
नमस्कार मित्रांनो
व्यावसायिक कामानिमित्ताने मी मुंबईमध्ये भायखळा येथे आलेलो आहे.
फक्त उद्या संध्याकाळच - सहा तारीख माझ्यासाठी मोकळी आहे. म्हणून
सोमवार दिनांक ६ जानेवारी २०२५ रोजी संध्याकाळी ६ नंतर भायखळा येथे एक माबो गटग करण्याचे ठरत आहे. सोमवारचा, म्हणजे कामकाजाचा दिवस असल्याने फार लांबून कोणी येऊ शकणार नाहीत ह्याची कल्पना आहे. घाईत कळवल्याबद्दल क्षमस्व !
परंतु भायखळा परिसरात किंवा मुंबई उपनगरांत रहाणारे कोणी माबोकर येऊ शकत असतील तर त्यांचे सहर्ष स्वागत आहे. (केवळ एकमेकांची सदिच्छा भेट आणि गप्पा-टप्पांचा कार्यक्रम एवढाच ह्या कट्ट्याचा मूळ उद्देश आहे.
संजय भावे त्यांच्या एका मित्रासह इथे येत आहेत.
भेटण्याचे ठिकाण
HOTEL HERITAGE,
Sant Sawata Marg,
Next to Gloria Church,
Byculla (E), Mumbai - 400027
Tel No : 022-69374891
.......
शक्य असल्यास संपर्कातून जरूर कळवा. वाट पाहत आहे.
धन्यवाद ! 
विवधतेत एकता... एवढ्या भाषा
विवधतेत एकता... एवढ्या भाषा एका घरात प्रथमच ऐकले.
दोन्ही बातम्या छान
दोन्ही बातम्या छान
स्वागत आहे डॉक्टर महेश आपले
ऋतुराज आणि संजय भावे
ऋतुराज आणि संजय भावे दोघांनीही अतिशय छान वृत्तान्त लिहिले आहेत.
या गटगला उपस्थित राहण्यासंबंधी कुमार सरांशी आणि संजय भावेंशीही बोलणे झाले होते अचानक वैयक्तिक महत्वाचे काही काम निघल्यामुळे उपस्थित राहू शकलो नाही याची हळहळ वाटते.
कुमार सरांच्या वृत्तांताच्या प्रतीक्षेत.
* कुमार सरांच्या
* कुमार सरांच्या वृत्तांताच्या प्रतीक्षेत.
>>>>> आणि मी महेश यांनी निदान तीन चार ओळी लिहून मायबोलीवरील लेखनाचा श्रीगणेशा इथूनच करावा याची प्रतीक्षा करतो आहे
त्यानंतर समारोप करायला मी मोकळा आहेच . . .
संयोजकाच्या नजरेतून . .
संयोजकाच्या नजरेतून . . .
प्रिय माबोकरांनो,
या गटगचा वृत्तांत एका प्रतिसादात पूर्ण न करण्याचा गुन्हा माझ्याकडून घडणार आहे !
( कै. कविराज, या वाक्यवापराबद्दल क्षमा करा !)
आता क्रमवार काही गोष्टी लिहितो.
१.
5 जानेवारीच्या रात्री दहा वाजता मुंबईत पोचलो आणि अचानक सणक आली की जमल्यास एखादे गटग भरवावे. आधी फक्त संजय यांना तशी कल्पना दिलेली होती आणि त्यांनी येण्याची कबुली दिली होती. केवळ त्या पाठबळावरच पुढचे पाऊल टाकले.
सोमवार हा तर बहुतेक सर्व कामधंद्याच्या दृष्टीने सर्वात व्यग्रतेचा दिवस. या दिवशी संध्याकाळी गटग आयोजित करणाऱ्या संयोजकाला खरंतर मायबोलीच्या कोर्टात उभे करून खास माबो शैलीतील दोन-चार शाब्दिक फटकेच दिले पाहिजेत, असेही अनेकांना वाटले असावे याची कल्पना आहे !!
