हृदयसंवाद (५) : करोनरी विकाराचा धोका

Submitted by कुमार१ on 24 October, 2023 - 09:30

भाग ४ : https://www.maayboli.com/node/84278
..

हृदयरोगांच्या संदर्भात हा अत्यंत महत्त्वाचा आणि विस्तृत विषय आहे. त्याची हाताळणी दोन लेखांमध्ये करतो. प्रस्तुत लेखात त्याची कारणमीमांसा विस्ताराने पाहू. नव्या वाचकांनी खालील मजकूर वाचण्यापूर्वी पूर्वीचा कोलेस्टेरॉलचा हा लेख जरूर वाचावा (https://www.maayboli.com/node/64397).

आपण या आधी (भाग २) पाहिल्यानुसार विशिष्ट करोनरी वाहिन्यांमधून हृदयस्नायूंना (myocardium) रक्तपुरवठा होतो. या वाहिन्यांमधून सतत रक्त वाहत असते. या दरम्यान रक्तातील काही घटक या वाहिन्यांच्या आवरणात पेरले जातात (deposition). त्यामध्ये कोलेस्टेरॉल, अन्य मेद व कॅल्शियमचा समावेश असतो. त्याच्या जोडीने आसपासच्या मृत पेशींचे अवशेष देखील तिथे जमा होतात. एखाद्याच्या आयुष्यभरात ही प्रक्रिया जर कमी प्रमाणात राहिली तर त्याचा बाह्य त्रास दिसत नाही. परंतु जर का ही प्रक्रिया सातत्याने खूप मोठ्या प्रमाणात होत राहिली तर मात्र Atherosclerosis हा आजार होतो (Ather = मेद, sclerosis = कडक होणे). या प्रक्रियेचा पुढील परिणाम म्हणून त्या सर्व साठलेल्या गोष्टींचा एक पापुद्रा (plaque) तयार होतो. जसा तो आकाराने वाढू लागतो तशी त्याच्यात एक रक्तगुठळी तयार होते. कालांतराने हा पापुद्रा फुटतो आणि मग रक्ताच्या गुठळीमुळे संबंधित रक्तवाहिनी खूप अरुंद किंवा बंद होते. परिणामी तिच्याद्वारे होणारा रक्तपुरवठा खूप कमी होतो किंवा थांबतो. ही प्रक्रिया करोनरीसह शरीरातील अन्य कोणत्याही रक्तवाहिनीत होऊ शकते. पण करोनरी वाहिन्यांची विशिष्ट भौमितिक रचना आणि त्यांना हृदयाच्या कार्यामुळे सतत बसणारा पीळ या कारणांमुळे या वाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होण्याची प्रक्रिया अन्य वाहिन्यांच्या तुलनेत अधिक होते.

या सर्व रोगप्रक्रियेचा अथपासून इतिपर्यंत कसा विकास होतो हे खालील चित्रात स्पष्ट होईल :
Athero progression Rev.jpgधोका वाढवणारे घटक
या आजाराचा धोका वाढवणारे अनेक घटक असून त्यापैकी काही निसर्गदत्त तर काही जीवनशैली व अन्य आजारांशी निगडित आहेत. ते आता विस्ताराने पाहू.
निसर्गदत्त घटक
१. वय व लिंग : हा आजार वाढत्या वयानुसार अधिक प्रमाणात होतो. तो 45 वर्षांवरील पुरुषांत आणि 55 वर्षावरील स्त्रियांमध्ये अधिक प्रमाणात आढळतो. एकंदरीत हा आजार स्त्रियांपेक्षा पुरुषांमध्ये अधिक प्रमाणात आढळतो अशी पारंपरिक समजूत आहे परंतु त्यात फारसे तथ्य नाही. स्त्रियांचे ऋतुचक्र चालू असेपर्यंत त्यांना संबंधित हार्मोनमुळे काही प्रमाणात संरक्षण मिळते. परंतु ऋतूसमाप्तीनंतर त्यांना पुरुषांइतकाच धोका असतो. अजून एक मुद्दा. जर एखाद्या स्त्रीला लवकरच्या वयात मधुमेह झाला आणि तिला तंबाखू-प्रकारची व्यसने दीर्घकाळ असतील, तर मात्र तिला ‘स्त्री’ म्हणून असणारे या आजारापासूनचे संरक्षण मिळत नाही.

