माझी मायबोली (२००५-२५) : मागे वळून पाहता

Submitted by हेमंतकुमार on 13 February, 2025 - 07:22

होय, तो २००५सालचा जानेवारी किंवा फेब्रुवारी महिनाच होता. परदेशात विनाकुटुंब आलो होतो त्याला जेमतेम अडीच महिने झाले होते. तिथल्या एका राष्ट्रीय रुग्णालयात सल्लागाराचे पद मिळालेले. स्वतंत्र केबिन आणि तिच्यात शिरताच एक प्रशस्त असे टेबल आणि त्यावर ऐटीत बसलेला डेस्कटॉप कम्प्युटर. तेव्हाचे संगणक त्यांच्या लवाजम्यासहित असल्यामुळे बऱ्यापैकी जागा व्यापत. भारतात संगणकाचे गमभन शिकून फक्त वर्षच झालं होतं. लँडलाईन फोनवरून इंटरनेटची जोडणी असला उद्योग मायदेशी करून पाहिलेला होता. अशा यंत्रणेत एक तर तुम्ही फोनतरी चालू ठेवू शकता किंवा इंटरनेट तरी वापरू शकता असा तो काटकसरी संसार थोडा अंगवळणी पडला होता. या उलट त्या रुग्णालयात दिलेल्या स्वतंत्र संगणक, वायफाय इंटरनेटची २४ तास अनिर्बंध सुविधा आणि 24 तासात मन मानेल तेव्हा रुग्णालयातील आपल्या खोलीत येण्याची मुभा या सर्व गोष्टी म्हणजे अगदी स्वर्गसुख होत्या.

परस्परांशी इ-संवाद साधण्यासाठी तेव्हा फक्त इ-मेलचीच सुविधा होती आणि त्याच्यावर तेव्हा देखील अनेक ‘ढकलमेल्स’ असायच्या. त्यातूनच थोडीफार करमणूक व्हायची. अर्थात तो सगळा प्रकार इंग्लिशमध्येच होता. त्यामुळे मराठीतून सोय असलेल्या काहीतरी करमणुकीच्या अगदी शोधात, नव्हे, भुकेला होतो. एकदा सहज बसलो असता शालेय जीवनातील दोन-तीन कविता आठवल्या आणि त्या पुन्हा आपल्यासमोर पूर्णपणे वाचायला मिळाव्यात अशी तीव्र इच्छा झाली. मग शोध घेता घेता ‘आठवणीतील गाणी डॉट कॉम’ चा शोध लागला आणि त्यावर कविता आणि गीतांचा अक्षरशः पाऊस पडलेला दिसला. म्हटलं, चला निदान मराठीतली पद्यमय करमणूक तरी चालू झाली.

कार्यालयीन वेळात रुग्णालयाचे काम तर सतत चालू असायचे. पण अधूनमधून ते बाजूला ठेवून विरंगुळा म्हणून संगणकावर इकडे तिकडे टिचक्या मारायची सवय लागली. असंच एकदा सर्फिंग चालू असताना ‘पांढऱ्यावर काळे’ असा काहीतरी मजकूर दिसला आणि त्यानंतर कसं काय ते काही आठवत नाही, पण अचानक ‘मायबोली डॉट कॉम’ला अलगद जाऊन पडलो ! तेव्हापासून त्याच आनंदात न्हात आहे. असा तो माझा मायबोली प्रवेश, ज्याला आता आपण जुनी मायबोली म्हणतो. तेव्हा त्यात सदस्यनाव रोमन लिपीत लिहावे लागे. सुरुवातीला संस्थळावर नजर टाकता असे दिसले की बरेच लोक तिथे चित्रविचित्र टोपण नावांनी वावरताहेत. मग आपण काय टोपणनाव घ्यावे हे मात्र काही जाम सुचेना. किंबहुना सदस्य होण्याची घाई झालेली होती आणि त्यात टोपणनावावर विचार करत बसायला वेळ दवडावासा वाटला नाही. कुमार हे माझे घरातले नाव म्हणून तेच नाव घ्यावे असे वाटले. पण ते आधीच कोणी घेतलेले असल्याने मिळाले नाही. माझ्या कॉलेज जीवनात दर रविवारच्या विविध भारतीवर एस कुमार यांचा एक प्रायोजित कार्यक्रम लागायचा आणि त्या जाहिरातीमुळे तेव्हा एस कुमार हे नाव प्रसिद्ध होते. मग मनाशी म्हटलं, झालं ठरलं आपलं - ते जसे एस कुमार तसे आपण Hkumar.

