एका श्रद्धांजलीची चिरफाड

Submitted by प्रकाश घाटपांडे on 16 August, 2024 - 03:53

डॉ शंतनू अभ्यंकरांचे निधन झाले ही बातमी सांगण्यासाठी एकाने नास्तिक विचारांच्या कायप्पा गटात तिथे एक मजकूर फार्वर्ड केला होता. मजकूर असा होता.
कळवण्यास अत्यंत दुःख होते की सुप्रसिद्ध स्त्री आरोग्य तज्ञ डाॅ. शंतनु अभ्यंकर यांना आज देवाज्ञा झाली. त्यांच्या कुटूंबीयांना हे दुःख सहन करायची ताकद मिळो ही परमेश्वर चरणी प्रार्थना.
भावपूर्ण श्रद्धांजली
झाले उजळ नास्तिक गटावर चर्चा चालू झाली
एकाने म्हटले की कोण येडझवा असले मेसेज बनवतो? आपण किमान ते फॉरवर्ड तरी करू नयेत ना! ‌अभ्यंकर नास्तिक होते.
दुसरा म्हणाला कि अरे मतितार्थ लक्षात घे.
नाही. हा खोडसाळपणा आहे. शोक व्यक्त केला नाही तरी चालेल. त्या गहिऱ्या संवेदनां‌अभावी आजवर कोणी नातेवाईक मेलेले नाहीत. पण जर शोकसंदेश द्यायचाच असेल तर तो आमच्या टर्म्सवरच द्या. असे एक मत व्यक्त झाले

परमेश्वर चरणी प्रार्थना करणाऱ्याने एवढे लक्षात ठेवायला हवं की, शंतनू अभ्यंकर आणि त्यांचे पूर्ण कुटुंब हे पूर्णपणे नास्तिक होते. तेव्हा अशा प्रकारच्या प्रार्थना करणारे आणि असे मेसेज फॉरवर्ड करणारे त्या विवेकी कुटुंबाचा अपमान करत असतात.हा मेसेज फॉरवर्ड करणाऱ्याने विचार करायला नको? की तो पण डोळे मिटून अंधभक्तांसारखाच वागणार? असे देखिल एक मत व्यक्त झाले

फॉरवर्ड करणारे गृहस्थ उजळ नास्तिक समूहाचे सदस्य आहेत, त्यांनी किमान तारतम्य बाळगून एडिट करायला हवा होता किंवा दोन ओळीचा त्यांच्या निधनाचा वेगळा मेसेज टाकायला हवा होता असे वाटते. अशी एकाने टिप्पणी दिली

आता मी त्या गटात होतो . अधूनमधून मी ही तिथे लिहित असे मी म्हणालो कि देव न मानणार देव माणूस अशी प्रतिक्रिया देणारे अनेक सश्रद्ध अस्तिक लोक असतात कि ज्यांना संबंधित व्यक्ती नास्तिक आहे हे माहित असते. त्यांची आदरांजली वहाण्याची ती पद्धत आहे. सश्रद्ध लोकांना त्यांच्या पद्धतीने आदरांजली वहाण्याचे अभिव्यक्तिस्वातंत्र्य आहेच. समजा ते फॉर्वड केले तरी त्यामागचा आशय समजून घेणे महत्वाचे.

त्यावर त्या सदस्याने असे सांगितल की आशय जाउ द्या वैश्विक पोकळीत. त्यांच्या संवेदना त्यांनी स्वतःपाशी ठेवाव्यात. इथे कोणाला शोकसंदेशांची भीक लागलेली नाही

त्यावर मी असे म्हणालो कि शंतनू चिकित्सक व नास्तिक असला तरी हेकट नव्हता. इतरांच्या भावना त्यांच्या भाषेत समजावून घ्यायचा.

