हस्ताक्षराचा ऱ्हास - एक Pen-demic

Submitted by चामुंडराय on 25 January, 2025 - 17:41

नुकत्याच पार पडलेल्या जागतिक हस्ताक्षर दिनाच्या निमित्ताने ...
तुम्ही स्वतःच्या हस्ताक्षरात लिखाण करता का? पेन, पेन्सिल वापरून कागदावर लिहिता का? एखादे पत्र लिहून पाठवता का? खरीखुरी रोजनिशी लिहिता का?

आजकालच्या डिजिटल युगात ह्या प्रश्नांची उत्तरे बहुतांश 'नाही' अशीच असतील. पेन वापरून कागदावर लिहिण्याचे प्रमाण खूप कमी झाले आहे. फार तर थोडे scribbling करत असाल. एव्हढेच नव्हे तर बऱ्याच ठिकाणी स्वाक्षरीची देखील गरज उरलेली नाही. PIN आणि OTP किंवा कॉन्टॅक्टलेस पद्धत वापरून सर्वत्र व्यवहार होत असताना धनादेशांवर स्वाक्षरी करण्याची वेळ फारशी येत नसेल. पूर्वी शाळेत हस्ताक्षर चांगले होण्यासाठी गिरवून आणि घोटवून घेत असत. त्याकरिता खास तक्ते होते आणि अक्षरांचे खाचे पाडलेली सुलेखन पाटी देखील मिळत असे. Fine motor skills development साठी बोटात पेन्सिल धरून लिहिणे, चित्र काढणे, कात्रीने कागद कापणे, कपड्यांच्या घड्या घालणे, शर्टची बटणे लावणे, बुटाची लेस बांधणे ह्या क्रियांपैकी कागदावर लिहिण्याच्या क्रियेचा पहिला आणि मोठा वाटा असतो. लिहिण्यासाठी अंगठा आणि पहिल्या बोटामध्ये पेन्सिल / पेन धरून त्याला मधल्या बोटाने आधार दिला कि लिहिण्यासाठी लागणाऱ्या पेन्सिल ग्रीपची सिद्धता होते. बोटांमधील स्नायू, हाताचे स्नायू, डोळे आणि मेंदू ह्यांच्या समन्वयातून हा Fine motor skills चा विकास होत असतो. सुंदर आणि सुवाच्य हस्ताक्षराला प्रोत्साहन देण्यासाठी शाळेत पूर्वी लिखाण स्पर्धा होत असत. "चांगले हस्ताक्षर म्हणजे निर्मळ मनाचा आरसा असतो" असे आणि अनेक वेगवेगळे सुविचार सुवाच्य अक्षरात शाळेतील फळ्यावर लिहीत. कित्येकदा एखाद्या चुकीबद्दल किंवा व्रात्यपणा केल्याबद्दल पुस्तकातील पाने लिहून काढण्याची शिक्षा होत असे. हि शिक्षा अर्थातच blessing in disguise म्हणायला हवी कारण हस्ताक्षर सुधारण्याच्याबरोबरीने Fine motor skill development ला देखील मदत होत असे. सध्याच्या डिजिटल जमान्यात अशा स्पर्धा आणि शिक्षा कालबाह्य झाल्या असतील.

हे सगळं आता आठवायचे कारण म्हणजे नुकतेच झालेले अमेरिकेतील सत्तांतर! जुन्या, सत्तेवरून पायउतार होणाऱ्या राष्ट्राध्यक्ष्याने नवीन, सत्ता पादाक्रांत करणाऱ्या अध्यक्षासाठी हस्तलिखित पत्र टेबलावर ठेवून जाण्याची तेथे प्रथा आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमध्ये शपथविधी दिवसाचा हा एक खास प्रघात आहे. ह्यातील गमतीचा भाग असा कि ट्रम्प तात्यांनी चार वर्षांपूर्वी बायडेन आजोबांना लिहिलेल्या पत्राला बायडेन यांनी आता उत्तर दिले असेल. सामान्यतः ह्या हस्तलिखित पत्रांमध्ये मध्ये निवडणुकीच्या यशापयशाच्या पार्श्वभूमीवर थोडाफार सल्ला, थोडेसे विनोद, आणि सत्तांतर विरोधी पक्षाला होत असेल तर मानभावीपणाचे प्रतिबिंब असते.

