शोक

Submitted by पराग र. लोणकर on 6 January, 2024 - 23:27

शोक

साहित्य क्षेत्रात जगन्मित्र असलेल्या प्रसिद्ध आणि प्रतिभासंपन्न साहित्यिकाच्या अचानक आणि अवेळी झालेल्या निधनाने मी सुन्न होऊन गेलो होतो. माझा आणि त्यांचा खूपच जवळचा, घनिष्ठ संबंध होता.

प्रोफेशनल फोटोग्राफर आणि तोही साहित्य क्षेत्राशी सदासर्वदा निगडित असल्यामुळे तसं विनयाने सांगायला गेलं तर मीही जगन्मित्रच होतो. साहित्य क्षेत्रात... त्यामुळे आता या साहित्यिकाच्या निधनाची बातमी कन्फर्म करण्यासाठी, त्याबद्दल दुःख आणि शोक व्यक्त करण्यासाठी मला फोन येण्याचा ओघ चालू होणार असं मला अपेक्षित होतंच, आणि घडलंही तसंच.

माझा मोबाईल अखंड वाजत राहिला व सर्व माझ्या परिचितांचेच फोन असल्यामुळे मी उचलत राहिलो. पण असे आठ-दहा फोन आल्यानंतर मी मोबाईल स्विच ऑफ करून टाकला.

कारण आलेले फोन हे बातमी कन्फर्म करणे, बातमीबद्दल दुःख व्यक्त करणे यासाठी नव्हतेच.

प्रत्येकाला, त्या साहित्यिकाबरोबर मी कधीतरी त्या माणसाचा काढलेला फोटो हवा होता. फेसबुक, व्हाट्सअप स्टेटस वर टाकण्यासाठी...

सोशल मीडियाच्या अतिरेकाच्या या भावनाशून्य आणि माणुसकीशून्य जगाकडून आलेल्या या अनुभवामुळे माझी खिन्नता अजूनच वाढली.

मी मोबाईल आणि माझं ऑफिस बंद करून बाहेर पडलो.

पुढील काही तास कोणाच्याही संपर्कात न येण्यासाठी...

*

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults