तसली!

Submitted by पराग र. लोणकर on 27 November, 2023 - 04:11

तसली!

त्या प्रसिद्ध कवी आणि गझलकाराचा कविता आणि गझलांचा कार्यक्रम असल्याचे मला खूप उशिरा समजले. नेमकी आज क्लिनिकलाही पेशंटची रोजच्यापेक्षा अधिक गर्दी होती. त्यामुळे क्लिनिकवरून निघायलाच मला बऱ्यापैकी उशीर झाला.

शहराबाहेरच्या एका महाविद्यालयाच्या सभागृहात हा कार्यक्रम होता. सभागृहाच्या भोवताली एक लहानसे पटांगण किंवा मैदान म्हणूयात; होते, आणि त्याच्या बाहेर गेट. गेट बाहेर थोडं चाललं की एक मैदान होतं. कार पार्किंगची सोय तिथे होती. निघायला उशीर झाल्यामुळे मी तिथे पोहोचलो तेव्हा गाड्यांचा महासागर तिथे मला पाहायला मिळाला. मैदानाच्या अगदी शेवटच्या कोपऱ्यामध्ये मला गाडी लावायला जागा मिळाली आणि गाडीतून उतरून झपाझप पावलं टाकत मी महाविद्यालयाच्या त्या सभागृहापाशी पोहोचलो.

सभागृहाचे दरवाजे बंद करण्यात आले होते. आतील आसन क्षमता पूर्ण भरली होती. कार्यक्रमही नुकताच चालू झाला होता. अर्थात सभागृहाला लागून असलेल्या पटांगणात हा कार्यक्रम बघण्याची एका स्क्रीनवर सोय करण्यात आली होती, त्यामुळे मी लगेचच त्या पटांगणाकडे मोर्चा वळवला आणि एक रिकामी खुर्ची बघून तेथे बसलो.

माझ्या नेहमीच्या सवयीप्रमाणे एका रांगेत सगळ्यात कडेला असलेली शेवटची रिकामी खुर्ची मी पकडली. माझ्या उजवीकडे फक्त दोन-तीन माणसं चालू शकतील एवढीच रिकामी जागा व त्यापलीकडे पटांगणाची भिंत होती. मी त्या ठिकाणी बसलो आणि अगदी काही सेकंदात कुणीतरी एक खुर्ची उचलून आणून माझ्या उजवीकडे ठेवलेली मला जाणवली. त्यावर ती व्यक्ती बसलेलीही माझ्या लक्षात आलं. काही क्षणात ही व्यक्ती म्हणजे एक महिला असल्याचं माझ्या लक्षात आलं. मी हळूच त्या महिलेकडे पाहिलं आणि ती माझ्या फारच जवळ बसल्याचं माझ्या लक्षात आलं. मी थोडा संकोचलो पण माझी खुर्ची डावीकडे घ्यायला डावीकडे इतर खुर्च्या लागलेल्या, व त्यावर आधीच माणसं बसलेली असल्यामुळे जागा नव्हती.

असं एका अनोळखी महिलेने इतकं चिकटून माझ्या शेजारी खुर्ची आणून बसावं हे मला फारच खटकलं. पटांगण ओपन असल्यामुळे अधून मधून हातावर डास बसत होते, पण ते उडवण्यासाठी उजवा हात हलवणंही कठीण जात होतं, इतकी ती महिला जवळ बसली होती. एक मात्र होतं, की ही माझ्या शेजारी बसलेली महिला तशी सुंदर म्हणावी अशीच होती. अतिशय आकर्षक!

कविता, गझल ऐकता ऐकता माझ्या मनात शंका येऊ लागली. ही आकर्षक अनोळखी स्त्री- अधून मधून काही ठिकाणी बसायची जागा, खुर्च्या रिकाम्या असताना- कुठूनतरी खुर्ची उचलून घेऊन आपल्या इतकी जवळ येऊन का बसली असावी? विचार करता करता डोकं भिरभिरायला लागलं. समोरच्या कविता, गझल्स मेंदूत शिरेनाश्या झाल्या.

अचानक एक विचार डोक्यात आला.

