मी तंव हमाल भारवाही!

Submitted by स्वाती_आंबोळे on 9 January, 2025 - 19:18

प्रतिभेची व्याख्या करता येत नाही.

सृजनशील व्यक्तीला 'कसं सुचतं हो तुम्हाला' हा एक प्रश्न अनेकदा विचारला जातो. जगातला बहुधा सर्वात कठीण प्रश्न असेल हा. कारण त्याला उत्तरच नाही. अनुभव हे उत्तर नाही, शिक्षण हे उत्तर नाही, सराव हे उत्तर नाही, कौशल्य हे उत्तर नाही. ही उत्तरं खरी किंवा पुरेशी असती तर 'क्रिएटिव्ह ब्लॉक'सारखा शब्दप्रयोगच अस्तित्वात आला नसता. या सार्‍यांनी कलाकृतीला झळाळी आणता येईल, पण सृजनाच्या रोपट्याची मुळं मात्र गीतेतल्या अश्वत्थ वृक्षासारखी कुठेतरी गगनापारच असतात.

आमचा ग़ालिब म्हणाला होता,
आते हैं ग़ैब से ये मज़ामीं ख़याल में
'ग़ालिब' सरीर-ए-ख़ामा नवा-ए-सरोश है

(
सृजनाचे मूळ | ज्ञाताच्या पल्याड | बहरते झाड लौकिकात ||
कुरुकुरू वाजे | लेखणीची निब | समजे ग़ालिब | देववाणी ||
)

कलाकृती जन्माला यायची असली की जणू कलाकार त्या परतत्त्वाच्या हातातलं माध्यम होतो - लेखणी होतो, कुंचला होतो, वाद्य होतो... आणि त्याच्या माध्यमातून ते परतत्त्व स्वतःलाच साकार करतं!

'Fireflies' नावाच्या काव्यसंग्रहात रवींद्रनाथ टागोरांची एक छोटीशी कविता आहे,
To the blind pen
the hand that writes is unreal,
its writing meaningless!

आपण ती लेखणी आहोत, जी कधीकधी उन्मादात हे विसरते की आपला लिहिविता धनी निराळा आहे आणि त्याला अभिप्रेत असलेलं सगळं आपल्याला पुरतं आकळलेलंदेखील नाही!

त्याच्या तीनएकशे वर्षं आधी दासबोधात समर्थांनी नेमकं तेच म्हटलं आहे,
'सकळ करणे जगदीशाचे | आणि कवित्वची काय मनुष्याचे | ऐशा अप्रमाण बोलण्याचे | काय घ्यावे ||'

परवा डॉ. सलील कुलकर्णींनी स्वरबद्ध केलेली आरती प्रभूंची 'कधी मी कधी तो' कविता ऐकत होते, तेव्हा हे असं काहीबाही आठवत राहिलं.

एक सामान्य माणूस आणि त्याच्यातच दडलेला प्रतिभावंत हे जणू एका शरीरात नांदणारे दोन जुळे जीव आहेत अशी कल्पना आरती प्रभूंच्याच 'तो कुणी माझ्यातला तो घनतमी तेजाळतो' या कवितेतही आली आहे. ते म्हणायचे 'चिं. त्र्यं. खानोलकर नावाच्या झाडाच्या फांदीवर आरती प्रभू नावाचा पक्षी कधीतरी बसून एखादे गाणे गाऊन जातो’.

कोणते पोषाख त्याचे चोरिले मी भर्जरी
विकित बसलो येथ हाटी, आणि खातो भाकरी
तो उपाशी तरिहि पोटी लाज माझी राखतो
राख होतांनाहि ओठी गीतगाणी ठेवितो
मैफिलीला तो नि मी दोघेही जातो धावुनी
ऐकितो मी सूर, तो अन् दूरचे घंटाध्वनी

तो कुणी माझ्यातला तो घनतमी तेजाळतो
दीन मी बांधून डोळे एकटा अन् चालतो


प्रतिभेचं मोल करू नये, करता येत नाही! मी मात्र हे कळत असूनही कधी भाकरीच्या मोहाने तर कधी टाळीच्या मोहाने त्याचे भरजरी पोशाख कवडीमोलाने विकून त्याला नागवतो! पण त्याला या कुठल्याच लौकिक गोष्टींची तमाच नाही! माझ्या मनात खिन्नतेचा अंधार दाटत राहतो आणि तो त्यातही तेजाळत राहतो!