तर, मला सांगा, तुम्ही शेवटचं पत्र (e -मेल नाही) कधी लिहिलं होतं ? बराच काळ झाला असेल, नाही का? आपण आज डिजिटल जगात वावरतो. स्क्रीनचे वेगवेगळे प्रकार आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झाले आहेत. एखाद्या मित्राची आठवण येत असेल तर काय करता? त्याला SMS पाठवता. ऑफिसमधील कामाबाबत अपडेट द्यायचं आहे? सहकाऱ्यांना e -मेल किंवा टेक्स्ट पाठवता. किराणा सामानाची यादी करायची आहे? नोट्स अॅपवर टाईप करता किंवा अलेक्सा, सिरी, गुगलला सांगता, बरोबर? आज आपण असेच जगतो आहोत. आपल्या फोन, डिजिटल डीव्हायसेस् आणि संगणकांनी आपली लिखाणाची पद्धत बदलून टाकली आहे, किंबहुना त्यामुळेच पेनाने कागदावर लिहिण्याची खरंच गरज आहे का? हा प्रश्न उभा राहिला आहे. लिहिलेले वाचून दाखवणारे आणि बोललेले स्क्रिन वर टाईप करणारे सॉफ्टवेअर्स आणि अँप्स आता उपलब्ध आहेत, त्यामुळे कळफलक बडवण्याची देखील आवश्यकता उरलेली नाही. तुम्ही केवळ विचार करा आणि त्या विचारातील अक्षरे स्क्रीनवर उमटतील असे तंत्रज्ञान भविष्यात येऊ घातले आहे.

हस्तलिखित लिखाण कमी होत आहे आणि दुर्दैवाने त्याचे महत्व देखील कमी होत आहे. धुळपाटीवर अक्षरे गिरवण्यापासून झालेली सुरवात पुढे पाटी-पेन्सिल, दौत-टाक, बोरू, शाईचे फाऊंटन पेन, बॉल-पॉईंट पेन, फेल्ट टीप पेन, स्टायलस् पेन इत्यादी पर्यंत येऊन पोहोचली आहे. कार्यालयीन कामकाजात टंकलेखन यंत्र वापरणे सुरु झाल्यावर हस्तलिखित लिखाणापासून दूर जाणे सुरु झाले आणि आता तर सर्वत्र संगणकाचा, भ्रमणध्वनीचा कळफलक वापरून लिखाण केले जात आहे, हा काळाचा महिमा म्हणावा लागेल. काही सुलेखनकारांनी हाताने लिहिण्याची कला (Calligraphy) अजूनही जोपासली आहे हे खरे परंतु नवनवीन आणि वेगवेगळे अक्षर "फॉन्टस्" उपलब्ध होत असलेल्या सद्य काळात सुलेखनाला देखील ग्रहण लागायची दाट शक्यता आहे.

प्रगत देशांमध्ये हस्तलिखित लिखाण शाळांमधून हळूहळू गायब होत आहे. शिक्षकांच्या दृष्टिकोनातून त्याला आता फारसे महत्व उरलेले नाही. हाताने लिहिण्याचा सराव नसल्याने एक तृतीयांश विद्यार्थ्यांना स्पष्ट आणि वाचनक्षम लिखाण करता येत नाही. अमेरिकेत आता विद्यार्थ्यांना कर्सिव्ह लिहिण्याची आवश्यकता उरलेली नाही. युरोप मधील देशांतील शाळांमधून कर्सिव्ह काढून टाकले आहे. भारतातील अनेक राज्यांमध्येही कर्सिव्ह हटवले जाते आहे. त्यामुळे लवकरच मुलं कर्सिव्हला एक प्राचीन, परकीय भाषा समजतील अशी दाट शक्यता आहे. मराठीचे कर्सिव्ह “मोडी” लिपी हटवून तर दशके उलटली आहेत. मराठी माणसाला मोडी लिहिता वाचता येत नाही. परंतु हस्तलेखन हा केवळ शाळेतील विद्यार्थ्यांचाच प्रश्न आहे असे नाही तर तो प्रौढांना देखील लागू आहे. एक त्रितीयांश प्रौढ हाताने काहीही लिहीत नाहीत तर तीन पैकी दोनजणांना दुसऱ्यांचं हस्तलिखित वाचण्यात अडचण येते.

