अहोऽऽ मुंबईत रिक्षा चालत नाहीत

Submitted by ऋन्मेऽऽष on 13 February, 2024 - 14:03

अहोऽऽ मुंबईत रिक्षा चालत नाहीत
(संदर्भ - मायबोलीवरील चर्चा. (शोधा पुन्हा कधीतरी))

आज माझे आजोबा जिवंत असते तर तब्बल १२० वर्षांचे असते. त्यांचे बालपण मुंबईतच गेले. थोडक्यात मुंबईकर म्हणून आमचा किमान शंभर वर्षांचा ईतिहास आहे असे म्हणू शकतो Happy

आजोबा दक्षिण मुबईतील माझगाव पोस्ट ऑफिसचे पोस्टमास्तर होते. आजही ते पोस्टऑफिस आमच्या मुंबईतील सध्याच्या घरासमोर आहे. पण त्याला जुने पोस्ट ऑफिस म्हटले जाते. कारण शेजारी नव्या ईमारतीत नवीन पोस्ट ऑफिस उघडले आहे. मला मात्र ईंग्रजांच्या काळातील जुने पोस्ट ऑफिसच जास्त आवडते. सध्या जाणे काही दोन्ही पोस्ट ऑफिसात होत नाही. तशी कधी गरजच पडत नाही.

पण तो काळ वेगळा होता. पोस्टाला मान होता. आणि पोस्टमास्तर आजोबांनाही सन्मान होता.
आजोबांना आठ मुले होती. कोणाला याचे फार कौतुक नव्हते. म्हणजे तेव्हाचे कुटुंब नियोजन असेच असावे. लग्नाचे प्रयोजन हेच असावे.

तर आठ मुले आणि त्यांच्यामुळे घरात आलेल्या सूना अधिक जावई मिळून तब्बल सोळा जणांपैकी आठ दहा जण पोस्ट ऑफिस / तार ऑफिसमध्ये कामाला लागले. यालाच नेपोटीजम द घराणेशाही असेही बोलू शकतो.

जसे मुलांची संख्या वाढू लागली तशी जागा कमी पडू लागली. जुने घर सोडून नवीन घरात आलो. मुले मोठी होऊ लागली तशी तिथेही एकाची दोन घरे झाली. पण मुंबई काही सोडली नाही.

पुढे जाऊन मुले लग्नाच्या वयात पोहोचली. मुली आपल्या नवर्‍याच्या घरी गेल्या, तर मुलांनी आपला वेगळा संसार थाटायचा म्हणत एकेक करत मुंबई सोडली. माझे वडील त्यांच्यात लहान, आणि त्यांचे लग्न सर्वात शेवटी म्हणून ते आजोबांसोबत मुंबईतच राहिले. त्यामुळे माझेही बालपण मुंबईतच गेले.

ज्या काकांनी मुंबई सोडली ते कोणी अंधेरीला गेले, तर कोणी विक्रोळीला, कोणी कुर्ल्याला तर एक थेट वसईला गेले. त्यापैकी अंधेरी आणि विक्रोळी असलेल्या काकांकडे दर उन्हाळ्याच्या सुट्टीत जाणे व्हायचे. तिथे माझी ओळख मुंबईहून आलेला पाहुणा अशीच असायची. यामागे मुंबई म्हणजे काही तरी ग्रेट, आणि उपनगरे म्हणजे त्याला जोडलेली ठिगळे असा अ‍ॅटीट्यूड बिलकुल नसायचा. कदाचित उपनगरात वसलेली लोकं मुंबईतूनच आलेली असावीत म्हणून असेल, किंवा रोज दादर किंवा बोरीबंदरच्या दिशेने कामाला जाताना ट्रेनच्या गर्दीला झेलत जावे लागते म्हणून असेल, पण ते आमचा उल्लेख मुंबई किंवा प्रॉपर मुंबई असाच करायचे. त्यात उपनगरे जोडायचे नाहीत.

तर या काकांकडे जाताना आजी सोबत असल्याने आणि तिला ट्रेन आवडत नसल्याने बसनेच जाणे व्हायचे. किमान दोन बस बदलून जावे लागायचे. तेव्हा प्रवासात दोन गोष्टी प्रकर्षाने लक्षात यायच्या.