२. आजाराचा कौटुंबिक इतिहास : खालील घटक धोकादायक समजले जातात :
A. एखाद्या व्यक्तीच्या वडील किंवा भाऊ यांना त्यांच्या 55व्या वर्षांच्या आत हा आजार झालेला असणे, किंवा
B. त्या व्यक्तीच्या आई किंवा बहिणीला त्यांच्या 65व्या वर्षांच्या आत हा आजार झालेला असणे.

जीवनशैलीशीतील घटक व अन्य आजार
या घटकांची यादी खूप मोठी असून त्यातले काही मोजकेच विस्ताराने पाहू.
१. नियमित व्यायामाचा अभाव : बैठी जीवनशैली आणि व्यायामाचा अभाव हे सध्याच्या जीवनशैलीतील महत्त्वाचे घटक ठरतात. करमणुकीसाठी कुठल्याही ‘स्क्रीन’ पुढे तासंतास बसून राहणे हे अर्थातच अनिष्ट आहे. नियमित व्यायामाच्या अभावाने लठ्ठपणा आणि रक्तातील मेदवृद्धीला आमंत्रण मिळते तसेच रक्तवाहिन्यांचा अंतर्गत दाह देखील होतो. त्याचप्रमाणे इन्सुलिनच्या सुयोग्य कार्यात अडथळा येतो.

२. तंबाखूचे धूम्रपान : हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. त्यातील रसायनांमुळे रक्तवाहिन्यांमध्ये पापुद्रा निर्माण होण्याची प्रक्रिया वाढते आणि रक्तवाहिन्या संकुचित होतात. तसेच रक्तगुठळी होण्याची प्रक्रिया देखील वाढते. दिवसाला २०हून अधिक सिगरेट्स ओढण्यामुळे या आजाराचा धोका सुमारे अडीचपट वाढतो. एकदा हार्ट अटॅक येऊन गेलेल्या व्यक्तीने धूम्रपान न सोडल्यास पुन्हा अटॅक येण्याचा धोका कायम राहतो.

३. आहार : सर्वसाधारणपणे साखर, मीठ आणि लाल मांस यांचे अतिसेवन या आजाराचा धोका वाढवतात. या उलट, भाज्या (शक्य तितक्या कच्च्या स्वरूपात खाणे), फळे अख्खी (whole) धान्ये, द्विदल वनस्पती आणि मासे हे घटक या आजाराचा धोका कमी करतात.

Diet lekh 5.jpg
अर्थात आहार हा विषय खूप क्लिष्ट आहे. जगातील सर्वांना लागू होईल असा एकच नियम/सल्ला या बाबतीत नाही हे ध्यानात घ्यावे. आहारातील विविध घटकांचे प्रमाण आणि प्रकार हे दोन्ही मुद्दे महत्त्वाचे ठरतात. याहून अधिक विवेचन या लेखाच्या कक्षेबाहेरचे आहे.

४. लठ्ठपणा : याची व्याख्या करण्यासाठी खालील तीन प्रकारच्या मापनांचा आधार घेण्यात येतो :
कंबरेचा घेर, कंबर/नितंब गुणोत्तर, बीएमआय.
waist hip  लेख ५.jpg

या तिघांचे धोका ठरवणारे कट ऑफ प्रत्येक वंश, देश आणि लिंग यानुसार वेगवेगळे आहेत. सर्वसाधारण भारतीय संदर्भानुसार (https://www.japi.org/t2a4d4b4/body-mass-index-waist-size-waist-hip-ratio...) खालील मापने धोका सर्वाधिक वाढवतात :
१. कंबरेचा घेर
स्त्री : > ८८ cm
पुरुष : > १०२ cm

२. कंबर/नितंब घेर गुणोत्तर :
स्त्री : > ०.८
पुरुष : > ०.९

३. बीएमआय > ३०.
(वेगवेगळ्या संशोधनानुसार वरील अंकांमध्ये थोडाफार फरक आढळू शकेल).
शरीरभरच्या संपूर्ण जाडीपेक्षा सुटलेले पोट (ढेरी) या संदर्भात अधिक धोकादायक असते.