मग अशा तऱ्हेने Hkumar ही व्यक्ती मायबोलीकर झाली. हळूहळू मराठी टंकनाचे धडे गिरवू लागलो पण लवकरच लक्षात आले की हे काही येरागबाळ्याचे काम नव्हे ! संगणकावरही अजून पुरता हात बसलेला नव्हता. त्यात डेस्कटॉपचा कीबोर्ड म्हणजे टाईपराईटर बडवल्यागत हातांना व्यायाम असायचा. रुग्णालयाच्या तांत्रिक कामात देखील अजून पुरेसा तरबेज झालेलो नव्हतो. त्यामुळे इथे काही आपण मोठ्या प्रमाणावर मराठी टंकन करू शकणार नाही हे उघड होतं. या तांत्रिक मर्यादेमुळेच एक गोष्ट मनाशी स्पष्ट झाली की गुलमोहर विभागात लिहिणे सध्या तरी आपल्याला शक्य नाही. त्याला अजूनही एक कारण होतं. तेव्हा मी छापील वृत्तपत्रे व मासिकांसाठी लेखन करीत होतो आणि त्याचे मानधन देखील मिळे. त्यासाठीची मुद्रणप्रत हस्तलेखनातच करे आणि त्याचा चांगल्यापैकी सराव होता. किंबहुना एकटाकी ओघवते लेखन करायचे तर त्यासाठी स्वतःचा हात आणि फाउंटन पेन हेच माझ्या दृष्टीने सर्वोत्कृष्ट साधन होते. हे सर्व पाहता मायबोलीवरील हितगुज या विभागापुरतेच स्वतःला मर्यादित ठेवायचे ठरले. सुरुवातीला एक दोन शब्द किंवा फारतर एखाद्या वाक्याचा प्रतिसाद देऊन थांबायचो तरी वाटायचे - हां, जमले भाऊ आपल्याला मराठी टंकन !

महिनाभरात या मूलभूत गोष्टीत गती आली आणि मग फारसे लेखनश्रम पडणार नाहीत अशा पद्धतीचे काही धागे काढले. त्यात अमुकतमुक गोष्टीच्या चौकशीपासून रेडिओच्या आठवणीपर्यंत, अशा विषयांचा समावेश होता. एकदा असेच पाहता पाहता ‘आवडलेल्या वाक्यांचा’ धागा दिसला आणि अगदी युरेकासम आनंद झाला. माझ्या हस्तलिखित दैनंदिनीत अनेक आवडत्या वाक्यांचा संग्रह केलेला होता. मग काय, दिवसाला एक वाक्य असा रतीब एकदोन महिने तरी चालू होता.

तेव्हा आठवड्यातून दोन दिवस कार्यालयीन साप्ताहिक सुट्टी होती. परंतु घरी एकटाच असल्यामुळे दोन पूर्ण दिवस सुट्टीचे काय करायचे असा पेच पडायचा. त्यापैकी एका दिवशी इच्छा नसताना घरापासून दूरवर असलेल्या मॉलमध्ये जाई आणि काहीतरी थातूरमातूर खरेदी करून येई. पण मुळात त्या प्रकाराचे अजिबात आकर्षण नव्हते. म्हणून मग सुट्टीचा दुसरा दिवस हा सरळ रुग्णालयात जाऊन धडकायचं आणि तीन-चार तास खुशाल संगणकासमोर ठिय्या देऊन बसे. सुट्टीच्या दिवशी कार्यालयीन काम नसल्यामुळे मग एकतर कुणाला तरी मेल करत बसायचं आणि मग मायबोलीवर मनसोक्त बागडत राहायचं. एकंदरीत धमाल येत होती आणि एकटेपणा घालवण्याचा एक उत्तम मार्गही सापडला होता.

