
भाग ५ : https://www.maayboli.com/node/84289
.. ..... .... .... ...
अंतिम भाग
करोनरी वाहिन्यांमध्ये Atherosclerosisमुळे मेद आणि अन्य घटकांचा पापुद्रा कसा तयार होतो ते आपण मागच्या भागात पाहिले. आता या आजाराचा पुढचा टप्पा पाहू.
आजार वाढत असताना एका स्थितीत हा पापुद्रा फुटतो. त्याचबरोबर रक्तातील बिंबिका पेशी (platelets) सक्रिय होतात. परिणामी रक्तगुठळी तयार होते तसेच रक्तवाहिनीचे आकुंचन होते. या सर्वांमुळे वाहिनीत बऱ्यापैकी अडथळा निर्माण होतो. हा अडथळा किती काळ टिकतो आणि त्याची तीव्रता किती, यानुसार रुग्णाला कुठल्या प्रकारचा त्रास होतो ते ठरते. साधारणपणे दोन प्रकारचे रुग्ण आढळतात :
१. निव्वळ छातीतील वेदना (stable angina)
२. हृदयविकाराचा झटका (myocardial infarction)
१. निव्वळ छातीतील वेदना : या प्रकारात अचानक कधीतरी छातीत दुखू लागते. ही वेदना मध्यम स्वरूपाची असते आणि ती सुमारे पाच ते पंधरा मिनिटे टिकते. बऱ्याचदा अशी वेदना कुठलेतरी श्रम केल्यानंतर होते. छातीत दुखू लागल्यानंतर विश्रांती घेतली किंवा nitroglycerinया औषधाची गोळी घेतली असता ती थांबते. काही जणांच्या बाबतीत स्वस्थ बसले असताना देखील अशी वेदना होऊ शकते आणि काही वेळेस धूम्रपान केल्यानंतर ती उद्भवते.
२. हृदयविकाराचा झटका : जेव्हा करोनरी वाहिन्यांमध्ये अडथळा मोठ्या प्रमाणात होतो तेव्हा हृदयस्नायूंना गरज असणाऱ्या रक्तापेक्षा खूप कमी पुरवठा होऊ लागतो आणि ऑक्सिजन अभावी त्या पेशींवर परिणाम होतो. परिणामी काही पेशींचा समूह मृत होतो (infarction). जेव्हा हृदयस्नायूंचा रक्तपुरवठा कमी होतो तेव्हा तिथे काही रासायनिक घडामोडी होतात आणि त्यातून काही आम्लधर्मी आणि अन्य पदार्थ तयार होतात. या पदार्थांमुळे वेदनेचे चेतातंतू सक्रिय होतात व त्यामुळे रुग्णाला वेदना जाणवते.
हृदयविकाराच्या झटक्याचे काही प्रकार असतात. त्यातील सर्वाधिक आढळणारा प्रकार आधी पाहू.
प्रकार-१चा झटका
रुग्णाला प्रत्यक्ष झटका येण्यापूर्वी एक दोन दिवस आधी छातीत कसेतरी होणे आणि खूप दमल्यासारखे वाटू शकते. परंतु सर्वांच्याच बाबतीत अशी पूर्वलक्षणे येत नाहीत. काहींच्या बाबतीत ध्यानीमनी नसताना अचानक झटका देखील येऊ शकतो.
हृदयविकाराचा जो नमुनेदार झटका असतो त्या प्रसंगी सर्वसाधारणपणे अशा घडामोडी होतात :
• बऱ्याच वेळेस हा झटका पहाटे किंवा सकाळी लवकरच्या वेळात येतो कारण या वेळेस शरीरातील नैसर्गिक स्थिती अशी असते :
१. sympathetic चेतासंस्था उत्तेजित होते. त्यामुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात.
२. हृदय-ठोक्याची गती आणि रक्तदाबात वाढ होते.
३. हृदयस्नायूंचे काम वाढते आणि त्यांचा ऑक्सिजनचा वापरही वाढतो.
४. रक्तातील प्लेटलेट्स एकमेकांना चिकटण्याची प्रक्रिया वाढते.
• वेदनेचे वर्णन
१. तीव्र असते; एकदा दुखू लागल्यावर सुमारे अर्धा ते एक तासपर्यंत ती थांबत नाही.
