शुभविवाह - उर्फ डेडली आत्या

Submitted by फारएण्ड on 18 July, 2024 - 11:26

सापडली, सापडली! बर्‍याच दिवसांत ऑफिसचे कामकाज दाखवणारी एखादी मराठी सिरीयल सापडली नव्हती. घरगुती नाट्यातील बिनडोकपणा जो काय चालतो तो सगळेच करतात. पण जेव्हा कथानके ऑफिसमधे शिरतात तेव्हा खरी मजा येते. कारण तेथे जे दाखवायचे आहे त्याबद्दल अगदी बेसिक माहिती सुद्धा न घेता आपण मोठा थ्रिलर दाखवत आहोत अशा आविर्भावात सादर केलेले सीन्स. वरकरणी ऑफिसबद्दल वाटणार्‍या पण आगापीछा नसलेल्या बिझिनेस टर्म्स. "चांगल्या होणार्‍या" मिटिंग्ज. मोघम रीतीने उल्लेख केलेली "डील्स".

नाव शुभविवाह असले, तरी सध्या यात याची रेलचेल दिसते.

मला यातील कथानकाची पार्श्वभूमी माहीत नाही. एकदम साधारण ४७५व्या एपिसोडपासून बघत आहे. यातले सीन्स येताजाता आधी दिसले होते पण नक्की काय चालले आहे ते लक्ष देऊन पाहिले नाही. आणि तेव्हा बहुतांश घरगुती ड्रामाच वाटत होता.

३-४ एपिसोड्स मधे मला माहीत झालेले लोक
भूमी - ही सेण्ट्रल कॅरेक्टर दिसते. आशा काळे ते नीलकांती पाटेकर ("आत्मविश्वास" चित्रपटातील) याचे मिश्रण असणार्‍या व दोन तीन ऑलटाइम कारस्थानी स्त्रिया सोडून बाकी सर्वांना ज्यांचे सतत कौतुक असते अशा लीड्स बहुतांश सिरीज मधे असतात. ही तशीच वाटते.
आकाश - तिचा नवरा. हे सांगायची गरज नाही. नावावरूनच कळते.
रागिणी (आत्या) - ही सध्यातरी व्हिलन दिसते. हीच ती डेडली आत्या. सगळे घर हिच्या ताब्यात असताना, आणि त्यांच्या बिझिनेस मधेही तिला बराच रोल ऑलरेडी असताना काहीतरी कारणामुळे तिला व्हिलनगिरी करायची आहे. क्षणात ही किचन पॉलिटिक्स करते, तर क्षणात लोकांचे खूनबिन पाडते. हिचा नवरा सध्या पोलिस लॉक अप मधे आहे. तिला त्याची काही फिकीर दिसत नाही.
आई - घरातील सर्वात सिनीयर स्त्री. ही नॉर्मल आहे असे वाटते. कारस्थानी वगैरे नाही.
सून क्र १ - ही चेहर्‍यावरून कारस्थानी वाटत नाही. भूमीची बहिण असावी. तिला सपोर्ट करते. म्हणजे लिटरली तिच्या संवादांवर माना डोलावते.
सून क्र २ - ही जरा ग्रे एरियामधली आहे. रागिणीची मुलगी असावी नक्की काय करते कळत नाही. पण ४-५ एपिसोड्स मधे फक्त स्वगत म्हणताना दाखवली आहे.
एक तरूण मुलगी - वेधू का काहीतरी नाव आहे. ही कितपत रिकरिंग कॅरेक्टर आहे माहीत नाही. बहुधा आकाशच्या मागे होती/आहे. तिच्या वयानुसार मोबाईल, बाहेर मित्रमंडळींबरोबर हँग आउट करणे वगैरे सोडून असल्या नाट्यात तिला भलताच इंटरेस्ट दिसतो.

काही निर्जिव गोष्टी. यांचा उल्लेख अशासाठी की नाट्यपूर्ण प्रसंगात यांचा रोल असतो.
कारंजे - यांच्या घराच्या समोर दोन्ही बाजूच्या पायर्‍यांच्या मधे आहे. पण ते चालू केले की पायर्‍यांवरचा माणूस पूर्ण भिजतो.
किल्ल्या - प्राचीन काळच्या पिक्चर्स मधे असत तसा १०-१२ दणकट किल्ल्यांचा एक जुडगा आहे. तो रागिणीच्या कमरेला असतो. घराचा ताबा तिच्याकडे असतो म्हणून. सध्याच्या जमान्यात कोणाला अशा किल्ल्या लागतात कल्पना नाही.