पण दुसरा पर्याय नव्हता. माझे काम सोमवार व मंगळवार मिळून दीड दिवसच होते आणि शक्य होईल तेवढ्या मुंबईतील माबोकरांना भेटायची तर तीव्र ओढ होतीच. त्या ओढीनेच त्या रात्री घाईघाईत व भीतभीत तो धागा काढला.
२.
. आता सुरुवात काही व्यक्तिगत धन्यवादांपासून करतो. मी तर भायखळ्यात मुक्काम ठोकून बसलेलो आणि मुंबईचा पसारा तर किती अफाट. अशाही परिस्थितीत आपापले उद्योगधंदे सांभाळून घाटकोपर, दहिसर आणि बदलापूर इथून जे 3 माबोकर आले त्यांच्या कष्टाला मी दाद देतो. सतीश, ऋतुराज आणि संजय : मनापासून धन्यवाद !
* सदासुखी आणि माझी जाल-ओळख केल्या पाच सहा वर्षांची; मैत्री अगदी छान जमलेली पण अद्याप एकमेकांचे प्रत्यक्ष दर्शन नाही. मागच्या एका पुणे गटगच्या वेळेला त्यांनी जवळजवळ येण्याची बॅग भरली होती परंतु काही कौटुंबिक अडचणीमुळे त्यांना येता आले नव्हते. यावेळेस मीच त्यांच्या मुंबईत आलेलो होतो आणि त्यांना प्रेमाचे, आग्रहाचे आणि सक्तीचे आमंत्रण देऊन टाकले होते. आमच्या फोनवरच्या संभाषणात त्यांची येण्याची उत्सुकता आणि आर्तता मला मनोमन जाणवली आणि त्यांच्या भेटीसाठी मी अगदी आसुसलेला होतो. परंतु याही खेपेस काही व्यक्तिगत अडचणीमुळे ते येऊ शकले नाहीत. तरीसुद्धा त्यांनी पाठवलेल्या शुभेच्छा या निश्चितच मौलिक आहेत.
* मित्रवर्य सुधीर कांदळकर यांनाही प्रेमाचे आमंत्रण पाठवले होते परंतु कोकणातील लांबवरच्या गावाहून त्यांना येणे अशक्य होते. एकेकाळी निवृत्तीपूर्वी ते खऱ्या अर्थाने हाडाचे मुंबईकर होते. त्यांनी केलेली सूचना त्यांच्या शब्दात जशीच्या तशी खाली उतरवतो :
“ भायखळ्यात उतरलाच आहात तर तिथूनच चार-पाच किलोमीटर अंतरावरील Paradox Museum ला जरूर भेट द्या. अफलातून, अपूर्व असा अनुभव आहे; तो चुकवू नका”.
त्यांची कलात्मक दृष्टी मला ठाऊक असल्याने वरील संग्रहालयाला भेट द्यायची तीव्र इच्छा होती. पण होतं काय, की अशा जेमतेम दोन दिवसाच्या मुंबई भेटीत ‘रात्र थोडी आणि सोंगं फार’ अशी आपली अवस्था होते. आम्ही जेव्हा हॉटेलात चौघे जमलो तेव्हा संध्याकाळचे सव्वासहा झालेले होते आणि संग्रहालय बंद होण्याची वेळ तर रात्रीची आठची होती. संध्याकाळच्या गर्दीत तिथून पोचेपर्यंतच तासभर लागण्याची शक्यता होती. मग अर्थात सर्वानुमते असे ठरले, की माणशी 650 रुपये तिकीट असलेल्या संग्रहालयाला भेट द्यायची असेल तर पुन्हा एकदा नियोजन करून किमान तीन तास आपले पाय दुखवून तिथे हिंडण्याची तयारी करायला हवी !
सुधीरभाऊ, तुमच्या सूचनेबद्दल धन्यवाद परंतु पालन करू न शकल्याबद्दल क्षमस्व.
. . .
3.
3.
