शुभविवाह - उर्फ डेडली आत्या

Submitted by फारएण्ड on 18 July, 2024 - 11:26

सापडली, सापडली! बर्‍याच दिवसांत ऑफिसचे कामकाज दाखवणारी एखादी मराठी सिरीयल सापडली नव्हती. घरगुती नाट्यातील बिनडोकपणा जो काय चालतो तो सगळेच करतात. पण जेव्हा कथानके ऑफिसमधे शिरतात तेव्हा खरी मजा येते. कारण तेथे जे दाखवायचे आहे त्याबद्दल अगदी बेसिक माहिती सुद्धा न घेता आपण मोठा थ्रिलर दाखवत आहोत अशा आविर्भावात सादर केलेले सीन्स. वरकरणी ऑफिसबद्दल वाटणार्‍या पण आगापीछा नसलेल्या बिझिनेस टर्म्स. "चांगल्या होणार्‍या" मिटिंग्ज. मोघम रीतीने उल्लेख केलेली "डील्स".

नाव शुभविवाह असले, तरी सध्या यात याची रेलचेल दिसते.

मला यातील कथानकाची पार्श्वभूमी माहीत नाही. एकदम साधारण ४७५व्या एपिसोडपासून बघत आहे. यातले सीन्स येताजाता आधी दिसले होते पण नक्की काय चालले आहे ते लक्ष देऊन पाहिले नाही. आणि तेव्हा बहुतांश घरगुती ड्रामाच वाटत होता.

३-४ एपिसोड्स मधे मला माहीत झालेले लोक
भूमी - ही सेण्ट्रल कॅरेक्टर दिसते. आशा काळे ते नीलकांती पाटेकर ("आत्मविश्वास" चित्रपटातील) याचे मिश्रण असणार्‍या व दोन तीन ऑलटाइम कारस्थानी स्त्रिया सोडून बाकी सर्वांना ज्यांचे सतत कौतुक असते अशा लीड्स बहुतांश सिरीज मधे असतात. ही तशीच वाटते.
आकाश - तिचा नवरा. हे सांगायची गरज नाही. नावावरूनच कळते.
रागिणी (आत्या) - ही सध्यातरी व्हिलन दिसते. हीच ती डेडली आत्या. सगळे घर हिच्या ताब्यात असताना, आणि त्यांच्या बिझिनेस मधेही तिला बराच रोल ऑलरेडी असताना काहीतरी कारणामुळे तिला व्हिलनगिरी करायची आहे. क्षणात ही किचन पॉलिटिक्स करते, तर क्षणात लोकांचे खूनबिन पाडते. हिचा नवरा सध्या पोलिस लॉक अप मधे आहे. तिला त्याची काही फिकीर दिसत नाही.
आई - घरातील सर्वात सिनीयर स्त्री. ही नॉर्मल आहे असे वाटते. कारस्थानी वगैरे नाही.
सून क्र १ - ही चेहर्‍यावरून कारस्थानी वाटत नाही. भूमीची बहिण असावी. तिला सपोर्ट करते. म्हणजे लिटरली तिच्या संवादांवर माना डोलावते.
सून क्र २ - ही जरा ग्रे एरियामधली आहे. रागिणीची मुलगी असावी नक्की काय करते कळत नाही. पण ४-५ एपिसोड्स मधे फक्त स्वगत म्हणताना दाखवली आहे.
एक तरूण मुलगी - वेधू का काहीतरी नाव आहे. ही कितपत रिकरिंग कॅरेक्टर आहे माहीत नाही. बहुधा आकाशच्या मागे होती/आहे. तिच्या वयानुसार मोबाईल, बाहेर मित्रमंडळींबरोबर हँग आउट करणे वगैरे सोडून असल्या नाट्यात तिला भलताच इंटरेस्ट दिसतो.