हस्तलिखित लिखाणाच्या ऱ्हासामुळे होणारे दुष्परिणाम केवळ वैयक्तिक पातळीवर आहेत असे नाही तर त्याचे सामाजिक, शैक्षणिक आणि मानसिक परिणाम देखील आहेत. वैज्ञानिकांनी ह्या skill atrophy बद्दल धोक्याचा इशारा दिला आहे. त्यांनी लिखाणाबाबत एक अभ्यास केला. त्यांनी मुलांना हस्तलिखित पद्धतीने लिहून आणि कीबोर्डवर टाईप करून अशा दोन प्रकारे अक्षरं शिकवली. नंतर या मुलांना एमआरआय स्कॅनिंग करून तपासले. जी मुलं हस्तलिखित पद्धतीने शिकली त्यांचा लिखाणाच्या प्रक्रियेमध्ये जास्त सहभाग होता. डोळे, बोटे आणि हात ह्यांच्या हालचालींचा समन्वय असल्याने मेंदू जास्त सक्रिय होता, माहिती सखोल साठवली गेली आणि मेंदू मध्ये प्रखर दृश्यमानता दिसून आली. याउलट टायपिंग करून शिकलेल्या मुलांमध्ये मेंदूच्या सक्रियतेचा स्तर तुलनेने खूपच कमी होता. हा मुळात लिखाणाच्या क्रियेमध्ये active participation किंवा passive participation असण्याचा फरक आहे. हस्तलिखित लिखाणामुळे शिकण्याची क्षमता सुधारते, स्मरणशक्ती, सर्जनशीलता, स्व-अभिव्यक्ती वाढते, ज्ञान-वृद्धी होते, भाषा-प्रभुत्वात वाढ होऊन संज्ञानात्मक कौशल्यांमध्ये (cognitive skills) वाढ होते, संवादातील वैयक्तिक आणि भावनिक संबंध वाढतात असे अनेक फायदे दिसून आले आहेत.

हस्ताक्षराचे विश्लेषण करून लिहिणाऱ्याच्या व्यक्तिमत्त्वाचे गुणधर्म निश्चित करण्याचे ग्राफोलॉजी (Graphology) नावाचे एक शास्त्र आहे. परंतु त्याला वैज्ञानिक मान्यता नाही. ग्राफोलॉजीच्या पद्धतींना आणि काढलेल्या निष्कर्षांना विज्ञान मान्यता देत नाही त्यामुळे ते एक छद्म विज्ञान मानले जाते. ग्राफोलॉजीचे अभ्यासक लिखाणाच्या वळणदार, सुवाच्य, छोटे, मोठे, किरटे, स्वच्छ, टापटीप, दुर्बोध, वाचण्यास कठीण (कुत्र्याचे पाय मांजरीला) अशा वेगवेगळ्या प्रकारावरून लेखकाची स्वभाव वैशिष्ट्ये कळतात असा दावा करतात. डॉक्टरांनी दुर्बोध अक्षरात लिहिलेले औषधाचे प्रिस्क्रिप्शन फक्त केमिस्टलाच वाचता येते असा एक प्रवाद आहे. तसे असेल तर ग्राफोलॉजी प्रमाणे सर्व डॉक्टरांना एकाच तराजूत तोलावे लागेल !

हस्तलिखित लिखाण न करणे म्हणजे केवळ वैयक्तिक कौशल्याचा ऱ्हास नव्हे तर आपले व्यक्तिमत्व, आपल्या माणूसपणाचा काही भाग हरवण्यासारखे आहे. हस्तलिखित पत्रातून आपल्याला आपले विचार, भावना जास्त सक्षमपणे व्यक्त करता येतात. कित्येक पत्रे “मर्मबंधातली ठेव” असल्यासारखी जपून ठेवली जातात. इतिहास काळात लिहिलेली पत्रे इतिहासकारांना इतिहासात डोकावण्यास मदत करतात. पत्राच्या संदर्भात चित्रपटांमध्ये अनेक गाणी लिहिली गेली आहेत. SMS आणि सोशल मीडिया नव्हते त्याकाळी कित्येक प्रेमी युगुलांना संपर्कासाठी "प्रेमपत्राचा" आधार असायचा.

हस्तलिखित लिखाण हरवणे, कमी होणे हे सद्य काळात अपरिहार्य आहे. "दिसामाजी काहीतरी लिहावे, प्रसंगी अखंडित वाचीत जावे" असे समर्थ रामदासांनी म्हटल्याप्रमाणे दर दिवशी काही ओळी हाताने कागदावर लिहिण्याचा संकल्प करू यात.

हाताने लिहिण्याची कला लोप पावत आहे ह्या बद्दलचा हा लेख मी हस्ताक्षरात न लिहिता बोटाक्षरात, थम्बाक्षरात किंवा कळफलकाक्षरात (कीबोर्डाक्षरात) लिहिला आहे, हा मोठा विरोधाभास आहे, नाही का?

टीप : शीर्षकातील पन् श्रेय -
Collins Dictionary
Submitted By: Unknown - 14/02/2021
Status: This word is being monitored for evidence of usage.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Pages