पाहायला सुरूवात केल्यावर लौकरच "नवर्‍याला जेवायला घालण्यात जे सुख आहे ते इतर कशात नाही" असा संवाद ऐकल्यावर सिरीज खूप आधुनिक आहे याची खात्री झाली. तेच मोठे घर (आणि तरीही दारासमोर जेवायला बसणारे लोक), तेच भारदस्त आडनाव व त्याचा वारसा वगैरे - इथे "महाजन". कामाला जाणारे नवरे, सतत किचन मधे वावरणार्‍या व किचन पॉलिटिक्स करणार्‍या बायका, व्हॉट्सअ‍ॅप अंकल्स व काकूंना आवडेल असे कौटुंबिक चित्र उभे करणारे आणि दोन तीन पिढ्या आधीच्या परिस्थितीचे ग्लोरिफिकेशन करणारे सीन्स. लग्न झाले तरी बेडरूम मधे फक्त नवर्‍याचा मोठा फोटो. एकूण सरंजामी मामला.

सर्व चेकमार्क्स चेक्ड.

कोणी पाहात असाल तर लिहा. मी लिहीन जमेल तसे. अमेरिकेत हुलू वर आहे. भारतातले माहीत नाही.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Today little scam. Medicine not reaching atya scam. Diabetes ones whhooooi.
.
Then atya drinking some vinegar instead of water scam. After Fadya scolding bhoomi. Bh cries d
Fadesh decid d to my tichya shi bolnarch nahi ja. And second CEO levwl he confirmed atya choice of dealers,

अमा पहिले वाक्य समजले नाही. तिचे औषध हे लोक लपवतात का?

सध्या आकाश आत्याला 'आई' अशी हाक का मारतोय? >> तिने त्याला त्या शार्पशूटर पासून वाचवले ना? त्यामुळे त्याला जीवनदान दिले, म्हणून तेव्हापासून तो तिला आई म्हणून हाक मारतोय.

आत्या सीईओ झाली नाही म्हणजे तिची सिच्युएशन एकदम "तुम्हाला पॉवर नाय म्हणजे तुम्ही पोलिस नाय?" सारखी कशी झाली? ती एक दिवस कामाला गेली नाही. बहुधा केवळ त्यामुळे आकाश सीईओ झाला. तो लगेच दुसर्‍या दिवशी मुंबईला. कारण याचे क्लायंट आज फोन करून आजच्या आज मिटिंगला या म्हणतात कंपनीच्या सीईओला. दुसरे कोणी चालणार नाही. त्यात अभिजित म्हणतो या कंपन्यांना तुमच्या घरी काय चालू आहे याच्याशी मतलब नसतो. कोणत्या कंपन्या या? तुम्ही जे काही करत आहात ते सगळे सोडून आजच्या आज मिटिंगला या असे एखाद्या इमर्जन्सी मधे सांगतीलही पण यांच्या बोलण्यावरून तशी काही इमर्जन्सी दिसली नाही.

आणि हा सीईओ झाला तर आत्याला लगेच कंपनीत यायलाच बंदी झाली. गेस्ट पास घ्या म्हणे. तिला नोकरीतून काढले आहे वगैरे काहीही चर्चा नाही. इतका मोठा बदल केला त्याचा सीईओला पत्ता नाही. ते ही सर्वांना त्यांचे नाते माहीत असून.

आणि सगळ्यात धमाल म्हणजे ती आत जाउन बसल्यावर इतर कर्मचारी किचन गॉसिप सारखे तेथे तिच्याबद्दल बोलतात "बघा नाती घरी ठेवायची असतात वगैरे यांना कळत नाही. या कशा आल्या इथे"? अरे लेको मुळात तिने नोकरी सोडली कधी? सीईओ झाली नाही, तरी कंपनी वरिष्ठ अधिकारी आहे तशी राहीलच ना?