२. ती छातीच्या मधोमध जाणवते. परंतु त्याचबरोबर मान, खांदा, जबडा किंवा डावा हात या भागांमध्येही ती पसरू शकते.
३. वेदनेचा प्रकार : छातीच्या मधोमध कोणीतरी वजन ठेवल्यासारखे वाटणे / किंवा पिळवटले जाणे / नुसतेच दुखणे किंवा जळजळणे.
४. काहींच्या बाबतीत पोटाच्या वरच्या भागात अस्वस्थता आणि वात अडकल्याची भावना देखील जाणवू शकते.
५. काही जणांत खालील अन्य लक्षणे उद्भवू शकतात :
* शरीरात काहीतरी भयंकर घडणार आहे अशी भावना
चक्कर येणे आणि/ किंवा बेशुद्ध पडणे
* खोकला, मळमळ आणि/ किंवा उलटी
* दरदरून घाम सुटणे
* दम लागणे, नाडीचे ठोके जलद आणि अनियमित होणे
* कोणीतरी आपला गळा घोटते आहे अशी भावना होणे.
* पोट फुगणे
• रुग्ण तपासणी :
रुग्णाचे निरीक्षण आणि स्टेथोस्कोपने तपासणी केली असता खालील बदल झालेले दिसतात :
१. नाडीची गती : बऱ्याच वेळा वाढलेली परंतु काही वेळेस कमी झालेली. तालबिघाड असू शकतात.
२. रक्तदाब : बऱ्याच वेळा वाढलेला परंतु काही परिस्थितीत कमी झालेला असतो.
३. श्वसनाची गती वाढलेली असते
४. तापमान : पहिल्या 24 ते 48 तासांमध्ये थोडा ताप येऊ शकतो
५. छातीची तपासणी : हृदयाचे विशिष्ट ध्वनीबदल, खरखर तसेच फुफ्फुसांच्या भागावरही काही बदल ऐकू येऊ शकतात.
६. हात व पाय : यांच्या टोकांना निळसरपणा किंवा पांढरेफटक पडणे किंवा सूज येणे.
• महत्त्वाच्या रोगनिदान चाचण्या :
१. इसीजी : यामध्ये हृदयातील विशिष्ट भागांच्या बिघाडानुसार निरनिराळे बदल दिसतात. असे बदल सुमारे 80 टक्के रुग्णांमध्ये दिसतात. अर्थात वैशिष्ट्यपूर्ण बदल न दिसणे किंवा इसीजी नॉर्मल येणे याही शक्यता असतात.
२. ट्रोपोनिनची पातळी : ही अत्यंत महत्त्वाची चाचणी आहे. या विषयावर स्वतंत्र लेख इथे वाचता येईल : https://www.maayboli.com/node/65025?page=3

जेव्हा हार्ट अटॅकचा संशय येण्यासारखी लक्षणे रुग्णामध्ये दिसत असतात तेव्हा डॉक्टरांनी ताबडतोब रक्तावरील ट्रोपोनिनची चाचणी करायची असते. जर ती पॉझिटिव्ह आली तर रोगनिदान पक्के होते. परंतु जर का ती निगेटिव्ह असेल आणि लक्षणे असतीलच, तर मग ती चाचणी त्यानंतर तीन आणि नंतर सहा तासांनी पुन्हा करायची असते.
म्हणजेच, रुग्णालयात लक्षणे असलेला रुग्ण दाखल होता क्षणीच ती चाचणी करणे महत्त्वाचे- नव्हे अत्यावश्यक- असते.
३. गरजेनुसार काही प्रतिमातंत्र चाचण्या (angiography) करता येतात.
रोगनिदान
MI चे निदान करण्यासाठी त्याची सार्वत्रिक व्याख्या करण्यात आली आहे. त्यानुसार :
MI चे शिक्कामोर्तब करण्यासाठी खालील गोष्टींची पूर्तता व्हायला हवी:
१. रक्तातील पुरेसे वाढलेले ट्रोपोनिन (विशिष्ट कटऑफच्या वर)
आणि
२. खालीलपैकी किमान एक घटना :
अ) करोनरी-विकाराची विशिष्ट लक्षणे रुग्णात दिसणे
आ) इसीजीतील विशिष्ट बदल किंवा
इ) हृदयाच्या ‘इमेजिंग’ तंत्राने मिळालेला पुरावा
* याप्रमाणे खात्रीशीर निदान झाल्यावर विशिष्ट तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली योग्य ते उपचार केले जातात. या लेखमालेत सुरुवातीस स्पष्ट केल्यानुसार हा मुद्दा या लेखमालेच्या कक्षेबाहेर आहे.
