होम अलोन
डांग्या खोकल्याच्या अनावर उबळीने हैराण; प्राणांतिक आकांत करणाऱ्या जीर्णजर्जर म्हातार्याप्रमाणे चित्रविचित्र आवाज करत, आणि अगडबंब देहाला आचके-गचके देत, महामंडळाची लाल परी एकदाची सुरू झाली.
त्याने चटकन निरोपाचा हात हलवला. ते अधीर ; आततायीपण त्याचे त्यालाच जाणवले अन् तो वरमला. सामानाची ठेवाठेव करण्यात गुंतलेल्या पत्नीचे आपल्याकडे लक्ष नसल्याचे बघून त्याला हायसे वाटले.
आत शिरल्या-शिरल्या; खिडकीकडची जागा बळकावण्यासाठी मुलांनी मांडलेल्या उच्छादाकडे त्याने पद्धतशीरपणे दुर्लक्ष केले.
‘ पोहोचलात की फोन कर,’ गाडी हलली तसा तो बोलला.
सभोवतालच्या गोंगाटात त्याचे शब्द हवेतच विरले. एस. टी. स्टँडबाहेर पडलेल्या बसने , मागे सोडलेल्या धूर अन् धुळीच्या ढगातून वाट काढत तो पार्किंगकडे वळला.
बायको अन् ही पिलावळ दूर आहे निदान तोपर्यंत आपण आपल्या मर्जीचे मालक! मोटरसायकलला मारलेल्या किकपेक्षा, ह्या एका बेबंद विचाराची किकच त्याला जबरी बसली !
वाचन, मनन, चिंतन, लेखन , टी.व्ही. , लवकर झोपणे, उशिराने उठणे, मन मानेल तेवढा वेळ यथेच्छ लोळत पडणे. आता सगळे कसे निर्धास्त, बिनदिक्कत अन् बिनधास्त! कुणाची आडकाठी नाही, कुणाचा अडथळा नाही. कुणाची अडचण नाही की कुणाची भुणभुण नाही.
आता ना किराणा भाजीपाल्यासाठी मार्केटच्या चकरा. ना डोक्यावर पोरांच्या होमवर्कची टांगती तलवार. ना अचानक तोंड फुगवून बसलेल्या किचन एप्लायंसशी , दुरूस्तीच्या नावाखाली देशी जुगाडाच्या खेटा. ना पोराटोरांच्या झगड्यात थर्ड अंपायरची थँकलेस भूमिका.
भांडणं, गदारोळ, गोंधळ, गलका, आदळ-आपट, मारामारी, झोंबाझोंबी...पुढचे पंधरा दिवस यातले काही काही सुध्दा आपल्याला सहन करायचे नाही.
अँड... अँड मोस्ट इंपोर्टंटली, नो स्ट्रेस ऑफ स्टिकिंग टू द ग्रेट रिंग मास्टर्स - ‘ स्पिक अँड स्पॅन ’ होम प्रोटोकॉल !
सो लेटस एंजॉय द लाइफ ऑफ , “ ए बॅचलर इन पॅरेडाईज ” - विदाउट ए डॅमसेल! ह्या एका रोमँटिक विचारापाशी येताच, त्याचे अंग अंग मोहरून आले.
गॉड, हाउ बॅडली आय वाँटेड... रादर - क्रेव्हड फॉर दिस पीस अँड हार्मनी, काम अँड ट्रँक्विलिटी!
विचारांच्या उलटसुलट प्रवाहात, एखाद्या ओंडक्यासारखा उभाआडवा भेलकांडत त्याने घरात प्रवेश केला. एका कोपर्यात हेल्मेट आणि दुसर्या कोपर्यात शूज भिरकावले. अंगावरचे कपडे ओरबाडून काढत, तसेच सोफ्यावर ढकलले. मोकळेढाकळे कार्गो बर्मुडा अन् टी शर्ट घालून, मन मानेल तसे हातपाय पसरून तो ऐसपैस बसला.