४. दीर्घकालीन मधुमेह : या आजारामुळे धोका दोन ते आठ पट वाढतो. मधुमेह नियंत्रणात न राहिल्यास भविष्यात करोनरी आजारामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण देखील वाढते.

५. कोलेस्टेरॉल रक्तपातळी : या संबंधीचे सविस्तर विवेचन व चर्चा वर उल्लेख केलेल्या स्वतंत्र लेखात केलेली आहे. एकूण कोलेस्टेरॉल जर 150 mg/dL यापेक्षा कमी असेल तर ते या संदर्भात सुरक्षित मानले जाते. कोलेस्टेरॉलच्या LDL-c या घटकाची वाढती पातळी आजाराचा धोका वाढवते. या विषयावर वैज्ञानिकांमध्ये भरपूर मतभेद आहेत. तरीसुद्धा हा घटक प्रस्तुत यादीमध्ये अजूनही कायम ठेवलेला आहे. याच्या जोडीने TG या अन्य मेदाची वाढलेली रक्तपातळी हा देखील एक धोकादायक घटक असतो.

६. उच्च रक्तदाब : हा अर्थात महत्त्वाचा घटक आहे. रक्तदाब सातत्याने वरच्या पातळीत राहिल्यामुळे हृदयाच्या डाव्या जवनिकेला सतत अधिक जोर लावून महारोहिणीत रक्त पंप करावे लागते. त्यामुळे कालौघात ही जवनिका thick होते (left ventricular hypertrophy). या स्थितीमुळे हृदयविकाराचा धोका आणि त्यापासून होणारे मृत्यू या दोन्हींमध्ये वाढ होते.

७. मेटाबोलिक सिंड्रोम : जेव्हा एखाद्याच्या तब्येतीमध्ये कमरेचा घेर, मेदांची रक्तपातळी, रक्तदाब आणि उपाशीपोटीची ग्लुकोज पातळी हे सर्व घटक वाढलेले दिसतात तेव्हा या स्थितीला मेटाबोलिक सिंड्रोम म्हणतात. अशा सिंड्रोमयुक्त लोकांच्या बाबतीत हृदयविकाराचा धोका अर्थातच अधिक असतो.

धोका मूल्यमापन : प्रयोगशाळा चाचण्या
या आजाराची पार्श्वभूमी लक्षात घेता काही मूलभूत चाळणी चाचण्या सर्वच मध्यमवयीन लोकांनी करून घेणे हितावह असते. जर आजाराचा कौटुंबिक इतिहास असेल तर वयाच्या तिशीतच त्या जरूर कराव्यात. एक गोष्ट महत्त्वाची : कुठल्याही चाळणी चाचण्या स्वतःच्या मनाने परस्पर लॅबमध्ये जाऊन करू नयेत. आधी आपल्या नेहमीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. एक महत्त्वाची गोष्ट डॉक्टर करतीलच, ती म्हणजे रक्तदाब तपासणी. त्यानंतर खालीलप्रमाणे काही मूलभूत चाचण्या सुचवल्या जातील :
१. ग्लुकोज संदर्भात : F & PP levels, HbA1c

२. मेद पातळी : या चाचणीला Lipid Profile म्हणतात. त्यात मुख्यतः एकूण कोलेस्टेरॉल व त्याचे LDL-c, व HDL-c हे दोन प्रकार आणि TG यांचा समावेश असतो. तसेच या मूलभूत मापनांवरून काही गणिती सूत्रे मांडून अन्य काही निकष मोजता येतात.
३. गरज भासल्यास मूत्रपिंड-आरोग्यासंबंधीच्या चाचण्या.

४. ज्या व्यक्तींना आजाराचा कौटुंबिक इतिहास असेल आणि वरील प्राथमिक तपासण्या झाल्यावर जर डॉक्टरांना गरज वाटली तरच ते काही वरच्या पातळीवरील चाचण्या सुचवू शकतात जसे की :
hsCRP, Lp(a), Homocysteine, Small dense LDL, coronary-artery calcium score by CT scan , इ.