काय वाट्टेल ते खपवत आहेत.

आता ते एक गुरूजी आले व म्हणाले की आकाश कसलातरी टिळा जिला लावेल त्या व्यक्तीच्या ताब्यात सगळी प्रॉपर्टी राहील.

आकाश कसलातरी टिळा जिला लावेल त्या व्यक्तीच्या ताब्यात सगळी प्रॉपर्टी राहील >>> आत्या एकदम सुपरनॅचरल वळणाला चालली की काय? Lol

तिची सिच्युएशन एकदम "तुम्हाला पॉवर नाय म्हणजे तुम्ही पोलिस नाय?" सारखी कशी झाली? >>> Lol
आकाश कसलातरी टिळा जिला लावेल त्या व्यक्तीच्या ताब्यात सगळी प्रॉपर्टी राहील. >>>> Lol

ते पिंडदान, आत्याला आकाशच्या बाबाचे भूत दाखवून घाबरवणे व आकाशला त्याच्या आईचे भूत दाखवून हा घातपात होता हे बिंबवणे बघितले. नंतर पिंडे, श्राद्ध, होलोग्राफिक आई व सिजिआय कावळे येतात व सूशी टाईप पिंडे खातात, एकदम 'हॅप्पी हॅलोवीन' एपिसोड होता. आत्या आणि भूमीने मिळून आकाशचा अगदी मृदुंग केलाय, आधी ही वाजवते मग ती. चोर शिरतो आणि भुताचा भास होतो तेव्हा आत्या जिन्यावरून तुरूतुरू खाली आल्या , कौतुक वाटले. आत्या ज्या आकाशी साडीमधे दुदू पित होत्या.( सारखं दुदू आणि तू आता आराम कर हेच आत्याच्या नशिबी.) दुसरी एखादी 'काय धाड भरलीये मला' म्हणाली असती पण आत्या मोठ्या सहनशील. सगळ्यांच्या मूर्खपणाच्या कलाकलाने घेणे म्हणजे अग्निपरिक्षाच. आकाशी साडीचे राहिलेच - तर मागे बरोबर त्याच साडीतला फोटो होता. Live in the moments, literally. Lol
मी हे बघताना घरचे वेदनेने किंचाळू लागतात म्हणून तुकड्यांतुकड्यांत बघतेय.

सूशी टाईप पिंडे
हॅप्पी हॅलोवीन
>>> Lol

"तुम्हाला पॉवर नाय म्हणजे तुम्ही पोलिस नाय? >>> हे भारी होतं. मला ही सीईओ सिलेक्शनची पद्धत फार आवडलेली आहे. आणि मग जी व्यक्ती सीईओ झाली/राहिली नसेल तिचा लगेच पाणउताराच सुरू करतात. Lol
गेस्ट पास प्रकरण पण कैच्याकै.

इतर कर्मचारी किचन गॉसिप सारखे >>> हे वाचून मला 'मन' नावाचा पिक्चर आठवला. गेल्या जन्मीचे आपले काही भोग असतात ते भोगूनच सुटका होते त्याप्रमाणे हा पिक्चर मी पाहिला आहे Lol त्यात त्या बोटीवरचे लोक हे असलं गॉसिप करतात त्याची आठवण आली. नको त्या आठवणी बरोब्बर राहतात ते हे असं.

आकाशी साडीमधे दुदू पित
Live in the moments
मी हे बघताना घरचे वेदनेने किंचाळू लागतात
>>> Rofl

गेल्या जन्मीचे आपले काही भोग असतात ते भोगूनच सुटका होते त्याप्रमाणे हा पिक्चर मी पाहिला आहे
>>> Lol रमड, पोस्ट.

धमाल प्रतिसाद सर्वांचे Lol मजा आली.
जी व्यक्ती सीईओ झाली/राहिली नसेल तिचा लगेच पाणउताराच सुरू करतात>>> एग्झॅक्टली Lol
'मन' नावाचा पिक्चर आठवला >>>> पीळ पिक्चर आहे Sad मनिषा चा चेहरा कायम सर्दी ने नाक चोंदल्यासारखा.. चांगली अभिनेत्री असून तिच्या वाटेस मन, जानी दुष्मन असे काही दगड पिक्चर आलेत..

