झिम्मा २ - काही निरीक्षणे कम परीक्षणे # प्रतिसादात स्पॉइलर

Submitted by ऋन्मेऽऽष on 6 November, 2023 - 10:24

झिम्मा - १ चा धागा इथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/80649

आता झिम्मा २ कडे वळूया.
मी कालच सकुसप बघून आलो. काही निरीक्षणे.

१) झिम्मा १ जिथे संपतो त्याच पानावरून पुढे झिम्मा २ सुरू होतो.

२) झिम्मा १ ज्यांना आवडला त्यांना झिम्मा २ किंचित कमी किंवा किंचित जास्त आवडू शकतो. पण आवडेल हे नक्की.
ज्यांना झिम्मा १ आवडला नाही त्यांना देखील आवडण्याची शक्यता आहे. प्रयत्न सोडू नका.

३) मी सकाळच्या शो ला लेकीसोबत गेलो होतो. मी झिम्मा १ पेक्षा झिम्मा २ किंचित कमी आवडला या गटात मोडतो.
माझी बायको तिच्या आईसोबत रात्रीच्या शो ला गेली होती. ती झिम्मा १ पेक्षा झिम्मा २ किंचित जास्त आवडला या गटात मोडते.
तर माझी लेक जिन्हे झिम्मा १ पाहिलाच नव्हता तिला एक स्वतंत्र चित्रपट म्हणून झिम्मा २ आवडला.
मॉरल ऑफ द स्वानुभव - तीन पिढ्यातील बायकापोरींनी एंजॉय केलेला हा झिम्मा देखील महिलावर्गाने डोक्यावर घेण्याची शक्यता आहे.

४) मला झिम्मा २ किंचित कमी आवडला, किंबहुना मी तितका समाधानी झालो नाही, याचे कारण कदाचित या चित्रपटात वेगळेपणा किंवा फ्रेशनेसपणा नसल्याने असेल. एखाद्या छानश्या सिरीयलचा पुढचा एपिसोड बघतोय असे वाटले. कदाचित माझ्या अपेक्षा वेगळ्या आणि कदाचित चुकीच्या देखील असाव्यात.

५) आजूबाजूची पब्लिक मात्र चित्रपट फार एंजॉय करत होती. बरेच प्रसंगात खिदळून हसत होती. स्पेशली निर्मिती सावंतने काहीही केले तरी हसायला सुरुवात करत होते. त्यामुळे चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालायला हरकत नाही. मराठी चित्रपट चालला तर आनंदच आहे. माझी वैयक्तिक आवड-नावड तितके महत्व राखत नाही.

६) परीक्षण लिहायचे सोडून मी असली निरीक्षणे कसली लिहितोय असे तुम्हाला वाटत असेल. पण हे वाचणार्‍या बहुतांश जनतेने झिम्मा १ पाहिला आहे, आणि त्यांना चित्रपटाची कथा आणि जातकुळी माहीत असेल हे गृहीत धरले आहे.

७) वेगळेपण घेऊन येतात ती दोन नवीन पात्रे. त्यातील एक म्हणजे शिवानी सुर्वे. तिला साजेसे असे फटकळ आणि माणूसघाणे कॅरेक्टर दिले आहे. ते तसे असण्यामागे एक ट्रॅजेडी दिली आहे. ओवरऑल तिचे कॅरेक्टर आणि तिच्या स्टोरीचा ट्रॅक चांगला जमला आहे.

८) दुसरी नवीन पाहुणी आहे सैराट फेम आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरू. जी निर्मिती सावंत यांची सून दाखवली आहे. तिची काही स्पेशल अशी स्टोरी नाही. एक चुणचुणीत पोरगी दाखवली आहे. जिची आपल्या नुकतेच मॉडर्न बनू पाहणार्‍या सासूशी केमिस्ट्री जुळताना दाखवली आहे. मला या दोन्ही नवीन एंट्री आवडल्या.