एक महत्त्वाचे : CT-स्कॅनच्या मदतीने करोनरी वाहिन्यांमधील ‘प्रत्यक्ष परिस्थितीचा’ अंदाज येत असला तरीही या चाचण्या फक्त काही निवडक रुग्णांच्या बाबतीतच केल्या जातात. वर दिलेल्या प्रस्थापित मूलभूत चाचण्यांना डावलून त्या उठसूट सर्वांसाठी केल्या जात नाहीत. या आधुनिक चाचण्याच श्रेष्ठ आहेत असा गैरसमज कोणीही करून घेऊ नये. या चाचण्या केल्यामुळे भविष्यातील हार्ट अटॅक संबंधी खात्रीने सांगता येतेच असे नाही. या चाचण्यांना देखील त्यांच्या काही अंगभूत मर्यादा आहेत.

धोक्याचे गुणांकन
एव्हाना हे लक्षात आले असेल की हा आजार शरीरासंबंधी अनेक घटकांच्या एकत्रित परिणामातून होतो. म्हणून एखाद्या व्यक्तीला आतापासून पुढील दहा वर्षात हा आजार होण्याची अंदाजे शक्यता किती आहे याचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन करणे उपयुक्त असते. त्यासाठी तिचे वय, लिंग, वंश, रक्तातील एकूण कोलेस्टेरॉल व HDL-c पातळी, रक्तदाब, मधुमेह आणि धूम्रपानाचे व्यसन या माहितीचे एकत्रीकरण करून हृदयविकाराचा धोका किती टक्के आहे हे संगणकीय सूत्राने काढले जाते. हे आठही निकष मूलभूत आणि महत्त्वाचे आहेत.

नमुन्यादाखल असे एक एक संगणकीय सूत्र इथे उपलब्ध आहे :
https://tools.acc.org/ASCVD-Risk-Estimator-Plus/#!/calculate/estimate/

सहज उत्सुकता म्हणून करून प्रत्येकाला आपापले गुणांकन तिथून काढता येईल. अर्थात जे काही आकडे येतील त्याने विचलित व्हायचे कारण नाही ! आपली तब्बेत जाणणाऱ्या डॉक्टरांचे मत अधिक महत्त्वाचे; त्यानंतर आकडेवारीचे स्थान. तसेच प्रत्येक संबंधिताने एक गोष्ट लक्षात ठेवावी. आपली तपासणी केल्यानंतर आणि वरील सर्व संगणकीय मदत घेतल्यानंतर या आजाराच्या धोक्यासंबंधी डॉक्टर जे काही सांगतील तो एक ‘अंदाज’ असतो; भविष्यात तो प्रत्येकाच्या बाबतीत पूर्णपणे खरा ठरेलच असे नाही.

आजाराचे दुष्परिणाम
जेव्हा Atherosclerosisची तीव्रता वाढत जाते तशा बाधित रक्तवाहिन्या अरुंद होऊ लागतात. परिणामी त्यांच्याद्वारे हृदयस्नायूंना होणारा रक्तपुरवठा कमी पडू लागतो. रक्तप्रवाहातील अशा अडथळ्याच्या प्रमाणानुसार रुग्णाला कमीअधिक त्रास होऊ लागतो. या त्रासाची व्याप्ती कशी वाढत जाते ते पुढच्या लेखात पाहू.
*****************************************************************************************************************************
क्रमशः

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

1) ताणतणाव.
२) अपुरी झोप.
३) वेळेवर जेवण न करणे.
हे पॉइंट पण लेखात add असायला हवे होते.

लेख वाचला. मला वाटतं हा सर्वाधिक चर्चिला जाणारा विकार असावा. त्यामुळे याबद्दल यापूर्वी उडत उडत का होईना वाचलं होतं. सगळं एकत्र वाचून चित्र नीट उभं राहिलं.

तुम्ही तंबाखूचे धूम्रपान असा शब्दप्रयोग केला आहे. त्यावरून इतर कोणत्या प्रकारचे धूम्रपान असू शकेल असा प्रश्न पडला. चुलीशी काम करणार्‍यांना होते तेही धूम्रपानच का? किंवा उदबत्ती, धूप यांचा धूर?