आजच्या भागात आकाश माझ्याशी बोलेपर्यंत निर्जळी उपवास करीन असं भूमी देवीसमोर शपथ घेते आणि लगेच आकाश च्या आईचं भूत दिसलं म्हणून घाबरून ग्लास भर पाणी घटाघटा पिते

आणि लगेच आकाश च्या आईचं भूत दिसलं म्हणून घाबरून ग्लास भर पाणी घटाघटा पिते
Biggrin
म्हणजे देवीच्या पावरपेक्षा तिला भुताच्या पावरवर जास्त विश्वासै? देवी नाराज झाली तर?

Hi are minor sca.m bhoomi ordered medications from shop. Then Poornima calls from bhoomi phone. And. Cancells atyas medicine. Now bhoomi is Attacked due to her halgarji pana Aakash is very angry and takes on bhoomi. She cries and tries to check with shop poornima ana atya smirk.

मध्यंतरी बरेचसे कौटुंबिक सीन्स व आत्या वि भूमी यांचे घरगुती डावपेच सुरू होते म्हणून बोअर होत होती बघायला. मधेच भूमी प्रेग्नंट झाली. पुढच्या एपिसोड्स मधे भरपूर प्रेमालाप सुरू झाले. प्रेग्नंसीनंतर रोमान्स म्हणजे खरेच तसे दाखवायचे आहे की एडिटिंग चुकले माहीत नाही.

आकाश व भूमी यांना एकमेकांच्या भुकेच्याच नव्हे, तर पाणी पिण्याच्या वेळाही माहीत असतात. तहान तर सोडा, पण कोण तरूण लोकांच्या अशा "भुकेच्या वेळा" असतात?

पण या सगळ्या काळात आत्याचे निरूद्देश कट सुरूच होते. अनेक प्रंसंगांचे, तिच्या कटाचे चालू कथानकाशी काहीही लॉजिक लागत नाही. आता भूमीचे व तिचे भांडण ओपन मधे सुरू आहे. मग एकदा ती एक लाल बॅग घेउन घर सोडून जाते म्हणून निघाली. नंतर आकाश व भूमीमधे वाद झाला, तर भूमी एक लाल बॅग घेउन घर सोडून निघाली. तीच सेम लाल बॅग दिसते. यांच्याकडे एकतर एकच लाल बॅग आहे, किंवा हे कधीतरी केसरी ट्रॅव्हल्सने सहकुटुंब युरोप सहलीला गेले असावेत.

आता भूमी घर सोडून निघाली आहे तर बॅगेत किमान काहीतरी असायला हवे. ती बॅग टोटल रिकामी आहे हे भूमी ज्या पद्धतीने ती सहज हलवते त्यावरून लगेच कळते. तिची "काळजी" घेणारे घरातील लोक तिला प्रेग्नंसीमधे ती सपोजेडली भरलेली बॅग घेउन जिन्यावरून चढू-उतरू देतात. घर सोडत आहे, तर ती माहेरी जाताना कोणीतरी तिला सोडेल, किमान ड्रायव्हरला सांगतील असला प्रकार नाही. ती तीच सपोजेडली भरलेली पण प्रत्यक्षात कोपर्‍यावर जायला एक कॅरी बॅग घेउन चालल्यासारखी सहज खेळवणारी बॅग घेउन तेथून चालत बाहेर पडते व माहेरी येते.

एकच बॅग असेल. आलटून पालटून घर सोडून जात असतील दोघी Wink

भुकेच्या वेळा >>> Lol दिल चाहता है च्या सुबोध वरून प्रेरणा घेतली असेल दोघांनी.

प्रेग्नंसीनंतर रोमान्स म्हणजे खरेच तसे दाखवायचे आहे की एडिटिंग चुकले माहीत नाही. Happy
भुकेच्या वेळा..
फा.. Lol

खरेच अगदीच कल्पना दारिद्र्य!!