कार्यक्रम रात्री उशिरा होता. संपायला बारा तरी वाजणार होते. ही वेळ म्हणजे ‘तसल्या’ बायकांसाठी व्यवसायाची वेळ आणि माझ्यासारखा एकटा माणूस म्हणजे यांचे हक्काचे गिऱ्हाइक. हा विचार डोक्यात आल्यावर माझं मन अधिकच कडवट झालं. मी शक्यतो तिच्याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करू लागलो.

कार्यक्रम संपायला साडेबारा वाजले. मी सकाळी क्लिनिक उघडत नाही. त्यामुळे मला तशी घाई नव्हती. कार्यक्रम संपायला आला आहे, याचा अंदाज येताच- नंतर गाड्या काढायला अडचण होऊ नये म्हणून प्रेक्षागृहातून हळूहळू लोक बाहेर पडू लागले होते. कार्यक्रम संपल्यावर तर मोठा लोंढाच बाहेर पडला. नेहमीप्रमाणे मी घाई न करता बसून राहिलो. एकदा बहुतेक मंडळी बाहेर पडली, की मला आरामात माझी गाडी बाहेर काढता येणार होती. मी बसून राहिलो.

त्या पटांगणातील बहुतेक मंडळी गेटबाहेर जाण्यासाठी बाहेर पडली, आणि तरीही इतका वेळ मला जवळपास खेटून बसलेली ती स्त्री उठली नाही. तिनं तिची खुर्ची थोडी बाजूला सरकवली, इतकंच.

मी खुर्चीवरून उठलो तशी तीही उठल्याचं माझ्या लक्षात आलं. आता मी जरासा वैतागलोच होतो. झपझप पावले टाकत मी पटांगणातून बाहेर, रस्त्यावर आलो. गाड्या पार्किंग केलेल्या मैदानात जाण्यासाठी. माझ्या वाढवलेल्या चालण्याच्या वेगाबरोबर तिनेही वेग वाढवलेला माझ्या लक्षात आला.

दुसऱ्या गेटमधून दुसऱ्या मैदानात शिरताना, आता तरी ती रस्त्यावरून सरळ चालती होईल अशी माझी आशा फोल ठरली. ती माझ्या मागे मागेच या मैदानातही शिरली. आता त्या पार्किंगच्या मैदानात अगदी तुरळक माणसं आणि तुरळक गाड्या होत्या. रात्रीची एकच्या जवळपासची वेळ. आता माझ्या संतापाची जागा भीतीने घेतली होती.

काय करेल आता ती? ती ‘तसली’ बाई काय बोलेल? काय करेल? आणि मी तिला झिडकारलं तर ती काय करेल? तिनं वेगळाच काही आरडाओरडा केला तर आणखीनच काहीतरी बिकट परिस्थिती ओढवेल.

शिवाय आणखी एक शक्यता होती. मी एक नामवंत डॉक्टर होतो. सज्जन माणूस होतो. कुटुंबवत्सल माणूस. पण शेवटी मी एक पुरुष होतो. तिच्याकडून ‘तसली’ काही मागणी झाली, आणि माझा संयम सुटला तर...

त्या काही क्षणात हे सगळे विचार माझ्या मनात येत राहिले, आणि मला दरदरून घाम फुटला. माझी गाडी अगदी शेवटी पार्क केली होती. चालताना, एका गाडीजवळून पुढे जात असताना, मला मागून आवाज आला, “एक मिनिट. थांबा.”

माझ्या छातीची धडधड मला स्वत:लाही ऐकू येऊ लागली होती. तिथून माझ्या गाडीकडे सर्व जीव गोळा करून, धूम पळ काढावा असंही मला वाटून गेलं. पण तसं न करता मी चालणं थांबवलं आणि मागे वळून तिच्याकडे पाहिलं.

इतकं समोरून पहिल्यांदाच!

ती खरंच खूप सुंदर आणि आकर्षक होती.

“मला तुम्हाला सॉरी म्हणायचं आहे, आणि थॅंक्सही द्यायचे आहेत!”

माझ्या कपाळावरील भलं मोठं प्रश्नचिन्ह तिनं ओळखलं असावं.