भरत पहिल्या परिच्छेदास मम.

तंबाखुचे धूम्रपान वाचून मला वेगळा प्रश्न पडला. तंबाखु खाणाऱ्यांना तेवढा धोका नसतो का हृदय विकाराचा?

माझ्या काही मित्रांनी धूम्रपान सोडले आहे पण जर्दा खाणे सुरू केले.

धन्यवाद !
चांगले मुद्दे आहेत. क्रमाने घेतो.
1. ताणतणाव, अपुरी झोप, वेळेवर जेवण न करणे.
>>>
या गोष्टींचा दुरान्वयाने संबंध आहे हे बरोबर. इथे एक मुद्दा सांगतो. तसं पाहायला गेलं तर अनेक छोटे मोठे घटक गोळा करून अनिष्ट असलेल्या घटकांची यादी 56 वगैरे काढलेली आहे ! परंतु जेव्हा आपण करोनरी विकाराचा “धोका” हा शब्द गांभीर्याने घेतो तेव्हा त्यातले काही मोजकेच महत्त्वाचे यादीत असावेत असं आपलं माझं मत.

तंबाखू आणि दारू मध्येच जनता अडकली आहे.
काहीच व्यसन नसणारे, वयाच्या १३ व्यां वर्षी पण हार्ट अटॅक नी जात आहेत.
दारू आणि तंबाखू ह्याचे सेवन करण्याचा माणसाचा हजारो वर्षांचा इतिहास आहे .
पण हार्ट अटॅक नी कमी वयात पण मृत्यू येण्याचे प्रमाण ह्या दहावीस वर्षात च वाढले आहे.
ह्याचा अर्थ सरळ आहे कारण काही तरी वेगळे आहे.
Dr मांडके ह्यांची मुलखात पूर्ण बघितली आहे.
त्यांनी पण तंबाखू ला हार्ट अटॅक साठी जबाबदार धरले होते.
ते तंबाखू चे व्यसन करत नव्हते.
दारू पीत नव्हते.
खूप मोठे हार्ट रोग तज्ञ होते.
तरी हार्ट अटॅक नीच गेले .
फॅमिली history' नव्हती.
ह्याचा अर्थ साफ आहे .
खरी कारणे वेगळीच आहेत.

२. तंबाखूचे धूम्रपान असा शब्दप्रयोग
>>
धूम्रपान आणि धूरविरहित तंबाखू सेवन या मुद्द्यांवर भरपूर काथ्याकुट झालेला आहे. त्या संदर्भात अनेक वर्ष बरेच प्रयोग झालेले आहेत. धूम्रपान हे खूप धोकादायक आहे हे निःसंशय. परंतु अन्य मार्गाने केलेले निव्वळ तंबाखू सेवन या मुद्द्यावर बराच वाद आहे.

https://pubmed.ncbi.nlm.nih.gov/29325111/
इथे दिल्यानुसार अनेक संशोधनांचे महाविश्लेषण अहवाल देखील वाचण्यात येतात. धूरविरहित तंबाखू अमुक एक वंशासाठी वाईट आहे पण तमुक वंशासाठी नाही ; त्यामुळे करोनरी विकार “होतो” असे नाही परंतु मृत्यूचे प्रमाण वाढते, वगैरे....

तोंडात तंबाखू ठेवणे याचा अधिकतर संबंध कर्करोग होण्याशी जोडलेला आहे.
अर्थात, सारासार विचार करतात कुठल्याही प्रकारचा तंबाखू वर्ज्य करणे हे आरोग्यासाठी केव्हाही उत्तम !

तंबाखू वर्ज्य करणे .

+११११२.
मी असे दारू विषयी वाचले आहे.माणूस दारू खूप वर्षा पासून पित आहे.
त्या मुळे मानवी जिन मध्ये मुटेशन झाले आहे.
दारू चे विघटन जे लिव्हर करते त्याची विघटन करण्याची क्षमता काही लोकात खूप जास्त असते.
त्या मुळे ते दारू चे बळी पडत नाहीत.
तीच बाब तंबाखू विषयी पण आहे का?

