मी तंव हमाल भारवाही!

Submitted by स्वाती_आंबोळे on 9 January, 2025 - 19:18

प्रतिभेची व्याख्या करता येत नाही.

सृजनशील व्यक्तीला 'कसं सुचतं हो तुम्हाला' हा एक प्रश्न अनेकदा विचारला जातो. जगातला बहुधा सर्वात कठीण प्रश्न असेल हा. कारण त्याला उत्तरच नाही. अनुभव हे उत्तर नाही, शिक्षण हे उत्तर नाही, सराव हे उत्तर नाही, कौशल्य हे उत्तर नाही. ही उत्तरं खरी किंवा पुरेशी असती तर 'क्रिएटिव्ह ब्लॉक'सारखा शब्दप्रयोगच अस्तित्वात आला नसता. या सार्‍यांनी कलाकृतीला झळाळी आणता येईल, पण सृजनाच्या रोपट्याची मुळं मात्र गीतेतल्या अश्वत्थ वृक्षासारखी कुठेतरी गगनापारच असतात.

आमचा ग़ालिब म्हणाला होता,
आते हैं ग़ैब से ये मज़ामीं ख़याल में
'ग़ालिब' सरीर-ए-ख़ामा नवा-ए-सरोश है

(
सृजनाचे मूळ | ज्ञाताच्या पल्याड | बहरते झाड लौकिकात ||
कुरुकुरू वाजे | लेखणीची निब | समजे ग़ालिब | देववाणी ||
)

कलाकृती जन्माला यायची असली की जणू कलाकार त्या परतत्त्वाच्या हातातलं माध्यम होतो - लेखणी होतो, कुंचला होतो, वाद्य होतो... आणि त्याच्या माध्यमातून ते परतत्त्व स्वतःलाच साकार करतं!

'Fireflies' नावाच्या काव्यसंग्रहात रवींद्रनाथ टागोरांची एक छोटीशी कविता आहे,
To the blind pen
the hand that writes is unreal,
its writing meaningless!

आपण ती लेखणी आहोत, जी कधीकधी उन्मादात हे विसरते की आपला लिहिविता धनी निराळा आहे आणि त्याला अभिप्रेत असलेलं सगळं आपल्याला पुरतं आकळलेलंदेखील नाही!

त्याच्या तीनएकशे वर्षं आधी दासबोधात समर्थांनी नेमकं तेच म्हटलं आहे,
'सकळ करणे जगदीशाचे | आणि कवित्वची काय मनुष्याचे | ऐशा अप्रमाण बोलण्याचे | काय घ्यावे ||'

परवा डॉ. सलील कुलकर्णींनी स्वरबद्ध केलेली आरती प्रभूंची 'कधी मी कधी तो' कविता ऐकत होते, तेव्हा हे असं काहीबाही आठवत राहिलं.

एक सामान्य माणूस आणि त्याच्यातच दडलेला प्रतिभावंत हे जणू एका शरीरात नांदणारे दोन जुळे जीव आहेत अशी कल्पना आरती प्रभूंच्याच 'तो कुणी माझ्यातला तो घनतमी तेजाळतो' या कवितेतही आली आहे. ते म्हणायचे 'चिं. त्र्यं. खानोलकर नावाच्या झाडाच्या फांदीवर आरती प्रभू नावाचा पक्षी कधीतरी बसून एखादे गाणे गाऊन जातो’.

कोणते पोषाख त्याचे चोरिले मी भर्जरी
विकित बसलो येथ हाटी, आणि खातो भाकरी
तो उपाशी तरिहि पोटी लाज माझी राखतो
राख होतांनाहि ओठी गीतगाणी ठेवितो
मैफिलीला तो नि मी दोघेही जातो धावुनी
ऐकितो मी सूर, तो अन् दूरचे घंटाध्वनी

तो कुणी माझ्यातला तो घनतमी तेजाळतो
दीन मी बांधून डोळे एकटा अन् चालतो


प्रतिभेचं मोल करू नये, करता येत नाही! मी मात्र हे कळत असूनही कधी भाकरीच्या मोहाने तर कधी टाळीच्या मोहाने त्याचे भरजरी पोशाख कवडीमोलाने विकून त्याला नागवतो! पण त्याला या कुठल्याच लौकिक गोष्टींची तमाच नाही! माझ्या मनात खिन्नतेचा अंधार दाटत राहतो आणि तो त्यातही तेजाळत राहतो!

