प्युअर सिक्वेन्स - भाग ६ (शेवटचा भाग)

Submitted by कविन on 26 October, 2023 - 23:59

भाग ५

भाग ६

मंगेश त्याच्या कामात खरच बेस्ट असावा. लकी त्याच्याकडे रिलॅक्स होता. सिद्धीने "गो चॅम्प!" म्हंटल्या म्हंटल्या तो मंगेशच्या मागोमाग घरात आतल्या बाजूला गेला देखील न कुरकुरता.

"बघ म्हंटलं होतं ना मी he is the best"

"खरय. He is the best" तिला उत्तर देताना मनात मात्र येऊन गेलं, "ही माझ्याबद्दल कधी, म्हणेल असं?”

त्यांच्यातला स्ट्रॉंग बॉंड स्पष्ट दिसत होता. फक्त मैत्री पुरता मर्यादीत नसावा असं सिक्स्थ सेन्स सांगत होता. आज च्यायला या सिक्स्थ सेन्सच्या. त्यादिवशी नकार द्यायचं ठरवलं दोघांनी त्यावेळी का बुडी मारुन बसलेला हा सेन्स? नकार कळवताना मधे काही अडथळे नाही आले आणि आता लॉजिक गुंडाळून ठेवून मनाच ऐकावं ठरवलय तर इतके स्पर्धक वाटेत यावेत? यापेक्षा लकी सोबतची बंपी राईड कमी बंपी होती. कुछ तो कर अवी. वरना तेरी रमी तो कभी ना लगने वाली. शूज काढून आत येताना मनात ही सगळी रोलर कोस्टर राईड सुरु होती.

जोरदार किंचाळ्या ऐकू आल्या म्हणून दचकून मी समोर बघितलं. दोन मुली किंचाळत, हसत एकमेकांना मिठी मारत होत्या आणि त्यातली एक सिद्धी होती.

"त्या अशाच भेटतात कायम. नॉर्मल आहे हे. तू का अवघडून बसलायस. बस की आरामात" पाठीवर थाप मारत मंगेश मला म्हणाला.

"ही माझी बायको सारीका" त्याने सिद्धीला मिठी मारणाऱ्या मुलीची ओळख करुन देत म्हंटलं.

"आणि माझी चुलत बहीण" सिद्धीने पूर्ण दात दाखवत हसून सांगितलं.

"ओह! मंगेश तुझ्या बहिणीचा नवरा आहे तर"

"नाही. सारीका माझ्या मित्राची बायको आहे." तिने म्हंटले.

“दोन्हीत फरक आहे?”

"हो मग. फरक आहेच. मी असं म्हंटलं की मंगेशचा इगो सुखावतो आणि मग तो ओव्हर प्रोटेक्टिव्ह भावासारखा न वागता एका मित्रा सारखा वागतो"

“ओके आणि..”

"आणि रात्र झालेय, घरी एकटी कशी जाशील? असे प्रश्न न विचारता फक्त राईड शेअर कर. घरी पोहोचलीस की कळव या दोन वाक्यावर मांडवली करतो" हे वाक्य तिने मंगेश आणि सारीकाकडे बघत ऐकवलं आणि मंगेशने फक्त "बोलू आपण जेवल्यानंतर" असं तिला सांगत माझ्याकडे बघितलं.

मला जेवणापेक्षा परतीच्या प्रवासात जास्त इंटरेस्ट होता पण असं डायरेक्ट दाखवून चालणार नव्हतं.

जेवल्यानंतर मंगेश लकीला खाणं द्यायला बाहेरच्या शेडमध्ये घेऊन गेला. जाताना सिद्धीलाही चल म्हणत सोबत घेऊन गेला.

चिन्याशी बोलायला मी फोन लावला तेव्हा ताई आणि जिजूशीही थोडंफार बोलणं झालं. अजून आठवडाभर तरी त्यांना तिथे रहावे लागणार हे समजलं. "डॉक्टर राऊंडवर आलेत एक दहा मिनिटात फोन करतो, मंगेशशी पण बोलेन त्यावेळी" असं म्हणत त्याने फोन कट केला. तिथे नुसते बसून करण्यासारखे काही नव्हते म्हणून मी शेड जवळ आलो तेव्हा त्या दोघांच बोलणं माझ्या कानावर पडलं.