काही निर्जिव गोष्टी. यांचा उल्लेख अशासाठी की नाट्यपूर्ण प्रसंगात यांचा रोल असतो.
कारंजे - यांच्या घराच्या समोर दोन्ही बाजूच्या पायर्‍यांच्या मधे आहे. पण ते चालू केले की पायर्‍यांवरचा माणूस पूर्ण भिजतो.
किल्ल्या - प्राचीन काळच्या पिक्चर्स मधे असत तसा १०-१२ दणकट किल्ल्यांचा एक जुडगा आहे. तो रागिणीच्या कमरेला असतो. घराचा ताबा तिच्याकडे असतो म्हणून. सध्याच्या जमान्यात कोणाला अशा किल्ल्या लागतात कल्पना नाही.

पाहायला सुरूवात केल्यावर लौकरच "नवर्‍याला जेवायला घालण्यात जे सुख आहे ते इतर कशात नाही" असा संवाद ऐकल्यावर सिरीज खूप आधुनिक आहे याची खात्री झाली. तेच मोठे घर (आणि तरीही दारासमोर जेवायला बसणारे लोक), तेच भारदस्त आडनाव व त्याचा वारसा वगैरे - इथे "महाजन". कामाला जाणारे नवरे, सतत किचन मधे वावरणार्‍या व किचन पॉलिटिक्स करणार्‍या बायका, व्हॉट्सअ‍ॅप अंकल्स व काकूंना आवडेल असे कौटुंबिक चित्र उभे करणारे आणि दोन तीन पिढ्या आधीच्या परिस्थितीचे ग्लोरिफिकेशन करणारे सीन्स. लग्न झाले तरी बेडरूम मधे फक्त नवर्‍याचा मोठा फोटो. एकूण सरंजामी मामला.

सर्व चेकमार्क्स चेक्ड.

कोणी पाहात असाल तर लिहा. मी लिहीन जमेल तसे. अमेरिकेत हुलू वर आहे. भारतातले माहीत नाही.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हि तिच सिरिअल ना ज्यात ती जाडी बाई २००० रुपये सुनांना देऊन पुर्ण रूम भरायला सांगते? कसलं तरी घरगुती कम्पिटिशन... ती भूमी मग फोटो एनलार्ज करून पूर्ण रूम भरणार असते. पैसे वाचवायला फोटो पेपर वर न प्रिंट करता कार्ड्पेपर कि कसल्या पेपर वर प्रिंट करते आणि तो फोटो घेउन येणारा माणूस त्या नायगरा फॉल्स ला टक्कर देणार्या कारंज्यात भिजतो. फोटो भिजतात पण तो माणूस फोन वर ही माहिती देताना पूर्ण सुका असतो. जरा एन्लार्ज करून फोटो प्रिंट करायला किती पैसे लागतात याची जवळच्या स्टुडिओ मध्ये जाऊन माहिती तरी घ्यायची, ते ही होम डिलिव्हरी सहीत.... डोक्याला हात लावणारी बाहुली....

हि तिच सिरिअल ना ज्यात ती जाडी बाई २००० रुपये सुनांना देऊन पुर्ण रूम भरायला सांगते? कसलं तरी घरगुती कम्पिटिशन.. >>>
हो का? आणि असल्या स्पर्धेत सुना भाग घेतात? शिशुविहारमधली मुले पण असल्या रिकामटेकड्या स्पर्धेत भाग घेणार नाहीत.
आणि पायऱ्यांच्या मध्ये कारंजे हा काय प्रकार? मयसभा करायचीय का घराची? म्हणजे मग महाभारताला कारण मिळेल.

ते कंपनीच्या वतीने डील करू शकतात. एका कुटुंबाच्या मालकीच्या कंपनीत मालक कोणालाही अशी ऑथॉरिटी म्हणून अ‍ॅड करू शकतो. मग व्यक्तिगतरीत्या पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी द्यायची गरज लागत नाही. हे बरोबर वाटते का?>> फारेंड, कंपनी ही कायद्याने एक वेगळी person आहे, तेंव्हा तिच्या वतीने सही करण्यासाठी poa देणे किंवा बोर्ड resolution ने अथॉरिटी देणे हे खूप कॉमन आहे. त्रयस्थ माणूस / डील करणारा हे अथॉरिटी कागदपत्र नक्की मागणार आणि तपासणार की रागिणी ला खरेच पॉवर आहे ना की करते आहे आपली उगा सही. आणि व्यक्तिगत असते अशी authority बरेचदा.. असो फार किचकट नको , एवढ्या डेडली बाईवर अशी चर्चा शोभत नाही Proud
जाई हो ' कंपनी खरिद ली ' अगदी चॉकलेट घेतल्यागत सांगतात Happy

