एक चाळीशी.. हवीहवीशी ..

Submitted by छन्दिफन्दि on 17 June, 2024 - 02:52

गेल्या दोन तीन वर्षांपासून मला एका गोष्टीचं अत्यंत कुतूहल वाटतंयं. काळा जाड्या फ्रेमचा चष्मा आणि अर्थात त्यामागील ते मिश्किल, प्रेमळ, आणि हसरे डोळे.. म्हणजे इतकं की तुम्हाला काय व्हायला आवडेल असा एखादा निबंधाचा विषय दिला तर माझा विषय अगदी पक्का- तो जाडा काळा चौकोनी चष्मा किंवा त्यापलीकडची ती दृष्टी.. ती जादुई नजर.. .

तसं तर आपल्या सगळ्यांनाच रोज शेकडो लोकं दिसत असतात. मुंबई सारख्या महानगरात राहत असू, लोकलने जात असू तर तोच आकडा हजारावरही जाऊ शकतो.
ही लोकं, काही अत्यंत कंटाळवाणी अगदी टाळू वाटावी अशी तर काही महाभयंकर अगदी चार हात दूर राहाव अशी, काही रागीट तर काही अतिप्रेमळ, काही बेफिकीर, तर काही बेरकी, काही भोळसट तर काही परोपकारी तर काही चाकोरीबद्ध जीवन जगणारी… हातावर पोट असणारी, दोन पैसे गाठीशी बाळगणारी, ऋण काढून सण साजरा करणारी, पोटाला चिमटा काढून पै न पै साठवणारी… अशी नाना प्रकारची, नाना स्तरावरची..
आपणही त्यांच्याशी कधी हसतो, बोलतो, चिडतो, टाळतो, दुर्लक्ष करतो, प्रेम करतो, द्वेष करतो, कौतुक करतो किंवा क्वचित कधी थोडी असुयाही बाळगतो.
आपण अगदी सामान्य माणसं, म्हणजे सूर्योदय किंवा सूर्यास्त बघितला म्हणजे काही लगेच आपल्याला कविता स्फुरणार नाही, की झाडाखाली बसलो म्हणून न्यूटन सारखे शोध लागणार नाहीत, किंवा परिस्थितीने चटके दिले वा प्रेमात पडलो म्हणून लगेच कादंबरी लिहायला सुचणार नाही …तेथे पाहिजे जातीचे.

या लेखक, कवी, नाटककार मंडळींचं आपल्यापेक्षा सगळंच वेगळं. पण तरी त्यातही डावं उजवं असतंच नाही? म्हणजे बघा अगदी कितीही श्रेष्ठ आणि ज्येष्ठ लेखक म्हंटला तरी त्यांची काही पुस्तकचं लोकप्रिय होतात.. त्यातही एखादी लेखांची पुस्तकांची मालिका लिहिली की त्यातील एखादे पात्र अजरामर होणार ..

पण मग असा एखादा अवलिया, ज्याच्या एका पुस्तकात त्याने वीसेक पात्र तरी खुबीनं रंगवलीयेत आणि ती सगळी लोकप्रिय झालीयेत. आणि हे असं एखादच पुस्तक नाही तर कितीतरी पुस्तकं, नाटकं, कलाकृती.. आणि त्या प्रत्येक कलाकृतीतली अनेक पात्र, व्यक्तिरेखा लोकप्रिय झाल्यात नव्हे तर अजरामर झाल्यात. इतक्या की नंतरच्या तिसऱ्या, चौथ्या पिढीलाही एखादा शब्द किंवा वाक्य त्यांच्या कुठल्या पुस्तकातील कुठल्या पात्राच्या तोंडी होत हे अगदी तत्परतेनं सांगता येतं. बरं ती पात्र किंवा व्यक्ती रेखाही काही शूरवीर राजे महाराजे, किंवा अमानवी शक्ती असलेले जादूगार किंवा देवदूत नाहीत तर अगदीच सामान्य किंवा अतिसामान्य माणसं… परिस्थितीचे तडाखे सोसलेली, जनरीतीच्या रहाट-गाडग्यात फिरणारी तुमच्या आमच्यासारखीच सुख दुःख असलेली.. किंबहुना
कदाचित ती तशी होती म्हणूनच ती इतकी लोकप्रिय झाली असावीत का?

आपल्या भोवती चालणाऱ्या कोलाहलातून, गराड्यातून, माणसांच्या जत्रेतून छोटे छोटे बारकावे, त्यांच्यातील नातेसंबंध, देवाण-घेवाण टिपणारे, त्यांच्या लकबी, लय, ढब, शब्दफेक, चढउतार हेरणारे ते ठसठशीत काळ्या जाड्या फ्रेममागचे ते मिश्किल डोळे.

