नागाची मुर्ती आणि क्रिकेटचे चेंडू !!

Submitted by ऋन्मेऽऽष on 22 January, 2024 - 17:07

आमच्या घरात माझे विचार घरातल्या चारचौंघांपेक्षा वेगळे आहेत. तसेच मला ते विचार मांडायला आणि शक्य तिथे आर्ग्युमेंट करायला आवडते. त्यामुळे घरात वादविवाद चर्चा होत राहतात.
-------------------------------

तर या शनिवारची गोष्ट. सुर्याचे पहिले किरण धरतीवर पोहोचायच्या आधीच आम्ही मस्त नहा धो के मॉर्निंग वॉल्कसाठी निघालो. आम्ही म्हणजे मी आणि माझी लेक. हे आमचे दर विकेंडचे रुटीन आहे. पोरांना घेऊन मॉर्निंग वॉकला मिनी सी शोअरला जायचे. तिथून चहा नाश्त्याला जवळच असलेल्या माझ्या सासुरवाडीला आणि पोरांच्या आजोळी फेरी मारून यायचे.

भल्या पहाटे ऊठायला अडचण येत नाही कारण बरेचदा रात्रभर जागेच असतो. त्यामुळे ईतर जनता उठायच्या आधी आम्ही घराबाहेर पडू शकतो. तसेच तिथे गेल्यावर ईतर मॉर्निंग वॉकला आलेल्या जनतेपासून वेगळे असे निर्जन निवांत जागी आम्ही फिरत राहतो. ईतर लोकं मिनी सीशोअरच्या तलावाभोवती फेरी मारत असतात, तर आम्ही खाली पायर्‍या उतरून तेथील खडकांवर जातो. तिथे विविध प्रकारचे पक्षी-पाणपक्षी दाणे टिपत असतात त्यांना न्याहाळणे हा आमचा छंद आहे. आणि तलावाच्या पाण्यात खडे मारणे हा आमचा खेळ आहे.

पुढच्या स्टोरीचा फिल यावा म्हणून त्या जागेचा फोटो अपलोड करतो..

IMG_20240123_031652.jpg

तर असेच सर्व काही नेहमीप्रमाणे आणि सुरळीत चालू असताना अचानक लेकीची नजर तेथील एका खडकावर ठेवलेल्या गणपतीच्या मुर्तीवर पडली. मला म्हणाली, ब्रो, मला तशी मुर्ती हवी आहे.

ती गणपतीची मुर्ती दोन फूटाची होती. मी म्हटले घरी गेल्यावर मम्मीला सांग, ती ऑर्डर करेल.. ही माझी नकार द्यायची पद्धत आहे.

तिच्या शेजारी अजून एक चार ईंची नागाची मुर्ती होती. गणपतीला नकार देताच तिने मला मग अशी नागाची मुर्ती हवी आहे असा हट्ट धरला. मुलांचे काय, त्यांना जे दिसेल ते हवे असते.

माझ्या तोंडातून चटकन बाहेर पडले, जा ऊचल मग तीच !
तसे तिचे डोळे लकाकले...
खरंच..?? घेऊ ती?
आणि मी फसलो!

तिथे आढळणारे शंख शिंपले, रंगीबेरंगी दगडे गोळा करून घरी आणने हा देखील तिचा एक छंद आहे. ते उचलायला तिला कधी अडवले नाही. तर आता ही कोणीतरी खडकावर सोडून किंवा विसर्जन करून गेलेली मुर्ती आपण का घेऊ नये हे तिला कसे समजवावे हा प्रश्न मला पडला. कारण ती तिथून नेण्यात कोणाचे काही नुकसान नव्हते, ना ती कसली चोरी होती. ना तिला कोणी हारफुले गंध वाहलेले. कोणीतरी बस असेच ती ठेऊन गेले होते.

तर अशी ती मुर्ती किंवा तिच्या द्रुष्टीने छोटासा तो खेळण्यातील नाग उचलण्यात फारसे काही वावगे नव्हते. पण घरी गेल्यावर काय वादळ येऊ शकते याची मला कल्पना होती.