“सांगते, सगळं सांगते. मी अशी अचानक तुमच्या जवळ येऊन बसले आणि तुम्हाला ऑकवर्ड केलं त्याबद्दल सॉरी! अॅक्चुअल्ली या कार्यक्रमाला मी तुमच्या खूप आधी आले होते. माझे पती नोकरीनिमित्त वर्षातील बराच काळ बाहेर असतात. कवितांच्या किंवा गझलांच्या कार्यक्रमाला बरोबर येण्यास कुणी मैत्रिणी पण तयार नसतात. आणि मला तर याचे फार वेड आहे. मग मी एकटीच जाते अशा कार्यक्रमांना.

आज मी आले तेव्हा प्रेक्षागृह भरलं होतं. पटांगणात बसायला गेले, तर अगदी मागं एक टपोरी टोळकं दिसलं. आम्हा बायकांना अशा मंडळींची नजर चांगलीच कळते. मला एकटीला आलेलं बघून रात्री परत जाताना या पोरांकडून काही दगाफटका होऊ शकतो अशी मला खूप भीती वाटू लागली. मग मी परत पार्किंगमध्ये गाडीपाशी आले, घरी परत जाण्यासाठी. पण मला हा कार्यक्रम मिस करायचा नव्हता. त्यामुळे काय करावं याचा विचार करत गाडीपाशीच उभी राहिले. थोड्याच वेळात अगदी लांबून तुम्ही तुमची गाडी पार्क करून येताना दिसलात.

स्वत:च स्वत:चं कौतुक करू नये, पण मी तशी चारचौघींत उठून दिसते, याची मला कल्पना आहे. येणारे जाणारे, विशेषत: पुरुष माझ्याकडे वळून बघितल्याशिवाय जात नाहीत. अर्थात मला काही याचा राग वगैरे येत नाहीत. ही सहज प्रवृत्ती आहे, आणि मला तर उलट हे कॉम्प्लिमेंट वाटतं. मी गाडीपाशी येऊन ‘काय करावं?’ असा विचार करत असतानाही समोरून जितके पुरुष गेले ते माझ्याकडे एक कटाक्ष टाकल्याशिवाय गेले नाहीत. तुम्ही माझ्या समोरून गेलात, परंतु आधीच कार्यक्रमाला उशीर झाल्यामुळे असेल कदाचित, पण, माझ्याकडे तुमचे अजिबात लक्ष गेले नाही. मलाही तुम्ही एकटे आल्याचे लक्षात आले. तुम्ही ‘सेफ’ही वाटलात. कार्यक्रम तर मला मिस करायचा नव्हताच. मग मीही तुमच्याच स्पीडने तुमच्या मागून त्या पटांगणात शिरले. तुम्ही इतके घाईने जात होतात, की मी तुमच्या मागून मागून चालत असल्याचे तुमच्या लक्षातही आले नाही. तुम्ही खुर्चीवर बसताच मीही तुमच्या अशी जवळ येऊन बसले, की त्या पटांगणात शिरल्यापासून ज्यांनी ज्यांनी आपल्याकडे पाहिलं, त्यांना आपण नवरा-बायकोच वाटलो. मी शेजारी, इतक्या जवळ येऊन बसल्यानं तुम्हाला आश्चर्य वाटल्याचं मला समजलं होतं, पण आजूबाजूला इतके लोक असताना, आणि कार्यक्रम चालू झाल्याने सगळे चिडिचूप असताना मला काहीच बोलता आलं नाही.

त्यामुळे हे सगळं आत्ता तुम्हाला सांगतेय. तुमच्यामुळे मी कार्यक्रम छान एंजॉय करू शकले, आणि त्या टोळक्याच्या विचारानं अजिबात न घाबरता या पार्किंग मैदानापर्यंत, माझ्या गाडीपर्यंत येऊ शकले. खूप खूप थॅंक्स आणि मनापासून सॉरी!”

असं आणि इतकं बोलून अगदी गोडसं आणि गोंडस हसून ती सुंदरी आपल्या गाडीत बसली, मला निरोपाचा हात दाखवून काही क्षणात मैदानाच्या गेटबाहेर पडली.

मी वळून, हळू हळू माझ्या गाडीच्या दिशेने चालायला सुरुवात केली. मनात कसली तरी रुखरुख लागून राहिली होती.

कसली? ते मलाही फारसं समजलं नाहीये...