एक म्हणजे जागोजागी रस्त्याकडेला असलेले उघडे नाले. मुंबईत हा प्रकार दिसायचा नाही. काकांच्या बिल्डींगमध्ये प्रवेश करतानाही एखादा छोटासा नाला ओलांडून प्रवेश करावा लागायचा. त्यामुळे काकांची घरे आमच्यापेक्षा छान, चकाचक, आणि प्रशस्त असली तरी त्या एक नाला प्रकारामुळे शहरातून गावात आल्याची भावना मनात उत्पन्न व्हायची.

दुसरी गोष्ट म्हणजे रिक्षा. जी फक्त मुंबई उपनगरात आणि मायबोलीवर चालते, पण मुंबई शहरात नाही.

लहानपणापासून मुंबई शहर कुठे संपते आणि उपनगर कुठून सुरू होते हे लक्षात ठेवायचा एक महत्वाचा मापदंड म्हणजे रस्त्यावर दिसणारी रिक्षा.
बसच्या प्रवासात खिडकीबाहेर नजर टाकता टॅक्सी दिसायचे बंद होऊन रिक्षा दिसू लागली की आपण मुंबई सोडली असे समजायचे हा थंब रूल घरूनच बालमनावर बिंबवण्यात आला होता.

अर्थात तेव्हा उपनगरे ईतकी विकसित झाली नसल्याने ईतर फरक सुद्धा चटकन जाणवायचे. जसे की, मुंबईत बिल्डींगखाली उतरले की शे-दोनशे मीटर त्रिज्येच्या परीघात हवे नको ते सगळे मिळायचे. पण तेच उपनगरात दहा पंधरा मिनिटांची पायपीट करावी लागायची किंवा वेळप्रसंगी रिक्षा करून मार्केट वा स्टेशनला जावे लागायचे.

टॅक्सीचे मीटर रिक्षाच्या दिडपट असले तरी मुंबईत ती वापरायची गरज फार कमी पडायची. मध्यमवर्गीय लोकांकडे स्वताच्या गाड्या असायचा तो काळ नव्हता. पण पब्लिक ट्रान्सपोर्टबाबत मुंबईमध्ये लोकल ट्रेन आणि बसचे सक्षम पर्याय उपलब्ध होते. हार्बर सेंट्रल वेस्टर्न अश्या तिन्ही रेल्वेलाईन मुंबईत एकत्र यायच्या, तसेच लोकसंख्येची घनता जास्त असल्याने दोन स्टेशनमधील अंतर देखील फार नसायचे. त्यामुळे मुंबईत कुठेही रहात असलो तरी एखाद दुसरे रेल्वेस्टेशन जवळ पडायचे. त्याचसोबत बेस्ट बसेसचे जाळे सुद्धा मुंबईभर पसरलेले होते. जे तुम्हाला दारात पोहोचवायचे.

जेव्हा कोणी काका मामा उपनगरात घर घ्यायचे तेव्हा पहिला प्रश्न हाच असायचा की स्टेशनपासून किती लांब/जवळ आहे? मुंबईत कधी हा प्रश्न पडला नव्हता. पण काका मामांकडे राहायची वेळ आली तेव्हा समजून चुकलो की हा प्रश्न किती महत्वाचा होता. कारण रोजचे शाळा-कॉलेज, ऑफिसला जाताना सुद्धा रेल्वेस्टेशनपर्यंत रिक्षा करावी लागायची. एका अर्थाने रिक्षा ही उपनगरांची लाईफ लाईन होती. आजही असेल.

सध्या मी नवी मुंबईत राहतो तिथे तरी नक्कीच आहे.
मुंबईत लहानपणी बराच वेळ बस आली नाही तर टॅक्सीला हात दाखवला जायचा. पण ईथे मात्र बस हा प्रकार असूनही काही जणांसाठी तो अस्तित्वातच नाहीये. चार पैसे जास्त खर्च करू, पण रिक्षालाच हात दाखवू. शेअर रिक्षामध्ये कोंबून चोंबून भरले जाऊ, पण बसच्या रांगेत उभे नको राहू. मी नवीनच इथे राहायला आलो तेव्हा मला या सगळ्याची आणि लोकांच्या मानसिकतेची गंमत वाटायची. पण लवकरच मी देखील याला सरावलो. आणि रिक्षाला दैनंदिन जीवनाचा भाग म्हणून स्विकारले.