म्हणून मी तिला प्रामाणिकपणे म्हटले,
बघ परी, मला काही प्रॉब्लेम नाही. तुला माहीत आहे मी देव मानत नाही (हे तिला खरेच माहीत आहे). पण घरी मम्मीला हे आवडणार नाही. अशी देवाची विसर्जित केलेली मुर्ती घरी आणणे हे फार वाईट समजले जाते. अशी मुर्ती घरात ठेवणे मम्मा अलाऊडच करणार नाही.

पण माझे पहिले वाक्यच तिच्या डोक्यापर्यंत पोहोचले आणि पुढची वाक्ये या कानाने ऐकून त्या कानाने सोडून तिने पडत्या फळाची आज्ञा घेत चटकन मुर्ती उचलून बॅगेत ठेवली.

घरी जायच्या आधी आम्ही नेहमीच्या रुटीनप्रमाणे माझ्या सासुरवाडीला गेलो. पहिली चकमक तिथे घडली. तिने नेहमीप्रमाणे मोठ्या कौतुकाने हे बघा मी सी शोअर वरून काय आणले, ढॅन टॅं ढॅण करत ती मुर्ती दाखवली. आणि सगळ्यांचे चेहरे खरा नाग बघितल्यासारखे झाले. आता जावईबापूंना काय बोलणार म्हणत तिलाच ओरडले, आणि ताबडतोब ती मुर्ती एखाद्या झाडाखाली नेऊन ठेवायला सांगितले. मग मीच म्हटले, बरे, घरी जाताना कुठेतरी झाड बघून ठेवतो.

चहा पिऊन घरी जायला निघालो. सवयीप्रमाणे मी सांगितलेले काम विसरलो. मुर्ती विसर्जन न करताच घरी पोहोचलो. पण त्या आधीच मुर्तीची किर्ती घरी पोहोचली होती. जे सासुरवाडीला नाही घडले ते ईथे घडले. हे माझे घर होते, आणि माझी बायको या घराची सिंघम. तिने मला आडवेतिडवे झापले. मुलीला प्रेमाने समजावले. अशी एखादी वस्तू घरात आणतो तेव्हा आपल्याला तिचा ईतिहास भूगोल माहीत नसतो. ती तिथे कोणी का ठेवली आहे याची माहिती नसते. त्यामुळे त्यासोबत कशी कोणाची पनवती, साडेसाती किंवा नकारात्मक उर्जा आपण घरात आणू शकतो याचे ज्ञान तिला दिले.

यावर मी बायकोला शांतपणे ईतकेच म्हटले की हे मी तिला सांगू शकलो असतो, पण ज्या गोष्टींवर माझा स्वत:चाच विश्वास नाही ते मी तिला पटवू शकलो नसतो...

लेकीचे मन मात्र ईतक्यात भरले नव्हते. हायकोर्टात निकाल विरोधात गेला की सुप्रीम कोर्टात जावे तसे तिने माझ्या आईला फोन लावला. पण तिथे काय निकाल लागणार होता हे मला माहीत होते. सात वर्षे सक्त मजूरीची शिक्षा आजन्म कारावासात बदलणार होती.. आणि तेच झाले.

तुझ्या बापाला एक अक्कल नाही, तुला तरी समजायला हवे... - ईति आमच्या मातोश्री.
(जनरली हे वाक्य लोकांकडे उलटे म्हटले जात असावे)

तात्पर्य - केस डिसमिस झाली. दुसर्‍या दिवशी रविवार असल्याने "जिथे होती तिथेच" मुर्ती ठेवून या असे फर्मान निघाले. यात जराही कसूर होऊ नये म्हणून कधी नव्हे ते दस्तुरखुद्द माझी बायको सुद्धा आमच्यासोबत मॉर्निंग वॉल्कला आली. मुर्ती होती तिथे ठेवली. बायकोने मुर्तीच्या आणि मी बायकोच्या पाया पडून आम्ही निघालो.

---------------------------------

किस्सा ईथेच संपत नाही. शीर्षकातील क्रिकेटचे चेंडू अजून शिल्लक आहेत. Hence it's not over yet!

