हृदयसंवाद (५) : करोनरी विकाराचा धोका

Submitted by कुमार१ on 24 October, 2023 - 09:30

भाग ४ : https://www.maayboli.com/node/84278
..

हृदयरोगांच्या संदर्भात हा अत्यंत महत्त्वाचा आणि विस्तृत विषय आहे. त्याची हाताळणी दोन लेखांमध्ये करतो. प्रस्तुत लेखात त्याची कारणमीमांसा विस्ताराने पाहू. नव्या वाचकांनी खालील मजकूर वाचण्यापूर्वी पूर्वीचा कोलेस्टेरॉलचा हा लेख जरूर वाचावा (https://www.maayboli.com/node/64397).

आपण या आधी (भाग २) पाहिल्यानुसार विशिष्ट करोनरी वाहिन्यांमधून हृदयस्नायूंना (myocardium) रक्तपुरवठा होतो. या वाहिन्यांमधून सतत रक्त वाहत असते. या दरम्यान रक्तातील काही घटक या वाहिन्यांच्या आवरणात पेरले जातात (deposition). त्यामध्ये कोलेस्टेरॉल, अन्य मेद व कॅल्शियमचा समावेश असतो. त्याच्या जोडीने आसपासच्या मृत पेशींचे अवशेष देखील तिथे जमा होतात. एखाद्याच्या आयुष्यभरात ही प्रक्रिया जर कमी प्रमाणात राहिली तर त्याचा बाह्य त्रास दिसत नाही. परंतु जर का ही प्रक्रिया सातत्याने खूप मोठ्या प्रमाणात होत राहिली तर मात्र Atherosclerosis हा आजार होतो (Ather = मेद, sclerosis = कडक होणे). या प्रक्रियेचा पुढील परिणाम म्हणून त्या सर्व साठलेल्या गोष्टींचा एक पापुद्रा (plaque) तयार होतो. जसा तो आकाराने वाढू लागतो तशी त्याच्यात एक रक्तगुठळी तयार होते. कालांतराने हा पापुद्रा फुटतो आणि मग रक्ताच्या गुठळीमुळे संबंधित रक्तवाहिनी खूप अरुंद किंवा बंद होते. परिणामी तिच्याद्वारे होणारा रक्तपुरवठा खूप कमी होतो किंवा थांबतो. ही प्रक्रिया करोनरीसह शरीरातील अन्य कोणत्याही रक्तवाहिनीत होऊ शकते. पण करोनरी वाहिन्यांची विशिष्ट भौमितिक रचना आणि त्यांना हृदयाच्या कार्यामुळे सतत बसणारा पीळ या कारणांमुळे या वाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होण्याची प्रक्रिया अन्य वाहिन्यांच्या तुलनेत अधिक होते.

या सर्व रोगप्रक्रियेचा अथपासून इतिपर्यंत कसा विकास होतो हे खालील चित्रात स्पष्ट होईल :
Athero progression Rev.jpgधोका वाढवणारे घटक
या आजाराचा धोका वाढवणारे अनेक घटक असून त्यापैकी काही निसर्गदत्त तर काही जीवनशैली व अन्य आजारांशी निगडित आहेत. ते आता विस्ताराने पाहू.
निसर्गदत्त घटक
१. वय व लिंग : हा आजार वाढत्या वयानुसार अधिक प्रमाणात होतो. तो 45 वर्षांवरील पुरुषांत आणि 55 वर्षावरील स्त्रियांमध्ये अधिक प्रमाणात आढळतो. एकंदरीत हा आजार स्त्रियांपेक्षा पुरुषांमध्ये अधिक प्रमाणात आढळतो अशी पारंपरिक समजूत आहे परंतु त्यात फारसे तथ्य नाही. स्त्रियांचे ऋतुचक्र चालू असेपर्यंत त्यांना संबंधित हार्मोनमुळे काही प्रमाणात संरक्षण मिळते. परंतु ऋतूसमाप्तीनंतर त्यांना पुरुषांइतकाच धोका असतो. अजून एक मुद्दा. जर एखाद्या स्त्रीला लवकरच्या वयात मधुमेह झाला आणि तिला तंबाखू-प्रकारची व्यसने दीर्घकाळ असतील, तर मात्र तिला ‘स्त्री’ म्हणून असणारे या आजारापासूनचे संरक्षण मिळत नाही.

