ओल्या हरभर्‍याची आमटी

Submitted by योकु on 29 December, 2023 - 06:22
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

सध्या बाजारात ओले हरभरे (सोले) मिळायला लागलेत. ही त्याची आमटी. रूढार्थानी आमटी प्रकार जरी असला तरी सूप म्हणूनही तसा फार चांगला आहे. जरा हरभरे सोलणे हा जरा किचकट टास्क, पण एखादवेळी करायला हरकत नाही. तर साहित्य -

एक वाटी सोललेले ओले हरभरे (हरभरे सोलण्याचा वेळ अर्थातच कृतीत धरलेला नाही)
तिखट पणा नुसार हिरव्या मिरच्या - कमी तिखट, पोपटी मिरची असेल तर २-३ तरी हव्यात
जरासा जास्त लसूण - इतक्या हरभर्‍यांसाठी ५-६ पाकळ्या तरी हवा
चिमूटभर हिंग
चवीनुसार मीठ
चिमूटभर साखर
२ मोठे + १ लहान चमचा तेल

क्रमवार पाककृती: 

एका बाजूला पाणी गरम करत ठेवावे.
दुसरीकडे सोललेले हरभरे, मिरच्यांचे तुकडे अन सोललेल्या लसूण पाकळ्या एका जाड बुडाच्या कढईत कोरड्याच भाजायला घ्यायच्या; मंद आचेवर. नीट भाज बसली नाही तर आमटीला जी अपेक्षित चव आहे ती साधत नाही.
चांगले ५-७ मिनिटं भाजून झाले - मिरच्या लसूण हरभरे यांना काळसर डाग पडले की एक लहान चमचा तेल त्यावर घालायचे आणि पुढे परतत राहायचे. लगेच ते सगळं प्रकरण खर्पुसेल. चांगलं खमंग झालं की गॅस बंद करून थंड होऊ द्यायचं.
गार झालं की मिक्सर ला गुळगुळीत पेस्ट करायची. पाणी वापरून अर्थात.

कोरडी भाज -
Harbhara Amti 1.jpg

तेल घातल्यावर -
Harbhara Amti 2.jpg

त्याच तेलाच्या कढईत उरलेलं तेल तापवून मोहोरीची फोडणी करायची, मोहोरी तडतडली की हिंग आणि लगेच वर ही पेस्ट घालायची. मीठ, साखर ही घालावी. पेस्ट तेलात ४-५ मिनिटं परतून वर बर्‍यापैकी पातळ होईल इतकं कढत पाणी यात ओतायचं. उकळी येइस्तो मोठ्या आचेवर सतत ढवळत राहायचं. उकळी फुटली के पुढे अजून १० मिनिटं तरी आमटी उकळू द्यावी. जरा थिक झाली की ५-७ मिनिटं झाकण घालून मुरू द्यावी आणि गरमगरमच खायला घ्यावी.

उकळतेय. फोटो वाफेमुळे नीट नाही आला. Sad
Harbhara Amti 3.jpg

ज्वारीची भाकरी, भात किंवा नुसतीही प्यायला सुरेख लागते.

या जेवायला ! - वाटीत ही केलेली आमटी, ताटलीत लाल भोपळ्याची बाकर भाजी, मुगाच्या डाळीची आंबट - गोड अशी खिचडी, भाकरी - फुलका, लोणच्यात लिंबू मिरची आणि आवळ्याचं लोणचं आहे.

Harbhara Amti 4.jpg

वाढणी/प्रमाण: 
आमटीप्रमाणे. इतक्या हरभर्‍यांची ४-५ वाट्या भरून आमटी झाली,
अधिक टिपा: 

विशेष साहित्य नसलं तरी भाजायला वेळ लागतो. म्हणून जरा वेळखाऊ प्रकरण आहे. बाकी कुठल्या मसाल्याची, कोथिंबीर - कढीपत्ता कश्याचीही गरज नाही. भाजल्याचा च फ्लेवर मस्त येतो आणि पदार्थ जिंकतो.

लोखंडी कढई वापरायची नाही. काळी होईल आमटी. शक्यतो जाड बुडाची स्टील ची कढई बेस्ट.

अगदी सेम पद्धत वापरून ओल्या तुरीच्या दाण्यांचीही आमटी करता येते. मी असला प्रकार मटाराचा ही केला होता - टोटल डीझास्टर. सो मटाराची उसळच चांगली होते. तसेच फ्रोजन दाण्यांची ही आमटी नीट होत नाही.

मधल्या काही स्टेप चे फटू मिसिंग आहेत - विसरलो काढायला - तरी मारकं पूर्ण द्यायचे गप... Biggrin

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Pages