त्याच रात्री बायकोची बहिण घरी आली होती. मावशीला कौतुकाने दाखवायला म्हणून लेकीने आपला खजिना तिच्यासमोर रिता केला. हा खजिना म्हणजे जवळपास दहा बारा क्रिकेटचे चेंडू. काही रबरी चेंडू, तर काही टेनिस बॉल. आता ते लेकीकडे आले कुठून??

तर आमच्या बिल्डींगला लागूनच एका शाळेचे भले मोठे मैदान आहे. तिथे रोज संध्याकाळी आणि सुट्टीच्या दिवशी दिवसभर आजूबाजूची बरीच मुले क्रिकेट खेळत असतात. आता क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे म्हणतात. गल्ली क्रिकेट हा त्याहून मोठा अनिश्चिततेचा आणि अनपेक्षित नियमांचा खेळ आहे म्हणतात. जिथे ईंटरनॅशनल क्रिकेटमध्ये उत्तुंग फटक्यांना सहा धावा मिळतात, तिथे गल्ली क्रिकेटमध्ये कधीकधी फलंदाजाला चक्क बाद ठरवावे लागते. कारण त्याने तो चेंडू अश्या जागी पोहोचवला असतो जिथून तो कधीच परत येत नाही. किंवा परत आणने अवघड असते.

तर असेच काही षटकाररुपी चेंडू आमच्या सोसायटीत येत राहतात. जे आमच्या सोसायटीतील मुले कधीच परत करत नाही. वॉचमन सुद्धा त्यांना सामील असतो. बॉल आला की तो ठेवून घेतो. आणि आमची मुले खेळायला आली की त्यांना देतो. आता या सगळ्यात माझी लेक लीडर बनत पुढे असल्याने ते चेंडू तिच्याकडे जमा होतात. जे ती आणि तिचे मित्रमैत्रीणी स्वतः खेळायला वापरतात.

मला व्यक्तीशः हे कधीच पटले नाही. मुलांनाच नाही तर मोठ्यांना सुद्धा सांगून पाहिले. पण त्यांचा मुद्दा असा होता की बॉल परत देऊ लागलो तर त्या पलीकडच्या मुलांना कसली भिती राहणार नाही आणि ते मोठे फटके बिनधास्त मारतील, बॉल वारंवार येऊ लागेल, जो आपल्याच मुलांना लागू शकतो.

कदाचित हा मुद्दा योग्यही असेल, तरी मला कधीच पटला नाही. याचे कारण म्हणजे माझे सारे बालपण अश्याच एका कंपाऊंडपलीकडील मैदानात खेळण्यात गेले. त्यामुळे त्या पलीकडच्या मुलांमध्ये मी स्वतःला बघतो. एक मैदान आमच्या घराच्या समोर सुद्धा आहे. बाल्कनीत बसून एका चहाच्या कपाला सोबत घेत मी तासनतास तिथल्या मुलांना खेळताना बघू शकतो. ते माझ्यासाठी स्ट्रेसबस्टर आहे. कारण त्यावेळी मी मनाने त्यांच्यासोबत खेळत असतो. क्रिकेट रक्तातच नाही तर श्वासात आहे, त्यामुळे त्या एक चेंडूची किंमत काय असते हे मी समजू शकतो. ती पैश्यात कधीच नसते..

लहानपणी आम्ही बाहेरच्या पोरांशी क्रिकेटच्या मॅचेस खेळायचो. तेव्हा प्राईजमनी सोबत बॉल सुद्धा ठेवला जायचा. मॅचसाठी म्हणून नवीन बॉल विकत घेतला जायचा आणि जो जिंकेल त्याला तो बॉल मिळणार अशी पद्धत असायची. पैश्यापेक्षा जास्त आनंद तो बॉल जिंकल्याचा व्हायचा. पैश्याला सुद्धा किंमत याचसाठी होती की त्यात नवीन बॉल किंवा बॅट घेता यायची. कारण रोजच्या खेळाला बॉल घेता यावा म्हणून पॉकेटमनीचे खाऊचे पैसे वाचवा, चालत जाऊन बसचे पैसे वाचवा, रद्दी विका, शेजारील बंद कंपनीच्या पत्र्यावर चढून तिथले भंगार गोळा करून विका असे कैक उद्योगधंदे केले जायचे. आणि खेळताना तो बॉल कुठे अडकला तर प्रसंगी जीव घोक्यात घालून, स्टंट करून तो काढला जायचा.

संध्याकाळी अंधार पडला की खेळ थांबायचा. पण मित्रांच्या गप्पा नाही. तेव्हा हाताला चाळा म्हणून तो बॉल सोबत असायचाच. हातातल्या हातात बॉल टर्न करत राहायचे. समोरच्या भिंतीवर आपटून झेल घेत राहायचे. ऊगाचच जमिनीवर टप्पा टप्पा पाडत राहायचे. मग कोणी मागायला आले तरी हातातून सुटायचा नाही, झाल्यास दोघे मिळून कॅच कॅच खेळत राहायचे.. कारण तो फिल सतत सोबत हवा असायचा. तो केवळ एक बॉल नसायचा, तर ते एक ईमोशन होते.

अगदी रस्त्याने चालतानाही एखादा गोलाकार दगड दिसला तर त्याला उचलून हातात चेंडूसारखे खेळवायचे आणि मग बॉलिंग अ‍ॅक्शन करून टाकायचे. त्यानंतर तो दूरवर कुठेतरी घरंगळत गेल्यावर आजूबाजूच्या ईतर शेकडो दगडांकडे दुर्लक्ष करून, तिथवर चालत जाऊन पुन्हा तोच दगड आणायचा यामागेही तेच इमोशन होते. कारण त्या दोनचार मिनिटे हातात खेळवल्यानंतर त्या दगडाशी स्पर्शाचे एक नाते जुळले असायचे.

त्यामुळे असा बॉल जर कुठे हरवला, कोणी घेतला, आणि परत दिला नाही तर त्या व्यक्तीबद्दल मनात किती शिव्याशाप यायचे हे अनुभवाने माहीत होते. बॉल परत करणारे देवदूत आणि न करणारे शैतान ईतके साधेसोपे गणित होते. आणि हेच मी बायकोला आणि तिच्या बहिणीला समजावून सांगू लागलो.

कालची कोणी तरी सोडून दिलेली नागाची मुर्ती घरी आणल्यावर, कश्याला उगाच कोणाची तरी नकारात्मक उर्जा आपल्या घरात आणा म्हणून मुलीला ओरडलात..
तर आता हे चेंडू घरात आणताता त्यामागे कोणाची हाय, कोणाचे तळतळाट घरात आणत आहोत हा प्रश्न नाही का पडत तुम्हाला??

माझा बोलायचा टोन अगदी जाब विचारल्यासारखे सिरीअस होता. तरी त्यांना काय विनोदी वाटले त्यांनाच ठाऊक. सगळ्याजणी हसायला लागल्या.
कदाचित हेच त्यांच्या सोयीचे असावे. कारण माझ्या प्रश्नाचे उत्तर त्यांच्याकडे नसावे..
तुमच्याकडे आहे का? माझ्या प्रश्नाचे ऊत्तर...

प्रतिसादात वाट बघतोय,
तोपर्यंत हा पहा तो नाग आणि हे पहा ते ढापलेले क्रिकेटचे चेंडू Happy