तो तेजाळतो, पण तो तरी स्वयंप्रकाशी आहे का? त्यालाही कधीतरी वाट पाहावीच लागते - दारी तोही कधी पणती लावतो!

गहाण शेताचे दोन आम्ही धनी
दूध दाण्यातले राखतो इमानी
मनाची गोफण तरी फिरताहे
कधी तो कधी मी उडू उडू पाहे

गहाण शेताचे दोन आम्ही धनी! तो सृजनशील आहे, पण प्रतिभेचं शेत त्याच्याही मालकीचं नाही, माझ्या तर मुळीच नाही! ते गहाण पडलं आहे त्या परतत्त्वाकडे! तो आणि मी नुसती राखण करतो त्याची! आणि राखणही कोणापासून? आमच्यापासूनच! श्रेयाचे धनी आपण नाही हे बजावणारा मनाचा पहारा सतत जागता ठेवला तरच तो मोह गोफणीने वेळीच उडवता येतो!

तुकोबा म्हणाले होते ना,
फोडिले भांडार | धन्याचा हा माल | मी तंव हमाल | भारवाही ||

***

तळटीप : परवा वाहत्या धाग्यावर लिहिलं होतं, इथेही आग्रह करते. डॉ. सलील कुलकर्णींची 'कवितेचं गाणं होताना' ही यूट्यूबवरची मालिका पाहिली नसाल तर आवर्जून पाहा. ते सांगतात तोच अर्थ आपल्याला लागेल असं नाही (उदा. या कवितेचा अर्थ त्यांनी दोन व्यक्तींतल्या जिव्हाळ्याच्या अनुषंगाने लावला आहे), पण असा इतक्या निरनिराळ्या अंगांनी कवितेचा, गाण्याचा विचार करता येऊ शकतो, आस्वाद घेता येऊ शकतो हे लक्षात येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्वाती: लेख मस्तच जमलाय. पण आता नुसता एक लेख नको, लेखमालिका येउ दे यावर. तुझ्याकडे भरपूर मटिरिअल आहे लिहायला. तेंव्हा होऊन जाऊ दे ........

टवणे सरांच्या सारखंच पुढे जाऊन..
कविता अनेकदा समजत नाही, ती ज्या पद्धतीने स्वाती समजावते ते फार मोठं कौशल्य आहे. कवितेच्या दारा पर्यंत ती घेऊन जाते, फारतर एकदोन पायर्‍या चढायला मदत करते आणि तिथे आपल्याला सोडून देते. नवनीत गाईड लिहित नाही, तर निरगाठी सुटत नसतील तेवढ्या फक्त सैल करुन देते. कविता जर शब्दबंबाळ नाही, आणि त्याचा आस्वाद तसा होऊन कसा चालेल? याने आपण वाचताना कविता आपली व्हायला मदत होते. तिच्याशी आपलं नातं जुळायला आपण स्वतः पूल बांधत जातो. ही हातोटी तिच्या लेखनात जाणते अजाणतेपणी माहित नाही, पण सहज येत रहाते. वाचकाचा अपमान न करता सोपं करणं सोपं नाही.
आईनस्टाईन म्हणालेला किंवा त्याच्या नावावर खपवतात तसं... Everything should be made as simple as possible, but not simpler.

