शुभविवाह - उर्फ डेडली आत्या

Submitted by फारएण्ड on 18 July, 2024 - 11:26

सापडली, सापडली! बर्‍याच दिवसांत ऑफिसचे कामकाज दाखवणारी एखादी मराठी सिरीयल सापडली नव्हती. घरगुती नाट्यातील बिनडोकपणा जो काय चालतो तो सगळेच करतात. पण जेव्हा कथानके ऑफिसमधे शिरतात तेव्हा खरी मजा येते. कारण तेथे जे दाखवायचे आहे त्याबद्दल अगदी बेसिक माहिती सुद्धा न घेता आपण मोठा थ्रिलर दाखवत आहोत अशा आविर्भावात सादर केलेले सीन्स. वरकरणी ऑफिसबद्दल वाटणार्‍या पण आगापीछा नसलेल्या बिझिनेस टर्म्स. "चांगल्या होणार्‍या" मिटिंग्ज. मोघम रीतीने उल्लेख केलेली "डील्स".

नाव शुभविवाह असले, तरी सध्या यात याची रेलचेल दिसते.

मला यातील कथानकाची पार्श्वभूमी माहीत नाही. एकदम साधारण ४७५व्या एपिसोडपासून बघत आहे. यातले सीन्स येताजाता आधी दिसले होते पण नक्की काय चालले आहे ते लक्ष देऊन पाहिले नाही. आणि तेव्हा बहुतांश घरगुती ड्रामाच वाटत होता.

३-४ एपिसोड्स मधे मला माहीत झालेले लोक
भूमी - ही सेण्ट्रल कॅरेक्टर दिसते. आशा काळे ते नीलकांती पाटेकर ("आत्मविश्वास" चित्रपटातील) याचे मिश्रण असणार्‍या व दोन तीन ऑलटाइम कारस्थानी स्त्रिया सोडून बाकी सर्वांना ज्यांचे सतत कौतुक असते अशा लीड्स बहुतांश सिरीज मधे असतात. ही तशीच वाटते.
आकाश - तिचा नवरा. हे सांगायची गरज नाही. नावावरूनच कळते.
रागिणी (आत्या) - ही सध्यातरी व्हिलन दिसते. हीच ती डेडली आत्या. सगळे घर हिच्या ताब्यात असताना, आणि त्यांच्या बिझिनेस मधेही तिला बराच रोल ऑलरेडी असताना काहीतरी कारणामुळे तिला व्हिलनगिरी करायची आहे. क्षणात ही किचन पॉलिटिक्स करते, तर क्षणात लोकांचे खूनबिन पाडते. हिचा नवरा सध्या पोलिस लॉक अप मधे आहे. तिला त्याची काही फिकीर दिसत नाही.
आई - घरातील सर्वात सिनीयर स्त्री. ही नॉर्मल आहे असे वाटते. कारस्थानी वगैरे नाही.
सून क्र १ - ही चेहर्‍यावरून कारस्थानी वाटत नाही. भूमीची बहिण असावी. तिला सपोर्ट करते. म्हणजे लिटरली तिच्या संवादांवर माना डोलावते.
सून क्र २ - ही जरा ग्रे एरियामधली आहे. रागिणीची मुलगी असावी नक्की काय करते कळत नाही. पण ४-५ एपिसोड्स मधे फक्त स्वगत म्हणताना दाखवली आहे.
एक तरूण मुलगी - वेधू का काहीतरी नाव आहे. ही कितपत रिकरिंग कॅरेक्टर आहे माहीत नाही. बहुधा आकाशच्या मागे होती/आहे. तिच्या वयानुसार मोबाईल, बाहेर मित्रमंडळींबरोबर हँग आउट करणे वगैरे सोडून असल्या नाट्यात तिला भलताच इंटरेस्ट दिसतो.

काही निर्जिव गोष्टी. यांचा उल्लेख अशासाठी की नाट्यपूर्ण प्रसंगात यांचा रोल असतो.
कारंजे - यांच्या घराच्या समोर दोन्ही बाजूच्या पायर्‍यांच्या मधे आहे. पण ते चालू केले की पायर्‍यांवरचा माणूस पूर्ण भिजतो.
किल्ल्या - प्राचीन काळच्या पिक्चर्स मधे असत तसा १०-१२ दणकट किल्ल्यांचा एक जुडगा आहे. तो रागिणीच्या कमरेला असतो. घराचा ताबा तिच्याकडे असतो म्हणून. सध्याच्या जमान्यात कोणाला अशा किल्ल्या लागतात कल्पना नाही.