तो तेजाळतो, पण तो तरी स्वयंप्रकाशी आहे का? त्यालाही कधीतरी वाट पाहावीच लागते - दारी तोही कधी पणती लावतो!

गहाण शेताचे दोन आम्ही धनी
दूध दाण्यातले राखतो इमानी
मनाची गोफण तरी फिरताहे
कधी तो कधी मी उडू उडू पाहे

गहाण शेताचे दोन आम्ही धनी! तो सृजनशील आहे, पण प्रतिभेचं शेत त्याच्याही मालकीचं नाही, माझ्या तर मुळीच नाही! ते गहाण पडलं आहे त्या परतत्त्वाकडे! तो आणि मी नुसती राखण करतो त्याची! आणि राखणही कोणापासून? आमच्यापासूनच! श्रेयाचे धनी आपण नाही हे बजावणारा मनाचा पहारा सतत जागता ठेवला तरच तो मोह गोफणीने वेळीच उडवता येतो!

तुकोबा म्हणाले होते ना,
फोडिले भांडार | धन्याचा हा माल | मी तंव हमाल | भारवाही ||

***

तळटीप : परवा वाहत्या धाग्यावर लिहिलं होतं, इथेही आग्रह करते. डॉ. सलील कुलकर्णींची 'कवितेचं गाणं होताना' ही यूट्यूबवरची मालिका पाहिली नसाल तर आवर्जून पाहा. ते सांगतात तोच अर्थ आपल्याला लागेल असं नाही (उदा. या कवितेचा अर्थ त्यांनी दोन व्यक्तींतल्या जिव्हाळ्याच्या अनुषंगाने लावला आहे), पण असा इतक्या निरनिराळ्या अंगांनी कवितेचा, गाण्याचा विचार करता येऊ शकतो, आस्वाद घेता येऊ शकतो हे लक्षात येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुरेख..! हा संपूर्ण लेख हीच एक कविता वाटतेय, इतके तरल तरीही प्रोफाऊन्ड लिहिलेयस.

प्रतिभा ही एक खरेच दैवी गोष्ट आहे. सुचणं आपल्या हातात नसतं, लिहिणेही 'आज मी लिहिणार आहे' असं ठरवून करता येत नाही. आपण आपलं बसायचं तेच आपल्याकडे येतं. अतिशय इंट्यूईटिव्ह प्रकरण आहे. आपण फक्त माध्यम असतो. बाधाच आहे ही..!

पुलंच्या 'मुक्काम शांतिनिकेतन' मधे रवींद्रनाथांच्या कलानिर्मिती विषयीचा सुरेख दृष्टांत दिलेला आहे, "लाकूड आहे फुंकरही आहे, पण ज्यामुळं ते सारं लाकूड पेटून उठतं तो आगीचा एवढाचा स्फुल्लिंग नाही. लाकडं चार ठिकाणांहून गोळा करता येतात पण तो अग्निकण स्वतःच्या अंतरातच असावा लागतो. तो नसला तर सारं व्यर्थ आहे ."

रवींद्रनाथांचीच अजून एक कविता (फायरफ्लाईज वाचून आठवली) -
Clothed in facts
truth feels opressed
in the garb of poetry
it moves easy and free.

समोर येणारं बरचसं जंक फुड पोटात घालत असताना, काजू, बदाम, केशर घातलेले दूध समोर यावे तसे वाटले, लेख वाचताना.
होलसम, नरीशिंग आणि रुचकर. Happy

सगळा लेख सुरेख आहे .. पण मी 'कधी माझी कधी त्याची ही साऊली' वरच अडकलो आहे.
काय शब्दप्रतिभा आहे! परत परत ऐकून समाधान होत नाहीत असे शब्द, चाल आणि संगीत संयोजन!

सुरेख लिहिलंस! तू सांगितल्यामुळे सलील कुलकर्णीची सीरीज पण पाहत आहे आणि आवडलेली आहे. त्याच्या दुसर्‍या भागात मला वाटते ही तू वर दिलेली "कधी त्याची कधी माझी सावली.." कविता आहे. फार मस्त बोलला आहे तो.