प्रसिद्धीपूर्व कोणत्याही संपादनाविना असलेली स्वप्रकाशनाची सोय, चर्चा विषयांची विविधता, दिलखुलास गप्पा, टोपणनावाने लिहायचे स्वातंत्र्य आणि बऱ्यापैकी खेळीमेळीचे वातावरण या वैशिष्ट्यांमुळे हे संस्थळ आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनून गेले. (अर्थात अनिर्बंध लेखनाची सोय लेखकाला बहुप्रसव बनवते. मात्र कालांतराने त्याच्यावर संयमाने विजय मिळवणे हे लेखकाच्या हिताचे असते). तिथे अंदाजे एक दीड वर्ष बागडल्यानंतर आपल्या संस्थळाने कात टाकली आणि नव्या मायबोलीचा जन्म झाला. आता आपले नाव देखील देवनागरीत लिहायची मूलभूत सोय झाली होती. मग मागच्या नावातील पहिल्या अक्षराला उडवून टाकले आणि कुमारच्या पुढे १ हा अंक लावून स्वतःचे नवे बारसे केले.

नव्या मायबोलीचे एकंदरीत रूप आता आकर्षक होते. काही नवीन सुविधा देखील दिल्या गेल्या होत्या. तरी पण काही काळ जुन्यानव्याची तुलना होतच राहते. जुन्या रचनेत सर्व विभाग मुखपृष्ठावर दिसत आणि आपल्याला हव्या त्याच विभागात जायची थेट सोय असायची. याला बुजुर्ग मंडळी ‘ट्री-व्ह्यू’ असं काहीतरी म्हणायची. तशी सोय नव्यात का नाही, यावर १-२ वर्षे तरी चर्चा झालेल्या आठवतात. अर्थात कालांतराने प्रशासकांनी विषयांच्या प्रकारानुसार ग्रुपची सोय दिली हे चांगले झाले. त्यामुळे स्वतःला गरज वाटत नसताना संपूर्ण लेखन बघत राहण्याचे बंधन राहत नाही.

नव्या मायबोलीतील हितगुजविहार 2016पर्यंत असाच चालू राहिला. त्यानंतर मात्र काही कारणांमुळे इथे स्वतंत्र लेखन करण्याचा निर्णय घेतला आणि गुलमोहरात प्रवेश करता झालो. त्याला कारणीभूत ठरलेल्या गोष्टींचा उल्लेख पूर्वी काही लेखांत केला असल्यामुळे आता पुनरुक्ती टाळतो. परंतु, ‘माझी मायबोली’ हा विषयच असा आहे की त्यावर दर दोन-चार वर्षांनी लिहायची हुक्की येते आणि मग लिहिताना जिव्हाळा अगदी ओसंडून वाहतो ! अशा लेखनात होणाऱ्या काहीशा अटळ पुनरुक्तीबद्दल क्षमस्व. अशा तऱ्हेने 2016पासून आजतागायत इथे स्वतंत्र लेखनात छानपैकी रमलेलो आहे आणि ते आनंददायी आहे. आपल्याकडील समृद्ध असा मराठी भाषा विभाग ही तर मायबोलीची शान आहे हे निःसंशय. त्याचबरोबर आपले वार्षिक गणेशोत्सव आणि मभागौदि वैविध्यपूर्ण आणि सुंदर असतातच.

