नुकत्याच पार पडलेल्या जागतिक हस्ताक्षर दिनाच्या निमित्ताने ...
तुम्ही स्वतःच्या हस्ताक्षरात लिखाण करता का? पेन, पेन्सिल वापरून कागदावर लिहिता का? एखादे पत्र लिहून पाठवता का? खरीखुरी रोजनिशी लिहिता का?
आजकालच्या डिजिटल युगात ह्या प्रश्नांची उत्तरे बहुतांश 'नाही' अशीच असतील. पेन वापरून कागदावर लिहिण्याचे प्रमाण खूप कमी झाले आहे. फार तर थोडे scribbling करत असाल. एव्हढेच नव्हे तर बऱ्याच ठिकाणी स्वाक्षरीची देखील गरज उरलेली नाही. PIN आणि OTP किंवा कॉन्टॅक्टलेस पद्धत वापरून सर्वत्र व्यवहार होत असताना धनादेशांवर स्वाक्षरी करण्याची वेळ फारशी येत नसेल. पूर्वी शाळेत हस्ताक्षर चांगले होण्यासाठी गिरवून आणि घोटवून घेत असत. त्याकरिता खास तक्ते होते आणि अक्षरांचे खाचे पाडलेली सुलेखन पाटी देखील मिळत असे. Fine motor skills development साठी बोटात पेन्सिल धरून लिहिणे, चित्र काढणे, कात्रीने कागद कापणे, कपड्यांच्या घड्या घालणे, शर्टची बटणे लावणे, बुटाची लेस बांधणे ह्या क्रियांपैकी कागदावर लिहिण्याच्या क्रियेचा पहिला आणि मोठा वाटा असतो. लिहिण्यासाठी अंगठा आणि पहिल्या बोटामध्ये पेन्सिल / पेन धरून त्याला मधल्या बोटाने आधार दिला कि लिहिण्यासाठी लागणाऱ्या पेन्सिल ग्रीपची सिद्धता होते. बोटांमधील स्नायू, हाताचे स्नायू, डोळे आणि मेंदू ह्यांच्या समन्वयातून हा Fine motor skills चा विकास होत असतो. सुंदर आणि सुवाच्य हस्ताक्षराला प्रोत्साहन देण्यासाठी शाळेत पूर्वी लिखाण स्पर्धा होत असत. "चांगले हस्ताक्षर म्हणजे निर्मळ मनाचा आरसा असतो" असे आणि अनेक वेगवेगळे सुविचार सुवाच्य अक्षरात शाळेतील फळ्यावर लिहीत. कित्येकदा एखाद्या चुकीबद्दल किंवा व्रात्यपणा केल्याबद्दल पुस्तकातील पाने लिहून काढण्याची शिक्षा होत असे. हि शिक्षा अर्थातच blessing in disguise म्हणायला हवी कारण हस्ताक्षर सुधारण्याच्याबरोबरीने Fine motor skill development ला देखील मदत होत असे. सध्याच्या डिजिटल जमान्यात अशा स्पर्धा आणि शिक्षा कालबाह्य झाल्या असतील.
हे सगळं आता आठवायचे कारण म्हणजे नुकतेच झालेले अमेरिकेतील सत्तांतर! जुन्या, सत्तेवरून पायउतार होणाऱ्या राष्ट्राध्यक्ष्याने नवीन, सत्ता पादाक्रांत करणाऱ्या अध्यक्षासाठी हस्तलिखित पत्र टेबलावर ठेवून जाण्याची तेथे प्रथा आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमध्ये शपथविधी दिवसाचा हा एक खास प्रघात आहे. ह्यातील गमतीचा भाग असा कि ट्रम्प तात्यांनी चार वर्षांपूर्वी बायडेन आजोबांना लिहिलेल्या पत्राला बायडेन यांनी आता उत्तर दिले असेल. सामान्यतः ह्या हस्तलिखित पत्रांमध्ये मध्ये निवडणुकीच्या यशापयशाच्या पार्श्वभूमीवर थोडाफार सल्ला, थोडेसे विनोद, आणि सत्तांतर विरोधी पक्षाला होत असेल तर मानभावीपणाचे प्रतिबिंब असते.
