आपला गाव - तेव्हां आणि आत्ता !

Submitted by रघू आचार्य on 3 September, 2023 - 00:39

ज्या गावात बालपण, तरूणपणाचा जास्तीत जास्त काळ गेला, त्याच्याशी खास आठवणी निगडीत असतात. काही कारणाने गाव सोडून जावे लागले तरी त्या गावाचे आपल्या जीवनातील स्थान कधीच ढळत नाही. अशी खास गावे जन्मगाव किंवा भावकी / गावकी असलेलीच असतील असे नाही. आमचे गाव दुष्काळी असल्याने मागच्या कुठल्यातरी पिढीत जवळच्या पाण्याशेजारी गावच्या गाव स्थलांतरीत झाले. पुढे शहरातल्या संधी बघून दोन तीन पिढ्यांच्या मागे आम्ही पुण्यात येऊन स्थायिक झालो. पुण्यातही आधी रामवाडीच्या पुढे, मग थोडे सरकत कल्याणीनगर आणि आता मध्यवर्ती ठिकाण ते नवे वास्तव्य वारजेच्या अलिकडे.

या काळात पुण्यातली ही ठिकाणे कशी बदलली हे पाहिले. विशेषतः रामवाडी, नगर रस्ता हा पुण्याचा मागास भाग समजला जायचा. आम्ही ज्यांच्या घरात भाड्याने रहायचो, त्या पाटलांनी त्यांच्या मुलाला शिकवून मार्गाला लावल्याबद्दल त्या काळात २० गुंठे जमीन वडलांना देऊ केली होती. वडलांनी ती घेतली नाही. खरे सांगायचे तर त्या जमिनीला आज जे मोल आहे ते येईल याची ब्रह्मदेवालाही कल्पना नव्हती.

आज कल्याणीनगर, खराडी, विमाननगर, वडगाव शेरी ते रामवाडी हा संपूर्ण परीसर कोरेगाव पार्कशी स्पर्धा करतो. हा आर्थिक बदल.

सामाजिक बदल म्हणजे शांत वातावरण होतं. एकमेकांकडे गप्पा व्हायच्या. शाळा कुठली, शाळा प्रवेश, कॉलेज अ‍ॅडमिशन हे टेण्शनचे विषय नव्हते. त्या पिढ्यांना आजचे ताण नव्हते.

सुविधा कमी होत्या, मेडीकल साठी ससून वर अवलंबून होते लोक. मनपाच्या दवाखान्यत लोक जायचे. आता जायला कचरतात.
रस्ते मोकळे होते, खासगी वाहने जास्त नव्हती. अंतरं कमी होती.
सायकलींचे प्रमाण जास्त होते.

मनोरंजनाच्या सुविधा कमी होत्या. नाटक आणि सिनेमा हेच मुख्य होते.
गुंजन / चित्रा / अलंकार या थिएटरला सिनेमे पाहिले जायचे. ब्लॅक मुळे तिकीटं न मिळाल्याने अमिताभचे सिनेमे बघायला मिळायचे नाहीत. अगदी री - रन ला आलेल्या सिनेमांना सुद्धा तिकीट नसायचं.

जंजीर हा दहावर्षांनी आला होता तेव्हां काका दाखवायला घेऊन गेला होता. १२, ३, ६ अशा तीनही शो ला तिकीट न मिळाल्याने जंजीर बघायचा राहून गेला. तो नंतर स्वतः सिनेमे पहायला सुरूवात केल्यावर अलंकारला मॅटिनीला पाहिला. रोटी, कपडा और मकान आणि मुगल ए आजम हे सिनेमे खूप वर्षांनी येऊनही काळाबाजारवाल्यांच्या नाकावर टिच्चुन तिकीट मिळवून पाहिल्याने लक्षात आहेत.

शोले आलेला माहिती नव्हता. तो बारामतीला काही वर्षांनी दुर्गा टॉकीजला पाहिला तेव्हां फक्त ओम पिसिंग हा डायलॉग, गब्बरचा बेल्ट एव्हढेच लक्षात राहिलेले. पुढे इंजिनियरींगला हॉस्टेलला मॅथ्सच्या पेपरला दोघे जण शोले बघून आले. तेव्हां एक जण म्हणाला कि "एक्झॅमचा स्ट्रेस घालवायचा होता, आणि शोले पाहिला नव्हता म्हणुन गेलेलो". त्यावर एक सीनियर म्हणाला " शोले अजून पाहिलेला नाही हे सांगायला लाज वाटत नाही का ? किती वेळा पाहिला एव्हढेच विचारायचे असते" हे ऐकून लहान असताना पाहिलाय त्यानंतर आजवर पाहिला नाही हे सांगायची हिमत झाली नाही. पेपर संपल्यावर गुपचूप बघून आलो. एखाद्याने स्टोरी विचारली तर ?

