भाग ५
पुढल्या दोन मिनिटात ओला कार गेट मधून आत आली.
कारमधे मागच्या बाजूला सिट कव्हर पसरुन पाठ टेकतो तिथे त्याच्या ब्लॅंकेटची चौघडी ठेवून लकी महाराजांना खिडकीजवळ स्थानापन्न केले. त्याच्या बाजूला मधल्या सीटवर सिद्धी बसली. दुसऱ्या खिडकीजवळ लकीची प्रवासी बॅग ठेवून मी ड्रायव्हरच्या बाजूला बसलो.
गाडी एसी असल्याने खिडकीच्या काचा बंद होत्या. लकीने बाहेर डोकं काढलं तर? बाहेर निघायचा प्रयत्न केला तर? या माझं बिपी वाढवणाऱ्या शंकांना त्यामुळे सध्या पूर्णविराम मिळाला होता.
सुरवातीला सगळीकडे नाक लावून हुंगण्यात त्याचा वेळ गेला. थोडावेळ तिने त्याला च्युईंग स्टिक्स देऊन त्यात रमवलं.
त्यादरम्यान मी रस्त्यावर कमी त्यांच्यावरच अर्धावेळ लक्ष ठेवून होतो.
इतकी तयारी करावी लागते दोन तासाच्या एका ट्रॅव्हलसाठी हे बघूनच गरगरायला लागलं होतं मला. चुकून म्हणजे अगदी चुकून मी माझ्या नकार द्यायच्या कारणाकडे दुर्लक्ष करुन एका रॅंडम इल्लॉजिकल आकर्षणाचा विचार केला असता तर रोजच्या आयुष्यात मला झुबी नावाच्या वादळाला प्रवेश द्यावा लागला असता. लकीला फक्त काही तास सांभाळून इतका दमला मेंदू माझा.
ही अशी सगळी पेट रिलेटेड गुंतागूंत २४/७ ३६५ दिवस झेपवू शकेन का? बहुतेक नाहीच.
पण मग सिद्धी बरोबरचे मॅजिकल क्षणही यापुढे विसरावे लागतील. स्मोकी आईज, हा मेसी बन, हा किलर ड्रेस आणि लंच डेट माझ्या नशीबात कधीच नसेल? सेकंड चान्सचा विचार पक्का करायचा असेल तर झुबी नावाची फ्लिप साईड स्विकारावी लागणार.
तिचं माझ्याकडे लक्ष जाताच तिने मानेनेच “काय?” असं विचारलं आणि उत्तरा ऐवजी मी उगाचच "लकी ठीक?" असा प्रतीप्रश्न केला.
“so far all good.” तिने वेट वाईप्सने चेहरा पुसत उत्तर दिलं
“Black suits you.” मला कळायच्याही आधी माझ्या तोंडातून निघून गेलं.
“Thank you.” तिने हसून प्रतिसाद दिला.
नशीब तिला ऑफेन्सिव्ह नाही वाटलं बोलणं मेंदू हललाय माझा नक्कीच. त्याशिवाय हे असं भीडभाड न बाळगता बोलून टाकलंच नसतं मी कितीही बोलावं असं मनातून वाटलं तरी. या विचारांमुळे तिचं हसणं फॉर्मॅलिटी म्हणून होतं की माझी कॉंप्लिमेंट आवडल्यामुळे होतं याकडे दुर्लक्षच झालं माझं. आता इथे सेकंड चान्स कसा मिळणार? पहिल्यावेळी कुठे माती खायला जातो मेंदू च्यायला. पण इतकं छान तयार होऊन गेली लंच डेटला म्हणजे तिच्या क्रायटेरियात बसणारीच व्यक्ती असणार. मन पुन्हा सालं नको त्या विषयात घुसलं.
नशीब त्या लकीने चित्र विचित्र आवाज काढून वास्तवात आणलं आणि उलटपालट, भलभलत्या विचारात गुरफटलेल्या मला भानावर आणलं.
तिने त्याची लीश एका हाताने पकडली होती. पण तो अस्वस्थ झालाय समजत होतं. मधेच शांत तर मधेच चुळबूळ आणि मधेच विचित्र आवाज असं एकंदर सुरु होतं.
आत्ताशी आम्ही काशिमिरा फ्लायओव्हर पर्यंत पोहोचलो होतो आणि या स्थितीतल्या कुत्र्याला कसं नॉर्मल करायचं याचा अनुभव मला शून्य होता.
