कवीचा मृत्यू आणि इतर

Submitted by पाचपाटील on 13 May, 2021 - 14:45

ऑनलाईन शोकसभा..
फार चांगला होता
मनमिळावू
कष्टाळू
एकांतप्रिय होता
कोऑपरेटीव्ह नेचरचा होता
हसतमुख होता
कविता पण लिहायचा
मला त्यातलं एवढं कळत नाही
पण चांगल्याच असतील
पाठवत असायचा इकडे तिकडे
पण छापायचेच नाहीत हो लोक
लोकांना किंमत कळली नाही त्याच्या कवितांची
आता कोण पाठवणार मला कविता..!

एका ग्रुपवर कळलं सकाळी
वाचून धक्का बसला
मग लगेच बाकीच्या ग्रुपवर सगळ्यांना कळवलं
सगळ्यांना धक्का बसला

शाळेतल्या मित्रांना धक्का बसला
कॉलेजच्या मित्रांना धक्का बसला
जुन्या कलीग्जना पण धक्का बसला

धक्का सगळ्यांना घरच्या घरीच बसला
कुणाला बेडवर लोळताना बसला
कुणाला दाढी करताना करताना बसला
कुणाला पेपर चाळताना बसला
ह्याला दोन मिनिटांचा बसला
त्याला दीडच मिनिटांचा बसला
पण हा ही अजून धक्क्यातून सावरला नाही
आणि तो ही अजून सावरला नाही

ह्या धक्क्यातून सावरायला वेळ लागेल..
तरी अंदाजे किती वेळ लागेल?
ते आत्ता लगेच कसं काय सांगता येईल..!

असं कसं काय झालं पण?
घरी कोण कोण असतं त्याच्या ?
माहिती घ्यायला पाहिजे
बरीच वर्षे कॉन्टॅक्टमध्ये नव्हतो आम्ही
होता होईल तेवढं करूया
कुणीतरी इनिशिएटीव्ह घ्या
येस सर.. येस सर.. जरूर

वाईट झालं
विश्वासच बसत नव्हता
ह्याचाही विश्वास बसत नव्हता
त्याचाही विश्वास बसत नव्हता
त्या तिकडे रस्त्यावरून एक मनुष्य चाललेला आहे,
त्याचा बसत असेल का विश्वास?
विचारायला पाहिजे एकदा..

गेल्याच महिन्यात बोलणं झालं होतं
गोव्याचा प्लॅन करूया म्हणत होता
गोवा म्हटलं की एक्साईट व्हायचा गडी
पण आता कुठलं गोवा अन् कुठलं काय..!
सगळंच राहून गेलं

ह्याला ही दु:ख झालं
पण अर्धंच झालं
त्याला ही दु:ख झालं
पण अर्धंच झालं
मग दोघं एकमेकांशी बोलले
मग दोघांनाही पूर्ण दु:ख झालं

चटका लावून गेला
डोंगर कोसळला
पहाड कोसळला
कडा कोसळला
आभाळ कोसळलं

फक्त आठवणी राहिल्या
पोकळी निर्माण झाली
व्हॅक्यूम क्रिएट झाला
भरून निघणार नाही

सगळ्यांनी मिळून कविता छापूया त्याच्या
हीच खरी श्रद्धांजली होईल
सगळ्यांनी आठवणीत जपून ठेवूया त्याला
तीच खरी श्रद्धांजली होईल

सोसण्याचं धैर्य मिळो, ही प्रार्थना
आत्म्यास शांती मिळो, ही पण प्रार्थना

अजून कुणाला काही बोलायचं आहे का?
आय थिंक.. झालं सगळ्यांचं सर
ओके.. ओके.. कनक्ल्यूड करूया का मग आता?

येस सर.. येस सर..
आता आपण दोन मिनिटं मौन पाळूया
कुणाचा तरी माईक चालूय बहुतेक
सगळा नॉईज येतोय पाठीमागचा
बरं दिसतं का हे ?
म्यूट करा सर्वांनी प्लीज

दोन मिनिटं मौन.

आभारी आहे
कार्यक्रम संपला असं जाहीर करतो

RIP आणि दोन पुष्पगुच्छांच्या इमोजी..
खतम.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Happy मला वाटलं उठला आणणिउठल्याउठलया परत एक तेजस्वी कविता प्रसवली की काय. म्हणजे परत सगळे फट्यावर मारायला तयार Happy

व्हॅक्यूम क्रिएट झाला...>>> होणारच नं, आधी वात आणत असेल त्यामुळे नंतर "निर्वात" वाटायला लागलं असेल. Wink
छान.

जहाल वास्तव आजकालच्या जीवनशैलीचे.
काहीच दिवसांपूर्वी अशीच एक घटना घडल्याने वर्णन कोरिलेट झाले.
"अलीकडच्या काळात त्याने फारसा कुणाशी संबंध ठेवलाच नव्हता", कोणीतरी म्हणलं. त्याला होयबा करून इतरांनी आपापल्या मनाचं समाधान करून घेतलं. त्याची भूमिका मांडायला तो थोडीच या जगात होता!

>> त्या तिकडे रस्त्यावरून एक
>> मनुष्य चाललेला आहे,
>> त्याचा बसत असेल का विश्वास?
>> विचारायला पाहिजे एकदा..

आसूड
Sad

ललित आवडलं.
बरोब्बर पकडलं आहे वास्तव. >>> +1

_/\_

ललित आवडलं.
बरोब्बर पकडलं आहे वास्तव. >>> +1

Solid!!!