नाम नामेति नामेति

Submitted by Revati1980 on 24 March, 2024 - 02:06

नाम नामेति नामेति

" नाव काय ठरलं शेवटी मुलीचं?"

" एकदम यूनिक ठेवलंय,अवीरा."

" अवीरा? काय अर्थ होतो या नावाचा?"

" बहादुर, ब्रेव, स्ट्रॉंग, कॉन्फिडेंशियल; कसं वाटलं नाव?"

"अवीरा म्हणजे बहादुर, ब्रेव, स्ट्रॉंग, कॉन्फिडेंशियल हा अर्थ तुम्ही कुठे शोधलात ?"

" गुगल बाबा आहे ना, मॉम जंक्शन नावाची एक साईट आहे तिथे मिळाले हे नाव. चांगलं नाव आहे ना?"

हे नाव हिंदू आहे?
१०० टक्के .का?

अवीरा नावाचा अर्थ होतो पुत्र आणि पतीरहित स्त्री. नास्ति वीरः पुत्त्रादिर्यस्याः सा अवीरा.
म्हणजे ही मुलगी आजन्म कुमारी असेल किंवा.... जाऊ द्या.

आता काय करायचं? बर्थ सर्टिफिकेटवर हेच नाव आहे.
मॉम जंक्शन पेक्षा ललिता सहस्रनाम वाचले असतेत तर हजारो नावं मिळाली असती.सत्तावीस नक्षत्रांची नावं माहिती नाहीत का तुम्हाला? आता काय उपयोग? ऍफिडेव्हिट करून नावं बदलून घ्या.

आजकाल काहीतरी हटके करायच्या नादात बाष्कळपणाचा ट्रेंड चाललाय. मुलगी झाली की मियारा, शियारा, कियारा, नयारा, मायरा, टियारा, अल्मायरा ... मुलगा झाला तर वियान, कियान, गियान, केयांश. गोमांश.. आणि त्याचा अर्थ विचारला कि घे गुगल, घे याहू ...... मग उत्तरं देतील इट मीन्स रे ऑफ लाइट.;इट मीन्स गॉड्स फेवरेट.इट मीन्स ब्ला ब्ला..
हे असं यूनीक नाव ठेवायच्या नादात मिसेस शहा नी तिच्या मुलीचं नाव श्लेष्मा ठेवलं. मी तर चकितच झाले. मी तिला विचारलं, काय गं भावना, श्लेष्मा म्हणजे काय?
तिनं काय उत्तर दिलं असावं? ती म्हणाली, श्लेष्माचा अर्थ होतो,जिच्यावर आईची कृपा आहे " . मी डोकं गच्च धरून बसले. मला असं बघून ती म्हणाली, का गं, काही चुकलं कि काय?"

मी म्हणाले, काय गं, तुझ्या मुलीला सारखी सर्दी असते, नाक गळत असतं असं काही आहे का?

नाही, असं काहीच नाही, का ?

अगं श्लेष्माचा अर्थ शेंबडी मुलगी, श्लेष्म म्हणजे नाकातला कचरा, मेकुड.

तिचा चेहरा पाहण्यालायक झाला. काय करणार होती ती? तिलाही तेच सांगितलं, ऍफिडेव्हिट करून नावं बदलून घ्या.
फॅशनेबल कपडे घालायच्या लाटेत अर्थहीन, अनर्थकारी, बेढब शब्दांचा प्रयोग समाज आपल्या संततीच्या नावासाठी करू लागलाय. नाव द्यायचा अधिकार आजी, आजोबा, गुरु, आत्याबाई यांच्याकडेच राहू द्या ना. तेच हिताचं नाही का?

