हृदयसंवाद (५) : करोनरी विकाराचा धोका

Submitted by हेमंतकुमार on 24 October, 2023 - 09:30

भाग ४ : https://www.maayboli.com/node/84278
..

हृदयरोगांच्या संदर्भात हा अत्यंत महत्त्वाचा आणि विस्तृत विषय आहे. त्याची हाताळणी दोन लेखांमध्ये करतो. प्रस्तुत लेखात त्याची कारणमीमांसा विस्ताराने पाहू. नव्या वाचकांनी खालील मजकूर वाचण्यापूर्वी पूर्वीचा कोलेस्टेरॉलचा हा लेख जरूर वाचावा (https://www.maayboli.com/node/64397).

आपण या आधी (भाग २) पाहिल्यानुसार विशिष्ट करोनरी वाहिन्यांमधून हृदयस्नायूंना (myocardium) रक्तपुरवठा होतो. या वाहिन्यांमधून सतत रक्त वाहत असते. या दरम्यान रक्तातील काही घटक या वाहिन्यांच्या आवरणात पेरले जातात (deposition). त्यामध्ये कोलेस्टेरॉल, अन्य मेद व कॅल्शियमचा समावेश असतो. त्याच्या जोडीने आसपासच्या मृत पेशींचे अवशेष देखील तिथे जमा होतात. एखाद्याच्या आयुष्यभरात ही प्रक्रिया जर कमी प्रमाणात राहिली तर त्याचा बाह्य त्रास दिसत नाही. परंतु जर का ही प्रक्रिया सातत्याने खूप मोठ्या प्रमाणात होत राहिली तर मात्र Atherosclerosis हा आजार होतो (Ather = मेद, sclerosis = कडक होणे). या प्रक्रियेचा पुढील परिणाम म्हणून त्या सर्व साठलेल्या गोष्टींचा एक पापुद्रा (plaque) तयार होतो. जसा तो आकाराने वाढू लागतो तशी त्याच्यात एक रक्तगुठळी तयार होते. कालांतराने हा पापुद्रा फुटतो आणि मग रक्ताच्या गुठळीमुळे संबंधित रक्तवाहिनी खूप अरुंद किंवा बंद होते. परिणामी तिच्याद्वारे होणारा रक्तपुरवठा खूप कमी होतो किंवा थांबतो. ही प्रक्रिया करोनरीसह शरीरातील अन्य कोणत्याही रक्तवाहिनीत होऊ शकते. पण करोनरी वाहिन्यांची विशिष्ट भौमितिक रचना आणि त्यांना हृदयाच्या कार्यामुळे सतत बसणारा पीळ या कारणांमुळे या वाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होण्याची प्रक्रिया अन्य वाहिन्यांच्या तुलनेत अधिक होते.

या सर्व रोगप्रक्रियेचा अथपासून इतिपर्यंत कसा विकास होतो हे खालील चित्रात स्पष्ट होईल :
Athero progression Rev.jpgधोका वाढवणारे घटक
या आजाराचा धोका वाढवणारे अनेक घटक असून त्यापैकी काही निसर्गदत्त तर काही जीवनशैली व अन्य आजारांशी निगडित आहेत. ते आता विस्ताराने पाहू.
• निसर्गदत्त घटक
१. वय व लिंग : हा आजार वाढत्या वयानुसार अधिक प्रमाणात होतो. तो 45 वर्षांवरील पुरुषांत आणि 55 वर्षावरील स्त्रियांमध्ये अधिक प्रमाणात आढळतो. एकंदरीत हा आजार स्त्रियांपेक्षा पुरुषांमध्ये अधिक प्रमाणात आढळतो अशी पारंपरिक समजूत आहे परंतु त्यात फारसे तथ्य नाही. स्त्रियांचे ऋतुचक्र चालू असेपर्यंत त्यांना संबंधित हार्मोनमुळे काही प्रमाणात संरक्षण मिळते. परंतु ऋतूसमाप्तीनंतर त्यांना पुरुषांइतकाच धोका असतो. अजून एक मुद्दा. जर एखाद्या स्त्रीला लवकरच्या वयात मधुमेह झाला आणि तिला तंबाखू-प्रकारची व्यसने दीर्घकाळ असतील, तर मात्र तिला ‘स्त्री’ म्हणून असणारे या आजारापासूनचे संरक्षण मिळत नाही.