वयाच्या दहाव्या बाराव्या वर्षांपासून पुलंना ऐकायला, वाचायला सुरुवात केली, तेव्हापासून ते वेगवेगळे कळत गेले, उमजत गेले. अर्थात वयाच्या प्रत्येक टप्प्यावर ते ते उमजणं, आवडणं वेगळं होतं.
शालेय किंवा महाविद्यालयीन दिवसांत त्यातला विनोद, कोपरखळ्या, गोष्टीवेल्हाळता ह्यांनी वेड लावलं.
पुढे नोकरी, संसार सुरु झाल्यावर त्यातील व्याप, ताणतणाव विसरायला लावून काही क्षण हसायला लावणारा तो एक हलकासा विरंगुळा झाला. चाळीशीच्या आसपास अजून आयुष्य, माणसे बघितल्यावर, त्यांचे अनुभव घेतल्यावर त्या विनोदामागचे कारुण्य, टोकदारता, विसंगती जाणवू लागली आणि तीच विसंगती, विक्षिप्त माणसे किंवा त्यांचे स्वभाव, परिस्थिती मग आपल्या स्वतःच्या आयुष्यात आल्यावर बसणारी तिची झळ जराशी सुसह्य होत गेली.
वाचता वाचता कधीतरी छोटे मोठे अनुभव, मनोगत लिहायला लागल्यावर मग मात्र पुलं च श्रेष्ठत्व, वेगळेपण अजूनच भावत गेलं. कारण त्यांची एक एक कलाकृती, आणि त्यात चपखल बसणारी ती पात्रं..
आता हेच बघा ना..
असामी असामी मधे फक्त ४०-५० च्या दशकातला कारकुनी करणारे धोंडोपंत जोशीच रंगवले नाही तर त्यांचं पूर्ण कुटुंब, कॉलनीतील, चाळीतील माणसे, कचेरीतील सहकारी, त्यावेळची मुंबई, आणि अर्थात सरोज खरे .. आपली .. सगळं सगळं चित्र शब्दसामर्थ्यावर उभं केलय.
तीन मजली बटाट्याची चाळ त्यातील अनेक बिऱ्हाडकरुंसकट इतकी सुंदर रंगवलीये की चाळसंस्कृती कधीही न अनुभवलेला, पाहिलेला वाचक/ श्रोताही त्यात रंगून जातो.
व्यक्ती आणि वल्ली म्हणजे तर एक खजिनाच आहे. नावाप्रमाणेच अनेक वल्ली तुम्हाला भेटतात अगदी कडकडून.
त्यात उच्चभ्रू नंदा प्रधान, साठाव्या दशकात मराठी कुटुंबियांच्या घरात सर्रास आढळणारा नारायण, गुलछबू नाथा कामत, बेरकी नामु परीट, अभ्यासातील किडा सखाराम गटणे, भोळसट गज खोत, परोपकारी गंपू, इरसाल पण तरीही हतबल असा अंतू बर्वा, उच्चमध्यमवर्गीय सरळमार्गी गुळगुळीत ते चौकोनी कुटुंब, नगण्य तरीही विक्षिप्त असा मिडिऑकर लखू रिसबूड, मिश्किल खट्याळ पेस्तनकाका - काकी, स्वतः मुखवटा घालून दुनियादारी करणारा आणि अंतर्मुख व्हायला लावणारा ‘तो’ …
सुंदर मी होणार मधील दीदीराजे, बेबी राजे किंवा तुज आहे तुजपाशी मधील जिंदादिल काकाजी, कठोर आचार्य किंवा ती फुलराणी मधील फुलराणी, प्राध्यापक किंवा रविवार सकाळ मधील एकेक हरहुन्नरी चाळकरी, मालू, तिच्या उच्चभ्रू मैत्रिणी किंवा वार्यावरची मधील गावातला महाबेरकी साक्षीदार, टुरिंग टॉकिज दाखवणारे गावकरी, स्वागत समारंभातील मान्यवर .. केव्हढा मोठा तो स्पेक्ट्रम!