समाप्त

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

छान

मानलं बुवा !
शेजारी एखादी सुंदर ललना असताना तिच्य्या सोबत (औपचारिक का होईना) न बोलता इतका वेळ कसे काय बसू शकलात ??

मस्त कथा.बाईंना एक टपोरी टोळकं स्टॅक करत असताना एका अनोळखी माणसाच्या शेजारी बसण्याकडून प्रोटेक्शन ची जाणीव आणि अपेक्षा आहे हे जरा बाळबोध असू शकतं(ही कथेवर टीका नाहीये.बाईवर टीका आहे.टपोरी टोळकी संधी कोणत्याही थराला जाऊ शकतात, अश्या वेळी त्यांना बरोबर नवरा/विश्वासू मित्र/बॉयफ्रेंड/भाऊ/वडील आहेत ही गोष्ट घंटा घाबरवत नाही.तरीही बायकांचा 'याने फरक पडेल' यावर भाबडा विश्वास असतो, याबद्दल बोलतेय.)

आवडली कथा. छान लिहिली आहे.

कॉलेजला असताना एकदा बसने घरी जात असताना बाजूच्या सीटवर एका अनोळखी मुलीशेजारी एक मवालीसारखा बेवडा येऊन बसला. तेव्हा त्या मुलीने लगेच मला पुटपुटत इशारा करत मला तिच्या बाजूला बसायची विनंती केली. मी त्याला म्हणालो आम्ही सोबत आहोत आणि त्याच्याशी जागा बदलून घेत तिच्या शेजारी बसलो.

किती जुना आणि विस्मरणात गेलेला प्रसंग आजा आठवला Happy

कसली? ते मात्र मी तुम्हाला सांगणार नाहीये..
>>>>
मला कळली कसली रूखरुख ते Happy

अश्या वेळी त्यांना बरोबर नवरा/विश्वासू मित्र/बॉयफ्रेंड/भाऊ/वडील आहेत ही गोष्ट घंटा घाबरवत नाही.
>>>>>>

फरक पडतो. एकटी मुलगी आहे म्हणजे संधी आहे हा विचार जो डोक्यात येतो तोच मुळात कोणी सोबत असेल तर येत नाही. अन्यथा असे अजूनही कितीतरी कपल असतीलच ना तिथे. पण तेच ती मुलगी एकटी होती तर नजरेत भरली असे सहज झाले असते.

दुसरे म्हणजे बरीच मवाली पोरे फट्टू देखील असतात. त्यांना सॉफ्ट टारगेट हवे असते. जिथे समोरून काही प्रतिकार होणार नाही. प्रतिकार झाल्यास घाबरतात, वा भांबावतात.

पण मद्याच्या वा दुसर्‍या कुठल्या नशेत असलेल्या मुलांचा मात्र भरवसा नसतो. कारण त्यांचा मेंदूचा ताबा त्या नशेने घेतला असतो. त्यामुळे त्यांची भिती देखील मेली असते. तिथे प्रतिकार करायच्या नादात आणखी डिवचू नये. सावध राहावे. सुरक्षित राहावे.

<<<<तरीही बायकांचा 'याने फरक पडेल' यावर भाबडा विश्वास असतो, >>>
माझे 2-3 वेळेचे अनुभव "खूप फरक पडला" असे आहेत.

नीना गुप्ता ने नुकतंच एक विधान केलं आहे, फरक पडतोच अशा अर्थाचं.
फरक तर पडतो माझ्या अनुभवानुसार, basic level ला तरी

गोष्ट आवडली.
अनुने जे लिहीलंय त्या संदर्भात घर पिक्चर (रेखा विनोद मेहरा) आठवला.

फरक पडतो असे ठामपणे नाही म्हणून चालणार. कुठला एरिया / शहर आहे त्यावर सुद्धा भाकिते बदलतील. उदाहरण म्हणून वाशी शहर मध्यवर्ती सेक्टर्स विरुद्ध वाशी गाव / मानखुर्द / गोवंडी किंवा ठाणे शहर मध्यवर्ती विरुद्ध भिवंडी / मुंब्रा / दिवा.

