भयंकर, अस्वस्थ करणारे

Submitted by रघू आचार्य on 15 October, 2024 - 09:49

हा व्हिडीओ डिस्टर्बिंग वाटू शकेल. त्यामुळे आपल्या जबाबदारीवर पहा.
https://www.youtube.com/watch?v=GYnbUiokKM8

आताच अ‍ॅमेझॉनवर ग्रेट इंडीयन फेस्टीवल झाला. या दिवसासाठी अ‍ॅमेझॉन वर्षभर तयारी करत असते. फ्लिपकार्ट आणि अन्य ऑनलाईन स्टोअर्स सुद्धा आपापले असे शॉपिंग फेस्टिव्हल आयोजित करत असतात. डेकॅथलॉन हा एक ब्रॅण्ड सुद्धा यासाठी प्रसिद्ध आहे. यांच्याकडे क्लिअरन्स सेल सुद्धा असतो. या उत्सवा दरम्यान मोठ मोठे डिस्काउंट्स दिले जातात. त्यामुळे या चार ते पाच दिवसांसाठी कधी कधी वाढीव चार दिवसांसाठी खूप मोठा ताण या स्टोअर्सच्या कामगारांवर येतो.

वर्षभरात जेव्हढा सेल होत नाही तेव्हढा या चार दिवसात होतो. म्हणजेच ३६० दिवसाचे काम चार दिवसात !
मनुष्याच्या क्षमतेच्या पलिकडे हा लोड असतो. अ‍ॅमेझॉनवर असा एक यूट्यूब वर व्हिडीओ उपलब्ध होता. तो बहुधा कंपनीने डिलीट करायला लावला असावा. कारण हे शोषण आहे. आठ तास काम हे शास्त्रशुद्ध पाहणीनंतर, अनेक अहवालानंतर संमत झालेले आहे. इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग नावाच्या विषयात एखादा मनुष्य किती काम करू शकतो, दोन हातांनी किती काम करू शकतो याची पाहणी कशी करायची आणि काम कसे नेमून द्यावे हे शिकवत. पुढे त्यात मानवी मर्यादा आल्या. निरनिराळ्या हॅण्डबुक्स मधून मानवी शरीराची क्षमता सांगितलेली असे.

आता कम्युनिस्ट चीननेच बारा तास रोबोपेक्षाही भयानक रितीने कामगारांना राबवून घ्यायला सुरूवात केली आहे. यामुळे स्वस्तात उत्पादने देणे शक्य होते. चीनच्या चलनाचा दर, उपलब्ध असलेले मनुष्यबळ यामुळे लेबर स्वस्तात उपलब्ध आहे. त्यांच्या शोषणाच्या कहाण्या पोलादी पडद्याआडच रहात असत. दारिद्र्य आहे म्हणून त्याचा फायदा घेणे आहे हे. यालाच शोषण म्हणतात. काही भलावणकार आम्ही रोजगारनिर्मिती करतो असे म्हणतात. पण श्रम तर लागणारच आहेत. मोठी लोकसंख्या रोजगारापासून वंचित ठेवणे हे (रक्तरंजीत?) क्रांतीला निमंत्रण असते.

भारतातही आता बारा तासांचे काम सुरू झाले आहे. ते ही सकाळी जी क्षमता असेल त्याच क्षमतेने पूर्ण बारा तास काम करावे या अपेक्षेने.
हे सगळं कुठे जाणार आहे ? हे सगळं भयंकर आहे. रोबो हा यावरचा उपाय आणखी भयानक आहे. भीक नको पण कुत्रं आवर अशा पद्धतीने रोबो आता सगळं काम करू लागलेले आहेत.

खरंच आपण सोपी लाईफस्टाईल सोडून कुठे चाललो आहोत. आपल्या मुलांना असे राबावे लागले तर ? काही सांगता येत नाही.

टीप : मध्यंतरी सातत्याने मानवी मूल्यांबाबत मांडणी करणार्‍या एका महाभागाने अशाच एका विषयात त्याच्या पक्षावर ठपका आल्यावर "मग काय हाताने टायपिंग करायचे का ?" असा प्रश्न विचारला होता. एका वाक्यात हवा काढायची ही युक्ती यांना पक्षाच्या आयटी सेल मधे शिकवली जाते. टूलकीट येते. त्यामुळे अ असो कि ब, या दोन्ही पक्षाच्या समर्थकांनी या विषयावर मत मांडू नये ही हात जोडून कळकळीची विनंती. तुम्हाला एकट्यालाच मतस्वातंत्र्य आहे असा अर्थ सोशल मीडीयावर तुम्ही काढलेला आहे. इतरांना लेबले लावून त्यांची मतं मोडीत काढणे, कुणी राष्ट्रद्रोही ठरवणे, कुणी धर्मद्रोही ठरवणे आणि आमच्या सोबत नसाल तर खलप्रवृत्तीसोबत तुम्ही आहात असा दम भरून आपले घोडे दामटणे यामुळे चर्चा करणे अशक्य झालेले आहे. त्यामुळे ज्या सत्राशेसाठ विषयांची आपण वासलात . विल्हेवाट लावत असता, त्याच धाग्यावर सुखाने नांदावे ही विनंती.
एकही प्रतिसाद मिळाला नाही तरी चालेल. पण उगाच पक्षीय पातळीवर विषय भरकटण्यापेक्षा ते लाखपटीने परवडलं.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कामाचे तास कमी ठेवून जास्त लोकांना नोकरीवर ठेवण्यापेक्षा हे कमी लोकांकडून जास्त काम करून घेण्याच्या मागे आहेत. प्रवासाचा वेळ पाहता कामगाराची कार्यक्षमता कामाच्या सुरवातीला आणि कामाचा कालावधी संपत असताना सारखी सलग किती दिवस राहू शकेल. काही गडबड, अपघात झाल्यास कोण जबाबदारी घेणार? त्यावेळी असे म्हणणार नाही की कामाचे तास वाढले म्हणून अपघात झाला तर कामगाराची कार्यक्षमता कमी झाली म्हणून अपघात घडला.