मायबोलीने निव्वळ लेखनवाचनाचे माध्यम अशी मर्यादा न ठेवता अन्य काही उपक्रमही राबवलेले होते व आहेत. त्याची नोंद घेणे आवश्यक. त्यामध्ये पिडीत/वंचित मुलांना इंग्रजी शिकवण्यापासून आपत्तीग्रस्तांच्या पुनर्वसनापर्यंत अनेक समाजोपयोगी कार्यांचा समावेश आहे. त्यात प्रत्यक्ष सहभागी झालो नसलो तरी त्यांत तनमनधन अर्पून काम करणाऱ्या माझ्या अन्य बांधवांप्रति कृतज्ञता व्यक्त करतो. इथल्या विचारपूस आणि संपर्क सुविधांमुळे अनेकांशी व्यक्तिगत जिव्हाळा निर्माण होत असतो आणि माझ्याही बाबतीत तो भरपूर झालाय हे सांगताना आनंद होतो. त्यातून इतरांबरोबर आरोग्यासह अनेक व्यक्तिगत गोष्टींची देवाणघेवाण झाली.

तथाकथित आभासी जगातून बाहेर डोकावून प्रत्यक्ष भेटीगाठी करणे हे देखील आपले एक ठळक वैशिष्ट्य. अनेक वर्षांपासून चालू असलेला वर्षाविहार हा पावसाळी उपक्रम म्हणजे तर मायबोलीची खासियत आहे. पावसाशी माझे सख्य नसल्यामुळे मी त्यात सहभागी होत नाही परंतु माझ्यासारख्यांसाठी अन्य प्रकारचा एक उपक्रम सदैव उपलब्ध असतो आणि तो म्हणजे गटग ! लेखकांबरोबरच इथे लेखनमूक असणाऱ्या शुद्ध वाचकांना भेटण्याची ती एक उत्तम संधी असते. आतापर्यंत काही गटगंना हजर राहून त्यांचा आनंद लुटलेला आहे हेवेसांनल. त्यामध्ये वेमांबरोबर झालेले गतवर्षीचे पुणे-गटग हे विशेष उल्लेखनीय. तसेच गेल्या महिन्यात मुंबईला कामानिमित्त गेलो असताना तिथे आयत्या वेळेस गटगचा धागा काढूनही यशस्वी झालेले एक आटोपशीर आणि लोभस गटग अगदी संस्मरणीय. त्यातून मिळालेल्या आनंदरुपी ‘ऑक्सिजन’ची पातळी अद्यापही कमी झालेली नाही.

तसे पाहता समाजात अनेक समूहांची अनेक प्रकारची संमेलने होत असतात परंतु आपल्या इथल्या गटगची चव काही न्यारीच. त्यात आपण प्रत्यक्ष सहभागी होऊन आनंद तर मिळवतोच पण त्याचबरोबर सहभागी-सदस्य नंतर काही दिवस आकर्षक व चटपटीत वृत्तांत लिहीत असतात. हे आपले आगळेवेगळे वैशिष्ट्यच म्हणावे लागेल. हे वृत्तांत म्हणजे प्रत्यक्ष सहभागी होऊ न शकलेल्या आपल्या मित्रमंडळींना देखील गटगचा आनंद वाटण्याचा एक सुंदर मार्ग आहे.

आपली व्यावहारिक कारकीर्द असो की संसार, एखाद्या संस्थेतील सहभाग असो की मन रिझवण्याचे असे संस्थळ, या सर्वांच्याच बाबतीत वीस वर्षांचा काळ हा एक महत्त्वाचा व सिंहावलोकनी टप्पा असतो. त्या निमित्ताने तुमच्यापुढे थोडा मोकळा झालो इतकेच. वयाने तिशीच्या उंबरठ्यावर असलेल्या आपल्या मायबोलीची अशीच भरभराट होऊन नवनव्या सदस्यांना तिने सतत सामावून घेत राहावे या सदिच्छेसह ही लेखनसीमा.
***********************************************************************************************************