२. आजाराचा कौटुंबिक इतिहास : खालील घटक धोकादायक समजले जातात :
A. एखाद्या व्यक्तीच्या वडील किंवा भाऊ यांना त्यांच्या 55व्या वर्षांच्या आत हा आजार झालेला असणे, किंवा
B. त्या व्यक्तीच्या आई किंवा बहिणीला त्यांच्या 65व्या वर्षांच्या आत हा आजार झालेला असणे.

जीवनशैलीशीतील घटक व अन्य आजार
या घटकांची यादी खूप मोठी असून त्यातले काही मोजकेच विस्ताराने पाहू.
१. नियमित व्यायामाचा अभाव : बैठी जीवनशैली आणि व्यायामाचा अभाव हे सध्याच्या जीवनशैलीतील महत्त्वाचे घटक ठरतात. करमणुकीसाठी कुठल्याही ‘स्क्रीन’ पुढे तासंतास बसून राहणे हे अर्थातच अनिष्ट आहे. नियमित व्यायामाच्या अभावाने लठ्ठपणा आणि रक्तातील मेदवृद्धीला आमंत्रण मिळते तसेच रक्तवाहिन्यांचा अंतर्गत दाह देखील होतो. त्याचप्रमाणे इन्सुलिनच्या सुयोग्य कार्यात अडथळा येतो.

२. तंबाखूचे धूम्रपान : हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. त्यातील रसायनांमुळे रक्तवाहिन्यांमध्ये पापुद्रा निर्माण होण्याची प्रक्रिया वाढते आणि रक्तवाहिन्या संकुचित होतात. तसेच रक्तगुठळी होण्याची प्रक्रिया देखील वाढते. दिवसाला २०हून अधिक सिगरेट्स ओढण्यामुळे या आजाराचा धोका सुमारे अडीचपट वाढतो. एकदा हार्ट अटॅक येऊन गेलेल्या व्यक्तीने धूम्रपान न सोडल्यास पुन्हा अटॅक येण्याचा धोका कायम राहतो.

३. आहार : सर्वसाधारणपणे साखर, मीठ आणि लाल मांस यांचे अतिसेवन या आजाराचा धोका वाढवतात. या उलट, भाज्या (शक्य तितक्या कच्च्या स्वरूपात खाणे), फळे अख्खी (whole) धान्ये, द्विदल वनस्पती आणि मासे हे घटक या आजाराचा धोका कमी करतात.

Diet lekh 5.jpg
अर्थात आहार हा विषय खूप क्लिष्ट आहे. जगातील सर्वांना लागू होईल असा एकच नियम/सल्ला या बाबतीत नाही हे ध्यानात घ्यावे. आहारातील विविध घटकांचे प्रमाण आणि प्रकार हे दोन्ही मुद्दे महत्त्वाचे ठरतात. याहून अधिक विवेचन या लेखाच्या कक्षेबाहेरचे आहे.

४. लठ्ठपणा : याची व्याख्या करण्यासाठी खालील तीन प्रकारच्या मापनांचा आधार घेण्यात येतो :
कंबरेचा घेर, कंबर/नितंब गुणोत्तर, बीएमआय.
waist hip  लेख ५.jpg

या तिघांचे धोका ठरवणारे कट ऑफ प्रत्येक वंश, देश आणि लिंग यानुसार वेगवेगळे आहेत. सर्वसाधारण भारतीय संदर्भानुसार (https://www.japi.org/t2a4d4b4/body-mass-index-waist-size-waist-hip-ratio...) खालील मापने धोका सर्वाधिक वाढवतात :
१. कंबरेचा घेर
स्त्री : > ८८ cm
पुरुष : > १०२ cm

२. कंबर/नितंब घेर गुणोत्तर :
स्त्री : > ०.८
पुरुष : > ०.९

३. बीएमआय > ३०.
(वेगवेगळ्या संशोधनानुसार वरील अंकांमध्ये थोडाफार फरक आढळू शकेल).
शरीरभरच्या संपूर्ण जाडीपेक्षा सुटलेले पोट (ढेरी) या संदर्भात अधिक धोकादायक असते.

४. दीर्घकालीन मधुमेह : या आजारामुळे धोका दोन ते आठ पट वाढतो. मधुमेह नियंत्रणात न राहिल्यास भविष्यात करोनरी आजारामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण देखील वाढते.