टिपॉयवरचा पेपर उचलून त्याने पाने चाळायला सुरुवात केली. नेहमीच्याच शिळ्या कढीला ऊत आणणाऱ्या त्याच त्या ठेवणीतल्या बातम्या वाचून तो कंटाळला. पेपर बाजूला सारून त्याने आढ्याकडे नजर टाकली अन् डोळे मिटून तो काही काळ तसाच बसून राहिला.
ए.सी.च्या कॉम्प्रेसरची लयबद्ध गुटूर ऽऽ गुटूर ऽऽ सोडली, तर सबंध घरात स्मशानशांतता पसरलेली होती.
मग नेहमीच्याच सवयीने त्याने टी. व्ही. रिमोट उचलला. आणि लगेचच, पुढ्यातल्या ८ बाय २ च्या आयताकृती मैदानात, तो हॉपस्कॉच खेळू लागला.
त्याच त्या शोजचे उबग आणणारे रिपीट टेलिकास्ट, तेच ते कंटाळवाणे सोप ऑपेरा, तीच ती न्यूज़ चॅनेलवरची अघोरपंथी आग पाखड, कुठकुठल्या ‘शोज’च्या नावाखाली, तोकड्या कपड्यात पांचट गाण्यावर चित्रविचित्र अंगविक्षेप करणारी तीच ती निरागस, चिमुरडी मुले अन् आपल्या कृत्याची लाज वाटण्याऐवजी; हर्षामर्षाने कृतकृत्य पावणारे त्यांचे जन्मांध पालक.पाच-दहा मिनिटातच त्याचे तोंड कडूजार झाले.
टी. व्ही. बंद करून त्याने भला मोठा श्वास सोडला.
अचानक त्याचे लक्ष, जाण्याच्या धांदल घाईत, घरीच विसरून राहिलेल्या मुलाच्या आय पॅडकडे गेले. मग टॅब उचलून, तो समाज माध्यमांच्या भाराभर चिंध्यांचे आणखी एक रुपेरी गाठोडे उघडून बसला. सोमी वरच्या चित्त विचलित करणाऱ्या भडक जाहिराती. पाचकळ विनोद. प्रैंकच्या नावाखालचा सुमार भावनाविष्कार. आणि कोर चतकोर मिनिटाच्या ‘रील्स’मधून व्हायरल होण्यासाठी चाललेल्या केविलवाण्या धडपडींचा ( पडझडींचा ?) नाही म्हणायला त्याला उबगच आला.
आळोखेपिळोखे देत त्याने एक भला मोठा आळस दिला. सहज चाळा म्हणून; काही वेळ, एक्स वर ‘ट्विट-ट्विट - ट्विट-ट्विट’ , ‘चिऊताई चिऊताई दार उघड’ खेळून पाहीले, तर तिथेही त्याचे मन काही केल्या रमेना.
हिवाळ्यातल्या पहाटेच्या गडद धुक्यासारखी, नीरव शांतता हळूहळू पुन्हा घरभर हातपाय पसरू लागली. एका निर्वात पोकळीत आपण प्रवेश करताहोत असा विलक्षण भास होऊन तो धास्तावला.
मस्तपैकी कॉफी घेतली की हा सारा ऊन सावल्यांचा खेळ खल्लास!
स्वत:शीच हसत तो उठला आणि किचनमधे शिरला. मोजून अर्धा डझन डबे उलटेपालटे करून हुडकून झाल्यावर, एकदाचा त्याला हवा तो साखरेचा डबा सापडला. ह्या साल्या बायका, नेमका हवा तोच डबा कसा काय उचलत असतील? त्याने स्वत:लाच प्रश्न केला.