२. आजाराचा कौटुंबिक इतिहास : खालील घटक धोकादायक समजले जातात :
A. एखाद्या व्यक्तीच्या वडील किंवा भाऊ यांना त्यांच्या 55व्या वर्षांच्या आत हा आजार झालेला असणे, किंवा
B. त्या व्यक्तीच्या आई किंवा बहिणीला त्यांच्या 65व्या वर्षांच्या आत हा आजार झालेला असणे.

• जीवनशैलीशीतील घटक व अन्य आजार
या घटकांची यादी खूप मोठी असून त्यातले काही मोजकेच विस्ताराने पाहू.
१. नियमित व्यायामाचा अभाव : बैठी जीवनशैली आणि व्यायामाचा अभाव हे सध्याच्या जीवनशैलीतील महत्त्वाचे घटक ठरतात. करमणुकीसाठी कुठल्याही ‘स्क्रीन’ पुढे तासंतास बसून राहणे हे अर्थातच अनिष्ट आहे. नियमित व्यायामाच्या अभावाने लठ्ठपणा आणि रक्तातील मेदवृद्धीला आमंत्रण मिळते तसेच रक्तवाहिन्यांचा अंतर्गत दाह देखील होतो. त्याचप्रमाणे इन्सुलिनच्या सुयोग्य कार्यात अडथळा येतो.

२. तंबाखूचे धूम्रपान : हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. त्यातील रसायनांमुळे रक्तवाहिन्यांमध्ये पापुद्रा निर्माण होण्याची प्रक्रिया वाढते आणि रक्तवाहिन्या संकुचित होतात. तसेच रक्तगुठळी होण्याची प्रक्रिया देखील वाढते. दिवसाला २०हून अधिक सिगरेट्स ओढण्यामुळे या आजाराचा धोका सुमारे अडीचपट वाढतो. एकदा हार्ट अटॅक येऊन गेलेल्या व्यक्तीने धूम्रपान न सोडल्यास पुन्हा अटॅक येण्याचा धोका कायम राहतो.

३. आहार : सर्वसाधारणपणे साखर, मीठ आणि लाल मांस यांचे अतिसेवन या आजाराचा धोका वाढवतात. या उलट, भाज्या (शक्य तितक्या कच्च्या स्वरूपात खाणे), फळे अख्खी (whole) धान्ये, द्विदल वनस्पती आणि मासे हे घटक या आजाराचा धोका कमी करतात.

Diet lekh 5.jpg
अर्थात आहार हा विषय खूप क्लिष्ट आहे. जगातील सर्वांना लागू होईल असा एकच नियम/सल्ला या बाबतीत नाही हे ध्यानात घ्यावे. आहारातील विविध घटकांचे प्रमाण आणि प्रकार हे दोन्ही मुद्दे महत्त्वाचे ठरतात. याहून अधिक विवेचन या लेखाच्या कक्षेबाहेरचे आहे.

४. लठ्ठपणा : याची व्याख्या करण्यासाठी खालील तीन प्रकारच्या मापनांचा आधार घेण्यात येतो :
कंबरेचा घेर, कंबर/नितंब गुणोत्तर, बीएमआय.
waist hip  लेख ५.jpg

या तिघांचे धोका ठरवणारे कट ऑफ प्रत्येक वंश, देश आणि लिंग यानुसार वेगवेगळे आहेत. सर्वसाधारण भारतीय संदर्भानुसार (https://www.japi.org/t2a4d4b4/body-mass-index-waist-size-waist-hip-ratio...) खालील मापने धोका सर्वाधिक वाढवतात :
१. कंबरेचा घेर
स्त्री : > ८८ cm
पुरुष : > १०२ cm

२. कंबर/नितंब घेर गुणोत्तर :
स्त्री : > ०.८
पुरुष : > ०.९

३. बीएमआय > ३०.
(वेगवेगळ्या संशोधनानुसार वरील अंकांमध्ये थोडाफार फरक आढळू शकेल).
शरीरभरच्या संपूर्ण जाडीपेक्षा सुटलेले पोट (ढेरी) या संदर्भात अधिक धोकादायक असते.

४. दीर्घकालीन मधुमेह : या आजारामुळे धोका दोन ते आठ पट वाढतो. मधुमेह नियंत्रणात न राहिल्यास भविष्यात करोनरी आजारामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण देखील वाढते.