तीच बाब तंबाखू विषयी पण आहे का?
>>> नाही.
मद्यपान आणि धूम्रपान यांचा वेगळ्या पातळ्यांवर विचार करावा लागतो. मद्यपानामधून इथाईल अल्कोहोल हा घटक शरीरात जातो. त्याचा चयापचय विविध वंशांमध्ये भिन्न गतीने होतो हे बरोबर.

या उलट तंबाखू धूम्रपानातून जवळजवळ 9000 रसायने शरीरात जातात ! त्यापैकी काही महत्त्वाची अशी :
१. निकोटीन
२. कार्बन मोनो-ऑक्साईड
३. काही जड धातू
४. ऑक्सिडंट प्रकारची अन्य रसायने

म्हणजेच तंबाखूचा शरीरावर होणारा दुष्परिणाम हा अनेक घटकांमुळे होतो. म्हणून मद्यपानाशी तुलना करता तंबाखू हा अतिशय गुंतागुंतीचा विषय आहे.

तंबाखूमधील घातक रसायनांची खूप मोठी संख्या बघता त्या प्रत्येक रसायनाच्या चयापचयाचा विविध वंशाच्या लोकांमध्ये दीर्घकाळ अभ्यास करणे हा अभ्यास खूप कष्टप्रद असेल.

तरुण वयात अटॅक येण्याचे प्रमाण हल्ली वाढले आहे.
सातारा जिल्ह्यात च ह्या दहा दिवसात दोन तरुण मुलाना अटॅक आला.
महत्वाचे म्हणजे दोघे ही लष्करात काम करत होते.
एक अग्निविर आणि दुसरा लिंब गावातील.
लष्करात काम करत होते म्हणजे physically फीट होते आणि शारीरिक दृष्ट्या active होते.
गुजरात मध्ये नवरात्री मध्ये गरबा खेळताना 8 की 10 मृत्यू मुखी पडले सर्व तरुण त्या मधील एक तर 14 वर्षाची मुलगी होती.
जास्त जुने नाही पण अगदी 40 एक वर्ष पूर्वी पण अटॅक तरुणांना आल्याची उदाहरणे अगदी दुर्मिळ होती.
हा आजार च 50 शी पुढचा आहे.
पण हल्ली सर्रास तरुण ह्याला बळी पडत आहेत.
संशोधक कारण शोधत असतील च

अतिशय उपयुक्त, अभ्यासपूर्ण लेखमाला...
मनापासून धन्यवाद, डाॅ.साहेब...

ही प्रक्रिया करोनरीसह शरीरातील अन्य कोणत्याही रक्तवाहिनीत होऊ शकते. >>>> मेंदूतील रक्तवाहिन्यात हे झाले तर स्ट्रोक येतो का !

धन्यवाद !

मेंदूतील रक्तवाहिन्यात हे झाले तर स्ट्रोक येतो का ?
>> होय. चांगला मुद्दा.

स्ट्रोकचे मूलतः दोन प्रकार असतात :
१. मेंदूला होणाऱ्या रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिनीत होणारा अडथळा
२. रक्तवाहिन्या फुटून होणारी घटना.

मी पण नियमित वाचत आहे. अनु वंशिकतेचा पण काही भाग आहे का? माझे सासरे ५२ वर्शी हार्ट अ‍ॅटेक नेच गेले हा दुसरा अ‍ॅटेक होता. मिस्टर पण ५२ वयातच पहिल्याच हार्ट अ‍ॅटेक ने वारले. त्या दोघांना मधुमेह प्लस हाय पर टेन्शन होते. सासरे जरा तरी मेडिकल अ‍ॅड्व्हाइस घ्यायचे. पण मिस्टरांनी मधुमेह आहे हे स्वीकारायलाच नकार दिला. बरोबर गोळ्या घेणे व्यायाम हे ते केले नाही. शुगर गेले त्या दिवशी २०० च्या पुढे होती.
मी आता तरी डॉक्टरला भेटु म्हटल्यावर माझ्यावरच रागवले. मग मी गप्प बसले.

