वर्ल्डकप फायनल : २० वर्षांनंतर पुन्हा एकदा... भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया

Submitted by प्रथमेश काटे on 19 November, 2023 - 01:47

मागील महिन्यात एकदिवसीय विश्वचषक सुरूवात झालं, आणि आता पाहता पाहता अंतिम सामना येऊन ठेपला आहे. मागच्या वेळी वर्ल्डकपच्या सेमीफायनल मॅचमध्ये भारतीय संघाला न्यूझीलंड कडून पराभव स्वीकारावा लागला होता. आताही सेमीफायनल सामन्यात हीच न्यूझीलंडची टीम समोर उभी ठाकली होती. पुन्हा एकदा अटीतटीचा सामना रंगला. पहिल्या डावात कॅप्टन रोहित शर्मा, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर व के एल राहुल या पिचवर उतरलेल्या प्रत्येक बॅटरने आपापल्या निरनिराळ्या शैलीत उत्कृष्ट बॅटिंग करून ३९७ धावांचा डोंगर उभा केला होता ; पण न्यूझीलंड बॅटिंगला उतरल्यानंतर मात्र सामन्यात अनिश्चितता निर्माण झाली होती. क्षणाक्षणाला पारडं कधी भारताच्या तर कधी न्यूझीलंडच्या बाजूने झुकत होतं. पुन्हा करोडो भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या मनावर दडपण वाढत होतं. मात्र शेवटी मोहम्मद शमीच्या धुरंधर गोलंदाजीसमोर न्यूझीलंडचे फलंदाज फार काळ तग धरण्यात अपयशी ठरले. आणि भारताने दडपणाखालच्या, नॉक आऊट सामन्यात हाराकिरी पत्करावी लागण्याची नामुष्की टाळण्यात शेवटी यश मिळवले.

भारतीय संघाने अंतिम फेरीत प्रवेश मिळविला आहे. आणि आता भारतीय संघाला सामना द्यावा लागणार आहे, तब्बल पाच वेळा विश्वचषकात पटकावणाऱ्या क्रिकेट मधील अत्यंत बलाढ्य अशा ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध. या आधीही २००३ साली भारतीय संघाने वर्ल्डकपमध्ये फायनल मॅच पर्यंत मजल मारून ऑस्ट्रेलियाशी सामना दिला होता. ज्यात भारतीय संघाला पराभव स्वीकारावा लागला होता. तेव्हा काय परिस्थिती होती. वीस वर्षांच्या काळात आता काय फरक पडला आहे, भारतीय संघाचे सामना जिंकण्याचे Chances किती आहेत, याच काही गोष्टींचा थोडक्यात आढावा या लेखातून घेण्याचा एक प्रयत्न या लेखातून केला आहे.

°°°°°°

२० वर्षांपूर्वी...

( तेव्हाचा वर्ल्डकप मी पाहिलेला नाही. वेगवेगळ्या Sources मधून ही माहिती ऐकण्यात, वाचण्यात आली आहे.)

साल २००३. १९८३ साली कपिल देव यांच्या नेतृत्वात वर्ल्डकप मध्ये मिळविल्यानंतर वीस वर्षांनी भारतीय संघाला फायनल गाठण्यात यश मिळालं होतं. आणि फायनलमध्ये सामना द्यायचा होता चॅम्पियन असलेल्या अॉस्ट्रेलियन संघाशी.

सौरव गांगुली सारखे तडफदार, डॅशिंग कॅप्टन, जगातील महानतम खेळाडूंमध्ये ज्यांची गणना होते असे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, शिवाय राहुल द्रविड, वीरेंद्र सेहवाग, युवराज सिंग, झहीर खान, हरभजन सिंग, आशिष नेहरा, नयन मोंगिया यांसारखे एकसे एक महारथी तेव्हा भारतीय संघात होते.

पण प्रत्यक्ष खेळ मात्र अनपेक्षित झाला. रिकी पॉंटिंगची धीम्या सुरुवातीनंतर ऐनवेळी केलेली तुफान फटकेबाजी, त्याला डेमियन मार्टिनने केलेली महत्वाची साथ, शिवाय आधी अॅडम गिलख्रिस्ट ने केलेली अर्धशतकी खेळी यांमुळे ऑस्ट्रेलियाने मोठी धावसंख्या उभारली होती. उत्तरात भारतीय संघ बॅटिंगला उतरल्यावर फॉर्ममध्ये असलेले सचिनो तेंडुलकर लवकर बाद झाले. सौरव गांगुली व वीरेंद्र सेहवाग मारून खेळत असताना गांगुली बाद झाला. द्रविडने सेहवागला चांगली साथ दिली मात्र अर्धशतकाजवळ येताच तोही बाद झाला. सेहवागही धावबाद झाला. आणि युवराज सिंग देखील खास कामगिरी करू शकला नाही. आणि या वर्ल्डकपच्या अंतिम‌ फेरीपर्यंत पोहोचूनही विश्वचषक जिंकण्याचं स्वप्न अधुरं राहिलं.