इतक्या प्रेमळ आणि उदार प्रतिक्रियांसाठी सर्व अभिप्रायदात्यांचे अनेकानेक आभार!!
हे असे आनंद वाटल्याने वाढतात म्हणून लिहावंसं वाटतं - स्वार्थच हा एक प्रकारचा. तुमच्या प्रतिक्रियांतून मलाही नवीन दृष्टीकोन, नवीन उदाहरणं मिळतातच.
खेरीज आरती प्रभू सृजनाचं श्रेय कसं नाकारतात यावर लिहायचं आणि आपल्या रसग्रहणाचं कौतुक स्वीकारायचं हा दुटप्पीपणा होईल. Happy

>>> लाकडं चार ठिकाणांहून गोळा करता येतात पण तो अग्निकण स्वतःच्या अंतरातच असावा लागतो
>>> in the garb of poetry it moves easy and free
>>> प्रज्ञा नवनवोन्मेषशालिनी प्रतिभा मता
>>> तू केवळ माझी प्रेयसी नव्हतीस, माझी सशरीर नियती होतीस
>>> तूही थेंब थेंब शब्दापाठी द्यावा, अर्थ ओला व्हावा माझ्या साठी
>>> ती येते आणिक जाते
किती सुंदर सुंदर ओळी आठवल्या तुम्हालाही!

अनेक कवींच्या वरकरणी प्रेयसीला उद्देशून लिहिलेल्या कविता कधी देवाला, कधी प्रतिभेला लागू पडतात. आरती प्रभूंच्याच 'तू तेव्हा तशी' कवितेत शेवटचं कडवं (जे गाण्यात घेतलेलं नाही), ते असं आहे:
तू कुणी पक्षी
पिसांवर नक्षी
कवितेच्या ईश्वराची!

ग़ालिबची शायरी 'इम्कानात की शायरी' आहे असं वाचनात आलं होतं - इम्कानात म्हणजे शक्यता (possibilities). ग़ालिबच्याच का, सगळ्याच उत्तम कवितांत अशा अनेक शक्यता असतात. एकाच कवितेचे वाचकानुसार, किंवा एकाच वाचकाच्याही त्या त्या वेळच्या मन:स्थितीनुसार निरनिराळे अर्थ लागतात / आयाम दिसतात. ते पाहण्याची दृष्टी हवी.

अमित Happy

भरत, 'तो कधी माझ्यातला' (दोन मी) कविता 'नक्षत्रांचे देणे' संग्रहात आहे, आणि 'कधी तो कधी मी' ही 'दिवेलागण' संग्रहात आहे.

अरूण, मला खरंच लिहायला आवडेल, पण प्रताधिकारभंग होईल अशी भीती वाटते. तिथे लिंका बघा आणि इथे अर्थ वाचा - हे काही खरं नाही, मलाही तसं वाचायला आवडणार नाही. पण आपल्या आनंदासाठी मायबोलीला वेठीला धरणं योग्य वाटत नाही. या लेखातल्या ओळीही घाबरत घाबरतच उद्धॄत केल्या आहेत. Happy

अश्याच असत्या आमुच्या मराठीच्या बाई
तर आवडल्या असत्या आम्हालाही कविता शाळेतही.

जोक अपार्ट , वरील सगळ्यांनी लिहिले आहे त्याला + १
तुम्ही सुरेख लिहीता . आणि त्याहूनही अधिक म्हणजे सोप, अर्थवाही लिहिता . लिहिण्याचा बाज सांभाळून सगळ्यांना समजेल असे लेखन करणे सोपे नाही. तुम्हाला ते वरदान आहे. अजून लिहा . तुमच्या लिखाणाने वाचक अजुन समृद्ध होतील Happy

सुरेख लिहिलंय! प्रतिसादही वाचनीय..
थोडा विचार केला तर वाटलं की आपले श्रेय कोणा अनामिक शक्तीला देण्याची विचारसरणी केवळ प्रतिभेच्या बाबतीत नाही तर सर्वच कर्मांसाठी लावा असं संतमंडळी सांगत असतातच! तुकाराम महाराज म्हणतात ना "वृक्षाचेही पान हाले त्याची सत्ता राहिली अहंता मग कोठे!"

दुसरी एक गोष्ट मला नेहमी फार छान वाटते ती म्हणजे आपली बरीचशी तत्वज्ञानं ही काव्य स्वरूप आहेत - वेद, उपनिषदे, गीता, भागवत, ज्ञानेश्वरी, मनाचे श्लोक. काव्यात काही तरी विशेष आहे याचेच हे द्योतक आहे.