५. कोलेस्टेरॉल रक्तपातळी : या संबंधीचे सविस्तर विवेचन व चर्चा वर उल्लेख केलेल्या स्वतंत्र लेखात केलेली आहे. एकूण कोलेस्टेरॉल जर 150 mg/dL यापेक्षा कमी असेल तर ते या संदर्भात सुरक्षित मानले जाते. कोलेस्टेरॉलच्या LDL-c या घटकाची वाढती पातळी आजाराचा धोका वाढवते. या विषयावर वैज्ञानिकांमध्ये भरपूर मतभेद आहेत. तरीसुद्धा हा घटक प्रस्तुत यादीमध्ये अजूनही कायम ठेवलेला आहे. याच्या जोडीने TG या अन्य मेदाची वाढलेली रक्तपातळी हा देखील एक धोकादायक घटक असतो.

६. उच्च रक्तदाब : हा अर्थात महत्त्वाचा घटक आहे. रक्तदाब सातत्याने वरच्या पातळीत राहिल्यामुळे हृदयाच्या डाव्या जवनिकेला सतत अधिक जोर लावून महारोहिणीत रक्त पंप करावे लागते. त्यामुळे कालौघात ही जवनिका thick होते (left ventricular hypertrophy). या स्थितीमुळे हृदयविकाराचा धोका आणि त्यापासून होणारे मृत्यू या दोन्हींमध्ये वाढ होते.

७. मेटाबोलिक सिंड्रोम : जेव्हा एखाद्याच्या तब्येतीमध्ये कमरेचा घेर, मेदांची रक्तपातळी, रक्तदाब आणि उपाशीपोटीची ग्लुकोज पातळी हे सर्व घटक वाढलेले दिसतात तेव्हा या स्थितीला मेटाबोलिक सिंड्रोम म्हणतात. अशा सिंड्रोमयुक्त लोकांच्या बाबतीत हृदयविकाराचा धोका अर्थातच अधिक असतो.

धोका मूल्यमापन : प्रयोगशाळा चाचण्या
या आजाराची पार्श्वभूमी लक्षात घेता काही मूलभूत चाळणी चाचण्या सर्वच मध्यमवयीन लोकांनी करून घेणे हितावह असते. जर आजाराचा कौटुंबिक इतिहास असेल तर वयाच्या तिशीतच त्या जरूर कराव्यात. एक गोष्ट महत्त्वाची : कुठल्याही चाळणी चाचण्या स्वतःच्या मनाने परस्पर लॅबमध्ये जाऊन करू नयेत. आधी आपल्या नेहमीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. एक महत्त्वाची गोष्ट डॉक्टर करतीलच, ती म्हणजे रक्तदाब तपासणी. त्यानंतर खालीलप्रमाणे काही मूलभूत चाचण्या सुचवल्या जातील :
१. ग्लुकोज संदर्भात : F & PP levels, HbA1c

२. मेद पातळी : या चाचणीला Lipid Profile म्हणतात. त्यात मुख्यतः एकूण कोलेस्टेरॉल व त्याचे LDL-c, व HDL-c हे दोन प्रकार आणि TG यांचा समावेश असतो. तसेच या मूलभूत मापनांवरून काही गणिती सूत्रे मांडून अन्य काही निकष मोजता येतात.
३. गरज भासल्यास मूत्रपिंड-आरोग्यासंबंधीच्या चाचण्या.

४. ज्या व्यक्तींना आजाराचा कौटुंबिक इतिहास असेल आणि वरील प्राथमिक तपासण्या झाल्यावर जर डॉक्टरांना गरज वाटली तरच ते काही वरच्या पातळीवरील चाचण्या सुचवू शकतात जसे की :
hsCRP, Lp(a), Homocysteine, Small dense LDL, coronary-artery calcium score by CT scan , इ.

एक महत्त्वाचे : CT-स्कॅनच्या मदतीने करोनरी वाहिन्यांमधील ‘प्रत्यक्ष परिस्थितीचा’ अंदाज येत असला तरीही या चाचण्या फक्त काही निवडक रुग्णांच्या बाबतीतच केल्या जातात. वर दिलेल्या प्रस्थापित मूलभूत चाचण्यांना डावलून त्या उठसूट सर्वांसाठी केल्या जात नाहीत. या आधुनिक चाचण्याच श्रेष्ठ आहेत असा गैरसमज कोणीही करून घेऊ नये. या चाचण्या केल्यामुळे भविष्यातील हार्ट अटॅक संबंधी खात्रीने सांगता येतेच असे नाही. या चाचण्यांना देखील त्यांच्या काही अंगभूत मर्यादा आहेत.