“एसी बंद करुन खिडकीची काच खाली घेऊन पाहूया? कदाचित कार सिकनेस कमी होईल” असं तिने सुचवल्या सुचवल्या मला एसीत घाम फुटला. त्याने डोकं बाहेर काढलं आणि मागून वाहन आलं तर काय?. पण तरी तिचे म्हणणे ऐकून आम्ही खिडकीची काच खाली केली. पुढचे दोन पाय खिडकीत ठेवून लकी महाशयांनी लागलीच बाहेर डोकं काढलच पण थोड्यावेळाने बाहेरचा वारा लागून म्हणा किंवा मनासारखं करायला मिळाल्यामुळे म्हणा तो बराच शांत झाल्यासारखा वाटला. डोकं आत घेऊन त्याने तिच्याकडे तोंड केले. माझं अर्ध्याहून जास्त लक्ष मागे त्यांच्याकडेच होतं. त्याने आतल्या बाजूला तोंड केल्यावर मी हुश्श केलं ते तिच्या नजरेतून सुटलं नाहीच.
“रिलॅक्स. आता मख्खनी राईड असेल पुढची. तो सेटल झालाय आता.” तिने एकीकडे त्याला ट्रीट देत मला हसत हसत ऐकवलं.
तिने तिच्या मोबाईलवर कुठल्यातरी रागातली बंदीश हलक्या आवाजात लावली. एकीकडे लकीला हलक्या हाताने मसाज करत अगदी हळू आवाजात त्याला 'तो सेफ आहे, रिलॅक्स आहे' असे काहीबाही सांगत होती.
नक्की कशाचा परिणाम झाला ते माहिती नाही पण लकी आता खरोखरच सेटल झाल्यासारखे वाटत होते. व्हाईनिंग बंद होऊन आता निष्पाप निरागस चेहरा करुन तो तिच्या मांडीवर डोकं ठेवून बसला होता. मग मात्र खरच मला प्रवास मख्खनी का काय तो वाटायला लागला.
"कुत्र्यांना शास्त्रीय संगीत आवडतं हे नवीच माझ्यासाठी" मी मागे बघत म्हंटलं.
“हे तर काहीच नाही. आमच्या झुबीला तारक मंत्र आवडतो स्वामी समर्थांचा पण तो ही फिमेल सिंगरने गायलेला. पुरुषाच्या आवाजातला ऐकला की ढिम्म फरक पडत नाही तिच्यात पण बायकांच्या आवाजातला सुरु केला की शांत ऐकत बसते समोर.”
"चल काहीतरीच. मीच भेटलो काय आज मस्करी करायला?"
“अरे! मस्करी नाही. खरच. झुबीची शप्पथ. तुला अनुभव नाही म्हणून खरं वाटणार नाही पण ज्यांच्याकडे प्राणी आहेत त्यांना विचार. तुला बरेच अविश्वसनीय किस्से आणि अनुभव ऐकायला मिळतील.”
या वाक्यावर मी “धन्य हो आप लोग” म्हणत हसून जात जोडले
“I know it sounds illogical पण आपल्याला त्यावेळी जे आतून वाटते ते बरेचदा फेल जात नाही हा माझा अनुभव आहे.” ती म्हणाली.
“It sounds like..”
“like different world?” माझा प्रश्न तिनेच पूर्ण केला.
“yaa something like that. Its different. No offense. पण माझ्यासारख्या पेटवर्ल्ड अशिक्षित व्यक्तीसाठी थोडं गरगरवणारं.” मी म्हंटलं.
“I can understand. मी नॉन स्टॉप बडबड करु शकते या विषयावर पण घाबरू नकोस मला इतर गप्पाही मारता येतात आणि इतरांना बोलायची संधीही दिली पाहिजे ना, तर मला लोकं सांगणार ब्लॅक सुट्स मी“ तिने हसत म्हंटलं.
“ओssके!” म्हणजे मगाचचं हासू हे कॉंप्लिमेंट आवडली म्हणून होतं तर.
"बस ओक्के? स्मार्ट ब्युटिफुल वगैरे शब्द नाहीत का तुझ्या डिक्ष्नरीत?"