ओटीटीवरल्या समस्त सिरीजा गाभण काय, रे, झंप्या? >> Lol समोर टीव्हीवर चालू असताना त्यात नवरा ऑफिसमधून बायकोला "मिटिंग चांगली झाली" सांगत होता हे ऐकल्यावर माझी मराठी-सिरीज-याद्दाश्त एकदम उफाळून आली Happy

जाई हो ' कंपनी खरिद ली ' अगदी चॉकलेट घेतल्यागत सांगतात >>> Lol हो मला आठवते. माझ्या नवर्‍याची बायको मधे एका कॉरिडॉर मधल्या चर्चेत एकजण कॅज्युअली दुसर्‍याला तो अमुक प्लांट बंद करून टाका म्हणून सांगतो.

लंपन - धन्यवाद. बोर्डाने ऑथोरिटी देणे इतके पुरेसे आहे असा माझा समज होता. इथे एकाच कुटुंबाची - किंबहुना एकाच व्यक्तीची- मालकी असल्याने त्याने लेखी ऑथोरिटी देणे पुरेसे होईल असे वाटले. पण इथे पीओए म्हणजेच ती ऑथोरिटी - त्यामुळे ठीक आहे.

पण जरा थोडे लॉजिक लावले आहे असे वाटेपर्यंत समजले की आधी ती पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी मुंबईला एका एक्झिबिशन मधे कंपनीचे प्रतिनिधित्व करायलाही दिली होती Happy रागिणी ऑलरेडी कंपनीत अधिकारी आहे ना?

पण ठीक आहे. निदान पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी "देण्याच्या" बाबतीत हे लोक लॉजिकशी फार फटकून नाहीत. ती वापरण्याच्या किंवा न वापरण्याच्या बाबतीत असले तरी Happy पूर्वीच्या कथांमधे एखाद्याला वर देताना तो वर जपून वापरावा सांगत तसे यांना तुम्हाला कथेत पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी शब्द वापरू देतोय पण अंधाधुंद वापरू नका असे कोणीतरी सांगायला हवे Happy

कसलं तरी घरगुती कम्पिटिशन... ती भूमी मग फोटो एनलार्ज करून पूर्ण रूम भरणार असते >>> हो तीच.

पैसे वाचवायला फोटो पेपर वर न प्रिंट करता कार्ड्पेपर कि कसल्या पेपर वर प्रिंट करते आणि तो फोटो घेउन येणारा माणूस त्या नायगरा फॉल्स ला टक्कर देणार्या कारंज्यात भिजतो. >>> Lol हो

ते फोटो "एन्लार्ज" करणेही मनोरंजक आहे. प्राचीन काळी ४ बाय ६ च्या प्रिण्ट्स मोठ्या करायच्या असतील तर त्याला एन्लार्ज म्हणत. इथे मुळात फोटो डिजिटल आहेत. त्याची प्रिन्ट तुम्हाला पाहिजे त्या साइजची काढा. त्यात "एन्लार्ज" काय करायचे आहे. पण पन्नास वेळा तो शब्द त्या एपिसोड मधे ऐकू येतो.

आणि त्या फोटोचा पूर्ण हेतू घरातील रूम भरून टाकणे हा आहे. तर ते फोटो भिजले तरी काय फरक पडतो. आणि फोटोच कशाला हवेत. न्यूजपेपरही भिंतीवर लावले तरी चालतील की.

पायऱ्यांच्या मध्ये कारंजे हा काय प्रकार? >>> पूर्वी हिंदी पिक्चर्स मधे रायबहादूर वगैरे लोकांच्या घरात जसे ते दोन्ही बाजूनी वर जाणारे वक्राकार जिने असत (जेथे हमखास हिरॉइनची "मैफिल" असे व एक रडके गाणे सादर होई) तसे यांच्या घराला बाहेरून आहेत. त्याच्या मधे एक कारंजे आहे. मात्र ते जिन्यावरच्या लोकांना नखशिखांत का भिजवते माहीत नाही.