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप सुंदर आठवणी आणि लिखाण.
आपले लेखन म्हणजे माहितीचा अमूल्य ठेवा आहे.
डोळे झाकून विश्वास ठेवावा अशी बरोब्बर आणि मुद्देसूद माहिती असते त्यामुळे confusion अजिबात रहात नाही.
मी वाट पाहते नेहमीच आपल्या लिखाणाची!
लिहीत रहा
आणि गटग ला भेटूया

किल्ली,
धन्यवाद ! मलाही तुम्हाला भेटण्याची उत्सुकता आहेच; लवकरच योग यावा Happy

छान लिहिले आहे.. मला बहुधा कल्पना नव्हती तुम्ही इतके जुने जाणते आहात.. जितके माझे वय नाही तितके तुमचा मायबोलीचा प्रवास आहे Happy

छान लिहिले आहे. तुम्ही मायबोली बदलताना पाहिलीत. तुमच्यातही त्यासोबत बदल घडत गेला का? आधी तुम्ही बरेच अलिप्त होता. आता नाही; असे माझे निरीक्षण आहे.

अर्थात हे चांगलेच आहे.

सर्वांना धन्यवाद !
* * *
* १. जितके माझे वय नाही तितके तुमचा मायबोलीचा >>> वा ! हे भारीच म्हणायचे. तुमचे वय दरवर्षी कमी करण्याची काही जादू आहे वाटतं Happy
. .
* २. आधी तुम्ही बरेच अलिप्त >>> असेनही कदाचित.
तुमच्या निरीक्षणाची दखल घेतो. मला वाटतं की जोपर्यंत आपण स्वतंत्र लेखन करत नाही तोपर्यंत कदाचित ती अलिप्तता असावी.
अर्थात लेखक काय व कसा आहे याबद्दल वाचकाचे मत महत्त्वाचे !

छान आढावा कुमार सर...तुमचे लेख वाचनीय असतात..लिहित रहा प्रत्येक वेळी प्रतिक्रिया दिली जात नाही..पण वाचत असते..
मला सदस्यत्व घेऊन 15 वर्ष झाली हे या निमित्ताने बघितले Happy

वा! छान आढावा. तुम्ही इतके जुने सदस्य आहात माबोवर हे कधी लक्षात नव्हतं आलं. कोणीतरी ट्री-व्ह्यू बद्दल बोलतंय हे बघून मस्त वाटलं हे मात्र खरं Happy
तुम्हाला भेटायचे आहेच. यावेळी जमले नाही. पुढच्या ट्रिपमधे नक्की प्रयत्न करेन भेटायचा.

सर्वांना धन्यवाद !
आपणा सर्वांना कधी ना कधी भेटायला मलाही नक्कीच आवडेल !
पाहूया . . .
. . .
* ट्री-व्ह्यू बद्दल >>> त्या रचनेमध्ये ठळकपणे दिसणारे 'समाज व संस्कृती' हे सदर प्रथमदर्शनीच माझ्या नजरेत भरल्याचे आठवते Happy

मस्त लेख व आठवणी.

मीही ती जुनी मायबोली व ट्री व्यु खुप मिस केला होता, खुप जणांनी मिस केला व बोलुनही दाखवले होते. नंतर एका वविला पुनमने हे असे का ते व्हवस्थित समजावले होते. असो, बदल ही एकमेव स्थिर गोष्ट आहे.

मला १९ वर्षे झाली माबोवर हे ह्या निमित्ते कळले Happy इतर साईट्स आहेत पण माबोच रोज पाहिली जाते.

सुंदर आठवणी आणि लेख.
ट्री व्यु खुप मिस केला होता, खुप जणांनी मिस केला व बोलुनही दाखवले होते. नंतर एका वविला पुनमने हे असे का ते व्हवस्थित समजावले होते. >>>>हे ट्री व्यू काय आणि काय समजावले होते , सांगण्यासारखे असेल तर इथेही लिहाल का. उत्सुकता आहे म्हणून विचारतेय.