धोक्याचे गुणांकन
एव्हाना हे लक्षात आले असेल की हा आजार शरीरासंबंधी अनेक घटकांच्या एकत्रित परिणामातून होतो. म्हणून एखाद्या व्यक्तीला आतापासून पुढील दहा वर्षात हा आजार होण्याची अंदाजे शक्यता किती आहे याचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन करणे उपयुक्त असते. त्यासाठी तिचे वय, लिंग, वंश, रक्तातील एकूण कोलेस्टेरॉल व HDL-c पातळी, रक्तदाब, मधुमेह आणि धूम्रपानाचे व्यसन या माहितीचे एकत्रीकरण करून हृदयविकाराचा धोका किती टक्के आहे हे संगणकीय सूत्राने काढले जाते. हे आठही निकष मूलभूत आणि महत्त्वाचे आहेत.

नमुन्यादाखल असे एक एक संगणकीय सूत्र इथे उपलब्ध आहे :
https://tools.acc.org/ASCVD-Risk-Estimator-Plus/#!/calculate/estimate/

सहज उत्सुकता म्हणून करून प्रत्येकाला आपापले गुणांकन तिथून काढता येईल. अर्थात जे काही आकडे येतील त्याने विचलित व्हायचे कारण नाही ! आपली तब्बेत जाणणाऱ्या डॉक्टरांचे मत अधिक महत्त्वाचे; त्यानंतर आकडेवारीचे स्थान. तसेच प्रत्येक संबंधिताने एक गोष्ट लक्षात ठेवावी. आपली तपासणी केल्यानंतर आणि वरील सर्व संगणकीय मदत घेतल्यानंतर या आजाराच्या धोक्यासंबंधी डॉक्टर जे काही सांगतील तो एक ‘अंदाज’ असतो; भविष्यात तो प्रत्येकाच्या बाबतीत पूर्णपणे खरा ठरेलच असे नाही.

आजाराचे दुष्परिणाम
जेव्हा Atherosclerosisची तीव्रता वाढत जाते तशा बाधित रक्तवाहिन्या अरुंद होऊ लागतात. परिणामी त्यांच्याद्वारे हृदयस्नायूंना होणारा रक्तपुरवठा कमी पडू लागतो. रक्तप्रवाहातील अशा अडथळ्याच्या प्रमाणानुसार रुग्णाला कमीअधिक त्रास होऊ लागतो. या त्रासाची व्याप्ती कशी वाढत जाते ते पुढच्या लेखात पाहू.
*****************************************************************************************************************************
क्रमशः

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नैसर्गिक मृत्यूची नक्की व्याख्या काय ?
>>>
जेव्हा एखाद्या माणसात कुठल्याही प्राणघातक आजाराचे पुरेसे रोगनिदान झालेले नसतानाच्या अवस्थेत त्याला मृत्यू येतो त्या घटनेला नैसर्गिक (किंवा अकस्मात) मृत्यू म्हणतात.

वय आणि वयानुसार येणारे आजार ह्या मुळे मृत्यू येतो .
अगदी 80 वर्ष वयात पण मृत्यू आला तरी ही दोन कारण असतात च.

Body shutdown होण्यास काही गोष्टी घडव्याच लागतात.
मी हा प्रश्न परत परत ह्या साठी विचारत आहे मला उतार वयातील मृत्यू जो वयानुसार येणाऱ्या आजाराने झाला असेल तर त्याचा संबंध आनुवंशिक आजाराशी जोडता येईल का.?
एकदा व्यक्ती ८० वर्ष वयात मधुमेह किंवा अटॅक नी मेला.
आणि दुसरा व्यक्ती ५० वर्ष वयात वरील आजारणेच मेला तर .
आनुवंशिकता मुळे आजार पुढील पिढीत संक्रमण करण्यात काही फरक आहे का?
डॉक्टर त्या साठी च मी परत परत हा प्रश्न विचारत आहे.

आनुवंशिकतेमुळे आजार पुढील पिढीत संक्रमण करण्यात काही फरक आहे का?
>> होय, आहे ना. त्याचे उत्तर मी या प्रतिसादात दिलेले आहे :
Submitted by कुमार१ on 26 October, 2023 - 12:21. तो पुन्हा बघा.