अवांतर - कधी माझी कधी त्याची या गाण्याची एक वेगळी चाल मला माहीती आहे. ती ऑनलाईन कुठे मिळेल ते शोधत आहे. मिळाली की देईनच इथे.

कालपासून लेख किमान दोनदा वाचला आहे, कदाचित जास्तच. लेख अतिशय सुंदर आहेच. मूळ कल्पना आणि तिचे विविध रचनांमधले दाखले याने लेख एकदम समृद्ध वाटतो. अनेक प्रतिक्रियाही सुंदर आहेत.

यात काही भरघोस आणखी लिहावे इतका विचार अजूनतरी जमलेला नाही व त्यामुळे काय प्रतिक्रिया लिहावी प्रश्न पडला होता पण आज किमान वाचल्याची नोंद करतो. प्रतिभा ही एखाद्या व्यक्तीपासून disassociate (योग्य मराठी शब्द आठवत नाही) करणे , ती प्रतिभा निर्माण करणारा वेगळा आहे पण त्यालाही हे "सुचणे" नेहमी जमतेच असे नाही ही संकल्पना - या सगळ्याचे व त्या विविध उदाहरणांचे सौंदर्य समजायला खूप सखोल विचार करावा लागत असेल आणि तो मुळात प्रचंड आवड असेल तर स्वाभाविकरीत्या केला जाईल असे वाटते.

ती कवितेबद्दलची मालिका मात्र नक्कीच बघणार आहे.

प्रकाटाआ.
इतक्या सुंदर धाग्यावर असू नये म्हणून प्रतिसाद काढला आहे. नंतर कधीतरी धागा पाहून लिहूयात...

सुरेख लेख. मी ती सलिल कुलकर्णी ची लिंक पण इथल्या धाग्यावर वाचल्या मुळे बघितली होती. आणि मी कालच ऑफिस मध्ये माझ्या मैत्रिणीला स्वातीच्या लिखाणाबद्दल सांगत होते.आईशप्पथ. हे लिहीताना पण शहारे येताएत. आता मी हा लेख पुरावा म्हणून तिला फॉर्वड करीन. कविता किती मस्त उलगडून दाखवतेस तू स्वाती.
मायबोलीवरचे सगळ्यांचे प्रतिसाद वाचनीय असतातच. खास करून अशा लेखांवर चे तर.

प्रत्येक शब्द, ओळ वाचताना वाटले अहाहा, सुंदर, तरल!
स्वाती, ग़ालिब, तुकाराम किंवा आरती प्रभू स्वतंत्र पणे वाचताना (मला) एवढे कळत नाहीत. Thankfully, मायबोलीवर तुमच्यासारखे लेखक/कवी आमचे भावविश्व संपन्न करत जातात.
मायबोलीवर खूप लिहित जा.

कुसुमाग्रजांची ही एक कविता आज वाचनात आली. माझ्या डोक्यात कुसुमाग्रज म्हणजे ते वीररस किंवा पृथ्वीचे प्रेमगीत वगैरे लिहिणारे (माझ्या डोक्यात असलेली प्रतिमा ).

जी आणिक मी आम्ही दोघे
एक घरामधले रहिवासी,
दोन गावचे, दोन दिशांचे,
हा रत येथे, हा वनवासी!

हा व्यवहारी रंगुनि जातो
हिशेब करतो रुपये आणे,
नक्षत्रांच्या यात्रेतील तो
ऐकत राही अबोध गाणे!

..
..
..
..
..

मी आणिक मी आम्ही दोघे
वस्तीसाठी एक परी घर
दोन ध्रुवांचे मीलन येथे
दोन ध्रुवांतिल राखुनि अंतर!

याच कवितेत एका कडव्यात या खालच्या ओळी येतात. त्याचा नाद फार आवडला.
स्वैर अनागर नागर जगि तो
कसले बंधन तया न साहे!

त्यांचीच "कोण" ही अजून एक कविता दिसली

बसलो असता निवान्त रात्री
टकटक झाली दारावरती
दार उघडता आत सरकली
कोणी व्यक्ती
बारीकतेने बघता कळले
हुबेहूब ती प्रतिमा माझी
दुसरी होती.