"हायला! मी आपला फ्लर्ट करतोय वाटू नये म्हणून आवरुन सावरुन बोलतोय आणि तू उडव माझी टर आता"
"मगाच पासून तुझी सारखी तंद्री लागतेय म्हणून म्हंटलं जरा तुला धक्का देऊन जागं करावं"
“बर मग मलाही आवडेल असच काही ऐकायला माझ्याबद्दल” मी तोच मूड पकडून ठेवत म्हंटलं.
“हम्म! बघ हा डोक्यात नाही ना जाणार कौतुक तुझ्या?” तिने खट्याळपणे विचारलं.
“कर तर आधी कौतुक” मी म्हंटलं.
“काय सांगू अवनीश तू म्हणजे ना ..”
“हम्म! ऐकतोय”
“अगदी गुणग्राहक आहेस. तुला गुणांची पारख आहे.“ तिने मिश्किलपणे म्हंटलं.
तिचा रोख मी तिच्या केलेल्या कौतुकाबद्द्ल होता हे ओळखून मी म्हंटलं तिला, “तू माझ्या प्रोफेशनमधेही चमकली असतीस.“
“मी LLB आहेच रे”
“म्हणजे lover of last benches?”
“हुशार आहेस”
“चला तू ही गुणग्राहक आहेस” मी परतफेड करत म्हंटलं.
"मान गए वकील साहब" तिने हसत म्हंटलं.
नाजूक किणकिणतं नसलेलं मोकळं हसूही छान वाटतं कानाला हे आजच समजलं.
"बरं पण तुझी खरच कमाल आहे. चिन्मय खरच लकी आहे." ती म्हणाली.
तिच्या वाक्यावर मी नुसतं झोपलेल्या लकीकडे बघितलं तसं तिने "एss! चल नाही हा" म्हणत हसत पुढे झुकत खांद्यावर गुद्दा मारला.
बॉस! फ्रोजन शोल्डर झाला ना तिथल्या तिथे. गोठला खांदा, स्पर्श झालेला. बरेच लेम जोक्स तयार ठेवायला हवेत असे, हे त्यातही मेंदूने गोंदवून ठेवलं.
इतका चांगला मूड आणि माहौल तयार झालाच होता तर म्हंटलं तिला दारात पाहिल्यापासून मनात दाबलेले विचार बोलूनच टाकूयात.
“बरं पण खरं सांग आमच्यामुळे म्हणजे चिन्या, लकी आणि माझ्यामुळे तुझी लंच डेट खराब झाली ना आज?”
“चल रे! असं काही झालं नाही.”
“let me guess एकंदर तयार होण्यावरुन कुणा यंग हॅंडसम वेटर्नरी डॉक्टर बरोबर किंवा तुझ्यासारख्याच दुसऱ्या एखाद्या स्मार्ट डॉग ट्रेनर बरोबर ब्रांद्र्याला लंच डेटला गेली होतीस. मग लंच आटोपल्यावर छानशा आयस्क्रिम पार्लरमधे जाऊन आयस्क्रिम खायच्या विचारात असताना नेमका त्या मंगेशने कॉल केला आणि माझ्या फोन न उचलण्याने रसभंग होऊन तुला डेट अर्धवट सोडून यावं लागलं. Am I right or am I right”
"वाह! वकील सहाब वाह! मान गये." तिने हसत ऐकवलं आणि माझ्या पोटात मात्र उगाचच खड्डा पडला.
"अंदाज अर्धा चूक अर्धा बरोबर. ना वेटर्नरी ना ट्रेनर पण.."
"Its ok. Its your life.", मी उगाच विषय कट करायला म्हंटलं
"It was date with my girl gang and nobody among them is vet and I am the only trainer in my group." तिने खांदे उडवत ऐकवलं तेव्हा दिल गार्डन गार्डन हो गया.
तरी जरा शंका होतीच शिल्लक. मी, चिन्या आणि किर्ती पार्टी करतो तेव्हाही आम्ही नेहमीच्या अवतारातच भेटतो.
मी मस्करीच्या टोनमधे ऐकवलं हे तिला तर हसायलाच लागली.
"आमची गॅंग जरा क्रेझी आहे. हॉटेल ठरवायचं काम माझ्याकडे असतं पण ड्रेसकोड ठरवायचं काम आसावरीचं. नाहीतर माझा आपला राष्ट्रीय ड्रेसकोड ठरलेला असतो ब्ल्यू जीन्स आणि ब्लॅक टीशर्ट" तिच्या या उत्तरावर मनातल्या मनात मी आसावरीचे आभार मानून टाकले.