व्यक्तीचे नाव आणि दैव यांच्यात एक नशिबाचा दुवा असतो म्हणून चांगले, शुभ नाव ठेवावे . नामाखिलस्य व्यवहारहेतु: शुभावहं कर्मसु भाग्यहेतु:। नाम्नैव कीर्तिं लभते मनुष्य-स्तत: प्रशस्तं खलु नामकर्म। ब्राह्मणांनी देव देवतेची नवे ठेवावीत , क्षत्रियांनी वीरता दिसेल अशी नावे ठेवावीत , उदा रिपुदमन , वीरेंद्र , ,प्रताप , राजेंद्र इत्यादी , वैश्यांनी संपत्ती दर्शक नावे ठेवावीत , उदा लक्ष्मीकांत लक्ष्मीधर, इत्यादी. आयुर्वर्चो sभिवृद्धिश्च सिद्धिर्व्यवहृतेस्तथा । नामकर्मफलं त्वेतत् समुद्दिष्टं मनीषिभि:। मुलांची नावे कशा प्रकारे ठेवावीत या बद्दल पारस्करगृह्यसूत्र मध्ये असा श्लोक आहे, द्व्यक्षरं चतुरक्षरं वा घोषवदाद्यंतरस्थं। दीर्घाभिनिष्ठानं कृतं कुर्यान्न तद्धितम्।।अयुजाक्षरमाकारान्तम् स्त्रियै तद्धितम्। नवा पण तीन प्रकारची; देवनाम, नक्षत्रनाम आणि व्यावहारिक नाम. कुंडलीतले नाव व्यवहारात नको कारण कोणी आपल्यावर जादू टोणा, जारण मारण, करणी संमोहन इत्यादी करत असेल तर त्या साठी नक्षत्र नावाची गरज असते. व्यवहारातल्या नावावर त्याचा प्रभाव पडत नाही.आपले नक्षत्र नाव सहसा कुणाला सांगायचे नसते हे ही लक्षात ठेवा.
तुमच्या समोरच्या फ्लॅट मध्ये राहणारे मिस्टर चुडासमा, त्यांच्या मुलाचं नाव ठाऊक आहे का?

होय. अनल नाव आहे.

काय स्पेलिंग कराल तुम्ही या नावाचं?

एएनएएल

याचा अर्थ इंग्रजीत काय होतो ते ही बघा एकदा गुगलवर. मुलाला त्यांनी इंग्रजी शाळेत घातलेय.

.............

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

फेफ Lol

फेफ Lol

कुरापती Biggrin

अशी सगळी पाण्याच्या संदर्भातील होती” - आई वडिलांचे सगळे कष्ट पाण्यात गेले म्हणायचे >> Biggrin

“अशी सगळी पाण्याच्या संदर्भातील होती” - आई वडिलांचे सगळे कष्ट पाण्यात गेले म्हणायचे >> फेफ Happy

माझ्या ऑफिस मधल्या एका कलिग ने त्याच्या मुलीचे नाव वृथा ठेवलेय. मला आधी पृथा जे कुंतीचे नाव आहे ते वाटले होते म्हणून परत विचारून confirm केले. वृथा हेच नाव आहे हे त्याने सांगितले. ऐकून डोक्यावर हात मारून घेतला होता मी.
पार्थिव , निर्वाण, अनिती ही नावे देखील माझ्या मुलाच्या वर्गातील मुला-मुलींची ऐकली आहेत

माझ्या वर्गात शुद्ध मराठी आडनावाची मोनालिसा होती Happy तसंच एका मराठी आडनावाच्या सहकार्याने त्याच्या नवजात कन्येचे नाव ऑलिविया ठेवल्याचे माहित आहे. नावं छानच आहेत. फक्त आडनावासकट जरा… आऊट ऑफ द बॉक्स वाटतात. त्या मानाने सारा तेंडूलकर खटकत नाही.

विश्पला चा उल्लेख वैदिक काळातील एक स्त्री म्हणून आहे, धनवन्ती. तिची गोष्टही आहे. वीरवनिता विश्पला म्हणून तिचा संस्कृत मध्ये धडाही आहे. /होता. मीही लहानपणी हे नाव ठेवलेलं पाहिलंय.

तिचं नाव मोनालिसा आणि आडनाव बाई. >> मला मोनालिसा विचित्र किंवा मजेशीर वाटलं नाही. बाई मजेशीर वाटलं. कारण एकदा तिचे वडील आले होते कॉलेजला. तेव्हा सगळे - हे मिस्टर बाई - म्हणत होते.

हिमगौरी , मोनालिसा नावं आवडली पण हिमगौरी नावाप्रमाणेच असायला हवी Happy

आमच्या टीममधे एका अमेरिकन बाईचे नाव Raquel आहे. अमेरिकन उच्चाराने ते सर्व तिला रखेल अशी हाक मारतात. पण मला कितीही दुर्लक्ष करायचं ठरवलं तरी जीभ रेटतच नाही म्हणुन मी तिला रकेल म्हणते. (तसंही माझं इंग्लीश गरीबच आहे त्यात अजुन ही एक भर, त्यामुळे अमेरिकनांना फरक पडत नाही). मला ही मारतातच की हाक त्यांना जमेल तशी.