आत्ता डॉन बॉस्को स्कूल आहे त्याच्या शेजारी फुटबॉल आणि क्रिकेटच्या टूर्नामेंट भरत.
रात्री मित्रांसोबत सायकलवर येऊन कोंडाळे करून शेकोटी शेकत रस्त्यावरुन जाणार्या गाड्या मोजणे हा एक टीपी होता. आता गाड्यांनी भरलेला रस्ता बघवत नाही.

अशा असंख्य आठवणी आहेत. झालेले बदल कधी कधी सुखद वाटतात, कधी नकोसे वाटतात.
हळव्या आठवणींच्या जागा नाहीशा झाल्या आहेत.

पुण्या मुंबईतल्या बदलांवर भरपूर वाचायला मिळते.
पण इतर मध्यम शहरं, तालुक्याची गावं, खेडेगाव याबद्दल कमी वाचायला मिळतं.

तुमच्या गावाबद्दल सांगण्यासारख्या अशा आठवणी आहेत का ?
तेव्हा आणि आत्ता असे बदल जाणवतात का ?

असेल तर येऊ द्या.

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चांगला विषय.
माझा जन्म शहरातला असल्यामुळे अशा आठवणींना मुकलो आहे !

छान धागा !

कोकणातले आमचे गाव काही फार बदलले नाही.
शौचालयाला वहाळावर जायची मजा तेवढी गेली.
बाकी हिरवळ आजही तशीच आहे.

मुंबईतले माझे गाव माझगाव मात्र बरेच बदलले आणि बदलत आहे... आता चाळ सुद्धा न राहिल्याने जीवनशैली देखील बदलली आहे. पण तरीही सणवार आले की तिथे जावेसे वाटतेच. कारण ओळखीची माणसे आजही बरीच तीच आहेत.

माझा जन्म आणि शिक्षण सांगलीत झाले, पण नोकरी आणि शिक्षणासाठी, आधी मुंबई, पुणे, गोवा, रूर्की हरिद्वार इथे वास्तव्य झाले. 90 सली सांगली सोडल्यावर परत 2004 आली आलो. 87 sali जिल्हा परिषदे पासून वालचंद कॉलेजला सायकलवरून जायचो. पूर्ण वडाच्या झाडांची दुतर्फा सावली होती आणि सांगली मिरज हा एकच रस्ता होता, निवांत, थंडगार. बसची जोडगाडी असायची. सांगली मिरज जुन्या रेल्वे रुळाचे अवशेष आणि ट्रॅक होता.

आता सांगली मिरज तिहेरी रस्ता झालाय, पण झाडे कमी झाली आणि गर्दी जास्त झालीय.
वालचंद चा 105 एकर परिसर म्हंजे साप, ससे, मोर यांनी भरलेला होता, आता तेही कमी झालेत.
तरुणांची गुंडगिरी वाढलीय. महिन्यात एखाद्या खुनाची बातमी अगदीच कॉमन झालीत.
पेंशनर लोकांचे गाव आता राहिलेले नाही सांगली म्हंजे.
सांगली आणि मिरज अंतर आठ किमी आहे, वालचंद नंतर वानलेस दवाखण्यापर्यंत पूर्ण शेती होती, आता आजिबात मोकळी जागा नाही
रहाता प्लॉट आजीने 25 पैसे प्रति चौरस फूट दराने 52 सालि घेतला होता, सध्या 3000 ते 3500 दर चालू आहे.

छान लेख.
मी आठ वर्षं झाली पुणे बघून.. आता कधी गेले तर बापरे किती बदललंय सगळं असं होईल बहुतेक..

आता सांगली मिरज तिहेरी रस्ता झालाय, पण झाडे कमी झाली आणि गर्दी जास्त झालीय.>>> माझा आवडता रस्ता. तसा मला मिरज पंढरपूर पण आवडतो, पण फक्त डी-मार्ट पर्यंत त्याच्यापुढे अनुभव चांगला नाही, खास करून फॅमिली सोबत असेल तर. भकास आणि अमानवीय शक्तींनी भरलाय तो रस्ता. एकट्याला मात्र कधी काही वाटलं नाही. लॉक डाऊन मध्ये संध्याकाळी मी त्या रस्त्यावर जायचो आणि मावळत्या सुर्यासोबत गप्पा मारायचो. तो सूर्य पण वाट बघत असायचा. गप्पा मारल्यावर मावळायचा Happy . असो तर मिरज- सांगली रस्त्यावर मी खूप फिरलो बायको मुलीसोबत. बायकोच्या फसिनोवर दर दोन दिवसांनी सांगलीला फेरी असायची. वालचंद कॉलेजच्या पुढे मागे मैदान आहे तिथे दर दोन चार महिन्यांनी सर्कस, प्रदर्शने लागलेली असतात तिथे एक फेरी व्हायची. नंतर पुढे स्कुपर शेकर मध्ये मस्तानी पिऊन सांगलीत हरमन जवळ एक कॉफी प्यायचो नंतर a2 मुक्ता ला वळसा मारून काळी खण तलावाजवळ 5 मिनिटे थांबायचं. तिथे मुलीने पाण्यात मनसोक्त दगड मारल्यावर परत रमत गमत मिरज गाठायच. येताना चिकन 65 घेऊन यायचं. कधीतरी सुट्टी असेल तर नरसोबाची वाडी गाठायची आणि दोन तीन प्रकारच्या बासुंदी ट्राय करायच्या. अवदुंबर, महालक्ष्मी कुठे कुठे फिरलो. मजा आली त्या 2-3 वर्षात.