थोडे अधिक सांगतो.
जेव्हा एखादा जनुकीय बिघाड पालकांपासून मुलांमध्ये संक्रमित होतो तेव्हा त्याचे पुढील भवितव्य खालील दोन घटकांवर ठरते :
१. त्या बिघाडामुळे व्यक्तीमध्ये आजार दृश्य स्वरूपात दिसण्याची भिन्नता (Variable expressivity )
२. बिघाड असूनही तो लक्षणांच्या रूपाने दिसत नाही किंवा ती नगण्य असतात (Reduced Penetrance).

सारांश : एखादा जनुकीय बिघाड वारसा म्हणून मिळाला असता त्यामुळे होणारा प्रत्यक्ष आजार हा जन्मल्यापासून ते पार म्हातारपणापर्यंत कधीही होऊ शकतो, किंवा (बिघाडाच्या प्रकार आणि ताकदीनुसार) होऊ शकत नाही.

रक्त वाहिन्या मध्ये मेद,मृत पेशी ,etc.
जमा होतात त्या मुळे रक्तवाहिन्यांत रक्त वाहून नेण्यासाठी जागा कमी होते.
त्या मुळे अटॅक येवू शकतो.
असे ह्या लेखात आहे आणि सर्व ठिकाणी पण हेच कारण दिलेले असते.
पण मला असा प्रश्न पडतो.
रक्तात कोणते घटक किती प्रमाणात असावेत ह्या वर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा नक्की असेल.
कोणत्या यंत्रणा न कडे हे काम असते?
आहार आपण काही घेवु ध्या .
अनावश्यक गोष्टी बाहेर काढणे,गरज असेल तेच ठेवून गरजे नुसार शरीरातील विविध अवयव ना पुरवणे .
ही पण यंत्रणा शरीरात असलीच पाहिजे.
कारण रोज same fat युक्त आहार १०० लोकांना दिला तर सर्व लोकांची रक्तातील चरबी वाढणार नाही.

प्रश्न हा आहे .
Fat, colostral ह्यांचे रक्तातील प्रमाण वाढणे ह्याचा अर्थ संबंधित यंत्रणा जी नियंत्रण करते किंवा नियंत्रण करणारा अवयव योग्य काम करत नाही हे असावे.
ना की तुमचा आहार. काय आहे ते

Colostrol रक्तात वाढण्यास. कारणीभूत
१) स्ट्रेस.
२) आजार ,मधुमेह वैगेरे.
३) आनुवंशिकता .
हे कारणीभूत आहेत फक्त आहार नाही.
ही माहिती तुमच्या लेखात मिळाली आहे.

पण कोणते अवयव ह्या साठी जबाबदार असतात ती फक्त माहिती मिळाली नाही.

फक्त आहार नाही. >>>
अगदी बरोबर. लेखात जे घटक दिलेले आहेत त्यांच्या एकत्रित परिणामातून धोका वाढतो. म्हणूनच धोक्याचे शास्त्रशुद्ध मूल्यमापन करणे महत्त्वाचे असते.

चयापचयाशी संबंधित जे आजार आहेत ते सर्व multifactorial diseases या गटात मोडतात. अशा अनेक घटकांचा एकत्रित परिणाम प्रत्येक व्यक्तीत वेगवेगळा होतो. त्यानुसार तब्येतीचे भवितव्य ठरते.

कोणते अवयव ह्या साठी जबाबदार असतात
>>
आहारामुळे रक्तातील कोणत्या घटकांची पातळी किती वाढावी याचे नियंत्रण पचनसंस्था, स्वादुपिंड आणि यकृत ही तीन इंद्रिये करतात. काही हार्मोन्सचा पण या कामात वाटा असतो .
कोलेस्टेरॉलच्या बाबतीत, नको असलेल्या ज्यादा कोलेस्टेरॉलचा निचरा करणे हे यकृताचे खूप महत्त्वाचे काम आहे.
लेखात हे सुचवलेले आहे :

नव्या वाचकांनी हा लेख वाचण्यापूर्वी पूर्वीचा कोलेस्टेरॉलचा हा लेख जरूर वाचावा (https://www.maayboli.com/node/64397).