"रजतला नाही म्हणालीस, ठीक. पण अरेंज मॅरेज करत्येस ना, मग ते काय ‘लव्ह अ‍ॅट फर्स्ट साईट’ सारखं असायला हवं का? कनेक्षन डेव्हलप व्हायला वेळ द्यावा लागतो." मंगेशचा आवाज स्पष्ट ऐकू आला.

तिला नसेल कनेक्टेड वाटलं आणि म्हणून नाही म्हणाली असेल तर याला काय प्रॉब्लेम आहे? मी इथे मनातल्या मनात चरफडून काय होणार म्हणा.

“त्याचं एक जाऊदे पण आसावरी म्हणाली की स्वरुपलाही नाही म्हणालीस? का? तो तर मित्र आहे ना? कनेक्षनचाही प्रश्न नाही. त्याला का नाही म्हणालीस हे शोध. Find and fix it” परत मंगेशचा चढा आवाज ऐकू आला.

याचा प्रॉब्लेम काय आहे? ती २७ ची आहे १७ ची नाही. सगळ्या जगाला नाही म्हणेना का, मर्जी तिची. मलाही म्हंटलंय नाही. त्याबद्दल काही ऐकवलं नसेलच या मंग्याने. माझ्या चरफडीला कोण भीक घालणार म्हणा. मी स्वतःही नकार देण्याचा गाढवपणा करुन झालाय. पण तरी ते काय ते find and fix it मधलं it नक्की काय आहे कळेपर्यंत चैनही नाही पडणार.

"आम्हाला काय कारण वाटतय तुला माहिती आहेच. तुलाही तेच वाटत असेल तर fix it. आणि सेकंड चान्स वगैरे वर तुझा विश्वास नाहीये असंच गेलं वर्षभर सांगत्येस आम्हाला याचाही शांतपणे विचार कर." त्याच्या या बोलण्यावर तिने काय उत्तर दिले समजले नाही कारण तोपर्यंत माझा वास येऊन लकीने भुंकून माझं लक्ष वेधायला सुरुवात केली होती.

त्याच्या भुंकण्यामुळे बोलणं थांबवून ते ही पुढे आले आणि मी ही नुकताच आतून आलोय असं भासवायच्या प्रयत्नात चिन्याला बोलायचं होतं म्हणून शोधत आलो असं म्हणत खरोखर फोन लावून मंगेशकडे दिला. फोन माझ्याकडून हातात घेताना ज्या नजरेने त्याने माझ्याकडे बघितलं त्यावरून मी सपशेल उघडा पडलो हे मलाही कळलं. पण त्याने त्याबद्दल काही सुनावलं नाही हे माझं नशीबच.

चिन्याला रोज फोटो आणि व्हिडीओ पाठवून अपडेट देईन लकीचे असं सांगून फोन कट करत त्याने माझ्याकडे परत दिला आणि मग आम्ही ओला राईड बूक करुन निघालो.

निघताना लकीला बाय करायला गेलो तर तो सगळ्यात पहिले माझ्याकडे आला. डोकं पायावर घासून मग तो सिद्धीकडे गेला. मी त्याच्यासाठी फार काही केलं नव्हतं तरी त्याने मला त्याच्या जगात सामावून घेतलं होतं. सिद्धीच्या जगात छोटी का होईना जागा हवी असेल तर लकी आणि मंडळींना माझ्या जगात प्रवेश द्यायला हवा हे मात्र मनात पक्क झालं.

आमची ओला राईड सुरु झाली. डेस्टिनेशन पर्यंत जायचा मॅप समोर दिसायला लागला.

डेस्टिनेशनला पोहोचायच्या आधी सिद्धीपाशी विषय काढायचा तर होता पण नेमका कशा पद्धतीने काढावा याबद्दल मनात द्वंद्व सुरु होतं.
मनात मांडणी सुरु होती. थोडावेळ शांततेत गेला. शेवटी विचार केला यात उडी मारावी वाटतेय यामागे काही लॉजीक नाही मग काय बोलू कसं बोलू याची लॉजिकल मांडणी तरी हवेय कशाला?