कॉफीचा पहिला घोट घशाखाली जातो न जातो, तोच त्याने तोंड वाकडे केले. कॉफीशी साधर्म्य सांगणारे हे आपण काय बनवलेय अन् काय झालेय हेच त्याला कळेना. औसे-पूनवेला किचनमधे शिरल्यावर आणखी काय होणार - कप्पाळ! त्याने स्वत:ला शिव्यांची लाखोळी वाहिली आणि कॉफीचा कप सिंकमधे सरकवला.
चलो, कुछ लिखते हैं! समथिंग सब्लाइम !! अनपेक्षितपणे घोगरा झालेला आपला आवाज, ड्रॉइंगरुमच्या पोकळीत बऱ्याच काळापासून दुमदुमतो आहे असा त्याला भास झाला.
नोट पॅड आणि पेन घेऊन तो शून्यात नजर लावून बसला. उनाड, भटक्या पाखरासारखे त्याचे मन स्वत:भोवती घिरटावू लागले.
आजवर आपण पोटतिडकीने लिहलेल्या इतक्या साऱ्या कथा अन् कविता का कुणालाच आवडू नयेत? ह्या एवढ्या मौलिक लिखाणावर, मेलोड्रॅमॅटिक वा दुर्बोधतेचा ठप्पा मारून, त्याला केराची टोपली दाखवायची म्हणजे जरा अतिच झाले.
सभोवतालच्या करूणदारूण परिस्थितीवर प्रकट भाष्य करून, वाचकांना अंतर्मुख करणारे, आशयघन, वास्तववादी साहित्य मेलोड्रॅमेटिक?
बारोमास आपल्या दारावर धडका मारणारे हे अठरा विश्वे दारिद्र्य, ही भूक, गरिबी, लाचारी, बेरोजगारी, हिंसा, अत्याचार, अमानुषता, लाचलुचपत, लांगूलचालन, आणि दिसामासे वाढतच चाललेले नात्या-नात्यांमधले दुभंगलेपण, परकेपण अन् टोकाचे दुरावलेपण, हे सर्व मोरपंखी रंगात कुणी कसे चितारायचे ?
तुमचे लिखाण नेहमीच एक नकार घंटा वाजवत आलेय, असे परवा कुणी तरी अनावधानाने बोलून गेला , म्हणून काय “ गुडी गुडी गोपाळा ” टाईपचं लिहून टाळ्या न लाइक्स घेण्यात धन्यता मानायची ? का, उघड्या डोळ्यांसमोर समस्यांचे महाभयंकर अग्नितांडव फेर धरून नाचत असताना, आपण फक्त “नीरो” पंथीत रममाण व्हायचे?
त्याने एक सुदीर्घ श्वास सोडला.
लिहण्याचा नाद अर्ध्यावर टाकून, देहमनावर आलेली मरगळ झटकून तो उठला आणि त्याने घर आवरायला घेतले . सर्व वस्तू , जीनसा, मुलांची खेळणी, किचनमधली भांडी त्यांच्या नेहमीच्या जागी ठेवून आणि किचन ओटा घासूनपुसून लख्ख केल्यानंतर, आपण केलेल्या कामावर खूष होऊन त्याने एक गोड शीळ भरली. अन् त्याच्याही नकळत; आतापर्यंत आक्रसलेल्या त्याच्या चेहर्यावर एक निर्मळ हसू पसरले.
कुठलेसे प्रणयधुंद गाणे गुणगुणत, त्याने मोबाइल उचलला आणि बायकोला कॉल लावला.
मनातल्या मनात, “ बेबोजी ; ऑलरेडी स्टारटेड मिसिंग यू , प्ली ऽऽ ज कम होम सून...” ची मनातल्या मनात उजळणी करत, तो मोठ्या आतुरतेने कॉल कनेक्ट होण्याची वाट पाहू लागला.
सहस्त्र दशसहस्त्र बीप बीप बीप नंतर, पलिकडून नेहमीचाच कमावलेला, संवेदनाहीन, यांत्रिक आवाज आला: ‘ द नंबर यू आर ट्राइंग टू रीच हॅज मुव्हड आउट ऑफ कवरेज एरिया, प्लीज़ ट्राय लेटर....’