"By the way तू ही मस्करी करतोयस का माझी. मी पहिल्या भेटीत माझ्या प्रोफेशनमधल्याशी लग्न करायचं म्हंटलं होतं म्हणून?" तिने कपाळाला आठ्या आणत विचारलं.
"नाही. अजिबात नाही. आणि मीही म्हणजे?" मी गोंधळून विचारलं.
“आज लंचला मीच टार्गेट होते ना गृपमधे. ते काय ते आसावरीचं आम्हाला, 'अशी पोझ द्या तशी पोझ द्या' करत शूटबीट करुन झालं पण तिच्या शूटच्या ब्रेकमधे तोंडी लावायला मी आणि माझे कांदेपोहेच तर होते"
“Its ok. पर्सनल चॉईस आहे तुझा तो“
“पण गंडलेला चॉईस आहे असं सगळ्यांनाच वाटतय”
“का असं?”
“असच रे. दोघांना भेटले या दरम्यान.”
“म्हणजे आपण पहिल्यांदा भेटलो त्यानंतर?”
“हो. अफकोर्स, आपण भेटल्यानंतरच. आपण नकार दिला ना एकमेकांना, म्हणून मग बावन्न पत्ते समोर टाकत निवड यातला एक आणि लाव तुझा प्युअर सिक्वेन्स म्हंटले घरच्यांनी. म्हणजे या शब्दात नाही अगदी पण असंच काहीसं."
“मग?”
“नाही लागला ना पण.”
“का? तुझ्या क्रायटेरियात बसणारं प्रोफेशन नव्हतं?”
“होतं ना. एकतर वेटर्नरी डॉक्टर होता.”
“त्याने नकार द्यायचा प्रश्नच नाही येत तरी विचारतो. त्याच्याकडून नकार होता?”
“नाही. त्याचा होकार होता“
“मग? कुठे अडला सिक्वेन्स रमीचा?”
“माहिती नाही. मला तो अख्खा सिक्वेन्सच वरवरचा वाटला. मला आनंदच नाही झाला कशाचा. ना आमच्या भेटीचा ना गप्पांचा ना त्याच्या होकाराचा.”
“का पण? याचं काय लॉजीक?”
“no logic. काही गोष्टी इल्लॉजिकल असतात.”
"खरय प्रत्येक गोष्टीत लॉजीक शोधायचेही नसते" मी तिच्या डोळ्यात बघत म्हंटलं
तिच्या वाक्याने कारण नसताना मनाला गुदगुल्या झाल्या. नाही खरतर 'कारण नसताना' हा शब्द प्रयोगच चुकीचा. कारण तर होतं फक्तं ते स्विकारायची माझी तयारी झाली आहे का हे तपासायची वेळ आली होती. कारण स्विकारायचं तर फ्लिप साईडही स्विकारावी लागणार आणि त्याच गोष्टीची खरतर किती तयारी आहे हे तपासायला हवे होते स्वतःपाशी.
मी नकार दिलाय. तिने मला नकार दिलाय. मला माझ्या प्रोफेशन मधल्या मुलीशीच लग्न का करायचय याचं लॉजिक तर परफेक्ट आहे पण मनाला त्यात उडी मारावी वाटत नाहीये.
जिथे नकार देऊन पुढे आलोय तिथून पुढे यायला मात्र मन नकार देतय. पेट्सचा असा इतका शिरकाव मला माझ्या आयुष्यात झेपणार आहे का असे मगाशी मनात आले खरे पण खरतर यावर विचार करायचीही वेळ आता उलटून गेलेय. हे असेल इल्लॉजीकल पण तरी ती सोबत असेल तर मी आजवर न चाललेली वाटही चालायला तयार आहे. फक्त तिलाही असेच वाटत असूदेत म्हणजे मिळवले. या सगळ्या विचारांच्या वादळात भेलकांडलो होतो मी.
ओलाचा मॅप, 'डावे वळण घेऊन १५० मिटर सरळ गेले की डेस्टिनेशन येईल' असे दाखवत होते.
लकीला सोडून परत येताना याबद्दल बोलायचं असं मी ठरवून टाकलं. ओला राईड ऐवजी परत येताना बाईक राईड असायला हवी होती यार हे वाटून हळहळायला झालेच पण इलाज नव्हता. असेल नशीबात तर करु ती ही कधीतरी.
