माझी मायबोली (२००५-२५) : मागे वळून पाहता

Submitted by हेमंतकुमार on 13 February, 2025 - 07:22

होय, तो २००५सालचा जानेवारी किंवा फेब्रुवारी महिनाच होता. परदेशात विनाकुटुंब आलो होतो त्याला जेमतेम अडीच महिने झाले होते. तिथल्या एका राष्ट्रीय रुग्णालयात सल्लागाराचे पद मिळालेले. स्वतंत्र केबिन आणि तिच्यात शिरताच एक प्रशस्त असे टेबल आणि त्यावर ऐटीत बसलेला डेस्कटॉप कम्प्युटर. तेव्हाचे संगणक त्यांच्या लवाजम्यासहित असल्यामुळे बऱ्यापैकी जागा व्यापत. भारतात संगणकाचे गमभन शिकून फक्त वर्षच झालं होतं. लँडलाईन फोनवरून इंटरनेटची जोडणी असला उद्योग मायदेशी करून पाहिलेला होता. अशा यंत्रणेत एक तर तुम्ही फोनतरी चालू ठेवू शकता किंवा इंटरनेट तरी वापरू शकता असा तो काटकसरी संसार थोडा अंगवळणी पडला होता. या उलट त्या रुग्णालयात दिलेल्या स्वतंत्र संगणक, वायफाय इंटरनेटची २४ तास अनिर्बंध सुविधा आणि 24 तासात मन मानेल तेव्हा रुग्णालयातील आपल्या खोलीत येण्याची मुभा या सर्व गोष्टी म्हणजे अगदी स्वर्गसुख होत्या.

परस्परांशी इ-संवाद साधण्यासाठी तेव्हा फक्त इ-मेलचीच सुविधा होती आणि त्याच्यावर तेव्हा देखील अनेक ‘ढकलमेल्स’ असायच्या. त्यातूनच थोडीफार करमणूक व्हायची. अर्थात तो सगळा प्रकार इंग्लिशमध्येच होता. त्यामुळे मराठीतून सोय असलेल्या काहीतरी करमणुकीच्या अगदी शोधात, नव्हे, भुकेला होतो. एकदा सहज बसलो असता शालेय जीवनातील दोन-तीन कविता आठवल्या आणि त्या पुन्हा आपल्यासमोर पूर्णपणे वाचायला मिळाव्यात अशी तीव्र इच्छा झाली. मग शोध घेता घेता ‘आठवणीतील गाणी डॉट कॉम’ चा शोध लागला आणि त्यावर कविता आणि गीतांचा अक्षरशः पाऊस पडलेला दिसला. म्हटलं, चला निदान मराठीतली पद्यमय करमणूक तरी चालू झाली.

कार्यालयीन वेळात रुग्णालयाचे काम तर सतत चालू असायचे. पण अधूनमधून ते बाजूला ठेवून विरंगुळा म्हणून संगणकावर इकडे तिकडे टिचक्या मारायची सवय लागली. असंच एकदा सर्फिंग चालू असताना ‘पांढऱ्यावर काळे’ असा काहीतरी मजकूर दिसला आणि त्यानंतर कसं काय ते काही आठवत नाही, पण अचानक ‘मायबोली डॉट कॉम’ला अलगद जाऊन पडलो ! तेव्हापासून त्याच आनंदात न्हात आहे. असा तो माझा मायबोली प्रवेश, ज्याला आता आपण जुनी मायबोली म्हणतो. तेव्हा त्यात सदस्यनाव रोमन लिपीत लिहावे लागे. सुरुवातीला संस्थळावर नजर टाकता असे दिसले की बरेच लोक तिथे चित्रविचित्र टोपण नावांनी वावरताहेत. मग आपण काय टोपणनाव घ्यावे हे मात्र काही जाम सुचेना. किंबहुना सदस्य होण्याची घाई झालेली होती आणि त्यात टोपणनावावर विचार करत बसायला वेळ दवडावासा वाटला नाही. कुमार हे माझे घरातले नाव म्हणून तेच नाव घ्यावे असे वाटले. पण ते आधीच कोणी घेतलेले असल्याने मिळाले नाही. माझ्या कॉलेज जीवनात दर रविवारच्या विविध भारतीवर एस कुमार यांचा एक प्रायोजित कार्यक्रम लागायचा आणि त्या जाहिरातीमुळे तेव्हा एस कुमार हे नाव प्रसिद्ध होते. मग मनाशी म्हटलं, झालं ठरलं आपलं - ते जसे एस कुमार तसे आपण Hkumar.