मी शाळेत असताना आमच्या घरातलं मोनालिसा चं पोस्टर बघून एका कातकरणीने आईला विचारलं होतं, ही तुमची सासू का? तेव्हापासून आम्ही मोनालीसाला आईची सासू म्हणतो Lol

लष्करात असताना नवरा बायको दोघेही कर्नल आणि डॉक्टर आणि विभागप्रमुख होते.

बायको नवऱ्याला "पी एन" असेच हाक मारायची.

त्यांना एकदा आमच्या ओ टी मेट्रन ने विचारले कि तुम्ही सरांना "पी एन" असे का हाक मारता.

त्यावर त्या शांतपणे म्हणाल्या त्यांचं नाव प्राणनाथ आहे मी जर सार्वजनिक ठिकाणी "प्राणनाथ" म्हणून हाक मारली तर कसे दिसेल?

बाकी आमच्या वडिलांचे वरिष्ठ होते श्री भौमिक त्यांना गोंडस तिळ्या मुली होत्या.

इन्की ( इंद्राणी), बिंकी (बंदिनी) आणि चिंकी (चंद्राणी)

ह्यावरून आठवलं
माझी आई तिच्या मोठ्या जावयाला म्हणजे दीपकचा उल्लेख करताना jb असा करायची म्हणजे जावईबापू Happy

मोनालिसा आईची सासू Lol
कर्नाटकात मंजुनाथ, बसवराज अशी काही काही नावं इतकी म्हणजे इतकी कॉमन आहेत की कंटाळा येतो! शिवाय कार्तिकस्वामीची (गणपतीचा मोठा भाऊ) जी विविध नावं आहेत तीही इतक्या जणांची असतात! महाराष्ट्रात त्या मानाने खूप व्हरायटी असते नावांची (त्यातूनच मग थेंब आणि ठिपका वगैरे निघतात Lol आणि मग 'आवरा' असं वाटायला लागतं)

माझ्या ओळखीच्या एकाच्या भावाचं नाव अश्वत्थप्पा आणि बहिणीचं नाव अश्वत्थम्मा! 'अश्वत्थ' वृक्षाशी संबंधित काही देवस्थान आहे त्यांच्या गावाकडे त्यामुळे तिकडे सर्रास प्रत्येक कुटुंबात ही नावं ठेवतात म्हणे.

आमच्या भागात काही समाजांमध्ये जुन्या काळी ज्या वारी जन्म झाला असेल त्या वारांच्या नावावरून मुला-मुलींची नावं ठेवली जात होती.
जसं की,
सोमवार - सोमाऱ्या, सोम्मारी बाई
मंगळवार - मंगळ्या, मंगळी बाई
बुधवार - बुध्या, बुधीबाई
शुक्रवार - सुकऱ्या, सुकरीबाई
शनिवार - शिणवाऱ्या, शिणवारी बाई

जुन्या काळी आधीची मुलं जन्माला येऊन जिवंत राहत नसतील आणि नंतर येणारं मुलं जगलं की त्या मुलाचं/ मुलीचं नावं ठकाजी आणि ठकुबाई ठेवत. मृत्यूला त्यांनी ठकवलं म्हणून
जुने लोकं अशी नावं ठेवत.

९० च्या आसपास तर बहुतेक मुला-मुलींची नावं हिरो- हिरोईनची नावावरून ठेवली जात. सोनम, मिथुन, दिव्या हि फेमस नावं ठेवत.

१९९४ साली ऐश्वर्या राय विश्वसुंदरी झाली त्यानंतर बहुतेक मुलींची नावं ऐश्वर्या ठेवली गेली असतील.

जुन्या ऑफीस मध्ये ' डिंकेश'' नावाचा मुलगा होता.. नाव ऐकून पहिल्यांदा मला आश्चर्य वाटलं आणि हसू आलं.. आता काही नाही वाटतं. शेवटी नावात काय आहे..? ' मॅनेजर' असं एक नाव आताच ऐकण्यात आलंय.

“ ९० च्या आसपास तर बहुतेक मुला-मुलींची नावं हिरो- हिरोईनची नावावरून ठेवली जात.” - हे त्याआधीपासून चालू आहे. दिलीप, अमित ही नावं कितीतरी आहेत.

Pages