"सिद्धी विनायक" मी मनाचा हिय्या करुन तिला हाक मारली

“Yes मिस्टर अवनीश”

“मला तुझ्याशी काही बोलायचय.”

“हम्म! ऐकतेय”

“मगाशी तुमचं बोलणं मी ऐकलं”

तिने चमकून पाहिलं

“I swear मुद्दाम नाही. मुद्दाम अजिबात नाही. चिन्याला बोलायच होतं म्हणून शोधत आलो तेव्हा कानावर पडलं.”

“हम्म!”

“अरे! सिद्धी यार नुसतं हम्म नको. डोकं त्याबद्दलच विचार करतय. काय असेल ज्याबद्दल तो तुला find and fix it म्हणाला. आणि सेकंड चान्सवर तुझा विश्वास नाही असं का?”

“काय फरक पडतो?”

“म्हणजे?”

“म्हणजे हे काय आहे ते कळलं किंवा नाही कळलं फरक पडणार आहे का?”

“फरक पडतो म्हणून तर विचारतोय. डोक्यात निरनिराळ्या कहाण्या जन्म घेऊन युद्ध करतायत इथे. तुझ्या उत्तराने हे वॉर तरी कमी होईल.”

एकदा तिने ओला ड्रायव्हरकडे नजर टाकली. एकदा वाटलं हे असं तिसरी व्यक्ती बरोबर असताना नकोच होतं विचारायला. मी तिला तसं म्हणणारच होतो पण तिने तोपर्यंत बोलायला सुरुवात केली.

“दोन वर्षांपूर्वी माझं ब्रेक-अप झालं. आमच्या ब्रेक-अपचं एक कारण आमच्या दोघांचे प्रोफेशनल इंटरेस्ट वेगळे असणे हे होतं. त्याहूनही पेट्सशिवाय आयुष्य माहिती नसलेली माणसे आणि पेट्स आयुष्यात सहन न होणारी माणसे या रेषेच्या अलिकडे पलिकडे आमच्या दोघांचे जग फिरत होते. ही मधली रेषा ओलांडणे दोघांनाही शक्य नाही झाले"”

मी काही तरी बोलणार होतो पण तिने हातानेच थांबवलं आणि बोलणं पूर्ण करुदेत आधी असं सांगितलं म्हणून मी ही थांबलो.

“आमची सुरुवात एकमेकांविषयी आकर्षण वाटलं म्हणूनच झाली. त्यानंतर आम्हाला एकमेकांशी गप्पा मारायला आवडतात हे समजलं. दोघेही फुडी होतो सगळं छान छानच होतं.
त्यावेळेस मी वॉलेंटिअरिंग करत होते अ‍ॅनिमल शेल्टरमधे. महिन्यातून एक दिवस किंवा कधीतरी दोन तास, मी तिथे वेळ देत होते तोपर्यंत ठीकच होतं.
आम्ही भेटलो त्यावर्षीच खरंतर मी डॉग ट्रेनर म्हणून ट्रेनिंग पूर्ण करुन एका ट्रेनरकडे अनुभव घेत होते. म्हणजे प्रपोज करताना माझं प्रोफेशन हेच असणार हे त्याला माहिती होतं.
पण तो अजिबात पेट पर्सन नव्हता आणि माझ्याकडे तर झुबी आली होती तोपर्यंत.

आम्ही त्यावेळी म्हणायचो हा एक अ‍ॅस्पेक्ट आम्ही एकमेकांच्या जगाची घडी न विस्कटता सेपरेट ठेवून मॅनेज करु. पण असं नाही होतं.
झुबी माझ्या जगाचा एक भाग होती आणि त्याच्या जगात फक्त माझ्यासाठीच जागा होती. आम्ही तेव्हा काहीतरी मधला मार्ग काढायला हवा होता पण आम्ही त्या ऐवजी एकमेकांना बदलायला गेलो आणि तोंडावर आपटलो. ब्लेम गेम सुरु झाले, सरकॅझम उग्र पद्धतीने बाहेर आला आणि संपलं नातं एक कडवटपणा मागे ठेवून. त्या नंतर जो राग, गिल्ट, बर्निंग इफेक्ट्स राहिले ते जाण्यासाठी मला स्वतःलाच पेट थेरपी घ्यावी लागली. गेल्या वर्षी येऊन त्याने माफी मागून परत संधी देण्याची रिक्वेस्ट केली पण माझ्या बाजूने काही उरलच नव्हतं ज्यासाठी परत एकमेकांना संधी द्यावी.
त्यानंतर मी ठरवलं. पेट्स ज्याच्या जगात असतील अशा व्यक्तीचीच निवड करायची. अरेंज मॅरेज इतकी तर सवलत नक्कीच देतं ना तुम्हाला”, ती म्हणाली