किंवा हे कधीतरी केसरी ट्रॅव्हल्सने सहकुटुंब युरोप सहलीला गेले असावेत.
>>> Lol
प्रेग्नंसीनंतर रोमान्स म्हणजे खरेच तसे दाखवायचे आहे की एडिटिंग चुकले माहीत नाही.
>>> हा ‘एवढी चार पोरं झाली पण वडीलधाऱ्यांसमोर एकमेकांशी कधी बोल्लो नाही’ काईंड ऑफ रोमान्स असावा. गेटींग टू द पॉईंट डिरेक्टली यु नो, अज्जाबात फापटपसारा नाही.

प्रेग्नंसीनंतर रोमान्स म्हणजे खरेच तसे दाखवायचे आहे की एडिटिंग चुकले माहीत नाही. >>> Rofl जबरदस्त पंच..!
यांच्याकडे एकतर एकच लाल बॅग आहे, किंवा हे कधीतरी केसरी ट्रॅव्हल्सने सहकुटुंब युरोप सहलीला गेले असावेत.>>> Lol

भुकेच्या वेळा>>> Lol दुदूच्या पण आहेत, आत्याचे बाळसे उतरता उतरेना येथे. वर 'दुदू प्या, आराम करा' म्हणत राहतात. कशाला??

तिची "काळजी" घेणारे घरातील लोक तिला प्रेग्नंसीमधे ती सपोजेडली भरलेली बॅग घेउन जिन्यावरून चढू-उतरू देतात.
>>> Happy मागच्या कुठल्यातरी भागात सप्राईज देण्यासाठी डोळ्यांवर पट्टी बांधून जिन्यावरून खाली उतरत आणले होते, ती म्हणतेय 'मी पडेन' तर 'तो आपल्या घरातल्याच तर पायऱ्या आहेत'. खाली आणून दुसऱ्या खोलीत ते सप्राईज पेंटिंग ठेवायचे. हे ह्यांचे तारतम्यहीन प्रेम.! मला जामच खटकले.

हा ‘एवढी चार पोरं झाली पण वडीलधाऱ्यांसमोर एकमेकांशी कधी बोल्लो नाही’ काईंड ऑफ रोमान्स असावा.>>> Lol

फुलांवर फूल आपटले तेव्हा फा अरुंधतीचे अश्रू पुसण्यासाठी रूमाल शोधत होता. त्यामुळे घात झाला आणि तिकडे हनिमून दिसला नाही आणि डायरेक्ट डोहाळजेवणाला जायची वेळ आली. आता ह्या हनिमूनला 'रिडिंग बिटवीन द लाईन्स' समजा.

मी आज मधेच ५७१वा एपिसोड का कुठलातरी बघितला, काय फरक पडतो म्हणा. टारझनसारख्या कुठल्याही एपिसोडवर उडी मारून कुठूनही बघून समजून घेत थट्टा करण्याची कला अवगत झाली आहे. त्यात भूमीला साक्षात कृष्णाने ॲडमिट केले होते जो दारोदार फिरणारा वासुदेव होता. भूमी आणि आत्याची कॅटफाईट आणि आत्याचे नक्राश्रू चालू होते. त्यात भूमी आकाशला म्हणते, 'तुझ्या जीवाशी खेळतेय ही बाई, तुला ज्या गोग्गोड गोळया द्यायची त्याने मेंदू स्लो होतो.' गोळ्या बंद झाल्या तरी 'साईडइफेक्ट' काही जाता जाईनात. Finally an explanation.... Lol

स्वैपाकघरातील एका दृश्यात आत्या 'तुम्ही भाजी चिरा' असे भूमी पालकाच्या भाजीकडे बोट दाखवून म्हणते, आत्या वेडावाकडा चेहरा करते. तिचा जन्म मुडदे पाडण्यासाठी झाला आहे, 'मुद्दा भाजी' करण्यासाठी नाही हे जाणवते. तेव्हा स्त्री-१ सिनेमातील 'पढीलिखी है, ये नये भारत की चुडैल है' संवाद आठवला. Happy

आत्या सख्खी आहे का सावत्र? एवढी नीच फक्त प्रॉपर्टीसाठीच झाली आहे का ? तिला ५७१ एपिसोड होऊनही एक छदामही मिळालेला दिसत नाही, मग ती आकाशपेक्षा मंद झाली ना, तेही बिना गोग्गोड गोळ्यांची. Wink

ह्या मालिकेत प्रत्येकजण एवढे गोरेपान/ पांढरे का आहे, प्रत्येकाचे तपकिरी/ पिंगट/घारे डोळे का आहेत? सगळे सारख्याच डिस्टेंपर मधे न्हाल्यासारखे दिसतात. अनैसर्गिक दिसते हे..!