मग त्याने सांगितले की शंतनू हेकट नव्हते तर तसले आचरट मेसेज केवळ शंतनूंना पाठवा

त्यावर मी असे म्हणालो की देवाने खुद्द त्याची जागा स्वर्गात राखून ठेवली आहे. देव स्वत: न्यायला आला होता नास्तिकाचे रुप घेउन. शंतनूने ओळखले पण देवाशी पण गप्पा मारल्या. कारण तो देव मानत नसला तरी देव मानणार्‍यांना शत्रू पण मानत नव्हता. आता ही संवादाच्या ओघातील टिप्पणी आहे, यात भाषिक सौंदर्य आहे. परमेश्वराने सुद्धा शंतनूविषयी आदर दाखवला कारण शंतनू परमेश्वराला शत्रू मानत नव्हता. असे मला सूचित करायचे होते. शंतनूच्या लिखाणातील भाषाशैली ही हलकी फुलकी विनोदी उपमा अलंकार वाकप्रचार बोली भाषा यांनी समृद्ध असायची.
त्यावर त्यांनी असे सांगितले की हा मेसेजही आम्हाला नको
त्यावर मी म्हणालो पण वाचून झालाच ना!
त्यावर त्यानी ते पाठवणाऱ्याचा अपमान करता आला अशी आशा करतो असे वक्तव्य केले
मी त्या वक्त्यव्यावर असे म्हणालो कि दाभोलकर म्हणायचे ती भावना आपण स्वीकारली नाही कि त्याला ती परत घेउन जावी लागते.
तेही वारले आता. जे जिवंत आहेत ते नियम ठरवतात. सध्याचे नियम मी ठरवतो. अशी त्या सदस्याने टिप्पणी दिली

आता या चर्चेनंतर मी "हा डॉ शंतनू अभ्यंकरांचा ब्लॉग. जरुर वाचा" हा संदेश द्यायला आलो होतो तर मला ग्रुपवरुन काढून टाकल्याचे दिसले.त्यामुळे पुढील संवादच खुंटला आता या ग्रुपवरील मंडळी काही माझी शत्रू नाहीत. शंतनू पण या कायप्प गटात होता. क्वचित कधीतरी लिहित असे. त्याचे लिखाण अत्यंत संयत असे. मी सुद्धा या गटात अधून मधून लिहित असतो. या गटाचे नास्तिक मेळावे होत असतात. मागच्य वर्षी पुणे व सांगली इथे मेळावे झाले होते. त्यापैकी पुण्यातील मेळाव्याला मी गेलो होतो. गटातील काही धुरीण लोक कठोर नास्तिक व तर्ककर्कश आहेत. शुभ, श्रद्धा, देव असे शब्द चर्चेत जरी आले की त्यांची सटकते. सर्वच तसे नाहीत. फार कमी लोक कडवे आहेत. अशाच एका वैचारिक चर्चेत मी दाभोलकरांच्या श्रद्धांजली बाबत ही इथे खालील प्रमाणे लिहिले होते कि जे मी अन्य चर्चापीठांवरही वेळोवेळी लिहिले होते. 2007 पासून मी अशा विषयांवर उपक्रम, मिसळपाव,मनोगत, ऐसी अक्षरे व मायबोलीवर लिहित आलो आहे. यात नवीन असे काही नाही. श्रद्धांजलीच्या चिकित्सेची पार्श्वमूमी समजावी व त्यावर चर्चा व्हावी म्हणुन मी हे सगळे नमुद करत आहे.
----------------
दाभोलकरांच्या स्मृतीस विनम्र "श्रद्धांजली" अशा प्रकारची आपली भावना व्यक्त करणारे अनेक माणसे आहेत. वेगवेगळ्या विचारसरणीची आहेत. दाभोलकरांविषयी आदर व प्रेम व्यक्त करण्याची त्यांची पद्धत आहे.
अंनिस मधे काही कडवे कार्यकर्ते श्रद्धा शब्द वापरत नाहीत.बाकी शब्द योजना करताना अंनिस वार्तापत्रात शुभेच्छा ऐवजी जाणीवपुर्वक सदिच्छा हा शब्द वापरला जातो. दिवाळी अंका ला दिवाळी अंक न म्हणता वार्षिक विशेषांक म्हटले जाते. व्यासपीठा ऐवजी विचारपीठ म्हटले जाते. असे नाही केले तर आपणच अंधश्रद्ध ठरु कि काय अशी भीती वाटते की काय कोण जाणे? शुभ शब्दाचे वावडे असल्याने मी शुभांगी नावाच्या एका मैत्रिणीला गमंतीने सदांगी म्हणतो.
दाभोलकर शब्दच्छला विषयी अनौपचारिक गप्पा मारताना सांगायचे कि जेव्हा पुरुष असे म्हणतो कि मी भीती ने अगदी गर्भगळीत झालो. तेव्हा तू पुरुष आहे तुला कसला आलाय गर्भ? असे आपण म्हणतो का? भाषेतले अनेक शब्दप्रयोगांचे शब्दशः अर्थ घ्यायचे नसतात. हा किस्सा जेव्हा मी जेव्हा सदानंद मोरेंना सांगितला तेव्हा ते म्हणाले की बुद्धीवादी कार्यकर्ते लोकभाषा बोलत नाहीत. पण लोकभाषेमुळे एक भावनिक जवळीक साधली जाते. हे अगदी खर आहे. पण या मुद्द्याची दुसरी बाजू पण आहे. लोकभाषेची परंपरा गतानुगतिकतेनसार राखली तर समयोचित सुयोग्य पर्यायी शब्द रुढ होणार नाहीत. त्यामुळे डॉ दाभोलकरांच्या स्मृतीस "आदरांजली" हे ही तितकेच उत्कट व भावपूर्ण आहे.
-----------------
मी स्वत: अंनिस मधे 1988-89 पासून कार्य करतो. माझे ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी... प्रश्नोत्तरातून सुसंवाद असे पुस्तक अंनिस ने देखील प्रकाशित केले आहे. शिवाय अंनिस वार्तापत्राचा लेखक पुरस्कार ही मला मिळाला होता. 2008 मधे झालेल्या फलज्योतिष चाचणीचा मी समन्वयक होतो. नारळीकर, दाभोलकर, संख्याशास्त्रज्ञ कुंटे व समन्वयक मी अशी चाचणी टीम होती. सर्व पत्रिका मी स्वत: तयार केल्या होत्या. दाभोलकर गेल्यानंतर माझा अंनिसतील सक्रिय सहभाग कमी झाला. पण मी आजही संपर्कात व हितचिंतक आहे. शंतनू अभ्यंकरांशी ही माझा व्यक्तिगत परिचय, संवाद व संपर्क होता. लिव्हिंग विल, अवयवदान, इच्छामरण अशा विषयांवर आमची देवाण घेवाण होत असे. आमच्या दोघांचेही लिव्हिंग विल माझ्या बायकोने नोटराईजड केल होते. मुख मुद्दा हा कि अशा पद्धतीचे अनेक लिखाण मी समाज माध्यमात करत असतो. त्यावर प्रतिक्रिया येतात. त्यातून समाज मनाची स्पंदने कळतात. अशा वैचारिक चर्चा संवाद या सामाजिक नोंदी असतात. मायबोलीवर अशा अनेक विषयाची नोंदी आहेत. सामाजिक दस्तैवज म्हणून त्याचे एक महत्व आहे त्यामुळे मला हे इथे मुद्दाम नमूद करावेसे वाटले. यावरील प्रतिक्रिया या मानसशास्त्रीय अभ्यासासाठी देखील उपयुक्त ठरतील याबाबत माझ्या मनात शंका नाही.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