गेले कुठे ?? त्यांनी प्रतिरूप समस्त सांगली मिरजकरांच्या रक्षणार्थ एका पिंपळाच्या ढोलीत गुप्तरुपात कार्यरत ठेवलेले आहे. हे गुपित असल्याने फक्त तुम्हाला म्हणून सांगतो. बाकी कोणाला कळू देऊ नका. एवढं करुनसुद्धा त्रास वाढला असेल तर त्या प्रतिरुपाची बॅटरी रिचार्ज करायला पौर्णिमेच्या चंद्रप्रकाशात ८ प्रहर ठेवली की पुढचा महिनाभर चिंता मिटेल.

>>>>>>>आम्ही ज्यांच्या घरात भाड्याने रहायचो, त्या पाटलांनी त्यांच्या मुलाला शिकवून मार्गाला लावल्याबद्दल त्या काळात २० गुंठे जमीन वडलांना देऊ केली होती. वडलांनी ती घेतली नाही.
दोघेही थोर!! खूप छान आठवण.

Submitted by सामो on 5 September, 2023 - 17:07 >> धन्यवाद.

वडलांबद्दल पूर्ण आदर आहेच, तरीही त्यांच्या अशा भावनिक ( किंवा उसूल वाल्या) निर्णयांना आम्ही दोघे भाऊ कधी कधी खूप हसतो. नको तिथे स्वाभिमान ! आज त्या जागेत गुंठ्याचा भाव अर्धा करोड आहे.

अग्रीड. पण अशी काही मोठी भेट नाकारायला किती निस्पृहता, निरपेक्षता लागत असेल. आय कान्ट इव्हन इमॅजिन. >>> खूप घटना आहेत अशा जमिनी दिल्याच्या. त्या वेळी जमिनीला मोल नव्हते. येण्याची शक्यता दिसत नव्हती. जमीन सुद्धा भरपूर असायची. माझ्या एका बंगाली मित्राला पोलादपूर इथं एका शेतकर्‍याने दहा एकर जमीन दिली. त्याने एव्हढेच केलं कि महाबळेश्वरवरून उतरताना त्या शेतकर्‍याला कार मधे लिफ्ट दिली. रस्त्यात खाऊ घातलं , चहा पाजला आणि ताप असल्याने औषधोपचार केले.

आमचा आजा सुद्धा असाच. गावची ४० एकर जमीन हक्कसोडपत्र देऊन भावाला दिली. कारण यांना शहरात काम मिळालं होतं. आज त्या चुलतआजाच्या पोरांची चांदी झालीय.

त्याचं वाईट वाटत नाही. पण या लोकांच्या निर्णय घेण्याच्या पद्धतीचं हसायला येतं.

रघु आचार्य आदर वाटला तुमच्या वडलांबद्दल, योग्य निर्णय.

असंच माझ्या आजोबांनी आजी एकुलती एक असून सासऱ्यांची परळची जागा नाकारली, भले ती भाड्याची होती पण मुंबईतली, बडोद्यात ते शेवटपर्यंत स्वतःची जागा घेऊ शकले नाहीत पण ते समाधानी होते.

आम्ही कौलारू चाळीत रहायचो म्हणून आईच्या एका काकांना जरा वाईट वाटायचं, ते ठाण्यातील श्रीरंग सोसायटीतला त्यांचा रिकामा फ्लॅट बाबांना नावावर करून देत होते पण बाबांनी घेतला नाही. बाबाही शेवटपर्यंत स्वतःची जागा घेऊ शकले नाहीत पण माझ्या भावामुळे आई बाबांना नंतर फ्लॅटमध्ये आणि एकंदरीत सुरळीत आयुष्य जगता आलं.

तुमच्या आजोबांनी मात्र स्वतःच्या जमिनीचे हक्कसोड द्यायला नको होतं, ते जरा पटलं नाही पण तुमच्या वडिलांचा निर्णय पटला.