जुन्या हितगुजवर क्लिक करुन पाहा.

ट्री व्यु मध्ये विषयाचे नाव मुख्यपृष्ठावर दिसत होते. जसे गुलमोहर. त्यावर क्लिक केले की कथा कविता कादंबरी ललित वगैरे वगैरे दिसायचे. त्यापेकी जे हवे त्यावर क्लिक करा की त्यातले सब हेड दिसणार.

आता सगळेच दिसते. नको असलेलेही दिसते. लोक ओरडायला लागले तसे ग्रूप केले. ग्रुपचे सभासदत्व घेतले तरच ग्रुपमध्ये लिहिलेले दिसणार असे केले.

सॉफ्टवेअर संबंधीत तिने सांगितले होते. माबो नव्या रुपात नव्या प्लॅटफॉर्मवर आल्यावर जुना फॉर्मॅट कितीही प्रिय असला तरी तसाच ठेवणे शक्य नव्हते. नव्या साईट्स सगळ्या सुरवातीपासुन नव्या रुपातच बनत होत्या. माबो सगळ्यांचीच बाप असल्यामुळे कात टाकत टाकत पुढे गेली.

हे असे दिसायचे

IMG_0915.jpeg

तांत्रिक चर्चा आवडली.
केया १५ वर्षे, साधना १९ वर्षे >>>> अरे वा ! २० पूर्ण झाली की तुम्ही पण आठवणी लिहा Happy

* बदल ही एकमेव स्थिर गोष्ट आहे. >>> + ११

धन्यवाद.
पाहिलं जुनं हितगुज .ट्री व्यू आणि लोकं सोडली तर काही वेगळी नाहीये.फक्त आत आत जावं लागतं त्यामानाने आताची माबो फार सुटसुटीत आणि सोपी आहे.

छान मनोगत...
मी 2017 पासून मायबोलीवर लिहिता झालो. एखाद्या नेणतं बाळ रांगू लागतं अथवा चालायला पाऊल उचलतं, तेव्हा जसं सगळे त्याचं कौतुक करतात तसं झालं अन् लिहीत गेलो. किती बरोबर किती चूक सारं मायबोली अर्पण.
जुणे, नवे दिग्गज कवी, लेखक वाचताना हरखून जातो.
अगदी सुरुवातीला गटग हा गटांगळ्या चा टायपो वाटायचा. सगळे कुठंतरी जातात आणि गटग करतात म्हणजे नेमकं काय करतात. विचारात पडायचो. डोळ्यांच्या भुवया ऊंचवायचो, हाताची मुठ गालावर टेकून बसायचो. Happy अशी बरीच अज्ञानाची जळमटं नंतर झडली. वाहते पान, पाण्यात पान सोडून पाहिले. कळफलक कळलाव्या फलक असावा असा समज होता म्हणजे वादंग माजवणारे प्रतिसाद वाचून तसे वाटायचे...असो सद्या तरी जेवढं पाजळलं तेवढं पुरे.

.

* .आताच चेकलं 20 वर्ष आणि 2 महिने >>> वा ! छानच. विशी ओलांडली की . . .

* गटग हा गटांगळ्याचा टायपो >>> हे एकदम भारी ! Happy
तसेही हा शब्द माबो परिवाराबाहेर बोलून उपयोग नसतो. इतरांना 'कट्टा' सांगितलेले बरे पडते.

>>>>नंतर काय बिघाड झाला समजुतीत?>>>> आधी बिघडलेलं नंतर घडलं बेफी....पण सुरवातीला मायबोलीचे असे शब्द खूप मनोरंजक वाटले. हे मायबोलीवरच घडू शकतं हे पटलं नंतर.

मस्त आढावा आणि सुंदर लेख.
एखाद्या लेखावर प्रतिसाद आल्यावर , लेखकाला जसा आनंद होतो , तसा मायबोलीवरच्या प्रवासाबद्दलचा लेख वाचून होतो Happy

Pages