५. कोलेस्टेरॉल रक्तपातळी : या संबंधीचे सविस्तर विवेचन व चर्चा वर उल्लेख केलेल्या स्वतंत्र लेखात केलेली आहे. एकूण कोलेस्टेरॉल जर 150 mg/dL यापेक्षा कमी असेल तर ते या संदर्भात सुरक्षित मानले जाते. कोलेस्टेरॉलच्या LDL-c या घटकाची वाढती पातळी आजाराचा धोका वाढवते. या विषयावर वैज्ञानिकांमध्ये भरपूर मतभेद आहेत. तरीसुद्धा हा घटक प्रस्तुत यादीमध्ये अजूनही कायम ठेवलेला आहे. याच्या जोडीने TG या अन्य मेदाची वाढलेली रक्तपातळी हा देखील एक धोकादायक घटक असतो.

६. उच्च रक्तदाब : हा अर्थात महत्त्वाचा घटक आहे. रक्तदाब सातत्याने वरच्या पातळीत राहिल्यामुळे हृदयाच्या डाव्या जवनिकेला सतत अधिक जोर लावून महारोहिणीत रक्त पंप करावे लागते. त्यामुळे कालौघात ही जवनिका thick होते (left ventricular hypertrophy). या स्थितीमुळे हृदयविकाराचा धोका आणि त्यापासून होणारे मृत्यू या दोन्हींमध्ये वाढ होते.

७. मेटाबोलिक सिंड्रोम : जेव्हा एखाद्याच्या तब्येतीमध्ये कमरेचा घेर, मेदांची रक्तपातळी, रक्तदाब आणि उपाशीपोटीची ग्लुकोज पातळी हे सर्व घटक वाढलेले दिसतात तेव्हा या स्थितीला मेटाबोलिक सिंड्रोम म्हणतात. अशा सिंड्रोमयुक्त लोकांच्या बाबतीत हृदयविकाराचा धोका अर्थातच अधिक असतो.

धोका मूल्यमापन : प्रयोगशाळा चाचण्या
या आजाराची पार्श्वभूमी लक्षात घेता काही मूलभूत चाळणी चाचण्या सर्वच मध्यमवयीन लोकांनी करून घेणे हितावह असते. जर आजाराचा कौटुंबिक इतिहास असेल तर वयाच्या तिशीतच त्या जरूर कराव्यात. एक गोष्ट महत्त्वाची : कुठल्याही चाळणी चाचण्या स्वतःच्या मनाने परस्पर लॅबमध्ये जाऊन करू नयेत. आधी आपल्या नेहमीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. एक महत्त्वाची गोष्ट डॉक्टर करतीलच, ती म्हणजे रक्तदाब तपासणी. त्यानंतर खालीलप्रमाणे काही मूलभूत चाचण्या सुचवल्या जातील :
१. ग्लुकोज संदर्भात : F & PP levels, HbA1c

२. मेद पातळी : या चाचणीला Lipid Profile म्हणतात. त्यात मुख्यतः एकूण कोलेस्टेरॉल व त्याचे LDL-c, व HDL-c हे दोन प्रकार आणि TG यांचा समावेश असतो. तसेच या मूलभूत मापनांवरून काही गणिती सूत्रे मांडून अन्य काही निकष मोजता येतात.
३. गरज भासल्यास मूत्रपिंड-आरोग्यासंबंधीच्या चाचण्या.

४. ज्या व्यक्तींना आजाराचा कौटुंबिक इतिहास असेल आणि वरील प्राथमिक तपासण्या झाल्यावर जर डॉक्टरांना गरज वाटली तरच ते काही वरच्या पातळीवरील चाचण्या सुचवू शकतात जसे की :
hsCRP, Lp(a), Homocysteine, Small dense LDL, coronary-artery calcium score by CT scan , इ.