तुला ज्या गोग्गोड गोळया द्यायची त्याने मेंदू स्लो होतो
दिग्दर्शक आणि लेखक पण त्याच गोळ्या खात असावेत का?

तिचा जन्म मुडदे पाडण्यासाठी झाला आहे, 'मुद्दा भाजी' करण्यासाठी नाही हे जाणवते.
५७१ एपिसोड होऊनही एक छदामही मिळालेला दिसत नाही, मग ती आकाशपेक्षा मंद झाली ना, तेही बिना गोग्गोड गोळ्यांची.
>>> Lol Lol

फुलांवर फूल आपटले तेव्हा फा अरुंधतीचे अश्रू पुसण्यासाठी रूमाल शोधत होता. त्यामुळे घात झाला आणि तिकडे हनिमून दिसला नाही आणि डायरेक्ट डोहाळजेवणाला जायची वेळ आली. >>> Lol

पण ही सिरीज मधेमधे बघत होतो. भूमी म्हणजे आशा काळेचा वारसा वाटेल असे सीन्स येत होते. आत्याचे कटही द्राविडी प्राणायाम पद्धतीचे होते. म्हणजे आकाशच्या डोक्यात भूमीबद्दल भरवायचे आहे (का ते माहीत नाही). म्हणून फ्रीजचा मेण्टेनन्स की रिपेअर करणार्‍याला बोलवायचा. तो ते करताना तेथे भूमी असेल पण तिला फोन येऊन ती त्यावेळेस बरोब्बर दुसरीकडे कोठेतरी बघत बसेल हा योगायोग घडवून आणायचा. व त्या फ्रीजवाल्याला आत्याच्या पाण्याच्या बाटलीत व्हिनेगर भरायला लावायचे. नंतर ते भूमीने आत्याला त्रास द्यायला भरले असे आकाशपुढे चित्र उभे करायचे.

स्वयंपाकघरात कायम भूमी किंवा मानसीच असते, तर फ्रीज मेन्टेनन्स वाला रॅण्डमली कसा येतो? मुळात असा मेण्टेनन्स कोण करतात फ्रीजचा, काही झालेले नसताना? ते काय गाडीचे सर्विसिंग आहे? तो येतो त्यावेळेस स्वयंपाकघरात भूमीच फक्त असणे, तो व्हिनेगार भरत असताना भूमीला फोन आला - तो यांनीच केला हे धरले तरी तो फोन चालू असताना भूमी त्या माणसाकडे जराही बघणार नाही हे सगळे योगायोग घडवून आणायचे या भरवश्यावर हा कट होता. अर्थात सिरीज मधले सगळे बिनडोक असल्याने तो साध्यही झाला.

पण भूमी कधीतरी बाहेर असताना आत्या स्वतःच हे व्हिनेगर भरू शकली असती. भूमी काय २४ तास तेथेच असते?

पण या सगळ्याचा आत्याला ते सगळे हडप करायचे आहे त्याच्याशी काय संबंध आहे त्याचा पत्ता नाही. त्या दोघांना मारायचे तिचे जे विनोदी प्रयत्न चालू आहेत त्यामधे त्यांच्यात बेबनाव झाला काय किंवा नाही झाला काय, काहीच फरक पडत नाही.

तिचा जन्म मुडदे पाडण्यासाठी झाला आहे, 'मुद्दा भाजी' करण्यासाठी नाही हे जाणवते. तेव्हा स्त्री-१ सिनेमातील 'पढीलिखी है, ये नये भारत की चुडैल है' संवाद आठवला. >>> Lol

फारएंड.. Biggrin
दिवाळीच्या सकाळी इतकं छान हसवल्याबद्दल थँक्यू.

फ्रीजवाल्याला आत्याच्या पाण्याच्या बाटलीत व्हिनेगर भरायला लावायचे. नंतर ते भूमीने आत्याला त्रास द्यायला भरले असे आकाशपुढे चित्र उभे करायचे.>>> कहर! रायटर ला किती रिकामा वेळ आहे..
आणि व्हिनेगरच तर आहे, विष थोडेच.. Wink त्यासाठि फ्रिजवाल्याचा रीसोर्स वाया घालवायचा.. विष असेल तर ही रिस्क वर्थ आहे.