लक्षणांची रुग्णभिन्नता
आतापर्यंत वर्णन केलेला आजार नमुनेदार आहे. परंतु काही रुग्णांमध्ये याबाबत भिन्नता आढळते ती अशी :
१. दीर्घकालीन मधुमेही रुग्णांच्या बाबतीत वेदनेशी संबंधित चेतातंतूवर परिणाम झालेला असतो. त्यामुळे त्यांना छातीत वेदना जाणवतेच असे नाही.
२. वृद्धांच्या बाबतीत स्मृतिभ्रंश किंवा बिघडलेले मानसिक संतुलन असल्यास त्यांना संबंधित लक्षणे समजू शकत नाहीत. त्यामुळे ही घटना कुटुंबीयांच्याही लक्षात यायला वेळ लागतो.
३. पुरुषांशी तुलना करता स्त्रियांमध्ये लक्षणविरहित झटका येण्याचे प्रमाण अधिक असल्याने बऱ्याचदा लवकर निदान होत नाही.
झटक्याचे अन्य प्रकार
वरील प्रकार-१ व्यतिरिक्त जे अन्य काही प्रकार असतात त्यातले दोन प्रमुख प्रकार पाहू.
A. प्रकार-२ : यामध्ये हृदयस्नायूंची ऑक्सिजनची मागणी वाढते परंतु त्या प्रमाणात पुरवठा होऊ शकत नाही म्हणून झटका येतो. हा प्रकार होण्यास करोनरी वाहिन्यांचे अचानक आकुंचन, एनिमिया किंवा श्वसन दुर्बलता हे कारणीभूत असतात.
B. प्रकार-३ : झटक्यामुळे आलेला तात्काळ मृत्यू. अशाप्रसंगी मृत्यू इतक्या वेगात येतो की त्यावेळेस रक्तात ट्रोपोनिन वगैरे रसायने सोडली देखील गेलेली नसतात. काही वेळेस असा रोगी रुग्णालयात मृत अवस्थेत आणला जातो किंवा तिथे आणल्या आणल्याच त्याला डॉक्टरने हात लावण्यापूर्वीच त्याचा मृत्यू होतो.
अनिश्चित रोगनिदान
छातीत दुखणे आणि त्याच्या जोडीने वर उल्लेख केलेली काही लक्षणे, हृदय वगळता इतर अनेक आजारांमध्येही दिसू शकतात. रुग्णाची तपासणी आणि चाचण्या केल्यानंतर प्रत्येक वेळेस ‘नमुनेदार चित्र’ दिसतेच असे नाही. अशा प्रसंगी त्याला रुग्णालयात थांबवून ठेवायचे की घरी सोडायचे असा पेचप्रसंग निर्माण होतो. या प्रसंगी खालील प्रकारचे वस्तुनिष्ठ मूल्यांकन कामी येते :
संभाव्य लक्षणे >>> रुग्णालयात दाखल >> डॉ. नी तपासल्यानंतर The HEART score असा काढतात :
History
ECG मधले बदल
Age (<45 , >65 )
Risk factors ( 0/1-2/3)
Troponin ( पातळीनुसार)
वरीलपैकी प्रत्येक मुद्द्याला ० ते २ गुण देतात. त्यानुसार HEART score १० पैकी किती हे कळते.
मग निर्णयप्रक्रिया अशी :
0-3: कमी धोका >>> लवकर घरी पाठवता येते.
4-6: मध्यम धोका >>> रुग्णालयात निरीक्षण चालू.
7-10: सर्वाधिक धोका >>> तातडीने योग्य ते उपचार
भविष्यात या संदर्भात मशीन लर्निंगचा वापर करण्यासंबंधी संशोधन प्रगतीपथावर आहे. रुग्ण दाखल झाल्यानंतर त्याच्या रक्तावरील ट्रॉपोनिन चाचणी एकदाच केली जाईल आणि रुग्णाची इतर सर्व माहिती मशीन लर्निंग यंत्रणेला पुरवली जाईल. त्यातून अचूक निदान केले जावे अशी अपेक्षा आहे.