एक महत्त्वाचे : CT-स्कॅनच्या मदतीने करोनरी वाहिन्यांमधील ‘प्रत्यक्ष परिस्थितीचा’ अंदाज येत असला तरीही या चाचण्या फक्त काही निवडक रुग्णांच्या बाबतीतच केल्या जातात. वर दिलेल्या प्रस्थापित मूलभूत चाचण्यांना डावलून त्या उठसूट सर्वांसाठी केल्या जात नाहीत. या आधुनिक चाचण्याच श्रेष्ठ आहेत असा गैरसमज कोणीही करून घेऊ नये. या चाचण्या केल्यामुळे भविष्यातील हार्ट अटॅक संबंधी खात्रीने सांगता येतेच असे नाही. या चाचण्यांना देखील त्यांच्या काही अंगभूत मर्यादा आहेत.

धोक्याचे गुणांकन
एव्हाना हे लक्षात आले असेल की हा आजार शरीरासंबंधी अनेक घटकांच्या एकत्रित परिणामातून होतो. म्हणून एखाद्या व्यक्तीला आतापासून पुढील दहा वर्षात हा आजार होण्याची अंदाजे शक्यता किती आहे याचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन करणे उपयुक्त असते. त्यासाठी तिचे वय, लिंग, वंश, रक्तातील एकूण कोलेस्टेरॉल व HDL-c पातळी, रक्तदाब, मधुमेह आणि धूम्रपानाचे व्यसन या माहितीचे एकत्रीकरण करून हृदयविकाराचा धोका किती टक्के आहे हे संगणकीय सूत्राने काढले जाते. हे आठही निकष मूलभूत आणि महत्त्वाचे आहेत.

नमुन्यादाखल असे एक एक संगणकीय सूत्र इथे उपलब्ध आहे :
https://tools.acc.org/ASCVD-Risk-Estimator-Plus/#!/calculate/estimate/

सहज उत्सुकता म्हणून करून प्रत्येकाला आपापले गुणांकन तिथून काढता येईल. अर्थात जे काही आकडे येतील त्याने विचलित व्हायचे कारण नाही ! आपली तब्बेत जाणणाऱ्या डॉक्टरांचे मत अधिक महत्त्वाचे; त्यानंतर आकडेवारीचे स्थान. तसेच प्रत्येक संबंधिताने एक गोष्ट लक्षात ठेवावी. आपली तपासणी केल्यानंतर आणि वरील सर्व संगणकीय मदत घेतल्यानंतर या आजाराच्या धोक्यासंबंधी डॉक्टर जे काही सांगतील तो एक ‘अंदाज’ असतो; भविष्यात तो प्रत्येकाच्या बाबतीत पूर्णपणे खरा ठरेलच असे नाही.

आजाराचे दुष्परिणाम
जेव्हा Atherosclerosisची तीव्रता वाढत जाते तशा बाधित रक्तवाहिन्या अरुंद होऊ लागतात. परिणामी त्यांच्याद्वारे हृदयस्नायूंना होणारा रक्तपुरवठा कमी पडू लागतो. रक्तप्रवाहातील अशा अडथळ्याच्या प्रमाणानुसार रुग्णाला कमीअधिक त्रास होऊ लागतो. या त्रासाची व्याप्ती कशी वाढत जाते ते पुढच्या लेखात पाहू.
*****************************************************************************************************************************
क्रमशः

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

डी व्हिटामिनच्या गोळ्या जास्त घेतल्याने हृदयविकाराचा धोका
>>> तसे एक गृहीतक आहे परंतु हे निर्विवाद सिद्ध झालेले नाही.

गरज नसताना D दीर्घकाळ घेतले असता रक्तातील कॅल्शियमची पातळी वाढते. परिणामी करोनरी रक्तवाहिन्यांमध्ये कॅल्शियमचे थर वाढतात असे ते गृहीतक आहे.

मुळात ‘औषध’ म्हणून ड जीवनसत्व घेणे ही एक दुधारी तलवार आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय आणि खरोखर कमतरता असल्याशिवाय त्याच्या गोळ्या घेऊ नयेत.

करोनरी विकाराचा धोका वाढवणाऱ्या पारंपरिक घटकांचा उल्लेख लेखात आहेच . गेल्या काही वर्षांत त्या घटकांव्यतिरिक्त अन्य काही नवे घटक संशोधनातून दिसून आलेले आहेत. अशा काही घटकांची ही यादी :
१. दीर्घकालीन दाहकारक आजार: यामध्ये आतड्यांच्या Crohn's disease, ulcerative colitis या आजारांचा समावेश आहे. तसेच Psoriasis हा आजार.