मी काही न बोलता पाण्याची बाटली पुढे केली आणि तिनेही काही न बोलता ती तोंडाला लावली. मधे जरा वेळ फक्त शांतता बोलत होती.

“तर हा आहे माझा भूतकाळ. पण सध्या प्रॉब्लेम असा झालाय की माझ्या पेट्सवाल्या क्रायटेरियात बसणाऱ्या व्यक्तीला भेटूनही मला तिथे पुढे जावे असे वाटत नाहीये. याच्या कारणापासून मी पळतेय असं आसावरी, सारिका, मंगेश सगळ्यांनाच वाटतय. ते Find & Fix it म्हणाले असले तरी मला कारण माहिती आहेच. ते शोधायची गरज नाहीये मला. Fix it तेव्हढं नाही जमलंय अजून, का ते मात्र विचारु नकोस आत्ता.” ती म्हणाली आणि ते कारण मी माझ्या फेवरमधे असेल असं मानून पुढचं बोलूनच टाकलं

“ठीक आहे. आज नाही विचारत. पण आता माझा भूतकाळ सांगतो. चालेल?”

“ऐकतेय.”

“माझ्या जगात मी अत्यंत सुखी होतो आणि माझ्या टर्म्सवर जगत होतो. मग एक दिवस ती माझ्या जगात आली. सुरवातीला मला लक्षातंही नाही आलं तिने आत जागा केलेय. मी तर समजत होतो आमचं जगच वेगळं आहे. पण तिचे विचार आले मनात की छान वाटायचं. तिचा मेसेज आला की शीळ घालावी वाटायचं. लॉजिक नव्हतं कळत पण काही गोष्टींचं लॉजिक शोधायचं नसतं हे ही तिनेच लक्षात आणून दिलं. रमीत प्युअर सिक्वेन्स लागला होता पण पत्ता खाली टाकल्यावर समजलं हे आणि आता समजतय की ती सेकंड चान्सच देत नाही.”

सुरवातीला गंभीर होऊन ऐकत असलेल्या तिच्या चेहऱ्यावर आधी संभ्रम आणि नंतर हलके हसू पसरलं.

ते बघूनच आर या पार म्हणत मी एकदाचं विचारुनच टाकलं.

“तुला नकार देणं हा जगातला मोठा गाढवपणा होता हे मला रोज, अक्षरशः रोज तितक्याच तीव्रतेने जाणवतंय. आपली सुरवात नकाराने झाली पण आपल्यातली केमिस्ट्री तेव्हाही नव्हती लपली. आपण एकमेकांना कधीच दुखावणार नाही, याची खात्री तर मी देऊ शकत नाही. पण अडचणी आल्या तर भिडू ना एकत्र. सिद्धी विनायक, मला तुझ्या बरोबर एकत्र प्रवास आवडेल. तुझ्या बरोबर म्हातारं व्हायला आवडेल. काही गोष्टीत लॉजीक नसते बघायचे असं तूच म्हणालीस ना! मग प्लीज या लॉजिक नसलेल्या कनेक्षनला एक संधी देऊन पहाशील? मला परत एकदा ग्रॅंडमामाज कॅफेमधे उद्या संध्याकाळी भेटशील?” हे बोलून झाल्यावर धडधड १०० पट वाढली होती. श्वास रोखून मी तिच्या उत्तराची वाट बघत होतो. तिच्या एका निर्णयावर माझ्या सिक्वेन्सचं स्टेटस ठरणार होतं.

“चालेल, पण यावेळी आतलं टेबल रिझर्व्ह करणार असशील तरच" माझा हात हातात घेऊन ती इतकंच बोलली पण त्या एका वाक्याने माझी अख्खी राईड पार मख्खन राईड होऊन गेली.

समाप्त.