आणि सुना का भाग घेतात? तर तो १०-१२ किल्ल्यांचा जुडगा, घरची जबाबदारी, महाजन घराण्याचा वारसा स्वीकारण्याची हैसियत आहे हे सिद्ध करायला.

Lol धमाल लिहिले आहे. मायबोलीवर येण्याचे सार्थक झाले. /\ Wink
प्रतिसादही धमाल Lol

आकाश - तिचा नवरा. हे सांगायची गरज नाही. नावावरूनच कळते.>>>> पोएटिक , आकाश आणि भूमी म्हणजे 'जुदाईवाला प्यार' की काय ?
क्षणात ही किचन पॉलिटिक्स करते, तर क्षणात लोकांचे खूनबिन पाडते. >>> मला वाटलं घालूनपाडून बोलल्यामुळे जीव घेणारी तर ही शब्दशः 'डेडली' निघाली. अष्टभुजा आहे, स्वैपाकापासून मुडद्यांपर्यंत.
तिला सपोर्ट करते. म्हणजे लिटरली तिच्या संवादांवर माना डोलावते.>>>
पण ते चालू केले की पायर्‍यांवरचा माणूस पूर्ण भिजतो.>>>>>
नवर्‍याला जेवायला घालण्यात जे सुख आहे ते इतर कशात नाही>>>> अरे संसार संसार Wink
कमवावा बिमवावा लागत नाही. That's literally what वारसा means>>>>
आत्याला आराम करू द्यायचा आहे. त्याच्या आड ती पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी म्हणे येत असते.>>>>>>
पूर्वीच्या कथांमधे एखाद्याला वर देताना तो वर जपून वापरावा सांगत >>>>>
न्यूजपेपरही भिंतीवर लावले तरी चालतील की.>>>>>
जिन्यावरच्या लोकांना नखशिखांत का भिजवते माहीत नाही.>>>>>>
Lol Lol

आकाश आणि भूमी म्हणजे 'जुदाईवाला प्यार' की काय ? >>> माहीत नाही. पुढे मुलगा होऊन त्याचे नाव क्षितिज ठेवतील Happy

ज्या सीनमुळे सिरीज याद्दाश्त उफाळून आली तो सीन. वरती उल्लेख केला आहे ती डील मिटिंग. आकाश तेथे आल्यावर रागिणीला ती दुसरी पार्टी ओनरच्या चेअरवरून उठवते वगैरे ते झाले (खरे म्हणजे इथे रागिणीच्या डेडली व्यक्तिमत्त्वाला "तुम्हाला काय करायचे आहे कोण कोठे बसते ते. जेथे ते पिवळे हायलाइट्स केले आहेत तेथे सह्या करा आणि फुटा" असे काहीतरी सूट झाले असते) . मग आकाश तेथे बसतो व रागिणी काहीतरी प्रचंड अपमान झाल्यासारखी बाहेरून एक चेअर मागवून तेथे बसते. आकाश एकएक क्लॉज बघायला लागतो. तेव्हा रागिणीला ते नको असते त्यामुळे ती मधेच सांगते की लंचटाइम झाला आता ब्रेक घेऊ. मग ते बाकीचे लोक बाहेर जातात आणि इथे आकाशला भूमीचा फोन येतो. "कशी झाली मिटिंग"?
"चांगली झाली" - मराठी सिरीज मधे मिटिंगा "चांगल्या", "छान" अशाच होतात. त्यापेक्षा काही निघत नाही त्यातून.

पण हा लगेच पुढे म्हणतो सेकंड सेशन अजून बाकी आहे. मग काय चांगली झाली मिटिंग? हा नुसताच येऊन बसला आहे, एक कागद हातात घेउन पाहात होता आणि लंच ब्रेक झाला. काही निर्णय नाही, काही चर्चा नाही. ही "चांगली" झालेली मिटिंग.