“बरं आधीच कल्पना देऊन ठेवते.” तिने माझी तंद्री मोडत म्हंटलं.
सिक्स्थ सेन्स ते मंगेश बद्दलच असावं सांगत होता मला .
“मंगेश तुला दहा प्रश्न विचारेल कदाचित. आपली ओळख कशी झाली? कधी झाली? वगैरे वगैरे.”
“का पण?”
“तो तसाच आहे. जवळच्या लोकांच्या बाबतीत जरा ओव्हर प्रोटेक्टीव्ह.”
च्यायला! गाडीने अजून पहिला गिअर नाही टाकला माझ्या तर स्पिड ब्रेकरच समोर. मनात असेच आले पण तरी तोंडावर मी फक्त 'बर' इतकच ऐकवलं.
“तू मनावर नको घेऊस. मी करेन मॅनेज त्याला. मी फक्त तुला कल्पना असावी म्हणून सांगितलं.”
“आणि काही?”
“कदाचित रहायचा आग्रह होईल. त्याला मॅनेज करणं सोपय एकवेळ पण त्याच्या घरच्यांना नाही. काही नाही तर जेवल्याशिवाय काही सोडणार नाही कोणी. आत्तापर्यंत माझ्या आवडीचा बेत तयारही झाला असेल.”
“स्पेशल ट्रिटमेंट?”
"Yes for special people. You know" तिने हसत उत्तर दिलं.
“सिद्धी विनायक!!”
“बोल!”
“काय बोलू?”‘
“काही बोलू नका वकील साहेब. आपलं डेस्टीनेशन आलं. दार उघडा. समोरुन मंगेश येतोच आहे.”
"As you wish Mam" मी पुढे झुकून दार उघडत म्हंटलं
डेस्टीनेशन आलं, गेट उघडून मंगेश पुढे आला. त्याने लकी बॉय असं म्हणत एका हातात लकीची लीश घेतली आणि looking gorgeous म्हणत सिद्धीला एका बाजूने मिठीत घेतलं.
“दिसणारच. मी ब्लॅक ड्रेस घातलाय ॲंड ब्लॅक सूट्स मी. Am I right or Am I right Avnish?”
“You are always right!” सिद्धी विनायक. मी म्हंटलं.
क्रमशः
खूप cute कथा आहे. . आम्ही माऊ
खूप cute कथा आहे. . आम्ही माऊ पालक असल्याने आणखीनच मजा येतेय वाचायला.
कहानीमें ट्विस्ट तो नही यह
कहानीमें ट्विस्ट तो नही यह ट्रैंगलवाला !
सर्वच भाग एकदम सरस झालेत. पुभाप्र
धन्यवाद मनिम्याऊ आणि अज्ञानी
धन्यवाद मनिम्याऊ आणि अज्ञानी
@मनिम्याऊ आम्हीही माऊ पालक (इथे व्हॉट्स ॲप वरची डोळ्यात बदाम स्मायली इमॅजीन कर)
छान चाललीय कथा
छान चाललीय कथा
आता मंगेशचा ट्विस्ट की वादळ हे?
सही जा रही है लव्हस्टोरी ....
सही जा रही है लव्हस्टोरी .......मजा येतेय वाचायला

तिच्या वाक्यावर मी नुसतं झोपलेल्या लकीकडे बघितलं तसं तिने "एss! चल नाही हा" म्हणत हसत पुढे झुकत खांद्यावर गुद्दा मारला.> आधी कळलंच नाही . दोन मिनिटांनी ट्यूब पेटली. सो डम्ब ऑफ मी
अरे मस्त झालाय हा भाग! आता
अरे मस्त झालाय हा भाग! आता परतीच्या वाटेवर इकरार, इजहार होऊन जाऊदे
छान
छान
दोघेही क्लिक शोधत आहेत
दोघेही क्लिक शोधत आहेत
छान सुरुय
मस्त. आवडत आहे.
मस्त. आवडत आहे.
रंगतदार कहाणी
रंगतदार कहाणी
मनिम्याऊ, सारखा चिमटा
मनिम्याऊ, सारखा चिमटा
कविन, मस्तच आहे हा भाग पण
अरे काय त्या बोअरींग ओलातून
अरे काय त्या बोअरींग ओलातून पाठवलं त्यांना!
छान सुरू आहे. पुभाप्र.