तर, मला सांगा, तुम्ही शेवटचं पत्र (e -मेल नाही) कधी लिहिलं होतं ? बराच काळ झाला असेल, नाही का? आपण आज डिजिटल जगात वावरतो. स्क्रीनचे वेगवेगळे प्रकार आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झाले आहेत. एखाद्या मित्राची आठवण येत असेल तर काय करता? त्याला SMS पाठवता. ऑफिसमधील कामाबाबत अपडेट द्यायचं आहे? सहकाऱ्यांना e -मेल किंवा टेक्स्ट पाठवता. किराणा सामानाची यादी करायची आहे? नोट्स अॅपवर टाईप करता किंवा अलेक्सा, सिरी, गुगलला सांगता, बरोबर? आज आपण असेच जगतो आहोत. आपल्या फोन, डिजिटल डीव्हायसेस् आणि संगणकांनी आपली लिखाणाची पद्धत बदलून टाकली आहे, किंबहुना त्यामुळेच पेनाने कागदावर लिहिण्याची खरंच गरज आहे का? हा प्रश्न उभा राहिला आहे. लिहिलेले वाचून दाखवणारे आणि बोललेले स्क्रिन वर टाईप करणारे सॉफ्टवेअर्स आणि अँप्स आता उपलब्ध आहेत, त्यामुळे कळफलक बडवण्याची देखील आवश्यकता उरलेली नाही. तुम्ही केवळ विचार करा आणि त्या विचारातील अक्षरे स्क्रीनवर उमटतील असे तंत्रज्ञान भविष्यात येऊ घातले आहे.
हस्तलिखित लिखाण कमी होत आहे आणि दुर्दैवाने त्याचे महत्व देखील कमी होत आहे. धुळपाटीवर अक्षरे गिरवण्यापासून झालेली सुरवात पुढे पाटी-पेन्सिल, दौत-टाक, बोरू, शाईचे फाऊंटन पेन, बॉल-पॉईंट पेन, फेल्ट टीप पेन, स्टायलस् पेन इत्यादी पर्यंत येऊन पोहोचली आहे. कार्यालयीन कामकाजात टंकलेखन यंत्र वापरणे सुरु झाल्यावर हस्तलिखित लिखाणापासून दूर जाणे सुरु झाले आणि आता तर सर्वत्र संगणकाचा, भ्रमणध्वनीचा कळफलक वापरून लिखाण केले जात आहे, हा काळाचा महिमा म्हणावा लागेल. काही सुलेखनकारांनी हाताने लिहिण्याची कला (Calligraphy) अजूनही जोपासली आहे हे खरे परंतु नवनवीन आणि वेगवेगळे अक्षर "फॉन्टस्" उपलब्ध होत असलेल्या सद्य काळात सुलेखनाला देखील ग्रहण लागायची दाट शक्यता आहे.
प्रगत देशांमध्ये हस्तलिखित लिखाण शाळांमधून हळूहळू गायब होत आहे. शिक्षकांच्या दृष्टिकोनातून त्याला आता फारसे महत्व उरलेले नाही. हाताने लिहिण्याचा सराव नसल्याने एक तृतीयांश विद्यार्थ्यांना स्पष्ट आणि वाचनक्षम लिखाण करता येत नाही. अमेरिकेत आता विद्यार्थ्यांना कर्सिव्ह लिहिण्याची आवश्यकता उरलेली नाही. युरोप मधील देशांतील शाळांमधून कर्सिव्ह काढून टाकले आहे. भारतातील अनेक राज्यांमध्येही कर्सिव्ह हटवले जाते आहे. त्यामुळे लवकरच मुलं कर्सिव्हला एक प्राचीन, परकीय भाषा समजतील अशी दाट शक्यता आहे. मराठीचे कर्सिव्ह “मोडी” लिपी हटवून तर दशके उलटली आहेत. मराठी माणसाला मोडी लिहिता वाचता येत नाही. परंतु हस्तलेखन हा केवळ शाळेतील विद्यार्थ्यांचाच प्रश्न आहे असे नाही तर तो प्रौढांना देखील लागू आहे. एक त्रितीयांश प्रौढ हाताने काहीही लिहीत नाहीत तर तीन पैकी दोनजणांना दुसऱ्यांचं हस्तलिखित वाचण्यात अडचण येते.
