बंगळूर महाराष्ट्र मंडळ हे नवीन नवीन कार्यक्रम आखून पार पाडण्याच्या बाबतीत अत्यंत उत्साही आहे. त्यांचा शिवगंगे ट्रेकबद्दल मेसेज आला तेव्हा लगेचच जाण्याचं पक्कं केलं. याआधी हुळुकुडी बेट्टा नावाच्या ट्रेकला मंडळाच्या सदस्यांबरोबर जाऊन आलो होतो. तेव्हा खूपच मजा आली होती. तो ट्रेक तसा सोपा होता. शिवगंगे त्यापेक्षा थोडासा अवघड असल्याचं गूगल केल्यावर लक्षात आलं. उंचीला सिंहगडाच्या निम्मा आहे. बंगळूर हे पश्चिम आणि पूर्व घाटापासून लांब असल्यामुळे इथे आजूबाजूला आपल्या सह्याद्रीसारखे उंच उंच डोंगर नाहीत. पण अशा टेकड्या मात्र अनेक आहेत.
पहाटे चार वाजता उठून, मुलांना उठवून तयार होऊन निघालो. पाच वाजता बंगळूरच्या बाहेर पडतानाच्या एका टोलनाक्याजवळ भेटायचं ठरलं होतं. आम्हाला थोडा उशीरच झाला. काही सदस्य आले होते, काही यायचे होते, काही पुढे जाऊन पायथ्याशी थांबले होते. आम्हीही पुढे गेलो. पायथ्याशी पोचलो, तेव्हा चहाच्या टपरीजवळ मराठी माणसांचा घोळका दिसला आणि आम्ही लगेचच त्या घोळक्यात सामील झालो. जुने ओळखीचे लोक भेटले, नवीन लोकांशी ओळखी झाल्या. आम्ही सगळे मिळून साधारण वीसपंचवीस जण होतो. होता होता जवळजवळ सगळे येऊन पोचले. एकांच्या गाडीला काहीतरी प्रॉब्लेम आला होता, त्यामुळे आमचा अनुभवी लीडर आणि अजून एक सदस्य आम्हाला आवश्यक त्या सूचना देऊन त्यांना घेऊन येण्यासाठी निघाले आणि बाकीचे आम्ही सगळे साडेसहाच्या सुमारास पायर्या चढायला लागलो. त्यांची सगळ्यात महत्त्वाची सूचना ही होती की वर चढताना वाटेत एका ठिकाणी शंकर-पार्वतीचे मोठे पुतळे लागतील. तिथे पोचलो, की अर्धा ट्रेक झाला, असं समजा. त्यानंतर माकडांचा उपद्रव सुरू होतो, त्यामुळे जे काही खायचं आहे, ते तिथेच (शंकर-पार्वतीला साक्षी ठेवून!) खा, त्यानंतर नको.
शिवगंगेच्या पायथ्याशी एक देवस्थान आहे आणि चढताना वाटेतही एकदोन ठिकाणी छोटी देवळं आहेत. चढायची वाट बर्याच ठिकाणी तशी अरुंदच आहे. आमच्यात एक तीन-चार वर्षांचा अत्यंत उत्साही पिटुकला होता. आम्ही दमलो, तरी तो दमत नव्हता. आम्ही इतक्या लवकर चढायला सुरुवात करूनही आम्हाला वरून खाली येणारे लोक भेटत होते. शिवाय आपल्यापेक्षा भराभर वर जाणारे कुणी मागून आले, तर त्यांना वाट करून द्यावी लगत होती. काही काही ठिकाणी अगदीच अडचण झाली. वर देवस्थान असल्यामुळे यात भक्तमंडळींचं प्रमाण भरपूर होतं. त्यातले बरेचसे अनवाणी चालत होते. त्यांचं कौतुक वाटलं. बराच वेळ चाललो आणि बर्यापैकी दमलो, तरी त्या सुप्रसिद्ध शंकर-पार्वतींचं दर्शन काही होईना! त्यानंतर अजून अर्धी वाट चढायची आहे, हेही विसरता येईना.