एक लेखक, प्रतिसादांमधे काही नवीन माहिती तर काही पूरक माहिती असते. ती त्या त्या वेळी दिली जाते. उदा. मी नास्तिकांचे प्रकार या व्ह्डिओची लिंक दिली आहे जी चर्चेसाठी पूरक आहे असे मला वाटते. तुमची आयडी खरी की डुआयडी मला माहित नाही. खरी असेल तर आपल्या आयडीच्या जन्मापूर्वीची ही पोस्ट आहे. अनेक प्रतिसाद कर्त्यांनी आपापल्या परीने माहिती व मते व्यक्त केली आहेत. जो तो आपापल्या आकलनक्षमतेनुसार चर्चेच अन्वयार्थ काढतो. सर्वच प्रतिसादांना पोस्टकर्त्याने उत्तरे द्यावी किंवा त्याला पटे पर्यंत लिहित कंठशोष करावा असे मला वाटत नाही. त्यामुळे अनेक बाबी वाचकांवर सोडून देतो. आपल्याला अनेक प्रश्नचिन्ह असलेला प्रतिसाद द्यावासा वाटला या बद्दल धन्यवाद.

माझा आयडी ड्यु असल्याने काय फरक पडला आणि खरा (?) असल्याने काय फरक पडला हे सुद्धा कळवले तर बरे पडेल.

जेव्हां सामान्य विषय असतात तेव्हां आमच्या व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपवर असे असे झाले असे सांगण्यात काहीच चुकीचे नाही असे माझे मत आहे. पण तुम्ही आरोप ठेवताय आणि त्यासाठी संदर्भ आवश्यक आहे या गोष्टीला तुम्ही फाट्यावर मारले आहे. माझ्या जन्मापूर्वीची असली तरी मी आता वाचू शकत नाही का ? आता तुम्ही जो टोन लावला आहे तो सगळं सांगत आहे. तुमच्याकडे उत्तर असतं तर दिलं असतं.

Pages