हस्तलिखित लिखाणाच्या ऱ्हासामुळे होणारे दुष्परिणाम केवळ वैयक्तिक पातळीवर आहेत असे नाही तर त्याचे सामाजिक, शैक्षणिक आणि मानसिक परिणाम देखील आहेत. वैज्ञानिकांनी ह्या skill atrophy बद्दल धोक्याचा इशारा दिला आहे. त्यांनी लिखाणाबाबत एक अभ्यास केला. त्यांनी मुलांना हस्तलिखित पद्धतीने लिहून आणि कीबोर्डवर टाईप करून अशा दोन प्रकारे अक्षरं शिकवली. नंतर या मुलांना एमआरआय स्कॅनिंग करून तपासले. जी मुलं हस्तलिखित पद्धतीने शिकली त्यांचा लिखाणाच्या प्रक्रियेमध्ये जास्त सहभाग होता. डोळे, बोटे आणि हात ह्यांच्या हालचालींचा समन्वय असल्याने मेंदू जास्त सक्रिय होता, माहिती सखोल साठवली गेली आणि मेंदू मध्ये प्रखर दृश्यमानता दिसून आली. याउलट टायपिंग करून शिकलेल्या मुलांमध्ये मेंदूच्या सक्रियतेचा स्तर तुलनेने खूपच कमी होता. हा मुळात लिखाणाच्या क्रियेमध्ये active participation किंवा passive participation असण्याचा फरक आहे. हस्तलिखित लिखाणामुळे शिकण्याची क्षमता सुधारते, स्मरणशक्ती, सर्जनशीलता, स्व-अभिव्यक्ती वाढते, ज्ञान-वृद्धी होते, भाषा-प्रभुत्वात वाढ होऊन संज्ञानात्मक कौशल्यांमध्ये (cognitive skills) वाढ होते, संवादातील वैयक्तिक आणि भावनिक संबंध वाढतात असे अनेक फायदे दिसून आले आहेत.
हस्ताक्षराचे विश्लेषण करून लिहिणाऱ्याच्या व्यक्तिमत्त्वाचे गुणधर्म निश्चित करण्याचे ग्राफोलॉजी (Graphology) नावाचे एक शास्त्र आहे. परंतु त्याला वैज्ञानिक मान्यता नाही. ग्राफोलॉजीच्या पद्धतींना आणि काढलेल्या निष्कर्षांना विज्ञान मान्यता देत नाही त्यामुळे ते एक छद्म विज्ञान मानले जाते. ग्राफोलॉजीचे अभ्यासक लिखाणाच्या वळणदार, सुवाच्य, छोटे, मोठे, किरटे, स्वच्छ, टापटीप, दुर्बोध, वाचण्यास कठीण (कुत्र्याचे पाय मांजरीला) अशा वेगवेगळ्या प्रकारावरून लेखकाची स्वभाव वैशिष्ट्ये कळतात असा दावा करतात. डॉक्टरांनी दुर्बोध अक्षरात लिहिलेले औषधाचे प्रिस्क्रिप्शन फक्त केमिस्टलाच वाचता येते असा एक प्रवाद आहे. तसे असेल तर ग्राफोलॉजी प्रमाणे सर्व डॉक्टरांना एकाच तराजूत तोलावे लागेल !
हस्तलिखित लिखाण न करणे म्हणजे केवळ वैयक्तिक कौशल्याचा ऱ्हास नव्हे तर आपले व्यक्तिमत्व, आपल्या माणूसपणाचा काही भाग हरवण्यासारखे आहे. हस्तलिखित पत्रातून आपल्याला आपले विचार, भावना जास्त सक्षमपणे व्यक्त करता येतात. कित्येक पत्रे “मर्मबंधातली ठेव” असल्यासारखी जपून ठेवली जातात. इतिहास काळात लिहिलेली पत्रे इतिहासकारांना इतिहासात डोकावण्यास मदत करतात. पत्राच्या संदर्भात चित्रपटांमध्ये अनेक गाणी लिहिली गेली आहेत. SMS आणि सोशल मीडिया नव्हते त्याकाळी कित्येक प्रेमी युगुलांना संपर्कासाठी "प्रेमपत्राचा" आधार असायचा.
हस्तलिखित लिखाण हरवणे, कमी होणे हे सद्य काळात अपरिहार्य आहे. "दिसामाजी काहीतरी लिहावे, प्रसंगी अखंडित वाचीत जावे" असे समर्थ रामदासांनी म्हटल्याप्रमाणे दर दिवशी काही ओळी हाताने कागदावर लिहिण्याचा संकल्प करू यात.