**************************************************************************
समाप्त
हृदयविकारावरील अत्याधुनिक
हृदयविकारावरील अत्याधुनिक उपचार ‘cath lab’मध्ये होत असतात आणि ते उपचार देणाऱ्या डॉक्टरांना बऱ्याचदा किरणोत्सर्गी तंत्रज्ञानाचा ( CT, fluoroscopy) वापर करावा लागतो. गेल्या दोन दशकांमध्ये अशा उपचारांचे प्रमाण भरपूर वाढलेले असल्यामुळे (रुग्णाबरोबर) संबंधित डॉक्टरांनाही अशा किरणोत्सर्गाचा वारंवार सामना करावा लागतो आणि त्यातून त्यांच्या तब्येतीवर विपरीत परिणाम होऊ शकतात. अशा परिणामांमध्ये कर्करोग आणि काही हृदयविकारांचाही समावेश आहे.
या गंभीर विषयावर जगभरात संशोधन चालू आहे आणि सध्याचा किरणोत्सर्ग कमी करणारी नवी तंत्रज्ञाने (near-zero fluoroscopy techniques) भविष्यात वापरावीत असा प्रयत्नही चालू आहे.
https://www.mdpi.com/2077-0383/13/7/2066
https://www.mdpi.com/2308-3425/10/3/121
कुमारजी छान लेखमाला.
कुमारजी छान लेखमाला.
मी यासर्वातून गेलोय. अगदी बायपास पर्यंत.
माझा अनुभव सांगतो. विषेशतः व्यायाम करणा-यांसाठी.
मी खूप व्यायाम आत्त्ता आत्तापर्यंत करायचो. अगदी १०० जोर वगैरे.
मला जेंव्हा निदान झाले त्याच्या ४-५ दिवस आधी पर्यंत काहिही त्रास न होता हेवी डंबेल्सचा व्यायाम एक दिवसा आड करत होतो.
पण मी जेंव्हा चालायला जायचो तेंव्हा खालच्या जबड्यात जाणीव व्हायची. पण तासभर चालायचो. पण नंतर नंतर २०० मीटर नंतर दम लागायचा, थांबावेसे वाटायचे. (लक्षात घ्या मला डंबेल्स करताना काही त्रास व्हायचा नाही, कारण सेटस करताना आपण सलग करत नाही. २०-३० सेकंद थांबतो. तेवढ पुरेस होतं. ) पण चालताना तस होत नाही. मग मी स्वतःच स्ट्रेस टेस्टला गेलो. आणि पुढचे बायपास पर्यंत (तेही लगेच) करावे लागले.
मागे वळून बघताना, माझे दोन मामा याच वयात हार्ट अॅटॅकनी गेले. माझ्या मोठ्या भावाला याच वयात असाच त्रास झाला होता.
काळजी घ्या.
कुणाला तरी उपयोग होईल म्हणून लिहिले कुमारजी.
विक्रम,
विक्रम,
अनुभवकथनाबद्दल आभार.
काळजी घ्या. आता योग्य ते पथ्यपाणी आणि सुयोग्य व्यायाम करीत असालच.
शुभेच्छा !
अनुभवकथनाबद्दल आभार.> +१
अनुभवकथनाबद्दल आभार.> +१
स्वतःहुन लक्षण ओळखुन वेळीच गेलात डॉककडे हे कौतुकास्पद आहे. पुढील वाटचालीस शुभेच्छा.
रक्तदाब, हृदयविकाराचा झटका
रक्तदाब, हृदयविकाराचा झटका आणि विमा कंपनीला चपराक
पुणे ग्राहक आयोगाकडे झालेला हा खटला महत्त्वाचा आहे. विमा ग्राहकाला उच्च रक्तदाबाचा त्रास होता व तो त्याने विमा कंपनीकडे जाहीर केलेला होता. त्याबद्दल कंपनीने त्याच्याकडून भरपूर अतिरिक्त हप्ताही घेतलेला होता. कालांतराने या ग्राहकाला हृदयविकाराचा झटका आला आणि त्यासाठी त्याचे 19 लाख रुपये खर्च झाले.