IMG_20240123_015553.jpg

- ऋन्मेऽऽष

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चांगला लेख

बाकी मत देण्याच्या फंदात काही पडू इच्छित नाही

लेख आवडला. छान लिहिलं आहे. अगदी मनापासुन.
बॉलशी जुळलेल्या भावना फारच नविन होत्या. एवढा विचार केला नव्हता.
मी माझ्या pet dog ला घेऊन रोज सकाळी टेकडीवर फिरायला जाते, तिथे एक सपाट जागा आहे त्यावर रोज संध्याकाळी अगदी अंधार पडेपर्यंत क्रिकेट चालु असतं. साहजिकच अंधारात बॉल्स हरवतात किंवा जोरदार मारलेले शॉट्स झुदुपांमधे बॉल्स गेल्यामुळे सापडत नाहीत. दुसऱ्या दिवशी सकाळी गेल्यावर माझ्या dog ला मात्र नक्की सापडतात. त्याला बॉल्स शोधण्याचे जन्मजात skills आहेत. दिवसाला एक ते दोन, पावसाळ्यात गवत वाढल्यावर तीन देखील balls मिळतात. तिथे खेळणाऱ्या मुलांना परत देऊन किंवा मेड्सच्या मुलांना, सोसायटीतील मुलांना वाटुन देखील एकावेळी 25-30 बॉल्स घरात कायम असतात.
(Touch wood) खेळणं हवं असताना न मिळणे ही परिस्थिती कधीच नसल्यामुळे बॉल बद्दल लिहिलेल्या भावना वाचुन वेगळंच वाटलं. आता ते 20-25 बॉल्स कधीच घरात नसतील. आम्ही नक्की ते रोजच्या रोज वाटुन त्या मुलांचा खेळाचा आनंद वाढवू.

लेख आवडला. मातोश्रींचे डायलॉगही आवडले. हे काही फारसे वेगळे नसते कुठल्याही घरात.

बाकी मुर्त्या किंवा बॉल घरात न आणण्याकडे कल असेल. तुमचे दोन्ही पॉईंट बरोबर आहेत.

पण आत्ताची मुले आपल्या फार वेगळ्या परिस्थितीत वाढत आहेत. त्यांना कशाचे अप्रूप वाटेल सांगता येत नाही.

मिनी सीशोअरचे फोटो आवडले. वाशीत मी काही काळ राहिले आहे आणि मिनी सी शोअर व जवळचे 'शिकारा' हॉटेल हे एके काळी फारच हॅपनिंग प्लेस होते.

लेख आवडला.
बॉलशी जुळलेल्या भावना फारच नविन होत्या. एवढा विचार केला नव्हता. ">>>> +100 .

भा पो.

माझा बोलायचा टोन अगदी जाब विचारल्यासारखे सिरीअस होता. तरी त्यांना काय विनोदी वाटले त्यांनाच ठाऊक. सगळ्याजणी हसायला लागल्या. >> आता त्यांचे लॉजिक त्यांच्या विरुद्ध जात होते आणि सिंघम कधी माघार घेत नाही, माहेरच्या लोकांसमोर तर कधीच नाही. त्यामुळेच तुमचे कळकळीचे बोलणे हसवुन उडवून लावल्या गेले.

धन्यवाद सर्वांंचे
मीरा विशेष धन्यवाद..

बॉलशी जुळलेल्या भावना क्रिकेट खेळायची आवड असलेल्यांना आणि त्यातही माझ्या जनरेशनच्या मुलांना नक्की समजतील. जनरेशन यासाठी की हल्ली मोबाईलच्या जमान्यात मुलांच्या आवडीनिवडी आणि इमोशन्स बदलल्या असण्याची शक्यता आहे.

गंमत म्हणजे हा लेख आज डोक्यात घोळत असल्याने आज मूडही तसाच होता. वर्क फ्रॉम होम करताना लंचब्रेकमध्ये घरीच अर्धा पाऊण तास लेकीसोबत क्रिकेट खेळलो. आणि टीव्ही फोडाल, झुंबर पाडाल म्हणून आजही घरची सिंघम ओरडत होती Happy

आम्ही नक्की ते रोजच्या रोज वाटुन त्या मुलांचा खेळाचा आनंद वाढवू. >>> हो नक्की करा. हे माझ्याही डोक्यात येते की ते बॉल घ्यावेत आणि आमच्या (सेकंड फ्लोअरवरील) गार्डनमधून पलीकडच्या मैदानात त्या पोरांमध्ये भिरकावून द्यावेत. आणि त्यांचा आनंद अनुभवावा..

माझेमन बोलत आहेत ते देखील बरोबर आहे,
आत्ताची मुले आपल्या फार वेगळ्या परिस्थितीत वाढत आहेत. त्यांना कशाचे अप्रूप वाटेल सांगता येत नाही.