Group content visibility: 
Use group defaults

बेस्ट! अगदी योग्य जागी संपली. पुढे काय ते शब्दात नकोच.
म्हातारं व्हायला आवडेल खटकलं पण मग हल्ली असच बोलत असतील असं ही वाटलं. तसही संवादात आहे त्यामुळे चालून जाईल.
'सम डे आय शेअर हर होम' , ' आय विल नॉट गिव्ह यू अप धिस टाईम' .... ओला मध्ये एड शीरेन च परफेक्ट लागलं आहे, अव्याने तिचा हात हातात घेतला आणि कोणीच काही बोललं नाही... शेवटी एंजल पर्सनला ती दुसरा हात पण देते असा शेवट दृकश्राव्य माध्यमात मस्त होईल. एकदम रोमँटिक आणि तरल. Lol
आवडली आणि मजा आली वाचताना! धन्यवाद.

अनिरुद्ध, अश्विनी, अमित, समाधानी, अनघा धन्यवाद

तुम्हाला सगळ्यांना वाचताना मजा आली हे वाचून छान वाटलं.

मलाही लिहिताना मजा आली होती. अगदी प्रत्येकच भेटीच्या जागा ठरवताना तिथपर्यंतचा रुट मार्क करत व्हर्च्युअली त्या ठिकाणी पोहोचणे असो, तिथला मेन्यू चेक करुन ऑर्डर डिसाईड करणं असो किंवा बाईकला खरोखरच त्या त्या ठिकाणी पार्किंग जागा आहे का चेक करणे असो मी संपूर्ण प्रवास एंजॉय केला. या निमित्ताने डॉग ट्रेनर्सचे इंस्टा प्रोफाईल फॉलो केले. दोन्ही जेंडरचे ट्रेनर्स फॉलो केले. त्यांच्या पोस्ट्स, रिल्स आणि फीडबॅक पोस्ट्स /review posts मधून प्रोफेशन बद्दल लिहिताना मदत झाली आणि या प्रोसेस मधे मला स्वतःला बरीच नवीन माहिती मिळाली. काही माहिती आधीही होती ती पक्की झाली डोक्यात.

गमतीशीर अनुभव - माझे पाच भाग लिहून पूर्ण झाले कथा संपूर्ण झाली आणि मग परत वाचन करताना मला आत्ता जो पार्ट ३ आहे तो लिहायची गरज वाटली. तो मधे आला आणि भाग ५ च बारसं भाग ६ झालं.

ही एक कथा अशी निघाली की शेवट लिहे पर्यंत मला शिर्षक मिळाले नव्हते. मला सिक्वेन्स/ रमी हा संदर्भ द्यावा वाटत होते पण त्यादृष्टीने विचार पक्का होत नव्हता कारण तितका उल्लेख पहिल्या ड्राफ्टमधे सगळ्यात भागात स्प्रेड झाला नव्हता. एका मैत्रिणीने ड्राफ्ट वाचून हे शिर्षक सुचवले. मग मात्र ते डोक्यात फिक्स झाल्यावर मी परत त्यादृष्टीने सगळ्या भागांमधे हा कंसेप्ट स्प्रिंकल केला इथे तिथे Proud

सगळे भाग लिहून पूर्ण झाल्याशिवाय म्हणून मी भाग १ पोस्टायचे डेअरींगही करत नाही. पण जरी बेसिक ड्राफ्ट तयार असला माझा तरी काही फिलर्स मला तुमच्या प्रतिसादामुळे दिसले आणि त्या सगळ्याची मला प्रत्येक नवीन भाग फायनल करताना/ एडीट करताना मदत झाली. त्याबद्दल मनापासून आभार.

छान कथा आवडली. पण एकदम संपल्यासारखी वाटली. हल्लीच्या शिरेलवाल्यांकडून शिकून थोडी ताणता आली असती Wink

बस्टम बेस्ट. सही फ्लो, क्रिस्पी घटनाक्रम, सगळंच आवडलं. शेवटही छान झालाय. सिध्दी विनायक, अशी हाक मला ऐकू आली दर वेळेस. तुझी कथा लिहायची प्रोसेस पण तेवढीच मस्त आहे. मागच्या वेळीच ते जाणवलेलं. ह्या गोष्टी वर खरंच खूप छान वेब सिरीज किंवा फिल्म बनू शकते.

