आकाश दर्शनाची पर्वणी! तारे जमीं पर!!

Submitted by मार्गी on 13 February, 2024 - 12:11

कल्पना चावला स्पेस एकेडमीच्या विद्यार्थ्यांसोबत आकाशातल्या खजिन्याची लूट

✪ तुंग किल्ल्याच्या पायथ्याशी रात्रभराचं आकाश दर्शन शिबिर
✪ मुलांचा आनंदमेळा आणि ता-यांचा झगमगाट
✪ “रात है या सितारों की बारात है!”
✪ मृग नक्षत्र? नव्हे, हा तर मोssssठा तारकागुच्छ!
✪ प्रकाश प्रदूषण नसलेलं अप्रतिम आकाश आणि तारकागुच्छांची उधळण
✪ कडक थंडीतही मुलांचा उत्साह, मस्ती आणि धमाल
✪ तुंग परिसरात ट्रेक आणि मुलांसाठी नवीन एक्स्पोजर
✪ नितांत रमणीय निसर्गात राहण्याचा अनुभव

सर्वांना नमस्कार. गेल्या शनिवार- रविवारी मला लोणावळ्याच्या कल्पना चावला स्पेस एकेडमीच्या मुलांसोबत आकाश दर्शनाच्या शिबिराला जाण्याचा योग आला. खगोलशास्त्र विषय म्हणून शिकवताना आकाश दर्शन तसं नेहमी होतंच. पण ते शहरातून बघणं आणि जिथे जवळ जवळ अजिबात प्रकाश प्रदूषण नाही, अशा जागी जाऊन बघणं, ह्यामध्ये खूप मोठा फरक पडतो. इथे अक्षरश: ता-यांची मैफील चकाकत होती. इतकं अंधारं आकाश ही आज अतिशय दुर्मिळ गोष्ट आहे!

पण सगळा दुर्मिळ योग जुळून आला नितांत सुंदर असं आकाश मिळालं. अक्षरश: लॉटरी मिळाल्यासारखं वाटावं असं आकाश. खगोलाच्या भाषेत सांगायचं तर नुसत्या डोळ्यांनी पाच प्रतीपर्यंतचे तारे सहज दिसत होते. आणि शहरातून जे तारकागुच्छ सापडत नाहीत, ते इथे अगदी सहज दुर्बिणीच्या फाइंडरोस्कोपमधूनच दिसत होते. भव्य दिव्य तारकागुच्छ असलेला ओमेगा सेंटारी नुसत्या डोळ्यांनी दिसत होता! डोंगराआडून पहाटेचा शुक्र अचानक समोर आला तेव्हा तो एक सर्च लाईटच वाटत होता. पण आधी सुरूवातीपासून सांगतो.

(माझ्या आकाश दर्शनाचे काही लेख व फोटो ब्लॉगवर बघता येतील: http://niranjan-vichar.blogspot.com/2024/02/a-starry-night-show.html इथे मागच्या एप्रिलमध्ये मी घेतलेला आपल्या आकाश गंगेच्या दुधाळ पट्ट्याचा फोटोही बघता येईल.)