ग्राहकाने विमा कंपनीकडे तो खर्च मागितला असता त्यांनी हात झटकले. पूर्वी रक्तदाबाचा त्रास असल्याने त्यातून हा झटका आलेला आहे आणि म्हणून उपचार खर्च देता येणार नाही असा त्यांचा दावा.
ग्राहक आयोगाने विमा ग्राहकाच्या बाजूने निकाल दिला. त्याला आता खर्चासह सर्व भरपाई देण्याचे कंपनीला आदेश दिले आहेत. निकालपत्रातील एक वाक्य महत्त्वाचे आहे. आयोग म्हणतो,
“ उच्चरक्तदाब हा आजार नसून जीवनशैली विकार आहे. त्याबद्दलचा भरपूर अतिरिक्त हप्ता ग्राहकाने आधीच दिलेला आहे”
(बातमी छापील मटा 15 मे)
. .
वैद्यकीय दृष्टीने पाहता निव्वळ उच्चरक्तदाब हा आजार नसतो हे बरोबर. ती एक अवस्था (कंडिशन) आहे. जर तपासणी करून तिचे कारण सापडले तर ते कारण हे रोगनिदान ठरते.
https://www.maayboli.com/node
https://www.maayboli.com/node/86900?page=1 या धाग्यात ‘माझेमन’ यांनी उपस्थित केलेल्या एका मुद्द्याबद्दल इथे लिहीत आहे :
चाळीशीच्या वयातील हार्ट अटॅकची कारणमीमांसा
सर्व वयोगटांना हार्ट अटॅकचा धोका वाढवणारे जे घटक आहेत (हृदयसंवाद : भाग 5 पहा) ते या वयोगटाला पण लागू आहेतच. परंतु चाळीशीत विशेष लागू असणाऱ्या काही घटकांची माहिती आता देतो.
या वयोगटातील हृदयविकार मुख्यतः चार कारणांमुळे होतात :
१. मादक पदार्थांची व्यसने : यामध्ये मुख्यत्वे खालील ड्रग्सचा समावेश आहे
Cocaine, marijuana and amphetamines.
या मुद्द्याच्या खोलात गेल्यास असे दिसते की, व्यावसायिक कामांच्या ताणतणावातून नैराश्य आणि अन्य काही मनोविकार जडू शकतात. त्याची परिणती देखील वरील व्यसने लागण्यात होऊ शकते. त्याचबरोबर बरेचसे कोकेनचे व्यसनी हे पारंपरिक धुम्रपान देखील करीत असतात. या व्यसनांमुळे करोनरी वाहिन्यांचे अचानक आकुंचन होते किंवा हृदयाच्या अंतरीक लेयरचा दाह (endocarditis) होतो. तसेच अतिरिक्त मद्यपान हे देखील एक महत्त्वाचे कारण असून त्याच्या कारणमीमांसेवर अधिक संशोधन चालू आहे
2. रक्तप्रवाहात गुठळी होण्याची प्रवृत्ती : अशी प्रवृत्ती विविध ऑटोइम्युन आजारांमुळे होऊ शकते. लुपस (SLE) हे त्यातले एक महत्त्वाचे उदाहरण. या आजारांमुळे रक्तातील बिंबिका पेशींचा चिकटपणा वाढतो. परिणामी गुठळ्या अधिक होतात.
३. करोनरी वाहिन्यांचे Atherosclerosis : हे होण्यामागे धूम्रपान हे अत्यंत महत्त्वाचे कारण आहे. या वयोगटातील स्त्रियांच्या बाबतीत हे कारण अधिकतर आढळलेले आहे. या व्यतिरिक्त रक्तातील homocystein & lipoprotein-A या दोन घटकांची वाढलेली पातळी देखील या प्रकारची इजा घडवते. Lipoprotein-A हा घटक विशेषता भारतीय आणि आशियाई वंशात जनुकीय कारणांमुळे अधिक असतो.
4. करोनरी वाहिन्यांच्या जन्मजात विकृती : सुदैवाने या दुर्मिळ असतात.
धन्यवाद कुमार सर ...
धन्यवाद कुमार सर ...
उपयुक्त माहिती डॉक्टर.
उपयुक्त माहिती डॉक्टर.
परवाच पेपरात हायड्रो गांजाचा मोठा साठा जप्त केल्याची बातमी आली होती.
29 सप्टेंबर : जागतिक हृदय
29 सप्टेंबर : जागतिक हृदय जागरूकता दिन

सर्वांनीच काय करावे ?