गटगची वेळ संध्याकाळी सहा ठेवण्यावाचून माझ्यापुढे अन्य पर्याय नव्हता आणि त्याच वेळेस सतीश यांची परिस्थिती अशी होती की दुपारी एक पर्यंत ते पूर्ण मोकळे होते आणि नंतर त्यांच्या व्यावसायिक कामकाजास सुरुवात होणार होती. मग काय, काढला यावर तोडगा आणि त्यांना म्हणालो,
“तुम्ही बिनधास्त माझ्या कामाच्या ठिकाणी या. मी काहीही करून अर्धा तास काढून तुमची गळाभेट घेतो आणि आपण गप्पा मारू”
.
सकाळच्या त्या धो धो गर्दीच्या वेळात घाटकोपरहून निघून सतीश यांनी माझ्याकडे येण्याचे जे काही कष्ट घेतले त्याबद्दल त्यांचा मनापासून आभारी आहे. माझ्या अन्य कार्यालयीन सहकाऱ्यांनी मला सतीश यांच्याबरोबर बोलण्याची बिनधास्त परवानगी देऊन टाकली मग आम्ही बाहेर जाऊन गॅलरीत मनसोक्त बोललो आणि नंतर सतीश यांची पण आमच्या इतर डॉक्टर मंडळींशी ओळख करून दिली. या निमित्ताने त्या सर्वांनाच ‘मायबोली डॉट कॉम’ चा परिचय झाला आणि त्याबद्दल कुतुहलही निर्माण झाले.
म्हणजे खऱ्या अर्थाने सतीश व माझी भेट ही एक गटगपूर्व गटग ठरली आणि ती अर्थातच आनंददायी होती.
. . .
४.
संध्याकाळी पाचपर्यंत माझे काम उरकून हॉटेलवर येऊन गादीवर आडवा पडलो होतो आणि सहज पंधरा मिनिटांनी मोबाईलमध्ये डोकावलो तर पावणेसहा वाजले होते आणि ऋतुराज यांचा संदेश येऊन पडला होता की ते खाली स्वागतकक्षात बसलेत. ठरलेल्या वेळेच्या पंधरा मिनिटे आधीच ऋतुराज पोचल्याने त्यांनी मला फोन करून अजिबात त्रास न देता केवळ संदेश पाठवून ते शांतपणे खाली बसून होते. अशी आदबशीर माणसे भारतात भेटणे आजकाल विरळा !
एव्हाना आमचे गटग त्रिकुट तयार झाले होते आणि जेमतेम पंधरा मिनिटातच संजय यांनी आपण नुकतेच भायखळा रेल्वे स्थानकावर उतरून आमच्याकडे येत असल्याचे कळवले आणि अशा तऱ्हेने सव्वासहा वाजता ही माबो-चौकडी कल्ला करायला सिद्ध झाली.
त्यानंतर जे काही घडले ते वरील दोन मित्रांनी सविस्तर लिहिलेले असल्याने पुनरुक्ती टाळतो. ऋतुराज यांच्या शैक्षणिक पात्रतेची विविधता वाखाणण्यासारखी आहे. विज्ञान शाखेतील शिक्षण घेतलेला माणूस जेव्हा सांस्कृतिक-ऐतिहासिक क्षेत्रातील व्यासंगही आवडीने करू शकतो हे समजल्यावर त्यांचे मनोमन कौतुक वाटले.
संजय यांच्या कलात्मक सांस्कृतिक पर्यटन लेखनाबद्दल मी नव्याने सांगण्याची काही गरज नाही. त्यांचा त्यातील हातखंडा सर्वपरिचित. तसेच एक यशस्वी मराठी उद्योजक म्हणून ते त्यांच्या बहुतेक जालमित्रांना परिचित आहेतच. उद्योजक होऊ इच्छिणाऱ्या नवोदित तरुणांना देखील ते अतिशय उत्तम मार्गदर्शन करतात. भविष्यात ते कल्पक शेती उद्योगाबद्दलही काही मौलिक लेखन करण्याची मला दाट शक्यता वाटते. शुभेच्छा आणि प्रतीक्षा !
