द्वेष : एक भय गूढकथा
अंतिम भाग
श्री आणि राजाभाऊ हताश मुद्रेने मागे परतले. जिना उतरत असतानाच तो आवाज त्यांच्या कानावर पडला. घुसमटलेल्या, क्षीण आवाजात कण्हण्याचा आवाज. त्यांनी एकवार एकमेकांकडे पाहिलं, आणि जवळजवळ धावतच जिना उतरून खाली आले. प्रियाच्याच रूममधून आवाज येत होता. दोघे पटकन आत शिरले. राजाभाऊंनी टॉर्चच्या उजेडाचा झोत आवाजाच्या दिशेने बेडवर टाकला, आणि ते चरकलेच. सोनाली बेडवर पडलेली, आणि प्रिया तिच्या छातीवर बसून तिचा गळा आवळण्याचा प्रयत्न करत होती. श्री एका झेपेत तिच्यापाशी पोहोचला, आणि तिला सोनाली पासून दूर करण्याचा प्रयत्न करू लागला. प्रियाच्या तोंडून रागारागाने खरखरीत आवाजात हुंकार बाहेर पडला. तसे थरारून राजाभाऊ भानावर आले, आणि तेही प्रियाजवळ जाऊन तिला खेचण्याचा प्रयत्न करू लागले ; पण हाताच्या एकाच धक्क्याने प्रियाने त्यांना बेडवरून खाली ढकललं. प्रकाराची बऱ्यापैकी कल्पना असूनही राजाभाऊ तिच्या ताकदीमुळे चकित झाले ; पण विचाराला वेळ नव्हता. प्रिया जोरजोरात हिसके देऊन श्रीला ढकलू पाहत होती. राजाभाऊ झटकन उठून पुन्हा तिच्यापाशी गेले. शेवटी अथक परिश्रमांनंतर - मुळात खरी 'ताकद' श्रीनेच लावली असणार. राजाभाऊंना खात्री होती - बऱ्याच वेळाने ते प्रियाला सोनाली पासून दूर करण्यात यशस्वी झाले. श्रीने आपल्या अंगरख्यातील खिशातून एक नारंगी-पिवळ्या रंगाचा, जाडसर धागा काढला. मागच्या वेळी या घरात आल्यानंतर प्रिया त्या दुष्ट शक्तीच्या अंमलाखाली गेली, तेव्हा तिला घरातून बाहेर काढण्यासाठी सेम असाच धागा श्रीने तिच्या हातांना बांधला होता ( गुंता सोडवायला श्रीने प्रियाला सोडल्यावर फक्त मिनीटभर तिला एकट्याने धरून ठेवतानाही राजाभाऊंची तारांबळ उडत होती ) श्रीने चटकन प्रियाचे दोन्ही हात एकत्र करून तो धागा बांधला. प्रियाच्या शरीराचा तडफडाट झाला.
" तुम्ही सोनालीकडे पहा." प्रियाला धरत श्री राजाभाऊंना म्हणाला, आणि तिला घेऊन बाहेर गेला. राजाभाऊ किचनमधून पाणी घेऊन आले. सोनालीच्या पाठीमागे हात घालून त्यांनी तिला अलगद उठवलं. आणि हळूवारपणे तिच्या डोक्यावरून पाठीवरून हात फिरवू लागले. तिला थोडं बरं वाटू लागल्यावर तिला पाणी प्यायला दिलं. ग्लास टेबलावर ठेवून ते परत सोनालीकडे वळाले, तेव्हा सोनाली एकटक त्यांच्याकडेच पाहत होती. त्यांनी इशाऱ्याने 'काय' म्हणून विचारलं. सोनालीने मंद स्माईल करत नकारार्थी मान हलवली, आणि एकदम त्याला बिलगली. राजाभाऊंना हे जरा अनपेक्षितच होतं. ते सहाजिकच चकित झाले ; पण मग त्यांनीही आपला हात तिच्या पाठीशी नेत तिला कवेत घेतलं.