कोण हे असे बिनडोक बदल करतात - कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर , मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार .

ही सुधारणा सर्वपक्षीय बहुमताने सहमत झाली आहे का ?- आपल्या लाडक्या पक्षाने न आवडणारी गोष्ट केली की विरोधी पक्ष काय करतो असे विचारायची साथ पसरत चालली आहे.

जरी मी भाजप ला मतदान करत असले तरी हा निर्णय जोड्याने बडवायच्या लायकी चा आहे. लोकांची सहनशक्ती , शारिरीक क्षमता याचा काही विचार केलाच नसणार आहे.

या प्रश्नाची दुसरी बाजू:
या देशात संघटित किंवा असंघटित कामगार वर्गापेक्षा शेतकरी व व्यापारी फेरीवाले यांची संख्या जास्त आहे.
ते किती तास काम करतात याची जाणीव आहे?
किमान 12 ते 14 तास काम त्यांना करावेच लागते. त्यातही उत्पन्नाची हमी नसते .
कामगारांना उत्पन्नाची हमी असते व या कायद्यामध्ये
नऊ ते बारा तास काम हे जास्तीत जास्त आहे. मध्ये दर चार तासांनी त्यांना अर्धा ताससुट्टी देण्याची व्यवस्था बदललेली नाही.
कामगार न्यायालयामध्ये जाऊन पहा.
गुंड लोकांच्या कामगार संघटना मध्यम आकाराच्या कारखानदारांना, दुकानदारांना कशा लेबरकोर्टात मध्ये खोट्या केसेस घालत जेरीला आणतात.
अगोदर गयावया व अजीजी करून कामाला लागणारा माणूस त्याच्या वाचून मालकाचे काम आडते असे समजल्यावर बरोबर सीजनच्या वेळेस कशा दांड्या मारतो, महत्त्वाच्या वेळेस कॉलिटी खराब होईल असे काम कसे करतो, याचा अनुभव कुठल्याही व्यापाऱ्याला वा छोट्या कारखाना दाराला विचारा.
एकदा काम सोडून गेल्यावर परत न येणे ,इतर कामगारांना पूर्ण आउटपुट देण्यास मज्जाव करणे. नवीन रिक्रुट साठी लोकं कामावर
येत असता त्यांना दादागिरी करून बाहेरच्या बाहेरहाकलून लावणे इत्यादी सर्व प्रकार होतात.
कामगार हा अशक्त आणि मालक सशक्त ही समजूत आता हळूहळू कालबाह्य होत चालली आहे.
एवढेच येथे नमूद करून इच्छितो आपल्याला वाटते तितके बहुतेक कामगार शोषित पीडित, सरळ, गरीब , बिचारे नसतात एवढेच.

<< या प्रश्नाची दुसरी बाजू:>>
------- दोन्ही बाजू बरोबर कशा आहेत याबद्दलची अनेक उदाहरणे मिळतील. कुठेतरी बॅलन्स हवा, कंपनी टिकली तर नोकरी आहे पण कामगारांची पिळवणूक करणरेही डोक्यांत जातांत.

कामगारांनी बारा तास काम करावं याचं समर्थन करण्यासाठी देण्यात येणारी उदाहरणं म्हणजे वडाची साल पिंपळाला लावणे !

कामगारांनी बारा तास काम करावं याचं समर्थन करण्यासाठी देण्यात येणारी उदाहरणं म्हणजे वडाची साल पिंपळाला लावणे>>> +१०००००

सध्या अस्तित्वात असलेल्या कामगार कायद्यातील तरतुदींचे असंघटीत क्षेत्रातील 'दुसऱ्या बाजुचे' मालक लोक नोकरी देताना, कामाचे तास निश्चित करताना, वेतन देताना, वेतन कापताना, हक्काच्या सुट्ट्या निश्चित करताना ज्या काटेकोरपणे पालन व पाठपुरावा करतात व कामगार लोक ज्या माजोर्डेपणाने वर्तन करत मालकांना नाडतात हे पाहीले असता सध्या मालक लोक अशक्त पडत चालले आहेत या दाव्याला दुजोरा देण्यावाचून काहीही पर्याय शिल्लक रहात नाही आहे हे उघड उघड सर्वत्र दिसत आहे.

Pages