९) पहिल्या भागात क्षिती जोग ही नवर्‍यापश्चात आत्मविश्वासाच्या अभावापायी धडपडणारी एक अबला नारी दाखवली होती. त्यात पुरेसा आत्मविश्वास कमावल्याने आता दुसर्‍या भागात तिच्यावर दुसरा जोडीदार शोधायची जबाबदारी टाकली आहे. ती तिला पेलवते की नाही, तिला तसाच साजेसा कोणी भेटतो की नाही हे चित्रपटातच बघा.

१०) सुहास जोशी सुरुवातीलाच डिक्लेअर करते की ती सगळ्यांना सरप्राईज देणार आहे. जे देते त्याला pleasant surprise तर नाही म्हणू शकत. पण त्यातूनही काहीतरी सकारात्मक शोधणे हा झिम्माचा युएसपी इथेही आहेच.

११) सोनाली कुलकर्णी आणि मृण्मयी गोडबोले यांचा पत्ता या चित्रपटात कटला आहे.पण त्यामुळे कोणाचे काही अडू नये. मृण्मयी गोडबोले मिसिंग आहे हे मी घरी आल्यावर माझ्या डोक्यात आले.

१२) सिद्धार्थ चांदेकरचा सतत हेवा वाटत राहतो. ही भुमिका (भले आपण कलाकार का नसेना) आपल्याला मिळायला हवी होती असे सतत वाटत राहते. पण ते शक्य नाही. कारण त्याचे काम ईतके सहज सुंदर झाले आहे की झिम्मा-३ मध्ये ईतर कोणी बाया नसल्या तरी हा बाप्या असणारच.

१३) संगीत सुमधुर आहे. झिम्मा टायटल ट्रॅक, तसेच अध्येमध्ये येणारी एखाद दुसरी गाणी आता शब्द आठवत नसले तरी छान वाटतात. "मराठी पोरी दुनियेला दाखवती माज" हे गाणे शेवटी येते. तोपर्यंत चित्रपटाचा मूड तयार झाला असल्याने मी त्याचा अर्ध्या एक मिनिटभराचा विडिओ काढला. हे बेकायदेशीर असेल तर क्ष्मस्व. व्हॉटसप स्टेटसवर शेअर करून झाला की डिलीट मारतो.

१४) बायकांच्या कपडेपटाबद्दल बायकांनाच जास्त कौतुक असते. पुरुष त्या फंदात पडत नाहीत. तरी मराठी पोरी या गाण्यातील सर्वांचे कपडे आणि स्पेशली त्या कपड्यांचे रंग मला फार्र आवडले.

१५) परदेशातली मोजकी निसर्ग द्रुश्ये छान चित्रित केली आहेत. ती मोठ्या पडद्यावर बघायला मजा आहे. एकूणच चित्रपटाची फ्रेम सुखद आहे. तर चित्रपट ओटीटीवर यायची वाट न बघता थिएटरला जायला हरकत नाही. जितके लवकर बघाल तितके यावर स्पॉईलरची भीड न बाळगता चर्चा करायला मजा येईल.

१६) अखेरीस भाग एक प्रमाणेच झिम्मा ग्रूपची व्हॉटसप चॅट दाखवली आहे. सगळे अनुभवी, सुज्ञ आणि रसिक प्रेक्षक ती चॅट थांबून वाचत होते. मी सुद्धा वाचत थांबलो तसे लेकीने मला हटकले. म्हणाली, आता हे कश्याला वाचतोयस? एवढे पडले आहे तर तू सुद्धा त्यांचा व्हॉटसप ग्रूप जॉईन कर ना... मग काय, अशी गूगली आल्यावर नाईलाजाने विकेट टाकून बाहेर पडावे लागले. आता तेवढ्यासाठी ओटीटीवर चित्रपट कधी येतोय याची वाट बघणे आले.

१७) ही निरीक्षणे लिहिता लिहिता मला जाणवले की मी उगाच मला दुसरा भाग पहिल्यापेक्षा किंचित कमी आवडला असे समजत आहे. कदाचित मला देखील हा भाग किंचित जास्त आवडला असण्याची शक्यता निर्माण झाली आहे..

