शब्दवेध व शब्दरंग (३)

Submitted by कुमार१ on 15 March, 2024 - 20:34

भाग २ इथे : https://www.maayboli.com/node/83225?page=33#new
......................................................................................................................
शब्दवेध व शब्दरंग......
अर्थात मराठी शब्दांचे अंतरंग.....
शब्दज्ञान आणि मनोरंजन....
सुस्वागतम !

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कोकणी भाषेत काढा ( औषधी पेय, काढणे चे आज्ञार्थ रूप नव्हे ) अशा अर्थाने कशाय शब्द वापरतात.
फळे पूर्ण पिकलेली नसली तर त्या चवीला आडकू असे विशेषण आहे - खासकरुन केळी / चिकू / फणस यांच्या संदर्भात वापरतात

कषाय हा काषाय शब्दाचा अपभ्रंश हे पटत नाही. उलट काषाय म्हणजे कषायाच्या रंगाचा असा अर्थ असावा. आणखी एका श्लोकात हा शब्द ऐकला आहे -

काषायवस्त्रं करदंडधारिणम् कमंडलुम् पद्मकरेण शंखम् |
चक्रं गदा भूषितभूषणाढ्यं श्रीपादराजम् शरणं प्रपद्ये ||

खूप लहानपणी ऐकला होता. त्यात शब्द नक्की कुठे तोडलेत आणि कुठे जोडलेत यात चुका असू शकतील.

>>> उलट काषाय म्हणजे कषायाच्या रंगाचा असा अर्थ असावा
हो, मलाही तसंच वाटतं.
(पुलंची ‘कषायपेयपात्रपतित मक्षिका’देखील आठवली त्यावरून. Happy

कषाय
आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून इथे काही रोचक माहिती आहे : https://marathivishwakosh.org/15724/

‘कष’ धातूपासून (‘हिंसा’ अशा अर्थाने) कषाय शब्द बनला आहे. मूळ पदार्थाची (द्रव्य) हिंसा करून अर्थात त्याचे स्वरूप नष्ट करून बनविला जातो म्हणून ‘कषाय’.

बरोबर, भरत.
पुलंच्या ‘हसवणूक’मध्ये ‘माशी’ नावाचा लेख आहे, ज्यात कषायपेय आणि मज्जितमक्षिका असे उल्लेख आहेत, त्यामुळे माझा गोंधळ झाला. Happy

पारंपरिक ( प)
https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%82%...
आणि
या विषयावर पूर्वी देखील बरीच चर्चा झाली आहे आणि दोन वर्षांपूर्वी भाषा या विषयावर अभ्यासू मंडळींची लेखमाला लोकसत्तात आली होती.
त्यातही पुन्हा एकदा हा मुद्दा अधोरेखित केलेला होता

https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4....

पारंपारिक चूक; पारंपरिक बरोबर. मूळ शब्द परंपरा. त्याला इक प्रत्यय लागण्यापूर्वी शब्दातले पहिले अक्षर ’प’, त्याची वृद्धी होऊन ’पा’अक्षर बनते. त्यामुळे परंपरा+इक=पारंपरिक. मूळ शब्दात आलेल्या दुसऱ्या ’प’ची वृद्धी होणाचे कारण नाही. अर्थात्‌ ’पारंपारिक’ अयोग्य आणि ’पारंपरिक’ योग्य.

परंपरा+इक=परंपर्‌+इक=पारंपरिक. या संधीच्या प्रकाराला पररूप संधी असे म्हणतात. यात पहिल्या शब्दातील शेवटचा स्वर जाऊन, त्याजागी दुसऱ्या (पर) शब्दाचा स्वर येतो.