•••••
पुन्हा जागा नेमकी तीच. हॉलचा मध्यभाग ; पण आता श्री खुर्चीवर बसलेला. पुढे गोलाकार टी पॉयवर ती शांतपणे तेवणारी मेणबत्ती. आणि पलीकडल्या खुर्चीवर प्रियाला (?) हातपाय जाड दोरीने बांधून बसवलेलं.
" आता तरी सगळं सांगणार आहात ना ? कोण आहात तुम्ही ? आणि प्रियाला का छळत आहात ? " श्रीने शांत, नरमाईच्या सुरात विचारलं.
" तुला सांगितलं ना एकदा... " त्याच थंड, जहरी आवाजात उद्दामपणे प्रिया म्हणाली - " तुझ्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर द्यायला मी बांधील नाहीये."
एक हळूवार सुस्कारा टाकून श्री म्हणाला -
" सुंभ जळला तरी पिळ जात नाहीये. ठिक आहे. उत्तरं तर तुम्हाला द्यायलाच लागतील, आणि प्रियाला सोडूनही द्यावं लागेल." श्री आत्मविश्वासाने म्हणाला.
" हूं." तुच्छतेने प्रिया म्हणाली. " मुळीच नाही. आणि तू माझं काहीही वाकडं करू शकणार नाही."
" पहालच आता." हलकंसंं स्मित करत श्री म्हणाला. त्याने क्षणभर डोळे मिटले, आणि उघडले. तेव्हा त्याच्या प्रेमळ, नितळ नजरेला एकदम एक वेगळीच धार चढली होती. एकदम असंख्य काटे शरीराला बोचल्यासारखी प्रिया वेदनेने विव्हळू लागली. कळवळू लागली. मात्र तिच्या चेहऱ्यावरील कठोरता, उद्दामपणा तसाच होता.
*****
एकदम सोनालीने मान वर करून राजाभाऊंकडे पाहिलं. तिच्या सुंदर, पाणीदार डोळ्यांत नशीलेपण उतरलं होतं. एक मूक विनंती त्या डोळ्यांत होती. तिचे नितळ, गुलाबी ओठ थरथरत होते. राजाभाऊंनी ते भाव अचूक ओळखले. सोनाली एकदम त्यांना चकित करू लागली होती ; पण आता फार विचार करत बसून चालणार नव्हतं, अन् राजाभाऊंची तशी इच्छाही नव्हती. सोनालीची नाजूक हनुवटी बोटांच्या चिमटीत धरून त्यांनी अधीरतेने आपले ओठ तिच्या ओठांवर टेकवले. तिच्या पाठीवरील हात खाली कमरेवर आणून तिला त्यांनी अजूनच जवळ ओढलं. त्यांचे ओठ अजूनच बेभानपणे तिच्या नाजूक ओठांशी खेळत होते. त्यांच्या त्या आवेगाने सोनालीही क्षणभर बावरली ; पण मग त्यांच्या गालावर हात ठेवून तीही त्यांना साथ देऊ लागली.
*****
असाच काही वेळ उलटून गेला होता. श्रीच्या नजरेतील धार अजूनच तीक्ष्ण झाली होती. आणि प्रियाच्या चेहरा वेदनेने पिळवटून निघाला होता. त्यावरील कठोरता पार पुसला गेला होता.
" थांब..." एकदम तिच्या तोंडून शब्द बाहेर पडले. " सांगते. सगळं सांगते."
श्रीने मंद स्मित करून डोळे अलगद मिटले. आणि उघडले. त्याची नजर पूर्ववत शांत, नितळ झाली होती. प्रियाचीही वेदना कमी झाल्याचं दिसून येत होतं. मग ती (किंवा तिच्या शरीरातील ती) बोलू लागली. श्री शांतपणे, लक्षपूर्वक ऐकू लागला ; पण जसजशी ती पुढे सांगत गेली, तशी श्रीची स्थितप्रज्ञता किंचित ढळू लागली. त्याच्या चेहऱ्यावरील भाव झरझर बदलत होते.