मधे एका सीन मधे आकाश भूमीला बाहेर एका ठिकाणी भेटायला बोलावतो. तेथून त्यांना रागिणीच्या नवर्‍याला भेटायला पोलिस स्टेशनला जायचे असते. तेथे एक बळंच संवाद. ती विचारते मला इथे का बोलावलंस. तर तो म्हणतो माझी एक क्लायंट मिटिंग होती इथे जवळ "फाइव्ह स्टार हॉटेल" मधे. नेहमीच्या चर्चेत असे कोण बोलतात? त्या हॉटेलचे नाव वगैरे न घेता ते फाइव्ह स्टार आहे याचा काय संबंध? हा कोणतरी भारी आहे आणि क्लायंट मिटिंग्ज फाइव्ह स्टार हॉटेल्स मधे करतो याने बहुधा प्रेक्षक म्हणून आपण इम्प्रेस होणे अपेक्षित असावे. भूमीलाही ते ऐकून काही विशेष फरक पडला नाही त्या सीन मधे. हा बाजूच्या अमृततुल्य मधे क्लायंट बरोबर बसलो होतो म्हंटला असता तरी तिची प्रतिक्रिया काही वेगळी नसली असती.

पुढे मुलगा होऊन त्याचे नाव क्षितिज ठेवतील>> Lol
'कितने दिनोंके बाद है आयी' हे नागनागिणीचं फेवरेट गाणं आठवलं उगाच. नावे अशी आहेत की विरहाचे संकेतच जणू.

मी क्षितीजचंच बारसं करायला आले होते, पण उशीर झाला. Proud

हा बाजूच्या अमृततुल्यमधे क्लायंट बरोबर बसलो होतो म्हंटला असता तरी तिची प्रतिक्रिया काही वेगळी नसली असती.
>>>
Rofl
कुलकर्णी अर्धा बाय दीड म्हणाला असता तरी मी 'अरे वा'च म्हटलं असतं

पूर्वीच्या कथांमधे एखाद्याला वर देताना तो वर जपून वापरावा सांगत तसे यांना तुम्हाला कथेत पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी शब्द वापरू देतोय पण अंधाधुंद वापरू नका असे कोणीतरी सांगायला हवे
>>> हे बेस्ट आहे Biggrin

क्षितिज
चांगली मीटिंग
अमृततुल्य
पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी शब्द वापरू देतोय पण अंधाधुंद वापरू नका
>>>> Rofl अशक्य हसते आहे वाचून.

कुलकर्णी अर्धा बाय दीड म्हणाला असता तरी मी 'अरे वा'च म्हटलं असतं >>> मला पण हेच आठवलं Lol

हा बाजूच्या अमृततुल्य मधे क्लायंट बरोबर बसलो होतो म्हंटला असता तरी तिची प्रतिक्रिया काही वेगळी नसली असती. >>>>>ह्ह्ह ह ह ह ह अह

पूर्वीच्या कथांमधे एखाद्याला वर देताना तो वर जपून वापरावा सांगत तसे यांना तुम्हाला कथेत पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी शब्द वापरू देतोय पण अंधाधुंद वापरू नका असे कोणीतरी सांगायला हवे
>>
स्वतः ला उगाच बाजीगर मधला मदन चोपडा समजू नका असं पण सांगता येईल....

कारंजे - यांच्या घराच्या समोर दोन्ही बाजूच्या पायर्‍यांच्या मधे आहे. पण ते चालू केले की पायर्‍यांवरचा माणूस पूर्ण भिजतो.>>> Lol

लग्न झाले तरी बेडरूम मधे फक्त नवर्‍याचा मोठा फोटो. >> Lol सिरीयसली???
हा बाजूच्या अमृततुल्य मधे क्लायंट बरोबर बसलो होतो म्हंटला असता तरी तिची प्रतिक्रिया काही वेगळी नसली असती.>>> होना Lol
अशक्य पांचट पणा असतो मराठी सिरेलीत. भारतवारीत आई सोबत थोडा वेळ बघावे लागते.

मागच्या काही भागांत आत्याने "आता काहीतरी मोठं करायला पाहिजे" असा डॉयलॉग मारला. गेम आणखी एक लेव्हल वर नेत आहे. मुळात एक बोट तिच्यावर स्फोट करून बुडवणे, लोकांना चहामधे विष देऊन मारणे, पुरावे देऊ शकतील अशा लोकांचा काटा काढणे ई गोष्टी तिने ऑलरेडी केल्या आहेत. आता आणखी मोठे म्हणजे ही काय करणार याचे प्रचंड कुतूहल निर्माण झाले होते.

