उपासना !..

Submitted by Sujata Siddha on 3 October, 2023 - 07:22

उपासना !..

भाग -१

‘कियारा ‘ला जेव्हा मी पहिल्यांदा पाहिलं तेव्हा माझ्या लक्षात राहिले ते तिचे बदामी आकाराचे , तपकीरी ,टपोरे डोळे , त्याच वेळी वाटून गेलं की ‘ कियारा ‘हे असलं धेडगुजरी नाव ठेवण्या पेक्षा आई-वडिलांनी तिचं नाव हरीणाक्षी , मृगनयनी , आणि अगदी मॉर्डन हवं असेल तर ईशिका असं डोळ्यांवरून ठेवायला काय हरकत होती ? पण मी तिला असं विचारलं की ती मिश्किल हसायची आणि म्हणायची , “नावात काय आहे ? असं शेक्सपिअर म्हणतो “ यावर मी म्हणायचो , “हो कारण तेव्हा त्याने आपली मराठी नावं ऐकली नव्हती ना “ यावर मग ती खळखळून हसायची .
‘कियारा’ श्रीमंत आई-वडिलांचं एकुलतं एक अपत्य त्यामुळे सहाजिकच लाड -प्यारसे पालि बढी, मग अशा मुलींना वाटतं की सगळ्या जगानेच त्यांचे नाझ उठावेत , माझ्याशी तिची ओळख झाली तेव्हा ती याच तोऱ्यात होती , पण मला मुळातच अशा मुलींना भाव द्यायची सवय नव्हती कारण मी पडलो एका गरीब शेतकऱ्याचा मुलगा . म्हणजे माझा बाबा शेतकरी होता म्हणून गरीब होता असं नव्हे ,तो शेतकरी असणं आणि आम्ही गरीब असणं या दोन वेगवेगळ्या गोष्टी होत्या , तसा तो फार महत्वाकांक्षी नव्हता ,पण मला त्याचा अभिमान होता कारण अशिक्षित असला तरी माझ्या बाबाचे विचार खूप पुढारलेले होते , माझ्यावर त्याने कधी कसलीही सक्ती केली नाही, ना माझ्याकडून कधी कसली अपेक्षा केली . घरात शेतीचा व्यवसाय आहे म्हणून शेती कर असे तो कधीही म्हटला नाही , तरी देखील मला स्वतः:ला शेतीत नवीन काही प्रयोग करायचे होते ,शेती वाढवायची होती म्हणून मी स्वखुशीने ऍग्रीकल्चर कॉलेज ला ऍडमिशन घेतली तेव्हा त्याचंच मन आभाळाएवढं झालं . तर सांगायचं म्हणजे ‘कियारा ‘ वैगेरे स्वप्न मला परवडण्यासारखी नव्हती .पण गंम्मत म्हणजे तीची माझी भेटच मुळी फिल्मी पद्धतीने झाली . त्याचं असं झालं की ,माझा शाळामित्र अनय उर्फ अन्या तो मला त्याच्या इंजिनिअरिंग कॉलेजच्या एका फंक्शन ला घेऊन गेला , तिथे त्यांचा फर्स्ट ईयर चा गाण्याचा प्रोग्रॅम चालू होणार होता . गाणं गाणार होते ‘कियारा’ आणि तिचा एक इंग्रजाळलेला मित्र. त्यांच्या नावाची अनाउन्समेंट झाली आणि ते दोघे स्टेजवर गाण्यासाठी येणार , तोच गिटार वाजवणऱ्या त्यांच्या एकुलत्या एक आर्टिस्ट ला ईमर्जन्सी कॉल आल्यामुळे तो दिलगिरी व्यक्त करून तिथून निघून गेला. आता काय ? ते दोघे बिचारे भांबावून गेले ,तेवढयात अन्याला युक्ती सुचली आणि अन्या ने माझ्या गळ्यात गिटार घालून मला स्टेजवर ढकलले , मी गिटार शिकत होतोच , त्यामुळे कसं तरी निभावून नेलं आणि गाण्याला चक्क वन्स मोअर मिळाला . ती दोघं खूप खुश झाली ,मग शो संपल्यावर थँक्स वैगेरे सोपस्कार झाले आणि त्यांनी आम्हाला पार्टी दिली. अशा पद्धतीने ‘कियारा’ मला भेटली. अगदी जादूच्या नगरीतल्या परीसारखी दिसणारी कियारा , तिचं वागणं ,बोलणं, दिसणं असं काही होतं की कोणीही तिला पहाता क्षणीच घायाळ होत असे , आणि तिलाही या अशाच घायाळ नजरांची सवय लागून गेली होती . त्या स्टेज शो नंतर गाण्याच्या निमित्ताने पुन्हा पुन्हा मी अन्या आणि ती असे भेटलो , मागाहून अन्याने मला सांगितले की गाणं हे निमित्त आहे पण खरं तर ती तुझ्यात ईंटरेस्टेड आहे .आयला !.. मी कधी तिच्याकडे त्या दृष्टीने पहिलेच नव्हते , म्हणजे ती मला आवडायची, नाही असं नाही ,पण शो केस मधली बाहुली जशी आवडते तशी . लाईफ पार्टनर वैगेरे खूळ डोक्यात नव्हते , म्हणून त्या दृष्टीने कधी पाहिलंच नाही त्यामुळेच कदाचित तिला मी जास्त आवडायला लागलो . आख्ख कॉलेज जिच्यामागे ती आपल्या मागे . काय सीन असावा राव .. कुठे मी, रोज एकाच पँटवर आलटून पालटून शर्ट घालणारा आणि कुठे ती कॉलेजच्या पहिल्या दिवशीही घातलेला ड्रेस परत रिपीट न करणारी !..
ती माझ्यावर अनुरक्त झालीये हे सगळ्या कॉलेजला माहिती होतं , ती हि ते लपवत नव्हतीच, माझ्याकडून काही प्रपोजल येतंय की याची वाट बघत होती . अखेर मी काही लक्ष देत नाही म्हटल्यावर तिने स्वतः:च प्रपोज केले . मी साफ नाही म्हणूंन टाकलं , नाकापेक्षा मोती जड नको भावा … माझं माझ्या कुटुंबावर जीवापाड प्रेम होतं, माझी माय ,माझ्यावर भाबडेपणाने प्रेम करणारी माझी दोन भावंड , माझा बाबा ,आणि जर आमच्यात कोणाला शिरायचं असलं तर तसंच माणूस पाहिजे ना ? पण ती वेडी माझ्यावर प्रेम करत राहिली , आणि तिचे सगळे मोह घालणारे विभ्रम पाहत असूनही तिच्याशी फक्त मैत्री ठेवायची हा मंत्र मी मनात दिवस रात्र जपत , स्वतः:ला कटाक्षाने तिच्यापासून दूर ठेवत राहिलो .

प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान सुरूवात!
वाचून-- चल चल जयश्री, कुछ भी मत बोल...असं होतंय Wink Wink

किल्ली , आबा. aashu29 , भावना गोवेकर, विवेक नरुटे : मनापासून आभारी आहे , तुमच्या प्रोत्सहानमुळे हुरूप येऊन पुढचे भाग लवकरात लवकर टाकायचा प्रयत्न करते