तिचं सगळं काही सांगून झालं. श्री कठोरपणे तिच्याकडे (?) पाहत होता. त्याने आपली मान किंचीत वर केली. शांभवी मुद्रेप्रमाण बुबुळे डोळ्यांच्या वरच्या कोपऱ्यात एकत्रित करून त्याने डोळे किंचित मिटले, आणि अगदी खोल, कुजबूजत्या आवाजात काही मंत्र पुटपुटू लागला. प्रिया एकदम जोरजोरात तडफडू लागली.
" नाही... नाही.." प्रिया खोल गेलेल्या आवाजात ओरडण्याचा प्रयत्न करू लागली. मात्र तिकडे पूर्णतः दुर्लक्ष करून श्री मंत्रोच्चारावर लक्ष केंद्रित ठेवलं. आणि...
काहीच क्षणात प्रियाच्या तोंडून किंकाळी बाहेर पडली. आणि मग हळूहळू तिचं आखडलेलं शरीर सैलावत गेलं. वेदना पार पुसली जाऊन तिचा सुंदर चेहरा पूर्वीसारखा निरागस दिसू लागला.
*****
" श्री. ती बाई होती ना, ती..."
" थांब प्रिया..." तिचं वाक्य मध्येच तोडत श्री म्हणाला " आता या गोष्टी मनातून काढून टाक. मला थोडीशी कल्पना येते आहे. त्या बाईंना कदाचित तो ओळखलं होतंस. आणि त्याबद्दलच तुला मला सांगायचं आहे ना ? "
यावर प्रियाचे हावभावच पुरेसे बोलके होते.
" पण त्याची खरंच आवश्यकता नाहीये. मला हे सारं सांगून त्या आठवणी तुझ्या मनातही पुन्हा ताज्या होतील. तसं व्हायला नको. त्या बाईंशी संबंधित असलेला तुझा भूतकाळ, आणि गेल्या काही दिवसांत जे काही झालं ते तू आता विसरण्याचा प्रयत्न कर. हे सहज शक्य होणारं नाही, मला माहिती आहे ; पण प्रयत्न तर करायला हवा ना ? "
हसून प्रियाने होकारार्थी मान हलवली.
" थॅंक्यू श्री..." ती काहीशी भावूक होत म्हणाली. श्रीने हसत तिचा खांद्यावर थोपटलं.
" येते..." असं म्हणून ती आपली बॅग घेऊन बंगल्याकडे निघाली. तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे जरावेळ शांत, गंभीर मुद्रेने पाहत श्री रस्त्यावरच उभा राहिला. मग हळूच त्याची नजर बंगल्याच्या वरच्या मजल्यावरील 'त्या' खोलीच्या खिडकीकडे गेली. हळूच खिडकीवरचा पडदा जरा बाजूला सरकला. ठिणगी सारखे दिसणारे दोन डोळे त्याच्याकडेच पाहत होते.
मंद स्मित करत श्रीने किंचित मान झुकवली.
समाप्त
© प्रथमेश काटे
वाचक मित्रांनो, आधी या भागाला लागलेल्या मोठ्या विलंबासाठी आपली मनापासून माफी मागतो. मला कल्पना आहे की कथेचा असा शेवट कदाचित् तुमच्यासाठी असमाधानकारक असेल. या भागातून तुम्हाला काही नवे प्रश्न पडले असतील. तर, त्या सगळ्याच प्रश्नांची उत्तरे घेऊन कथेचा दुसरा सीझन लवकरच येईल. मी समजू शकतो, आपलं कुतूहल पूर्णपणे शमलेलं नसणार ; पण या कथेचा एक सीझन मी कम्प्लीट केला याचं समाधान आहे. पुढील सीझन शक्य तितका छोटा ठेवून लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न असेन. तोही सीजन आपल्या पसंतीस पडेन अशी खात्री आहे. धन्यवाद.