पाहायला सुरूवात केल्यावर लौकरच "नवर्‍याला जेवायला घालण्यात जे सुख आहे ते इतर कशात नाही" असा संवाद ऐकल्यावर सिरीज खूप आधुनिक आहे याची खात्री झाली. तेच मोठे घर (आणि तरीही दारासमोर जेवायला बसणारे लोक), तेच भारदस्त आडनाव व त्याचा वारसा वगैरे - इथे "महाजन". कामाला जाणारे नवरे, सतत किचन मधे वावरणार्‍या व किचन पॉलिटिक्स करणार्‍या बायका, व्हॉट्सअ‍ॅप अंकल्स व काकूंना आवडेल असे कौटुंबिक चित्र उभे करणारे आणि दोन तीन पिढ्या आधीच्या परिस्थितीचे ग्लोरिफिकेशन करणारे सीन्स. लग्न झाले तरी बेडरूम मधे फक्त नवर्‍याचा मोठा फोटो. एकूण सरंजामी मामला.

सर्व चेकमार्क्स चेक्ड.

कोणी पाहात असाल तर लिहा. मी लिहीन जमेल तसे. अमेरिकेत हुलू वर आहे. भारतातले माहीत नाही.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Lol धमाल पोस्ट.
मुळात तेथे इतकी रहदारी दाखवली आहे की तो कणीसवाला गपचूप कसा मारणार होता
>>>> वाळवीत सुबोध भावे नाही का म्हणत, लोकसंख्या इतकी वाढली आहेे की प्रेत पुरायला निर्जन स्थळ मिळत नाही. लोकांना काही जाणीव नको का ? Lol

मुळात त्या आत्याचा हे सगळे करण्याचा मोटिव्ह नक्की काय आहे याचा पत्ता नाही. कारण त्यांना मारून सपोजेडली तिला जे मिळणार आहे त्यातले बरेचसे तिला त्या घरात ऑलरेडी मिळत असते.>>> नुसती डेडली नाही आत्या , स्वयंप्रेरित सायको आहे. आदर्श घ्यावा अशा व्यक्तिमत्त्वाला हसू नका. Proud

आत्या विशाखा सुभेदार आहे. >>> धन्यवाद, मलाही कुतूहल होते. Happy

माझेमन, मग तुम्हांला "सुख म्हणजे नक्की काय असतं", हेच मालिका पहावीच लागेल.

तिथली माधवी निमकरने रंगवलेली शालिनी या आत्यापेक्षा काही पट अधिक डेडली आहे.

विद्युत मंडळाला हे जीव वाचवण्याचे क्रेडिट मिळणार नाही कारण यांना पत्ता नसतो.>> लॉल.
विशाखा सुभेदार हे कॅरॅक्टर हिट्ट करेल ह्यात शंकाच नाही..
पण इतके कारस्थान करताना पोलिस्/इन्शुरन्स वाल्यांचा आपल्या वर थेट संशय जाईल असाही ह्यांना काही वाटत नाही.

फा Lol कसले पपलू प्रयत्न आहेत खुनाचे! आणि असल्या मालिकांमधे योगायोग तर प्रचंड उच्च दर्जाचे असतात. आता त्यांच्या नोकराला काय तेच रिसॉर्ट मिळालं होतं का काम करायला? आणि कणीसवाला काय रील बनवणार असतो का खुनाचं?
बाय द वे, नेमका खून कोणाचा करायचाय? दोघांचाही का?

लोकसंख्या इतकी वाढली आहेे की प्रेत पुरायला निर्जन स्थळ मिळत नाही. लोकांना काही जाणीव नको का ? >>> Lol हे खूप आवडलं होतं.

आदर्श घ्यावा अशा व्यक्तिमत्त्वाला हसू नका >>> Lol

लोकसंख्या इतकी वाढली आहेे की प्रेत पुरायला निर्जन स्थळ मिळत नाही. लोकांना काही जाणीव नको का ? >>> Lol त्या पिक्चर मधे अशी वाक्ये अनेकदा मस्त सहजपणे येतात. उदा: "हिच्याकरता बायकोला मारलं याने!"