छे, जरा कन्फ्यूजनच आहे,
पण सारांश असा - एकूणात कोणी माझ्याकडे रिव्यू मागितल्यास - चित्रपट छान आहे, चित्रपटगृहात जाऊन बघायला हरकत नाही. हे माझे उत्तर तयार आहे.

सतरा तिथे खतरा म्हणत ईथेच थांबतो.
अजून काही अठरा-एकोणीस लिहावेसे वाटले तर प्रतिसादात भर टाकत जाईन.. माझे प्रतिसाद आवर्जून फॉलो करा. या पोस्टला बदाम लाईक करा. मराठी चित्रपटांवरचे प्रेम दाखवण्याची हिच ती वेळ Happy

धन्यवाद,
ऋन्मेऽऽष

ट्रेलर ईथे बघू शकता
https://www.youtube.com/watch?v=t4fRUhn-KvA
दुसरा ट्रेलर इथे
https://youtu.be/MCrA8dFHG4E?si=8fpR4Whv7wagzG6v
मराठी पोरींचे तडकते फडकते गाणे इथे ऐकू शकता
https://www.youtube.com/watch?v=90cVpTfjfDY

पुन्हा एकदा,
धन्यवाद,
ऋन्मेऽऽष

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

झिम्मा २ आज रिलीज झाला.
शक्य झाल्यास ओटीटीवर यायची वाट बघू नका.
पहिल्यावेळचा आमचा थिएटर मधील अनुभव छान होता.
त्यामुळे शक्य झाल्यास याच विकेंडला जायचा विचार आहे. बघूया कसे जमते...

दोन्ही ट्रेलर बघून चित्रपट जवळपास कळतोच.
असे वाटते की यांनी काही पत्ते हातात ठेवले की नाहीत..
माझ्या आठवणीप्रमाणे पहिल्या झिम्मा वेळी सुद्धा असाच ट्रेलर बनवला होता. पण तरीही त्याने काही रसभंग झाला नाही. तेच प्रसंग चित्रपटात गुंफलेले सविस्तरपणे बघायला आवडले होते..

आज जात आहे
बघून सांगतो कसा ते?

छे हो,
बघितला... लिहितो, आज उद्या...

काल पाहिला , 1 च्या तुलनेत खूप छान झालाय. सुहास जोशी, निर्मिती आणि क्षिती ह्यांचा अभिनय खूप छान झालाय.
नक्की पहा असे सुचवेन !

भ्रमर +७८६

परीक्षण कम निरीक्षणे मूळ लेखात टाकली आहेत.
लाभ घ्या Happy

अखेरीस भाग एक प्रमाणेच झिम्मा ग्रूपची व्हॉटसप चॅट दाखवली आहे >> भाग १ मधे हा चॅट वाचतानाच समजलं होतं की भाग २ येणारे. म्हणुन मी देखील काल शेवटी चॅट वाचायचा प्रयत्न केला, पण प्रेक्षक उठुन जात होते त्यात काही समजले नाही. सिद्धार्थ आणि शिवानी ह्यांचं काही जुळु घातलंय असं काहीस वाचलं. झिम्मा ३ चं बीज ह्यात असेल का माहित नाही

सिद्धार्थ आणि शिवानी ह्यांचं काही जुळु घातलंय असं काहीस वाचलं.
>>>>>>

असे असल्यास आवडेल...
खूप झाली त्याच्या कॅरेक्टरला flirting.. जरा शाहरूख स्टाईल लव्ह स्टोरी सुद्धा हवी कथेत...

छान निरिक्षणे आणि परीक्षण..

शनिवारी मैत्रिणी गेल्या होत्या झिम्मा -२ पाहायला मला इच्छा असूनही जायला जमलं नाही. पहिला भाग अजून पाहायचा आहे.. आधी तो बघेन नंतर दुसरा..!