मग अशा तऱ्हेने Hkumar ही व्यक्ती मायबोलीकर झाली. हळूहळू मराठी टंकनाचे धडे गिरवू लागलो पण लवकरच लक्षात आले की हे काही येरागबाळ्याचे काम नव्हे ! संगणकावरही अजून पुरता हात बसलेला नव्हता. त्यात डेस्कटॉपचा कीबोर्ड म्हणजे टाईपराईटर बडवल्यागत हातांना व्यायाम असायचा. रुग्णालयाच्या तांत्रिक कामात देखील अजून पुरेसा तरबेज झालेलो नव्हतो. त्यामुळे इथे काही आपण मोठ्या प्रमाणावर मराठी टंकन करू शकणार नाही हे उघड होतं. या तांत्रिक मर्यादेमुळेच एक गोष्ट मनाशी स्पष्ट झाली की गुलमोहर विभागात लिहिणे सध्या तरी आपल्याला शक्य नाही. त्याला अजूनही एक कारण होतं. तेव्हा मी छापील वृत्तपत्रे व मासिकांसाठी लेखन करीत होतो आणि त्याचे मानधन देखील मिळे. त्यासाठीची मुद्रणप्रत हस्तलेखनातच करे आणि त्याचा चांगल्यापैकी सराव होता. किंबहुना एकटाकी ओघवते लेखन करायचे तर त्यासाठी स्वतःचा हात आणि फाउंटन पेन हेच माझ्या दृष्टीने सर्वोत्कृष्ट साधन होते. हे सर्व पाहता मायबोलीवरील हितगुज या विभागापुरतेच स्वतःला मर्यादित ठेवायचे ठरले. सुरुवातीला एक दोन शब्द किंवा फारतर एखाद्या वाक्याचा प्रतिसाद देऊन थांबायचो तरी वाटायचे - हां, जमले भाऊ आपल्याला मराठी टंकन !

महिनाभरात या मूलभूत गोष्टीत गती आली आणि मग फारसे लेखनश्रम पडणार नाहीत अशा पद्धतीचे काही धागे काढले. त्यात अमुकतमुक गोष्टीच्या चौकशीपासून रेडिओच्या आठवणीपर्यंत, अशा विषयांचा समावेश होता. एकदा असेच पाहता पाहता ‘आवडलेल्या वाक्यांचा’ धागा दिसला आणि अगदी युरेकासम आनंद झाला. माझ्या हस्तलिखित दैनंदिनीत अनेक आवडत्या वाक्यांचा संग्रह केलेला होता. मग काय, दिवसाला एक वाक्य असा रतीब एकदोन महिने तरी चालू होता.

तेव्हा आठवड्यातून दोन दिवस कार्यालयीन साप्ताहिक सुट्टी होती. परंतु घरी एकटाच असल्यामुळे दोन पूर्ण दिवस सुट्टीचे काय करायचे असा पेच पडायचा. त्यापैकी एका दिवशी इच्छा नसताना घरापासून दूरवर असलेल्या मॉलमध्ये जाई आणि काहीतरी थातूरमातूर खरेदी करून येई. पण मुळात त्या प्रकाराचे अजिबात आकर्षण नव्हते. म्हणून मग सुट्टीचा दुसरा दिवस हा सरळ रुग्णालयात जाऊन धडकायचं आणि तीन-चार तास खुशाल संगणकासमोर ठिय्या देऊन बसे. सुट्टीच्या दिवशी कार्यालयीन काम नसल्यामुळे मग एकतर कुणाला तरी मेल करत बसायचं आणि मग मायबोलीवर मनसोक्त बागडत राहायचं. एकंदरीत धमाल येत होती आणि एकटेपणा घालवण्याचा एक उत्तम मार्गही सापडला होता.