* मधुमेह आणि/ किंवा उच्चरक्तदाबाने बाधित रुग्णांनी डॉक्टरांच्या मदतीने नियमित उपचार घेऊन आपापले आजार नियंत्रणात ठेवावेत.
हार्ट अटॅकचे निदान
हार्ट अटॅकचे निदान करण्यासाठीचे विविध निकष लेखात दिलेले आहेतच. परंतु बऱ्याच रुग्णांच्या बाबतीत नेहमीचे निकष अगदी सुस्पष्ट असतातच असे नाही. त्यासाठी आता MI3 या प्रकारच्या मशीन लर्निंग अलगोरिदमचा वापरही केला जातो.
या मंत्रणेत ट्रोपोनिनच्या पातळीबरोबरच रुग्णाचे वय, लिंग आणि अन्य काही गोष्टींचा विचार करून लवकर आणि खात्रीशीर निदान करता येते. त्याचबरोबर धोक्याच्या पातळीनुसार रुग्णांचे वर्गीकरण देखील करता येते. धोका अधिक वाटल्यास डॉक्टरांना तातडीचा निर्णय घेण्यासाठी याची मदत होत आहे.
इंदूरची प्रसिद्ध गायिका Palak
इंदूरची प्रसिद्ध गायिका Palak Muchhalने आतापर्यंत 3800 गरीब मुलांच्या हृदय शस्त्रक्रियांसाठी आर्थिक मदत करून एक विक्रम केलेला आहे. त्यासाठी तिची गिनीज बुकमध्ये नोंद झालेली आहे.
अभिनंदन !
https://www.indiatoday.in/entertainment/music/story/singer-palak-muchhal...
रुग्णालयात दाखल झालेल्या
रुग्णालयात दाखल झालेल्या संभाव्य हार्ट अटॅकच्या रुग्णांच्या दोन प्राथमिक चाचण्यांबाबत काही सुधारणा 2025 पासून अमलात आलेल्या आहेत त्या अशा :
१. ट्रोपोनिन चाचणी तातडीने करावी ( ASAP) आणि ईसीजी रुग्ण आल्याच्या दहा मिनिटांच्या आत करावा.
२. जर वरील ट्रोपोनिन चाचणी निगेटिव्ह आली तर ती पुन्हा करण्यासंबंधीचा नियम असा आहे :
A . जर रुग्णालयात ट्रोपोनिन high sensitivity पद्धतीने केले जात असेल तर चाचणी एक ते दोन तासांच्या आत पुन्हा करावी.
B. परंतु जर वरील आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध नसेल तर पारंपरिक पद्धतीच्या चाचणीनुसार ती तीन ते सहा तासांनी पुन्हा करावी.
हार्ट अटॅकमध्ये ज्या भागाचा
हार्ट अटॅकमध्ये ज्या भागाचा रक्तपुरवठा खंडित झालेला असतो तिथल्या स्नायूपेशी मरण पावतात आणि त्यांच्या जागी वण (scar) तयार होतो हे आतापर्यंत प्रस्थापित झालेले ज्ञान आहे.
मात्र एका नवीन संशोधनातून काही आशादायक स्थिती दिसली आहे. अटॅकच्या क्षणानंतर हृदय काही नव्या स्नायूपेशींची निर्मिती करू लागते असे या संशोधनात दिसले आहे. परंतु ही कृती अटॅकने झालेले नुकसान भरून काढण्यास पुरेशी नसते. हृदयाची ही नवनिर्मितीक्षमता (regeneration) काही औषधे देऊन वाढवता येईल का, हा पुढील संशोधनाचा विषय असेल :
https://www.ahajournals.org/doi/10.1161/CIRCRESAHA.125.327486
महाराष्ट्रातील हृदयविकार
महाराष्ट्रातील हृदयविकार उपचार सुविधा बळकट करण्यासाठी राज्य सरकारने पुणे, जालना, गडचिरोली आणि कोल्हापूर येथे हृदय-विशेष उपचार केंद्रांच्या (cath lab) उभारणीस मंजुरी दिलेली असून या प्रकल्पासाठी 100 कोटी रुपयांचा निधी मंजूर केलेला आहे.
https://www.loksatta.com/mumbai/maharashtra-govt-approves-100-crore-for-...
Pages