Doctors thanks.
तुम्ही जी महत्वाची माहीत दिली आहे ती गूगल पण सहज देत नाही.
जे शोधायचे आहे ते योग्य शब्दात सर्च करा असा सल्ला ते देते.
आणि योग्य शब्द ज्याचे मेडिकल चे ज्ञान नाही, डिग्री नाही त्यांना सुचणे शक्य च नाही.
भारी गैर समज लोकात आहेत.
१) मी सात्विक,fat नसणारे,व्हिटॅमिन,प्रोटीन चे योग्य प्रमाण असणारे अन्न घेते( ते योग्य की अयोग्य ह्याची काही मोजपट्टी
सर्वांना लागू होईल अशी अस्तित्वात च नाही)
मला नाही colostrol वाढणार.
२) लठ्ठ पना कशाला म्हणतात ह्याचे खरे उत्तर पण खूप लोकांना माहीत नाही.
५ फूट उंची असेल तर इतके वजन हवं इतकेच माहीत असते.
तुम्ही तुमच्या धाग्यात बाकी पण parameter दिले आहेत त्या बद्धल खरेच धन्य वाद..
निरोगी शरीर म्हणजे कमी वजन असणे ही सर्वात मोठी अंध श्रद्धा आज जगात दिसून येईल..
निरोगी शरीर असण्यासाठी कमी वजन असावे हा फक्त एक घटक आहे. ह्याची जाणीव होणे गरजेचे आहे.
यकृत,स्वादुपिंड,पचनसंस्था ह्यांच्या कार्याकडे दुर्लक्ष करू नका .
तेच खलनायक असतात.
ही माहिती तुम्ही दिलीत ती कुठेच सहज मिळणार नाही.
ही माहिती सर्वांना असणे गरजेचे आहे म्हणून मी तशा कॉमेंट केल्या होत्या

Sorry' पण हे लिहण्याची तीव्र इच्छा झाली.
मी रोज आवळा, निंबु, आणि मोसंबी खाते माझ्या शरीराला व्हिटॅमिन c मिळेल.
पण तुम्ही आवळा एक खा किंवा दहा त्या मधील व्हिटॅमिन c घ्यायचे की नाही हे ठरवणारे पण असतात.
त्यांना वाटले तर घेतील नाही तर सरळ बाहेरचा रस्ता दाखवतील.
शरीर इतके क्रूर वागत नाही पण वागणारच नाही ह्याची खात्री कोनी देवू शकत नाही

दोन उदाहरणे अगदी जवळची मी बघितली आहेत.
एक मित्राची बहीण.
आणि दुसरे आमची जमीन खंडाने करणारा.
वय वर्ष 20 ते 25.
,1) कॅन्सर ची history वडिलांकडून सोडा आई कडून पण नाही.
अगदी खात्री नी.
२) आहार अगदी योग्य , सात्विक.
३) शारीरिक व्यायाम अगदी योग्य.
४) स्ट्रेस बिलकुल नाही ह्या दोन्ही घरातील आर्थिक स्थिती अगदी उत्तम.
५) व्यसन .
बिलकुल कोणतेच नाही
६) दुखापत बिलकुल नाही
अगदी जवळचे संबंध असल्या मुले खात्री शिर माहिती.
तरी ह्यांना ब्रेन कॅन्सर झाला आणि त्या मध्ये मृत्यू पण झाला
काय कारण सांगता येतील .

काहीच सांगता येणार नाही.
शरीर यंत्रणा खूप किचकट आहे ती कशी चालते हे अजून आपल्याला बिलकुल माहीत नाही.
त्या मुळे नेहमी सावध रहा.
गैरसमजातून बाहेर या.

कोणी तरी ह्या अगोदर प्रश्न विचारलं होता..dr मांडके हे प्रसिद्ध heart तज्ञ होते त्यांना हार्ट अटॅक चे धोके माहीत होते.
कोणती लाईफ स्टाईल असावी हे पण माहीत होते..
कोणता आहार असावा हे पण माहीत होते.
सर्व संबंधित टेस्ट पण माहीत होत्या.
त्यांच्या कडे सर्व संसाधन होती.
तरी ते हार्ट अटॅक नीच गेले.

निरुत्तर होतो कोणी पण अशा प्रसंग मुळे.
फक्त dr मांडके च नाहीत तर अनेक तज्ञ डॉक्टर असेच गेले आहेत

खरंय ! यावर मी काही टिपणी न करता एका मान्यवराचे उद्गार पाहू.