सांस्कृतिक कार्यक्रम असल्याने दर्दी प्रेक्षकच फक्त सगळे आहेत असेच प्रत्येक वेळी नसावे आणि जरी असले तरी वेळ रात्रीची म्हटल्यावर ठंडीचे औषध प्राशन करुन येणाऱ्या दर्दी प्रेक्षकांचा कल मुख्य स्टेज सोडून इतरत्र भरकटणे आपोआपच होत राहणार.

छान आणि पटणेबल गोष्ट आहे. रिक्षावाला पण सहसा रोखून न बघणाराच निवडला जातो एकतं दुकटं असताना..
पुलेशु.

गोष्टीतील प्रसंग खरोखर घडल्यास काय योग्य अयोग्य ही चर्चा इथे होतेय ह्यात लेखकांच यश आहे
छान लिहिली आहे, बऱ्याच गोष्टी वास्तवात घडणाऱ्या वाटतात, नायकाची विचारसरणी सर्व सामान्य सांसारिक पुरुषाची वाटते.

छान गोष्ट! तिला सेफ वाटलं त्याच्यासोबत चांगलंच आहे.

कोणावर असा विश्वास टाकणं महाकठीण! तोच फायदा घ्यायचा नाहीतर इतकी चिकटून बसली आहे त्याचा. आगीतून उठून फुफाट्यात!

टपोरी टोळकी संधी कोणत्याही थराला जाऊ शकतात, अश्या वेळी त्यांना बरोबर नवरा/विश्वासू मित्र/बॉयफ्रेंड/भाऊ/वडील आहेत ही गोष्ट घंटा घाबरवत नाही.तरीही बायकांचा 'याने फरक पडेल' यावर भाबडा विश्वास असतो, याबद्दल बोलतेय.)>>>>>>>>>>>>+++११११११
प्राईमवर एक इंग्लिश मुव्ही आहे आत्त्ता नाव आठवत नाही. गफ्रे बॉफ्रे विकेंडला बाहेर गेले असताना टपोरी पोरं त्रास देतात आणि त्यातून ती मुलगी कशी सुटते. अ ती भयंकर आहे हा सिनेमा. अनुष्काचा एनएच १० पण उदाहरण आहेच आणि निर्भयाचं पण!

एनएच १० आणि निर्भया टोकाची उदाहरणे आहेत.
हातात काठी घेऊन जंगलात जाल आणि हिंस्त्र श्वापदे आले तर काही फायदा होईल ही अपेक्षा भाबडी आहे.
पण गावशहरातल्या रस्त्याने जाताना समोर कुत्रे येत असेल तर ती काठी आधाराची आहे.
इथे प्रत्येक महिलेचे विचार तिच्या अनुभवावरून आले असतील त्यामुळे कोणाला चूक बरोबर ठरवायचे नाही. पण घरच्या महिलेच्या सुरक्षिततेची काळजी करताना मी काय विचार करतो यावरून हे लिहीत आहे.

अजून एक किस्सा आठवला. बायकोसोबत एकदा बाहेर गावी काही कामानिमित्त गेलो होतो. रस्त्यावर बसची वाट बघत होतो. रस्ता अगदीच तुरळक रहदारीचा. स्टॉप शेजारी एक टपरी. आणि ती चालवणारा एक टपोरी. स्टॉप वर आमच्या सोबत एक मुलगी देखील होती. तो माणूस टपरीवर गाणी लाऊन स्वतःही गात तिच्या सोबत छेडखानी करत होता. ती मुलगी घाबरून आमच्याकडे आली, आणि आमच्यासोबत उभी राहू का म्हणून विनंती केली.

(गंमत हां)
कथेचे एक्सटेन्शन:

सुं.बा. -
"त्यामुळे हे सगळं आत्ता तुम्हाला सांगतेय. तुमच्यामुळे मी कार्यक्रम छान एंजॉय करू शकले, आणि त्या टोळक्याच्या विचारानं अजिबात न घाबरता या पार्किंग मैदानापर्यंत, माझ्या गाडीपर्यंत येऊ शकले. खूप खूप थॅंक्स आणि मनापासून सॉरी!”