बाय द वे, नेमका खून कोणाचा करायचाय? दोघांचाही का? >>> हो. ते का ते बघायला ४७५ एपिसोड्स मधे शोधावे लागेल. कॉम्प्युटरवरच्या फाइल्स जशा विनझिप वगैरे करून काँप्रेस करतात तशी व्हर्जन्स काढायला हवीत या सिरीजची. यू ट्यूबवर लोक एपिसोड्सची माहिती टाकतात पण तेथेही हायलाइट्सऐवजी आख्खी मॅच परत पाहिल्यासारखे वाटते.

पण दोघांचा खून करायचा असताना, जेव्हा तो आकाश कणीस आणायला निघतो तेव्हा भूमी कारपाशीच थांबते रस्त्यापलीकडे. म्हणजे यांच्या बेस्ट केस सिनॅरिओ मधे फक्त आकाशच कणीसवाल्यापर्यंत जातो. खुनाच्या लाइव्ह रेकॉर्डिंमधेही जर इतर माणसे येत असतील तर हा एकाला किंवा दोघांना मारून "तेथेच दरीत" कसा टाकणार असतो कोणास ठाऊक.

नोकराला काय तेच रिसॉर्ट मिळालं होतं का काम करायला? >>> आणि नुसते काम नव्हे. झाडांना पाणी घालायचे काम. जेव्हा त्या खोपट्याला आग लावली जाते त्याआधी त्या मारेकर्‍याचे आत्याशी बोलणे त्याच्या कानावर पडलेले असते. तो मारेकरी सुद्धा आत्याशी इतक्या वेळा त्या खुनाबद्दल बोलून झाल्यावरही नंतर काहीतरी सांकेतिक बोलण्याऐवजी "आता आकाश भूमी वाचत नाहीत" असे नावागावासकट फोनवर बोलत असतो प्रत्येक वेळा. तेथे हा झाडांना पाणी घालत असतो व "ते आकाश भूमी म्हणजे तेच की काय" असा विचार करून वाचवायला जातो.

त्याच्याकडे एक अमर्याद लांबीची पाण्याची नळी असते. तो जेथे झाडांना पाणी घालत असतो तेथून ती तशीच धरून तो थेट खोपट्यापर्यंत येऊन ती आग विझवतो.

मारेकरी व आत्याने इतक्या वेळा फोनवर खुनाबद्दल चर्चा केली आहे की त्यांच्या फेसबुक, इन्स्टा वगैरेवर "सहज खुनाचे १० मार्ग" वगैरे क्लिप्स येत असतील एव्हाना.

यात "बेधुंद मी, बेधुंद तू" हे एक गाणे सारखे लागते. यांचा "आज एक माणूस खूप सुंदर दिसत आहे" छाप अत्यंत सात्विक प्रणय बघून बेधुंद सोडाच, अगदी साधे धुंद तरी हे लोक कसे होतील याचा मी कल्पनाशक्तीला कितीही ताण दिला तरी विचार करू शकत नाही.

फा Rofl

फा Rofl

फा... Biggrin
किती चिरफाड त्या सीरियलची!!!

कणीसवाला काय रील बनवणार असतो का खुनाचं?>>> Lol

नावागावासकट फोनवर बोलत असतो>>>> Lol
एक अमर्याद लांबीची पाण्याची नळी >>>>> Lol
सहज खुनाचे १० मार्ग" >>> Lol
सात्विक प्रणय बघून बेधुंद सोडाच, अगदी साधे धुंद तरी हे लोक कसे होतील>>>> Lol

ह्यात आगावपणाला फार वाव आहे. चहाच्या टपरीवरल्या आर्डरी सारखा-
एक साधे धुंद, एक पाणी कम धुंद, एक मलाई मारके धुंद, एक रेग्युलर बेधुंद, एक एक्श्ट्रा बेधुंद (यासोबत गर्भनिरोधक फ्री द्यावे लागेल. )

एक साधे धुंद, एक पाणी कम धुंद, एक मलाई मारके धुंद, एक रेग्युलर बेधुंद, एक एक्श्ट्रा बेधुंद (यासोबत गर्भनिरोधक फ्री द्यावे लागेल. ) >>> Lol टोटली. फक्त वेगळ्या गर्भनिरोधकाची गरज नाही. इतके लोक आजूबाजूला जितेजागते गर्भनिरोधक आहेत. कोणीही कोणाच्याही बेडरूममधे कधीही शिरतात. इव्हन यांच्या हनीमूनला जेथे मेटॅफोरिकली आग लागायला हवी तेथे लिटरल आग लागते Happy

यांच्या हनीमूनला जेथे मेटॅफोरिकली आग लागायला हवी तेथे लिटरल आग लागते.>>> Rofl

बाय द वे, तो कणीसवाला कसा खुन करणार होता? कोळशाच्या शेगडीने? का कणसाच्या पोत्यात भरून?