गेस्ट लेक्चरर म्हणून लोणावळ्याच्या एडव्होकेट भोंडे हायस्कूलमधील कल्पना चावला एकेडमीमध्ये मुलांना भेटताना एक रात्र "अशा" ठिकाणी आकाश दर्शनासाठी जायची इच्छा होत होती. तिथल्याच एका मुलाच्या वडिलांचं तुंग किल्ल्याच्या पायथ्याला कँपिंग असल्याचं कळालं. तेव्हा हा योग जुळून आला. एकेडमीतले २३ मुलं- मुली, श्री. संजय पुजारी सर, भोंडे सर व इतर शिक्षक असे निघालो. निघताना आकाश किती चांगलं मिळेल, काय काय दिसेल ही उत्कंठा व अस्वस्थताही मनात आहे! लोणावळ्यावरून भुशी डॅमच्या बाजूने व आयएनएस शिवाजी अशा नौदलाच्या परिसरातून हळु हळु रस्ता एकदम घाटाचा होत जातोय. पुढे पुढे तर अगदी डोंगराच्या आतल्या भागात रस्ता जातोय. अतिशय निळं आकाश व लोणावळ्याचे दिवे अडवणारे डोंगर बघितल्यावर मनामध्ये आनंदाच्या उकळ्या फुटायला सुरूवात झाली! एकेडमीतल्या काही मुलांनी इथे सायकलिंग केलंय पूर्वी. त्यांचे मस्त गाणी- गप्पा सुरू झाल्या. घुसळखांबनंतर रस्ता अगदी छोटा होऊन डोंगरातून आत जातोय. अंधार पडता पडता अगदी सह्याद्रीच्या आतल्या बाजूच्या तुंगवाडीजवळ पोहचलो! आकाशात ता-यांचा झगमगाट सुरू झालाच आहे! नुसतं सारखं अहा हा, च च च होतंय.


.

.

.

लोणावळा फॉरेस्ट कँप (गूगल मॅपवरचं नाव) अर्थात् पवना हिल कँपिंग (वेबसाईटचं नाव) ह्या जागी पोहचलो! समोर दरी आणि दूरवर पवना धरणाचं जलाशय. बाजूला तुंग किल्ला व त्याचे भाईबंद! अहा हा! इथे सगळे तंबू रचून ठेवलेले! लगेचच टेलिस्कोप सेट करायला घेतला आणि झाली मेजवानीची सुरूवात! कँपच्या पाठारेजींनी सगळे दिवे मालवले आणि एक खूप मोठा प्रकाश सोहळा सुरू झाला! जिकडे बघावं तिकडे तारेच तारे. शहरातून टेलिस्कोपमधून जे तारे- ऑब्जेक्टस शोधायला कठीण जातात, ते इथे स्वत:हून दिसत आहेत! आणि मुलांसोबत हा आनंद शेअर करण्यासाठी माझा ११४ बाय ५०० मिमीचा टेलिस्कोप आणि बायनॅक्युलर आहे. शिवाय एका मुलाने- विशाल परबने त्याचा ७० मिमीचा टेलिस्कोपही आणलाय!

२२ लाख प्रकाश वर्षांवरची एंड्रोमिडा गॅलक्सी दिसेल असं वाटलं आणि लगेच दिसलीसुद्धा! अर्थात् ती पश्चिमेच्या जवळ असल्यामुळे थोडी फिकट दिसतेय. पण ती दिसतेय हेच खूप आहे! मुलांचा उधाणता उत्साह, असंख्य प्रश्न, मस्ती, मजा आणि धमाल! मोठा ग्रूप असल्यामुळे एक ऑब्जेक्ट सगळ्यांचा बघून व्हायला वेळ लागतोय. एंड्रोमिडा गॅलक्सी- M 31, नंतर मृगातला तेजोमेघ- M42! तिथेही खूप जास्त तारे दिसत आहेत! आणि नुसत्या डोळ्यांनी बघितलं तर मृग नक्षत्र हाच एक तारकागुच्छ वाटतोय. कृत्तिकांचा साज तर काय वर्णावा! नुसता झगमगाट! बायनॅक्युलरमधून तर रोहिणी, सारथी, मृग अशा सर्व ठिकाणी तारेच तारे दिसत आहेत! आणि ओळखीच्या तारकासमुहांमध्ये असंख्य नवीन तारेही नुसत्या डोळ्यांनी दिसत आहेत! आणि हे सगळं बघताना मुलांचे लकाकणारे चेहरे! नंतर पुनर्वसुमधलं मधाचं पोळं- Beehive cluster M44 बघितलं. M 44 बघताना मुलांना averted vision चं तत्त्व सांगितलं. मंद ऑब्जेक्टकडे थेट न बघता बाजूला बघितलं तर तो थोडा स्पष्ट दिसतो. ह्याला averted vision म्हणतात. ही एक उपयोगी टेक्निक व वैज्ञानिक संकल्पना आहे. पुढे गुरू व सप्तर्षीतला वसिष्ठ जोडताराही बघितला. अक्षरश: ही स्थिती आहे-