५.
डॉ. महेश यांना या गटगची अजिबात पूर्वकल्पना नव्हती. मी त्यांना ६ तारखेला दुपारी ती दिली. खरंतर संध्याकाळी सहानंतर ते त्यांच्या पद्धतीने त्यांची संध्याकाळ साजरी करायला मोकळे होते. परंतु मायबोलीकर हा शब्दप्रयोग ऐकताच त्यांनी आमच्याबरोबरच राहणे आनंदाने पसंत केले आणि या गटगला शोभा आणली यात शंका नाही. त्या तीन तासांच्या कालावधीत आम्हा सर्वांच्या झालेल्या गप्पाटप्पा, विचारमंथन, वगैरे वगैरे मनाला उल्हसित करून गेले.
. . .
६.
६.
७ जानेवारीला दुपारी तीन पर्यंत माझे काम उरकल्यानंतर तिथे आम्ही डॉक्टर मित्रांनी मिळून एक छोटासा सांस्कृतिक कार्यक्रमही सादर केला त्यात मी माझ्या मायबोलीवरील या (https://www.maayboli.com/node/80635) लेखातील पहिल्या प्रस्तावनारूपी मजकूराचे अभिवाचन केले.
अखेर ठरल्याप्रमाणे दुपारी साडेचार वाजता छ. शि. म. ट. स्थानकात दाखल झालो. माझी बॅग सावरत सावरत चालत असतानाच समोरूनच धीम्या गतीने आलेली देखणी दख्खनची राणी अलगदपणे पुढे येऊन टर्मिनसला चिकटली. माझे सामान गाडीत ठेवून आलो आणि अर्धा तास फलाटावर मान एकदा डावीकडे आणि एकदा उजवीकडे करत भिरभिरत्या नजरेने बघत राहिलो.
म्हटलं, काल सकाळी जसा सतीश यांनी स्वतंत्रपणे येऊन भेटीचा सुखद धक्का दिला तसा आता देखील कदाचित एखादा ‘ऋ’पवान तरणाबांड माबोकर चुकून भेटतोय की काय? पण नंतर लगेचच स्वतःला सावरून मनाशी म्हटले,
“असे सुखद धक्के वारंवार बसायला आपले जीवन म्हणजे काय ‘एसआरके’चा चित्रपट थोडाच आहे?”
असो.
असे हे अचानक ठरवलेले परंतु चांगल्यापैकी यशस्वी झालेले मुंबईच्या भायखळ्यातील हिवाळी गटग. आतापर्यंतच्या प्रतिसादातून आपण सर्वांनी जे प्रेम व्यक्त केले आहे त्याबद्दल सर्वांचेच मनापासून आभार मानून आपली रजा घेतो.
* * * * * * * * *
खूप छान वृत्तांत कुमार सर.
खूप छान वृत्तांत कुमार सर.
पुण्यात गटग होईल तेव्हा आपल्याला भेटायची इच्छा आहे.
खूप छान वृ!
खूप छान वृ!
कुमार सरांना सा दंडवत.
कुमार सरांना सा दंडवत.
डॉक्टर म्हणून त्यांचं माबोवरचं योगदान माहिती आहेच. पण इतर अनेक विषयात त्यांचा दांडगा व्यासंग आहे.
त्यांच्या धाग्यावर लिहायची भितीच वाटते , कारण र्हस्व, दीर्घ वगैरे चुका , व्याकरणाच्या चुका झाल्या तर कुमार सर लगेचच पकडतील.
या गटगच्या निमित्ताने त्यांनी अनेक शब्द असे वापरले कि जे त्यांच्याकडून कधीच येत नाहीत. सुखद धक्का बसला. सरांना सर्व वयोगटाची भाषा अवगत आहे. खरंच कल्ला केला असेल.
छान वृत्तान्त.