अखेर शंकर-पार्वती दिसले. त्यांच्या समोरच्या मोठ्या कट्ट्यावर मंडळी स्थानापन्न झाली आणि खाण्याचे डबे उघडले गेले. फळं, सँडविचेस, कोरडी भेळ, चिक्की यांची देवाणघेवाण झाली. चढून लागलेला दम जरा जिरला आणि ’अजून निम्मा ट्रेक बाकी आहे’ याची मानसिक तयारी करून आम्ही उठलो. पण खरं म्हणजे उरलेलं अंतर निम्म्यापेक्षा बरंच कमी वाटलं. उंचीच्या दृष्टीने मात्र हे ठिकाण नक्कीच निम्म्यावर असेल. कारण यानंतर चढ तीव्र होत गेला. त्यामुळे चढणं कठीण वाटलं, पण त्या मानाने वेळ कमी लागला. पुढे सगळीकडे रेलिंग्ज बसवली आहेत, हे खूपच बरं झालं. त्याशिवाय चढणं अशक्य झालं असतं.
वर पोचलो तोपर्यंत धुकं/ढग आजूबाजूला होते. ऊन असं पडलंच नव्हतं. पण जवळजवळ वर पोचलो आणि अचानक ढग बाजूला झाले. लख्ख ऊन पडलं. खालच्या बाजूला मात्र ढग तरंगत होते. माझ्या आणि नवर्याच्या मनात एकदम इंद्रवज्राचा विचार आला. अजून थोडं वर चढून आम्ही पलीकडच्या बाजूला गेलो तर इंद्रवज्र दिसू शकेल असं वाटलं आणि भराभर आम्ही तिकडे गेलो. सकाळचे साडेआठ वाजले होते. आता सूर्य आमच्या मागे होता, समोर खोल दरी होती आणि त्या दरीत ढग तरंगत होते. ही अगदीच अनुकूल परिस्थिती होती. सूर्यासमोर आता परत ढग आले होते. पण एकदोन मिनिटांतच ते बाजूला गेले आणि समोरच्या दरीत आम्हाला इंद्रवज्र दिसलं!
खालच्या ढगावर पडलेली आपली सावली आणि त्याभोवती दिसणारं सप्तरंगी वर्तुळाकार इंद्रवज्र. इंद्रधनुष्यापेक्षा हे बरंच लहान असतं. इंग्रजीत याला ’ग्लोरी’ म्हणतात. हरिश्चंद्रगडावरून दिसणारं इंद्रवज्र बरंच प्रसिद्ध आहे. गो. नी. दांडेकरांनी राजगडावरूनही हे पाहिलं आहे. मला कधी ते प्रत्यक्षात बघायला मिळेल असं मला वाटलं नव्हतं. मी फारसे ट्रेक्स केलेले नाहीत, अवघड तर मुळीच नाही. शिवाय आता वास्तव्य बंगळूरला. त्यामुळे हरिश्चंद्रगडासारख्या ठिकाणी जाणं आणि त्यातही हे दुर्मिळ असलेलं दृश्य बघणं, याची शक्यता अगदीच कमी आहे. (विमानप्रवासात दिसू शकतं. पण डोंगर चढून आल्याचं सार्थक वाटायला लावणार्या या दृश्याची सर विमानातून दिसणार्या दृश्याला नाही.) त्यामुळे इथे हे अनपेक्षितपणे समोर आल्याचा मला खूप आनंद झाला! आम्ही आमच्या ग्रुपमधले जे वर पोचले होते, त्यांनाही बोलवून इंद्रवज्र दाखवलं. सूर्य अधूनमधून ढगाआड जात असल्यामुळे इंद्रवज्रही अधूनमधून अदृश्य होत होतं. पण अगदी छान बघता आलं, फोटोही काढले.
आता जवळजवळ सगळेजण वर पोचले होते. अगदी आमचा लीडरही मागे राहिलेल्या सगळ्यांना सोबत घेऊन वेळेत वर पोचला होता. शिरस्त्याप्रमाणे फोटोसेशन्स पार पडली. खाली दिसणारं दृश्य अतिशय सुंदर होतं. आम्ही आत्ता उभे होतो तिथून वरच्या बाजूला शंकराचं मुख्य देऊळ होतं. त्याच्या पलीकडे खाली जाऊन थोडा वेळ फिरलो. तिथून दक्षिण दिशा, म्हणजे बंगळूरची दिशा दिसत होती. अर्थात आम्ही पन्नास किलोमीटर लांब होतो आणि हवेत धुकं होतं त्यामुळे काही दिसण्याचा प्रश्न नव्हता.