प्रसिद्धीपूर्व कोणत्याही संपादनाविना असलेली स्वप्रकाशनाची सोय, चर्चा विषयांची विविधता, दिलखुलास गप्पा, टोपणनावाने लिहायचे स्वातंत्र्य आणि बऱ्यापैकी खेळीमेळीचे वातावरण या वैशिष्ट्यांमुळे हे संस्थळ आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनून गेले. (अर्थात अनिर्बंध लेखनाची सोय लेखकाला बहुप्रसव बनवते. मात्र कालांतराने त्याच्यावर संयमाने विजय मिळवणे हे लेखकाच्या हिताचे असते). तिथे अंदाजे एक दीड वर्ष बागडल्यानंतर आपल्या संस्थळाने कात टाकली आणि नव्या मायबोलीचा जन्म झाला. आता आपले नाव देखील देवनागरीत लिहायची मूलभूत सोय झाली होती. मग मागच्या नावातील पहिल्या अक्षराला उडवून टाकले आणि कुमारच्या पुढे १ हा अंक लावून स्वतःचे नवे बारसे केले.

नव्या मायबोलीचे एकंदरीत रूप आता आकर्षक होते. काही नवीन सुविधा देखील दिल्या गेल्या होत्या. तरी पण काही काळ जुन्यानव्याची तुलना होतच राहते. जुन्या रचनेत सर्व विभाग मुखपृष्ठावर दिसत आणि आपल्याला हव्या त्याच विभागात जायची थेट सोय असायची. याला बुजुर्ग मंडळी ‘ट्री-व्ह्यू’ असं काहीतरी म्हणायची. तशी सोय नव्यात का नाही, यावर १-२ वर्षे तरी चर्चा झालेल्या आठवतात. अर्थात कालांतराने प्रशासकांनी विषयांच्या प्रकारानुसार ग्रुपची सोय दिली हे चांगले झाले. त्यामुळे स्वतःला गरज वाटत नसताना संपूर्ण लेखन बघत राहण्याचे बंधन राहत नाही.

नव्या मायबोलीतील हितगुजविहार 2016पर्यंत असाच चालू राहिला. त्यानंतर मात्र काही कारणांमुळे इथे स्वतंत्र लेखन करण्याचा निर्णय घेतला आणि गुलमोहरात प्रवेश करता झालो. त्याला कारणीभूत ठरलेल्या गोष्टींचा उल्लेख पूर्वी काही लेखांत केला असल्यामुळे आता पुनरुक्ती टाळतो. परंतु, ‘माझी मायबोली’ हा विषयच असा आहे की त्यावर दर दोन-चार वर्षांनी लिहायची हुक्की येते आणि मग लिहिताना जिव्हाळा अगदी ओसंडून वाहतो ! अशा लेखनात होणाऱ्या काहीशा अटळ पुनरुक्तीबद्दल क्षमस्व. अशा तऱ्हेने 2016पासून आजतागायत इथे स्वतंत्र लेखनात छानपैकी रमलेलो आहे आणि ते आनंददायी आहे. आपल्याकडील समृद्ध असा मराठी भाषा विभाग ही तर मायबोलीची शान आहे हे निःसंशय. त्याचबरोबर आपले वार्षिक गणेशोत्सव आणि मभागौदि वैविध्यपूर्ण आणि सुंदर असतातच.