पण मन अजूनही तिथेच मुंबईत आहे,
त्यामुळे कोणी रिक्षांचा किस्सा सांगताना त्या जागेचा उल्लेख मुंबई असा केला तर तोंडातून चटकन बाहेर येतेच,
अहोऽऽ मुंबईत रिक्षा चालत नाहीत
आणि यामागे कुठलाही खोडसाळपणा नसतो. पण ती अमुक तमुक जागा मुंबईत येत नाही का हा वाद ठरलेलाच असतो Happy

धन्यवाद,
ऋन्मेऽऽष

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त लेख.
जनरली रिक्षांना जरा कमी लेखलं जातं आणि आमच्याकडे टॅक्सी च असतात रिक्षा नाही हे अभिमानाने म्हटल जातं मुंबईकरांकडून. पण माझा अनुभव वेगळा आहे थोडा.
VT हून आमचं ऑफीस तसं जवळच होतं. मधल्या गल्ली मधून अगदी चालत जाण्यासारख. पण कधी कंटाळा आला तर बस आणि शेअर टॅक्सी ची सोय ही होती. त्या टॅक्सी इतक्या खराब असत . सीट कवर घाणेरडी, दार कशी तरी लागणारी , पाय ठेवतो तिथे कचरा ई... म्हणून मी कधी ही टॅक्सी घेत नसे पुढ्यात आली तरी... त्या मानाने बेस्ट बस खूपच स्वच्छ आणि डिसेंट होती. ठाण्याला स्टेशन वर येण्यासाठी लागणारी रिक्षा ही खूपच स्वच्छ असे.

तूला संपूर्ण नव्या मुंबईमधे फूड कल्चर आणि टेस्ट सापडली नाहि का रे ?
>>>>>>
खरेच नाही. मुंबई लेव्हलची बिलकुल नाही. >>> + 11111

खरेच नाही. मुंबई लेव्हलची बिलकुल नाही. ...... ..+१.

चेंबूरला (जे मुंबईचे उपनगर आहे) देखील पणशीकरांची सुतरफेणी असते तशी अजूनही मिळत नाही.
ब वडा वगैरेला मुख्य मुंबईतील चव येथे नाही.

सीट कवर घाणेरडी, दार कशी तरी लागणारी , पाय ठेवतो तिथे कचरा ई>> यात भर म्हणजे सीट डाव्या टोकाला डाव्या बाजूला बरीच झुकलेली असे (मधून डावीकडे उतार) तिथे बसले की घसरून डाव्या दाराकडे ढकलला जाई प्रवासी.
उजव्या बाजूला त्यामानाने कमी घसरण होई.
काही सीट्सना पुढल्या बाजूने उतार असे, हळुहळु घसरत पुढे जायचे मग परत मागे सरकून बसायचे. कळकट वासही असे.
(माझे ऑफिस बलार्ड पिअरला होते, दोन वर्षे. चालतच जावे लागे पण नंतर रे रोड, माझगाव डॉक ते लॉयन गेट कुठेही जावे लागे. त्याकरता टॅक्सी/बस)

दक्षिण-मध्य मुंबई चाळ संस्कृती हा स्वतंत्र लेखाचा नाही तर कधीही न संपणार्‍या लेखमालेचा विषय आहे Happy>>> 'चाळ नावाची वाचाळ वस्ती ' या नावाची दूरदर्शनवर मालिका यायची... त्यावेळी लहान होते.. पण अंधुक आठवते ती मालिका.. अभिनेते चंदू पारखी आणि उषा नाडकर्णी होत्या त्यात... ते आठवतेय..

अंजु धन्यवाद!
असामी आणि विक्षिप्त मुलगा मम मिठाई वाला... नाव सांगितल्याबद्दल धन्यवाद!