एक साधे धुंद, एक पाणी कम धुंद, एक मलाई मारके धुंद, एक रेग्युलर बेधुंद, एक एक्श्ट्रा बेधुंद (यासोबत गर्भनिरोधक फ्री द्यावे लागेल. )
>>> Biggrin

बाय द वे, तो कणीसवाला कसा खुन करणार होता? कोळशाच्या शेगडीने? का कणसाच्या पोत्यात भरून?
>>> सोलून

नावागावासकट फोनवर बोलत असतो>>>> Lol
एक अमर्याद लांबीची पाण्याची नळी >>>>> Lol Rofl
सहज खुनाचे १० मार्ग" >>> Lol Rofl
सात्विक प्रणय बघून बेधुंद सोडाच, अगदी साधे धुंद तरी हे लोक कसे होतील>>>> Rofl

ह्यात आगावपणाला फार वाव आहे. चहाच्या टपरीवरल्या आर्डरी सारखा-
एक साधे धुंद, एक पाणी कम धुंद Rofl
हनीमूनला जेथे मेटॅफोरिकली आग लागायला हवी तेथे लिटरल आग लागते>>> Rofl

फा : सगळीच पोस्ट Lol
ते आकाश भूमी म्हणजे तेच की काय >>> हो मग! ही असली स्ट्रॅटेजिक नावं ठेवतं का कोणी खर्‍या आयुष्यात? त्याला लगेच समजलं असेल ही आपलीच पार्टी आहे Proud

एक साधे धुंद, एक पाणी कम धुंद, एक मलाई मारके धुंद, एक रेग्युलर बेधुंद, एक एक्श्ट्रा बेधुंद (यासोबत गर्भनिरोधक फ्री द्यावे लागेल. )
>>> Rofl

धन्यवाद Happy

कोठीची खोली/"स्टोअर रूम" नक्की कोठे आहे?

तुमच्या घरात चहात वगैरे घालतात त्या डब्यातली साखर संपली की तुम्ही कोठून काढता? यांच्याकडे इतके सतत गोड पदार्थ होत असताना इतक्या मोठ्या किचन मधे जेमतेम अर्धा किलो साखर बसेल असा डबा असतो. त्यातली संपली की थेट "कोठीच्या खोलीत" जाऊन साखर आणावी लागते. बहुधा त्या मोठ्या जुडग्यातील एक किल्ली साखरेच्या डब्याच्या कुलूपाची असेल. त्यात त्या किचन मधे दोन बहिणी काम करत आहेत. एकीने दूध ऑलरेडी गरम करायला ठेवले आहे. दुसरी केळीची पाने पुसणे वगैरे काहीतरी करत आहे. दोघींपैकी कोणी "हातातले काम टाकून" इतक्या लांब जाऊ नये? तुम्ही बरोब्बर ओळखले असेल. जी दूध गरम करत आहे तिने जावे व जी त्याकडे पाठ करून आपले काम करत आहे तिने "त्याकडे लक्ष द्यावे"

भूमीला काही करून त्या वेळेस कोठीच्या खोलीत पाठवायचे आहे म्हणून या सीनचा खटाटोप. त्यापेक्षा नुसती "आज कीर्तन्/अभिषेक आहे. जास्त साखर आणून ठेवते" इतका संवाद म्हणत ती गेली असती तरी चालले असते. पण त्यात तेवढीच १० मिनीटे गेली निरर्थक सीन मधे.

मग ती मजल दरमजल करत त्या प्रवासाला निघते. आता इथे थोडी बॅकग्राउण्ड म्हणजे कोठीच्या खोलीत वेगळा ड्रामा सुरू आहे. तेथे आत्या त्या नोकराला धमकावते आहे. इतकेच नव्हे तर आकाश व भूमी यांनी मरायला हवे म्हणजे मला सगळी इस्टेट मिळेल हे मोठ्याने सांगत आहे. तर तिकडे भूमी निघाली आहे. ती कोठून तरी जिना चढून वर येत आहे. म्हणजे ही खोली वर असावी. किल्ल्यांचा विषय कोणीच काढत नाही म्हणजे किल्ल्याबद्दल इतका ड्रामा आधी झालेला असताना कोठीची खोली आओ जाओ घर तुम्हारा स्टाइलने उघडीच असावी.