मायबोलीने निव्वळ लेखनवाचनाचे माध्यम अशी मर्यादा न ठेवता अन्य काही उपक्रमही राबवलेले होते व आहेत. त्याची नोंद घेणे आवश्यक. त्यामध्ये पिडीत/वंचित मुलांना इंग्रजी शिकवण्यापासून आपत्तीग्रस्तांच्या पुनर्वसनापर्यंत अनेक समाजोपयोगी कार्यांचा समावेश आहे. त्यात प्रत्यक्ष सहभागी झालो नसलो तरी त्यांत तनमनधन अर्पून काम करणाऱ्या माझ्या अन्य बांधवांप्रति कृतज्ञता व्यक्त करतो. इथल्या विचारपूस आणि संपर्क सुविधांमुळे अनेकांशी व्यक्तिगत जिव्हाळा निर्माण होत असतो आणि माझ्याही बाबतीत तो भरपूर झालाय हे सांगताना आनंद होतो. त्यातून इतरांबरोबर आरोग्यासह अनेक व्यक्तिगत गोष्टींची देवाणघेवाण झाली.

तथाकथित आभासी जगातून बाहेर डोकावून प्रत्यक्ष भेटीगाठी करणे हे देखील आपले एक ठळक वैशिष्ट्य. अनेक वर्षांपासून चालू असलेला वर्षाविहार हा पावसाळी उपक्रम म्हणजे तर मायबोलीची खासियत आहे. पावसाशी माझे सख्य नसल्यामुळे मी त्यात सहभागी होत नाही परंतु माझ्यासारख्यांसाठी अन्य प्रकारचा एक उपक्रम सदैव उपलब्ध असतो आणि तो म्हणजे गटग ! लेखकांबरोबरच इथे लेखनमूक असणाऱ्या शुद्ध वाचकांना भेटण्याची ती एक उत्तम संधी असते. आतापर्यंत काही गटगंना हजर राहून त्यांचा आनंद लुटलेला आहे हेवेसांनल. त्यामध्ये वेमांबरोबर झालेले गतवर्षीचे पुणे-गटग हे विशेष उल्लेखनीय. तसेच गेल्या महिन्यात मुंबईला कामानिमित्त गेलो असताना तिथे आयत्या वेळेस गटगचा धागा काढूनही यशस्वी झालेले एक आटोपशीर आणि लोभस गटग अगदी संस्मरणीय. त्यातून मिळालेल्या आनंदरुपी ‘ऑक्सिजन’ची पातळी अद्यापही कमी झालेली नाही.

तसे पाहता समाजात अनेक समूहांची अनेक प्रकारची संमेलने होत असतात परंतु आपल्या इथल्या गटगची चव काही न्यारीच. त्यात आपण प्रत्यक्ष सहभागी होऊन आनंद तर मिळवतोच पण त्याचबरोबर सहभागी-सदस्य नंतर काही दिवस आकर्षक व चटपटीत वृत्तांत लिहीत असतात. हे आपले आगळेवेगळे वैशिष्ट्यच म्हणावे लागेल. हे वृत्तांत म्हणजे प्रत्यक्ष सहभागी होऊ न शकलेल्या आपल्या मित्रमंडळींना देखील गटगचा आनंद वाटण्याचा एक सुंदर मार्ग आहे.

आपली व्यावहारिक कारकीर्द असो की संसार, एखाद्या संस्थेतील सहभाग असो की मन रिझवण्याचे असे संस्थळ, या सर्वांच्याच बाबतीत वीस वर्षांचा काळ हा एक महत्त्वाचा व सिंहावलोकनी टप्पा असतो. त्या निमित्ताने तुमच्यापुढे थोडा मोकळा झालो इतकेच. वयाने तिशीच्या उंबरठ्यावर असलेल्या आपल्या मायबोलीची अशीच भरभराट होऊन नवनव्या सदस्यांना तिने सतत सामावून घेत राहावे या सदिच्छेसह ही लेखनसीमा.
***********************************************************************************************************

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कुमार सर इतके जुने जाणतेमाबोकर आहेत हे नव्हते माहीत.
छान आढावा लेख.