छान वृत्तांत. डॉक्टरसाहेबांनी पण धाग्यावर शाहरुखला आणल्यामुळे, ते पण आता 'सरा'ईत झाले आहेत, म्हणून अभिनंदन.
मस्त वृत्तांत ऋतुराज, संजय
मस्त वृत्तांत ऋतुराज, संजय भावे आणि कुमार सर..!
तिघांच्याही वेगवेगळ्या आणि तरीही नर्मविनोदी शैलीने मजा आली. छानच झाले की हे छोटे गटग, गप्पाटप्पांनी समृद्ध झालेय.
डॉ महेश यांचे मायबोलीवर स्वागत
येथे येण्याचा रस्ता आहे पण परत जाण्याचा नाही, दोन नंबरच्या धंद्यासारखे आहे थोडेफार.
ऋपवान, जाडी वाढवलेला फोटो, पाऊण डॉक्टर>>>>
सगळ्यांचे वृत्तांत वाचले. फार
सगळ्यांचे वृत्तांत वाचले. फार छान एकत्र वेळ घालवलात तुम्ही लोकांनी.
कुमार१, तुमची पोस्ट मनापासून आणि जिव्हाळ्याने ओतप्रोत भरलेली आहे. छान वाटलं वाचुन.
काय तो वृत्तान्त.. काय तो
काय तो वृत्तान्त.. काय तो माहोल..
श्या थोडक्यात चुकले माझे..
अन्यथा तो ऋ’पवान तरणाबांड माबोकर मीच असतो आणि आपले आयुष्य सुद्धा एसआरकेच्या चित्रपटांसारखेच असते यावर तुमचा विश्वास बसवला असता
बाकी,
<<< तुमची पोस्ट मनापासून आणि जिव्हाळ्याने ओतप्रोत भरलेली आहे. छान वाटलं वाचुन...
>>
याला +७८६
कुमार सर,
कुमार सर,
किती भारी लिहिलंय. सुंदर आढावा घेतला सगळा.
<< तुमची पोस्ट मनापासून आणि जिव्हाळ्याने ओतप्रोत भरलेली आहे. >> अमितव यांना मम.
कुमार सर मस्तच वृतांत. मी काय
कुमार सर मस्तच वृतांत. मी काय मिस केलंय यांची जास्तीचं हळहळ वाटतेय वाचून. सगळ्या कोपरखळ्या झकास.
सगळ्यांचेच वृत्तांत छान आहेत. डॉ महेश यांचे स्वागत.
कुमार सर,
कुमार सर,
कुमार सर, वृतांत छानच कथन !!! सरांच्या भेटेची इच्छा पूर्ण झाली हे खूपच आनंददायक व Achievement !!!
‘ऋ’पवान तरणाबांड माबोकर
‘ऋ’पवान तरणाबांड माबोकर
‘एसआरके’चा चित्रपट थोडाच आहे?
>>> खतरनाक!
छान वृत्तांत, कुमार सर!
* काय तो वृत्तान्त.. काय तो
* काय तो वृत्तान्त.. काय तो माहोल..>>>
अं हं !
त्यापेक्षा मी म्हणेन की - काय ते एकाहून एक सरस सर्वांचेच प्रतिसाद !! आभार !
'एक नूर धागा तो दस नूर प्र." ही म्हण पुरेपूर सार्थ ठरवणारे आहेत ते.
सतीश यांच्या फोटोमुळे आता सर्वांना लक्षात आलेच असेल की हे गटग ही 'चौकडी' नसून "पंचम" होते !!
या पानावरील प्रतिसादांमधून
या पानावरील प्रतिसादांमधून रंजकतेबरोबरच अन्य काही विचार करण्याजोगे मुद्दे आलेले आहेत. त्यांची स्वतंत्र दखल घ्यावीशी वाटते.