खूपच सुरेख लिहिलंय..
<<<<समोर येणारं बरचसं जंक फुड पोटात घालत असताना, काजू, बदाम, केशर घातलेले दूध समोर यावे तसे वाटले, लेख वाचताना.
होलसम, नरीशिंग आणि रुचकर.>>>>>
+१००

व्वा!
काय सुंदर लिहिलं आहे. खूपच छान.
मलाही लेखकांच्या बाबतीत हा नेहमी पडणारा प्रश्न आहे की हे "सुचत कसं"?
अस्मिता, फार सुंदर प्रतिसाद.
सुरेख..! हा संपूर्ण लेख हीच एक कविता वाटतेय>>>>>+११
"प्रज्ञा नवनवोन्मेषशालिनी प्रतिभा मता"
अमूर्तातून मूर्त निर्माण करणाऱ्या त्या अद्भुत प्रतिभेला वंदन.

वा सुरेख!

जशी प्रतिभेची व्याख्या करता येत नाही वा सुचते कसे याला उत्तर नाही, त्याचप्रमाणे समजते कसे/रसास्वाद कसा घ्यायचा यालाही खरे तर उत्तर नाही. योग्य मार्गदर्शनाने (शिक्षक) कदाचित पाया भक्कम होईल. मात्र कविता भिडायला आतूनच काहितरी असावे लागते.

ती समजत नाही याचा त्रास होतो. कारण अनेकदा कविता खुणावतात पण मळभ्/धुक्याचा पडदा सरून कधी लखलखतच नाही.

आमच्या सारख्यांसाठी आरती प्रभूनेच लिहून ठेवले आहे

या माझ्या अजाण कवितेचा अपमान का करता बाबांनो का?
प्रेम हवय का या कवितेचं?

आहा काय लिहिलस. किती विविध कविता आठवत गेलीस. ते आठवणं असं शब्दात ओवता येणं! ग्रेट. थॅंक्यु मस्त अनुभव दिलास.

आहाहा.
संपूर्ण लेखच एक काव्य बनला आहे.. ह्याला अनुमोदन.

कसलं सुंदर, सुरेख लिखाण!!!
सकाळी सकाळी असं काहीतरी वाचायला मिळणं यासारखं सुख नाही.
You brightened my day!!!!
पुन्हा येईन वाचायला.
साद घालतं असं लिखाण. सुचलं तर प्रतिसादात लिहीन.

स्वाती, तुझं लेखन वाचणं हा नेहमीच एक श्रीमंत अनुभव असतो. अस्सल, दर्जेदार आणि राखीव गोष्टी जशा काही निवडक लोकांसाठी असतात तसे आपण भाग्यवान आहोत असं वाटतं तुझं लेखन वाचताना.
काय सुंदर लिहिलं आहेस आणि प्रत्येक दाखला समर्पक!
आपल्याला अवघड वाटणारी एखादी गोष्ट त्यातली पारंगत व्यक्ती अगदी आपल्या समोर बसून झरझर करून दाखवते आणि आपण फक्त थक्क होऊन बसतो.. तेव्हा त्या गोष्टीचे कौतुक करावं का त्या हाताचं हे ही कळत नाही, काहीही शिकता आलेलं नसतं तरीही मन भरून गेलेलं असतं तसं झालंय काहीसं. थँक्यू!

आहा!

टवणे सर+१. कविता कोणतीही कलाकृती सुचण्याबद्दल आहे, ते ती समजण्याबद्दलही तितकंच लागू आहे.

आता आरती प्रभूंची कोणतीही कविता वाचताना हाच कोन आधी लागेल. ती येते आणिक जाते यातली ती म्हणजे प्रतिभा असं हृदयनाथ म्हणालेत. त्यांच्या आणखीही कवितांत हे तो आणि ती आले आहेत. आपल्याला लाभलेल्या प्रतिभेचे ओझे पेलवत नाही अशी विव्हलता त्यांच्या कवितांत दिसत राहते. गेले द्यायचे राहून.....

लेखातल्या दोन कविता कोणत्या संग्रहातल्या आहेत? नक्षत्रांचे देणेची पारायणे झाली आहेत. पण जोगवा आणि दिवेलागण कधी नीट वाचले नाहीत .

गालिबच्या ओळी मराठीत केल्यात, त्या झाडाची फांदी वेगळ्या मातीत रोवून झालेल्या रोपासारख्या मूल झाडाची ओळख सांगतानाही सस्वतंत्र , तरतरीत झाल्या आहेत.

सुंदर लिहिलं आहेस! प्रतिसादही वाचनीय.

बोरकरांची एक कविता आहे..'दिसली नसतीस तर'.