परत मागे येऊन थोडी पोटपूजा केली. तिथे काकडी, अननस, कोरडी भेळ वगैरेचं दुकान होतं. असंख्य माकडं होती त्यामुळे खाताना अतिशय काळजी घ्यावी लागत होती.
थोड्या वेळाने खाली उतरायला लागलो. तीव्र चढ चढताना जेवढा जाणवला नव्हता, तेवढा आत्ता उतरताना जाणवला. वाटेत शंकर-पार्वतीसमोर एक ब्रेक घेतला.
आता वाटेतल्या टपर्या उघडल्या होत्या. चवदार मसाला ताक प्यायलं. नंतर एका ठिकाणी तिखट-मीठ घातलेले रायआवळे घेतले. आहाहा..कित्येक वर्षांनी खाल्ले. आता अकरा-साडेअकरा वाजले होते आणि कडक ऊन पडलं होतं. आत्ताही वर चढायला सुरुवात करणारे महाभाग होते. त्यातले काही वाटेतल्या देवळात थांबणारे असले, तरी काहीजण नक्कीच वरपर्यंत जायच्या उद्देशाने आलेले होते. उतरताना शेवटी शेवटी जरा कंटाळाच आला. ’वाट सरता सरेना’ असं वाटायला लागलं. एकदाचे पार्किंगजवळ पोचलो. योगायोगाने उस्मानाबादहून इथे ऑफिसच्या सहलीसाठी आलेल्या काही मुली भेटल्या. त्यांनाही मराठी माणसं भेटल्याचा आनंद झाला.
गाडी काढून निघालो. वाटेत जेवून दोन-अडीचपर्यंत घरीही पोचलो.
रोजच्या रहाटगाडग्यातून असा एखादा दिवस मिळाला, की तो मनाला ताजातवाना करतो, हे वाक्य कितीही गुळगुळीत झालेलं असलं, तरी ते १००% खरं आहे!
वाह
वाह
प्रसन्न अनुभव
प्रचि खूप छान
छान अनुभव आणि शब्दांकनही छान.
छान अनुभव आणि शब्दांकनही छान. इंद्रवज्र नावच मुळी मला नेहमी मोहक वाटतं.
ओहो!! कसलं भारी गं!! तुम्हाला
ओहो!! कसलं भारी गं!! तुम्हाला योग्य वेळी सुचलं आणि नेमकं दिसलं किती भाग्यवान!! theory ज्ञानाचा असा प्रॅक्टिकल उपयोग योग्य वेळी करता आला आणि सुंदर अनुभव मिळाला... छान लिहिलंय, आणि फोटो पण सुरेख!
छान लेख आणि फोटो
छान लेख आणि फोटो
दृश्य सुंदर आहे वरून पाहायला
माकडांना अजून सुगावा नाही वाटते माणसे खाऊची काय आयडिया करतात ते
तव शहाणे झाले आणि शंकर पार्वती मंदिरापर्यंत आले तर अजूनच अडचण
सह्याद्रीत देखील आताशा फारच लोकसंख्या वाढलीय माकडांची.
एकदा लोहगड दरवाज्यात जाउन परत आलो होतो त्यांचे आक्रमक टोळके बघून.
खत्तरनाक! जबरी अनुभव. मी
खत्तरनाक! जबरी अनुभव. मी शाळेत असताना एकदा दुपारी आकाशात वर गोल इंद्रधनुष्य पाहिलं आहे. एकदा विमानातून जात असताना खाली इंद्रवज्र आणि त्याच्या मधोमध विमानाची सावली असं एक नितांत सुंदर दृश्य दिसलं होतं. कितीही शब्दात मांडलं तरी नाही नीट मांडता येत ते सौंदर्य.
छान लेख
छान लेख
इंद्रवज्र पाहायला मिळालं हे भाग्य
हे फारच भारी आहे.