***
छान....
छान....
शेवटी एकांत तोपर्यंतच हवा जोवर मिळत नाही.... काही सन्मान्य अपवाद सोडल्यास.....
द सा - अगदी बरोबर..!! खरे तर,
द सा - अगदी बरोबर..!! खरे तर, तोच ह्या लेखनाचा मुख्य धागा... मनःपूर्वक आभार!
मला पण आवडली. सयंत. क्रिस्प.
मला पण आवडली. सयंत. क्रिस्प. खुसखुशीत. वेळेवर "समे"वर आली.
>>>> वेळेवर "समे"वर आली.
>>>> वेळेवर "समे"वर आली.
केशवकूल - खूप खूप आभार प्रतिक्रियेसाठी... !
मस्त
मस्त
मस्त
मस्त
किल्ली - खूप खूप आभार
किल्ली - खूप खूप आभार प्रतिसादासाठी..!
बन्या - मन:पूर्वक आभार!!
आवडली कथा.
आवडली कथा.
मनिम्याऊ - मन:पूर्वक आभार
मनिम्याऊ - मन:पूर्वक आभार प्रतिसादासाठी..!!
मस्त!
मस्त!
नवरा बाहेरगावी गेला की
नवरा बाहेरगावी गेला की तेरड्याचे तीन दिवस बरे वाटतात मग मात्र कंटाळा येतो. क्रोनॉलॉजी साधारण अशी असते -
(१) पहीले २ दिवस सुचत नाही कारण नवर्याच्या ऑफिसात जाण्याची वेळ, घरी येण्याची वेळ, दिनचर्येची सवय झालेली असते.
(२) नंतर इट सिन्क्स इन की आपण हव्व ते करु शकतो. जे की काहीही सिनिस्टर नसतं. स्टारबक्स, पिझ्झा, जिमला दांडी, रात्री सिनेमे पहात बसणे वगैरे क्षुल्लक व निरुपद्रवी आनंद.
(३) दिनचर्या मोडल्याने झोपेचे खोबरे व पर्यायाने दिवसाचे खोबरे होते, उत्साह टिकत नाही वगैरे वगैरे ...
(४) नवर्याला मिस करु लागणे किंचीत सुरु होते न होते तोच तो परततो.
--------
कथा रिलेट झाली.
स्वाती२ - प्रतिसादासाठी आपले
स्वाती२ - प्रतिसादासाठी आपले आभार..!
सामो - कोटी कोटी नमन..!
सामो - कोटी कोटी नमन..!
You know what..? मूठभर कामाचे आभाळभर कौतुक करण्यात आपण पारंगत आहात..!! I MEAN IT... !!!
बाकी एवढ्या विस्तृतपणे कमेंट लिहिलीय की भरभरून पावलो.. पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद...
छान लिहिलेय.
छान लिहिलेय.
SharmilaR- मन:पूर्वक आभार आणि
SharmilaR- मन:पूर्वक आभार आणि धन्यवाद -प्रतिसादासाठी!!
हे भयंकरच आवडले - "मग
हे भयंकरच आवडले - "मग नेहमीच्याच सवयीने त्याने टी. व्ही. रिमोट उचलला. आणि लगेचच, पुढ्यातल्या ८ बाय २ च्या आयताकृती मैदानात, तो हॉपस्कॉच खेळू लागला. "
स्फुटाचा नायक वरच्या वाक्यानंतर उच्चासनावर बसणार असे वाटत असताना शेवटाची किक जबरदस्त आली.
>>>> हे भयंकरच आवडले - "मग
>>>> हे भयंकरच आवडले - "मग नेहमीच्याच सवयीने ......."
असामी- प्रोत्साहनपर अभिप्रायाबद्दल खूप खूप आभार...
ही कथा लिहताना मला ही प्रचंड मजा आली..! पुनश्च आभार...