२. गरोदरपणातील मधुमेह आणि फिट्सचा त्रास
३. शस्त्रक्रियेने स्त्री बीजांडे काढून टाकल्यामुळे आलेली मुदतपूर्व ऋतूसमाप्ती

४. स्त्रियांमध्ये वारंवार होणारी मायग्रेनची डोकेदुखी
५. बाल्यावस्थेत बसलेला मोठा मानसिक धक्का किंवा हलाखीचे जीवन

६. ट्रान्सजेंडर व्यक्ती : त्यांच्यामध्ये नैराश्याचे प्रमाण अधिक राहते त्याचा संबंध असावा.
७. सामाजिक व आर्थिकदृष्ट्या निम्नस्तरातील जीवन

८. हवा प्रदूषण : यामध्ये विशेषतः प्रदूषित हवेतील शिसे, पारा, arsenic & cadmium यांचा वाटा असू शकेल.

https://www.amjmed.com/article/S0002-9343(22)00569-1/fulltext

हार्ट ची शक्ती कमी होत आहे ह्याचे सहज लक्षात येतील अशी काही लक्षणे आहेत. लक्ष ठेवा.

साधे चालताना दम लागणे.

जड गोधडी, जी डब्बल बेड वर घालून त्यात घुसुन आपण झोपतो किंवा जिमिनीवर पसरून लोळतो ती उचलता व घडी घालता न येणे.

एक मधु मेही लोकांना चालण्या चा व्यायाम व्हावा म्हणून पूर्वी एक वॉक र यायचे. पेशंट जमिनीवर झोपायचा व तो वॉकर इलेक्ट्रिकचा असतो तो प्लग इन करायचा व पंधरा मिनिटे त्यात पाय ठेवायच्चे. चालायची अ‍ॅक्षन करतो. पेशंटचे समाधान दुसरे काय. माझा नवरा खाली तसे क्विल्ट घालून झोपऊन हा व्यायाम!! करत असे पण जायच्या आधी सहा महिने त्याला ते उचलून जमिनीवर पसरून घालता येत नसे. मी त्याला सर्व् सेटिन्ग करुन देइ व मग तो आयपॉड ऐकत पंधरा मिनिटे पडून तो व्यायाम करे. तो अ‍ॅपलचा चौकोनी छोटा बिट्टा आयपॉड पण मी त्याला आव डीच्या गाण्यांनी लोड करुन दिला होता.

दहा पावले चालले की त्याला दम लागत होता पण तेव्हा लक्षात आले नाही. जायच्या वर्शी मी व्हॅलेंटाइन डेला फुल बॉडी चेक अप करुन घेतलेला तेव्हा त्याला पण बरोबर चल गळ घातली होती पण साह ब माने नही.

काही नवे घटक संशोधनातून दिसून आलेले आहेत. अशा काही घटकांची ही यादी :>>> ओरल / डेंटल हायजिन हा पण एक महत्वाचा घटक आहे, ( अगोदर चर्चेत आला असेल तर ठीक ).

+१
मौखिक आरोग्य आणि हा आजार या संदर्भात बरेच संशोधन होत आहे. या दोन गोष्टींचा अगदी थेट संबंध सिद्ध झालेला नाही. तरीसुद्धा मूलभूत दाहजनक प्रक्रिया हा एक धोका वाढवणारा घटक ठरतो.

अमा,तुम्हांला त्या आठवणी त्रास देत असतील, आतापर्यंत कोणाशी मनमोकळं बोलता आलं नसेल, तर सलग लिहून काढा. वाटलं तर शेअर करा. जिथून त्या काढून टाकता येतील अशा ठिकाणी शेअर करा. बरं वाटेल.
तुम्ही सध्या ज्या त्रासातून जाताय तेही शेअर करा. वाटल्याने दु:ख हलके होते हे खरे आहे. आणि त्या आठवणी शब्दबद्ध करून कुठेतरी उतरवल्या की मनातली त्यांची बोच कमी होते असा माझा अनुभव आहे.