'रतनअबोलीची वेणी माळलेली आणि निळ्याजांभळ्या वस्त्रालंकारांत संध्येसारखी बहरलेली तू' अशी सुरुवात आहे. तसं बघितलं तर प्रेयसीला उद्देशून आहे. पण ती कवितेला किंवा काव्यप्रतिभेला उद्देशून असावी असं मला वाटतं. 'तू केवळ माझी प्रेयसी नव्हतीस, माझी सशरीर नियती होतीस. तसं जर नसतं, तर मी आज जो काही आहे, तो तसा झालोच नसतो' असा शेवट आहे.

सगळे प्रतिसाद आणि लेख.
नितांत सुंदर आहेत पुन्हा पुन्हा वाचण्यासारखे!
.
सुचतं कसं तुम्हाला हे? Happy

आशूडी +१
खरंतर सगळेच प्रतिसादही सुरेख आहेत!

असं नीट समजावून सांगणं हीपण प्रतिभाच आहे. तुमचं असं लिहिलेलं वाचलं की आपणही वाचून अगदी आतून समृद्ध होतोय असं सतत वाटत रहातं!

तरल लिहिलंय एकदम. सगळ्या प्रतिसादांना मम. कवितेचं गाणं होताना ही मालिका पाहिली आहे, आता पुन्हा पाहायला हवी.
वावेचा प्रतिसादही आवडला.

रात्र थांबवुनी असेच उठावे
तुझ्यापाशी यावे क्षणासाठी
डोळियांच्या व्हाव्या वेड्या गाठीभेटी
आणि दिठी दिठी शब्द यावे !
तूही थेंब थेंब शब्दापाठी द्यावा
अर्थ ओला व्हावा माझ्या साठी
आणि उजाडता पाठीवर ओझे
वाटेपाशी तुझे डोळे यावे !

ग्रेस यांच्या "चंद्रमाधवीचे प्रदेश" या काव्य संग्रहातील ही एक कविता.
कविता / प्रतिभेविषयी असावी असे वाटते !

हा लेख वाचून आठवली परत ! धन्यवाद स्वाती !

ती येते आणिक जाते
येताना कधी कळ्या आणिते
आणि जाताना फुले मागते

याबद्दल पण सलील कुलकर्णीने असंच सांगितलं आहे कुठल्या तरी भागात.

- कोणाला, अवांतर वाटल्यास उडवुन टाकेन.

वीमेन हु रन विथ वुल्व्हज या (माझ्या आवडत्या) पुस्तकात , लेखिका एक दंतकथा सांगते - लालोबा नावाची वाळवंटातील म्हातारी, वाळवंटात मेलेल्या प्राण्यांचे सांगाडे, हाडे गोळा करायची ती हाडे नीट मांडुन, अगदी टेलबोन पर्यंत सगळी हाडे मांडून गाणे गायची. आणि त्या हाडांत हळूहळू जीव येउ लागे. ती अजुन जास्त गायची आणि त्या प्राण्यात प्राणंची फुंकर घातली जाई. व एक वेळ अशी येई की ती गात असे व तो प्राणी उडी मारून उभा राही व पूर्ण शक्तीनिशी पळू लागे, बागडु लागे.
आपण हे जे टॅरॉट करतो, प्रार्थना करतो, आय चिंग करतो, नृत्य करतो, ड्रामा हे सारे आपल्याच अंतराशी कनेक्ट होण्याकरता रचलेले सांगाड्यांचे सेतू असतात.
People do meditation to find psychic alignment. That's why people do psychotherapy
and analysis. That's why people analyze their dreams and make art. That is why some
contemplate tarot cards, cast I Ching, dance, drum, make theater, pry out the poem, and
fire up their prayers. That’s why we do all the things we do. It is the work of gathering
all the bones together. Then we must sit at the fire and think about which song we will
use to sing over the bones, which creation hymn, which re-creation hymn. And the truths
we tell will make the song.
--------------------
असे काव्यमय लेख वाचले की माझे मन भावावस्थेत जाते. कालही कुठे तरी अंतर्मनाशी कनेक्ट झालेले. कविता, टॅरॉट , गॉसपेल गाणी ऐकताना व स्तोत्रपठनामुळे जे होतं जे 'वीमेन व्हु रन ...' ची लेखिका सांगते आहे, तेच अगदी असे लेख वाचताना, होतं. अंतरातील अत्तराच्या कुपीचा अ‍ॅक्सेस मिळतो.

आणि धिस इज नॉट अ लिप सर्व्हिस. मला खरच होतं तसं.

Pages