१. इथल्या लेखनातील शुद्धलेखनाबाबत मला इथल्याच एका अन्य सदस्यांचे मत फार आवडलेले आहे आणि ते म्हणजे अति-शुद्धलेखनाचा आग्रह कोणाचाच नसावा परंतु जे काही लिहीले जाईल ते ‘स्वच्छलेखन’ असावे. त्याचा मी काढलेला अर्थ असा, की आपल्याला शाळेत जे किमान शुद्धलेखन शिकवले जाते त्याचे पालन झाले तरी पुरे. अगदी अलीकडे महाराष्ट्र शासनाने नवे सुधारित काय नियम केले आहेत, वगैरे गोष्टींमध्ये आपण फारसं डोकं घालण्यात अर्थ नाही. अखेर हे सामान्य माणसासाठीचे व्यक्त होण्याचे व्यासपीठ आहे; हा काही कुठल्याही ज्ञानशाखेचा वर्ग वगैरे नाही.
२. आता तरुणाईच्या काही शब्दांबद्दल, जे माझ्या लेखातून आले आहेत. कल्ला करणे आणि कट्टा टाकणे हे वाक्प्रचार आम्ही 1980 च्या दशकापासून वापरत आलेलो आहोत. त्यामुळे तसे ते आता प्राचीनच म्हटले पाहिजेत ! या आशयाचे सध्याच्या कॉलेज तरुणांचे काय वाक्प्रचार आहेत हे जाणून घ्यायला नक्कीच आवडेल.
३. एखाद्या गटगची उपस्थितांची संख्या आणि एकूण गटगचा कालावधी (तास/दिवस, इ ) याबाबत अनेकांची अनेक मते असणार आहेत. मी स्वतः कमी ते मध्यम लोकसंख्या प्रिय असलेला माणूस आहे. त्यामुळे मला चार ते सहा माणसांचे गटग सर्वाधिक आवडते. एरवी आपण आपल्या कुटुंबीय आणि मित्र परिवाराबरोबर विविध प्रकारचे ठोकळेबाज पर्यटन करतच असतोच. परंतु इथल्या गटगचा उद्देश यापेक्षा काहीतरी वेगळा आहे.
जी माणसे आपल्याला ऑनलाइन भेटून बऱ्यापैकी सूर जुळणारी (किंवा न जुळणारी) वाटताहेत ती जेव्हा प्रत्यक्षात समोर येतात तेव्हा त्यांच्याबरोबर वेळ घालवणे कुतूहलजनक असते आणि अशा छोट्यामोठ्या संमेलनातच आपण आपल्यासमोर बसलेला माणूस ‘वाचायला’ शिकतो. त्यातूनच आपल्याला त्याची थोडीफार ओळख समजू लागते. असे ‘माणूस वाचन’ हे चार ते सहाच्या समूहात प्रभावीपणे होते. (वै म ).
५. माझ्या समजुतीनुसार मुळात हे संस्थळ म्हणजे लेखनाला प्राधान्य देणारे व्यासपीठ आहे. त्यामुळे एखाद्या लेखनामध्ये फोटोंचा वापर कितपत करावा हा मुद्दा विचार करण्याजोगा आहे आणि यावर मतभिन्नताही असणार हे उघड आहे.
परवा सतीश आणि माझी चर्चा झाली त्यात आम्हाला असे जाणवले की आम्ही दोघेही एका बाबतीत अगदी समविचारी आहोत. ते म्हणजे, आपल्याला जे काही व्यक्त व्हायचंय ते आपण प्रभावी शब्दांमधूनच व्यक्त होऊयात, फोटो वगैरे बाबी लेखकाच्या दृष्टीने दुय्यम असाव्यात. त्यामुळे मुद्दामहून अधिकाधिक फोटो इथे चढवत राहावेत असे आम्हाला दोघांनाही काही वाटत नाही. अर्थात लेखनाच्या विषयानुसार विविध चित्रे, व्यंगचित्रे किंवा फोटोंचे महत्त्व असू शकते हे मी नाकारत नाही.
तारतम्य महत्वाचे !
अस्मिताच्या प्रतिसादाला
अस्मिताच्या प्रतिसादाला जोरदार अनुमोदन!