त्यां नी आजाराची नीट कल्पना न दिल्याने मला गांभीर्य कळले नाही. गेले त्या दिवशी शुगर २०० च्या पुढे होती. ऑफिसात गेले तर पार्किंग पासून रूम परेन्त चालायला दम लागत होता हे लोकांनी नंतर सांगितले. आता तरी हॉस्पिटल ला जाउ म्ह टले तर माझ्यावरच जाम च उखडले. पण मग काय वाटून होमिओपाथ कडे गेले. तिथोन परत येता येइना म्हणून मला फोन केला मी स्कूटर वरुन आणले घरी. रात्री साडेतीनला मला उठवले व सव्वा चार परेन्त खेळ खलास. मेजर हार्ट अ‍ॅटेक. आम्ही अपोलो अ‍ॅम्ब्युलन्स बोलवली पण ते येइपरेन्त, कि,वा ड्रायवर येइ परेन्त ही दम धरला नाही.
काही लंग इशू पण असावा पण आम्हाला माहितीच दिली नाही.

हे मी लिहिते कारण माझ्याकडे आता माझ्याच सहा सात फायली आहेत. रिपोर्ट सीडी सर्व अपडेटेड व कोणी विचारले तर लगेच माहिती देते. प्रायमरी केअर गिव्हर ला सर्व माहिती आहे. गोळ्या घ्यायचे एक्सेल शीट आहे. आजाराची पण म्यानेज मेंट करावी लागते गुप्त ठेवल्यास नुकसानच होते पेशंटचे. ते जर रात्री हॉस्पिटल मध्ये असते तर वाचायची शक्यता होती. असा विचार नेहमी मनात येतो. पण पेशंट ऐकत नसल्यास काय करावे. अशी हतबलता येते.

मिस्टरांनी मेडिकल रेप. ते मॅनेजर असे फार्मा मध्ये काम केलेले होते त्यामुळे स्वतःच्या डोक्यानेच औषध घेत. आय गो बाय प्रिस्क्रीप्शन. सेल्फ मेइडिकेशन ने धोका होउ शकतो. म्हणून लिहिले.

अनुभवकथनाबद्दल धन्यवाद !

आनुवंशिकतेचा पण काही भाग आहे का? >>>
होय.
आनुवंशिकतेचा वाटा सुमारे 40 ते 60 टक्के आहे.
गेल्या काही वर्षांत या संदर्भात जनुकीय कारणांचा सखोल अभ्यास होत आहे.

हार्ट अटॅक आणि मधुमेह ह्यांना आनुवंशिक आजार कसा ठरवणार.
कारण ह्या दोन्ही आजाराचे निदान,उपचार करण्याची मानव त क्षमता आताच काही दशकं पूर्वी आली आहे.
मग आनुवंशिकता कशी ठरवणार .
एक दोन पिढ्यांचा इतिहास म्हणजे आनुवंशिकता समजण्यास पुरेसा पुरावा आहे का?
हा पहिला प्रश्न .
२) ३० व्य वर्षी मुल झाले आणि ५० vya वर्षी मधुमेह झाला किंवा हार्ट विषयी आहार,विहार मुळे दोष निर्माण झाला तर तो पुढच्या पिढीत आनुवंशिक म्हणून कसा transfer होईल.
३) नैसर्गिक मृत्यू म्हणजे काय?
हा मला पडलेला सर्वात मोठा गहन प्रश्न आहे.
वृध्टव मुळे आलेला मृत्यू इतकेच मोजमाप आपण लावतो.
पण मृत्यू चे कारण शोधले तर.
Heart' attack, किडनी फेल,लिव्हर फेल, ब्रेन stroke, infections.
ह्या मधील एक कारण निष्पन्न होईल च .
पण जगात असे कारण शोधायची पद्धत नाही.
त्या मुळे आनुवंशिक आजाराची माहिती मिळण्याचे प्रमाण नगण्य आहे त्या मुळे निदान चुकीचं होते.
का?
हा प्रश्न पण आहे

‘आनुवंशिक’ आजार
चांगला मुद्दा.
सामान्य मराठीत “आनुवंशिक” हा शब्द मोघम आहे. वैद्यकीय शास्त्रानुसार आपण दोन मूळ इंग्लिश शब्द पाहू म्हणजे त्याच्या दोन प्रकारांमधला फरक स्पष्ट होईल.