हे फारच भारी आहे.
असं दिसतं माहितच न्हवतं! लेखही छान.
धन्यवाद लोकहो.इंद्रवज्र नावच
धन्यवाद लोकहो.
इंद्रवज्र नावच मुळी मला नेहमी मोहक वाटतं. हो ना, त्या मानाने 'ग्लोरी' हे नाव सपाट वाटतं.
अंजली, येस, मोठाच योगायोग झाला!
झकासराव, मीही हाच विचार करत होते की माकडं खाली का येत नाहीत? खाली आली तर भरपूर खायला मिळेल. आणि पायथ्याशीही माकडं आहेत. मधल्या भागातच फारशी नाहीत.
एकदा लोहगड दरवाज्यात जाउन परत आलो होतो त्यांचे आक्रमक टोळके बघून. खरं आहे, भीतीच वाटते.
ह.पा., तुम्ही दुपारी आकाशात पाहिलेलं बहुतेक सूर्याच्या भोवती पडलेलं खळं असणार. तेही रंगीत वर्तुळाकार दिसतं. Halo of sun.
पौर्णिमेच्या चंद्राभोवतीही दिसतं, पण ते रंगीत नसतं.
शब्दांत नीट मांडता येत नाही हेही खरं.
किल्ली, ऋतुराज, अमितव, धन्यवाद
हे अजून नाही पाहिलं.
हे अजून नाही पाहिलं.
सहल वर्णन सोपं आणि छान. बेंगळुरूत कानडी किती बोललं जातं?
कन्नड बरंच बोललं जातं, पण येत
कन्नड बरंच बोललं जातं, पण येत नसेल तरी हिंदी-इंग्रजीवर सामान्यतः निभतं. माणसं जनरली सहकार्य करणारी आहेत. अपवाद अर्थात भेटतात.
मला रोजच्या वापरातलं कन्नड चांगलं समजतं आणि बोलताही येतं. संदर्भ माहिती असेल तर एकेक अक्षर लावून वाचताही येतं.
भारी! फोटोही मस्त!
भारी! फोटोही मस्त!
Dr Bro आणि Not in Office हे
Dr Bro आणि Not in Office हे दोन कन्नडा- इंग्रजी यूट्यूब चानेल पाहतो तेव्हा कन्नडाची गरज लागते. थोडीफार कळते.
मस्त
मस्त
काय मस्त फोटो आहेत! वर्णनही
काय मस्त फोटो आहेत! वर्णनही आवडले. इंद्रवज्राच्या फोटो मधे त्यावर जी सावली दिसत आहे ती फोटो काढणार्या व्यक्तीचीच असते का?
मला पण दुसऱ्याचं इंद्रवज्र
मला पण दुसऱ्याचं इंद्रवज्र आपल्याला वाकून बघितलं तर दिसतं का विचार आलेला. वाकून बघायची सवय!
#क्रॉसबीबीजोक.... इंडिव्हिज्युली रॅपड इंद्रवज्र असतं का? का आकाश भर डझनाने इंद्रवज्र!
फारएण्ड, हो, सावली माझीच आहे.
फारएण्ड, हो, सावली माझीच आहे. पण ती disproportionate असते.
अमितव, इंद्रवज्र, इंद्रधनुष्य प्रत्येकाची स्वतंत्र असतात.
सुविचार-
' या जगात आपलं इंद्रधनुष्य आपल्यालाच शोधावं लागतं. दुसरं कुणीही ते बघू शकत नाही, कितीही वाकून बघितलं तरी.'
वॉव! इंद्र वज्र अप्रतिम दिसतय
वॉव! इंद्र वज्र अप्रतिम दिसतय! ट्रेकिंग चे वर्णन ही आवडले.
(मलाही हे नाव, इंद्र धनुष्य त्यांच्या इंग्रजी काऊंटर पार्ट नावापेक्षा अधिक आवडतात. Duke's nose la मराठीत नागफणी म्हणतात, किती छान नाव ठेवलेय.)
या जगात आपलं इंद्रधनुष्य
या जगात आपलं इंद्रधनुष्य आपल्यालाच शोधावं लागतं. दुसरं कुणीही ते बघू शकत नाही, कितीही वाकून बघितलं तरी >>> हे भारी आहे.