प्रत्येकाच्या मताचा आदर आहे
पण हे मत नक्की चित्रपट बघून आहे का?
कारण इथे तर खूप चांगला रिस्पॉन्स मिळत आहे. अगदी अपवादाने देखील कोणी टुकार वगैरे बोलत नाहीये.

https://m.facebook.com/groups/360423554642670/permalink/1297829650902051...

IMG_20231128_191537.jpg

मराठी बायका, प्रत्येकीची समस्या जी हॉलिडे नंतर चुटकी सरशी सॉल्व्ह होणार, मधे मधे हळुच दारु पिण्याचे बहाणे , ‘बायका’ दारु पिऊन कॉमेडीच करणार असा दावा, तुपकट सिद्धार्थचे स्वतः किती भारी बॉयफ्रेन्ड मटेरिअल आहे या विषयी गैरसमज, क्षिती जोग ला नेमका फॉरेन मधे एक्स लव्हर भेटणे आणि डेट ला जाऊन आल्यावर रडारड , एक्स्ट्रॉ पकाऊ भर म्हणून रुसलेली ब्रिटिश सासू, प्रेमळ दिर असा कौटुंबिक माहौल = ढोम्याचे महापकाऊ डायरेक्शन !
निर्मीती सावन्त आणि रिंकु त्यातही बिचार्‍या आपले बेस्ट देतात, थोडे फन मोमेंट्स क्रिएट करतात.. गॉड ब्लेस देम !

हेमंत ढोमे मुंबई पुणे मुंबईच्या वाटेवर जात आहे का?
मुंबईचा तिसरा भाग अशक्य होता.
फ्रेशनेस पहिल्या भागातच असतो,हे का कळत नाही यांना.
झिम्मा 1मध्ये फ्रेश कॉन्सेप्ट होता,पोस्ट करोना रिलीज झाला होता ,त्यामुळे हलकाफुलका झिम्मा 1 लोकांनी डोक्यावर घेतला.(हा सुध्दा घेत आहेत, पहिल्या चार दिवसात 4कोटी वगैरे कमावले अशी न्यूज आहे,आता हा सुध्दा बॉलिवूड प्रमाणे प्रमोशन फंडा आहे की नाही माहीत नाही.)
वेगवेगळ्या कल्चरच्या,विचारांच्या ,वेगवेगळे प्रॉब्लेम्स असलेल्या बायका एकत्र येतात,निमित्त लंडन टूर आणि मग एकमेकांचे प्रॉब्लेम्स समजून हसतखेळत दूर करतात हा झिम्मा 1 चा विषय फ्रेश होता
मग निमित्त मंगळागौर स्पर्धा ,पण अशाच बिछडलेल्या सहा जणींना एकत्र आणून(वयोगट साधारण 50) हाच विषय केदार शिंदेने बाईपण मध्ये हिट करून दाखवला.
आता परत मात्र तो विषय चावून चोथा झाल्यासारखा वाटतो.
भाग 2काढायचाच ,मग काहीतरी कथानक हव म्हणून रियुनियन,त्यात दोन नवीन कँरँक्टर्स,शिवानी सुर्वे च्या कँरँक्टरच युट्रस काढल्याचा प्रॉब्लेम,सुहास जोशीला पार्किन्सन्स, क्षिती जोगला बरोब्बर लंडनमध्ये अगदी याच ट्रिपला जुना कॉलेज फ्रेंड भेटण,मग रडारड,आता हा अति मेलोड्रामा होईल म्हणून निर्मिती सावंत आणि तिच्या सुनेला प्रॉब्लेम्सविना आणि आजाराविना ठेवून निर्मिती सावंतच्या विनोदी ढंगाचा छान वापर करत अक्षरश: तिच्या जोरावरच अख्ख्या पिक्चरचा घाट घातला आहे अस पिक्चर बघताना सतत वाटत होत.
झिम्मा 1 मध्ये कंटाळा नाही आला पण या भागात प्रचंड कंटाळा येतो मध्ये मध्ये.
मुळात इंदूचा वाढदिवस हे रियुनियन च निमित्त इतपत ठीक आहे पण तिच सरप्राईज म्हणजे तिला झालेला आजार हे मैत्रिणींना सांगण,हा विचार कथाकाराला का करावासा वाटला.
शिवानी सुर्वेच्या कँरँक्टरवर तर अख्खी सिरियल निघू शकेल,निघालीसुध्दा असेल कदाचित या आधी .
कुठल्याशा ट्रिपला पैसे नाहीत आणि कुणाकडून घेणार नाही हे सागणारी मनाली(शिवानी)लंडनला कुणाच्या पैशाने आली हे कळत नाही.
क्षिती जोगला नक्की का रडवल आहे हेच कळल नाही.
भाग 1 मध्ये सायली संजीव आवडली होती पण या भागात नाही आवडली.
ओव्हरअऑल,भाग 2बोअर होतो
निर्मिती सावंत आणि तिवा साथ देणारी रिंकू राजगुरू हाच काय तो युएसपी.
ढोमे शहाणा असेल तर तिसर्याच्या वाटेला जाऊ नये आणि जायचच असेल तर वेगळ कथानक घ्याव.