हाताने लिहिण्याची कला लोप पावत आहे ह्या बद्दलचा हा लेख मी हस्ताक्षरात न लिहिता बोटाक्षरात, थम्बाक्षरात किंवा कळफलकाक्षरात (कीबोर्डाक्षरात) लिहिला आहे, हा मोठा विरोधाभास आहे, नाही का?
टीप : शीर्षकातील पन् श्रेय -
Collins Dictionary
Submitted By: Unknown - 14/02/2021
Status: This word is being monitored for evidence of usage.
बोकलत, सुंदर सुलेखन.
बोकलत, सुंदर सुलेखन.
भाऊ नमसकर, कार्टून मस्त.
संगणकाचे लिहिण्यात बरेच फायदे - लिहिण्यासाठी व वाचण्यासाठी - आहेत, हे जितकं खरं तितकंच हाताने लिहिण्यातलं व्यक्तिनिष्ठ सुख, समाधान वेगळं हेही खरं. हस्ताक्षराचा ऱ्हास म्हणूनच जितका अपरिहार्य तितकाच दुःखद! >> +1
छान लेख .
पेनाने लिहिण्याची मजाच वेगळी . अक्षर सुधारावं म्हणून मध्यंतरी नियमित पेपरातले सुविचार लिहिले होते पेन पेन्सिल दोन्हीने आता परत नियमित लिहायला हवं.जितका सराव कराल तितकं अक्षर सुधारते असं आमच्या शाळेच्या बाई म्हणायच्या ते एकदम डोक्यात फिट आहे. कर्सिव्ह इंग्लिश लिहिणार्याविषयी मला कमालीचा आदर वाटतो .कॉलेजमध्ये असताना माझी एक इंग्लिश मिडीयम ची मैत्रीण लिहायची, तसं ते कळायला तेव्हाही ते कठीण वाटायचं पण सुंदर होतं. तीच्याकडुन आम्ही ग्रीटिंग कार्ड वर मेसेजेस लिहून घ्यायचो ते आठवले.
छान समयोचित आढावा @ चामुंडराय
छान समयोचित आढावा @ चामुंडराय. शीर्षक विशेष. 👌
मीही प्रवाहपतित गटात आहे. फक्त सह्याजीराव 😀 बाकी काही पेन धरून लिहिणे होत नाही.
रिकाम्यावेळी क्वचित doodling करतो. हे असे :
त्यानी हस्ताक्षर सुधारत नाही, फक्त टाइमपास होतो.
धन्यवाद सिमरन
धन्यवाद सिमरन

(No subject)
मला स्टेन्सिल्स वापरून सुद्धा
मला स्टेन्सिल्स वापरून सुद्धा इतके चांगले अक्षर काढता येणार नाही बोकलत.
अनिंद्य, छान जमले आहे डूडलिंग.
सह्याजीराव
हल्ली stylus pen चालणाऱ्या
हल्ली stylus pen चालणाऱ्या tablets जी जोरात जाहिरात आहे. पण परीक्षेत कागदावरच लिहायचं आहे.
आजच्या लोकसत्तेतील बातमी.
आजच्या लोकसत्तेतील बातमी.
प्रसिद्ध सुलेखनकार अच्युत पालव यांच्या कलाकृती दिल्लीतील राष्ट्रपती भवनातील ‘ग्रंथ कुटीर’ दालनात झळकल्या आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या या दालनात, त्यांनी भारतीय संविधानाची प्रस्ताविका, ‘आम्ही भारताचे लोक’ हा मजकूर ११ अभिजात भारतीय भाषांमध्ये, सुलेखनातून साकारला आहे. याशिवाय सरस्वती वंदनेचेही सुलेखन तिथे करण्यात आले आहे.
धन्यवाद मानवमामा _/\_
धन्यवाद मानवमामा _/\_
*.....इतके चांगले अक्षर काढता
*.....इतके चांगले अक्षर काढता येणार नाही बोकलत.* - अगदी खरंय. अप्रतिम !!!!!
बोकलत
बोकलत
अतिशय सुरेख हस्ताक्षर.
तुम्ही सुलेखनाचे क्लास घेता का? घ्याच.
वाह बोकलत!
वाह बोकलत!
तुम्ही तुमच्या पोस्ट टाईप न करता लिहून त्याचे फोटो टाकत जा..