‘समाजातील बहुतेकांना एकतर करोनरी हृदयविकार अथवा कर्करोग कधीतरी गाठणारच आहे’
, अशा आशयाची रिचर्ड गॉर्डन यांची एक लघुकविता आहे :

Ashes to ashes
Dust to dust
If cancer doesn’t get you
Atherosclerosis must
!
.....
ही 2019 मध्ये कर्करोगाच्या धाग्यावर लिहिली होती. इथे त्याची पुनरावृत्ती प्रस्तुत ठरावी.
हे अंतिम सत्य !

Atherosclerosis आणि माणसाचे वय या संदर्भात हे काही वैशिष्ट्यपूर्ण :
१. याची सुरुवात अगदी बालपणीच होते- अंदाजे वय १०
२. ही प्रक्रिया माणसाचे संपूर्ण आयुष्य व्यापून टाकते.

३. मात्र (रोग)प्रक्रिया जलद अथवा मंदगतीने वाढणे हे मात्र बऱ्याच ‘घटकांवर’ अवलंबून आहे.
४. लेखात जी पापुद्रा फुटण्याची प्रक्रिया वर्णन केली आहे ती सर्वाधिक प्रमाणात (the highest incidence) चाळिशीतील पुरुषांमध्ये दिसते

५. या उलट स्त्रियांच्या बाबतीत ती सर्वाधिक प्रमाणात पन्नाशीनंतर दिसते.
६. या विकारामुळे होणाऱ्या अचानक (sudden) मृत्यूचे प्रमाण वाढत्या वयाबरोबर कमी होत जाते !

७. तरुण वयातील अकस्मात हार्ट अटॅक आणि मृत्यू हा नेहमीच कुतुहलाचा आणि चर्चेचा विषय. तरुण खेळाडू, निर्व्यसनी सात्विक माणूस ..... वगैरे वगैरे.. जे 30- 40 वयाच्या दरम्यान या आजाराने अकस्मात ‘जातात’, त्याचे अंशतः स्पष्टीकरण वरील मुद्द्यांवरून मिळावे.

मात्र रोगप्रक्रिया जलद अथवा मंदगतीने वाढणे हे मात्र बऱ्याच ‘घटकांवर’ अवलंबून आहे. >>> अगदी हेच वाक्य माझ्या अनेक डाॅ. मित्रांनीही मला आवर्जून सांगितलेले आठवले.
__/\__

हृदयविकाराचा धोका वाढवणाऱ्या घटकांमध्ये अलीकडे अजून एका घटकाची भर पडते आहे आणि तो म्हणजे कर्करोग.
समजा, एखाद्या व्यक्तीला कर्करोग झाला आणि त्यावरील उपचार यशस्वी होऊन बऱ्यापैकी उर्वरित आयुष्य मिळाले, तर तेव्हा हृदयविकार होण्याची शक्यता वाढू शकते.

या संदर्भातील उपपत्ती अशी :
जेव्हा कर्करोग प्रथम होतो तेव्हा शरीरात दाहप्रक्रिया बऱ्यापैकी वाढलेली असते. त्यात कर्करोगाच्या विविध उपचारांमुळे सुद्धा रक्तवाहिन्यांच्या अंतर्गत रचना आणि कार्यात बिघाड होतो. परिणामी Atherosclerosis ची प्रक्रिया अधिक वेगाने घडते.

या संदर्भात गेल्या काही वर्षांमध्ये संशोधन प्रगतीपथावर आहे :

https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC4800750/
https://www.ahajournals.org/doi/10.1161/circ.148.suppl_1.16592

जेव्हा कर्करोग प्रथम होतो तेव्हा शरीरात दाहप्रक्रिया बऱ्यापैकी वाढलेली असते. त्यात कर्करोगाच्या विविध उपचारांमुळे सुद्धा रक्तवाहिन्यांच्या अंतर्गत रचना आणि कार्यात बिघाड होतो. परिणामी Atherosclerosis ची प्रक्रिया अधिक वेगाने घडते.>> ह्याला अनुमोदन.

मी अजून टू डी एको करून घेतलेली नाही. पण जानेवारी पासून तब्ये ती ने सिग्निफिकंट डाउन टर्न घेतला आहे. एक कारण डिप्रेशन, काही काम उठून करायचे तर अगदी शक्ती एकव टून उठावे लागते.