पोलिस अ‍ॅकेडमी नावाची एक जुनी पिक्चर सिरीज आहे. बर्‍यापैकी धमाल आहे. त्यात एक सीन आहे ज्यात दोन पोलिस चोरांचा पाठलाग करताना एक सिटी बस वापरतात. त्यातला एक पोलिस पाठलाग करताना मधे बस स्टॉप येतो तेव्हा ती बस थांबवतो, कारण "या बसच्या रूटवर हा स्टॉप आहे. मला इथे थांबायलाच पाहिजे". मला या सिरीज मधले मागचे काही भाग पाहताना आत्या व तिचा कंपू हेच करतोय असे वाटले.

आत्याचा उद्देश या दोघांना मारून ती प्रॉपर्टी व बिझिनेस थेट बळकावण्याचा आहे. त्याकरता ते त्या घरात फॅमिलीचा एक भाग म्हणून राहायचे नाटक करतात. पण प्रत्यक्षात हे करताना "महाजन घराण्याचे..." म्हणून जे काही रीतीरिवाज, कुळाचार असतात त्यातही आपल्याला मान मिळावा याकरताही ते नाटके करतात, तो मिळाला नाही तर चिडतात. म्हणजे या आत्याच्या हिंसक कारवाया न दाखवता नुसती एक फॅमिली ड्रामा सिरीज दाखवली असती तर त्यात जसे विविध लोकांचे रुसवे फुगवे असते, तसेच हे एरव्ही खूनबिन करणारे लोक दाखवतात.

दोरीवर पताका लावतात तसे फोटो बेडरूममधे लावायची नवीन प्रथा आली आहे का? परवा मानसीच्या रूम मधे दिसले. एकतर अशी प्रथा असेल किंवा तिचा एक सिक्रेट फिल्म डेव्हलपमेण्ट स्टुडिओ असावा.

भूमीचा आणि पौर्णिमेचा बाप सेमच आहे ना? मग तो हॉस्पिटलमधे अ‍ॅडमिट असताना भूमी व मानसी काळजी करताना दाखवल्या आहेत. पण तो आपलाही बाप आहे हे त्या पौर्णिमाला लक्षात नसल्यासारखे तिचे सीन्स आहेत.

या सर्व सिरीज वाल्यांना एकूणच "प्रॉपर्टी" या प्रकाराचे, त्याच्या मालकीचे विअर्ड फॅसिनेशन आहे. रोज असे उठसूठ कोण प्रॉपर्टी, मालकी बद्दल बोलत असतात? मालमत्ता व बिझिनेस ज्याच्या नावावर आहे ती व्यक्ती मेली तर तेव्हा ठीक आहे. एरव्ही कोण असे सतत बोलत असते?

काड्याची पेटी स्विंग होते का हवेत?

यांच्या घरासमोर एक कारंजे व त्याच्या दोन्ही बाजूला ( ) अशा गोलाकार शेपमधे जिने आहेत. ते जिने जेथे खाली येतात तेथे समोर कोठेतरी एक रांगोळी काढलेली आहे. त्यावर एक दिवा आहे. भूमी माहेरी गेल्याने तो दिवा लावायचा मान व त्यामुळे दिवाळीचे सर्व विधी करण्याचा मान हा पौर्णिमेला मिळणार असतो. त्यावर ती, व का कोणास ठाऊक, आत्याही खुष असते. कोणताही जिना पटकन उतरायचा नाही या नियमाप्रमाणे पौर्णिमा हळुहळू खाली येउ लागते. तेवढ्या सगळे दिवे जातात. आणि पौर्णिमाच्या हातातली काडेपेटी खाली निसटते. आता ती कशी शोधणार हे लोक? मोबाईलमधून फ्लॅशलाइट लागतो हा शोध सिरीयल्समधे अजून लागलेला नाही. त्यात लाइट जातात म्हणजे अगदी "पिच डार्क" असते. आणि लाइट गेले की घरात नेमके कोठे काय शोधायचे याचे ज्ञान तमाम भारतीयांना असले, तरी मराठी सिरीज अजून त्यापासून लांब आहेत. त्यामुळे सगळे वरती तसेच उभे राहतात.