धन्यवाद स्वाती, पराग, धनुडी, मीरा

हल्लीच्या शिरेलवाल्यांकडून शिकून थोडी ताणता आली असती Wink>> नको नको आहे हे बरं आहे Lol

मस्त झाली कथा! शेवटच्या कबुलीसाठी अजून एखादा भाग घेतला असता तरी चालला असता असे वाटले. ओला ड्रायव्हर चा (त्यांच्यापेक्षा) मला जरा त्रास झाला Proud Happy

मस्त झाली कथा! शेवटच्या कबुलीसाठी अजून एखादा भाग घेतला असता तरी चालला असता असे वाटले>+1.

मनापासून धन्यवाद @काविन, एवढी छान गोष्ट मायबोली वाचकांना दिल्याबदद्ल
अगदी अमोल पालेकर चा सिनेमा बाघतोय अस वाटलं, पुन्हा सगळे भाग सलग वाचले.
तुमच्या कडून असच सुंदर लेखन होत राहो ही सदिच्छा.
गोष्टीतील पात्र, घटना, संवाद अगदी सहज वाटतात, खरे भासातात.
>>>मला तुझ्या बरोबर एकत्र प्रवास आवडेल. तुझ्या बरोबर म्हातारं व्हायला आवडेल.>>>
हे मला सर्वात जास्त आवडलं, नुसत्या गोड गोड संसारची स्वप्न नाही तर एक आयुष्य भराची कटिबध्दता दिसते, तो नक्कीच तयार आहे, पण सिद्धी ने अजून थोडा वेळ घ्यायला हवा, पुन्हा कटू अनुभव नको. पान उचलय तर सिक्वेन्स जुळवायला हवा.

मस्तच जमली आहे कथा, आज सगळे भाग सलग वाचले.
कॉलेज मध्ये असताना कथा कादंबऱ्यात मन रमायच पण हल्ली अनेक वर्ष कथा / फिक्षन मला एवढं आवडत नाही. पण तुझी गोष्ट मन लावून वाचली आणि आवडली ही खुप.
तू वर लिहिलेली गोष्टीच्या मागची गोष्ट ही आवडलीच. किती मेहनत घेतली आहेस, पण चीज झालंय त्याच.
अश्याच छान छान कथा लिहीत रहा.

छान शेवट ! थोडा फिल्मी झालाय पण तरीही छानच वाटतोय. अजून एक दोन भाग रचले असते तरी कोणीही तक्रार केली नसती Happy

मस्त मस्त मस्त. खूप आवडली कथा. त्याचं प्रपोजल सगळ्यात जास्त आवडलं. कुठेतरी सिद्धिला पण तो आवडत असणार, हो ना? नाहीतर इतक्या लगेच विचार करायला तयार कशी झाली असती?

लिहीत रहा ग. छान लिहितेस.

अजून एक दोन भाग रचले असते तरी कोणीही तक्रार केली नसती >>> +१ Happy

आवडली कथा. जरा अजून मोठी चालली असती खरंच..
आणि ओला ड्रायव्हरला साक्षीदार नसतं केलं तर जास्त आवडलं असतं Lol

फारच गोड गोष्ट.

काल सलग पहिले ५ भाग वाचले होते. आज शेवटचा वाचला. प्रपोझ करण्याची स्टाईल आवडली. +१११
ह्यावर एक छान video होऊ शकतो. web story Happy

ओला ड्रायव्हर चा (त्यांच्यापेक्षा) मला जरा त्रास झाला Proud Happy>> मलाही झाला असता पण बिचाऱ्यांना मी लाजकाज सोडायला लावली तिथे Lol

झेलम, मैत्रेयी, मन्या, ममो, असामी, रमड, शरद, वावे, किल्ली, प्राचीन धन्यवाद

पण तुझी गोष्ट मन लावून वाचली आणि आवडली ही खुप.>> धन्यवाद ममो

ह्यावर एक छान video होऊ शकतो. web story Happy>> धन्यवाद किल्ली.