Dakc, कोपरखैरणे हा भाग आता निश्चितच खूप बदलला असेल.
२००० क्या आधी जेव्हा तिकडे ट्रेन नव्हत्या अगदी गावा सारखे भाग होते किंवा चिकार मोकळी जागा होती.

.

नववदीच्या दशकात वाशीत सुद्धा कच्चे रस्ते होते असे आमच्या सासरचे सांगतात. ते तेव्हा इथे आलेले.
नंतर नवीन कन्स्ट्रक्शन करायला जागा नाही अशी स्थिती झाली, पण छान प्लानिंग करून वसले आहे हे शहर. वाशी स्टेशन बाहेर पडताच छान मोकळे वाटते. तेच ठाणे स्टेशन बाहेर पडले की पाच दहा मिनिटे काही सुचायचे बंद होते.
काही वर्षांपुर्वी आम्ही वाशीलाच स्थायिक व्हायला घर शोधत असताना आम्हाला हवे त्या लोकेशनला कुठेच नवीन कस्ट्रक्शन चालू नव्हते. पण आता जुन्याच बिल्डींगचे रिडेव्हलपमेंट सुरू झाले आहे.

नववदीच्या दशकाच्या आधी वाशीत सेक्टर ६ , कामगार हॉस्पिटल च्या ठिकाणी छान रस्ते होते. मोकळी ऐसपेस जागा होती. सध्या जिथे वाशी बस स्थानक आहे त्या चोकाच्या तीन बाजुला खारफुटीचे जंगल , मोकळी जमीन होती. फक्त एकाच भागात घरे /कल्ब/ हॉस्पिटल होते. सेक्टर १७ न्हवते. वाशी गाव सोडले तर अगदी परदेशात राहिल्यासारखे वाटत होते.
१९८३ मध्ये सिडकोच्या बसचा स्ट्राईक झाला मग १९८४-८५ मध्ये महाराष्ट्र ST आणि BEST ने मुंबई ते नवीन मुम्बई बस चालु केल्या तसेच नॉन सिडको बिल्डर वाशी/ नवी मुंबईत आले आणि मग काही भागात कच्चे रस्ते आले. १९८५ च्या आधी सिडको सोडुन एकही बिल्डर न्हवता. थोडे विषयांतर होत आहे आता मुळ विषयाकडे
दक्षिण मुंबईचे आमच्या घरात सगळ्यानाच क्रेझ आहे पण रिक्षा नाही याचे वाईट वाटते. सीट कवर घाणेरडी, दार कशी तरी लागणारी , पाय ठेवतो तिथे कचरा असल्याने टॅक्सी मध्ये बसवत नाही. त्यामुळे दक्षिण मुंबईत गेलो तर बसनेच प्रवास.

मला खरंच आश्चर्य वाटते की अशा टॅक्सीज माझ्या वाटेला कशा आल्या नाहीत? अर्थात माझ्या लहानपणी टॅक्सी फारशी माहीत नव्हती.कारण बऱ्याच गोष्टी जवळच होत्या.
नंतर कॉलेजमधून किंवा ऑफिसला जाताना टॅक्सी केली तरी चांगल्या असायच्या.
नाही म्हणायला एकदा ड्रायव्हरने मागचे दार घट्ट ओढून लावले होते. जरा प्रॉब्लेम है म्हणून बोलला होता.

मला खरंच आश्चर्य वाटते की अशा टॅक्सीज माझ्या वाटेला कशा आल्या नाहीत?
>>>>
मलाही वाटले. पण बोललो नाही. कारण ज्याचे त्याचे अनुभव.
तसे टॅक्सी जुनी असल्यास दाराची अवस्था खडखड असणे किंवा सीट फार कंफर्टेबल नसणे हे अनुभव आहेत. पण अस्वच्छता कधीच आढळली नाही. ना मुंबई टॅक्सीत ना नवी मुंबई रिक्षात..
तरी वर उल्लेखलेल्या सीएसटी मधील शेअर टॅक्सीचा अनुभव नाही.