जागतिक पातळीवर पाहता करोनरी हृदयविकाराचे सर्वाधिक रुग्ण भारतात आहेत. हा आजार आणि रक्तातील विविध मेदांच्या पातळीचा जवळचा संबंध आहे. त्या अनुषंगाने भारतीय हृदय-आरोग्य संघटनेने भारतातील संशोधनावर आधारित काही महत्त्वाच्या मार्गदर्शक सूचना यंदा जाहीर केल्यात : (https://www.sciencedirect.com/science/article/pii/S0019483223004698)

अहवाल विस्तृत असल्यामुळे त्यातील काही निवडक मुद्द्यांची ही नोंद :
1. भारतात सर्वाधिक प्रमाणात आढळणारा मेदबिघाड म्हणजे रक्तातील वाढलेले TG.
2. हृदयविकाराचा धोका ठरविताना रक्तातील मेदपातळी मोजण्याचे महत्व निर्विवाद आहे. ही पातळी उपाशीपोटी मोजण्याची परंपरा दीर्घकालीन आहे. परंतु नव्या सूचनेनुसार ही पातळी उपाशीपोटी सोडून अन्य कोणत्याही वेळी ( non-fasting) मोजावी, ही महत्त्वाची शिफारस.

3. एखाद्या व्यक्तीची हृदय-धोका पातळी ठरवताना मेदपातळी बरोबरच मधुमेह, उच्च रक्तदाब, सिगारेटचे व्यसन, इत्यादी नेहमीच्या घटकांचाही एकत्रित विचार केला पाहिजे. या सर्व घटकांपैकी जे बिघडलेले असतील त्यांचे योग्य ते उपचार वेळीच सुरू करावेत.

4. आहारासंबंधी काही महत्त्वाचे :
a. साखर घातलेली कृत्रिम शीतपेये आणि हायड्रोजन-संपृक्त तेले टाळावीत. आहारातील एकूण मेदांच्या प्रमाणावर कठोर निर्बंध घालण्याची गरज नाही. परंतु तळलेले पदार्थ आणि ट्रान्स फॅट्स यांच्यावर मात्र निर्बंध हवा.

b . स्वयंपाकाच्या तेलांमध्ये शेंगदाणा आणि सूर्यफूल तेलासारख्या दोन भिन्न घटकप्रकारच्या तेलांचा योग्य प्रमाणात वापर करावा. पाम तेल मात्र टाळले पाहिजे.
c. भरपूर कोलेस्टेरॉलयुक्त अन्नपदार्थ आणि हृदयविकार यांचा थेट संबंध नाही परंतु आहारशैलीनुसार रक्तातील वाढलेले कोलेस्ट्रॉल हे घातक आहे.
d . चोथायुक्त आहाराचे महत्त्व निर्विवाद आहे
e. दुग्धजन्य पदार्थ आणि हृदयविकार हा अत्यंत वादग्रस्त मुद्दा झालाय. किंबहुना त्या दोघांचा कार्यकारणभाव सिद्ध झालेला नाही. परंतु रिफाइंड आणि प्रोसेस्ड प्रकारच्या खाद्यांपेक्षा दुग्धजन्य पदार्थ चांगले.

f . एकूण आहारापैकी अधिक प्रमाण वनस्पतीजन्य असणे चांगले. परंतु अंडी, दुग्धजन्य पदार्थ आणि प्रक्रिया न केलेले (unprocessed) मांस यांचा माफक वापर करायला हरकत नाही.
g. एकूण आहारातील उष्मांकांपैकी कर्बोदकांचा वाटा 50% असावा

5. मद्यपान हे कमीत कमी प्रमाणात असलेले ठीक. कुठल्याही प्रकारच्या मद्यामुळे हृदयविकाराचा प्रतिबंध होत नाही.
6. चहा/ कॉफीचे सेवन दिवसातून तीन ते चार कपपर्यन्त ठीक.

7. मेद पातळी वाढलेली असल्यास विशिष्ट व्यायाम हा तज्ञांच्या सल्ल्यानुसार ठरवावा. त्यामध्ये एरोबिक आणि रेझिस्टन्स या दोन्ही व्यायामप्रकारांचा योग्य तो मिलाफ असावा.

8. योगासने काही प्रमाणात हृदयसंरक्षक आहेत. मात्र त्यांचे महत्त्व निर्विवाद सिद्ध होण्यासाठी अद्यापही बऱ्याच मोठ्या संशोधनाची गरज आहे.

9. रक्त-मेदपातळीची आयुष्यातील पहिली मोजणी वयाच्या अठराव्या वर्षाच्या दरम्यान करून घ्यावी.