झगमगाती हुई जागती रात है

रात है या सितारों की बारात है

जेमतेम पाच- सहा ऑब्जेक्टस बघून झाले आणि अडीच तास होऊनही गेले आहेत. मुलांचं जेवण बाकी आहे. एका मुलीचा- भाविकाचा वाढदिवसही आहे. तिचा वाढदिवस फार स्पेशल झाला, हे मात्र नक्की! केक आणि मुलांचं जेवण चालू असताना माझे पाय टेलिस्कोपकडे ओढ घेत आहेत. त्यावेळी चिन्मय सरांनी अप्रतिम गाणी गायली! वेगवेगळी गाणी एकामागोमाग एक! ह्या सोहळ्यामध्ये अमावस्येमुळे चंद्र नसला तरी ह्या गाण्यांनी चार चाँद लावले!

जशी जशी रात्र वाढतेय तशी थंडीही वाढतेय. बायनॅक्युलरमधून आकाशामध्ये फेरफटका मारला. सारथीमध्ये नुसत्या डोळ्यांनीच पुसटसे अनेक क्लस्टर्स दिसत आहेत! टेलिस्कोपमधून तर अप्रतिम देखावा! सगळ्या मुलांनाही मनसोक्त बायनॅक्युलर वापरू दिला. कृत्तिका पश्चिमेकडे कलल्या. सप्तर्षी उत्तरेला वळले. मघा नक्षत्र आकाशमाथ्याकडे येतंय. अखेर रात्री साडेदहाला तात्पुरता ब्रेक घ्यावा लागला. पहाटे ४:३० ला उठून पहाटेचं आकाश बघायला सगळेच तयार आहेत! कडक थंडीमध्ये तंबूत स्वत:ला झोकून दिलं. तंबूमध्ये इतकी थंडी वाटत नाहीय!

नयनरम्य नरतुरंग, वृश्चिक राशीची आरास आणि शुक्र नामक हेडलाईट!

मुलं पहाटे साडेचारला उठली असं म्हणण्यापेक्षा ती रात्रभर झोपली नाहीत व शांतही बसली नाहीत असं म्हणणं जास्त समर्पक असेल. पण पहाटेचं आकाश- आ वासायला लावेल इतकं ऑस्सम! आणि अजिबात ढग किंवा धुकं नाही! पूर्ण निर्मळ आकाश! फक्त भयंकर थंडी! पण थंडीकडे लक्षही जाणार नाही इतका सोहळा सुरू आहे! दक्षिणेला नरतुरंगाचा थाट! आधी ओमेगा सेंटारी हा भव्य तारकागुच्छ थोडा शोधावा लागला. पण मग डोळ्यांनीही दिसतोय! किती मोठा तो कापसासारखा डाग दिसतोय! डोंगर मध्ये आल्यामुळे मित्र- मित्रक आणि त्रिशंकूमधला ज्वेल बॉक्स मात्र हुकला. पण अनुराधा- ज्येष्ठा परिसरातली श्रीमंती आहे की! मूळ नक्षत्र व इतर तारकागुच्छांना थोडा वेळ आहे. पण अगदी सहजपणे शौरीतलं हर्क्युलस क्लस्टर- M 13, शौरीतलंच M 92 क्लस्टर दिसलं. अवेर्टेड व्हिजन वापरून मुलांनीही बघितलं! शिवाय बायनॅक्युलरने ते स्वत:च अनेक क्लस्टर्स शोधत आहेत. सिंह- कन्या राशीच्या परिसरातही तेजाची उधळण आहे! स्वाती- चित्रा- मघा हे नेहमीचे तारे तर आहेतच. पण तेही खूप जास्त चमकताना दिसत आहेत. अगदी असं वाटतंय-

तारें जमीं पर
उतरें जो आँगन को सुनहरा सा करने
मन के अंधेरो को रोशन सा कर दें
ठिठुरती हथेली की रंगत बदल दें
खो न जाए ये...