डिप्रेशन >>
योग्य तो सल्ला व काळजी घ्या.
शुभेच्छा !

>>>>>>>एक कारण डिप्रेशन, काही काम उठून करायचे तर अगदी शक्ती एकव टून उठावे लागते.
आई ग्ग!!! अमा तुम्ही यातून नक्की बाहेर पडाल. धिस विल पास टु. तुम्हाला इच्छा झाल्यास मला व्हॉटसॅपवरती अ‍ॅड करा. ते ही जर तुम्ही त्यावर असाल तर. असो.

आई ग्ग!!! अमा तुम्ही यातून नक्की बाहेर पडाल. धिस विल पास टु. तुम्हाला इच्छा झाल्यास मला व्हॉटसॅपवरती अ‍ॅड करा. ते ही जर तुम्ही त्यावर असाल तर. +११११११११
काळजी घ्या
किल्ली तुमच्या सोबत आहे
Big hug

गरज नसतानाही ‘टॉनिक’ या गैरसमजातून ब जीवनसत्वाच्या गोळ्या घेण्याचे प्रमाण समाजात बऱ्यापैकी आहे. प्रगत देशांमध्ये तर, ‘Niacin हे ब जीवनसत्व म्हातारपण रोखण्यास मदत करते’, अशाही जाहिराती केल्या जातात. त्याचा प्रभाव पडून लोक विनाकारण या गोळ्या खात राहतात. ‘Niacin जीवनसत्वाच्या अतिरिक्त सेवनाने हृदयविकाराचा धोका वाढतो असे एका अभ्यासात आढळले आहे :
https://www.nature.com/articles/s41591-023-02793-8.epdf?sharing_token=oN...

ऑर्थोमॉलिक्युलर मेडिसिनवाल्यांचा तर जीव की प्राण आहे नियासीन. सगळ्या रक्तवाहिन्या साफ करणे, ते एड्स, सगळे मानसिक रोग बरे करणे यासाठी नियासीन पावडर, व्हिटॅमिन सी यांचा मारा आणि ओमेगा3, व्हिटॅमिन इ च्या गोळ्या घ्या म्हणतात.

खरे आहे. एखाद्या पोषण घटकाची कमतरता असल्याशिवाय विनाकारण गोळ्यांच्या रूपाने त्याचे मारे करणे अयोग्यच आहे.

omega-3 fatty acids ना सुद्धा प्रचारकी स्वरूप आल्याने त्यांचा अतिवापर झाला. पुढे हे घटक वादग्रस्त ठरलेले आहेत. बऱ्याचदा प्रचारकीपणाचा अतिरेक झाल्यावर त्या गदारोळात मूळ सत्य हरवून जाते.

मला थकवा वाटत असे तो बी व्हायटॅमिनच्या गोळ्या घ्यायला लागल्यापासून गेला. कमतरता असावी बहुधा.

जास्त प्रोटीन युक्त आहार घेतल्याने हृदयविकाराचा धोका वाढतो असे मध्ये पेपरात वाचले. ते खरे आहे का ?

जास्त प्रोटीन युक्त आहार
>>> सध्या या विषयावर काही संशोधन चालू आहे. आहारातील प्रथिनांचे प्रमाण 30 टक्क्यांच्यावर सातत्याने राहिल्यास रक्तवाहिन्या कठीण होण्याचा धोका वाढू शकतो असे गृहीतक मांडले गेलेले आहे. त्यामध्ये प्राणीजन्य प्रथिनांचा अधिक संबंध असावा असे दिसते. या प्रथिनांमधून शरीरात निर्माण होणारी जी काही अमिनो आम्ले आहेत, त्यांच्यामुळे रक्तातील दाहपेशींना उत्तेजन मिळते.

अर्थात या धोक्यासंदर्भात आहारातील कोणत्याही फक्त एकाच घटकाला पकडून चालणार नाही. एकूण उष्मांक किती घेतले जातात याचाही त्याचाही जोडीने विचार करावा लागेल.

https://www.ahajournals.org/doi/full/10.1161/CIRCULATIONAHA.109.915165

https://www.nature.com/articles/s42255-024-00984-2.epdf?sharing_token=cu...
..
वृत्तपत्रांनी या विषयाचे घाईने मथळे करायची गरज नाही

Pages