10. Lipoprotein (a) या मेदाची पातळी मोजणे दृष्टीने महत्त्वाचे आहे. सुमारे 25% भारतीयांमध्ये ही वाढलेली असते. त्यामुळे प्रत्येकाने ती आयुष्यात किमान एकदा तरी मोजून घ्यावी.

वरील मार्गदर्शन हे सर्वसाधारण आहे. प्रत्येक व्यक्तीच्या प्रकृतीधर्मानुसार डॉक्टर आणि अन्य आरोग्य सल्लागार विशिष्ट सल्ला देतीलच. त्याचे पालन करावे.

चांगली माहिती डॉक्टर.
<रक्त-मेदपातळीची आयुष्यातील पहिली मोजणी वयाच्या अठराव्या वर्षाच्या दरम्यान करून घ्यावी.>
हे वाचून जरा धक्का बसला.

उन्हाळ्याचे दिवसेंदिवस वाढणारे प्रमाण, कालावधी आणि उष्णतेच्या लाटा या सर्व गोष्टी हृदयरोग्यांच्या दृष्टीने चिंताजनक आहेत. टोकाच्या उष्णतेमुळे शरीरात विविध घडामोडी होऊन अंतिमतः हृदयावरील ताण वाढतो. तसेच पोटॅशियम व मॅग्नेशियमसारख्या क्षारांचे प्रमाण बिघडल्याने सुद्धा हृदयतालावर परिणाम होतो.
त्याचबरोबर टोकाचा हिवाळा सुद्धा ह्रदयरोग्यांसाठी त्रासदायकच ठरतो.

जगातील 27 देशांमधील 40 वर्षांचा संशोधन-अभ्यास करून हे विश्लेषण करण्यात आलेले आहे : https://www.ahajournals.org/doi/10.1161/CIRCULATIONAHA.122.061832#:~:tex....

उच्चरक्तदाब या विकाराचा 2024चा जागतिक अहवाल सादर झालेला असून त्यानुसार :

  • जगभरात 1.4 अब्ज लोक या विकाराने बाधित आहेत आणि
  • त्यापैकी फक्त एक पंचमांश लोकांचा विकार योग्य त्या उपचारांनी नियंत्रित केलेला आहे.

उच्चरक्तदाब अनियंत्रित राहिल्यास त्यातून खालील धोके संभवतात :

  1. करोनरी हृदयविकार
  2. मेंदूविकार (स्ट्रोक)
  3. दीर्घकालीन मूत्रपिंड विकार आणि
  4. स्मृतिभ्रंश

https://www.who.int/news/item/23-09-2025-uncontrolled-high-blood-pressur...

माझ्या एका डॉक्टर मित्राने सुचवले म्हणून Coronary Artery Calcium Test (CAC) टेस्ट करून घेतली. यामध्ये CT scan करून हृदयात calcium deposits किती आहेत, ते बघून Calcium score काढतात. Score जितका कमी तितके चांगले.
स्कोअर आणि Risk of Coronary Artery Disease
Score 0 म्हणजे Risk < 5%
1-10 Risk < 10%
11-100 Mild or minimal coronary narrowing likely
101-300 Mild coronary artery disease highly likely, significant narrowing possible. Moderate levels of plaque detected (relatively high risk of a heart attack within 3-5 years)
300-400 = extensive levels of plaque detected (very high risk of heart attack, high levels of vascular disease are present)
400+ High likelihood of at least one significant coronary narrowing

मुंबईत खर्च आला ₹ ४५००. अमेरिकेत साधारण $२००- २५०. टेस्टचे नाव CT Coronary Calcium Score मी ही टेस्ट केवळ precaution म्हणून डॉक्टरच्या सल्ल्याने केली. माहिती म्हणून सुचवत आहे.

मला आणि नवर्‍याला पण ही टेस्ट सांगितली पण जेव्हा भारतात जाल तेव्हा करू शकता म्हटले. अमेरिकेत बहुधा प्रिस्क्रिप्शन शिवाय करता येत नाही.

>>>>>मुंबईत खर्च आला ₹ ४५००. अमेरिकेत साधारण $२००- २५०. टेस्टचे नाव CT Coronary Calcium Score मी ही टेस्ट केवळ precaution म्हणून डॉक्टरच्या सल्ल्याने केली. माहिती म्हणून सुचवत आहे.
नोंद केलेली आहे.

Pages