* लेखकाला जसा आनंद होतो , तसा मायबोलीवरच्या >>> समर्पक प्रतिसाद !
. . .
इथल्या वयाची विशी ओलांडलेले बरेच जण आहेत हे पाहून आनंद वाटला
धन्यवाद !

छान लिहिले आहे. प्रसन्न व सकारात्मक लेख आहे. आढावा आणि प्रवास आवडला. मी फारच नवीन आहे, सक्रिय होऊन साडेतीन-चार वर्षे झालीत. पण स्वतःचीही कुठेतरी पडताळणी केली. भरत यांनी लिहिल्याप्रमाणे तुम्ही हल्ली कमी अलिप्त वाटता यालाही अनुमोदन. मी तर म्हणेन सगळीच अलिप्तता सोडून तुमच्या नर्मविनोदी शैलीतले लेखन येऊ द्या. मायबोली व मायबोलीकरांविषयीचा जिव्हाळा व आपुलकी ह्या लेखातून जाणवते आहे. तुम्हाला लेखनासाठी मनापासून शुभेच्छा. तुमची आणि अजून काही आयडींच्या लेखनातील मराठी भाषा आदर्श वाटते, त्यामुळे माझे मराठी सुधारले आहे. येथे निरीक्षणातूनही खूप शिकता येते, मायबोली ही बिनभिंतीची शाळा आहे.

मी तुमच्या लेखनाची चाहती आहे. Happy /\

'शब्दवेध' आणि 'प्रतिभावंतांच्या तऱ्हा' या धाग्यांवर मी तुमच्याशी संवाद साधण्यासाठी सुद्धा आवर्जून येते. धाग्यावरल्या माहितीपेक्षा 'कनेक्शन' आवश्यक वाटतं. ते अधूनमधून का होईना व्हावं असं वाटतं. वेगवेगळ्या धाग्यांवर वेगवेगळी लोक ठरलेली असतात, अशी 'डायव्हर्सिटी' फार महत्त्वाची वाटते. जी मायबोलीने सहज उपलब्ध करून दिली आहे. त्याबद्दल वेमांचेही आभार.

वेमांची दाद आणि कृतज्ञता आवडली. Happy

प्रसन्न प्रतिसाद !
* मायबोली ही बिनभिंतीची शाळा आहे. >> + 1

* धाग्यावरल्या माहितीपेक्षा 'कनेक्शन' आवश्यक वाटतं >>> अ ग दी च !

* मराठी भाषा >> इथल्या मराठी भाषा विभागात नियमित येणाऱ्या तुमच्यासह सर्वांकडूनच मी देखील बरंच काही शिकलो आहे.

* वेमांचेही आभार. >>> + १००००

छान आठवणी.
मराठी बोलायला, लिहायला, वाचायला आसपास कुणी नसणे, आणि अशाच वेळी नेमकी मायबोली साइट सापडणे - यामागचा आनंद अगदी समजू शकते.

मराठी बो लि वा आसपास कुणी नसणे - ही गोष्ट मी सुद्धा अनेक वर्षं अनुभवली आहे. पण तेव्हा भारतात घरोघरी पीसी आणि इंटरनेट नसल्याने मायबोलीचा शोध मला जरा उशीराच लागला. आणि तेव्हा नेमका मायबोलीचा नवा मेक-अप सुरू होता.

* अशाच वेळी नेमकी मायबोली साइट सापडणे - यामागचा आनंद >>> +१११

. . . नंतर कधी कधी असंही वाटलं की, समजा आपण भारताबाहेर दीर्घकाळासाठी कधीच गेलो नसतो तर आपल्याला अशा संस्थळाचा शोध लागला असता का किंवा गरज भासली असती का ? माहित नाही . . . नक्की सांगता येत नाही ...

( थोडं अवांतर :
मायबोलीच्या शोधानंतर काही महिन्यांनी असाच मनोगत डॉट कॉमचा शोध लागला आणि त्यावरील मराठीतील जालावरच टिचकी मारून सोडवायची गूढकोडी पाहून झालेला आनंद हा देखील अवर्णनीय होता. किंबहुना मराठीतही गूढकोडी असतात, असा शोध त्या निमित्ताने लागला).