१. Hereditary : या आजारांमध्ये ठराविक जनुकीय कारण/बिघाड माहित असते (त्याचा शोध लागलेला असतो).

२. Familial : या आजारांमध्ये जनुकीय वाटा असू शकतो परंतु अद्याप नक्की जनुकीय बिघाड कसा आहे, हे माहीत झालेले नसते. असा आजार एका कुटुंबातील बऱ्याच जणांना होताना आढळतो (affecting more family members than would be expected by chance alone).

वरील मुद्दा स्पष्ट होण्यासाठी एक उदाहरण देतो.
समजा, 40 वर्षांच्या एका पुरुषाला उच्चरक्तदाब आहे आणि त्याच्या हृदयाच्या कार्यात काही बिघाड आढळला आहे. त्याच्या वडिलांना त्यांच्या वयाच्या 65 व्या वर्षी हार्ट अटॅक आलेला होता.

आता, या गृहस्थाच्या आजारामागे तीन घटकांचा प्रभाव असतो :
१. कौटुंबिक इतिहास
२. (माहीत नसलेला) ? जनुकीय बिघाड
३. जीवनशैलीतील अनिष्ट घटक.

वरील तिघांचा एकत्रित प्रभाव बघता वरील रुग्णाचा सद्य आजार familial या गटात येईल.

या उलट मधुमेह ( प्रकार २) च्या बाबतीत जनुकीय घटकांचा अभ्यास मोठ्या प्रमाणावर झालेला असून किमान दोन डझन जनुकीय बिघाड माहित झालेले आहेत.
त्यापैकी TCF7L2 variants असे तांत्रिक नाव असलेला बिघाड भारत, जपान आणि पाच युरोपीय देशांमध्ये विविध वंशांत आढळून आलेला आहे.
आतापर्यंतच्या संशोधनातील हा सर्वात महत्त्वाचा बिघाड मानला जातो.

मधुमेह प्रकार २ हा आजार ( शारीरिक दोष ) खूप वर्षांपासून मानवात अस्तित्वात होता.
त्या मुळे जनिकुय बिघाड इतक्या स्पष्ट पने दिसत आहेत.
असे म्हणता येईल का?
जनुकीय बिघाड पुढल्या पिढीत संक्रमित होवून ते स्थिरवण्या साठी खूप वर्ष जावी च लागणार.
( उत्क्रांती चे नियम)

अजून एक शेवटचा प्रश्न.
आनुवंशिक आजार होण्याचे वय हळू हळू कमी होत आहे का?
म्हणजे जे पूर्वी ७० होते ते आता कमी कमी होत.
४० ते ५० पर्यंत आले आहे..

पूर्वी नव्हते बाबा मधुमेह,आणि अटॅक असे जे बोलतो आपण ते चुकीचं असू शकते.
पहिले पण हे आजार होते फक्त ७०, वयाच्या पुढे होत असल्या मुळे होणारे मृत्यू नैसर्गिक समजले जात होते.
हे मत योग्य आहे का?

आनुवंशिक आजार होण्याचे वय हळूहळू कमी होत आहे का?
>>>
नाही. असे सरसकट विधान आपण करू शकत नाही. Hereditary आजारांच्या बाबतीत संबंधित बिघाड एखाद्या व्यक्तीत कधी express होईल याबाबतीत खूप भिन्नता आढळते.

एक उदाहरण :
BRCA1 variant हाच बिघाड आनुवंशिकतेने एका बहिण-भावांमध्ये आलेला आहे.
वास्तवात असे दिसून आले :
त्या बहिणीला 45 व्या वर्षी स्तनांचा कर्करोग झाला, परंतु
त्या भावाला 72 व्या वर्षी प्रोस्टेटचा कर्करोग झाला.

जनुकीय पातळीवरील सूक्ष्म घटनांमध्ये खूप भेद असतो.

धन्यवाद डॉक्टर.
अनेक प्रश्नांची उत्तर मिळाली तुमच्या प्रतिसाद मध्ये

Pages