हे मत नक्की चित्रपट बघून आहे का?>>>> हो चित्रपट बघूनच की. Happy
कारण इथे तर खूप चांगला रिस्पॉन्स मिळत आहे. अगदी अपवादाने देखील कोणी टुकार वगैरे बोलत नाहीये. >>>> हो असेल. आश्चर्य वाटत नाही. मला आत्मपॅम्प्लेट खूप आवडला, बर्‍याच लोकांना बोअर वाटला. मला झिम्मा, बाईपण सुमार वाटले, ते पब्लिकने डोक्यावर घेतलेत. Happy

@ मैत्रेयी
हो चित्रपट बघूनच की
>>>>

ओके, हे यासाठी विचारले की..
जर झिम्मा १ कोणाला आवडला नसेल तर तो पहिल्याच आठवड्यात पटकन जाऊन झिम्मा २ सुद्धा बघेल याची शक्यता कमीच.
आणि झिम्मा १ आवडला असेल म्हणून झिम्मा २ ला गेले असेल तर सुमार, टुकार अशी टोकाची प्रतिक्रिया येणार नाही असे मला वाटत होते.

जर झिम्मा १ च बघितला नसेल तर ती वेगळी केस झाली Happy
पण ओटीटी मुळे तो पर्याय आहे की आधी भाग १ बघून मग भाग २ बघायला थिएटरला जायचे धाडस करावे.

बाकी आत्मपाफ्लेट, नाळ, वाळवी, हे सारे मराठी पिक्चर मी यावर्षी थेटरला बघितले आणि सारे आवडले. हे सगळे वेगवेगळ्या जॉनरचे होते. आपापसात तुलना नाही करू शकत. कोणाला आवडेल कोणाला नाही. पण आपल्याकडे उगाच एक विचित्र पद्धत आहे, बहुसंख्य लोकांना आवडणारी कलाकृती मास आणि मोजक्याच लोकांना आवडणारी कलाकृती क्लास असे समजले जाते Happy

जे काही दाखवलंय त्यासाठी परदेशात जाण्याची गरज खरंच होती का. पांचगणी किंवा कोकण काय वाईट होतं. एवढ्या लांब जाऊन या बायका एकमेकींचे प्रश्न सोडवत बसतात, म्हणजे ठराविक एक टूर प्लॅन काही दिसला नाही. सगळा हौशी मामला. क्षिति अंकुशला भेटायला जाते तेव्हा तिला पूर्ण कल्पना असते तो काय बोलणार आहे त्याची. तिची प्रतिक्रिया अगदीच पटली नाही. छोटी सोकू नव्हती ते बरं झालं. रिंकूचे ड्रेस आवडले. गावातली मुलगी रोल म्हणून तिला घेतले असे ढोमे एका मुलाखतीत म्हणाला. हिच तिची ओळख बनून राहणार का. सायली संजीव प्रीमिअरला अतिशय तोकड्या कपड्यात होती, एका प्रमोशनला तर ती हॉट पॅन्ट घालून आली होती. भूमिकेप्रमाणे कपडे घालून बाकी तर कोणी दिसलं नाही. भिकारणीचा रोल असेल तर प्रमोशनलाही तेच कपडे घालणार का ही. दोन गाणी आवडली, वाऱ्याचा रंग काहीतरी आणि मराठी पोरी. परक्या देशात इतक्या बिनधास्त गाडी चालवतात या बायका, काहीही दाखवलंय. शेवटच्या शोला गर्दी होती आणि सकाळच्या शोचे तिकीट त्याच्या निम्मे होते. सकाळी बघितला असता तर बरे झाले असते.