हा माझा विरंगुळा (मिरर इमेज
हा माझा विरंगुळा (मिरर इमेज मधे लिहिणे
, बोकलत यांची क्षमा मागून )
सगळ्यांचे मनापासून धन्यवाद.
सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. तुमच्या सगळ्यांच्या शाबासकीमुळे लिहायला अजून हुरूप येतो. धन्यवाद.
बोकलत फार सुंदर !
बोकलत फार सुंदर !
अज्ञान_बालक तुमचा छंदही हटके.
लेख आवडला असे नाही म्हणणार कारण मुळात विषय अजिबात आवडीचा नाही... हस्ताक्षर! बरेच मुद्दे नाही पटले.
ऋन्मेष आणि शर्मिला - दोघच का होईना आपल्या गटात आहेत हे वाचून बरे वाटले.
वर लेखात आल्याप्रमाणे कुत्र्या मांजराच्या पायासारखं , स्वतः ला पण नंतर वाचता येईल की नाही अशी खात्री नसलेलं हस्ताक्षर!
त्यामुळे आयुष्यात कुणालाही कधीही पत्र लिहिलं नाही.
कॉलेज मधून बाहेर पडल्यापासून हाताने लिहिल्याचे फारसे आठवत नाही... आजकाल एक नोंदवही ( कोणाच्या तरी आग्रहामुळे/ मार्गदर्शनामुळे/ प्रभावामुळे केली आहे) त्यात लिहिलेलं आजकाल माझं मला वाचता येत.
वाईट हस्ताक्षराने बरेच नुकसान शाळा महाविद्यालयात झाले आहे. पण तरी ते सुधारणे जमले नाही.
दहावीला संस्कृतला अक्षरावरून मार्क जातील ही धास्ती होती.. तेव्हा त्यावेळी असणारी सर्व संसाधने धुंडाळून. एक समजले की सुटे लिहायचे आणि खाडाखोड करायची नाही म्हणजे मार्क कापतं नाहीत. युक्ती बोर्डाच्या परीक्षेत अमलात आणली आणि संस्कृतचे ( शाळेतील) पहिल्या नंबरचे ( त्या काळा च्या मानाने) घसघशीत बक्षीस मिळविले.
सुंदर हस्ताक्षर, सुलेखन बघायला, वाचायला आवडते . लिहिणाऱ्यांचे कौतुकही वाटते. पण ते तेव्हढेच.
त्याव्यतिरिक्त हस्ताक्षराला उगाच अवास्तव महत्व दिले जाते / जात असे , अस मात्र नक्की वाटतं.
बाकी fine mortar skill , हस्ताक्षर analysis vagaire nude पटन्यासारखे!
*त्याव्यतिरिक्त हस्ताक्षराला
*त्याव्यतिरिक्त हस्ताक्षराला उगाच अवास्तव महत्व दिले जाते / जात असे , अस मात्र नक्की वाटतं.* -
'अवास्तव , ' हे अगदी खरं! माझा एक अतिशय हुशार, प्रचंड अभ्यासू व असामान्य वक्ता असलेला जिवलग बालमित्र केवळ वाईट हस्ताक्षर हा शाप घेवून जन्मला व शाळा, कॉलेजात ह्या सर्व गुणांना शुन्याने गुणत
बसला होता ! केवळ नशिबाने शेवटी त्याला आवडीच्या शिक्षकी पेशात प्रवेश मिळाला व त्याच्या गुणांचं व चिकाटीचं सार्थक झालं !
चांगल्या वळणदार अक्षराच कौतुक
चांगल्या वळणदार अक्षराच कौतुक करावं पण जसं चांगल्या चित्राच/ स्वयंपाकाच करतो तास असावं...
एकदा मुलगा दुसरीत असेल तेव्हा - वही पूर्ण करायला त्याच्या वर्गातील एक मुलीची वही घेतली. हिचं वर्गात पालकांना बाई अतिशय हुशार/ चांगल्या अक्षराची म्हणून खूप कौतुक सांगत , तिचीच वही दिली.
बघितलं तर खरच खूप सुवाच्य अक्षरात सर्व छान लिहिले होते.. कौतुकाने नेट बघितले तर प्रत्येक पानावर चुका होत्या...
तेव्हा इतकं आश्चर्य वाटलं होतं... हुशार मुलगी आणि इतक्या चुका?