पुढे हे आतले द्वंद्व - त्या दोघांच्या गप्पा, वाद-संवादातून उलगडले आहे.

कवितेच्या शेवटच्या कडव्यात

अखेर होता पहाट, गेला.
एक आमच्यामधला निघुनी
गेला कोण नि कोण राहिला
हे मज आता-जन्मभराचे --
कोडे पडले.

सुंदर लेख आणि प्रतिसाद .
कवितेचं गाणं होताना साठीच्या लिंक करिता धन्यवाद. अतिशय सुंदर आहे मालिका.

सुंदर विषय , छानच लिखाण व सर्व प्रतिसादही !
"...मी तंव हमाल | भारवाही ||" - तुकोबाच एका अभंगात म्हणतात की, कां लोकांना हे सारं समजवायच्या फंदात पडतो मी तेंचं कळत नाही. मला नेहमी वाटतं आलंय, तुकोबा, ज्ञानेश्वर, नामदेव.. हे सारे देवाच्या खास मर्जीतलेच ' हमाल ' असावेत, ज्यांच्यावर विश्वासाने हा भार सोंपावताना त्यांच्या दिमतीला ' अभंग ', ' ओव्या ', ' भारुड " , '.आरत्या ' इ. त्याच्या खास 'क्रिएटिव्हीटी ' दलातले दमदार शिलेदारही देवाने तैनात केले असावेत !!

खूप वेळा वाचला लेख. तरल काही वाचल्यावर व्यक्त होणं अवघड असतं.

अश्याच असत्या आमुच्या मराठीच्या बाई
तर आवडल्या असत्या आम्हालाही कविता शाळेतही. >>> +१००

कविता ही माझ्याकरता कायमच क्रिप्टीक राहिली आहे - थोडा दूरच असतो तिच्यापासून.

अध्यात्मात एक दाखला दिला जातो. एका फांदीवर दोन पक्षी बसले आहेत. त्यातला एक गातोय, इकडून तिकडे उडतोय, मध्येच काही चोचीत पकडून खातोय. आणि दुसरा शांत बसून फक्त त्याचे निरिक्षण करतोय. दाखला इथे संपतो. पण त्या शांत बसलेल्या पक्षाने जर एकदाच किलबील केली तर जे काही उमटेल ती कविता असावी.

लेख खूपच आवडला.

गालिब च्या शेराचे मराठी आवर्तन वाचून तुम्ही लिहिलेले गालिबच्या शेरांचे मराठी भाषांतर पूर्ण कुठे वाचायला मिळेल हे विचारायची इच्छा झाली.
कवितेच्या कारणाबद्दल मला माहित असलेल्या काही कवींच्या ओळी आठवल्या आणि छान साहित्यस्मृती जाग्या झाल्या, त्याबद्दल अनेक आभार.

नवीन प्रतिसादकांचे अनेक आभार! Happy

माधव, तुम्ही म्हणता ती मुंडकोपनिषदातली ही ऋचा:
द्वा सुपर्णा सयुजा सखाया समानं वृक्षं परिषस्वजाते।
तयोरन्यः पिप्पलं स्वाद्वत्त्यनश्नन्नन्यो अभिचाकशीति ॥

>>> पण त्या शांत बसलेल्या पक्षाने जर एकदाच किलबील केली तर जे काही उमटेल ती कविता असावी
वा! सुंदर कल्पना! Happy

तुषार, नाही इतक्या एकाच शेराचं भाषांतर केलं होतं.

प्रतिभाशाली व्यक्तींबद्दल मला नेहमी कौतुकमिश्रित सूक्ष्म असूया वाटते. आता काही माबोकरांची त्यात भर पडते आहे. जोक्स अपार्ट निराकारीची वस्तू आकारा आणली
यात सृष्टीचा कृष्ण करण्यासाठी कृष्ण होणं गरजेचं पण नेमकं तेच तर मृगजळासारखं खुणावत राहतं, हातात येत नाही. ते उलगडून दाखवणाऱ्यांबद्दल काय बोलावं?

Pages