांना विचारू लागली.
“ हो.. गेला हुंदडायला नेहमीप्रमाणे, बैल कुठला” शेंडे आवाज चढवत म्हणाले. तसं त्या स्त्रीला मनातून थोडासा राग आला. परक्या माणसांसमोर आपल्या मुलाचा असा उपमर्द केलेला तिला आवडला नाही.
“ नाश्ता कर म्हटलं तर तसाच बाहेर गेला, थांबा त्याला बोलावते” असं म्हणत ती बाई बाहेर निघून गेली.
“कामात लक्ष घाल म्हटलं, तर जमत नाही, फुकट बसून खातोय नुसता” त्रागाने शेंडे म्हणाले.
ती बाई हि शेंडेंची बायको होती. या घरगुती ड्रामावर काहीही न बोलता रॉबिन बाहेर जायला वळला, कारण त्याला शेंडेच घर बाहेरून पहायचं होत. मुख्य दरवाजातून बाजूला हिरवळीवरून चालत जाऊन मागच्या बाजूला जाऊ लागला. त्याच्या मागोमाग शेंडे आणी हरिभाऊ सुद्धा चालू लागले. घराच्या मागेसुद्धा बरीच मोकळी जागा होती. काही खोल्यांच्या खिडक्या भिंतींवर तिथे दिसत होत्या. संडास बाथरूमचे सांडपाण्याचे पाईप सुद्धा त्या बाजूला बसवले होते. घराच्या बाजूच्या भागात झाडे लावलेली असल्याने मस्त सावली पडलेली होती. वरच्या मजल्यावरच्या दोन खोल्यांना गॅलरी असल्याचं त्याला दिसलं. घराच्या मागच्या बाजूला आल्यावर वर अजून एका खोलीला गॅलरी होती. सगळ्या गॅलऱ्या या वरच्या मजल्यावर होत्या त्यांना लोखंडे नक्षीदार कठडे बसवले होते. मागच्या बाजूला वर एक गॅलरी होती, जी अगदी त्या खोलीच्या जवळ होती ज्या खोलीत चोरी करण्याचा प्रयत्न झालेला होता. बाजूला सांडपाण्याचा एक पाईप सुद्धा होता जो अगदी वर गॅलरीपर्यंत जात होता, पाईप रुंदीला खूप जाड दिसत होते. रॉबिनने जवळ जाऊन व्यवस्थितपणे मागची बाजू पहिली विशेषतः खिडक्या आणी त्यांच्या चौकटी. ज्या खोलीत मचकूर लिहिलेला होता तिथे त्या खोलीबाहेर बाहेर काही खुणा दिसतात का हे त्याला पाहायचं होतं. तिथे त्याला काही आढळलं नाही म्हणून काही वेळ तिथे निरीक्षण करून त्याने बाजूच्या सांडपाण्याच्या पाईपाकडे पाहिलं तर तो खूप जुना झालेला होता, त्याला भिंतीला आधार म्हणून ठोकलेल्या कड्यांपैकी एक कडी तुटलेली होती.
“ ती वरची खोली कोणाची आहे जिला गॅलरी आहे “रॉबिनने विचारलं
“ ती गेस्ट रूम आहे कोणी पाहुणा माणूस आला कि तिथे राहण्याची, अंघोळीची व्यवस्था केली आहे” शेंडे बोलले.
काही वेळ तिथे पाहून रॉबिन घराला वळसा मारून बाजूच्या मार्गाने घराच्या पुढ्यात हिरवळीवर आला. नोकरांनी सगळीकडे पाणी मारल्यामुळे सगळ्या हिरवळीवर पाणी साचले होते त्यात चालल्यामुळे त्याच्या बुटाचा पचपच आवाज येत होता. घरापुढे उभे राहून रॉबिन काहीसा विचारमग्न झाला. शेंडे आणी हरिभाऊ सुद्धा त्याच्या मागोमाग तिथे आले.
“ मग काय वाटत तुम्हाला रॉबिन, तुम्ही हे प्रकरण सोडवू शकाल का? “ शेंडे आठ्यायुक्त चेहऱ्याने म्हणाले.
“ हो मी शंभर टक्के प्रयत्न करण्याचं आश्वासन दिलेलं आहे शेंडे साहेब” घराकडे पाहत रॉबिनने उद्गारला.
रॉबिन खात्रीने काहीही बोलला नसल्याने शेंडेना दिलासा मिळाला नाही पण रॉबिन आता या प्रकरणात लक्ष घालणार म्हटल्यावर त्याचं मनावरच दडपण काही प्रमाणात दूर झालेलं होतं. जेवढी माहिती मिळवायची होती ती मिळाली असल्याने रॉबिनने शेंडेची रजा घेतली आणी तो हरिभाऊंसोबत शेंडेंच्या घरासमोरील गेटमधून बाहेर पडला.
क्रमशः
दोन्ही भाग वाचले
दोन्ही भाग वाचले
सुरुवात छान झाली आहे
नेहमीच्या भूत भय कथे पेक्षा काहीतरी वेगळं उत्कंठावर्धक वाचायला मिळेल अशी आशा आहे
पुढचे भाग येऊ द्या
दोन्ही भाग वाचले >>>> +१
दोन्ही भाग वाचले >>>> +१
छान लिहिले आहे.
मचकूर नाही मजकूर!