मुंबईतील टॅक्सी म्हटल्या की मलाही कळकट्ट, कुबट वाहन आणि उर्मट अरेरावी करणारे ड्रायव्हर, परत नियम पाळणे वगैरे इसपूर्व शक्य असेल. त्यामानाने उपनगरातील रिक्षा चालक गरीब असतात (हे त्यांना वाचायला देऊ नका... चार दोन स्युसाईड करतील उगाच!). मला तर रोखठोक पुणेरी रिक्षावाले ही आवडतात पण मुंबईचे कॅबी... नको रे बाबा! फसवायला बसलेले असतात!

उपनगरातील रिक्षा चालक गरीब असतात ..... कधीची गोष्ट ही?मालाड गोरेगाव साईडचे रिक्षावाले महा उर्मट,बिलंदर असतात.बिलंदरपणा समजू शकते.पण समोरच्याची काही अडचणी असतील हे विचारात घेतले जात नाही.वडील हॉस्पिटल मध्ये होते.त्यावेळी आईला घेऊन परत घरी सोडून यायचे होते.आईच्या हातात काठी पाहूनही तिकडचे रिक्षावाले ,रिक्षा थांबवायचे नाहीत.याउलट आमच्याकडचे रिक्षावाले खूप चांगले आहेत.

अमितव तुमची पोस्ट उपरोधिक आहे का?
नसल्यास प्रत्येक वाक्य मला उलटे लिहिले की काय असे वाटले.

म्हणजे मला उपनगरातील रिक्षावाल्यांचे काही अनुभव नाहीत.
पुण्याचे दोन तीन फार वाईट अनुभव आहेत ज्यात सरळ सरळ फसवत होते. मी गूगल मॅप वापरून त्यांना खोटे पाडले. पण सँपल साईज छोटी असल्याने निष्कर्ष नको.

मुंबईत मिक्स अनुभव येतात. सरसकटीकरण नको.

पण नवी मुंबई (वाशी कोपरखैरणे पट्टा) मध्ये मात्र खूप चांगले अनुभव आहेत.
एकतर यायला नकार देणे हा प्रकार नाही. जाऊन बसायचे आणि मग सांगायचे कुठे ते..
त्यातूनही त्यांचा काही वेगळा पर्सनल प्लान असेल आणि आपल्या दिशेला येणे शक्य नसेल तर अगदी मनापासून दिलगिरी व्यक्त करतात.
वाशी स्टेशनला तर जे रिक्षावाले नियम आणि लाईन तोडतात त्यांना इतर रिक्षावालेच फटकावतात. पण आपली शिस्तीची इमेज खराब होऊ देत नाही.

आता त्या जुन्या पद्मिनी टॅक्सी नसतील >> पद्मिनी गेल्या हल्ली .पण काही काळ santro, मारुती व्हॅन ह्या ही होत्या पद्मिनी बरोबर. ती van तर सर्वात वाईट असायची. टॅक्सी तर कळकट असायचीच पण त्यांच्या कडच्या नोटा ही फारच soiled असायच्या. आम्हा rbi वाल्यांना कोऱ्या करकरीत क्रिस्प नोटांची सवय Happy . असो. पद्मिनी किंवा santro मध्ये मागे तीन जण बसले की फारच चिकटून बसावं लागे. ते टाळण्यासाठी पुढे बसले तर तो कळकट ड्रायव्हर बाजूला ...
ठाण्यातील रिक्षावाले मिक्स आहेत अस वाटत. कधी कधी खूप चांगले ही मिळतात. पण रिक्षा स्वच्छ असतात अस वाटत. सीट कव्हर चांगली असतात.

प्रिमियर पदमिनीच्या टॅक्सीज आवडायच्या मला, तसा कमीच प्रवास व्हायचा त्यातून पण अनुभव चांगला. बाबा प्रिमियरमधे असल्याने त्यांच्या कंपनीच्या टॅक्सीत बसल्याचा आनंद व्हायचा. जास्त करुन मुंबईत मला चालायला किंवा डबलडेकर बसमधे वरती बसायला आवडायचं.