अज्ञानी, प्रयोग सुरेख जमलाय.
अज्ञानी, प्रयोग सुरेख जमलाय.
मीस्वछंदी , मानव सर आभार
मीस्वछंदी , मानव सर आभार
"हस्ताक्षर हाच व्यक्तिमत्वाचा खरा आरसा" यावरचा विश्वास लहानपणीच उडाला आहे.
मी सहावी पर्यंत वर्गात पहिला येत असे (वासरात लंगडी गाय शहाणी) आणि एक मुलगा जेमतेम पास होत असे परंतु त्याचे हस्ताक्षर अतिशय सुंदर, वळणदार, होते, हस्ताक्षर स्पर्धांमध्ये नेहमी तो प्रथम येत असे (जिल्हापातळीपर्यंत). त्याकाळी सातवी पण बोर्ड परीक्षा असे, मला खात्री होती शाळेत पहिला येण्याची पण जो सहावीपर्यंत काठावर पास होत असे तो सातवीला तालुक्यात पहिला आला, कसा ते त्याला आणि सर्व वर्गाला माहित होते. परंतु त्या दिवसापासून वरील उक्तीवरचा विश्वास उडाला तो उडालाच.
हस्ताक्षर फार खराब लिहिलेला
हस्ताक्षर फार खराब, लिहिलेला शब्द (पटकन) ओळखता न येणे, शुद्धलेखनात चूक आहे वाटणे (हलन्तचा उकार किंवा उकाराचा हलन्त वगैरे) यामुळे मार्क कापले गेले हे एकवेळ समजण्यासारखे आहे. पण खूप छान अक्षर म्हणुन नॉर्मल हस्ताक्षर असणाऱ्या व्यक्तीपेक्षा जास्त मार्क? हस्ताक्षरापेक्षा अजुन काहीतरी बायस* असावे असे वाटते. एखाद दुसरे शिक्षक असतीलही सुंदर अक्षराला भुलून भरघोस मार्क्स देणारे, पण सगळ्याच विषयांचे शिक्षक?
*लहान गावी शाळेतर्फे एखाद्या विद्यार्थ्याला/विद्यार्थीनीला पहिल्या क्रमांकावर आणायचे असे ठरवून करतात असे प्रकार पूर्वी पाहिले आहेत.
यात कोणता 'बायस' नव्हता किंवा
यात कोणता 'बायस' नव्हता किंवा फक्त हस्ताक्षरामुळे मार्क दिले गेले नव्हते, तर कॉपी हे मुख्य कारण होते
यामुळे सुंदर निर्मळ हस्ताक्षर असलेली व्यक्तीपण चुकीचे वागू शकते असा ठाम समाज त्या वयात झाला तो कायमचाच .
अज्ञान बालक
अज्ञान बालक
अर्थात
हस्ताक्षर म्हणजे व्यक्तिमत्वाचा किंवा चारित्र्याचा आरसा वगैरे अंधश्रद्धाच आहेत.
हस्ताक्षर चांगले असणे ही कला आहे. जसे की चित्रकला. जी सगळ्यांच्या बोटात नसते.
तसेच कितीही प्रयत्न केला तरी चांगले हस्ताक्षर न जमणे ही देखील एक कला किंवा त्या कलेचा अभाव म्हणू शकतो.
बाकी इतर एव्हरेज अक्षर असणाऱ्यांमध्ये एखादा स्वभावानुसार वेगाशी स्पर्धा करून लिहिताना अक्षरांची वाट लावून आपल्या एव्हरेज अक्षराला below average करू शकतो. तर एखादा नीटनेटकेपणाची आवड असलेला आपले एव्हरेज अक्षर अजून उठावदार करू शकतो.
यातून हवे तर त्यांच्याबद्दल अंदाज बांधू शकतो की ती व्यक्ती कशी असावी. पण यातही सकारात्मक नकारात्मक असे काही नाही. कोण कश्याला जास्त महत्त्व देते एवढेच.
अच्छा, कळले. अर्थात हस्ताक्षर
अज्ञानी: अच्छा, कळले. अर्थात हस्ताक्षर आणि नीतीमत्तेचा काही संबंध नाही हे बरोबर आहे.