‘ऋ’पवान तरणाबांड माबोकर
‘ऋ’पवान तरणाबांड माबोकर
‘एसआरके’चा चित्रपट थोडाच आहे?
>>> खतरनाक! +१
मस्त वृत्तांत ऋतुराज, संजय
मस्त वृत्तांत ऋतुराज, संजय भावे आणि कुमार सर..!
नवीन वृत्तान्त वाचले.
नवीन वृत्तान्त वाचले.
कुमार१ , तुम्ही विनोद केलेले पहिल्यांदाच वाचले. हा मायबोली इफेक्ट समजावा का?
सदासुखी आणि सुधीर कांदळकर हे मायबोलीकर आहेत का?
ऋतुराज, तुम्ही माझ्या शेजारच्या गावचे आहत की ! कामाचं क्षेत्र फार्मसी / क्लिनिकल रिसर्च आणि निसर्गाची आणि वाङ्मयाची आवड व व्यासंग ! उत्तर मुंबई गटग करायचं का? शब्द गप्पा आणि पुस्तक प्रदर्शन कधी आहे? तिथे मी यापूर्वी मायबोलीकरांसोबत गेलो आहे. म्हणजे मला जायचंच होतं, त्यांना कळवल्यावर तेही आले.
कुमार सर,
कुमार सर,
तुम्ही लिहिलेला वृत्तान्त वाचून गटग चुकल्याची हळहळ वाढली. तुम्हा तिघांशीही भ्र. ध्व. वर बोलूनच ती कमी होईल.
तुमच्या प्रत्यक्ष भेटीचा योग लवकरच येईल अशी आशा करतो.
_/\_
* मायबोली इफेक्ट समजावा का? >
* मायबोली इफेक्ट समजावा का? >>>
हरकत नाही !
..
* सदासुखी आणि सुधीर कांदळकर हे मायबोलीकर आहेत का ? >>> होय.
सदासुखी यांचे वरती २ प्र आलेले आहेतच की !
सुधीर कांदळकर : https://www.maayboli.com/user/26217
प्रतिसादांमधून रंजकतेबरोबरच
प्रतिसादांमधून रंजकतेबरोबरच अन्य काही विचार करण्याजोगे मुद्दे >>>>> छान मांडलय कुमार सर.
उत्तर मुंबई गटग करायचं का? >>>>> भरत, नक्कीच. शुभस्य शीघ्रम.
शब्द गप्पा आणि पुस्तक प्रदर्शन कधी आहे? >>>
शब्द च डळमळीत असत. विचारून सांगतो.
मागच्या काला घोडा गटगला कुणी
मागच्या काला घोडा गटगला कुणी आलं नाही. यावरून मी एक नक्की केलं..............
यावरून मी एक नक्की केलं......
यावरून मी एक नक्की केलं.............>> काय? की काला घोडाला परत जायच नाही?
भरत, कुमारसरांनी या आधीही एक
भरत, कुमारसरांनी या आधीही एक मिश्किल शैलीतील लेख लिहिलेला आठवतोय मला.
नवीन पोस्ट आवडली कुमारसर. स्वच्छलेखनासाठी अनुमोदन.
आपल्याला जे काही व्यक्त व्हायचंय ते आपण प्रभावी शब्दांमधूनच व्यक्त होऊयात, फोटो वगैरे बाबी लेखकाच्या दृष्टीने दुय्यम असाव्यात. >>> ह्यालाही जोरदार अनुमोदन.
शुद्धलेखन, व्याकरण, फोटो ह्या सगळ्या आनुषंगिक गोष्टी लेखनाची तांत्रिक बाजू असते. तांत्रिक बाजूंनी लेखन नीटनेटके होते पण प्रगल्भ नाही होत कारण लेखनाचा आशय हाच त्याचा गाभा असतो.
कामाचं क्षेत्र फार्मसी / क्लिनिकल रिसर्च आणि निसर्गाची आणि वाङ्मयाची आवड व व्यासंग !
>>> ऋतुराज, कौतुक.
Pages