पुण्यात दिवसा रिक्षा ओके, पहाटेच्या वेळेचा अनुभव बरेचदा चांगला नाहीये, फसवतात. अगदी पुर्वी दादर पुणे रात्रीचा प्रवास करुन साडेपाच सहाला पुण्यात पोचायचो. एनिवे रिक्षेचे सगळीकडेच मिश्र अनुभव येतात.

Taxi अस्वच्छ असल्याचा अनुभव नाही... तसा खूप जास्त अनुभव नाही तरीही.

ठाण्यातील रिक्षावाले..काही चांगले पण होते... आणि खूप सारे नग ही भेटले.. विशेषकरून त्यांना ठराविक किंवा लांब भागातच जायचं असायचं.
मग ते जवळील किंवा नको असणाऱ्या फेरीना नाही म्हणणार.

पण मग एक नियम केला गेला की कुठल्याही रिक्षावाल्याला मीटर ओपन असेल तर एरिया ऐकून नाही म्हणता येणार नाही... त्यामुळे त्यांना थोडा तरी वचक बसला.

टॅक्सी म्हटले की माझ्या डोळ्यासमोर पदमिनीच येते. इतर मॉडेल ना काळया पिवळ्या रंगामुळे टॅक्सी म्हटले जाते.
मला साधारण आठवते तसे नव्वदीच्या दशकापर्यंत त्या फार सुस्थितीत आणि दणकट असायच्या. त्यांच्या डोक्यावर सामान ठेवले तरी चिंता वाटायची नाही. नंतर त्यांचा जमाना जाऊ लागला तसे जुन्या खिळखिळ्या दिसू लागल्या.. की तसेच वेगळे मॉडेल होते कल्पना नाही. पण हा अनुभव नव्वदीच्या दशकात नाही यायचा. किंवा असेही असेल की मी तेव्हा फार लहान असल्याने मला ते वाहन तेव्हा मोठे वाटत असेल Happy

मागे एका बातमीत वाचलेले की त्या आता बंद झाल्यात. २००३ साली शेवटचे रजिस्टर मॉडेल होते जे वीस वर्षांचे आयुष्य संपून २०२३ साली शेवटची पद्मिनी मुंबई रस्त्यावर धावली..

मी २०२१ ला मुंबईत आलो. तेव्हा Covid मुळे माझी कारच वापरायचो. तसेच कोलशेत रोड ठाणे ते कांजुरला ओफिसला जायला सोयीचे Public transport नाही तेव्हा कारच बरी पडते. अधेमधे रिक्षा वापरतो. ठाणे-कांजुर कोणी नाही म्हणत नाही Happy
सोबोत जायला आधी लोकल, टॅक्सी वापरायचो, पार्कींग शोधायच्या भितीने, पण खुप दमायला होत. पण आता कार वापरतो. जहांगीरच्या बाजुला के. दुभाष रोड वर मिळते हमखास पार्कींग. तिथे कार लावुन पायी फिरायचे. टॅक्सीच्या कळकट पणा बद्द्ल वरिल पोष्टींशी सहमत.

मूळ लेख वाचला नाही. प्रतिसाद वाचले. माझा जन्म १९६८ चा. १९७४ पर्यंत घाटकोपरला होतो. तोवर तिथे रिक्षा नव्हत्या. बसने शक्य नसेल तिथे बाबा आम्हांला टॅक्सीने फिरवायचे. त्या काळात ही चैन मानली जायची. १९७४ ला बोरिवलीला आलो. इथेही रिक्षा कधी आल्या ते आठवत नाही. पण मी प्राथमिक शाळेत असताना शाळेच्या स्नेहसंमेलनानंतर आईसोबत रात्री उशिरा टांग्याने घरी आलो होतो, हे आठवतंय. शाळेत बसने जायचो. पण अगदी दहावी किंवा कॉलेजमध्ये असतानाही बस येत नाही, खूप गर्दी आहे म्हणून रिक्षा केल्याचे आठवत नाही. अनेकदा चालत आलो आहे. एकदा तर भर पावसात.
Late 70s मध्ये रिक्षा सुरू झाल्या असणार. खूप सामान असले तर बाबा रिक्षाने यायचे.