इंग्रजी नावापेक्षा मराठी नाव जास्त समर्पक असण्याबद्दल +१
क्रॉसबीबीजोक >> >लोल अमित.
मस्त!..
मस्त!..
फोटो कालच पाहिलेला.. लेख वाचायला आजा वेळ मिळाला..
हरिश्चंद्रगडावरून दिसणारं इंद्रवज्र मायबोलीवर सुद्धा लेख फोटो पाहिलेले. तेव्हा पासूनच वाटतेय की हे बघणे कधी नशिबात येईल आपल्या...
धन्यवाद ऋन्मेष, मनमोहन.
धन्यवाद ऋन्मेष, मनमोहन.
एकच नंबर.
एकच नंबर.
भाग्यवान आहेस.
फोटोही सुंदर आलाय.
आज मोठ्या कालावधी नंतर मायबोलीवर आल्याचे सार्थक झाले.
बाय द वे, हा धागा जेव्हा
बाय द वे, हा धागा जेव्हा जेव्हा वरती येतो, तेव्हा त्याचं शीर्षक मी 'स्वरगंगेच्या काठावरती'च्या चालीत वाचतो.
ह.पा., टाळी द्या मला शिवगंगे
ह.पा., टाळी द्या मला शिवगंगे म्हटल्यावर हेच गाणं आठवतं. In fact मी या लेखाचं नाव ठेवतानाही 'शिवगंगेच्या शिखरावरुनी' अशी जुळवाजुळव करण्याचाही प्रयत्न केला पण इंद्रवज्र त्यात बसेना!
हर्पेन, धन्यवाद _/\_
अनुभव, शब्दांकन आणि
अनुभव, शब्दांकन आणि छायाचित्रे छान.
वावेंचा लेख आहे म्हटल्यावर इंद्रवज्राच्या मागचं विज्ञानही मांडलं असेल असं वाटलं.
याबद्दल मायबोलीवर याआधी अनुभव लिहिले गेलेत. मला त्यातला हा आठवला
https://www.maayboli.com/node/46146
यातला फोटो मायबोलीवरच्या इतर इंद्रवज्रांच्या तुलनेत जवळून घेतला आहे का?
वावे, वरती भरत यांनी लिंकवर
वावे, वरती भरत यांनी दिलेल्या लिंकवर जसा फोटो आहे, अगदी तसंच मला दिसलं होतं लहानपणी (माझ्या पहिल्या प्रतिसादात लिहिलं होतं ते). सप्तरंगी असलं तरी त्याला खळंच म्हणायचं का?
भरत, ते दोन्ही भौतिक दृष्ट्या वेगळे आहेत. त्या लिंकवर सूर्य मधोमध आहे. याउलट वावेंच्या फोटोत व्यक्तिच्छाया.
(भरत, तुमचा भाषा धाग्यावरचा प्रतिसाद वाचून वरती छ आधी च जोडला आहे)
हो, खळं (halo) वेगळं आणि
हो, खळं (halo) वेगळं आणि इंद्रवज्र वेगळं.
इंद्रवज्र आणि इंद्रधनुष्य ही सूर्याच्या विरुद्ध दिशेला (anti solar point) दिसतात. खळं सूर्याच्या ( किंवा चंद्राच्या) भोवती दिसतं.
भरत प्रयत्न करते याच्यामागचं विज्ञान (समजून घेऊन) लिहिण्याचा.
अच्छा. दोन गोष्टी वेगळ्या
अच्छा. दोन गोष्टी वेगळ्या आहेत तर!
सावलीचं कारण कळलं.
मस्त लेख आणि फोटोज
मस्त लेख आणि फोटोज.इंद्रावज्राबद्दल चक्क काहीच माहीत नव्हतं.
मस्त अनुभव आहे.
मस्त अनुभव आहे.
मला हर्पेन यांचा लेखही आठवला.
हर्पा,
स्वरगंगेच्या काठावरती+१ वचन दिले तू मलाSS- पर्यंत चाललं आहे माझं तर
लेख आणि छायाचित्रे फारच मस्त!
लेख आणि छायाचित्रे फारच मस्त!