ढोम्याने सगळ्या गोष्टींचे बिनडोक ओवर सिम्प्लिफिकेशन केले आहे. सायली संजीवच्या कॅरेक्टरने एका युरोपियन माणसाशी लग्न केले आहे. तरी त्यांचे बळेच भारतीय पद्धतीचे कौटुंबिक डायनामिक्स का दाखवलेत? दीर, सासू वगैरे खटलं. नवरा कुठे दिसला नाही, ही दिराबरोबर राहतेय. ( असं कुठे असतं?) . आणि सासूच्या परवानगीशिवाय तिचे घर बेड अँड ब्रेफा मधे कन्वर्ट केलेय. ते पाहून सासू चिडते ( ओके हा खराच सिरियस प्रॉब्लेम होऊ शकतो) तर या ६ बायका ज्या केवळ तिथे आलेल्या गेस्ट्स आहेत, त्यांचे उथळ सोल्यूशन म्हणजे त्या बाईला चांगले जेवण खाऊ घालायचे(?) अन खूष करायचे . आणि प्रिस्कूलर मुले कशी "प्लीssज प्लीssज कॅन वी गेट अ पिझा??" असा हट्ट करतात तसं " प्लीज व्हाय डॉन्ट यू सपोर्ट हर??? " असे अ‍ॅम्बुश स्टाइल विचारायचे ( आणि ते वर्क होते?) Uhoh
अजून भरपूर यडपटपणा आहे. लिहीन नंतर.

या तमाम सो कॉल्ड बेस्टीज इतक्या उथळ इन्सेन्सिटिव आहेत , सुहास जोशीला पार्किन्सन्स डिजिज आहे कळल्यावर (ती व्यवस्थित चालती फिरती असताना) गुलाबी फित लावलेली गिफ्ट् रॅप्ड ‘व्हिल चेअर‘ सरप्राssssज गिफ्ट देतात तिला Uhoh

मी बघितला नाहीये अजून पण मैत्रेयीच्या पोस्टींवरून गृहशोभिका-वाईब्ज आल्या. महिला प्रधान सिनेमा म्हटलं की हलकाफुलका असेल तर 'मेरी सहेली किंवा गृहशोभिका' करून टाकतात, गंभीर असेल तर एकदम 'उंबरठा', सरासरी काढून पिळायचं असेल तर चिमणी पाखरं/अशी असावी सासू/मला आई व्हायचंय.

चंपा, पोस्ट आवडली. Happy

पार्किन्सन्स डिजिज आहे कळल्यावर (ती व्यवस्थित चालती फिरती असताना) गुलाबी फित लावलेली गिफ्ट् रॅप्ड ‘व्हिल चेअर >> Lol हो नेक्स्ट तेच लिहिणार होते!! कमाल मूर्खपणा.

गिफ्ट 'वापरता आलं पाहिजे' आणि 'पडून नाही राहिलं पाहिजे' अशा 'टिकाऊ आणि मळखाऊ कपडे' देण्याच्या मम गाईडलाईन प्रमाणे व्हीलचेअर बेस्ट गिफ्ट झालं की! Lol
'डिसिज-रिव्हिल' पार्टी थ्रो करायच्या आधी आपण गिफ्ट लिस्ट तयार करुन टाकू. पेटंट करुन टाका आयड्या. इव्हेंटब्राईट इंटरफेस करुन टाकेल नाहीतर.

Pages