डॉक्टर साहेबांचा स्मरणरंजनात्मक आणि त्यांच्या आंतरजालीय लिखाणाचा आढावा घेणारा छान लेख. डॉक्टर मंडळींचे अनुभव विश्व अतिशय समृद्ध आणि विविधतेने नटलेले असते त्यामुळे त्यांचे लिखाण वाचायला नेहमीच आवडते. डॉक्टर कुमारांची वैद्यकीय विषय सर्वसामान्यांना समजेल अशा भाषेत समजावून सांगण्याची हातोटी छान आहे आणि चालू, सद्य वैद्यकीय परिस्थितीवर ते नियमित लेखन करतात त्यामुळे त्यांच्या लिखाणाची नेहमीच उत्सुकतेने वाट बघत असतो.

देशात असताना एखादे मराठी आणि इंग्रजी वृत्तपत्र वाचत असे. देशत्याग केल्यावर आंजावर झाडून सगळे मराठी आणि काही इंग्रजी वृत्तपत्रे वाचायला लागलो. असाच एकदा आंजावर विहार करत असताना माबो चा शोध लागला आणि एखादे नवीन दालन उघडल्यासारखे झाले आणि किती वाचशील दोन अक्षाने अशी अवस्था झाली. बरेच वर्षें वाचनमात्र होतो पुढे धीर करून सभासदत्व घेतले.

मैत्र जुळण्यासाठी दोघांमध्ये काहीतरी समान धागा असावा लागतो असे म्हणतात. आपण ज्या परिसरात लहानाचे मोठे होतो तेथील आजूबाजूचे मित्र मिळतात. पुढे शाळा, कॉलेज, कार्यालय, व्यवसाय इत्यादी क्षेत्रातील मित्र मिळतात परंतु एका विशिष्ट वर्तुळातच तुम्ही सीमित राहता. माबो सारख्या समाज माध्यमामध्ये मात्र जीवनातील सर्व क्षेत्रात असलेल्यांच्या परिचय होऊन मैत्र जुळू शकते. इथे आपापल्या क्षेत्रातील यशस्वी आणि प्रथितयश मंडळी असतात, त्यांचे अनुभव विश्व, त्यांचे ज्ञान आणि दृष्टिकोन तुमच्या पेक्षा अगदी वेगळे असू शकतात. आणि ह्याचा तुमचे अनुभव विश्व समृद्ध होण्यासाठी नक्कीच फायदा होतो.

डॉक्टर कुमारांच्या राजप्रासाद लेखाला माझ्या दोन पैश्यांच्या विटा !

मस्त आढावा आणि सुंदर लेख.
तुमचे लिखाण आवडते याबद्दल वादच नाही.
पण त्यापेक्षाही तुमची एखाद्या गोष्टीबद्दलची विचारप्रक्रिया जास्त आवडते. तुमच्या भेटीनंतर हे प्रकर्षाने जाणवले. त्यातून खूप काही शिकण्यासारखे आहे.
तुम्हाला भेटून तुमच्याबद्दलचा आदर अधिक दुणावला आहे.
त्यातून मिळालेल्या आनंदरुपी ‘ऑक्सिजन’ची पातळी अद्यापही कमी झालेली नाही.>>>>>> अगदी अगदी.

मायबोलीने एक "मायबोली स्नेहसंमेलनाचा" विचार करायला हवा.