नरेन,
माहेरच्या लोकांसमोर तर कधीच नाही. >>>> हो Proud माझ्या आईसमोर माझ्या सगळ्या चुगल्या होतात. पण सासुरवाडीला मात्र यातले काहीच पोहोचले नाही पाहिजे अशी तंबी मिळते. असो, हा वेगळाच विषय आहे. आणि व्यापक आहे Happy

माझेमन,
@ मिनी सीशोअर >>>> मला तर ते माझे तिसरे घर वाटते. (दुसरे मायबोली). त्यावर धागा काढायचा विचार मनात आहे. इथे अजून काही लोकांच्या आठवणी त्या जागेसोबत जुळल्या आहेत ह बघून छान वाटले Happy

अशीच, अगदी अशीच घटना माझ्या लहानपणी घडली होती.
आमच्या घराच्या गच्चीत कटलेले पतंग येऊन पडायचे.
ते गोळा करायचे , टाकी खाली लपवून ठेवायचे आणि दोन-तीन दिवसांनी आमच्या आसरी आणि मांजाला लावून पुन्हा उडवायचो.
दादांनी एकदा बघितले आणि कानाखाली लावून पतंग कापून फेकून दिला होता, "उष्टे पतंग उडवायचे नाहीत . त्याच्यात त्या पोराचं मन अस्त.
स्वतः घरी बनव किंवा नवीन आण आणि उडव."

छबुराव, ग्रेट Happy
पतंगबाबत मात्र आमच्याकडे वेगळा नियम होता. कोणाची पतंग पेच लावल्यावर गुल झाली तर जो पकडेल त्याची. मूळ मालकाने त्यावरचा आपला हक्क गमावला असतो.
त्यातही काही स्वाभिमानी मुले स्वतःची गुल झालेली पतंग पुन्हा वापरायचे नाही Happy

मृणाली, धन्यवाद Happy

देवाच्या वगैरे मूर्ति मी आणत नाही घरी. देवळात कोपर्‍यात ठेवलेल्या असतात. लोकांना टाकवत नाही म्हणुन देवळात आणुन ठेवतात. एक नारसिंही नामक मातृकेचे (प्रत्यंगिरा मला वाटतं) चित्र होते. क्वचित गणपती, देवी, संत असतात. पण मी नाही आणत.

छान लिहिलं आहे. भा.पो.
बॉलच्या बाबतीत अगदी तुझ्यासारख्या नव्हेत, पण आठवणी आहेत. आम्ही शाळेत असताना लगोरी खेळण्यासाठी बॉल वापरायचो, क्रिकेट नाही. (मुलं क्रिकेट खेळायची.) तेव्हा दरवर्षी शाळा सुरू झाली, की वर्गणी काढून मुलं आणि मुली एकेक रबरी बॉल जवळच्या दुकानातून आणायची. वर्षाच्या मधेच बॉल हरवला किंवा फुटला वगैरे, तर बहुतेक नवीन आणत असू. वर्ष संपल्यावर तो बॉल कुणाकडे जायचा ते आठवत नाही. पण त्या बॉलशी एक प्रकारचं नातं जुळायचं.
कधी एखाद्या दिवशी दुसऱ्या एखाद्या वर्गातल्या मुलींबरोबर लगोरी खेळलो आणि तेव्हा जर त्या़चा बॉल वापरला तर तो परका वाटायचा Happy

लेख आणि फोटो मस्त..!

फोर्टीज हॉस्पीटल आहे त्याच्या समोर जो तलाव आहे तोच मिनी सि शोअर का..? मी दिड वर्षापूर्वी आले होते तिथे... खूप छान जागा आहे... स्वच्छ आणि शांत. ..!

वेळ होता तर मी आणि पती बराच वेळ बसलो होतो तिथे.. एरिया आवडला होता. निवांत बसायला, walk करायला चांगली जागा आहे.