तसंच त्या काळी कपडे , स्वयंपाकाची उपकरणे घ्यायला दादरला जात असू. दादरहून मिक्सर आणल्याचं आठवतंय. शिवाय आईच्या डायरीत अशाच नोंदीही आहेत.
हे चित्र फार पटकन बदललं.

शेअर टॅक्सीचा उल्लेख आला, पण शेअर रिक्षा आल्या नाहीत. बोरिवलीत काही रूट्सवर शेअर रिक्षा आहेत. मध्ये भांडुपला गेलो तर फक्त शेअर रिक्षा. एकट्या प्रवाशाला स्टेशनवर वाली नाही.

भरत, रिक्षा साधारण 75 नंतर सुरू झाल्या. तेव्हा फ्रंट इंजिन रिक्षा होत्या. भलताच आवाज करत आणि प्रवासी सीट वरून उडत असे. गोरेगाव पूर्वेला पहिली रेअर इंजिन रिक्षा 82 मधे आली हे आठवतेय. रिक्षा ही तेव्हा चैनच होती. आता चालत दहा मिनिटांवर असलेल्या स्टेशनला जाण्याकरता लोकं रिक्षाला हात दाखवतात तेव्हा गंमतच वाटते.

जन्माने मुंबईकर नसले तरी खाडीच्या एका बाजूला केवळ टॅक्सी आणि दुसऱ्या बाजूला रिक्षाही असते हे लहानपणापासून माहितीये. गिरगाव सोडून मुंबईच्या बहुतेक सर्व मराठी भागात नातेवाईक विखुरलेले असल्याने आणि दर सुट्टीत किमान 80% नातेवाईक तरी भेटले पाहिजेत असा आईचा उत्साह असल्याने मालाड ते मुंबईतली विविध मराठी पॉकेट्स लहानपणी फिरले आहे. नंतर स्वतःच पार्ल्यात राहायला लागल्यावर कामामुळे मुळची मुंबई ओळखीची झाली. अंधेरीतला जेम ड्रेसवाल्याचा माणूस खरेदीला मुंबईला जायचं म्हणाला अंधेरीत बसून तेव्हा मुंबई आणि उपनगर हा फरक लख्ख कोरला गेला डोक्यात.
बाकी मुंबई आणि उपनगरात सगळीकडचे खाणेपिणे व इतर गोष्टी स्पेशल/ नॉन स्पेशल/ ठीक वगैरे आहेत. पण मंगलदास मार्केट, भुलेश्वर, गुलालवाडी हा मार्केट एरिया आणि फोर्ट, काळा घोडा, जहांगीर, कुलाबा कॉजवे, NCPA, नरीमन पॉईंट वगैरे गोष्टींना तोड नाही. उपनगरी मुंबईत ही मजा नाहीच. हे सगळे भाग नसते तर मुंबई सहनच झाली नसती मला. उपनगरात राहून लोकल अंगवळणी पडल्यावर हे सगळे अगदी घराशी नसले तरी हाताच्या अंतरावर आहेच असं वाटायचं. आता वसईत आल्यानंतर माझ्यासाठी मुंबईची हद्द दहिसर, ऐरोली आणि वाशी (मुंबईचे एन्ट्री पॉईंट टोल नाके) हीच झालेली आहे. आणि फोर्ट वगैरे भाग म्हणजे विरार ट्रेन नावाचे हॉरर पार केल्यावरच मिळणारे बक्षीस.

आवडला लेख .
मला स्वतःला मुंबईतील टॅक्सी आणि रिक्षा कधी कळकट नाही वाटल्या, काही अपवाद वगळता.
आमच्या इथे तर कॉलनीच्या समोरच्या रस्त्यावर दादर माटुंग्यासाठी फक्त टॅक्सी , आणि कॉलनी च्या मागच्या सायन पनवेल रस्त्यावर रिक्षा असे दोनहि ऑपशन्स आहेत. मुंबईत असून सुद्धा सेंट्रल लोकेशन आहे. रिक्षाने बांद्र्याला पण जात येते तसेच बाकी ठिकाणी जायला टॅक्सी किंवा बस. बसची frequency पण चांगली आहे.

Pages