तितक्यात बाहेरून येणारा अभिजित (आत्याचा मुलगा. हा सहसा फक्त प्रतिक्रिया देतो. अगदीच कंटाळा आला तर याला एखादा संवाद असतो) ते बघतो. तो एका कमर्शियल वाटणार्‍या लिफ्टमधून बाहेर आला आहे. अशा स्वतंत्र बंगल्याच्या समोर अशी रॅण्डम लिफ्ट कोठून आली? आणि तो जेथे कोठे आहे तेथून त्याला ही कोठीच्या खोलीत निघाली आहे हे कसे कळाले? आणि हा त्याला "स्टोअर रूम" का म्हणतोय? हा सीन आधी ऑफिसच्या बॅकग्राउण्डला असावा.

मग तो असा काहीतरी विचार करत तिला शोधायला येतो ती यांचे बोलणे ऐकू नये म्हणून. ही भूमी सुद्धा कोठीच्या खोलीत दिसेल ते कपाट उघडून साखर शोधत आहे. मधेच एक कपाट तिच्या अंगावर कलते म्हणून ती खाली बेशुद्ध पडते. ते कपाट बाजूला पडते. ते म्हणे अभिजितने तिच्या अंगावर पाडले. तो तेथे कसा पोहोचला माहीत नाही. आणि इतका पुढे होता तर आत्याला ती येत आहे सांगून गप्प करणे जास्त सोपे होते. पण एपिसोड मधल्या पुढच्या ड्राम्याकरता भूमी अनफिट असणे गरजेचे होते. भूमीला आधी काहीतरी झालेले असते त्यामुळे तिच्यावर अशा घटनांचा परिणाम होतो वगैरे लक्षात आले. पण तो नक्की कशाने होते व नक्की कशाने ती बरी होते हे लॉजिक अजून क्लिअर झालेले नाही. तुपारे मधे "ईशाच्या जिवाला धोका" हे हत्यार जसे रॅण्डमली बाहेर काढत तसे इथे काढतात असे वाटते. तिला जुन्या घटना नक्की कधी आठवू द्यायच्या आहेत ते अजून लक्षात आलेले नाही.

मोठ्या जुडग्यातील एक किल्ली साखरेच्या डब्याच्या कुलूपाची असेल
रॅण्डम लिफ्ट
दिसेल ते कपाट उघडून साखर शोधत आहे
>>> Lol

मुळात कोठीच्या खोल्या वरच्या मजल्यावर कोण करतं? ते ही इतक्या वर की जिथे लिफ्टने जावे लागेल. शिवाय कोठीच्या खोलीत अशी हलणारी कपाटं कशाला?
ईशाच्या जिवाला धोका >>> खरंतर ईशापासून आपल्या सगळ्यांच्या जीवाला धोका होता तुपारे मधे Proud

त्यांच्या बंगल्यातच लिफ्ट आहे.
आधी भूमीचे बाबा wheelchair वर होते, तेव्हा त्यांच्यासाठी लिफ्ट वापरत होते
मध्ये आकाश पण एका पायाला मार लागला म्हणून लिफ्ट नेच ये-जा करत असे

ओह मग बरोबर आहे. ते आधीचे एपिसोड्स फारसे पाहिले नसल्याने ते माहीत नव्हते. त्या सीन मधे अभिजित बाहेरून येताना दाखवला आहे त्यामुळे मला वाटले ती दुसरीच लिफ्ट होती कोठलीतरी.

खरंतर ईशापासून आपल्या सगळ्यांच्या जीवाला धोका होता तुपारे मधे >>> Lol हे मात्र खरे.

धमाल पोस्ट Lol
एकच एपिसोड(४७५) बघून डोळ्याचे पारणे फिटले. त्यात लग्नाचा दुसरा दिवस असतो आणि सगळ्या जरीच्या साड्या नेसून राबतबिबत असतात. शिरा करताना आकाश बेडरूममधून व्हिडिओ कॉल करतो आणि कोपऱ्यात क्रॉप टॉप घातलेली मुलगी ऐकत उभी असते आणि याला जास्तच लाडात आल्याने काहीही दिसत नाही, भूमीवरच्या प्रेमात आंधळा. नंतरही पुष्कळ हास्यास्पद गोष्टी घडतात. त्यापैकी सगळ्यात भंगार रोमॅन्टिक गोष्टी नोंदवते.