जिथे एका लेखकाला एक पात्र तयार करून ते लोकांच्या मनावर ठसवायला फक्त एक पुस्तक नाही तर पुस्तक मालिका कराव्या लागतात.
तिकडे एका नाटकात, पुस्तकात असणारी अनेक पात्रे त्यांच्या संवादासह प्रेक्षकांच्या, वाचकांच्या मनावर राज्य करतात आणि पुस्तक/ नाटक संपल्यावरही हलकेच मनात त्यांची सोबत करत राहतात.. अगदी काही दशकांपूर्वीच्या काळातील त्या व्यक्ती अगदी ह्या काळातही त्यांना भेटत राहतात.. खरंच अगदी अद्भुत वाटतं सारं! म्हणूनच ते इंग्रजी मध्ये म्हणतात ना ‘अ फ्लाय ऑन द वॉल’ अगदी तसच त्या चष्म्यात बसून त्यांना काय काय आणि कस कसं दिसतं ते बघत राहावं .. अगदी तासनतास .. दिवसेंदिवस .. वर्षानुवर्षे पण म्हणजे आत्ता नाही हं कित्येक दशकं मागे जाऊन अगदी पार ६०च्या दशकापासून!

______________________________________________

गेल्या आठवड्यात पुलं चा स्मृतिदिन होता त्यानिमित्त हा लेख. कितीतरी महिने हे डोक्यात घोळत होतं. आज त्याला शब्दरूप देता आलं. पुलं च्या स्मृतीस त्रिवार वंदन !

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी त्यांच्या पेक्षा २० वर्षे वयाने लहान.
त्यांनी निखळ विनोद आणि निरागस व्यक्तीचित्रांनी माझे जीवन हसरे ठेवले, आणि सवंग विनोदांपासून दूर ठेवले
असे ते असे ते
ते महान फिलॉसॉफर होते!!!

तिकडे एका नाटकात, पुस्तकात असणारी अनेक पात्रे त्यांच्या संवादासह प्रेक्षकांच्या, वाचकांच्या मनावर राज्य करतात आणि पुस्तक/ नाटक संपल्यावरही हलकेच मनात त्यांची सोबत करत राहतात.. >> खरंय. अन्तु बर्वा असा सतत सोबतीला असतो आमच्याकडे..
छान लिहिलंय छन्दिफन्दि.

त्यांनी निखळ विनोद आणि निरागस व्यक्तीचित्रांनी माझे जीवन हसरे ठेवले, आणि सवंग विनोदांपासून दूर ठेवले >>>> हमम अगदी खरंय.!

महान फिलॉसॉफर होते>> हो, त्यांची पात्रे विशेष करून त्यांची भाषणं ऐकली तर ते जास्त प्रकर्षानं जाणवत, हलक्या फुलक्या पद्धतीने कठीण परिस्थितीला, माणसांना कसं सामोरं जावं.. सहज सांगून जातात.

अन्तु बर्वा असा सतत सोबतीला असतो >>> Bw

तरी चितळे मास्तर राहिले नमूद करायचे.... आमच्या शाळेतही अशा बाई / सर होते.

रेव्यू, स्वाती, प्राचीन, आबा thank you!

नैऋत्य ईशान्य टोपी हा joke ज्याला समजला त्याला चहा पाजयला तयार आहे मी!
( माबोकर अपवाद आहेत अर्थात.)

माबोकर अपवाद आहेत अर्थात.)

Submitted by धवलतरांशुकगंधमा...

... >>> इथे वाचणारे, कॉमेंट टाकणारे सगळे माबो करच , नाहींका? Bw

तुला डिग्री ऑफ माबोकर असा काही म्हणायचंय का??

----

पुलंच्या साहित्यातील किस्से, पात्रे, त्यांचे संवाद यातील काहीही लिहिण्यासाठी हा धागा वापरू शकता..
त्यानिमित्ताने त्यांच्या स्मृतींना उजाळा..

Thank you ऋतुराज आणि हरचंद पालव.

त्यांची सर्व पात्रं डोळ्यासमोर आली >>आदरमोद

"पैशाला पसाभर मिळणाऱ्या लाह्या आता पॉपकॉर्न झाल्यावर सहा आणे मूठ झाल्यावर अंगाची लाही झाली ती झालीच!.. "
- अर्थात असामी असामी
च्या लायनीत हे बसतयं का ? ?
योगासनाचं योगा झाल्यावर पूर्वी योगकुटीरमध्ये मोफत योगसाधना शिकण्याचे दिवस जाऊन आताच्या योगा स्टुडिओ च्या फिया ऐकल्यावर शवासनातं जायची पाळी येते की काय असे वाटते.
भूगोलात आदिवाश्यांचे अन्न म्हणून वाचलेली नागली / नाचणी, रागी झाल्यावर मात्र तिने सेलिब्रिटीच्या स्वयंपाकघरात शिरकाव केला.

तुम्हाला काही सुचलं तर नक्की लिहा