मराठीत एकाक्षरी शब्द असून असून किती असतील ?
अंदाज बांधायला गेलो तर आपल्याला वाटते- असतील ३०-४० … Happy

परंतु संख्या इतकी मर्यादित नाही !
सध्या मी मराठीतील एकाक्षरी शब्दांचा लघुकोश आणलेला आहे. तो प्राध्यापक भा म गोरे यांनी लिहिलाय. या छोटेखानी पुस्तकातील तब्बल 68 पाने या एकाक्षरी शब्दांनी व्यापलेली आहेत !!
एकूण शब्द मोजावे लागतील Happy

ण, ळ आणि अन्य एक दोन किचकट अक्षरे वगळता बाकी सर्व अक्षरांची बाराखडी एकाक्षरी शब्द म्हणून अस्तित्वात आहे.

रोचक
इथे तुम्हाला आवडलेल्या एकाक्षरी शब्दाबद्दल माहिती देत जा

नक्की लिहीन !
अर्थातच प्राध्यापक भा म गोरे यांना श्रेय देऊन.

मिलिंद शित्र्यांनी फारसी भाषेतून मराठीत आलेल्या शब्दांवर काही व्हिडिओ केले आहेत. अ ते ज्ञ अश्या क्रमाने साधारण शब्दकोश वाचावा असे ते शब्द सांगत जातात. त्यातले काही शब्द (उदा> बंद) हे संस्कृतशीही जवळिक साधू शकतील असं मला वाटलं (बंद - बंध), पण त्यांचं मूळ प्रोटो-इंडो-युरोपीय भाषासमूहातून आले असल्यास नवल नाही. असो. हा पहिला व्हिडिओ https://www.youtube.com/watch?v=sIQs5tgYYUk

अपरंपार =
सं. अ + पर + पार
दाते शब्दकोश

मिलिंद शित्र्यांनी फारसी भाषेतून मराठी >>
पाहिला.
मूळ प्रोटो-इंडो-युरोपीय भाषासमूहातून आले असल्यास नवल नाही >>> +१

खटला, खटले
याचे विभिन्न अर्थ रोचक आहेत :
१. जमीनजुमला; घरदार; गुरेढोरे; जिंदगी.
२. परिवार; लवाजमा; प्रवासी सामानसुमान
३. पत्नी, कारभारीण.
४. पोट भरण्याचा उद्योग; व्यापारधंदा.
५. फिर्याद;. त्रासदायक काम; लचांड.

वरीलपैकी ३ व ५ ची व्युत्पत्ती वेगवेगळी आहे :
३. (सं.) कलत्र ( कल = शरीर + त्र ).
शरीर>>> वामांग >> वामांगी
पण ‘त्र’ म्हणजे काय ?
..
५. (क.) कटले = फिर्याद, परंपरा, पद्धत.
हा कन्नड दिसतो आहे.

>>> शरीर>>> वामांग >> वामांगी
पण ‘त्र’ म्हणजे काय ?
यत्र, तत्र, सर्वत्र इ. शब्दांत त्र म्हणजे ठिकाणी/स्थित असा अर्थ होतो. त्यावरून शरीराच्या ठायी (अर्धांगी म्हणून) स्थित असा अर्थ असावा असा कयास आहे.

वामांगी म्हणजे डाव्या बाजूला असलेली, पत्नी.
पण वामा म्हणजे सुंदर असाही अर्थ होतो.
मुंबईतील एका साड्यांच्या दुकानाच नाव आहे वामा.

बेचिराग मूळ शब्द आहे. पण आता बेचिराखच सहसा वापरला जातो. तो अपभ्रंश म्हणून बरोबर आहे का माहीत नाही.

बेचिराग? Happy
मला तर असा काही शब्द माहितीही नव्हता!
नेहमी बेचिराख च वापरला गेला आहे.
आणि जळल्या नंतर राख होते म्हणून योग्यही वाटायचा!

मी वाचलं होतं त्याप्रमाणे प्रचंड मनुष्यहानी (रोगराई, आक्रमण, युध्द इत्यादी कारणांमुळे) झाल्यावर दिवा लावायलाही माणूस शिल्लक नसणे, ह्याला ते 'गाव बेचिराग' झालं', असं म्हणतात. फारसी शब्द आहे का? बेशरम, बेताबू वगैरे सारखा?

Pages