सामो,
देवाच्या मुर्ती फोटो असे उचलून शक्यतो कोणीच आणत नसावे. आस्तिकांना हे बरोबर वाटत नसेल आणि नास्तिकांना त्याचा मोहच नसेल. वो तो बच्ची का दिल रख ने के लिये उठा लिया Happy
आणि तसेही माझ्यात थोडा खोडसाळपणा देखील आहे. म्हणजे कोणी रस्त्यावर पडलेली लिंबू मिरची दाखवून "सावध" केले तर मी मुद्दाम पाय देऊन जाणार टाईप्स Happy
पण वर असा खोडसाळपणा मुद्दाम केला नव्हता. तर ज्यावर माझा विश्वास नाही ते ज्ञान मुलीला ज्यांचा विश्वास आहे त्यांच्याकडूनच मिळावे असे वाटत होते. म्हणून मी तिला अडवले नाही. ती आणि घरचे काय ते बघून घेतील म्हणून ती मुर्ती उचलू दिली. अर्थात हार फुले वाहिलेली, कोणी पूजा करत असलेली मुर्ती असती तर नसती उचलू दिली. पण ती तशी वापरातली नव्हती.

वावे, धन्यवाद Happy

वर्षाच्या मधेच बॉल हरवला किंवा फुटला वगैरे, तर >>>>>>> क्रिकेट खेळताना बॉल काही दिवसातच फुटून जायचा. त्यामुळे तुलनेत खर्चिक प्रकरण होते Happy
रबरी बॉल घेताना एक्सपर्ट लोकं दाबून चेक करायचे. बॉल फार दाबला नाही गेला आणि जास्त कडक असला तर तो फुटायचे चान्सेस जास्त. पण म्हणून जास्त दाबला जाणारा सुद्धा कामाचा नाही, त्यात हवा बॉल उसळायचा नाही आणि खेळताना मजा यायची नाही.

तेव्हा जर त्या़चा बॉल वापरला तर तो परका वाटायचा >>>> हो अगदी. या लगोरीवरून आठवले, आमच्याकडे लगोरी वा आबादुबी खेळायला स्पेशल बॉल होते जे वर उल्लेखल्याप्रमाणे जास्त दाबले जाणारे, त्यामुळे क्रिकेटसाठी फुसके मात्र या खेळांसाठी उत्तम आणि जास्त टिकणारे ठरायचे.

रुपाली धन्यवाद,

फोर्टीज हॉस्पीटल आहे त्याच्या समोर जो तलाव आहे तोच मिनी सि शोअर का..? मी दिड वर्षापूर्वी आले होते तिथे... खूप छान जागा आहे... स्वच्छ आणि शांत. ..!
>>>>>>
हो, तीच जागा... आणि खरेच फार सुंदर, स्वच्छ, शांत वगैरे आहे. मी चार वर्षे तिथेच शेजारच्या गल्लीत राहायचो. वर्षाचे सगळे ऋतु आणि दिवसाच्या सगळ्या वेळा तिथे अनुभवल्या आहेत.

आपली नसलेली कुठलीही गोष्ट घरी उचलून आणणे याला चोरी म्हणतात हे आजीने लहानपणी शिकवलेलं.
एकदा मला रस्त्यात एक पाकिट सापडलं होतं ज्यात तब्बल तीन का पाच हजार रुपये होते. ही तेंव्हाची गोष्ट आहे जेंव्हा माझ्या आईचा पगार १८०० रुपये होता. अर्थात ते किती पैसे आहेत ते कळावं एवढं माझं वय नव्हतं पण बाबांचं पाकिट खराब झालंय तर त्यांना देऊ आपण या विचाराने ते पाकिट उचलून घरी आणलं. त्या संध्याकाळी आई बाबांनी जे झोडपलंय मला. त्याचा ट्रौमा आत्तापर्यंत आहे. मी रस्त्यावर पडलेली पेनी उचलते कारण ती लकी मानली जाते पण तो पुर्ण दिवस कसल्याश्या दडपणाखाली असते. त्या व्यतिरिक्त आजही मी माझी नसलेली गोष्ट उचलून घरी आणु शकत नाही. अगदीच फारच पैसे सापडले आणि उचलावेच लागणार असतील (पैसे तुडवले जातायेत, अपमान होतोय) तर मी ते उचलून लगेच कोणाला तरी देऊन टाकते. देवाच्या कृपेने अजुन तरी मला ते घरी आणावे लागले नाहीत.
अवांतर: सेम गोष्ट एखाद्याचे पैसे बुडवण्याबाबत. मला कोणाकडुन पैसे घ्यावे लागलेच तर ते शक्य तितक्या लवकर मी परत करते. तोपर्यंत झोप लागत नाही मला. पैसे परत न करणारे महाभाग माहित आहेत. एक डेडलाईन सांगुन पुन्हा पुन्हा रिमाईंडर द्यावा लागुनही ते परत न करणारे किंवा उपकार केल्यासारखे परत करणारे महाभागही ओळखीत आहेत. अशांना शांत झोप कशी लागते रात्री हा प्रश्न पडतो मला.