°°°°°°°

Team India

भारतीय संघाची यावेळीच्या वर्ल्डकप मधील कामगिरी उत्कृष्ट झाली आहे. अगदी सर्वच खेळाडू उत्तम फॉर्ममध्ये आहेत. रोहित शर्मा व विराट कोहली यांनी या वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या टॉप 5 फलंदाजांच्या यादीत स्थान मिळवले आहे. शुभमन गिल ची फलंदाजी कौतुकास्पद व आश्वासक होत आहे. श्रेयस अय्यरने आधीच्या जराशा साधारण परफॉर्मन्स नंतर शतक, अर्धशतकांचा सपाटा लावला आहे. के एल राहुलचा खेळही छान सुरू आहे.

गोलंदाजांनी तर या वर्ल्डकपमध्ये विशेष कामगिरी बजावली आहे. मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव व रविंद्र जडेजा या धुरंधर गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, इंग्लंड, श्रीलंका आणि साऊथ आफ्रिका अशा या संघांच्या भल्या भल्या बॅटिंग ऑर्डर्स ची दाणादाण उडाली आहे. श्रीलंका व साऊथ आफ्रिकेला तर शंभरीही ओलांडता आलेली नाही.

मागील दोन वर्ल्डकपमधील खेळ पाहून भारतीय संघ दडपणाखालील नॉक आऊट सामन्यांत हाराकिरी करतो असं सारखं म्हटलं जातं. मला स्वतःला हे मुळीच पटत नाही. एखाद्या दोन अनुभवांवरून कुठलेही जजमेंट
करणे अयोग्य वाटते. परिस्थिती बदलू शकते. सुधारणा करता येतात. मागील दोन्ही वेळा सेमीफायनल सामन्यात‌च भारतीय संघाचा पराभव झाला. मात्र यावेळच्या न्यूझीलंड संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात भारतीय संघाच्या दणदणीत विजयामुळे याच बदलाची चिन्हे दिसू लागली आहेत.

खेळाडू आपल्या खेळात आवश्यक त्या सुधारणा करताना दिसत आहेत. सुरुवातीच्या सामन्यांत मोहम्मद सिराजच्या षटकांत खूप धावा पडत होत्या ; पण नंतर मियां मॅजिक ' मोहम्मद सिराजचे मॅजिक पुन्हा चालू लागले. श्रेयस अय्यर सुरूवातीस जलद खेळण्याच्या प्रयत्नात वारंवार झेलबाद होत होता. ज्यामुळे त्याच्यावर टीकाही झाल्या ; पण नंतर तो पिचवर पाय रोवून सातत्याने चांगली कामगिरी करताना दिसून आला आहे.

°°°°°

Team Australia :-

आताचा ऑस्ट्रेलिया संघ पूर्वीसारखा नाही, असं माजी क्रिकेटपटू, क्रिडा समीक्षक व चाहते म्हणतात. यात तथ्य नाही असं म्हणता येत नाही. आताच्या संघाची पूर्वीच्या ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाशी बरोबरी होऊ शकत नसेलही. पण तुलना करायची आहेच कशाला ? सद्य स्थितीबद्दल बोलायचं झाल्यास डेव्हिड वॉर्नर, मिशेल मार्श, स्ट्रेविस हेड, मिचेल स्टार्क, अॅडम जॅम्पा, जॉश हेजलवूड वर्ल्डकपमध्ये चांगल्या फॉर्ममध्ये दिसून आले.
ऑस्ट्रेलियाला सुरुवातीचे सलग तीन सामने हरावे लागले. मात्र त्यानंतर या संघाने कमबॅक केलं, आणि आता थेट फायनल पर्यंत धडक मारली आहे. या वर्ल्डकपमध्ये तीन वेळा याच ऑस्ट्रेलियन संघाने हातातून निसटत चाललेला शेवटी सामना जिंकून दाखवला आहे. अफगाणिस्तान विरूद्ध च्या सामन्यात ग्लेन मॅक्सवेलने दुखापत झाल्यानंतरही न थांबता चिकाटीने खेळून द्विशतक करत अडचणीत सापडलेल्या संघाला सामन्यात विजय प्राप्त करून देण्यामध्ये मोलाचा वाटा उचलला होता. यावरून आताचा ऑस्ट्रेलिया संघही नक्कीच धडाडीचा व कार्यक्षम असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे हा सामना रंगतदार होणार यात शंका नाही.

© प्रथमेश काटे

Group content visibility: 
Use group defaults

विश्वचषक जिंकल्याबद्दल ऑस्ट्रेलियन संघाचे अभिनंदन. भारताने सलग दहा सामने जिंकले होते, पण महत्वाच्या सामन्याच्यावेळी हार पत्करावी लागली.

खेळ आहे असे आपण म्हणायचे, पण आता त्यामधे अमाप पैसा, तसेच राजकारणाने शिरकाव केला आहे. जाणकार लोक या अपयशाची चिकीत्सा / विश्लेषण करतीलच.