डॉ.सा:
"मॅडम थांबा जाऊ नका.अश्या 3 फुटावर उभ्या राहा शेजारी.मी एक व्हॉट्सअप व्हिडिओ कॉल करतोय.माझ्या बायकोची एक मैत्रीण होती कार्यक्रमात, ती आपल्याकडे बघत होती.नंतर फोनवर बोलत बाहेर गेली.आपण व्हिडिओ कॉल मध्ये तिला आणि बायकोला घेऊ आणि मग तुम्ही हे सर्व डायलॉग त्यांच्या समोर परत बोला.नाहीतर आज मी सेफली घरी जाणार नाही."

अनु Lol

सर्वांना प्रतिक्रिया, प्रतिसाद यांबद्दल मनापासून धन्यवाद!

अनु यांचे एक्सटेन्शन खूssप आवडले. धमाल आहे!

अनु Lol

ऋन्मेष लुक्स लाईक बर्याच स्त्रिया/मुलींना तुझ्यात भावा चा भास होतोय. काळजी घे! Wink
>>>>

आशू तुमचा प्रतिसाद आणि अनु यांचे एक्स्टेंशन वाचून मला माझा अजून एक किस्सा आठवला ज्यात अशी जबाबदारी स्वताहून घेऊन लटकता लटकता वाचलो होतो...
(@ धागालेखक, सॉरी हा, आठवताहेत एकेक किस्से तर लिहितोय)

किंवा राहू दे आता.. रात्री वेळ काढून सविस्तर लिहितो. फार धमाल आहे. लांबला तर नवीन धागा काढेन. माझ्याही रेकॉर्डला राहील.

पराग ..सॉरी पण आता हा किस्सा इथेच पोस्ट करतोय

मागच्या वर्षी मी भारतात जाताना San Francisco- Dubai flight वर घडलेला, ....

सवयी प्रमाणे एकटा प्रवास करताना मी isle seat book केली होती. मी seat पाशी पोहचलो तेंव्हा माझ्या आधी एक माणूस window seat मधे बसला होता. पेहराव पठाणी होता मात्र चेहरा थोडा उग्र वाटावा असा. मी जुजबी smile देऊन माझ्या seat वर बसलो. थोड्या वेळात एक साधारण तिशी मधल्या बाई आमच्या seat row पाशी येऊन थांबल्या. पोशाख आणि चेहऱ्या वरून पंजाबी वाटत होत्या. खर तर window seat त्या बाईंची होती, त्यामुळे त्या माणसाला उठाव लागलं, त्या बाईंना आत जाता यावं म्हणून मी पण उठलो. त्या बाई त्यांच्या window seat मधे बसता बसता मला म्हणाल्या की मी isle seat ऐवजी मधल्या सीट वर त्यांच्या बाजुला बसणार का? मी जवळपास ओरडलोच "Why?" ... माझ्या डोक्यात वरच्या कथेतील नायका सारखे असले तसले विचार नव्हते आले पण मला माझी isle seat सोडून मधे बसायचं नव्हतं. त्या माणसाची आमच्या कडे पाठ होती म्हणून त्या बाईने चेहऱ्या वरील हावभाव आणि हातवारे करुन मला सांगण्याचा प्रयत्न केला की त्या उग्र चेहऱ्याच्या पठाणी माणसा पेक्षा मी त्यांच्या बाजूला पुढचे १६ तास असणं त्यांना सेफ वाटत होत...
मला खर तर हसू च येत होत पण चेहऱ्यावर कुठलाही भाव न बदलता मी माझ्या isle seat वर बसलो...
किस्सा इथे संपला नाही
थोड्या वेळाने त्या माणसाला हवा तो प्रोग्राम entertainment system वर सापडत नव्हता, तेंव्हा त्याने मला विचारलं की पाकिस्तानी चित्रपट वैगेरे कसे बघता येतील. मी त्याला दाखवलं कुठे शोधायचं ते... पण आमचं बोलणं त्या बाईंनी एकल आणि त्यांना कळलं की तो माणूस पाकिस्तानी आहे.........
मग काय .....
एकदम सुत जुळल .. त्या पण पाकिस्तानीच होत्या ... त्यांच्या गप्पा सुरू झाल्या आणि मी निवांत झालो ...कारण आता मी त्यांच्या मुलखातही नव्हतो ...
थोड्याच वेळा पूर्वी त्याच पाकिस्तानी माणसापेक्षा त्यांना एक भारतीय पुरुष सेफ वाटला होता