( अकराव्या भागात छोटासा बदल केला आहे. पुन्हा वाचा. )
शेवट थोडा खुलवायला हवा होता.
शेवट थोडा खुलवायला हवा होता.
सोनाली आणि राजाभाऊ चं प्रकरण समजलं नाही
सोनाली मध्ये सुद्धा आत्मा आली होती का?
.
बाकी series छान होती
.
वरती लावलेला फोटोतला कोण आहे?
मस्त दिसतो आहे, पण तो श्री, राजाभाऊ किंवा भूत वाटत नाही.
सोनाली आणि राजाभाऊ चं प्रकरण
सोनाली आणि राजाभाऊ चं प्रकरण समजलं नाही
सोनाली मध्ये सुद्धा आत्मा आली होती का? >> त्या दोघांमध्ये लव्ह अँगल तयार होत आहे. सहाव्या भागातच त्याची हळूहळू सुरूवात होताना दाखवलं आहे.
तो फोटो रस्त्यावरून बंगल्याच्या खिडकीकडे पाहणाऱ्या श्रीचं प्रतिक आहे. अर्थात, अगदी तंतोतंत नाहीये ; पण जसा मिळाला तसा अपलोड केला.
.
आधीच्या भागांच्या लिंक्स अ
आधीच्या भागांच्या लिंक्स अॅड कराल तर सलग वाचतील लोक.
कथेचा एक सीझन << सीझन खटकते - भाग तरी म्हणा.
आधीच्या भागांच्या लिंक्स अॅड
आधीच्या भागांच्या लिंक्स अॅड कराल तर सलग वाचतील लोक.>> खरच.
बाकी शेवट ठीक ठाक आहे. एकूण कथा आवडलीच.
"त्याची नजर बंगल्याच्या वरच्या मजल्यावरील 'त्या' खोलीच्या खिडकीकडे गेली. हळूच खिडकीवरचा पडदा जरा बाजूला सरकला. ठिणगी सारखे दिसणारे दोन डोळे त्याच्याकडेच पाहत होते.
मंद स्मित करत श्रीने किंचित मान झुकवली."
शेवट वाचून असे वाटले की हा तात्पुरता शेवट आहे . अजून एपिसोड येणार आहेत.
सीझन खटकते - भाग तरी म्हणा. >
सीझन खटकते - भाग तरी म्हणा. >> मुळात 'पर्व' हा योग्य मराठी शब्द आहे. स्वतः तुम्हालाच योग्य शब्द ठाऊक नाही, आणि तुम्ही मराठी भाषाच असली पाहिजे असा अट्टाहास करता म्हणजे जरा नवल वाटते. माझा भाषा प्रेम प्रॅक्टिकल आहे. जिथं इंग्लिशचा वापर करावा वाटतो, तिथे करतो. जिथे नॅचरली मराठी शब्द मनात येतो, तिथे मराठी भाषेचा उपयोग करतो. सगळीकडे मराठी मराठी करायलाच हवं हे गरजेचं वाटत नाही.
सीजन म्हणा नाहीतर पर्व (तस
सीजन म्हणा नाहीतर पर्व (तस सीजन हा शब्द अजूनही काही लेखकांनी माबो वर वापरला आहे)...
एकांदिरत कथा बरी झाली होती, पण तुमचा नेहमीचा सूर लागला नाही , मधे वेळ पण बराच गेला त्यामूळे "बरी झाली" अस म्हणावं लागत.
शेवट मात्र पटकन कथा आटोपल्या सारखा वाटल तरी छान केला आहे, पुढे अजूनही काही आहे ही उत्कंठा वाचकांच्या मनात उतरविण्यात तुम्ही यशस्वी झालात.
पुढील लेखनासाठी शुभेच्छा
रक्तपिपासू वाचतोय...
भाग शब्दाचे दोन अर्थ आहेत.
भाग शब्दाचे दोन अर्थ आहेत. त्या पेक्षा पर्व ठीक वाटतो.