उपवासाची बटाट्याची भाजी

Submitted by योकु on 3 September, 2023 - 03:56
उपवासाची बटाट्याची भाजी
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

काल परवा अशीच कुणाकडे कुठेतरी ही नेहमी होणारी बटाट्याची उपवासाची भाजी खाल्ली… रीड-गिळली. मग तदनुषंगाने इथे सर्चली पण जुन्या माबोवरली ही एकच रेस्पी दिसली.
आज मैने मेरे हाथोंसे ये बायडी के लिये बनाई और हमरे पास आज फटू भी है…
तर जिन्नस -
सात ते आठ मध्यम आकाराचे बटाटे
चमचाभर जिरे
चवीनुसार मीठ
अर्धा चमचा साखर
अर्धे लिंबू
तीन हिरव्या मिरच्यांचे मोठे तुकडे
पाव ते अर्धा चमचा लाल तिखट
तीन - चार टेबलस्पून शेंगदाणा तेल
सहा ते सात चमचे खमंग भाजलेल्या शेंगदाण्याचे जरा भरड - दाणेदार कूट

क्रमवार पाककृती: 

उपासाच्या पदार्थांची चव ही दाण्यांच्या कूटावर मोस्टली अवलंबून आहे. मुळात दाणे मंद आचेवर खमंग आणि शक्यतो लोखंडी कढइत भाजले तर हे सहज साधते. तर असं कूट एकदाच डबाभर करून ठेवले जरा वेळ काढून तर पुढले प्रकार मस्तच होतात.
या रेसपीकरता बटाटे नव्वद टक्के (च) उकडायला हवेत. तर पुढे फोडणीत पडल्यावर फोडींना भुगा न होता खरपूस व्हायची संधी मिळते.
बटाटे उकडून सोलून तासभर फ्रीजात ठेवले तर अजूनच छान.
तर या फोडी करून तयार ठेवाव्यात.
लोखंडी कढई सणकून तापली की तेल घालून जिऱ्यामिरचीची फोडणी करावी आणि बटाटे त्यात घालून चांगले परतावे. जरा खरपूस झाले की मीठ साखर आणि तिखट घालून अजून एक दोनदा परतून झाकण घालावे.
जरा वाफरल्यावर दाण्याचे कूट घालून नीट मिसळून मंद आचेवर झाकण घालून पूर्ण शिजेस्तो अधून मधून भाजी हलवावी.
बटाटे जरा खरपूस दिसायला लागतात दाण्याच्या कुटांचही तेल सुटतं असं दिसलं की भाजी तयार आहे.
गरमागरमच खायाला घ्यावी. वरून जरा लिंबू पिळले तर चव अजूनच खुलते.

वाढणी/प्रमाण: 
उपासाचे पदार्थ आहेत!
माहितीचा स्रोत: 
नेहमी केल्या जाणारा प्रकार aahe
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भयंकर आवडती भाजी आहे. वरीचे तांदूळ (भगर), दाण्याची आमटी, है भाजी आणि खोबर्‍याची चटणी मस्ट आहे उपासाला.

आमच्याकडेही थोड्याफार फरकाने अशीच भाजी केली जाते.तुपाच्या फोडणीवर हि.मी,उकडलेल्या बटाट्याच्या फोडी,साखर,मीठ आणि ओले खोबरे.

माझी पण फार फेवरिट भाजी. पण मी साजुक तुपाची फोडणी करते. जिरे एकदम मस्त तळले गेले पाहिजेत. भाजी झाल्यावर काढून घेउन त्याच कढईत दाण्याची आमटी करते. आधी वर्‍याचे तांदूळ शिजवून घेते. दहा मिनिटात शिजतात. ही डिश वर सायोने लिहिले आहे तशी वर्ल्ड बेस्ट काँबिनेशन मध्ये सर्व्ह होते. फुल मेन्यु फाइव स्टार टाइप सर्व्ह करता येतो. वर्‍याच्या तांदुळाची मूद प्लेटीच्या मध्ये ठेवते वरुन ही खरपूस भाजी. व मग सॉस सारखी दाण्याची आमटी. वरुन फ्रेश कोथिंबीर. साइडला दही काकडी कोशिंबीर. आनंदी आनंद गडे.

अशीच काचर्‍यांची पण करते.

यम्मी.
हल्ली फार होत नाही.पण ही भाजी आवडते.

एक इस्लाह !
मी साजूक तुपात करतो, फक्त जिर्‍याची फोडणी. ही भाजी मस्त जमली तर मन आषाधी एकादशीकडे जाते व आपसूकच कानावर अभंग पडल्याचा भास होतो.

छान, फक्त जिरे फोडणी साठी तूप मस्ट Happy बाकी अशीच करते. वर देवकी ताई ne सांगितल्याप्रमाणे ओले खोबरे घालून बघेन.

मस्त रेसिपी. मी पण तेलावरच करते. कधी तरी किंचित आलं ही घालते किसून.

आमच्याकडे ही फार आवडते , वरी भात, ही भाजी आणि दाण्याची आमटी हे तर आवडतच पण मी कधी कधी साखि मध्ये बटाटे न घालता सा खि बरोबर खायला ही करते अशी भाजी . सा खिचडी, ही भाजी , खंमग काकडी, दह्याची वाटी, रताळ्याचे गोड काप हा मेन्यू ही आवडतो बिन उपासाच्या दिवशी.

मस्तच लागते. उपवासाचे सर्वच प्रकार चविष्ट असतात.

मी ही तेलाची फोडणी करते. फोडणीत लाल सुकी मिरची आणि कढिपत्ता देखिल घालते. हिरव्या मिरच्या आणि दाणे मिक्सरमधून एकत्र भरड वाटून टाकते.

आता अशी करून पाहिन.

आम्ही तिखट घालत नाही व तूपाच्या फोडणीत कुटाऐवजी भिजलेले शेंगदाणे मिठ घालून उकडून भाजीत घालतो.

सायो, हेमाताई आणि अमांच्या पोस्टला मम.
अशी साजुक तुपात परतलेली भाजी, काकडीची दही-मीठ-साखर-जरासं कूट घालून कोशिंबीर, ओलं खोबरं-कोथिंबीर चटणी, वरीतांदूळ-आमटी हे एकदम भारी काम असतं.

(घरीच केलेल्या उपासाच्या भाजणीची थालिपिठं विथ लोणी आणि ताकसुद्धा असेल तर नंतर १-२ तास तरी झोप मस्ट असते हेपण नोंदवून ठेवते Proud )

माझी प्रचंड आवडती भाजी. लेकीला पण आवडते. कधीकधी बटाटे चवीला उग्र असतात. मग फसते. गोडसर आणि चांगले शिजणारे बटाटे हवे.

मलाही खूपच आवडते ही भाजी ! अगदी साधी सोपी आहे. माझ्या लेकालाही आवडते, त्यामुळे फक्त उपासाच्या वेळीच नाही तर एरवी पण अधून मधून करते.