नंतर अनुराधाचा जोडतारा बघितला. ज्येष्ठा व तिच्या बाजूचा M4 बंदिस्त तारकागुच्छसुद्धा दिसला. आणि मग मूळ डोंगरामागून वर आलं तसे मुळाच्या जोडता-याजवळचा तारकागुच्छ NGC 6231 छान दिसला. आणि टॉलेमी क्लस्टर व बटरफ्लाय क्लस्टर (M7 and M6) हे तर दिसणार होतेच. ते डोळ्यांनीही मस्त दिसले. श्रवण वर आला. आता वाट शुक्राची आहे. आपल्या आकाशगंगेचा दुधाळ पट्टा दिसणार नाही, कारण तो थोडा वर येईल आणि तोपर्यंत लगेच उजाडायला सुरूवात होईल. पण तरीही मूळ नक्षत्र थोडं वर आल्यावर आकाशगंगेची धुसर आउटलाईन दिसतेय. एप्रिलमध्ये ह्याच वेळी आकाशामध्ये अक्षरश: आकाशगंगा अवतरली असेल! आता शुक्राची वेळ! त्याच्या जागी जाऊन तो बघायला गेलो. अक्षरश: हेड लाईटसारखा गोळा! डोंगराच्या मागेच तो उगवून वर आलाय, त्यामुळे एकदमच चमकतोय! शिवाय इथल्या आकाशामध्ये सगळेच तेजस्वी दिसत आहेत. तोही तितकाच चमकतोय! शुक्रासह पहाटेच्या दीड तासात टेलिस्कोपने व बायनॅक्युलरने १० ऑब्जेक्टस बघून झाले!

त्याबरोबर मुलांसोबत गप्पा, त्यांच्या प्रश्नांचा भडीमार आणि त्यांचा उत्साह! तोही इतक्या थंडीत! हळु हळु पूर्व दिशा उजळतेय! पण अजूनही एक ऑब्जेक्ट बाकी आहे! आणि तोही दिसलाच! पूर्वेला तांबडं फुटलं, आकाशाचा रंग बदलला! समोरच्या धरणाचं दृश्य स्पष्ट दिसायला लागलं! आणि शुक्राच्या थोडं पूर्वेला मंदसा मंगळही दिसला! असा हा आकाश दर्शनाचा सोहळा पूर्ण झाला. त्याबरोबर वेगवेगळ्या संकल्पनांवर चर्चा, मुलांचे प्रश्न व अनेकदा त्यांचीच उत्तरं असाही क्रम सुरू राहिला.

आता मात्र थंडी चांगलीच जाणवतेय! सूर्य उगवतोय, पण त्यालाही १० अंश डोंगराच्या मागूनच वर यावं लागेल. थोड्या वेळाने मुलांसोबत तुंगवाडीच्या जवळच्या डोंगरावर कँपिंगच्या पाठारेजींसोबत ट्रेक करता आला. ते मुलांना केवड्याच्या फुलांची माहिती देत आहेत. इकडे सगळीकडे केवड्याचा सुगंध दरवळतोय. एक गमतीची माहिती पाठारेजींनी सांगितली. इथे डोंगराचा भाग असल्यामुळे जमिनीत पाणी मिळत नाही. पाणी झ-यावरूनच मिळतं! आणि त्यांनी त्या प्रवाहाची जागाही दाखवली! कदाचित त्यामुळेच इथल्या गाजर- काकडीला खूप वेगळी चव लागत होती! वेगवेगळी झाडं, किल्ल्याची पार्श्वभूमी ह्याबद्दल पाठारेजींनी मुलांना माहिती सांगितली. नंतर त्यांच्या शेतातलं मधुमक्षिकापालनाचं युनिटही दाखवलं! हेसुद्धा एक beehive cluster च की! ते सांगत आहेत की, इथे नुकताच रस्ता झालाय. इकडचं राहणीमान तसं बरच टफ आहे. इथून त्यांची मुलं पहाटे ४ ला उठून वेळेची कसरत करत लोणावळ्याला भोंडे हायस्कूलला जातात. इथलं जगणं कसं असेल, ह्याचा अंदाज सिंबा कुत्र्याच्या काटेदार बेल्टवरूनही येतोय…


.