थोडा फिल्मी झालाय>> I know. रक्तगट बॉलीवूड पॉझिटिव्ह असल्याचा परिणाम Proud

लिहीत रहा ग. छान लिहितेस.>> येस्स बॉस

मनापासून धन्यवाद @काविन, एवढी छान गोष्ट मायबोली वाचकांना दिल्याबदद्ल
अगदी अमोल पालेकर चा सिनेमा बाघतोय अस वाटलं, पुन्हा सगळे भाग सलग वाचले.
तुमच्या कडून असच सुंदर लेखन होत राहो ही सदिच्छा.>>धन्यवाद

परत एकदा सगळ्यांचे आभार. सुचना डोक्यात जमा करुन ठेवल्यात सगळ्या. कधीतरी एडीट करायला जमले तर त्यांचा वापर करायचा प्रयत्न करेन. (भाग २ वगैरे नाही लिहीणार आहेथोडक्यात गोडी. याच कथामालिकेत पुढे कधी जमल्या तर सुधारणा करेन)

आज सगळे भाग वाचून काढले.
मस्तच!!
एकदम फ्रेश फ्रेश ताजा ताजा फिलिंग.
अजूनही २,३ भाग आवडले असते मलाही.

एक नंबर होती ही कविन! खूप आवडली. ल फ्लोर नंतरची अजून एक मस्त लव्हस्टोरी!! या गोष्टीसाठी खूप खूप thank you. पुढच्या लेखनासाठी शुभेच्छा.

तुम्ही सूचना पॉझिटिव्हली घेताय म्हणून लिहायचं धाडस करतोय.

हल्ली हम्म्म असं लिहिलं जातं. उच्चार पाहता ते हं किंवा हंऽऽऽ असं हवं असं मला वाटतं.

तसंच कथांमध्ये सलग संवाद , तेही एकेका - अर्ध्या वाक्यांचे आले की मला ते नाटकासारखं वाटायला लागतं. संवाद येणं स्वाभाविक आणि अपरिहार्य आहे, पण नावाजलेल्या कथालेखकांच्या कथांत तसं असतं का? ते कसं मांडतात?

कविन, खूप छान कथा लिहिली आहेस. तुझी आधीची कथासुद्धा (प्रेस्ड फ्लॉवर ईयरीन्ग्ज सकट) मला खूप आवडली होती.
या कथेचा पहिला भाग इथे आल्यापासून ती पूर्ण होण्याचे वेध लागले होते. कारण मला पूर्ण कथा एका दमात वाचायची होती.
वाचल्यानंतर अजून थोडे भाग हवे होते असे वाटले इतकी त्यामध्ये गुंगून गेले.
वरच्या प्रतिसादांत तुझी कथेसाठी केलेली तयारी वाचून आणखी कौतुक वाटले.
धन्यवाद ही छान गोष्ट आम्हाला वाचायला दिल्याबद्दल आणि पुलेशु.

वंदना, धनवंती, गोगा, भरत, एस धन्यवाद

तुम्ही सूचना पॉझिटिव्हली घेताय म्हणून लिहायचं धाडस करतोय.>> सुचना नोट करुन ठेवल्या आहेत. सगळ्याच कंस्ट्रक्टिव्ह सुचनांचा फायदा होतच असतो. बरेचदा जरा गॅप घेऊन (३-४ महिन्या नंतर) मग कथा वाचायला घेतली की मग एडीट करायच्या जागा सापडत जातात त्यावेळी या सुचनाही हेल्पिंग हॅंडचे काम करतात.

कवे खूप लवकर संपवलीस गोष्ट. खूप आवडली. खूप अभ्यासपूर्वक लिहितेस हे प्रत्येकवेळी जाणवतं.
तुझे पेटप्रेम सगळीकडे डोकावतय Happy
पूर्वी मी कम्प्लीट अवनीश होते, मग माऊ घरी आली आणि धाकधूक लेव्हल पार करत सिद्धीचं जग माझं झालं > त्याही पलीकडे जाऊन तू ऍनिमल कम्युनिकेटर झाली आहेस हि खरंच कौतुकाची गोष्ट आहे. प्रत्येक गोष्ट मनापासून करतेस म्हणून कदाचित प्राण्यांच्या मनातलं पण ओळखू शकतेस.
तुझ्या बरोबर म्हातारं व्हायला आवडेल. > हे आवडलं मला
कवे याचा सिक्वल लिही ग, छान लिहिशील.

Pages