धन्यवाद !
. . .
* माबो सारख्या समाज माध्यमामध्ये मात्र जीवनातील सर्व क्षेत्रात असलेल्यांच्या परिचय होऊन मैत्र जुळू शकते. >>> +११
आणि त्याला ग ट गची जोड मिळाल्यास दुधात साखरच.
दिलखुलास प्रतिसाद अर्थात लघु-मनोगत आवडलेच !
* * *
* "मायबोली स्नेहसंमेलनाचा" विचार >>> उत्तम सूचना !
शुभेच्छा. पुन्हा भेटीचा योग यावा
Happy

समजा आपण भारताबाहेर दीर्घकाळासाठी कधीच गेलो नसतो तर आपल्याला अशा संस्थळाचा शोध लागला असता का किंवा गरज भासली असती का ? माहित नाही . . . नक्की सांगता येत नाही ...
>>> लागला असता कदाचित. मला हा शोध लागला तेव्हा मी भारतातच होते. माझा लोकल मित्रपरिवारही मजबूत होता. तरीही इथे रमले. वेगवेगळ्या वयाची, वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारी माणसं सापडली आणि ग्लोबल मित्रपरिवार मिळाला मला. त्यातल्या काहींना मी आजवर भेटले नाहीये. पण तरीही मैत्री आहे. हेच मायबोलीचे वेगळेपण आहे. इथली बहुतांश माणसे चांगलीच निघतात असा निदान माझा आजवरचा अनुभव आहे.

खूपच सुंदर आढावा घेतला आहे डॉ. मलाही तुमचं लिखाण आवडतं.
तुम्ही किती वेगवेगळ्या विषयांवर लिहीता.
दरवेळी प्रतिक्रिया दिली जाते असं होतं नाही, हल्ली माझं येणं थोडं कमी झालंय. पण साधना ने म्हंटलं तसं रोज मायबोलीवर डोकावलं जातंच. आणि अशा प्रकारचे लेख ( मायबोली विषयी चे) जास्त जवळ जीवाच्या. ❤️

पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद !

* लागला असता कदाचित. >>> बरोबर आहे. तुमच्यासारख्याच कोणाच्यातरी संपर्कातून कळण्याची शक्यता राहतेच.

* रोज मायबोलीवर डोकावलं जातंच. >>> खरंय, हेच आपल्या सर्वांचं व्यसन झालंय.
अधून-मधून व्यसनावर ताबा ठेवता येईल पण सुटणार नाही असं दिसतंय Happy

*वीस वर्षाचा मायबोलीसोबतचा प्रवास आढावा मस्तच! 100% सहमत ! अनेकांची - माझी देखील - जीवनसाथीच झाली आहे मायबोली !!

माझ्या वाढदिवसाला तुम्ही कधी गुलाब आणल्याचं आठवतं नाही; नक्की त्या मायबोलीचाच वाढदिवस असणार आज !!!
20190715_131637_0_3.jpg

छान आढावा घेतला आहे कुमार सर 👍

@ ऋन्मेऽऽष
>> "मला बहुधा कल्पना नव्हती तुम्ही इतके जुने जाणते आहात.. " >>
+१०००
मलाही नव्हती... भायखळा गट्ग मध्ये हे आणि माबोची २८ वर्षांपासुन यशस्वी वाटचाल सुरु असल्याचे समजले तेव्हा मला ह्या संस्थळाबद्दल इतक्या उशीरा कसे काय समजले ह्याचे आश्चर्य वाटले होते!

छान आढावा ! माझा प्रवास मनोगत ते माबो! स गळ्यांच्या प्रतिसादासातून माबोवरचे प्रेम व आपुलकी दिसून येते आणि माबो जीवनाचा अविभाज्य झालाय…

@भाऊ नमसकर एकदम झक्कास !
तुमची व्यंगचित्रे गेली अनेक वर्षे पाहतो आहे. ती आवडतातच पण दिवसेंदिवस तुमचा रेषेवरचा ताबा आणि त्यामागचा वाढता आत्मविश्वास दिसून येतो. तुमचं पहिलं व्यंगचित्रं आणि त्यापासूनची नंतरची मायबोलीवरची व्यंगचित्रं हा प्रवास बघायला आणि वाचायला आवडेल. एका व्यंगचित्रकाराचा दुसर्‍याला मनापासून सलाम !

Pages