यांच्याकडे एरव्ही ड्रायव्हर्स, चौकीदार सगळे असतात. रात्र सोडून. किंवा कहानी की माँग असेल तरच येत असावेत.

तेवढ्यात एकदम त्या रांगोळीवरची एक पणती लागते. आणि दिसते की ती भूमीने लावलेली आहे. लगेच आजी ई खुष. पण भूमी तेथे कोठून आली? तर ती हॉस्पिटलमधून घरी चालली होती व तिला अंधारात महाजनांचे घर दिसले. तिला तेथे कोठेतरी पायाला काडेपेटी लागली - "पिच डार्क" असताना घराबाहेरच्या भागात पायाला काहीतरी लागले, तर ती काडेपेटी असू शकेल म्हणून उचलून बघण्याइतके अंतर्ज्ञान तिला असते. तसेच ती पहिली काडी जी पेटवते ती थेट त्या रांगोळीवरच्या पणतीवर लावते. तेथे पूर्ण अंधार आहे. त्यात एकही काडी आधी पेटवून इकडेतिकडे न बघता तेथे खाली पणतीही आहे हेही तिला त्याच अंतर्ज्ञानाने समजले. कारण सीनमधे आधी काडी न पेटता थेट वातच लागली.

पण मुळात वरती पौर्णिमेच्या हातात असलेली काडेपेटी पडल्यावर तेथे कशी आली? तेथेच एखाद्या पायरीवर पडून राहायचे सोडून जिन्यावरून माणसे उतरतात तशी गोलाकार टर्न मारून बरोब्बर रांगोळीवर येऊन ती पडली असावी. किंवा एका बाजूने काड्या जास्त घासल्याने व दुसरी बाजू नवी कोरी राहिल्याने ती पडताना क्रिकेटच्या बॉल सारखी स्विंग होउन रांगोळीवर जाउन पडली असावी.

मग पहिला दिवा भूमीच्या हातून लागला. आता दिवाळीचे सर्व विधी करण्याचा मान तिला मिळाला, त्यामुळे ती घरात राहणारी एक व्यक्ती इतरांचे खून पाडण्याच्या प्रयत्नात आहे असा आरोप करून माहेरी गेली असली, तरी दिवाळीपुरती चार दिवस परत येणार. तो आरोप बिरोप सध्या होल्डवर आहे.

मग आता बॅग आणायला जायला पाहिजे म्हणून निघते, तर आकाश विचारतो मी येऊ तुझ्याबरोबर? . एरव्ही "महाजन घराण्यात..." पासून सुरू होणारी भरदार वाक्ये अधूनमधून येत असतात. पण प्रेग्नंट असलेली सून माहेरी जाताना स्वतःची बॅग स्वतः उचलून चालत जाते. सरंजामी, परंपरा पाळणारी कर्मठ घराणी रिग्रेसिव्ह भरपूर असतील, पण घरातील सुनेला एकटी चालत कोठे जाउ देणार नाहीत. तोही त्यांच्या बडेजावाचाच भाग असतो. यांना सरंजामीपणा सुध्दा नीट करता येत नाही.

Lol
शिर्डी के साईबाबा चित्रपटात पणत्यांचा चमत्कार दाखवला. साईबाबांना कोणी तेल देत नाही, तर ते पाण्याच्या पणत्या लावतात आणि त्या पेटतात.
त्यानंतर हा चमत्कार.
इथल्या आत्याला खुनाचे प्रयत्न कसे करायचे याचं ट्रेनिंग घ्यायला सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेतील शालिनीकडे पाठवलं पाहिजे. अर्धात तिथले नायक नायिका शुक्राचार्याकडून संजीवनी मंत्र शिकलेले असल्याने त्यांना कधीच काही होत नाही आणि मराठी मालिकांतील नायक नायिकेचा अंगीभूत चांगुल बावळटपणा त्यांच्यातही असल्याने कोणी ठार मारायचा प्रयत्न करतंय हे लक्षातही येत नाही.

Pages