.

फिरून परत शिबिरस्थानी आल्यानंतर कल्पना चावला स्पेस एकेडमीचे प्रमुख पुजारी सरांनीही मुलांना खूप गोष्टी सांगितल्या. मधमाशा जगल्या तर माणूस जगणार आहे, असं आईनस्टाईनने म्हंटलं होतं. ह्या वेगवेगळ्या क्षेत्रात संवर्धनाचं काम करणा-या मंडळींची त्यांनी मुलांना माहिती दिली. एक होता कार्व्हरसारख्या पुस्तकाचं व वाचनाचं महत्त्व सांगितलं. असा हा सोहळा सम्पन्न झाला! मुलांसाठी काही आनंद देणारं करता आल्याचं मोठ्ठ समाधान मिळालं. आणि हो, रात्रीचं आकाश इतकं इतकं जबरदस्त होतं, की ते डोळ्यांनी लुटताना फोटो घेण्याचं भानच राहिलं नाही. तरी ते आकाश कसं होतं, ह्याची एक झलक म्हणून मागच्या वर्षीचा आकाशगंगेचा फोटो ब्लॉगवर बघता येऊ शकेल. ही पोस्ट आपल्या जवळच्यांसोबत शेअर करू शकता. धन्यवाद.

(वाचल्याबद्दल धन्यवाद! निरंजन वेलणकर 09422108376 फिटनेस, ध्यान, आकाश दर्शन, ट्रेकिंग, मुलांचे ज्ञान- रंजन सेशन्सचं आयोजन.)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान अनुभव!
तुम्ही चालू/ अपूर्ण वर्तमान काळात लिहिल्याने आणखी मजा आली.

काय मस्त अनुभव, अन शब्दांत उतरलयही छानच. किती वेगळं, छान काम करता आहात तुम्ही. वाचताना मागे वांगणीला रात्रभर बघितलेले तारे, अनुभवलेली थंडी अन सगळ्याच रोमांच पुन्हा आठवता आला. धन्यवाद सर __/\__

वा! वा! मस्त अनुभव आणि वर्णन! खूप दिवस झाले असं आकाशदर्शन करून!
योगायोगाने, काल रात्री एका लग्नाच्या रिसेप्शनला जिथे गेलो होतो ते ठिकाण शहरापासून बऱ्यापैकी लांब होतं आणि आजूबाजूला गावंही नव्हती. त्यामुळे तिथून आकाश छान स्वच्छ दिसत होतं. चंद्र मावळायला आला होता आणि इतका सुरेख दिसत होता!

नक्षत्र दर्शन - पुरुषोत्तम कुलकर्णी, नांदेडचे प्रकाशन.
Joy of star watching - Biman Basu, National Book Trust ( आता मिळत नाही)
ही दोन पुस्तके नवशिक्यांच्या कामाची.

मस्तच... Happy
निरंजन..... ग्रेट...

सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद! Happy

@ srd जी, तुम्हांला नांदेडच्या एल के कुलकर्णी लिखित नक्षत्र विहार तर म्हणायचं नाहीय? अप्रतिम पुस्तक आहे ते. राजहंस प्रकाशनने सुधारित आवृत्ती काढलीय. बूकविश्ववर आहे. शिवाय गो. रा. परांजपे रचित आकाश दर्शन एटलाससुद्धा आता प्रिंट स्वरूपात व पीडीएफमध्ये उपलब्ध आहे.