हो ना, शिवाय ओलाच्या
हो ना, शिवाय ओलाच्या ड्रायव्हरसमोर ही सगळी प्रश्नोत्तरं करायला लावली
अरे काय त्या बोअरींग ओलातून
अरे काय त्या बोअरींग ओलातून पाठवलं त्यांना!>>>
company matters mami 
आता परतीच्या वाटेवर इकरार,
आता परतीच्या वाटेवर इकरार, इजहार होऊन जाऊदे Happy>>>
मंगेशला इसरुन कसं चालेल
दोघेही क्लिक शोधत आहेत>>> व्हॉट्स अॅपचा thumps up
मंडळी धन्यवाद. छोटे भाग
मंडळी धन्यवाद. छोटे भाग चालवून घेतलेत त्याबद्दलही आभारी आहे.
मजा येतेय वाचायला. आणी पटापटा
मजा येतेय वाचायला. आणी पटापटा नविन भाग येत आहेत त्यामुळे लिंक तुटत नाहीये.
हो ना, शिवाय ओलाच्या
हो ना, शिवाय ओलाच्या ड्रायव्हरसमोर ही सगळी प्रश्नोत्तरं करायला लावली Lol>>
इश्वर को साक्षी मानकर ऐवजी यांच्या नशीबात ओला ड्रायव्हर को साक्षी मानकर आहे.
वावे आणि गिरिकंद धन्यवाद
वावे आणि गिरिकंद धन्यवाद
वावे, ड्रायव्हरचा मुद्दा
वावे, ड्रायव्हरचा मुद्दा माझ्याही मनात येऊन गेला हं.
म्हटलं असू दे, प्रेमात पडलेल्यांना सभोवतालचं जरा कमीच पोहोचतं
है ना कविन
प्रेमात पडलेल्यांना सभोवतालचं
प्रेमात पडलेल्यांना सभोवतालचं जरा कमीच पोहोचतं Wink है ना कविन>>> असंच काही नाही पण बरेचदा उशीरा भान येतं.
ओला ड्रायव्हरना या पेक्षाही जास्त काही विटनेस करायची सवय झालेली असते खरतर
अय मंग्या हू बाहीर! चेनै
अय मंग्या हू बाहीर! चेनै एक्स्प्रेसच्या मदी येतोय लगा तू!
मस्त!
अरे मंग्या हाय म्हनून तर या
अरे मंग्या हाय म्हनून तर या बेण्याला कळणारे त्याच्या मनातलं. म्हंजे तसं कळलंय पण वळत नाहीये.
दोघांचे क्लिक शोधणे फार क्युट
दोघांचे क्लिक शोधणे फार क्युट आहे मात्र घटनाक्रम तितकाच सहज नैसर्गिक! हे फार आवडले!
मस्तच रंगतेय कविन. एकदमच
मस्तच रंगतेय कविन. एकदमच स्वाभाविक वाटातेय सगळे.
अय मंग्या हू बाहीर! चेनै
अय मंग्या हू बाहीर! चेनै एक्स्प्रेसच्या मदी येतोय लगा तू!>>
मात्र घटनाक्रम तितकाच सहज नैसर्गिक! हे फार आवडले!
एकदमच स्वाभाविक वाटातेय सगळे.
>> Thank you
धन्यवाद मंडळी.
आई गं! काय मस्त सुरु आहे कथा.
आई गं! काय मस्त सुरु आहे कथा. खूपच आवडली.
माझं पण अवनिशसारखं झालं, जसा तो प्रोफेशनमधली मुलगी नसल्याने सिद्धीची भेट टाळत होता तशी मीपण क्रमशः कथा असल्याने वाचण्याचे टाळत होते. पण आता दोघेही प्रेमात पडलोय, तो सिद्धीच्या आणि मी कथेच्या.
खूप छान चालली आहे कथा.. आवडली
खूप छान चालली आहे कथा.. आवडली. पुभाप्र
कविन, फार छान रंगलीय कथा!
कविन, फार छान रंगलीय कथा! आवडली.
आम्हीही माऊ पालक, (तुला माहितच आहे म्हणा)
अय मंग्या हू बाहीर! चेनै
अय मंग्या हू बाहीर! चेनै एक्स्प्रेसच्या मदी येतोय लगा तू!>>
मस्तच रंगतेय कविन. एकदमच स्वाभाविक वाटातेय सगळे. >> +१
Pages