"हस्ताक्षर हाच व्यक्तिमत्वाचा
"हस्ताक्षर हाच व्यक्तिमत्वाचा खरा आरसा>>
सुंदर निर्मळ हस्ताक्षर असलेली व्यक्तीपण चुकीचे वागू >>>
हस्ताक्षरावर जेव्हढा भर दिला जातो तेव्हढा मुलांना स्वतःच्या मनाने ( पुस्तकात/ गाईड मध्ये n बघता ) विचार करून लिहायला शिकवले तर कदाचित त्यांचे भविष्यात जास्त भले होईल..
असो! पण ह्या धाग्या निमित्ताने हस्ताक्षरात कमी असणारे, हळू असणारे विद्यार्थी असतात (ज्यांचा कोणी वाली नसतो) अशी काही उदाहरणे समोर आली.
अजून एक..
आमच्या शेजारचा मुलगा... त्याची आजी आग्रहाने आईकडे अभ्यासाला पाठवायची.
त्याचे बाबा ( स्वतः दहावीचे गणिताचे शिक्षक) आणि माझी आई ( शिकवणी घेणारी) दोघांचेही एकच म्हणणे.. इतका हुशार मुलगा ( आईच्या मते एकपाठी ) लेखन मुळे / अक्षरामुळे दहावीत मार खाणार.
तसेच झालं . त्याला असे mark मिळाले की ज्युनिअर कॉलेज साठी एका शाळेत प्रवेश घ्यायला लागला.
पण भाषा , इतिहास वायर लिखाणाचे विषय गेल्यावर बारावीत आणि पुढच्या पूर्ण आयुष्यात ( कॉलेज / करिअर) कायम उत्तम कामगिरी करत राहिला. कारण तो खरच हुशार होता.
पुढे एकदा असेच कसले पेढे द्यायला आईकडे आला, हसत म्हणाला,
" आता अक्षरांचा प्रश्न येतच नाही. लिहायलाच लागत नाही."
अक्षरावरून त्याला त्या वयात समस्त शिक्षकांनी/ पालकांनी बरेच टोकले असेल. / होते.
गणित कच्चा आहे, इंग्लिश कच्च आहे त्याची बाजू घेतली जाते.. अक्षर/ लेखनाचा वेग कमी असणाऱ्यांची बाजू असेल हेही कुणाच्या गावी नसते.
धन्यवाद मीस्वच्छंदी
धन्यवाद मीस्वच्छंदी
अक्षर/ लेखनाचा वेग कमी
अक्षर/ लेखनाचा वेग कमी असणाऱ्यांची बाजू>> मुद्दा पटला.
थोडक्यात बोकलतच्या
थोडक्यात बोकलतच्या हस्ताक्षरावरून त्याच्या व्यक्तिमत्वाचा / चारित्र्याचा / व्यक्तिमत्वाचा अंदाज बांधू नका
बोकलतला गणेशोत्सवाच्या सुलेखनाच्या स्पर्धेमधे बक्षिस मिळाले होते ना ?
बोकलतला गणेशोत्सवाच्या
बोकलतला गणेशोत्सवाच्या सुलेखनाच्या स्पर्धेमधे बक्षिस मिळाले होते ना ?>>>हो पाहिले आले होते . बरेच जण चकित झाले होते .पण त्यांचे अक्षर पाहा मग कळेल त्यांनाच पहिला नंबर मिळणार होता निर्विवाद.
https://www.maayboli.com/node/76203
थोडक्यात बोकलतच्या
थोडक्यात बोकलतच्या हस्ताक्षरावरून त्याच्या व्यक्तिमत्वाचा / चारित्र्याचा / व्यक्तिमत्वाचा अंदाज बांधू नका>>>
धन्यवाद सिमरन _/\_
*धन्यवाद सिमरन _/\_* -
*धन्यवाद सिमरन _/\_* - त्यांच्यावरील शेरेबाजीवरचा बोकलत ह्यांचा हा प्रतिसाद खूप आवडला, त्यांच्या हस्ताक्षरापेक्षाही !!!
अक्षर तेच सुंदर जे नजर पडताच
अक्षर तेच सुंदर जे नजर पडताच वाचले गेले पाहिजे मेंदूला अर्थ कळला पाहिजे. अन्यथा काही जण फार आर्टिस्टिक काढतात, जे बघायला छान वाटते पण वाचताना वेग मंदावतो. त्याला चांगली चित्रकला म्हणू शकतो. हस्ताक्षर नाही. असे माझी आजी म्हणायची.
Pages