बालवाडीतल्या मुलासारखे आकाश टंगळमंगळ करत शिरा संपवतो. त्याने वाटीभर का होईना खाल्ले या समाधानाने आजी एकदम तोडेच देते भूमीला. हे बघून एक रॅन्डम बाई खूष होते आणि एकीचा जळफळाट होतो, एकीला 'काय करायचेय ते करा' टाईप न्यूट्रल भावना असतात. #शेवटची बाई प्रेक्षकांकडून आहे.

सगळ्यांचे खाणे संपून सगळी मंडळी आपापल्या कामाला लागतात तरीही हा तेथेच चिवडत बसलेला असतो. आणि मग भूमी विचारते ' तुझे पोट तर भरले का नाही राज्जा'. हे ऐकून तो डोळा मारतो आणि आता भरले म्हणतो. #डोमा =बडिशेप मोमेन्ट

काहीबाही होते, मग दोघे गादीवरची चादर बदलायची ठरवून आधीची चांगली चादर उगाच काढून तांबडा गोणपाट घालतात. आकाशला एकही काम धड जमत नसल्याने तेथेही तो भूमीच्या डोक्यावर आपले मंद डोके हाणतो. डोके जड असल्याने भूमी म्हणते, 'काहीतरी याद आल्यासारखं झालं बे, या आधी बी हाणलं व्हतंस का?' तो म्हणतो 'नाही नाही. पण आता शिंग फुटतील आपल्याला, मला तर बाबा शिंगवाली बायको नको. आता शिंगं undo करायला कपाळाच्या पाप्या घ्याव्या लागणार.' ती येडी पण मुरकते मग.
#हे ह्यांचे लाक्षणिक अर्थाने "horny" क्षणं आहेत.

आईग्गं , कसली मंद शिरेल आहे! शिरा हे झी चं वैशिष्ट्य असताना यांची शिरा करायची हिंमतच कशी झाली? Proud
#डोमा =बडिशेप मोमेन्ट >>> Uhoh
ते शिंग येतील वगैरे गोष्टी पार लहानपणी शाळेत करत असू. पण, माझी याद्दाश बरोबर असेल तर, त्याचा उतारा म्हणून आम्ही कपाळाच्या पाप्या नक्की घेत नव्हतो. हल्लीच्या पिढीचं काही भलतंच Proud

त्याचा उतारा म्हणून आम्ही कपाळाच्या पाप्या नक्की घेत नव्हतो. >>>
म्हणूनच आपण असे शिंगं फुटल्यासारखे करतो. Lol

डोळा मारल्यावरच तो बडिशेप खाल्ल्यासारखे पानावरून उठला. इतकी डम्ब फ्रिक्वेन्सी कशी तरी मॅच करतेय. अजून चिकित्सा करू नका. Lol

म्हणूनच आपण असे शिंगं फुटल्यासारखे करतो >>> Wink Lol

वर तुपारे चा विषय निघालाच आहे तर इथेच लिहून टाकते. शिल्पा तुळ्सकर किती माठ असावी की दोन्ही जन्मांत सुभाशीच लग्न करते. बरं दुसर्‍या जन्मात लग्न करून बदला घेईल म्हटलं तर तिने काही न करताच तो मरतो ( आत्महत्या करुन) . अर्थात त्याचा असा सूड घ्यायचा म्हणून ती ईशाच्या रूपात येते असं एक म्हणायला हरकत नाही Proud

#हे ह्यांचे लाक्षणिक अर्थाने "horny" क्षणं आहेत. >>> Lol हो तसेच असेल. त्यांचे रोमॅण्टिक सीन्स महा-क्रिंजी आहेत.

हे बघून एक रॅन्डम बाई खूष होते आणि एकीचा जळफळाट होतो, एकीला 'काय करायचेय ते करा' टाईप न्यूट्रल भावना असतात. >>> Lol या कोण मी अंदाज लावू शकतो ८-१० एपिसोड्सवरून सुद्धा Happy बहुतांश एपिसोड्समधे हेच चालते.

ती क्रॉप टॉप मुलगी अगदी तेथेच असते. तरीही याला पत्ता नसतो. ती मुळात लग्न झालेल्या (किंवा कोणाच्याही) व्यक्तीच्या बेडरूममधे काय करतीये ते कळले नव्हते त्या भागात.

तो शिरा करतानाच बहुतेक "नवर्‍याला खायला करून घालण्यात जे सुख आहे..." संवाद आहे. तेव्हा पाहणारे लोक वरच्या तिन्ही प्रतिक्रिया एकाच वेळी देत असतील Happy

Pages