कॉमी, धन्यवाद Happy

रीया,
बहुतेक पाकिट सापडल्याचा किस्सा तू आधीही कुठेतरी लिहीला असावा. वाचलेला आहे.

त्या संध्याकाळी आई बाबांनी जे झोडपलंय मला. त्याचा ट्रौमा आत्तापर्यंत आहे.
>>>>
हा किस्सा मग या धाग्यात सुद्धा यायला हवा Happy
https://www.maayboli.com/node/82469

मी रस्त्यावर पडलेली पेनी उचलते कारण ती लकी मानली जाते पण तो पुर्ण दिवस कसल्याश्या दडपणाखाली असते. >>> तरीही उचलावीशी वाटत असेल तर अंधश्रद्धेचा प्रभाव जास्त असेल.

एक डेडलाईन सांगुन पुन्हा पुन्हा रिमाईंडर द्यावा लागुनही ते परत न करणारे >>> यामुळेच मी कोणालाही पैसे वा काहीही दिले तर ते स्वाहा बोलूनच देतो. किंवा तितकेच देतो जे पुन्हा परत नाही आले तर मला चालू शकेल. आणि परत मिळाले तर बोनस समजतो. कधी रिमाईंडर देण्याची भानगड ठेवत नाही. अन्यथा लहानपणी मी कोणाला गोट्या उधार दिल्या तरी रात्रभर विचार करत राहायचो त्या परत कधी मिळणार Happy
आता असले काही विचार मनात येत नाहीत. पगार बायकोच्या हातात देतो, सारे जमाखर्चाचे हिशोब तीच बघते. त्यामुळे उधार घेणेदेणे सुद्धा तीच ठरवते. याने तिचे काय होते ते माहीत नाही, मला नेहमी शांत झोप लागते Happy

>>>>>>>देवाच्या मुर्ती फोटो असे उचलून शक्यतो कोणीच आणत नसावे.
ऋन्मेष देवळात दत्तक देण्याकरताच त्या मूर्ति ठेवलेल्या असतात.

श्रद्धा असते की त्या मूर्ति कचर्‍यात फेकायच्या नाहीत वगैरे. विसर्जनाकरता नदी नसते परत नदीत काही फेकलेले वाईट दिसते. त्यामुळे देवळात ढीग असतो.

आज जाताना खालच्या मजल्यावर जीन्यात एक खोडरबर सापडला..लेकीने उचलला..म्हटलं ठेव तिथेच ज्यांचा असेल ते घेऊन जातील तर आता मला सापडला तो माझा झाला म्हणे..

सामो हो, कचऱ्यात म्हटले की श्रद्धा दुखावणारच.. पण निर्माल्यकलश असतात त्यातही काही विसर्जित करणे बरेच जणांना रुचत नाही. शास्त्रानुसार पाणीच हवे असते.

तर आता मला सापडला तो माझा झाला म्हणे.. >>>> बरेचदा पोरांचे आपसात खेळताना असे रुल बनतात Happy

धन्यवाद हपा Happy

सभासद, तुमचा आयडी बघून आधी नवीन सभासद वाटलात. पण तुम्ही तर एक तपापेक्षा जास्त जुने निघालात... प्रतिसादाबद्दल धन्यवाद Happy

Pages