तर तो मोठा प्लॅन म्हणजे त्यांना हनिमूनला पाठवायचे आणि त्यांच्यावर मारेकरी घालायचा. पहिला प्रयत्न एकदम फ्लॉलेस असतो. त्यांच्या हनिमूनच्या मार्गावर एका कणीस विकणार्‍याशी संगनमत केलेले असते. हे तेथे थांबणार, कारण भूमीला कणीस आवडते. तेथे तो कणीसवाला यांचे खून करणार व तेथेच दरीत त्यांना टाकून देणार. त्या हनिमूनच्या आख्ख्या रूटवर कणीस विकण्याचे लायसन्स सरकारने त्या एकाच कणीसवाल्याला दिले असल्याने ते बरोब्बर तेथेच जातील या एका गृहीतकावर हा सगळा डोलारा असतो. अर्थात ही मराठी सिरीयल असल्याने हे लोकही तेथेच बरोबर थांबतात. पण आयत्या वेळी भूमी आकाशला जाऊ देत नाही कणीस घ्यायला. मुळात तेथे इतकी रहदारी दाखवली आहे की तो कणीसवाला गपचूप कसा मारणार होता हे त्याला व आत्यालाच ठाऊक. तो मारेकरी त्या खुनाचे लाइव्ह टेलिकास्ट आत्याकरता करत असतो त्यातही मधे मधे इतर लोक दिसतात.

मग ते हनिमूनकरता ज्या रिसॉर्ट मधे उतरतात तेथे त्यांना मारण्याचे प्रयत्न होतात. त्यात रिसॉर्टचे मॅनेजर लोकही सामील असतात. एकदा स्विमिंग पूल मधे लाइव्ह वायर टाकून यांना मारायचा प्लॅन असतो. पण आयत्या वेळेस लाइट जाते. विद्युत मंडळाला हे जीव वाचवण्याचे क्रेडिट मिळणार नाही कारण यांना पत्ता नसतो.

मग घरातून बर्‍यापैकी आलिशान रिसॉर्ट मधे आलेले हे लोक त्यांचे एक झोपडीचे पॅकेज घेतात. एक धक्का मारला तर पडेल अशा एका तट्ट्याच्या खोपट्यात यांचे पकाऊ रोमॅण्टिक सीन्स चालतात. बाहेरून आतले सहज दिसेल अशा गॅप्स असतात त्या तट्यांमधे. तेथे हनिमून म्हणे. आता तेथे हे आत असताना एका बाजूने आग लावली जाते. मग आत यांचे घाबरायचे सीन्स. ती आग एकाच बाजूला लावलेली असते. इतर कोणत्याही बाजूने जोरात ढकलले तर सहज बाहेर पडता येईल अशा त्या खोपट्यामधे मग हे लोक वाचवा वाचवा ओरडत बसतात.

पण मनमोहन देसाई स्टाईल योगायोगाने यांचा एक जुना नोकर त्याच रिसॉर्ट मधे झाडांना पाणी घालायला असतो. तो त्या मारेकर्‍याचे बोलणे ऐकून यांना वाचवतो.

ती आत्या व तो मारेकरी सर्व माहिती फोनवर एकमेकांना सांगत असतात. यांच्या नावासकट. मधे ती आत्या त्याला सगळे पुरावे नष्ट करायला सांगते. हे ही फोनवर.

आता त्या ऑफिसचा उपयोग संपलेला दिसतोय. आत्याही घरी आहे आणि आकाशही तिकडे जात नाही. एक मिटिंग चांगली झाली. बास.

मुळात त्या आत्याचा हे सगळे करण्याचा मोटिव्ह नक्की काय आहे याचा पत्ता नाही. कारण त्यांना मारून सपोजेडली तिला जे मिळणार आहे त्यातले बरेचसे तिला त्या घरात ऑलरेडी मिळत असते.

Lol मस्त
आत्या विशाखा सुभेदार आहे. मी काही भाग बघितलेत या मालिकेचे ज्ये. नां. बरोबर.

Pages