वाटली डाळ

Submitted by लंपन on 23 September, 2023 - 13:06
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

आज आमच्या बाप्पांचे विसर्जन झाले. त्यासाठी वाटली डाळ असतेच.. आमच्या वाड्यात एक गोडबोले काकू होत्या, त्या मिरची न घालता लाल तिखट वापरून मस्त डाळ बनवत. आमच्याकडे हिरवी मिरची वापरून डाळ बनवली जाई. मी दोन्ही वापरून केली आहे. गणपती बाप्पा मोरया..

चणा डाळ - दोन वाट्या
हिरवी मिरची -२ (कमी तिखट)
काश्मीरी तिखट -२ चमचे
ओल खोबर - ३ ते ४ चमचे
लिंबू -१
तिखट, साखर, मीठ चवीनुसार
फोडणी साठी हळद, मोहरी, जिरे, हिंग आणि बारीक चिरलेला कढिपत्ता.

क्रमवार पाककृती: 

प्रथम चणा डाळ चार ते पाच तास भिजत घालावी. नंतर पाणी निथळून भरड वाटून घ्यावी. आता मिरची वाटून त्यात घालावी. दोन मोठे डाव तेल तापत ठेवावे. त्यात फोडणीच्य्या साहित्याची फोडणी करावी. त्यात काश्मीरी लाल तिखट घालावे. आता त्यात वाटलेली चणा डाळ घालावी. मीठ आणि साखर घालावी. आता चार ते पाच वाफा काढाव्यात. डाळ सुटी होईतोवर वाफवून घ्यायची आहे. गीचका वाटत असेल तर तेल घालावे आणि परत वाफ आणावी.
IMG20230923155602~3.jpg

पूर्ण सुटी झाली की त्यात लिंबू पिळावे. आणि सगळ्यात शेवटी ओले खोबरे घालावे. वाटली डाळ तयार.

वाढणी/प्रमाण: 
प्रसाद आहे
अधिक टिपा: 

लिंबू साखर हवीच. वाफ आणताना गॅस मंद ठेवावा, डाळ खाली लागू शकते. ह्यासाठी तेल जास्तच लागते कारण त्याशिवाय डाळ मोकळी होणार नाही.

माहितीचा स्रोत: 
पारंपरिक
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच! काल वाटली डाळ करताना मी नुसता हरभरा डाळ भरड वाटून घेतली अन् कुकरला वाफवली.. मग फोडणी घालून त्यात ही वाफवलेली डाळ घालून मोकळी होईपर्यंत परतली.. पटकन होते

मस्त दिसतेय डाळ लंपन .
चना वाफवताना पाणी घातलं की नाही ?
माझ्या लहानपणी आई खूपच वेळा मधल्या वेळी खायला करत असे ही डाळ. तेव्हा पाट्यावर वाटावी लागे डाळ. त्यामुळे वाटली डाळ हा तसा मेहनत लागणारा पदार्थ होता.
मला लहानपणी कधी आवडली नाही, मी विशेष करत ही नाही पण आता एकदा करून पाहिली पाहिजे. आता आवडेल असं वाटतंय.

चना वाफवताना पाणी घातलं की नाही ? >> कुकरमध्ये खाली पाणी घालून एका भांड्यात ती भरड घातली अन् झाकण लावलं .. कुकरचा चार शिटट्या झाल्यावर गॅस बंद केला.. कुकर थंड झाल्यावर भांड बाहेर काढून डाळ मोकळी करून घेतली

आमच्याकडे गणपती विसर्जनाला मोकळि डाळ असते..मी मायक्रोव्हेह मधे करते, झटपट कमी तेलात आणी छान मोकळी डाळ होते..
फोटो छान आलाय.

रेसिपी पर्फेक्ट आहे. तेल जास्तच हवं आणि बराच वेळ परतावं लागतं. मी तिखट घालूनच करते पण कैरी शिवाय केली नाही कधी. अशीही करून बघेन.

कुकरमध्ये खाली पाणी घालून एका भांड्यात ती भरड घातली अन् झाकण लावलं .. कुकरचा चार शिटट्या झाल्यावर गॅस बंद केला.. कुकर थंड झाल्यावर भांड बाहेर काढून डाळ मोकळी करून घेतली>> थँक्यु चना

मी प्राजक्तासारखी मावेत करते. कुकरमध्ये करून बघेन. कढईमध्येही करते पण हल्ली जास्त मा वे त करते, थोडी मुगडाळही घालते चणाडाळ भिजवते तेव्हा.

लोकहो खूप धन्यवाद. चना आणि प्राजक्ता तुमच्या पद्धतीने करून पाहीन. ममोजि पाटा वरवंटा खूपच कष्टाचे काम. माझी आजी इडली पिठ पण करत असे आणि वाटीत इडल्या बनवत असे ते आठवलं. Happy अस्मिता कैरी नाही घालत इकडे. Samo ही स्पर्धेची रेसिपी नाही.

छान पाकृ.
आमच्याकडेही परवा विसर्जनादिवशी केलेली मी वाटली डाळ. मी कुकरमध्ये 3 शिट्ट्या काढून करते. हात अडकून पडत नाही. झब्बू देऊ का इथे Wink
ही परवाच्या नैवेद्याची

Screenshot_20230927-182538_Gallery.jpg